shabd-logo

माझी शाळा

31 August 2024

5 पाहिले 5

माझी शाळा आणि तेथील आठवणी माझ्या मनावर इतक्या खोलवर रुजल्या गेल्या आहेत की... आजही मला शाळेची आठवण येते. आणि मग आठवण आली की मन कितीतरी वेळ त्या आठवणीत रमतं..... शाळेचे ते दिवस.. आणि आम्ही केलेली धमाल ..हे सगळंकाही मी आज तुम्हाला सांगणार आहे. इतका सुंदर विषय दिल्याबद्दल प्रतिलिपीचे मनापासून आभार.

माझं गावं काही खेडेगाव नव्हतं. तालुक्याचं ठिकाण होतं, माझ्या गावाचं नावं "वरोरा", चंद्रपूर जिल्हयातील नामांकित तालुक्याचं ठिकाण, हे गावं प्रसिध्द आहे ते, “बाबा आमटे" यांच्या "आनंदवन" मुळे. माझं पदवी पर्यंतच शिक्षणही बाबा आमटे यांच्या आनंदवनातील "आनंद निकेतन महाविद्यालय" इथेच झालं.
माझ्या गावातच घरापासून जरादूर अंतरापर्यंत खूप चांगल्या आणि नावजलेल्या शाळा होत्या. पहिल्या वर्गात मला घराजवळच्याच लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेत टाकण्यात आलं होतं. शाळा जरी घराजवळ होती तरी मला शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा, मला आत्ताही आठवते मला जेव्हा पहिल्या वर्गात टाकलं होतं तेव्हा मी शाळेत जातच नव्हतो, मस्त रडायचो, भोकाड पसरायचो, मग मला मारुन मारुन शाळेत पाठवायचे, माझे बाबा मला घरापासून ओढत शाळेत न्यायचे, रस्त्यात मी जोराजोरात रडायचो, मारही तितकाच पडायचा, आणि शाळेत गेल्यावर मी बरेचदा शाळेतून पळूनही यायचो, त्यामुळे घरी पुन्हा मार मिळायचा. मग दुसरीत गेल्यावर नियमित शाळेत जायला लागलो.

दुसरीतली गोष्ट आहे आमच्या शाळेत डॉक्टर आले होते, खरं तर ते आम्हा विद्यार्थ्यांना लस लावायला आले होते, पण हे मला उशीरा कळलं, मला इन्जेक्शनची प्रचंड भिती वाटायची. दवाखान्यात गेलो की डॉक्टरला बघूनच मी भोकाड पसरायचो. पण आता कसं करणार... इंजेक्शन घ्यावचं लागणार होतं, आम्हा सगळया विद्यार्थ्यांना लाईनमध्ये उभं करण्यांत आलं आणि माझी धडधड सुरु झाली..खरं तर मला रडायला येत होतं, पण शाळेत कसं रडणार... हळू हळू माझा नंबर जवळ येत होता, तसा मी अधीकच घाबरायला लागलो होतो. आता माझ्यासमोर चारपाचच विद्यार्थी राहले होते, आणि माझ्या मनात अचानक काय आलं कुणास ठाऊक मी सरळ तिथून पळ काढला दप्तर उचललं आणि शाळेच्या खिडकीतून उडी मारुन पसार झालो. घरी आलो आणि बर नाही नाही म्हणून पांघरुन झोपलो, तो सायंकाळी उठलो. त्यांनतर तीन-चार दिवस शाळेचं तोंड बघीतलं नाही ते वेगळचं.

शाळेच्या बाजुला एक खाऊ विकणारा बसायचा, त्याच्याकडे गोळया, बिस्कीट चकली इ. विकायला असायचे, पण त्याच्याकडला एक खाऊ मला प्रचंड आवडायचा तो म्हणजे "मसाला आलु" (बटाटे )उकडलेल्या बटाटयांना तिखट मिठ लावलेले असायचे ते मला खूप आवडायचे... आणि ते खायचा मोह मला टाळता यायचा नाही.

कसं तरी चौथीपर्यंत चे शिक्षण त्याच शाळेत आटोपलं. पण चौथीपर्यंत अभ्यासात अगदी हुशार झालो होतो, चौथ्या वर्गात दुसरा नंबर मारला होता, त्यामुळे घरचे पण खुष होते.

त्यानंतर मला पाचव्या वर्गात कुठल्या शाळेत घालायच याविषयी घरी चर्चा सुरु झाली. मला वाटतं होतं की घरापासून थोडया दूर अंतरावर असलेली "हिरालाल लोया विद्यालय" इथेच मला पाचव्या वर्गात टाकतील.. पण घडलं भलतच.

माझे आजोबा ज्या शाळेत शिकले होते, त्याच शाळेत माझे वडीलही शिकले होते, ती शाळा म्हणजे नागपूर-चंद्रपूर रोडवरील "नेताजी हायस्कूल", ही शाळा माझ्या घरापासून ४ ते ५ किलोमिटर अंतरावर होती. त्यावेळी माझ्याकडे शाळेत जायला सायकल वैगरे काही नव्हती. तरीही माझ्या वडीलांच्या आग्रहास्तव मला ५ व्या वर्गात नेमकं त्याच शाळेत घालण्यात आलं. रोज इतक्या लांब पायपीट करावी लागणार त्यामुळे मी जरा नाराजच होतो. इतक्या लांब पोराला शाळेत टाकायचं माझ्या आईच्या मनात नव्हतं तरीही माझ्या बाबांनी आईला विरोध करत, मला त्याच शाळेत घातलं होतं. शाळेत पायी चालत जायला किमान अर्धातास तरी लागायचा.

जून महिना सूरु झाला आणि शाळेला सुरवात झाली. शाळा सकाळी सातला असायची त्यामुळे मला घरुन सकाळी सव्वासहा वाजता निघायला लागायचं. सकाळी चहा चपाती खायची आणि जेवनाचा डबा घेवून, दप्तर खांदयाला लटकवून ४ ते ५ किलोमिटर असा पायी प्रवास करायचा. खरं तर मला इतक्या लांब शाळेत जायचं जिवावर आलं होतं. तरीही मनावर दगड ठेवून मी शाळेच्या पहिल्या दिवशी रमत गमत सात वाजेपर्यत शाळेत पोहोचलो. जरा दमलोही होतो, इतक्या लांब चालायची सवय नव्हती त्यामुळे जरा पायही दुखायला लागले होते. पण आश्चर्य म्हणजे शाळेत पोहोचलो आणि शाळा बघून माझा थकवा कुठल्या कुठे पळाला.

माझी शाळा अगदीच निसर्गरम्य.... झाडाझुडपांनी बहरलेली.. किमान ७-८ एकरचा मोठ्ठा‍ परिसर असलेली शाळा होती. शाळेला मोठ्ठं लोखंडी गेट, त्यावर शाळेच्या नावाची कमान "नेताजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, वरोरा".

मी शाळेच्या परिसरात प्रवेश केला आणि तिथलं निसर्गरम्य सौंदर्य बघून भान हरपून गेलो होतो. साधारणत: एक मिनीट चालत गेल्यावर शाळेचं कार्यालय होतं. आणि ऑफिसच्या बाजुला एका सरळ रेषेत बांधण्यांत आलेल्या वेगवेगळया वर्गखोल्या, त्यामध्ये ५ वी ते १० वी पर्यंतच्या वेगवेगळया वर्गखोल्या होत्या. आणि त्या प्रत्येक वर्गखोल्यांमधील अंतर किमान २० ते २५ फुटाचं होतं. शाळेच्या कार्यालयाच्या मागे मोठी प्रयोगशाळा होती.

शाळेला तारेचं मोठ्ठ उंचच उंच कुंपन होतं, आणि ते कुंपन झाडे‍ आणि वेलींन झाकलेलं होतं. शाळेत कवठ, बोरं, चिंच, आंबे यांची कितीतरी झाडे होती. तो निसर्गरम्य परिसर बघून मी देहभान हरपून गेलो होतो.

वर्गखोल्यांच्या मागे नांगरलेली जमिन होती, त्याठिकाणी कार्यानुभवच्या तासासाठी आम्हा विद्यार्थ्यांचा ४-४ जनांचा समुह करुन, एका समुहाला जमिनीचा एक एक चौरस तुकडा देवून वाफे तयार करायला लावायचे व त्याठिकाणी मेथी, कोथींबिर, पालक यांचे बीज लावून शेती करायला लावायचे.
खूप मजेदार होतं सगळं. नंतर वाफ्यांमध्ये तयार झालेली भाजी आम्ही समूहामध्ये वाटून घ्यायचो, आणि त्याचा काही भाग शिक्षकांनाही दयायचो. शाळेच्या मधल्या सुटीत आणि एक चक्कर त्या वाफ्यांकडे नक्कीच मारायचो, तिथल्या झाडांना पाणी घालायचो. कधी एकदा रोपटी मोठी होतात आणि भाजी घरी न्यायला मिळते याची घाई लागलेली असायची.

जेवनाच्या सुटीमध्ये जेवन झालं की शाळेचा निसर्गरम्य परिसर भटकायला मजा येत होती. आमचा चार जनांचा समुह होता. आणि त्यांच्यासोबत माझी अगदीच गट्टी जमली होती. दुपारच्या सुटीमध्ये झाडांना दगड मारुन चिंचा, बोरं जमा करायचे आणि शाळेत सुरु असलेल्या तासात चघळत बसायचं. शाळेत असतांना माझा एक संजय नावाचा मित्र होता. त्याला झाडावर चढायची खूप हौस होती. एकदा असाच तो कवठाच्या झाडावर कवठ तोडायला चढला होता. आणि तो झाडावरुन पडला, त्याचा हात मोडला होता. झाडावर चढला म्हणून शिक्षक तर त्याला रागावलेच पण त्याला घरीही चोप मिळाला होता. नंतर तो एक महिना हाताला प्लॉस्टर बांधून शाळेत येत होता.

आमच्या शाळेचा मुलांचा पोषाख पांढरा सदरा आणि काळा हापपँट असा होता, तर मुलींसाठी पांढरा शर्ट आणि काळा स्कर्ट असा पोषाख होता. शाळा शहरापासून दूर होती त्यामुळे शाळेत शहरातील मुली खूप कमी होत्या, शाळेच्या जवळपास असलेल्या खेडेगावातल्या मुली त्या शाळेत यायच्या, खेडेगावातील मुली म्हणजे छान निरागस, दोन वेण्या घातलेल्या आणि प्रचंड लाजऱ्या, वर्गात मुलं आणि मुली एकत्र बसायचो पण वर्गखोलीच्या एकाबाजुला असलेल्या बेंचवर मुली बसायच्या आणि दुसऱ्या बाजुला मुले. आम्ही मुले मुली एकमेकांशी बोलायचो नाही. बोलायची इच्छा असायची पण मुलांसोबत बोलण्यासाठी मुली खूपच लाजायच्या. कधी खूपच महत्वाचं काम असेल तर मग दोघीतिघी एकत्र येवून मुलांसोबत बोलायच्या. मधल्या सुटीत आम्ही बोरं, चिंचा तोडायचो तेव्हा त्या चिंचा आणि बोरं खाण्याचा मोह मुलींना व्हायचा पण त्या आम्हाला मागायच्या नाही, मग आम्हीच मुले त्यांना नेवून दयायचो.

आठवीत असतांनाची गोष्ट आहे, एकदा मी झाडाची खूप बोरं तोडली होती. आठवीत असतांना मला एक मुलगी खूप आवडायची, छान होती दिसायला नाकी डोळी निटस्, दोन वेण्या घालायची, आमच्या शाळेच्या मागे दोन तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या "जामगांव" इथून यायची. मेघा नाव तिचं (नाव बदललयं). त्यातली काही बोरं मी इतर मुली आणि मेघालाही दिली होती. नगराळे मास्तरांचा इंग्रजीचा तास सुरु झाला. आम्ही लपून हळूच एकएक बोरं तोडांत टाकून हळूवार चघळत होतो, मुली सुध्दा लपूनच बोरं‍ चघळत होत्या. मुली बेंचवर बसल्यावर स्कर्टवर बोरं ठेवून निवांत एक एक बोर खात बसल्या होत्या. नगराळे मास्तरांनी हजेरी घेण्यास सुरवात केली. समोरच्या बाकावर बसलेली मेघा, गुरुजींनी तिचं नावं घेतलं आणि ती उभी राहून "हजर गुरुजी " म्हणाली आणि नेमकी स्कर्टवर ठेवलेली बोरं खाली पडून वर्गभर पसरली. ते सगळं बघून गुरुजी आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागले आणि वर्गात जोरात एकच हश्या पिकला होता. मेघाचा चेहरा तर लाजेनं अगदीच लाल झाला होता. गुरुजींची बोलणी खावी लागली ती वेगळीच. त्यानंतर मुली वर्गात बसून स्कर्टवर बोरं ठेवून खातांना दिसायच्या नाही.

आठवीपासून आमची शाळा दिवसभर असायची. सकाळी ९.०० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, पण शाळा सुटल्यानंतरही आम्हाला घरी जायची घाई नसायची इतकं आम्ही शाळेत रमायचो. शाळा सुटल्यावर चिंचेच्या झाडाखाली आम्ही मुलं एकत्र जमायचो‍ आणि सिनेमातल्या मारामारी सारखी खोटी खोटी मारामारी खेळायचो. तिथल्याच काठयाच्या तलवारी, बंदूक समजून वापरायचो, खूप धमाल वाटायची. त्यात वेळ कसा जायचा कळतचं नव्हतं.

आठवीत असतांना वर्गशिक्षक नगराळे गुरुजी खूप कडक होते, त्यामुळे ते शाळेतून घरी जायला निघाले की आमच्या मस्त्या सुरु व्हायच्या. नगराळे गुरुजी रोज पाच वाजले की सायकलने घरी जायला निघायचे. आम्ही आठवीत असतांनही गोष्ट, जुलै महिना सुरु होता, वातावरण थंडगार झालं होतं. शाळेच्या कुपंनावर काटवेलचे (कंटोली) मोठे मोठे वेल होते, एक दिवस सायंकाळी ५.०० नंतर नगराळे गुरुजी घरी गेले असे समजून, मी आणि माझा एक मित्र तिथले काटवल तोडून पिशवीमध्ये भरत होतो. जवळपास पाऊन तास फिरल्यानंतर पिशवी भरली. आणि आम्ही दोघे घरी जायला निघालो तोच नगराळे मास्तर आमच्या पुढयात हजर.

“काय आहे रे पिशवीत" त्यांचा प्रश्न

मी घाबरतच पिशवी त्यांच्या हातात दिली. काटवल बघून त्यांना आनंद झाला ते बोलले

"अरे व्वा.. छान" म्हणत त्यांना त्या पिशवीतली अर्धी अधिक काटवलं स्वत:च्या पिशवीत ओतून घेतली आणि बोलले "यातली उरलेली अर्धी अर्धी वाटून घ्या"

आणि ते निघून गेले. आम्ही मात्र दोघेही एकमेकांकडे बघत उभे होतो. त्यानंतर आम्ही काटवल तोडले की आठवणीनं नगराळे गुरुजींना दयायचो. गुरुजी अगदीच खुष व्हायचे.

पावसाळयात शाळेत जायला खूपच मजा येत होती. आम्ही एकही दिवस शाळेला दांडी मारायचो नाही. आमचा संपूर्ण दिवस शाळेत जायचा, तरीही घरी जायची ओढ नसायची. घरापासून चार किलोमिटर चालत गेल्यावर एक रेल्वेचा पुल होता. पावसाळयात पाण्याने पुल संपूर्ण भरलेला असायचा. त्यामुळे पुलाच्या वर चढून रेल्वे लाईन ओलांडून आम्ही पलीकडे जायचो. त्यावेळी जास्त रेल्वेगाडयाचं येणं जाणं नसायचं, पण भिती वाटायची. रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे जायच्या आधी आम्ही सिग्नल बघायचो. त्यावेळी आत्तासारखे लाल, हिरवे, पिवळे रंगाच्या दिव्यांचे सिग्नल नव्हते. एकच लोखंडाचा लाल पिवळया रंगाचा सिग्नल असायचा तो वर असला की समजायचं की गाडी येत आहे, मग गाडी जातपर्यंत रेल्वेरुळाच्या बाजुला तिथेच बसून राहायचं आणि गाडी गेल्यावर रेल्वेलाईन पार करुन शाळेत जायचं.

सायंकाळी घरी परततांना पुलाचं पाणी ओसरलं असल्यास, पाण्यातून जाण्याचा मोह आवरायचा नाही, मग चारपाच मित्र एकमेकांचे हात धरुन कमरेच्यावर असलेल्या पाण्यातून ओले होतं, दप्तर सांभाळत, पाण्यातून निघायचो. खूप मज्जा यायची. मग‍ तिथेच जरावेळ पाण्याचा खेळ करत थांबायचो. एकदा असचं पाण्यातून पूल पार करुन आल्यावर मी जेवनाचा रिकामा झालेला डबा, पुलाच्या पाण्याच्या धारेवर धरला आणि काय आश्चर्य माझ्या डब्यात दोन तिन मासे जमा झाले. मग काय आम्ही सगळे मित्र मासे पकडायला लागलो.. डबा पाण्याच्या धारेवर धरला की मस्त मासे वर उडायचे आणि आम्ही ते मासे पकडून जेवनाच्या डबा भरुन मासे नियमित घरी न्यायचो. घरी ओरडापण मिळायचा, बाबा रागवायचे "शाळेत शिकायला जातो की मासे पकडायला जातो" असे बोलायचे. पण जेवतांना सगळे मात्र मास्यांची भाजी आवडीने खायचे. कधी चिंबोऱ्या पकडत बसायचो, तर कधी पावसाळयात निघणाऱ्या पालेभाज्या तोडून घरी न्यायचो. त्यामुळे घरचेपण खूष असायचे.

आमच्या गावाला थंडी खूप असायची. शाळेत जातांना हात अगदी गारठून जायचे. शाळेतही खूप थंडी वाजायची. मग गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना घेवून वर्गशाळेच्या समोरच्या हिरव्यागार जागेत शाळा भरवायचे. आम्ही गुरुजीची खूर्ची बाहेर टाकायचो. आणि मुले मुली मस्त हिरव्यागार गवतावर बसायचो. सकाळचं कोवळं उन्ह आणि शाळा. खूप मस्त वाटायचं. तो तास संपूच नये असं वाटायचं.

दुपारच्या जेवनाच्या सुटीत तर चंगळच असायची, चिचेंच्या झाडाखाली मस्त एकत्र आठ-दहा विद्यार्थ्यांची ओळीने पंगत बसायची. रोजच वनभोजनाचा आनंद असायचा, त्या जेवनाला एक वेगळीच गोडी असायची. त्यावेळी डब्यात चटणी भाकर असली तरी ती आजच्या पंचपक्वानांना लाजवेल अशी त्याची चव असायची, सगळे एकमेकांच्या डब्यातील जेवन खायचो. शाळेत पेरलेला कोथींबिर, मिरच्या, मेथी पालक हे सगळं आमच्या दुपारच्या जेवनात असायचं. आम्ही तयार केलेल्या वाफ्यातील भाज्या तोडून त्या पाण्याने स्वच्छ धूवून दुपारच्या जेवनासोबत कच्च्याच खायचो, पण त्याची चव इतकी मस्‍त असायची की शब्दात वर्णन नाही करता येणार.

आठवी पासून आम्हाला एनसीसी होतं. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर एनसीसीचा तास असायचा, तो तास घेण्यासाठी मिल्ट्रीतून एक मेजर यायचे, ते खूप शिस्तीला खूप कडक होते. एनसीसीच्या तासाला जायचं जिवावर यायचं; पण मजाही वाटायची. खाकी ड्रेस साबुदान्याच्या पाण्यात टाकून कडक इस्त्री करुन घालायचा, डोक्यावर पमपम असलेली टोपी असायची, पायात खाकी पायमोजे आणि पॉलीश केलेले त्याच रंगाचे बुट असायचे, पॉलीश केलेला बेल्ट असायचा, हे सगळं साहित्य शाळेतूनच मिळायचं. एनसीसीचा ड्रेस घातल्यावर मस्त काहीतरी वेगळचं वाटायचं.. आपण पोलीस आहोत की काय असचं वाटायचं. जवळपास एक तास लेप्टराईट ची परेड असायची. एनसीसीच्या तासाला आम्ही सगळे थकून जायचो. तास संपला की मग तिथेच हिरवळीवर जरावेळ मस्त लोळायचो.. थकवा कुठल्या कुठे निघून जायचा. महिन्यातून एकदा आम्हाला गावाबाहेर फायरिंग साठी न्यायचे.प्रत्येकाला एक रायफल देण्यात येत होती, आणि त्यात छर्रे भरून द्यायचे, शेतातल्या बांध्यावर झोपून टार्गेट ला नेम धरून फायरिंग करायची. खूप मस्त वाटायचं, बांध्यावर झोपून फायरिंग करताना ढोपर सोलायचे, पण तेव्हा काही वाटायचं नाही. मजा वाटायची.

शनिवारला सकाळची शाळा १२ वाजेपर्यत असायची पण घरी परतायला आम्हाला चार पाच वाजायचे. आम्ही मित्र शाळेतच तहान भूख विसरुन जायचो, मस्त बागडायचो, खेळायचो. शाळेतून परततांना बाभळीचं बन लागायचं. आम्ही तिघे मित्र त्या बाभळीच्या बनात फिरायचो, आणि बाभळीच्या झाडांचा डिंक गोळा करायचो. जमा झालेला डिंक वाण्याच्या दुकानात विकायचो, त्यामुळे सिनेमा बघायच्या पैशाची सोय व्हायची.

पाचवी पासून ते दहावीपर्यतचे दिवस शाळेत कसे गेले कळलचं नाही, शाळेला सुटी नकोसी वाटायची, सुटीच्या दिवशी खूप कंटाळवाणं वाटायचं, मग आम्ही दोन-तिन मित्र सुटीच्या दिवशीही शाळेत जायचो. आम्ही केलेल्या वाफ्यांना पाणी घालायचो, चिंचा, बोरं खायचो..खूप खेळायचो.. खूपच सुंदर दिवस होते ते, तसे दिवस आता कितीही पैसे मोजून मिळणार नाही. माझ्या शाळेचे मित्र अजूनही संपर्कात आहेत, जेव्हा बोलतो तेव्हा शाळेची आठवण हमखास निघतेच.

दहावी संपल्यानंतर ११ वीला "बाबा आमटे" यांच्या आनंदवन येथील आनंद निकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला ते ही खूप निसर्गरम्‍य ठिकाण. तिथल्या गमतीजमतीबद्दल पुन्हा कधीतरी वेगळं लिहणार आहे. कॉलेजला गेलोतरी वेळ मिळेल तसा आम्ही दोघे‍ तिघे मित्र शाळेत चक्कर मारायचो, आमच्या शिक्षकांना भेटायचो. खूप छान वाटायचं, आम्ही भेटायला गेलो की शिक्षकांनाही आनंद व्हायचा.

माझे तिन्ही बहिण भावंड, घरापासून जवळच असलेल्या शाळेत शिकले, पण ही निसर्गरम्य शाळा फक्त माझ्याच वाटयाला आली. त्यावेळी माझी आई मला इतक्या लांबच्या शाळेत टाकू नका म्हणून माझ्या वडीलांना विरोध करत होती. पण माझ्या वडीलांनी कुणाचही न एैकता मला त्याच शाळेत टाकलं... कदाचीत माझ्या वडीलांनी त्याच शाळेत शिकतांना जो आनंद अनुभवला असेल.. तोच आनंद मला मिळावा हाच त्यांचा प्रामाणिक हेतू असावा. याबद्दल माझ्या बाबांचे खूप खूप आभार.
त्यांनतर ग्रॅज्युएशन आनंदवन इथे झालं, आणि PG सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर इथे, तिथल्या गमतीजमती तर भारीच आहे, ती मजा परत लिहणार आहेच.

नोकरीसाठी मुंबईला आलो. पण शाळेची आठवण काही मनातून गेली नाही. कधीतरी मनाला शाळेतल्या गोष्टी स्पर्श करुन जातात, आणि मन त्या आठवणीत रमतं. मुंबईत असल्याने वर्षातून एक-दोनदा गावी जाणं व्हायचच. गावी गेलो की शाळेला भेट देण्याचा मोह आवरता येत नसायचा. माझ्या शाळेतल्या मित्रांपैकी एक मित्र गावातच होता, त्यामुळे त्याच्यासोबतच शाळेला भेट दयायचो. शाळेतील जुने दिवस आठवले की मन भारावून जायचं. शाळेच्या निसर्गरम्य वातावरणात वेळ कसा जायचा काही कळायचं नाही.

माझं लग्न झालं, माझी सासुरवाडी चंद्रपूर इथली, त्यामुळे माझ्या गावाहून बसने चंद्रपूरला जातांना डाव्या हातावर माझी शाळा दिसायची. मग माझ्या पत्नीला "ही माझी शाळा" म्हणून शाळा दाखविण्याचा मोह आवारता यायचा नाही. तिला माझी शाळा दाखवतांना एक वेगळाच आनंद व्हायचा. जेव्हा जेव्हा मी चंद्रपूरला जातो तेव्हा प्रत्येक वेळेस माझ्या पत्नीला "ही माझी शाळा" म्हणून शाळा दाखवण्याचा मोह होतोच.

पण गेल्या काही वर्षापासून माझी शाळा बंद पडलीय. कारण काय ते माहित नाही, पण इतकी मोठी जागा ओसाड पडली आहे. आता त्या रस्त्यावरुन जातांना शाळेच्या लोखंडी गेटवर असलेलं कुलूप बघून काळजात धस्स होतं. शाळेच्या कमानीवर अर्धवट दिसणारं शाळेचं नांव मनाला हूरहूर लावून जातं, शाळेतल्या वर्गखोल्या तशाच उभ्या आहेत, पण ओसाड आहेत. तरीही आत्ताही सासुरवाडीला जातांना माझ्या दोन्ही मुलींना आणि पत्नीला "ही माझी शाळा" म्हणून शाळा दाखविण्याचा मोह होतोच. शाळा जरी बंद झाली असली तरी, शाळेच्या आठवणी अजूनही जीवंत आहेत, शाळेत घालवलेला प्रत्येक क्षण, शाळेतील गुरुजी, तिथंल निसर्गरम्य वातावरण, शाळेतील क्षण, माझे मित्र, मला आवडणारी मेघा.. त्यावेळी काही कळत नव्हतं तरी, ते निरागस प्रेम.., हे सगळे आता परत मिळणार नाही, पण मनात मात्र सगळं कसं खोलवर दडलेलं आहे. माझ्या शाळेच्या आठवणी कायम मनात खोलवर रुजलेल्या आहेत. आणि त्या कधीच पुसल्या जाणार नाहीत.

00000
समाप्त
©® sarjesh

एक पुस्तक वाचा