धर्मयुग, २० जानेवारी १९७४ मध्ये प्रकाशित पुष्पा भारती यांचे समीक्षणः स्वामी विवेकानंद यांनी आपले शिष्य आणि सहकाऱ्यांमध्ये लोक कल्याणासाठी आपले जीवन अपर्ण करण्याची जशी प्रेरणा भरली होती, त्या विषयी अनेकानेक प्रसंग अतिशय रोमांचक पद्धतीने श्रीमती आशा प्रसाद यांनी आपल्या पुस्तकात सादर केले आहेत. अशा अनमोल प्रसंगांना एकत्र गुंफणे हे खरोखरच अथक परिश्रमाशिवाय शक्य नाही. त्यामुळे श्रीमती प्रसाद अभिनंद आणि शुभच्छा देण्यासाठी पात्र आहेत. हे पुस्तक एका खऱ्या तपस्व्याचे चित्र सादर करते. ज्याने उपाशी, नागड्या, दलित, पतित यांच्या उद्धारासाठी परमेश्वर प्राप्तीचा मार्ग शोधला होता. लहान मोठे चमत्कार करून दाखविणाऱ्या आणि आपल्या भोवती धनवान, अभिमानी भक्तांची गर्दी जमा करणाऱ्या तसेच त्यातच आपला आध्यात्मिक विकास असल्याचे समजणाऱ्या साधूंपेक्षा स्वामी वेगळ्या प्रकारचे साधू होते. आज देशातील युवक नेतृत्त्वहीन अवस्थेत भटकत आहे. त्याला हे पुस्तक एक नवीन प्रेरणा देऊ शकते. विवेकानंद युवकांना म्हणाले होते, “आधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, मग परमेश्वरावर.मूठभर शक्ति संपन्न लोक हे जग हादरवून टाकू शकतात, आपल्याला आवश्यकता आहे ती एका संवेदनशील हृदयाची, विचार धरून ठेवणाऱ्या डोक्याची आणि काम करू शकतील अशा बाहूंची... . या जगाचा इतिहास ज्यांचा स्वतःवर विश्वास होता, अशा काही मोजक्या लोकांचा इतिहास आहे. विश्वासामुळेच माणसाच्या आतील दैवी शक्ती जागी होते. तेव्हा मग तुम्ही काहीही करू शकता." Read more