अन्नाची खरी किंमत...
सकाळी साडेसहाला मला जाग आली...मी खाली फरशीवर चटई टाकून झोपलेलो होतो...कारण अंगदुखी ! असे म्हणतात फरशीवर चटई टाकून झोपल्यावर अंगदुखी कमी होते... उठलो ! पाणी प्यायलो आणि पुन्हा चटईवर झोपण्याऐवजी बेडवर जाऊन झोपलो. त्या मऊ मुलायम बेडवर मला पुन्हा गाढ झोप लागली..मी माझ्या मोबाईलमध्ये सातचा अलाराम लावून ठेवला होता...तो रोजच वाजतो ते ही तीन वेळा पाच - पाच मिनिटांनी पण बहुदा मी पहिल्याच अलारामला जागा होतो...पण काल रात्री भरपेट खिचडी खाल्ल्यामुळे असेल कदाचित ! मला गाढ झोप लागली असावी...आमच्या इमारतीत सकाळी सव्वा सातला पाणी येते...घरचे सगळे गावी गेल्यामुळे पाण्याचा फार वापर होत नसल्यामुळे पाण्याची टाकी जवळजवळ भरलेलीच होती...त्यात काल रात्री मी पाण्याचा कॉक बंद करायला विसरलो होतो...आणि मला वेळेत जागही आली नाही...त्यामुळे पाण्याची टाकी लगेच ओव्हर फ्लो झाली आणि पाणी किचनच्या भांड्यात जमा होऊन तेथेही ओव्हर फ्लो होऊन फरशीवर पडू लागले नशीब मला पाण्याचा आवाज ऐकून जाग आली म्हणून नाहीतर घरात स्विमिंग पूल तयार झाला असता... त्यानंतर फरशिवरील पाणी पुसून जमा करता करता मला नाके नऊ आले...माझे कंबरडे मोडले अक्षरशः सकाळी लवकर न उठण्याची माझ्या आयुष्यात मला मिळाली ही सगळ्यात मोठी शिक्षा होती असेच म्हणावे लागेल...ती फारशी पुसायला जवळ - जवळ माझा एक तास गेला..रोजच्या रोज पाणी भरून ठेवण्याचा मला अक्षरश:राग आला...पण माझ्या मनात असा विचार चुकूनही आला नाही की आता आपल्याला लवकर उठण्याची सवय पुन्हा लावायला हवी ! काल तांदळाची खिचडी खाण्याचा कंटाळा आला म्हणून की काय मी चपात्या बनविण्याचा विचार केला...बरीच वर्षे झाली मी चपात्या बनवल्या नव्हत्या. चपात्या लाटणे ते तर अवघड असतेच पण त्याहून अवघड असते ते म्हणजे पीठ मळणे ! आई म्हणाली होती,'' कोणाला तरी मी सांगते रोज चार चपात्या द्यायला ! तर मी तोऱ्यात नको ! म्हणालो होतो. खरं तर मला लहानपणापासून कशासाठी ! कोणावर अवलंबून राहायला नाही आवडत आणि आपल्यामुळे इतरांना त्रास द्यायलाही नाही आवडत... खरं तर अन्न हे आपल्या प्रेमाच्या माणसाने तयार केलेलेच आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते...त्यात स्वतः तयार केलेले तर अधिकच उत्तम ! आपण तयार केलेले अन्न कसेही असले तरी आपण ते चवीने खातो...मला उत्तम स्वयंपाक येतो कारण तो मी माझ्या लहानपणीच करायला शिकलो होतो...आता बरीच वर्षे सलग स्वयंपाक न केल्यामुळे आता स्वयंपाक करणे थोडे अवघड वाटते पण यावेळी सलग दोन आठवडे बाहेरचे खाणे माझ्या तब्बेतीला सध्यातरी झेपणार नव्हते...शेवटी हिंमत करून मी एकदाचे पीठ मळायला घेतले आणि वेड्यावाकड्या चपात्या लाटल्या शेवटी...चपात्या भाजल्या म्हणजे जरा करपवल्याच ! मला करपलेल्या चपात्याच आवडतात ... चपात्या छान म्हणजे खाण्या योग्य झाल्या होत्या...चपात्या म्हटल्या की त्या ओघाने भाजीही आलीच ! भाजी काय करावी हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला ! मग काय कांद्याची फोडणी देऊन मसाल्यात सोयाबिनची भाजी केली...सकाळची उरलेली खिचडी फ्रिजमध्ये होतीच ! त्या चपात्या आणि खिचडीवर ताव मारून झाल्यावर भांडी घासण्याची वेळ जेंव्हा जवळ आली तेंव्हा ...ती भांडी बघूनच माझे डोके सटकले... नाईलाज को इलाज क्या ? भयंकर कंटाळा आला असतानाही मी भांडी धुवायला घेतली. त्यामुळेच त्या गडबडीत पाण्याचा कॉक बंद करायचा राहिला होता...सगळे गावी जाऊन आत्ताशे चार दिवस झाले होते...मी खिचडी उत्तमच करतो पण दोन वेळा खायला कंटाळा येतो म्हणून आज सकाळसाठी मी मॅगी आणि मल्टी ग्रेन ब्रेड आणला होता...बदल म्हणून पण ! तीन चार ब्रेड घशात कोंबल्यावर ते नको झाले मग ! मॅगी बनवून खावी लागली...मी सुट्टीवर होतो म्हणून नशीब नाहीतर खूप हालत झाली असती...बाहेरचे खाऊन दिवस काढावे लागले असते. म्हणजे मी ते जवळ जवळ काढतही होतो...खारी - बटर, केल्याची वेफर्स, चिवडा, मॅगी, चायनीज सुफ, बिस्कीट आणि भजी...खाऊन... अवघे चार- पाच दिवस घरातील कामे करून मला जीव अक्षरश: नकोसा झाला होता पण घरातील स्त्रिया ही कामे सातत्याने करत असतात तर त्याबद्दल त्यांची कधी काही तक्रार नसते...या कामापासून त्यांना थोडी सवड मिळते ती ही त्या आजारी पडल्यावर...आज बऱ्याच स्त्रिया नोकरी सांभाळून ही घरातील सर्व कामे करतात...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या ते उत्तम करतात पण भविष्यातील स्त्रिया हे असं करू शकतील असे मला वाटत नाही...
मी लहान असताना घरातील सर्व कामे मोठ्या उत्साहाने करत असे पण नंतर काही कारणाने ते मागे पडत गेले. लहान असताना मी पाट्यावर वरवंट्याने मसाला वाटत असे...त्या मसाल्याची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते पण आता ती चव अनुभवता येत नाही कारण मिक्सर...आता पाट्यावर मसाला वाटण्याची माझी हिंमत काही होणार नाही...पूर्वी लांबून विहिरीवरून पाणी आणून कपडे धुवायला कंटाळा येत नसे ! पण आज पाण्याने भरलेली टाकी आणि कपडे धुवायला वॉशिंग मशीन असतानाही रोज चार कपडे धुवायला कंटाळा येतो. ते कपडेही मी आता तीन - चार दिवसांनी एकदम धुतले...घरातील बायका रोज ढिगभर कपडे आणि भांडी धुतात तरी त्या साधी का- कु करत नाहीत...मी साधी खिजडी करतानाही कमीत कमी भांडी कशी वापरता येतील याचा विचार करतो पण धुताना कंटाळा येईल इतकी भांडी जमा होतातच... रोज पंचपक्वान्न बनविण्याऱ्या बायकांना किती भांडी घासावी लागत असतील...आम्ही चाळीत राहायला असताना आजूबाजूच्या बायका काही ना काही भाजी वगैरे द्यायच्याच आजूबाजुच्या मुली स्वयंपाकात मदत करायच्या...पण एकाच इमारतीत...खूप जास्त माणसे एकत्र असूनही मनाने खूप दूर असतात...खरं तर मला लहानपनापासून इमारतीचे आकर्षण होते पण ! आता ते आकर्षण संपले आहे...पूर्वी आमचे चाळीतील घर माणसांनी भरलेले असे ! आता ते तसे भरलेले नसते...रिकामे रिकामे असते...आमच्या गावच्या घरातील अंगण मात्र नेहमी माणसांनी गजबजलेले असते तेथे एकांत असा शोधूनही सापडत नाही...पुरुषांनाही सर्व स्वयंपाक यायला हवा ! या मताचा मी पूर्वीही होतो आणि आजही आहे.. त्यामुळे पुरुषांना स्त्रियांवर अवलंबुन राहण्याची वेळ येत नाही.. माझे किती तरी मित्र आहेत त्यांच्या घरातील स्त्रिया कोठे बाहेर गेल्या तर ते एक तर हॉटेलचा रस्ता पकडतात किंवा कोणा ओळखीच्यांकडे जेवणाची सोय होते का ते पाहतात. मला व्यक्तीश: दुसऱ्यांच्या घरी जेवायला अजिबात आवडत नाही त्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे एक तर मी शाकाहारी आणि त्यात पथ्य म्हणून मी बऱ्याच लोक रोज खाणाऱ्या भाज्या मी खात नाही. मला चमचमीत जेवण अजिबात आवडत नाही. पूर्वी जेंव्हा मी अंडी खायचो तेव्हा ! भाजीची काही समस्या नव्हती कारण तेव्हा मी रोज अंडी खाऊ शकत होतो आता ते ही नाही. मी अंड्याची बुर्जी आणि आमलेट उत्तम करायचो ! आता मी फक्त पोट भरण्यासाठी जेवतो... जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही... रात्री मी साधा भात आणि भाजी न बनविता सांभार बनविला पण शेवटी भात उरला ! तो मी फ्रिज मध्ये ठेवला कारण उद्या मला त्याचा फोडणीचा भात करायचा होता... फोडणीचा भात तर मला प्रचंड आवडतो... आमच्या घरात तो आजही फक्त मीच आवडीने खातो.. मी लहान असताना या फोडणीच्या भातावर तर कित्येकदा एक वेळ काढली होती... त्यामुळे मला अन्न वाया गेलेले अजिबात आवडत नाही... एक वेळ थोडे कमी खाल्ले तरी चालेले पण अन्न वाया जाता कामा नये ! असा माझा अट्टहास असतो... एक वेळ अशी होती की एक किलो तांदळासाठी काय काय जमा करून विकले होते... कसली कसली कामे केली होती...ते आज आठवले तरी अंगावर शहारा येतो... आणि तोच मी जेंव्हा एखाद्या पार्टीत १००० रुपये ताट असणारे ताट हातात घेतो तेंव्हाही मोजून त्यात फक्त तीन - चार पदार्थच घेतो...पण तेव्हाही मला नाही विसरता येत फक्त मसाला आणि मिठात घोळून खाल्लेला भात... आजची ही वेळ आणि कालची ती वेळ ! खूप काही बदललं पण मी नाही बदललो ! आजही माझे पाय जमिनीवर आहेत... कारण एकच मला अन्नाची खरी किंमत माहीत आहे...