shabd-logo

१: स्वामी

23 June 2023

75 पाहिले 75
ध्येयाला जो कवटाळील, प्रेमा निर्मळ मिठी मारील दुःखी भारत जो हसवील निज बळिदाने । त्या अनंत माझी नमने॥

अमळनेर गावात आज विश्व-धर्म-मंडळाच्या वतीने थोर पैगंबर महंमद ह्यांची पुण्यतिथी साजरी होणार होती. विश्व-धर्म-मंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्यात सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रातील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदू-मुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्यांच्या आगीत तेल ओतण्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानातील दहा-वीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहा-वीस शहरे म्हणजे काही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदू- मुसलमान गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदू-मुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदू- मुसलमानात सलोखा आहे.

वर्तमानपत्रांना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेष-मत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांची तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात आणि कोट्यवधी हिंदू-मुसलमानांची मने अशांत केली जातात! आग नसेल तेथे आग उत्पन्न होते, प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतू जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे ह्या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय ! मग भारत मरो, का तरो, समाजाला आग लागो, की समाजाची राखरांगोळी होवो.

मुंबईला एका इमारतीस आग लागते! परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेवल्या होत्या. हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला, तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळ-आपट करू लागतो प्रत्येक धर्मातले संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.

परंतु ईश्वरी सूत्रे हळूहळू हलविली जात असतात. हा विश्वाचा विणकरी कसे कोठून घोटे फेकील, ते कोणाला कळणार ? अमळनेरसारखे लहानसे शहर आणि तेथे हिंदू-मुसलमानांनी अन्योन्य संस्कृती समजून घेण्यासाठी संस्था स्थापन करावी, हे आश्चर्य नव्हे का? अमळनेर हे संतांचे स्थान ! संसाराला निर्मळ करणारी संस्था तेथे स्थापन न व्हावी, तर कोठे व्हावी?

ती संस्था म्हणजे एक सुचिन्ह होते. तो लहान बिंदू- जीवनदायी बिंदू होता. त्या बिंदूची उपेक्षा नका करू. त्या बिंदूचाच उद्या सिंधू होईल. आपण नदीचा उगम पवित्र मानतो. गोदावरीच्या मोठ्या प्रवाहापेक्षा, त्र्यंबकेश्वराजवळील दगडा-धोंड्यातील गुंतवळासारखा तिचा लहान प्रवाह- ती करांगुळीएवढी धार- तिलाच आपण पवित्र मानतो. मंगल कर्माचे सारे आरंभ पवित्र आहेत. मग ते किती का लहान असेनात.

त्या लहान संस्थेला शिष्ट लोक हसत होते. आपापल्या क्षुद्र डबक्यांचा अभिमान धरणारे लोक हसत होते. ध्येयाची जगात टरच हात असते, परंतु ध्येयवादी पुरुष आशेने व श्रद्धेने श्रमत असतो. प्रयत्न यशस्वी होवो वा अपयशी होवो, त्यात भिण्यासारखे काय आहे? परंतु ह्या जगात काहीही फुकट जात नाही. मनातील विचार, उच्चारलेला शब्द, प्रत्यक्ष कर्म, सर्वांचा परिणाम जगावर घडतच असतो. ते परिणाम दिसोत वा न दिसोत. कोठेतरी कोपऱ्यात फुललेल्या फुलाचा सुगंध वाऱ्याबरोबर दशदिशांत जातच असतो. त्या सुगंधाने वातावरण स्वच्छ व पवित्र राखण्यास मदत केलेलीच असते. त्या गोष्टींचे ज्ञान जगातील वर्तमानपत्रांस असो वा नसो, जगातील अहंपूज्यांस असो वा नसो.

स्वामी शहरांत हिंडत होते. दहा वाजता आगगाडीतून उतरल्यापासून ते भटकतच होते. त्यांना भूक लागली होती. परंतु कोणाकडे जाणार? कोठे उतरणार? त्या शहरांत कोणाशीही त्यांची ओळख नव्हती. रस्त्यांतून हिंडता हिंडता त्यांच्या हातात ती जाहिरात पडली. स्वामी जाहिरात वाचू लागले.

'आज सायंकाळी सहा वाजता नगर भवनात विश्व धर्म- मंडळाच्या वतीने महंमद पैगंबर यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. तरी सर्वांनी यावे, अशी प्रार्थना आहे. '

ती पवित्र पत्रिका वाचताच त्यांचे तोंड फुलले. त्यांची भुकेने काळवंडलेली मुद्रा टवटवीत दिसू लागली. आत्म्याची भूक शांत झाली. प्रेमाच्या यात्रेकरूला प्रेमाचा प्रसाद मिळाला. ती पत्रिका स्वामींनी हृदयाशी धरली. ती पत्रिका म्हणजे नवीन आशा होती, नवीन प्रभा होती. नवभारताची दिव्य पताका होती, ती पत्रिका घेऊन ते पुढे चालले. भटकत भटकत ते नदीतीरावर आले. गाव आता दूर राहिला होता. तेथे एक लहानशी टेकडी होती. त्या टेकडीवर महादेवाचे लहानसेच पण सुंदर असे देवालय होते, देवालयाभोवती झाडे लावलेली होती. दाट छाया पडली होती. टेकडीच्या पायथ्याशी नदी होती. जणू भगवान शंकराचे महिम्नस्तोत्रच ती रात्रंदिवस गात होती. गावापासून दूर राहून त्या टेकडीवरून भगवान शंकर गावाला आशीर्वाद पाठवीत होते. ते स्थळ पवित्र होते, रमणीय होते. एक प्रकारचा शांत व गंभीर एकांत तेथे होता.

स्वामींनी नदीमध्ये स्नान केले. उन्हाने तप्त झालेला आपला देश त्या शीतल जलाने त्यांनी शांत केला. कितीतरी वेळ ते पाण्यात होते. आईच्या प्रेम-तरंगांशी खेळत होते, आईच्या कृपा-समुद्रात डुंबत होते. मधूनमधून पाणी पीत होते. शेवटी ते बाहेर आले. त्यांनी वस्त्रे धुतली. धुऊन उन्हात वाळत टाकली. देवाच्या अंगणात शीतल छायेखाली घोंगडीवर ते बसले. त्यांना थकवा आला होता. त्या घोंगडीवर शेवटी ते पडले. त्यांचा डोळा लागला. झाडावरची पाखरे त्या श्रांत पांथाकडे पाहात होती. एक पाखरू येऊन त्यांच्या अंगावरही बसले. हळूच बसले व अलगद उडून गेले.

परंतु स्वामींना झोप कोठून येणार? भारतवर्ष झोपले असतांना, हा प्रिय महाराष्ट्र झोपला असताना, त्यांना झोप कोठून येणार? ज्यांच्यावर सारी आशा, ते राष्ट्राचे तरुण झोपलेले असताना, त्यांना कोठून सुख-निद्रा, कोठची मनाची विश्रांती? ते उठले. तेथेच येरझाऱ्या घालू लागले. अनेक विचार त्यांच्या हृदयात उसळत होते. एकदम ते थबकत व दूर कोठेतरी बघत. भारताच्या भव्य भविष्याचे दर्शन का त्यांना त्या वेळेस होई!

ते पाहा स्वामी खाली बसले. त्यांनी आपल्या पिशवीतून वही काढली. पेन्सिलीने काहीतरी ते लिहू लागले. काय बरे लिहीत आहेत? तो निबंध आहे, का ती गोष्ट आहे? तो हिशोब आहे, की काही टाचणे-टिपणे आहेत? त्यांचे डोळे पाहा, भावनांनी पेटल्याप्रमाणे ते दिसत आहेत. हृदयातील ज्वालामुखी डोळ्यात येऊन उभा राहिला आहे. त्यांचे ओठ थरथरत आहेत व लिहितांना बोटे कापत आहेत. भावनांचा वेग शरीराला व हृदयाला सहन होत नाही वाटते? भावनांच्या बरोबर शब्दांना टिकाव धरवत नाही, म्हणून तर ते नाही ना तो वेग ओठांच्या कंपातून, बोटांच्या कंपातून प्रकट होत?

एक दिव्य गान तेथे जन्माला आले होते. त्या कागदावर तेजस्वी व उदार भावनांचे एक गाणे लिहिण्यात आले होते. स्वामीजींनी ते गाणे म्हटले. लिहून झाल्यावर त्यांना समाधान झाले. त्या गाण्यातील चरण गुणगुणत ते शिवालयाभोवती प्रदक्षिणा घालू लागले.

वेळ केव्हा संपला, ते त्यांना कळले नाही. संध्याकाळ होत आली. सूर्यास्ताचे कोमल किरण नदीच्या पाण्यावर पडले होते. निघून जाणारे किरण झाडांच्या पानांशी शेवटची खेळीमेळी करीत होते. स्वामीजींना एकदम आठवण झाली. गावात सभा आहे. नगर भवनात सभा आहे. ते एकदम उठले. त्यांनी आपली पिशवी भरली. अंगावर घोंगडी टाकली. झपझप पावले टाकीत ते गावाकडे निघाले. 'नगरभवन' कोठे आहे, त्याची ते विचारपूस करू लागले.

शेवटी एकदाचे नगरभवन आले. नगरभवनाभोवती बाग होती. अद्यापसभेस सुरुवात झाली नव्हती. मुसलमानांच्या झुंडी येत होत्या. तरुणांचे मेळावे ठायी ठायी उभे होते. बागेत मुले फिरत होती. बागेतील एका बाकावर स्वामी बसले. त्यांच्या तेजस्वी मूर्तीकडे सारे कुतूहलाने पाहात होते. पहाडासारखी धिप्पाड ती मूर्ती होती. परंतु पुन्हा किती शांत व गंभीर ! पाहणाऱ्याच्या मनात त्या मूर्तीबद्दल एकदम आदर व भक्ती उत्पन्न होई.

सभेचे अध्यक्ष आले. मंडळी सभागृहात जाऊ लागली. स्वामीजीही सभागृहात शिरले. तरुणांच्या घोळक्यातच ते बसले. सभेस आरंभ झाला. नियुक्त वक्ते उभे राहिले व त्यांनी पैगंबराविषयींची माहिती सांगितली. आपल्या धर्मस्थापकाबद्दलची माहिती एका हिंदूने गोळा करून, आस्थापूर्वक मिळवून ती आपणास सांगावी, ह्याचे मुसलमान बंधूस आश्चर्य वाटले. मुख्य वक्त्याचे भाषण संपल्यावर अध्यक्षांनी दुसऱ्या कोणास बोलायचे असल्यास परवानगी आहे, असे सांगितले.

कोणी उठते का? श्रोते चौफेर पाहू लागले. ते पाहा स्वामी उठले. सिंहाप्रमाणे खुर्चीजवळ गेले. त्या नव-पुरुषाकडे सर्वांचे लक्ष वेधले. हा मनुष्य कोण, कोठला काय सांगणार? स्वामींची धीर-गंभर वाणी सुरू झाली. अत्यंत शांतता होती. लोक शब्द न् शब्द पिऊ लागले, हृदयात साठवू लागले.

“मुसलमान बंधूंनो, आज मला किती आनंद होत आहे, याची कल्पना तुम्हाला होणार नाही. आपले ध्येय परार्धांशाने का होईना, कुठे तरी प्रगट होत आहे. हे पाहण्यात धन्यता असते. आज हिंदुस्थानभर हिंदू-मुसलमानांचे तंटे होत आहेत. अशा अविश्वासाच्या काळात आजच्यासारखा प्रसंग पाहायला मिळणे, म्हणजे सहारा वाळवंटात झुळझुळ वाहाणारा झरा दिसण्यासारखे आहे. बंधूंनो, हा भारतवर्षांचे एक महान ध्येय आहे. ते ध्येय कधीही डोळ्याआड करू नका. परमेश्वराला भिन्न भिन्न संस्कृतीचे लोक या भारतात आणून, त्या सर्वांची एक महान संस्कृती निर्माण करायची आहे. सर्व धर्माचे व जातीचे लोक इथे आणून, त्यांना गुण्यागोविंदाने नांदवण्याचा एक महान प्रयोग भारतभाग्यविधाता करू पाहात आहे. समुद्रात हजारो प्रवाह येतात, म्हणून समुद्र पवित्र; त्याप्रमाणे भारतवर्ष हे पवित्र तीर्थ आहे. मानवी जीवनाचे विविधतेतील ऐक्य पाहायला जगातील यात्रेकरू या भारतभूमीत येतील. भारतीय इतिहासातले हे सोनेरी सूत्र विसरू नका.

“भारताला ऐक्याचा संदेश जगाला द्यायचा आहे. भेदभावात अभेद पाहायला शिका, हे भारत सांगत आहे. भारतातच अद्वैत तत्त्वज्ञान का निर्माण झाले? तत्त्वज्ञाने परिस्थितून जन्माला येत असतात. जरुरीमुळे ज्याप्रमाणे भौतिक शास्त्रातही शोध लागत असतात. या भारतवर्षाच्या भाग्याने हजारो मानव-प्रवाह इथे येतील. त्यांच्यात संगीत निर्माण व्हायला. अद्वैताची जरुरी होती, म्हणूनच तो महान विचार इथे निर्माण झाला.

“बंधूनो, हृदये हृदयात मिळायला हवी असतील, तर परस्परांच्या संस्कृतीतले जे जे सत्य, शिव व सुंदर असेल, त्याचा अभ्यास करायला हवा. आपण पाश्चात्त्य ग्रंथ वाचतो. त्यांच्या काव्यातली वचने पाठ म्हणतो, परंतु हिंदू कुराणातले वचन व्याख्यानात सांगणार नाही, किंवा मुसलमान गीतेतला श्लोक म्हणणार नाही. परस्परांच्या संस्कृतीतील ही देवाणघेवाण आपण अकबराच्या कारकिर्दीत करायला लागलो होतो. ईदच्या प्रार्थनेच्या वेळेस 'हिंदू-मुसलमान यांना सांभाळ,' असे मुसलमान म्हणतो. आधी हिंदूचे नाव तो घेतो. मुसलमानी राजांनी हिंदू देवस्थानांना व हिंदू राजांनी मुसलमानी पीरांना नि दर्यांना वर्षासन दिलेली आहेत. आपण या विशाल भारताची पूजा करायला शिकत होतो. ते भव्य, दिव्य कर्म पुन्हा नव्याने सुरू करू या.”

“सूर्यफुलाची अशी गंमत सांगतात की, जिकडे जिकडे सूर्य वळेल, तिकडे तिकडे ते तोंड करते. आपली मने अशीच झाली पाहिजेत. जिथून जिथून प्रकाश मिळेल, तिथून तिथून तो घेऊन, आपण आपला विकास करून घ्यायला हवा. एकमेकांचे वाईट पाहणे, हे मानवांना शोभत नाही. गिधाडाची दृष्टी सडलेल्या मांसखंडावर असते, त्याप्रमाणे आपण होता कामा नये, सुफी कवींनी म्हटलं आहे, ‘अरे, तुझ्या मशिदीचा दगड भंगला तरी चालेल, परंतु दुसऱ्याच्या दिलाची मशीद नको फोडू.' आमच्या संतांनीही सांगितले आहे.

कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
 
 “दोन्ही धर्मातल्या संतांनी एकच प्रेमाचा व शांतीचा संदेश दिला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ काय? इस्लाम म्हणजे शांती ! आणि हिंदूच्या प्रत्येक मंत्र्याच्या शेवटी 'ॐ शांतिः शांतिः शांतिः । ' असेच म्हटलेले असते. ज्या धर्मांचा अवतार शांतीसाठी आहे, त्या धर्मांनी आग लावीत सुटणे, हे योग्य नाही.

“या हिंदुस्थानचा इतिहास हिंदू-मुसलमानांनी बनवला आहे. अशोक व अकबर, प्रताप व शेरशहा, अहल्याबाई व चांदबिबी, कबीर व चैतन्य सर्वांनी ही इमारत रचीत आणली आहे. आग्य्राचा ताजमहल व अजिंठ्यांची लेणी यांनी या संस्कृतीत भर घातली आहे. इस्लामी गुलाब व आर्यांचे पवित्र कमळ, दोन्ही एके ठिकाणी आली आहेत. एकमेकांस नाव न ठेवता पुढे जाऊ या. एकमेकांवर बहिष्कार न घालता सहकार्य करा, सख्य जोडा. मुसलमानांची आता इथेच घरेदारे, इथेच शेतीवाडी; इथेच पूर्वजांची कबरस्ताने. हा भारतवर्ष त्यांना आपलासा वाटला पाहिजे. भारतीय भवितव्यते त्यांनी लग्न लावले पाहिजे. हिंदूनीही त्यांना जवळ करावे. मुसलमान सारे वाईट, असा मंत्र जपत बसू नये. आपले तत्त्वज्ञान निराळा मार्ग सांगत आहे. 'अहं ब्रह्माऽस्मि ।' नि 'तत्त्वमसि।' हा आपला मार्ग आहे. मी ब्रह्म आहे व तूही ब्रह्म आहेस. मी चांगला आहे. व तूही चांगला आहेस. राम, राम. मी राम व तू राम. आपण सारी देवाची लेकरे. आपण दैवी आहोत, दानवी नाही. हा मंत्र आपल्याला जपायचा आहे. शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतात, 'मुलाला दगड म्हटलेत, तर तो खरोखरच दगड होईल.' त्याप्रमाणेच आपण मुसलमानास ते वाईट आहेत. वाईट आहेत. असे सारखे म्हटले, तर ते वाईट नसले तरी वाईट होतील. जो वाईट असेल, असे सारखे म्हटले, तर ते वाईट नसले, तरी वाईट होतील. जो वाईट असेल, त्याचेही लक्ष त्याच्यामधल्या संदेशावर आपण खिळवले पाहिजे. या उपनिषदातल्या शास्त्रशुद्ध, सनातन मार्गानेच एकमेकांना श्रद्धेने सुंदर करीत, आपण पुढे गेले पाहिजे.”

“आज महंमदाची पुण्यतिथी ! त्या महापुरुषाबद्दल मी काय सांगू? त्यांची केवढी श्रद्धा, किती तळमळ, किती नम्रता ! भटक्या अरबांना त्यांनी एकत्र आणलं. त्यांनी स्त्रियांचा महिमा वाढवला. ऐक्याचा संदेश दिला. तुझ्या शेजारी तुझा भाऊ उपाशी असेल, तर त्याला अर्धी भाकर नेऊन दें. असे सांगितले. व्याज घेऊ नको, असे बजावले. स्वावलंबी व्हायला त्यांनीच शिकवले. एका भिकाऱ्याला त्यांनी बळेच लाकडे तोडायचा धंदा करायला लावले. ‘मला महंमदाला ईश्वरी ज्ञान झाले आहे, तसे जगात इतरही महात्म्यांना झाले असेल, त्यांनाही तुम्ही मान द्या.' असे कुराणात स्वच्छ सांगितले आहे. महापुरुषाच्या शिकवणीतली दोषता ही कालोद्भव असते. महापुरुषाला परिस्थिती पाहून उपदेश करावा लागतो. तो उपदेश म्हणजे त्याचे हृदयसर्वस्व नसते. त्या उपदेशाचा आपण विकास करायला हवा.”

“महंमदांच्या मरणाच्या वेळचा केवढा उदात्त प्रसंग ! त्या वेळेचे त्यांचे शब्द कधीही विसरू नका. महंमद म्हणाले, 'मी कुणाचे देणे नाही ना? कुणाचे ऋण फेडल्याशिवाय नाही ना मी राहिलो? बोला, माझी मान इथे खाली झाली, तरी चालेल, परंतु तिथे देवासमोर ती खाली न होवो.'

थोर शब्द! ज्या योगे देवासमोर मान लाजेने खाली घालावी लागेल, असे काहीही करू नका. पैगंबराची ही शेवटची आज्ञा आहे. यात सर्व धर्मांचे सार आहे. मरणकाळच्या क्षणात आपले सारे जीवन पुंजीभूत होऊन येऊन बसते. साऱ्या जीवनाचा अर्थ मरणकाळच्या उद्गारात प्रगट होत असतो. महंमदाच्या सर्व जीवनाचा काय अर्थ? देवासमोर मान खाली घालायला लावणारे कोणतेही कर्म करू नको, हाच तो अर्थ. मी तुम्हाला जास्त काय सांगू? मी वाऱ्याप्रमाणे हिंडणारा एक प्रवासी आहे. तुमचा माझा परिचय नाही. उणं- अधिक बोलल्याबद्दल क्षमा करा.'

असे बोलून स्वामीजी जाऊ लागले. अध्यक्षांनी उठून त्यांना आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. स्वामींजींचे व्याख्यान सारा श्रोतृसमाज स्तब्धतेने ऐकत होता. सर्वांची हृदये व मने दिव्य वातावरणात गेली होती. स्वामींच्या शब्दात जिव्हाळा होता. तळमळ होती, कळकळ होती. तळमळ कोणाला जिंकून घेणार नाही? कळकळ कोणाच्या हृदयाला समभाव करणार नाही?

अध्यक्षांनी फार न बोलता समारोप केला. स्वामींच्या भोवती लोक गोळा झाले. तेथून जावे असे कोणास वाटेना. फुलांपासून दूर जावे, असे कोणास वाटेल? दिव्य संगीत सोडून जावे, असे कोणास वाटेल? कोणी स्वामींना प्रश्नही विचारू लागले. स्वामीजी शांतपणे त्यांना उत्तर देत होते. एक मुसलमान म्हणाला, “तुम्ही हिंदू तर मूर्तिपूजक आहात, तुमचे आमचे कसे पटावे?"

स्वामी म्हणाले, “आपण सारेच मूर्तिपूजक आहोत, मूर्ती म्हणजे का केवळ दगडी आकृती? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ती मूर्तीच असते. कुराण ही तुमची मूर्ती आहे, महंमद ही तुमची मूर्ती आहे. मग महंमदाचे दगडी पुतळे किंवा रंगीत चित्रे असोत, वा नसोत, महंमद म्हणताच तुमच्या मनात काही भाव उत्पन्न होतात की नाही? खरे पाहिले, तर हिंदूच मूर्तिपूजक असूनही मूर्तिपूजक नाहीत व बाकी इतर धर्म मूर्तिपूजक नसूनही मूर्तिपूजक बनले आहेत. हिंदू स्वतःचे तेवढे खरे असे मानीत नाही. तो मूर्तिपूजक असूनही मूर्तीच्या पलीकडे जातो. जगातील सारे संत, सारे धर्म, सारे थोर पुरुष यांना तो तुच्छ मानीत नाही. याच्या उलट तुम्ही महंमद व कुराण या पलीकडे पाहाणार नाही. ख्रिस्ती मनुष्य बायबलच्या पत्नीकडे जाणार नाही. म्हणजे तुम्ही आपल्या मूर्ती कायमच्या करून ठेवल्या आहेत. तुम्ही मूर्तीच्या पलीकडे जात नाही. त्याच दोन गोष्टींना फक्त सत्य मानाल. आता यावरूनच कोण अधिक मूर्तिपूजक ते तुमच्या ध्यानात येईल. आपण मूर्तिपूजक व मूर्तिभंजक दोन्ही प्रकारचे असू तरच विकास होईल. लहानपणी मी कुटुंबाची मूर्ती पूजीत होतो. पुढे ती मूर्ती फोडली. मी समाजाची मूर्ती पुजू लागलो. पुढे तीही फुटली व मी सर्व देशाची मूर्ती पुजू लागलो. एक दिवस तीही फुटेल व सर्व मानवजाती माझी मूर्ती बनेल. तीही मूर्ती मला अपुरी पडेल व भगवान् बुद्धांप्रमाणे सर्व सचेतन सृष्टीची मी पूजा करीन. याप्रमाणे लहान ध्येयाच्या मूर्ती फोडीत, उत्तरोत्तर विशाल ध्येयाच्या मूर्ती पूजीत आपणास पुढे जावयाचे आहे व एक दिवस या सर्व चराचर सुष्टीलाच आपण वंदन करू व 'आनंदे सागर हेलावती' अशी आपली स्थिती होईल. म्हणून आम्ही हिंदू मूर्ती करतो व मूर्ती बुडवितो. टर उडविण्यासारख्या या गोष्टी नाहीत. "

एक मुसलमान म्हणाला, “कुराण आम्हाला मान्य आहे, ते एक आम्ही ओळखतो."

स्वामींनी त्याला विचारले, “कुराण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे?”

तो म्हणला, “नाही.

स्वामी म्हणाले, “कुराण म्हणजे हृदय पिळवटून निघालेला उद्गार ! जो जो हृदय पिळवटून उद्गार निघाला असेल, त्याला वंद्य मानले पाहिजे. असे करणे म्हणजेच कुराण मानणे होय. रामकृष्ण परमहंस, 'देवा, केव्हा रे भेटशील,' असे रडत म्हणत. तुकाराम महाराज, 'भूक लागली नयना,' असे म्हणत. ते उद्गार म्हणजे कुराणच आहे. हे विशाल कुराण पाहा.”

एक हिंदू गृहस्थ म्हणाले, “आमची महाराष्ट्राची परंपरा निराळी आहे. श्री शिवछत्रपती व समर्थ यांची शिकवण म्हणजे आमचा वेद. "

स्वामी म्हणाले, “त्याची शिकवण व माझी शिकवण यात फरक नाही. शिवाजी महाराज मुसलमान तेवढा कापावा असे नव्हते म्हणत. त्यांच्या आरमारावर मुसलमान अधिकारी होते. मुसलमान भगिनीस त्यांनी किती थोरपणाने वागविले. ते अन्यायचे शत्रू होते. धर्माचे नव्हते. त्यांनी चंद्रराव मोरेही मारले व अफजलखानही मारला. अन्याय करणारा स्वकीय वा परकीय ही भाषा त्यांच्याजवळ नव्हती. समर्थांच्या शिकवणीचीही आपण वाढ केली पाहिजे. 'मराठा तितुका मेळवावा' हा समर्थांचा संदेश मराठा म्हणजे का मराठा? मराठा म्हणजे महाराष्ट्रातील ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र सारे. पेशव्यांच्या काळात 'मराठा तितुका मेळवावा' हा संदेश अपुरा पडला. त्या वेळेस जाट, रजपूत वगैरे लोकांशी मराठ्यांचा सबंध आला. 'हिंदू तितुका मेळवावा' असा संदेश देणारा समर्थ त्या वेळेस पाहिजे होता. परंतु तो न मिळाल्यामुळे मराठे घसरले व सर्वांचे शत्रू झाले. आजच्या काळात 'हिंदू तितुका मेळवावा' हा मंत्रही अपुरा ठरेल. 'आज हिंदी तितुका मेळवावा' असा मंत्र सांगणारा पाहिजे आहे. नामदार गोखले, महात्मा गांधी हा युगमंत्र देत आहेत. मंत्रातील अर्थ वाढत जात असतो. समर्थांनी सांगितले आहे, 
'घालून अकलेचा पवाड । व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड । तेथे कैचें आणिले द्वाड । करंटेपण ॥'

आपापली बुद्धी विशाल करून सर्व ब्रह्मांडाला मिठी मारावी असे करण्याऐवजी आपापली क्षुद्र ६ घरे बांधून अभागी का होता? लहान लहान जेथे निर्माण करून तेवढ्याच भिकाऱ्यासारखे का राहाता ? विश्वाचा वारसदार तू आहेस. संकुचित कुंपणे घालीत नको बसू. हे ध्येय कधीही दृष्टिआड आपण करता कामा नये. हा भारताचा तर मोठेपणा आहे. तोच जर आपण गमावून बसलो तर काय शिल्लक राहिले?"

हळूहळू लोक जाऊ लागले. स्वामीही निघाले. कोठे जाणार ते? त्यांची कोणी चौकशीही केली नाही. ते कुठे उतरले, कुठे जेवले- कोणी विचारले नाही. स्वामींना त्याची चिंता नव्हतीच. ते गावातून हिंडत बोरी नदीच्या तीरावर पुन्हा आले. जेथे संत सखाराम महाराजांची समाधी आहे, तेथे ते आले. बोरीचा प्रवाह शांतपणे वाहात होता. ही समाधी कोणाची वगैरे चौकशी स्वामींनी आसपासच्या मुलांजवळ केली. देवदर्शनास लोक येत जात होते.

स्वामीजी समाधीजवळ बसून रिले. त्यांना वाईट वाटत होते. संशयाची पिशाचे सर्वांच्या मानगुटीत बसलेली पाहून त्यांना खेद झाला. महाराष्ट्रातून विशाल दृष्टी विलुप्तच झाली का? उंच उंच गगनचुंबी पर्वत ज्या महाराष्ट्रात ठायी ठायी उभे आहेत, त्या महाराष्ट्रातील जनतेची मने उंच का नसावीत? युगधर्म नाही का कोणी ओळखणार? भारतवर्षाचे महान ध्येय- त्या ध्येयाभोवती यावे, त्या ध्येयार्थ झिजावे, मरावे असे का बरे कोणास वाटत नाही?

ते एकदम उठले. त्यांनी समाधीवर मस्तक ठेवले. ते म्हणाले, “देवा, तुझे पाय व माझे मस्तक यांची तरी ताटातूट होऊ देऊ नको. माझ्या डोक्यात नेहमी तुझ्याच पायांचे स्मरण असू दे आणि तुझे पाय म्हणजे काय ! 'पादोऽस्य विश्वा भूतानि ।'

हे सर्व प्राणी म्हणजे तुझे पाय तुझ्या पायांचे स्मरण करणे म्हणजे सर्व प्राणिमात्रांचे स्मरण करणे. मुसलमान, ख्रिस्ती, पारशी कोणीही मला भेटो; तुझे पाय मला तेथे दिसू देत, महार, मांग, चांडाळ भेटो, तुझेच पाय तेथे मला दिसोत.

" जेथे तेथे देखे तुझीच पाऊले सर्वत्र संचरले तुझे रूप"

असे मनात म्हणता म्हणता स्वामी गहिवरून गेले. केवढे उदात्त विचार! हिमालयातील शुभ्र. स्वच्छ गौरीशंकर शिखराप्रमाणे हे विचार उच्च आहेत. भारताच्या उशाशी हिमालय आहे. भारताच्या डोक्यावर हेच थोर विचार सदैव घोळत आले आहेत. परंतु हिमालयातील बर्फ वितळून खालच्या नद्यांना पूर येतात. खालची सारी भूमी समृद्ध हाते. त्याप्रमाणे हे डोक्यातील विचार खाली संसारात कधी येणार? प्रत्यक्ष व्यवहारात प्रेमाचे प्रवाह कधी वाहू लागणार? समाज सुखी व समुद्ध कधी होणार?

या थोर विचारांचा अनुभव घ्यावयास भारत अजून का उठत नाही ? संतांची सारी संताने का उठत नाहीत? उठतील, उठतील. जेथे हे विचार स्फुरले, तेथे एक दिवस ते मूर्तही होतील. भारतीयांनो, महान कार्य तुमची वाट पाहात आहे. तुम्ही क्षुद्र गोष्टीत काय लोळत पडला आहात? सर्व जगाला, सर्व विचारांना मिठी मारावयास उठा. सारे बळ तुमचेच आहे. सारी शक्ती तुमचीच आहे. आपली शक्ती दूर लोटून. तुम्ही पंगु व दुबळे होत आहात. तुम्ही अस्पृश्यांना दूर करता व स्वतःचे बळ कमी करता, ब्राह्मण ब्राह्मणेतर एकमेकांस दूर करतात व आपले सामर्थ्य कमी करून घेतात. अरे, आपापले हातपाय तोडता काय? तुम्ही कोट्यवधी शिरांचे व कोट्यवधी हातांचे आहात, आपत्ती डोकी व आपले हात तुम्ही आपण होऊन काय छाटीत बसलात? केवढे तुमचे भाग्य, केवढे तुमचे सामर्थ्य! अरे करंट्यानो! ते दूर नका फेकू, दूर नका लोटू.

चंद्राला पाहून समुद्रावर लाटा उसळतात. त्याप्रमाणे ध्येयचंद्र डोळ्यासमोर आल्यामुळे स्वामींचींजेच हृदय शतविचारांच्या लाटांवर नाचत होते. ती समाधी, तो सरितप्रवाह, तेथील वाळवंट, त्या सर्व वस्तू एकच गोष्ट त्यांना सांगत होत्या. अनेक दगड एकत्र आले, संयमपूर्वक एकत्र आले व समाधी उभी राहिली. एकेक जलबिंदू प्रेमाने जवळ आला व नदी वाहू लागली. एकेक कण जवळ आला व वाळवंट बनले. स्वामींनी वर पाहिले. एकेक तारा जवळ येऊन सारे आकाश फुलले होते. स्वामींनी दूर पाहिले. एकेक मृत्कण जवळ येऊन ती दूर टेकडी उभी होती. सजीव, निर्जीव सृष्टी एकत्वाचा संदेश सांगत होती.

शब्द एकत्र येतात, सारस्वते बनतात, फुले एकत्र येतात व हार गुंफिले जातात. सूर एकत्र येतात व दिव्य संगीत निर्माण होते. शेकडो हाडे एकत्र येतात व हा देह बनतो. या देहात केवढे सहकार्य, किती प्रेम! पायाला काटा बोचला तर वरच्या डोळ्यांना पाणी येते! या लहानशा देहात सारा वेदान्त भरलेला आहे. सारी शास्त्रे येथे ओतलेली आहेत. परंतु कोण पाहतो? आंधळे, सारे आंधळे!

समाधीच्या पायऱ्यांवरून स्वामी खाली उतरले. नदीच्या पाण्यात ते शिरले. त्यांच्या डोळ्यातील भावगंगा खाली वाहत होती. ते खाली वाकले व म्हणाले, “हे सरिते! तू सागराकडे जात आहेस. मानवजात ऐक्यसागराकडे तू कधी ग जाईल? सांग, सांग- हे जगन्माते, सांग सांग."

“बाळ! मानवजात ऐक्यसागराकडेच जात आहे. तू घाबरू नकोस. नदी वाकडी गेली, तरी सागराकडेच तिची चाल असते. मानवजातीची पावले कधी वाकडे पडतील, परंतु शेवटी मानवजात प्रेमसागराकडेच जाणार!” नदी न बोलता बोलली.

स्वामीजी तेथल्या शिलाखंडावर बसले. डोळे मिटून बसले. ते का प्रार्थना करीत होते? का आपल्या अंतः सृष्टीत ते दिव्य ऐक्यसंगीत ऐकत होते? ते पाहा दोन तरुण येत आहेत. त्यांना कोण पाहिजे आहे? इतक्या रात्री का देव दर्शन घ्यायला आले होते?

“अरे तिथे हे खडकावर बसले आहेत; तेच ते." एकजण म्हणाला.

“होय, चल त्यांच्याजवळ जाऊ. परंतु त्यांच्याजवळ काय बोलायचे?” दुसरा म्हणाला.

“आपण आणलेला फराळ त्यांच्यासमोर ठेवू नि वंदन करू. न बोलताच जे बोलता येईल, ते बोलू." पहिला म्हणाला.

दोघे स्वामींजवळ येऊन उभे राहिले. जय-विजय उभे होते. तरुण भारत स्वामीजवळ उभा राहिला होता. हिंदू-मुसलमानांचा संयुक्त महान भारत त्यांच्या हाकेला ओ देऊन तेथे आला होता.

“येणार, येणार, मानव जात शेवटी एकत्र येणार,” एकदम स्वामी मोठ्याने म्हणाले, त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या समोर दोन तरुण उभे होते. वर आकाशातले तारे पावित्र्याच्या तेजाने थरथरत होते. ते दोन तरुणही कापत होते. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. शेवटी मुजावर म्हणाला, “स्वामीजी. "

“काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही माझ्याकडे का आला आहात? बसा,”

स्वामी प्रेमळ वाणीने म्हणाले. ते दोघे युवक खाली बसले. मधून ते स्वामींच्या तोंडाकडे बघत, मधून खाली बघत.

" काय हवंय तुम्हाला?” स्वामींनी विचारले.

“काही नको." कृष्णा म्हणाला.

“मग सहज आलेत ?” त्यांन पुन्हा विचारले.

“आम्ही तुम्हाला फराळाचे आणले आहे. दूध आणलं आहे.” कृष्णा म्हणाला.

“थोडे शेंगाचे दाणेही आणले आहेत.” मुजावर म्हणाला.

“माझी भूक तुम्हाला कोणी सांगितली?” स्वामींनी विचारले.

“आमच्या मनाने, ” कृष्णा म्हणाला. “ काढा तर फराळाचे. आपण तिघेही फराळ करू या." स्वामी म्हणाले.

स्वामींनी हातपाय धुतले. तेथे एक रुमाल पसरण्यात आला. त्यावर शेंगदाणे ठेवण्यात आले. स्वामीजी खाऊ लागले. ते त्या तरुणांनाही देत होते.

“तुम्ही संकोच नका करू. घ्या.” ते त्यांना म्हणाले. “तुम्हीच भुकेले असाल, तुम्हीच खा. आम्ही जेवून आलो आहोत.” कृष्णा म्हणाला.

“तुम्ही खा. आम्ही तुमच्याकडे बघत राहतो.” मुजावर म्हणाला.

“तुमचे नाव काय?” स्वामींनी विचारले.

“मुजावर.”

“आणि तुमचे ?”

“कृष्णा. "

“वा! माझ्यासमोर माझा ध्येयभूत भारत मी पाहात आहे. खरेच, केवढा धन्यतेचा क्षण, केवढी पवित्र वेळ! या, मला भेटा, तुम्ही दोघांना मला हृदयाशी धरू दे.” असे म्हणून स्वामींना त्या दोघांना उराशी धरले.

तिघे दूर झाले. खाणे-पिणे केव्हाच संपले. शेवटी स्वामीजी म्हणाले, “या तुमच्या अमळनेरात आज मला कधी न मिळालेला मेवा मिळाला. माझ्या आत्मारामाची कधी शांत न झालेली भूक, आज इथे थोडी फार शांत झाली. धन्य आहे हा गाव, धन्य ही संतभूमी, नवभारताचा, नवमहाराष्ट्राचा अभिनव जन्म इथे मी पाहात आहे. मला इथे आशा मिळाली, उत्साह मिळाला, नवचैतन्य मिळाले. "

“तुम्ही इथेच राहाल ?" मुजावरने विचारले. “तुम्ही इथे राहाल, तर किती सुरेख होईल!” कृष्णा म्हणाला.

“मला काहीच सांगता येत नाही. मी आज सुखावलो आहे खरा. आज मला थोडी शांत निद्रा येईल.” स्वामी म्हणाले.

“चला आमच्याकडेच." कृष्णा म्हणाला. “नको. मी त्या टेकडीवरच्या शिवालयात जातो. तिथेच देवाच्या पायांशी मला झोपू दे. देवाच्या विशाल आकाशाखाली झोपू दे." स्वामी म्हणाले.

“हे एवढे दूध प्या ना. आमच्याकडच्या गायीचं आहे.” मुजावर म्हणाला. “तुझ्याकडच्या गायीचे? दे, दे” असे म्हणून, अधीर होऊन, ते भांडे स्वामींनी ओढून घेतले व रिकामे केले. “आम्ही जातो," कृष्णा म्हणाला.

“मीही जातो." स्वामी म्हणाले.

त्या टेकडीवर येऊन स्वामींनी घोंगडी घातली. त्या घोंगडीवर मृत्युंजय शिवशंकराजवळ स्वामी झोपी गेले. भारताच्या दिव्य भाग्यासाठी तळमळणारा तो आत्मा तेथे झोपी गेला.
2
Articles
धडपडणारी मुले
0.0
1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले. माझे मनात ज्या शेकडो कल्पना येत असत, ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या व्यक्ती उभ्या राहत, त्या सर्वांतून हे पुस्तक निर्माण झाले आहे. माझे मनाच्या समाधानासाठी हे सारे मी हिहित असे. प्रत्यक्ष सृष्टीत अतृप्त राहिलेल्या शेकडो हदयांच्या भुका शांत करण्याचा हा एक मार्ग होता. ज्या व्यक्तिंना कृतीवीर होता येत नाही, ते वाचिवीर होतात.

एक पुस्तक वाचा