shabd-logo

अंधश्रद्धेशी गाठ

25 September 2024

3 पाहिले 3

श्रद्धा आणि भारत यांच एक गाढ नातं आहे. जगातली सर्वात पुरातन धर्म संस्कृति असलेल्या आपल्या भारताची जवळ जवळ सर्व गोष्टींवर श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेने मागील पाच हजार वर्षामध्ये कधी अंधश्रद्धेचे रूप घेतलेआणि ती कधी आपल्या रक्तात मुरली हे मात्र या श्रद्धावानाना आजतागायत कळले नाही. आता बघायला गेलं तर अंधश्रद्धा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आढळून येते. फक्त काहीजण उघड उघड तिला आपलं करतात तर काही जण विज्ञानाच्या पडद्याआड तिला झाकू पाहतात. पण ती आहे सगळीकडे हे मात्र खरं. जेव्हा समाज उन्नतीच्या चळवळी चालू झाल्या तेव्हा लोकांना समाजामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन प्रकार पडतात हे नक्कीच माहीत नसणार. परंतु आजही समाजात लोकांना श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक कळत नाही, किंवा कळत असला तरी तो वळत नाही. तर आज आपण अंधश्रद्धा काय, कशी, कुठे आणि कोणामुळे निर्माण होते व पसरते ते बघूया.

अंधश्रद्धा म्हणजे काय?

अंधश्रद्धा म्हणजे अश्या श्रद्धा ठेवणे किंवा प्रथा पाळणे ज्यांना कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक पाठपुरावा नाही. किंवा त्यांना मान्य करण्यामागचे कारण मुख्यतः अनैसर्गिक/काल्पनिक असते. यामध्ये काही अंधश्रद्धा दुसऱ्या व्यक्तीचे किंवा आजूबाजूच्या समाजाचे नुकसान करीत नाहीत फक्त बंधने घालतो जसे कि, काळे मांजर आडवे गेल्याने पुढचा प्रवास न करणे, रात्री नखे न कापणे, पौर्णिमा-अमावस्येला रात्री घराबाहेर न पडणे, मासिक पाळी असताना घरात बाजूला ठेवणे वगैरे वगैरे.तर काही अंधश्रद्धांमुळे मात्र समाजाला खूप भयानक संकटांना सामोरे जावे लागते. जसे कि, अघोरी प्रथा, नर बळी, सती जाणे,वगैरे वगैरे. या अंधश्रद्धांमुळे मानव समाजाला जास्त प्रमाणावर नुकसान झालेले दिसते.

अंधश्रद्धा कश्या,कुठे आणि कोणामुळे निर्माण  होतात?

जगाचा इतिहास पहिला तर समाज सुधारणा चळवळी होण्यापूर्वी जगातील जवळ जवळ सर्वच देशांमध्ये धर्माचा  प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. आणि सत्तेची हाव हि नेहमीच धोक्याची घंटा वाजवत असते. आणि हेच झाल जगातल्या बऱ्याच महासत्तांच्या बाबतीत. मुख्यतः युरोपियन देशांवर पोप किंवा धर्मगुरूंचे राज्य होते. त्यामुळे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी  ते धर्मामध्ये बदल करू लागले व ते पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या कहाण्या बनवू लागले. शिक्षण व वैज्ञानिक ज्ञानाचा अभाव यामुळे समाजात धर्मगुरू बोलेल तीच पूर्व दिशा ठरत होती. व  यामुळे युरोपियन देशांमध्ये श्रद्धेसोबतच अंधश्रद्धेचे वारेही मोठ्या जोमाने वाहू लागले.

भारतीय समाजात धर्माला नेहेमीच श्रेष्ठ स्थान दिले गेलेले आहे.विविध धार्मिक लोकांच्या विविध मान्यता व प्रथा पिढ्यानपिढ्या समाजात वावरताना आजही दिसून येतात. या मान्यता, प्रथा यांबद्दलचे साहित्य हे बहुतांश पणे लिखित किंवा  मौखिक स्वरूपात समाजापुढे आले.  ऐतिहासिक काळात विविध धार्मिक धर्मगुरूहे ज्ञानी विद्वान समजले जात असत. त्यामुळे या साहित्याची रचना मोठ्या प्रमाणावर धर्मगुरूंमार्फत झाली.  व आजही त्या साहित्याचा फार काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. परंतु आपण एक लक्षात घ्यायला विसरतो आहोत कि पौराणिक काळ असो किंवा आधुनिक काळ असो धार्मिक बाबींवर आधीपासून एका ठराविक अश्या वर्गाचे वर्चस्व आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान होते तसेच त्यांनी संपत्ती व सत्ता यांचे ऐश्वर्य उपभोगले होते. युरोपियन देशांतील धार्मिक राजवटीप्रमाणे उन्मत्त नसले तरी भारतीय धार्मिक पंडित यांनीही समाजातील आपले महत्व कायम ठेवण्यासाठी धार्मिक साहित्यात फेरफार केलेले आढळतात.

समाजात निर्माण झालेल्या सर्वच अंधश्रद्धा ह्या स्वार्थासाठी बनल्या असे आपण म्हणू शकत नाही.अनेकदा समाजातील विविध घटकांचा विचार करून नवीन रीती काढल्या जात, परंतु त्या सर्वानी मान्य कराव्या  म्हणून  त्याला धर्माचे गालबोट लावले जाई.

या प्रथांमध्ये काही अंधश्रद्धा ह्या समाजाला हानी करणाऱ्या आहेत तर काही समाजाची हानी करत नाहीत.

* समाजाला हानी न करणाऱ्या प्रथा किंवा श्रद्धा

काळे मांजर आडवे जाणे -   भारतात मुख्यतः हिंदू धर्मीयांमध्ये रस्त्याने जात असता काळे मांजर आडवे जाणे हे अपशकुन मानले जाते.  यामुळे आपली कामे होत नाहीत किंवा अपघाताला सामोरे जावे लागते असे समज आहेत.  परंतु आजकाल काळे मांजर घरात पाळलेे जाते. व या मान्यतेला कोणत्याही प्रकारचे तार्किक पाठबळ नाही. फक्त यांमुळे या अंधश्रद्धा पाळणाऱ्या  वर्गाची कामे वेळेत पूर्ण होत नसतील मात्र यामागे मांजराचा काही दोष नाही.

रात्री नखे न कापणे -  ऐतिहासिक काळात दिवा बत्तीची सोया नसल्याने माणसाचा रहाट गाडा दिवस मावळताच थांबत असे.  त्यामुळे माणूस आपली छोटी  मोठी कामे दिवसाच करून घेत होता. त्यामुळे नखे कापणे यासारखे नाजूक कामदेखील दिवसाचं केले जाई.तेव्हापासून रात्री नखे न कापण्याची प्रथा चालू झाली. यामागे कोणत्याही प्रकारचे वैज्ञानिक कारण नसून आज  अनेकजण दिवसाच्या धावपळीतून स्वतःची रोजची कामे करण्यासाठी रात्रीचाच वेळ काढतात.

उपवास करणे  -  विविध धर्मांमध्ये विविध सण व प्रथांमुळे उपवास केले जातात.  इस्लाम धार्मिक रमजान पाळतात, ख्रिश्चियन लेन्ट पाळतात तर  हिंदू धार्मिक श्रावण पाळतात. या उपवासांमध्ये आहार व  पाणी त्याज्य केले जाते तर काहीवेळा थोड्याप्रमाणात आहार ग्रहण केला जातो. व आपला पूर्ण वेळ ईश्वर प्रार्थनेत व्यतीत केला जातो.ज्याने ईश्वर प्राप्ती होते  अशी मान्यता आहे. परंतु उपसांसाठी वैज्ञानिक कारण आहे,रोजचे समृद्ध आहार यांमुळे शरीरावर टॅन पडतो.  यातून शरीर शुद्धीला मदत होते. उपवासाने ईश्वर प्राप्ती होते कि नाही हे जरी स्पष्ट नसले तरी त्यातून निरोगी आरोग्य मात्र नक्कीचप्राप्त होते.

मासिक पाळीत स्त्रियांना दूर ठेवणे -  अनेक भारतीय धर्मांत मासिक पाळी दरम्यान स्त्रिया ह्या अशुद्ध मानल्या जातात. त्यांना स्वयंपाकघर, देवघर, पाण्याचे साठे, मंदिरे, यांपासून दूर ठेवले जाते.  त्यांच्या हात लावण्याने किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास ह्या गोष्टी अशुद्ध होतात किंवा बाटल्या जातात. अशी मान्यता आहे.  परंतु हि केवळ अंधश्रद्धा आहे. पूर्वी स्त्रियांना संपूर्ण घराचे काम करावे लागत असे, व मासिक पाळीच्या काळात स्त्रिया ह्या नाजूक असतात. त्यांना कामाचा अधिक भर पडू नये व त्यांना आराम मिळावा हा ह्यामागचा हेतू असावा.कारण पुरुषप्रधान मानसिकता फक्त धर्माच्या भीतीनेच झुकत होती.

* समाजाला हानी करणाऱ्या अंधश्रद्धा

पुरातन काळात नर बळी, जादूटोणा, सती,पशु बळी अश्या विविध अमानुष व अघोरी प्रथा भारतीय समाजात होत्या. यामध्ये काळा जादू,  जादूटोणा या प्रथा अजूनही काही भागांमध्ये आढळून येतात.  या प्रथांमागे कोणत्याही प्रकारचे तार्किक कारण आढळुन येत नाही.  फक्त वृद्ध किंवा अशिक्षितच यावर विश्वास ठेवतात असे नाही तर यामध्ये शिक्षित तरुण पिढी देखील तेवढीच अडकून पडली आहे.

आपल्या समस्यांना आपल्या बुद्धीने उत्तर मिळाले नाही तर त्यामागे कोणत्यातरी अनैसर्गिक शक्तीचा हात  असतो अशी बऱ्याजणांची समज असते.  परंतु आपल्या उडी पेक्षाहि मोठं जग आहे व तेवढ्याच मोठ्या शक्यता असतात.  हे समजून घेतले तर जगण खरंच सरळ होईल.

रसिका कवळे ची आणखी पुस्तके

एक पुस्तक वाचा