माझ्या जीवाची होतिया काहिली
ओतीव बांधा, रंग गव्हाळा
कोर चंद्राची, उदात्त गुणांची
मोठ्या मनाची , सीता ती माझी रामाची
हसून बोलायची, मंद चालायची
सुंगध केतकी, सतेज कांती
घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची
काडी दवन्याची, रेखीव भुवया
कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिरयाची
काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची
मैना रत्नांची खाण, माझा जिव की प्राण
नसे सुखाला वाण
तिच्या गुणांची छक्कड मी गायिली
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची
वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबाध झाली भाकर तुकड्याची
घालवित निघाली मला, माझील मैना चांदनी शुक्राची
गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची
शिकस्त केली मी तिला हसविण्याची
खैरात केली पत्रांची, वचनाची
दागिन्यांनी मडवून काढण्याची
बोली केली शिंदेशाही तोड्याची
साज कोल्हापुरी, वज्रटिक
गळ्यात माळ पुतळ्याची
कानात गोखरे, पायात मासोळ्या
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची
परी उमलली नाही कळी तिच्या अंतरिची
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुंबईची
मैना खचली मनात, ती हो रूसली डोळ्यात
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
या मुंबई गर्दी बेकरांची
त्यात भर झाली माझी एकाची
मढेंवर पडावी मुठभर माती
तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची. जागरणाची, मरनारांची, शेदिंची, दाढींची, हडसनच्या गाडीची. नायलोनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची
पैदास इथे भवतीच चोरांची
एतखाऊची, शिर्जोरांची
हरामखोरांची, भांडवलदारांची
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची
पाण्यान भरलं खीस माझं
वाण मला एका छत्रीची
त्याच दरम्यान उठली चळवळ
संयुक्त महाराष्ट्राची ||