shabd-logo

मोरू

31 May 2023

10 पाहिले 10

मोरू म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल (स्टोव्ह) नव्हती; साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती; साधी जमीनच होती.

मोरूची खोली लहानशीच होती. मोरू व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली होती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरू तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी.

एके दिवशी मोरू फिरायला गेला होता. एकटाच लांब फिरायला गेला. एका झाडाखाली एक मनुष्य बसला होता. मोरू त्याच्याकडे पाहू लागला. त्या माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. मोरूने त्याच्याजवळ जाऊन “तुम्ही का रडता ?”

असे विचारले. त्या मनुष्याला जास्तच हुंदका आला. मोरू- तुम्ही असे मुलासारखे ओक्साबोक्शी का रडता? मनुष्य- आजूबाजूचे रडणे ऐकून मलाही रडू आले.

मोरू- कोण रडत आहे? मला तर कोणाचे रडणे ऐकू येत नाही.

मनुष्य- तुझे कान तिखट नाहीत. तुम्ही सारे बहिरे झालेले आहात. तुमच्या कानात मळ भरला आहे.

मोरू- माझ्या कानात बिलकूल मळ नाही

मनुष्य- दुसऱ्याची उपेक्षा करण्याचा मळ सर्वांच्या कानांत

सारखाच भरून राहिला आहे. माझ्या आजूबाजूला मला सारखे रडणे ऐकू येत आहे.

मोरू- मला दाखवा, मला ऐकवा.

मनुष्य- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे.

मोरू- हे झाड काय म्हणते?

मनुष्य- 'सारे लोक माझी फुले व फळे तोडून नेतात. एक सुद्धा माझ्याजवळ ठेवीत नाहीत. सारे मला लुटतात. परंतु मला पाणी कोणी घालीत नाही. माझ्या मुलांना खाली अंधारातून पाण्यासाठी किती लांबवर धडपडत जावे लागते. परंतु माणसांना माझे कष्ट दिसत नाहीत. खुशाल येतात, दगडधोंडे मारतात. फुले तोडतात, फले पाडतात, पाने ओरबाडतात,' असे म्हणून झाड सारखे रडत आहे.

मोरू- ती गाय का रडत आहे?

मनुष्य- तिला प्यायला पाणी नीट मिळत नाही, खायला पोटभर मिळत नाही. तिचा मुलगा गाडीला जोडतात. नांगराला जोडतात. व त्याच्या अंगात बोट बोट खोल आर भोसकतात! बिचारा बैल ! त्याला नाही पोटभर दाणावैरण. तो किती ओढील? किती चालेल? मुलाचे हे हाल पाहून गाय रडत आहे. स्वत:च्या दुःखाचे तिला फारसे वाटत नाही, परंतु मुलाच्या दुःखाने ती वेडी झाली आहे. तिच्या डोळ्यांतील पाण्याचा भूमातेवर अभिषेक होत आहे.

मोरू- तुम्हाला ऐकू येते, तसे मलाही येऊ दे. मला ही शक्ती द्या.

मनुष्य- मनुष्य विचारी झाला, मनाने निर्मळ झाला की, त्याला ही शक्ती येते. सर्व चराचराची भाषा त्याला समजू लागते, तारे आणि वारे, पशू आणि पक्षी, दगड आणि धोंडे, नद्या आणि नाले झाड आणि माड साऱ्यांची सुख-दुःखे मग तो जातो. तुमच्या गावातील नदी तर सारखी रडते. तिचे पाणी ते तिच्या अखंड गळणाऱ्या आसवांचेच जणू आहे.

मोरू- ती काय म्हणते?

मनुष्य- लोक तिच्यात घाण करतात. जणू तिचं सत्त्वच पाहतात. तिच्यात शौच करतात. लघवी करतात! शेतातील शेंगा वगैरे आणून तिच्या पात्रात धुतात, सारे पाणी घाण करतात. तिला का बरे वाईट वाटणार नाही? परवा तहानलेली पाखरे चोच वासून आली, परंतु त्यांनाही ते पाणी पिववेना; तहानलेली वांसरे आली; परंतु पाणी हुंगून निघून गेली. माणसाला शिव्याशाप देत ती निघून गेली. सारी सृष्टी आज माणसाला शिव्याशाप देत आहे.

मोरू- तुमची शक्ती एक दिवस तरी मला द्या. मनुष्य- बरे, तू आज गेलास की, ही शक्ती तुला येईल. काम करून, जेवण करून व अभ्यास करून अंथरुणावर पडलास की, तुला ही शक्ती येईल. आजच्या रात्रभरच फक्त ही शक्ती राहील. सकाळ होताच ती निघून जाईल.

मोरू- बरे, मी जातो.

त्या मनुष्याला नमस्कार करून मोरू लगबगीने घरी आला. केव्हा एकदा आपल्याला त्या शक्तीचा अनुभव येतो, असे त्याला झाले होते. खोलीत येऊन तो काळाकुट्ट कंदील त्याने लावला. त्या उखळलेल्या चुलीवर भात करून तो जेवावयास बसला. भराभर जेवण करून त्याने ती भांडी तशीच तेथे गोळा करून ठेवली. नंतर आपली पथारी पसरून तो तिच्यावर पडला. अजून ती शक्ती आली नव्हती. तो वाचीत पडला. त्याने दिवा बारीक केला. मोरूच्या चेहऱ्यात तो पहा फरक पडू लागला.

मोरूला हलूहलू ऐकू येऊ लागले. त्याने डोळे ताठ केले व तो पाहू लागला. मागे, पुढे, खाली, वर सर्वत्र त्याला आवाज ऐकू येऊ लागले. एकाएकी दीनवाणे शब्द त्याच्या कानावर आले. त्याच्या समोर कंदील होता. तो रडत होता. मोरूला ते रडणे ऐकू आले.

मोरू कंदिलाला म्हणाला, “का रे तू रडतोस ?”

कंदील म्हणाला, “अरे तुझ्यासाठी मी काळा होतो. तू वाचावेस, ज्ञानाने तुझे तोंड उजळ व्हावे, म्हणून माझे तोंड काले होते. परंतु तू मला कधी पुसतोस का ? सकाळ होताच मला पुसून ठेव. पुन्हा रात्री तुझ्यासाठी तापेन; काळा होईन. सकाळी पुन्हा स्वच्छ कर. तू मला किती घाणेरडे केले आहेस बघ. मी रडू नको तर काय करू?"

इतक्यात मोरूला अगदी जवळच रडणे ऐकू आले. जणू त्याच्या अंगातून ते निघत होते. त्याच्या अंगातील सदरा व नेसूचे धोतर; तीही रडत होती. .

मोरू म्हणाला, “अरे, माझ्या सदऱ्या, का रे रडतोस?” सदरा म्हणाला, “तुझा घाम लागून मी घामट झालो, तुझ्या अंगाचे रक्षण करून मी मळलो. धूल व घूर मी अंगावर घेतो. परंतु तू मला कधी धूत नाहीस. मला स्वच्छ करीत नाहीस. पूर्वी पाण्यात पडताच मी ओला होत असे, आता पाणी माझ्यात शिरत नाही, ते सुद्धा जवळ येण्यास लाजते, इतका मी गलिच्छ झालो आहे. आणि हे सारे तुझ्यासाठी. मी रडू नको तर काय करू?"

धोतर म्हणाले, “त्या दिवशी तू उडी मारीत होतास, त्या वेळेस तुझ्या अंगात काटे बोचू नयेत म्हणून मी पुढे झालो व माझे अंग फाडून घेतले. परंतु मला चार टाके घातलेस का? तसेच ते शाईचे डाग माझ्या अंगावरचे धुतलेस का?"

सतरंजी व घोंगडी, त्याही बोलू लागल्या. “अरे, आमच्यात तुझ्या पायांची धूळ किती रे भरलीस? तुझे ते घाणेरडे पाय ते आमच्यावर ठेवतोस. आम्हांला जरा झटकून तरी टाकीत जा. "

खालची जमीन म्हणाली, “अरे, माझे सारे अंग सोलून निघाले. तू माझ्यावर बसतोस, उठतोस, नाचतोस, कुदतोस. मला शेणामातीने कधी सारवतोस का? ते मलम अंगाला मधून मधून लावीत जा रे. सारे अंग ठणकते आहे. काय तुला सांगू? किती वेदना, किती हाल?"

चूल म्हणाली, “तुझ्यासाठी मी तापते. भाताचा कड जाऊन माझे अंग पहा कसे झाले आहे? अरे, रोज सकाळी मला सारवीत जा. माझ्यावरून हात फिरव. अशी दीनवाणी नका रे मला ठेवू!”

ती खरकटी भांडी म्हणाली, “मोरू, तू जेवलास, परंतु आम्हाला सकाळपर्यंत अशीच खरकटलेली ठेवणार ना ? चिखलात बरबटलेले बसून राहायला तुला आवडेल का रे ? ही तुझी आमटी, हे ताक, हे शितकण- सारे तसेच आमच्या अंगावर. आम्हाला रात्री कधी झोप येत नाही. आम्हांला घासूनपुसून ठेवीत जा. तुझ्यासाठी चुलीवर आम्ही काळी होतो. तुझ्या जेवणामुले आम्ही ओशट होतो. कृतज्ञता नाही का रे तुला?” .

पिशवीतील पुस्तक म्हणाले, “अरे, तुला मी ज्ञान देतो. पशूचा मनुष्य करतो. परंतु माझी दशा बघ काय केली आहेस ती! पानन् पान सुटले आहे. शाईचे डाग पडले आहेत. तुला नाही का रे दयामाया ?"

मोरूला खोलीतील प्रत्येक वस्तू काहीतरी गाऱ्हाणे करीत आहे असे दिसले. साऱ्यांचा त्याच्यावर आरोप. 'तू कृतघ्न आहेस. तुझ्यासाठी आम्ही झिजतो, श्रमतो, काले होतो. तू आमच्यासाठी काय करतोस?' असे सारी म्हणत होती.

एकाएकी सारे आवाज बंद झाले. मोरू अंथरुणावर गंभीरपणे बसला. शेवटी खोलीतील सर्व वस्तूना त्याने रडत रडत गहिवरून साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून तो म्हणाला, “माझ्या उपकारकर्त्यांनो, आजपासून तुमची काळजी घेईन, तुम्हाला स्वच्छ राखीन. तुम्ही क्षमावान आहात. या मुलाला चुकल्यामाकल्याची, झाल्यागेल्याची क्षमा करा. आजपासून मी कृतज्ञता दाखवीन. सर्वाचे उपकार स्मरेन. रडू नका, रुसू नका, या मुलावर प्रसन्न व्हा. "

दुसऱ्या दिवसापासून मोरू अगदी निराळा मुलगा झाला. सर्वांना त्याच्यातील फरक पाहून आश्चर्य वाटले. ते म्हणत, “मोरू, अलीकडे सूर्य पश्चिमेस उगवू लागला?” मोरू म्हणे, “तुम्हांला काय माहीत आहे? मी केवढा थोर अनुभव घेतला तो?" ते विचारीत, “कोणता?” मग मोरू ही सारी हकीगत सांगे व ती ऐकून त्याचे मित्रही गंभीर होऊन घरी जात व नीट वागत.

मोरू व त्याचे मित्र वागू लागले, तसे आपणही सारे वागू या.
5
Articles
मुलांसाठी फुले
0.0
लहान मुलांसाठी फुले ही साने गुरुजींनी लिहिलेली लघुकथांची कादंबरी आहे. ज्याच्या खालीलप्रमाणे पाच कथा आहेत: 1. सत्त्वशील राजा 2. मोरू 3. आई व तिची मुले 4. प्रामाणिक नोकर 5. मधुराणी
1

सत्त्वशील राजा

31 May 2023
3
0
0

फार जुनी गोष्ट आहे. त्या वेळेस आपल्या देशात एक राजा होता. उदार म्हणून त्याची सर्वत्र ख्याती होती. तो राजा कोणाला कधीही नाही म्हणत नसे. कोणाचीही इच्छा अपूर्ण ठेवीत नसे. त्याच्या तोंडातून नकार कधीच बाहे

2

मोरू

31 May 2023
0
0
0

मोरू म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्

3

आई व तिची मुले

31 May 2023
0
0
0

ती एक गरीब विधवा होती. मोलाने काम करी व चार कच्च्या- बच्च्यांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे.त्या दिवशी

4

प्रामाणिक नोकर

31 May 2023
0
0
0

एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला. त्या मुलाचा बाप गरीब होता. बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते. परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते. प्रामाणिकपणाने वागावे,

5

मधुराणी

31 May 2023
1
0
0

एका राजाचे दोन मोठे मुलगे आपआपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुशाफिरीला गेले. वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले. वेडेवाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही

---

एक पुस्तक वाचा