shabd-logo

२. संन्याशाचा संसार

23 June 2023

36 पाहिले 36
हृदयात सेवा वदनात सेवा।
 उतरे न हातांत ।
 करू काय देवा ।

पहाटेची वेळ होत आली. थंडगार वारा सुटला होता. स्वामींजींना रात्री गाढ झोप लागली होती. ते आज अजून कसे बरे उठले नाहीत? प्रार्थनेची वेळ तर होत आली. अमळनेरच्या मिलचा तो पाहा भोंगा झाला. स्वामी एकदम जागे झाले. ते उठले. क्षणभर अंथरुणात ते बसले. नंतर ते नदीवर गेले. शौच- मुख-मार्जन त्यांनी केले. स्नानही त्यांनी उरकून घेतले.

आता चांगलेच उजाडले. प्रकाश सर्वत्र पसरला. मिलमध्ये जाणाऱ्या लोकांची रांग लागली होती. मिलच्या चिमणीतून काळ्याकुट्ट धुराचे लोट वर जात होते व सर्वत्र पसरत होते. तिकडून ईश्वराचा पवित्र प्रकाश पसरत होता. आणि इकडून मानवाच्या यंत्रातील काळे धुराचे लोट वर जात होते. देव मानवाला वरून प्रकाश देत आहे, मानव त्याला धुराचे लोट परतभेट म्हणून पाठवीत आहे. त्या मिलमधील हजारो मजुरांची निराशेने व उपासमारीने काळवंडलेली जीवने म्हणजेच तो धुराचा लोट होय. त्या हजारों स्त्रीपुरुषांची दुःखे, त्यांचे अपमान, त्यांचा यातना, त्यांचे अविश्रांत श्रम, त्यांचे कढत सुस्कारे या सर्वांचा तो लोट बनला होता. ईश्वराच्या कानावर सारी अश्रू, त्यांचे दुःखाची कहाणी घालण्यासाठी हा लोट सारखा जात असतो, परंतु देव ऐकेल तेव्हा ऐकेल !

तो मिलचा धूर पाहून स्वामीजी अशांत झाले. प्रभातकाळची प्रसन्न वेळ होती. नवीन आशा, नवीन उत्साह हृदयात साठविण्याची ती वेळ होती. परंतु उजाडले नाही, तो हजारो गरिबांना पिळून काढणारी ती गिरणी पाहून स्वामींचा आनंद मावळला. 'कोण मला विरोध करणार? मी हजारो जिवांचे बळी घेणार ! हजारोंना बेकार करून, त्यांचे घरचे धंदे मारून, इथे माझ्या पायाशी त्यांना लोटांगण घालायला मी लावणार! हजारो जिवांची अब्रू मी धुळीत मिळवीन. मी लहान मुले पाहणार नाही, स्त्री-पुरुष पाहाणार नाही, अशक्त, सशक्त पाहाणार नाही. थंडी असो, उन्हाळा असो, दहा दहा तास मी सर्वांना इथे उभे करणार! त्यांना घाणेरड्या चाळी राहायला देणार, पत्रे तापून, आत मुले उकडून निघतील, अशा झोपड्या मी त्यांना बांधून देणार! माझी सत्ता कोण दूर करील? माझ्या मालकांच्या मोटारी कोण अडवील? माझ्या धन्यांचे राजविलासी बंगले कोण धुळीत मिळवील?' अशी घोषणा ती गिरणी पहाटेपासून करीत असते. साऱ्या जगाला, उजाडले नाही, तो अशी धमकी गिरणी देत असते. सायंकाळी पुन्हा तशीच धमकी देते.

स्वामीजी त्या धुराकडे पाहात राहिले, परंतु किती वेळ पाहणार! ते आपल्या घोंगडीवर येऊन बसले. ते काही पदे गुणगुणत होते, काही अभंग म्हणत होते. एक पद दुसऱ्या पदास जन्म देई. एक अभंगाचा चरण दुसऱ्या चरणास जन्म देई. जो चरण आवडे, तो स्वामी स्वतःशीच पुनः पुन्हा घोळून घोळून म्हणत. मध्येच डोळे मिटीत व मध्येच उघडीत. मध्येच टिचक्या वाजवीत, हाताने तोल घरीत.

एक वेळ करी या दुःखावेगळे । दुरिताचे जाळे उगवावे ।। आठवीन पाय हा माझा नवस। पुरवावी आस पांडुरंगा।।

हे चरण ते पुनःपुन्हा घोळीत होते. 'आठवीन पाय हा माझा नवस ।' हा चरण म्हणता म्हणता ते तल्लीन झाले.

शेवटी ते उठले. गावात जावे, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी घोंगडी उचलली, झटकली. इतक्यात कोणीतरी आपल्याकडे येत आहे असे त्यांना वाटले.

ते एक चाळीशीच्या वयाचे गृहस्थ आहे. अंगावर खादीची वस्त्रे होती. त्यांचे कपाळ उंच होते. डोळ्यात एक प्रकारचे भावनांचे पाणी खेळत होते. त्यांच्याबरोबर दोन मुलेही होती. ती तिन्ही माणसे स्वामींकडे आली. त्या तिघांनी स्वामींना प्रणाम केला. स्वामींनी त्यांना प्रणाम केला. स्वामी घोंगडी पसरू लागले. इतक्यात त्या दोन मुलांनी ती घोंगडी त्यांच्या हातातून घेतली व नीट खाली घातली. स्वामी म्हणाले, “बसा.” ते सभ्य गृहस्थ बसले. ती दोन मुले विनयाने जरा बाजूला बसली. स्वामीही बसले.

“आपण मला भेटायला आलात?" स्वामींनी बसले.

“होय,” ते गृहस्थ म्हणाले.

“काही काम आहे, की सहज आलात?” स्वामींनी विचारले. “आपला परिचय व्हावा म्हणून आलो आहो,” ते गृहस्थ म्हणाले.

थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. सूर्य-चंद्रासारखे, गुरू-शुक्रासारखे ते दोघे तेथे शोभत होते. गंगेस यमुना आली होती. कृष्णा गोदावरीस भेटू पाहात होती.

“आपण कुठून आलात?” त्या गृहस्थांनी विचारले.

"कुठून असे काय सांगू? मी भटकत असतो, हिंडत असतो. कधी पायी फिरतो. कधी आगगाडीने फिरतो. जिथे उतरावयास चाटेल, तिथे उतरतो. माझे जीवन म्हणजे वाऱ्यावरती वावडी आहे.” स्वामी म्हणाले.

“ ही वावडी परमेश्वर उडवीत असला, तर सारे भलेच होईल. तुम्ही आपल्या जीवनाचा पतंग त्याच्या हातात दिला आहे ना? तो तुम्हाला इकडे तिकडे नाचवीत आहे ना?" ते गृहस्थ म्हणाले.

“शेवटी तसेच सर्वांना म्हणावे लागते.” स्वामींजी म्हणाले. “आपले नाव काय?” त्या गृहस्थांनी विचारले.

“मला आता जग स्वामी या नावानेच हाक मारते, तसे पाहिले, तर मी स्वामी हसत म्हणाले.

स्वामी कशाचाच नाही. ना जगाचा, ना स्वतःचा. मी नाममात्र स्वामी आहे.”

“तुम्ही कायमचे कुठे नाही का राहत?"

“एके काळी तसे राहण्याचा प्रयत्न केला, परंतु मला समाधान होईना. मी मेघासारखा स्वैरसंचार करीत असतो,” स्वामी म्हणाले. “मेघाप्रमाणे वर्षाव करता, कोरडी जीवने ओली करता, संदेशाची गर्जना करता."

"कोरडी गर्जना करणारेही मेघ असतात." स्वामी म्हणाले.

“परंतु त्यांचे स्वरूप एकदम कळले. ते लपत नाही. तुमचे कालचे भाषण आम्हा सर्वांना आवडले. '

“छट्. ते आवडणे शक्य नाही. उगीच खोटं सांगू नका.” स्वामी म्हणाले. “खरोखरच तुमचे विचार मला आवडले. माझ्या हृदयात तेच विचार आहेत. ते बोलून दाखवायचे धैर्य नि सामर्थ्य माझ्याजवळ नाही.”

“काय, ते तुमचेही विचार असे आहेत? हे विचार स्वाभिमानहीनतेचे तुम्हाला नाही वाटत? महाराष्ट्राचा अपमान करणारे आहेत, असे नाही वाटत?” स्वामींनी विचारले.

“नाही, महाराष्ट्र तीन शतके मागे यावा, असे मला वाटत नाही. प्राचीन इतिहासातली स्फूर्ती व त्याग घेऊन आजच्या नवीन ध्येयांना आपण कवटाळले पाहिजे."

“तुमचे नाव काय?" स्वामींनी विचारले.

“गोपाळ . " ते गृहस्थ म्हणाले.

“तुम्ही काय करता?” स्वामींनी विचारले.

“मी इथे एक छात्रालय चालवतो," गोपाळराव म्हणाले.

"शाळेला जोडून आहे, की स्वतंत्र आहे?"

"स्वतंत्र आहे. "

“किती आहेत मुले?”

“दीडशे मुले आहेत!” गोपाळराव जरा अभिमानाने म्हणाले. “तुमचे छात्रालय विशिष्ट जातीसाठी आहे की काय?"

“नाही, ते सर्वसंग्राहक आहे. सर्व जातीची व सर्व धर्मांची मुले आहेत. " “किती आनंदाची गोष्ट! नाही तर आज पाहावे, तो प्रत्येक जातिजातीची छात्रालये निघाली आहेत. गुजर बोर्डिंग, लेवा बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, शिंपी बोर्डिंग! काय आहे समजत नाही. अशा संकुचित संस्थांतील मुले आपापल्या जातीपुरतेच पाहाणारी होतात, त्यांना व्यापक दृष्टीच येत नाही. नवभारत निर्माण करायचा आहे. परंतु एकीकडे पाहावे, तो ह्या छकलं छकलं करणाऱ्या वृत्तीस ऊत येत आहे." स्वामींजी म्हणाले.

“जोडण्यापूर्वीचे हे तोडणे आहे. नवीन माळ गुंफण्यासाठी प्रत्येक मणी स्वच्छ होत आहे. " गोपाळराव म्हणाले.

“स्वच्छ होत आहे की, अहंकाराने बुजत आहे. कुणास ठाऊक? भारतीय बंधुत्वाचे पुण्यमय अखंड सूत्र स्वतःमध्ये घालून घ्यायला हे मणी तयार होतील का?" स्वामींनी शंका प्रगट केली.

" श्रद्धेने व आशेनेच काम करावे लागते. पदोपदी शंकाच घेत बसले, तर थोर ध्येयांना कुणीच हात घालणार नाही." गोपाळराव निश्चयाने म्हणाले.

"तुमची जगात निराशा नाही होत?" स्वामींनी विचारले.

“मी निराशेच्या रानातून खूप भटकलो आहे. निराशेची विषण्णता मी अनुभवली आहे, परंतु पुनः पुन्हा आशेचे पल्लव फुटत असतात. तुमच्याकडेही

मी आशेने आलो आहे.” गोपाळराव म्हणाले. “मी तुम्हाला काय देणार? माझ्याजवळ काहीही नाही." स्वामी म्हणाले.

“माझ्याजवळ द्यायला काहीही नाही, असं जो म्हणतो, तो देवाचा अपमान करतो, असे मला वाटत असते. त्या श्रीमंत परमेश्वराची लेकरे इतकी कशी भिकारी, की त्यांच्याजवळ द्यायला काहीही नाही ? हा एक प्रकारचा अहंकार आहे. कधीकधी नम्रतेतून अहंकार बाहेर पडत असतो. हा अहंकाराचा नारू कुठून, कसा उत्पन्न होईल, याचा नेम नसतो.” गोपाळराव स्वस्थपणे बोलत होते.

“गोपाळराव, तुम्हाला काहीही वाटो, परंतु माझ्या मनातले तुम्हाला सांगितले.” स्वामी खिन्नपणे म्हणाले.

“काल सायंकाळचे शब्द ज्या पुरुषाच्या हृदयातून बाहेर पडले, ते श्रीमंत हृदय आहे. ते सागराप्रमाणे उचंबळणारं हृदय आहे. कालचे तुमचे भाषण ऐकून, मुले वेडी झाली.” गोपाळराव भावनेने बोलत होते. “खरेच. आम्ही कधीच असे भाषण ऐकले नव्हते. तुम्ही दोन तास काल बोलले असतेत, तरी कुणी उठले नसते.” त्या दोन मुलातला एक मुलगा म्हणाला.

"तुमचे विचार ऐकायला तरुण भुकेलेले आहेत. तरुणांच्या मनोभूमी ओसाड आहेत. त्यांच्यावर सहृदय मेघांचा सारखा वर्षाव झाला पाहिजे. स्वामी, तुम्ही ते करू शकाल. तुम्ही संस्थेत येता? हीच गोष्ट विचारायला मी आलो आहे. तुमचा आम्हाला फार उपयोग होईल," गोपाळराव म्हणाले.

" गोपाळराव, आजपर्यंत आशेने मी अनेक ठिकाणी राहिलो. एक वर्तमानपत्राच्या संस्थेत होतो, परंतु राष्ट्र बनवू पाहाणारी ती संस्था, म्हणजे एक चिखलाचे डबके होते. जातिभेद सर्वांच्या रोमरोमांत भिनलेले. कुणी ब्राह्मणाचे अभिमानी, कुणी ब्राह्मणेतरत्वाचे अभिमानी ! जिकडे तिकडे स्वार्थाचे बुजबुजाट, विशाल दृष्टी व उदार विचार या लोकांना सहन होत नाहीत. जो तो स्वतःला कोंडून घेत आहे. त्या संपादकमंडळातल्या सूत्रधाराशी माझे जमेना. ध्येय सोडण्याऐवजी मी ती संस्थाच सोडली. माझ्या ध्येयाचा निदान मी एक तरी पूजक नको का राहायला? अजून अस्पृश्यता सशास्त्र आहे, हेच यांचे तुणतुणे ! आज या विसाव्या शतकात, साम्यवादाच्या काळात अस्पृश्यतेचा शास्त्रर्थ सांगत बसणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्या जडमूढ संस्थेचा मी त्याग केला. तिथून दुसऱ्या एका मंडळात गेलो. ते अस्पृश्यांना जवळ घेऊ पाहात होते, परंतु मुसलमान म्हणजे त्यांना जसं वावडं आखाडे काढा. का? तर मुसलमानांना ठोकायला! मला आखाडे हवे आहेत, ते शरीर सेवेला बळकट असावे यासाठी. वाईट कुणीही करो, त्याला विरोध करायला शक्ती कमवा. मग तो हिंदू असो, वा मुसलमान असो.

“गोपाळराव, संकुचितपणाच्या हवेत माझा जीव गुदमरतो. मी तिथून उडून जातो. निळ्या निळ्या आकाशात हिंडणाऱ्या पक्ष्याला तुमचे पिंजरे कसे रुचणार? आपले विचार जिथे जमेल तिथे पेरीत जावे. कुठेही आसक्ती ठेवू नये. आतडे गुंतवे नये, असे मला वाटत असते. अमळनेरला आलो. काळ- वेळ आली. माझे हृदय मोकळे केले. उद्या दुसरीकडे. आज इथे, उद्या तिथे.” स्वामी एक प्रकारच्या गूढ निराशेने बोलत होते.

“परंतु याचा उपयोग कितीसा होणार? कुठे तरी तुम्ही मूळ धरून बसले पाहिजे. बंधनात घालून घेतल्याशिवाय विकास नाही. बीज जर एके ठिकाणी जमिनीत नीट गाडून घेणार नाही, तर वृक्ष कसा होईल? बी सारखे हवेत उडत राहील, तर त्याला अंकुर फुटणार नाहीत. एका बीजाचे शेकडो दाण्यांचे कणीस होणार नाही. बी एके ठिकाणी स्वतःला पुरून घेते, परंतु शेकडोंना जन्म देते नि असे मध्येच कुठे तरी जाऊन पडते. हे एक प्रकारे पाप आहे. जे आपण पेरू, त्याची जर आपण काळजी न घेतली, तर ते मरेल. जो अंकुर लावू, त्याला जर पुन्हा पुन्हा पाणी न घालू, तर तो अंकुर करपेल. ही भ्रूणहत्या आहे, बालहत्या आहे. या मुलांच्या मनात काही विचार तुम्ही काल पेरलेत, ते का तुम्ही मरू देणार? मग ते पेरलेत तरी कशाला? लावलेले झाड वाढवायचे नसेल, तर लावूच नये. जन्माला येणाऱ्या बाळाची जर नीट काळजी घ्यायची नसेल, तर बाळाला जन्मच देऊ नये. स्वामीजी, मी स्पष्टपणे बोलतो. याची क्षमा करा. मी आहे स्पष्टवक्ता. " गोपाळराव म्हणाले.

“ मला मोकळेपणा आवडतो. मला तुमचा राग न येता उलट तुमच्याबद्दल आदर वाटत आहे. मला बंधने आवडत नाहीत, हे खरे. " स्वामी म्हणाले. “म्हणजे तुम्हाला जबाबदारी नको, हेच त्याचा अर्थ. " गोपाळराव म्हणाले.

“हो, एक प्रकारे तसे म्हटलेत तरी चालेल,” स्वामी म्हणाले.

“स्वामी, आज काल सेवा हा शब्द पुष्कळांच्या ओठांवर असतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात संकटे, विघ्न, विरोध, निराशा सहन करून, सेवा करीत राहाणे, स्थिर वृत्तीने अखंड सेवा करीत राहाणे, हे दुर्मीळ आहे. हृदयात सेवेची भावना असेल. ओठांना सेवा शब्दाचे वेड असेल, परंतु हातापायांना सेवेचे वेड लागल्याशिवाय फुकट आहे. स्वामीजी, तुम्हाला तुमचे विचार पसरवायचे असतील, तर तुम्ही माणसे तयार केली पाहिजेत. माणसे तयार करण्यासाठी तुम्ही संघ स्थापले पाहिजेत, आश्रम काढले पाहिजेत. एकाचे पाच, पाचाचे पन्नास, याप्रमाणे त्या त्या विचारांनी अंतर्बाह्य पेटलेले तरुण राष्ट्रभर गेले पाहिजेत. म्हणून मी म्हणतो, की आमच्या संस्थेत या. तिथे दीडशे तरुण मुले आहेत. नवविचार व नवभावना यांची त्यांना भूक आहे. द्या त्यांना विचारांची पौष्टिक भाकरी. मी त्यांच्या शरीरांना पौष्टिक नि जीवनतत्त्वांचा विकास करणारे अन्न देईन. तुम्ही त्यांची मनोबुद्धी पोसा, हृदय नि बुद्धी यांना तुम्हीच पोसू शकाल. तुम्ही मला 'नाही' म्हणू नका. अशा संस्थेत राहिल्याने तुमच्यासारख्यांच्या जीवनाचा संस्थेला फार उपयोग होईल. निदान काही दिवस प्रयोगादाखल तरी राहून पाहा." गोपाळराव उत्कटतेने बोलत होते.

“या तुमच्या संस्थेशी आणखी कुणाचा संबंध आहे” स्वामींनी विचारले. “कुणाचाही नाही. सहानुभूती पुष्कळांची आहे. मीच या संस्थेचा उत्पादक आहे. तुमच्यासारख्यांची जोड मिळाली, तर सोन्याहून पिवळे होईल. शाळेतले शिक्षण कसेही असो, परंतु आपण आपल्या छात्रालयातून तरी त्यांना नवीन दृष्टी देऊ, नवीन सृष्टी दावू.” गोपाळराव म्हणाले.

“गोपाळराव, जगात माझी विशेष आसक्ती कुठेच नसल्यामुळे, इथे हा प्रयोग करायला हरकत नाही. परंतु मला कोणतेही मुदतीचे बंधन घालू नका. ज्या दिवशी मला जावेसे वाटेल. त्या दिवशी मी निघून जाईन. हाच आपला नैतिक करार. जावेसे वाटणे, की मी जावे. तुम्हीही तुम्हाला वाटेल, तेव्हा मला घालवू शकाल.” स्वामी म्हणाले.

“चला तर मग. हे पाहा छात्रालयातले मुलांचे दोन प्रतिनिधी तुम्हाला न्यायला आले आहेत. स्वामीजी, मला किती आनंद होत आहे. तुम्ही याल असेच मला वाटले होते." गोपाळराव जरा कंपित आवाजाने म्हणाले. "हृदयाची खरी आशा विफल होत नसते. या अमळनेर स्टेशनवर मी उतरलो नि एका प्रकारे अननुभूत भाव माझ्या हृदयात कांल उत्पन्न झाला होता. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध या जागेशी आहेत की काय?' स्वामी म्हणाले. “आंतरः कोऽपि हेतुः । " गोपाळराव म्हणाले.

“आपण सारे पतंग आहोत नि देव ते उडवतोय. काही दिवस मला अमळनेरच्या निर्मळ हवेत उडवणारसं दिसतयं !” स्वामी म्हणाले.

"काही दिवस का? आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही." एक मुलगा म्हणाला.

“तुझे नाव काय?” स्वामींनी विचारले.

“नामदेव." तो मुलगा म्हणाला. “किती गोड नाव आणि किती गोड तुझे डोळे.” असे म्हणून स्वामीजी तुकोबांच्या अभंगातले चरण म्हणू लागले. "गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ।। " "तुम्ही राहिलेत तर ना आम्ही प्रेम देणार?” नामदेवाने विचारले.

“अरे राहातीलच ते. ते आता जाणार नाहीत." दुसरा मुलगा म्हणाला.

“आणि तुझे रे नाव काय?” स्वामींनी विचारले. “रघुनाथ.” तो मुलगा म्हणाला. "रघुनाथ साथै प्रीत बांधो होय तैसे होय रे ।" स्वामींनी चरण म्हटला.

"तुमची तर मुलांशी इतक्यातच मैत्री जडली.” गोपाळराव म्हणाले. “आता आपण निघायचे ना ? तुमची ही पिशवी मी घेतो." नामदेव म्हणाला.

“ते तिकडे धोतर वाळत आहे, ते तुमचेच ना? मी ते घेऊन येतो.” असे म्हणून रघुनाथ गेला.

निघायची तयारी झाली. स्वामीजी जरा सचिंतपणे उभे होते. गोपाळराव त्यांच्याकडे पाहात होते.

“मी पुन्हा बंधनात पडत आहे. 'बंधन काट मुरारी।' अशी मी देवाला नेहमी प्रार्थना करीत असतो.”

“आता मुलांची अज्ञानाची बंधन काढून टाकायला चला. स्वतःच्या जीवनाभोवतालची असत्कल्पनांची जाळी तोडून टाकलीत. या मुलांचे जीव त्यात गुरफटू नयेत, म्हणून ती काटायला चला. हे पवित्र काम आहे. मुलांच्या सान्निध्यात राहाणे, म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहाणे, मुलांचे राज्य, म्हणजे देवाचे राज्य. मुले म्हणजे देवाघरचा बगीचा. देवाच्या बागेतल्या काळ्या फुलवायला चला.” गोपाळराव म्हणाले.

“या कळ्या फुलवायला मी पात्र आहे का? जो स्वतःचा प्रभू असेल त्यानेच या देवराज्यात शिरावे, परंतु ज्याच्या हृदयात अजून साप-विंचू आहेत, त्याने जावे का? तो ते साप-विंचू मुलात सोडायचा. मुले फुलायच्याऐवजी मरायची. मुलांनी रागावू नये. असे मला वाटत असेल, तर मी रागावता कामा नये. मुलांनी आळशी राहू नये, असे म्हणेन, तर आधी मी सतत कर्मात मग्न असले पाहिजे. गोपाळराव. कठीण आहे हे काम. " स्वामी म्हणाले.

“कठीण आहे, म्हणूनच करण्यासारखे आहे. स्वतःच्या जीवनाचा त्यात खरा विकास आहे. जगात पूर्ण कोण आहे? सारे अपूर्णांकच आहेत. पूर्णांक झाला की, परब्रह्मात मिळाला. या देहात पूर्णांक मावणार नाही. एखाद्या मडक्यातल्या पाण्याचे जर गोठून बर्फ झाले, तर ते मडके फुटते. पूर्ण ज्ञान या जीवनात मावणार नाही. " गोपाळराव म्हणाले.

“मग जीवनमुक्त म्हणजे कल्पनाच का?" स्वामींनी विचारले.

“असे वाटते. ज्याप्रमाणे भूमितीतला बिंदू काढता येणार नाही. रेषा काढता येणार नाही, तसेच हे. म्हणून भूमितीत 'समजा' हा शब्द आपण योजीत असतो. खरा बिंदू व्याख्येतच राहातो. त्याप्रमाणे पूर्ण पुरुष ध्येयातच राहणार. त्या पूर्णत्वाच्या जवळजवळ गेलेले फार तर काही लोक दृष्टीस पडतील. पूर्णत्व या शरीरात भरताच शरीर गळून पडेल.” गोपाळराव म्हणाले.

“तुम्ही पुष्कळ विचार केलेला दिसतोय. खोल दृष्टीचे आहात तुम्ही.” स्वामी म्हणाले.

“परंतु तुमच्यातली भावनेची उत्कटता माझ्याजवळ नाही. एक प्रकारची स्वभावातली मधुरता माझ्याजवळ नाही. एक क्षणात ही दोन मुले तुम्ही आपलीशी केलीत. ती देवाची देणगी असते. काल तुम्हाला पहिल्यापासून मुले तुमच्यासाठी वेडी झाली आहेत. " गोपाळराव म्हणाले.

“स्वामीजी, आता चला. मुले वाट पाहात असतील.” नामदेव म्हणाला. “नाही तर आम्ही पुढे जातो. साऱ्या मुलांना आनंदाची वार्ता देतो,” रघुनाथ म्हणाला.

“खरेच, तुम्ही जा. सारी मुले जमवून ठेवा.” गोपाळराव म्हणाले.

“आम्ही तुमचे सामान घेऊन जातो." नामदेव म्हणाला. “नामदेव, माझ्याजवळ दे घोंगडी. तू घे पिशवी. प्रत्येकाजवळ काहीतरी असू दे." रघूनाथ म्हणाला.

" आणि माझ्याजवळ नको का रे काही?" गोपाळराव म्हणाले. " तुम्हाला तर मोठी वस्तू आणायची आहे." नामदेव म्हणाला.

"कोणती रे?" गोपाळरावांनी विचारले.

“स्वामीजी.” नामदेव हसत म्हणाला.

“अरे, मी किती काटकुळा आहे? त्यांना मी कसे आणू?” गोपाळराव म्हणाले.

“परंतु तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे." स्वामी म्हणाले. "बरं आम्ही जातो. स्वामी, जातो हां.” दोघे म्हणाले.

गेले. दोन्ही पक्षी पुढे उडून गेले. छात्रालयातली सगळी मुले एकदम त्यांच्याभोवती जमू लागली. त्यांच्याजवळ चौकशी करू लागली.

"ही त्यांची का रे पिशवी ?” एकाने विचारले. “आपण पाहू या तिच्यात काय काय आहे ते.” दुसरा म्हणाला.

“त्यांच्या परवानगीशिवाय आपण त्यांची पिशवी पाहाणे योग्य होणार

नाही. तो विश्वासघात होईल." नामदेव म्हणाला. “अरे, अशा पुरुषांजवळ आत-बाहेर काही नसते. त्यांचा सारा मोकळा

संसार असतो. " एक प्रौढ मुलगा म्हणाला.

"आणि ही त्यांची घोंगडी वाटते?” एकाने चौकशी केली. "आपण सारी मुले दरवाजाजवळ रांगेने उभी राहू या. स्वामीजी व गुरुजी

आले, म्हणजे आपण टाळ्यांचा गजर करू.” रघुनाथने सुचवले. “मी लवकर फुलांची एक माळ करतो." नामदेव म्हणाला.

“खरेच. चला, आपण फुले तोडू. नामदेव, चल." वासुदेव म्हणाला.

"इथला कचरा झाडून टाकायला हवा. आपण हे सारे लख्ख करून ठेवू

या." रघुनाथ म्हणाला.

मुले आवार स्वच्छ करू लागली. इतर मुलांनी आपापल्या खोल्यांतून स्वच्छता निर्माण केली. सर्वत्र नीटनेटकेपणा दिसू लागला. एखादा थोर पुरुष येणार, या कल्पनेनेच कामाची चक्रे भराभर फिरू लागतात. सर्वांच्या अंगात चैतन्य संचरते. मग तो महापुरुष प्रत्यक्ष चोवीस तास ज्यांच्याजवळ बसत उठत असेल, त्यांची जीवने कशी निरलस, धगधगीत व संस्फूर्त असतील, त्याची कल्पनाच करावी आणि सर्व विश्वाचा चालक जो विश्वंभर, तो रात्रंदिवस आपल्याजवळ आहे, आपल्या हृदयात आहे, ही ज्याला अखंड जाणीव असते, त्याचे जीवन किती सुंदर व पवित्र असेल? महात्माजीसारख्यांच्या जीवनात किती शांत तेज, किती पावनत्व, किती प्रसन्नत्व! महापुरुषाच्या जीवनाचे दर्शन, म्हणजे अनंताचे दर्शन!

नामदेव माळ करू लागला. त्याच्या रमणीय चेहऱ्यावर भाव-भक्ती पसरली होती. प्रत्येक फूल तो किती हळुवारपणाने ओवीत होता. सुंदर पुष्पहार तयार झाला. नामदेवने तो आपल्या हातात ठेवला. सारी मुले अर्धवर्तुळाकार छात्रालयाच्या द्वारापाशी उभी राहिली. ते पाहा येत आहेत. स्वामीजी व गोपाळराव येत आहेत. हसत, बोलत येत आहेत. द्वाराजवळ आले. मुलांनी टाळ्यांचा गजर केला. नामदेव पुढे झाला. त्याने स्वामींच्या गळ्यात ती सुंदर माळ घातली. दुसऱ्या एक मुलाने गोपाळरावांच्याही गळ्यात घातली.

“अरे मला कशाला? मी रोजचाच आहे. " गोपाळराव म्हणाले. “तुम्ही यांना आणलंत, म्हणून तुम्हालाही हवी.” एक मुलगा म्हणाला. "चला, सारे प्रार्थना मंदिरातच चला, ” गोपाळराव म्हणाले. सारी मुले प्रार्थना मंदिरात जमली. प्रार्थना मंदिर स्वच्छ होते. सुंदर तसबिरी तेथे लावलेल्या होत्या. तेथे शिरताच मनात पवित्र भावना उत्पन्न होत होत्या. मुलांनी उदबत्त्या लावून ठेवल्या होत्या. त्यांचा सुगंध दरवळला होता.

गोपाळराव व स्वामीजी आले. सारी मुले उभी राहिली.

“बसा." गोपाळराव म्हणाले.

मुले बसली. स्वामीजी व गोपाळरावही बसले. सर्व शांत झाल्यावर गोपाळराव उभे राहिले. ते काहीतरी बोलणार होते. मुले लक्ष लावून ऐकू लागली.

“मुलांनो, आज फार पवित्र दिवस आहे. आज एक थोर संत आपल्या संस्थेला लाभले आहेत. ते किती दिवस इथे राहातील याचा नेम नाही, परंतु त्यांना इतका मोह पाडा, की ते तुमच्यातून कधीही न जावोत. हे आता तुमच्या हातात आहे. तुम्ही चांगले व्हाल, चांगले वागाल, तर स्वामींना इथे राहण्यात आनंद वाटेल. वातावरण निर्मळ राखा. मी रत्न आणले आहे. ते न गमावणे हे तुमच्या हाती आहे. स्वामींना तुम्ही लुटा त्यांच्याजवळचे विचार पिऊन टाका व पुष्ट व्हा. गायीची भरलेली कास वत्स रिती करतो, त्याप्रमाणे तुम्ही स्वामींना रिकामं करा. स्वामी येणार, म्हणून तुम्ही सर्वत्र साफ-सफाई केलीत, परंतु ते आता कायमचे इथे राहणार, तर नेहमीच स्वच्छता राखा, शरीराची, मनाची, सभोवतालच्या वातावरणाची स्वच्छता राखा. तुमच्या ताब्यात मी स्वामींना देत आहे व तुम्हाला स्वामींच्या ताब्यात देत आहे. आता मी फक्त साक्षी राहीन.” असे म्हणून गोपाळराव खाली बसले.

स्वामीजी उभे राहिले. त्यांचे मन भरून आले होते. ते म्हणाले, “जगात मला एकच बंधन तोडता येत नाही नि ते म्हणजे मुलांचे. मी इतर सर्वांच्या इच्छा धुडकावून लावतो, परंतु मुलांची इच्छा मी भंगू शकत नाही. आज गोपाळरावांबरोबर ही दोन मुले न येती, तर मी इथे आलो असतो की नाही, याची मला शंका वाटते. मुलांनी मला इथे खेचून आणले आहे. उंच पर्वत इकडे तिकडे भटकणाऱ्या मेघांना ओढून घेतात, प्रचंड जंगल मेघांना ओढून घेतात, त्याप्रमाणे इतस्ततः भटकणाऱ्या मला, तुमच्या प्रेमळ व थोर हृदयांनी ओढून घेतले आहे. तुमच्यात राहायला मी उत्सुक आहे. आपला हा सहवास एकमेकांना उत्साहप्रद, बलप्रद व स्फूर्तिप्रद होवो. आजपासून मी मुलांचा होत आहे. मुले म्हणजे माझे देव." असे म्हणून स्वामी खाली बसले. गोपाळराव स्वामींना म्हणाले, “एखादी प्रार्थना म्हणा. नवीन संसाराला प्रार्थनेने आरंभ होऊ दे."

"संन्याशाचा संसार, " स्वामी म्हणाले.

मुले हसली.

“एखादा अभंग म्हणा, ” गोपाळराव म्हणाले.

“काहीही म्हणा," मुले म्हणाली.

“देवांची आज्ञा झाली. आता म्हणतो,” असे म्हणून स्वामी गुणगुणू लागले. पद सुरू झाले. स्वामींचा मीठा आवाज त्या प्रार्थना मंदिरात भरून राहिला.

 मुले म्हणजे देव
 मुले म्हणजे देव
 मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ही ठेव । मुले. ॥
 त्यांना देई सारे काही
 त्यांची चिंता सदा वाही
 त्यांना आधी पोटभर, मागून तू रे जेव । मुले. ।।
 हसव त्यांना, खेळव त्यांना
 फुलव त्यांना, खुलव त्यांना
 आनंदाच्या विकासाच्या वातावरणी ठेव ।। मुले. ।।
 भविष्याचे कोमल मोड
 भविष्याच्या कळ्या गोड
 भविष्याचे विधाते है, भक्तिभावे सेव ।। मुले. ॥

गाणे म्हणून स्वामी एकदम निघून गेले. गोपाळरावही न बोलता उठले. मुलेही शांतपणे क्षणभर बसली व मग उठली, “मुले म्हणजे देव, मुले म्हणजे देव.' हेच चरण वातावरणात भरून राहिले.
2
Articles
धडपडणारी मुले
0.0
1932 - 33 साली नाशिकच्या तुरूंगात असताना मी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. ते लिहिल्यानंतर धडपडणारी मुले हे पुस्तक लिहिले. माझे मनात ज्या शेकडो कल्पना येत असत, ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या व्यक्ती उभ्या राहत, त्या सर्वांतून हे पुस्तक निर्माण झाले आहे. माझे मनाच्या समाधानासाठी हे सारे मी हिहित असे. प्रत्यक्ष सृष्टीत अतृप्त राहिलेल्या शेकडो हदयांच्या भुका शांत करण्याचा हा एक मार्ग होता. ज्या व्यक्तिंना कृतीवीर होता येत नाही, ते वाचिवीर होतात.

एक पुस्तक वाचा