बस नंबर ★★★
एक काल्पनिक विनोदी कथा
दोन दशकांपूर्वी एके दिवशी मला काही कामा निमित्तशांती नगर वरून प्रेमनगरला जायचे होते. शांतीनगर वरून प्रेमनगरला जायला एकच बस होती बस नंबर ★★★ आम्ही बस- स्टॉपवरजाण्यापूर्वीच ती बस स्टॉपवर लागली होती. बसच्या बाहेरून आत बसमधे पाहिले तर बस खचाखच भरलेली होती. कशीतरी धक्का बुक्की करत मी विजयासह बसमध्ये चढलो. बसमध्ये चढल्यावर मला एखाद्या रंगीबेरंगी फुलांनी भरलेल्या बागेत उभं राहिलो असल्याचा भास होऊ लागला. बसमध्ये माझी नजर जिकडे जाईल तिकडे फक्त रंगी बेरंगी कपडे परिधान केलेल्या सुंदर तरुणी दिसत होत्या. त्यांच्या उबदार खांद्याचा उबदार स्पर्श सारखा अनुभवता येत होता. आजूबाजूला इतक्या सुदर तरुणी पाहून मला तर घाम फुटत होता. मी माझा घाम पुसण्यासाठी खिशात हात घातला खरा पण घाम मात्र एका तरुणीच्या ओढणीने पुसला. माझं नशीब बलवत्तर म्हणून त्या तरुणीने ते पहिले नाही. नाहीतर माझ्या श्रीमुखात दिल्याखेरीज राहिली नसती. बसमधून पुढे सरकताना माझा पाय चुकून एका तरुणीच्या पायावर पडला. त्यावर ती तरुणी आई !...म्हणून जोरात ओरडली. ते ऐकून तिच्या बाजूची तरुणी तिला म्हणाली, तुला काय विंचू डसला काय ? त्यावर उत्तरादाखल ती म्हणाली, “ नाही मुंगळा डसला दोन पायाचा ! त्या गडबडीत एका लठ्ठ पण गोड तरुणीला माझा धक्का लागला. त्यावर घाबरून मी तिला सॉरी ! म्हटल्यावर ती गालात गोड हसून म्हणाली, इट्स ओके ! आमचा बस - स्टॉप जवळ येताच उतरता उतरता एका तरुणीची ओढणी माझ्या बॅगेच्या चैनीत अडकली. ओढणी थोडी पुढे ओढत नेल्यावर ते माझ्या आणि त्या तरुणीच्या लक्षात आले. मी तिची ओढणी चैनीतून काढण्यापूर्वीच ती तरुणी म्हणाली, “ अहो
! महाशय !! माझ्या ओढणीला कोठे नेताय ? हवं तर मी येते ! पण माझ्या ओढणीला सोडा. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिची ओढणी चैनीतून सोडवली आणि विजयासह बसमधून एकदाचा खाली उतरलो.
खाली उतरल्यावर मला थोडं मोकळं मोकळं वाटू लागलं. इतक्यात विजयने बसमधील एका तरुणीला हात उंचावून टाटा केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून तिनेही टाटा केला. बस निघून गेल्यावर मी विजयला म्हणालो, “ त्यावर तो हसून म्हणाला, “ ती माझी बसफ्रेंड होती. त्यापूर्वी मी फक्त गर्लफ्रेंड ऐकली होती. त्या बसफ्रेंड आणि तुझी ओळख कशी झाली ? या माझ्या भोळ्या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला, “ अरे ! काही नाही एक दिवस तिच्याकडे बसमध्ये तिकीट काढायला पैसे सुट्टे नव्हते. मग मी तिची तिकीट काढली होती. असंच बोलता बोलता आमच्यात फ्रेंडशिप झाली. मग ! या बसफ्रेंडला गर्लफ्रेंड करायचा विचार नाही ना ? त्यावर तो हसून म्हणाला, या बस नंबर ★★★ मध्ये माझ्या अशा दहा बसफ्रेंड आहेत. त्यावर कपाळाला हात लावत त्याला म्हणालो, या बसमध्ये इतक्या तरुणी का असतात ? त्यावर तो म्हणाला याच्या पुढच्या स्टॉपवर एक महिला कॉलेज आहे. त्या महिला कॉलेजात जायला आपल्या शांतीनगरहून ही एकच बस आहे. आपली सोनल त्याच कॉलेजला जाते. च्यामारी ! माझी बहिण कोणत्या कॉलेजला जाते मला माहित नाही पण ह्याला बरोबर माहीत आहे.
त्या विभागातील आमचे काम आटपून काही तासांनी आम्ही परत त्याच बस स्टॉपवर आलो. जवळ जवळ अर्धातास वाट पाहिल्यावर एकदाची बस नंबर ★★★ समोरून येताना दिसली आणि आमच्या जीवात जीव आला.
बसमध्ये चढून पाहिलं तर प्रत्येक खिडकीवर एक तरुणी बसली होती. त्यामुळे विजय आणि मला दोन वेगवेगळ्या तरुणींच्या बाजूला बसावे लागले. विजय त्याच्या एका बसफ्रेंडच्या बाजूला बसला आणि मी एका आधुनिक तरुणीच्या म्हणजे जीन्स आणि टी शर्ट परिधान केलेल्या तरुणीच्या शेजारी हळूच बसलो. मी त्या तरुणीच्या शेजारी बसताच काही तरुणी आमच्याकडे मागे वळून वळून पाहू लागल्या. त्यावेळी मला पिंजऱ्यात असलेल्या वाघाची आठवण आली ज्याला पिंजऱ्याबाहेरील लोक कुतूहलाने पाहात असतात.
पण त्यांच्याकडे पाहून पिंजऱ्यातील वाघ मात्र अस्वस्थ होत असतो कारण त्याला हे कळत नसत की हे बाहेरील लोक नेमकं त्याच्यात पाहता काय आहेत ? थोड्या वेळाने माझ्या बाजूची तरुणी उठल्यावर आमच्या मागचीही तरुणी उठली. उठता उठता ती माझ्या बाजूला बसलेल्या तरुणीला म्हणाली, काही म्हण कविता ! पण तू भाग्यवान आहेस रोज कोणी ना कोणी तुझ्या बाजूला बसतोच त्यावर ती गालात गोड हसून म्हणाली, “ ही माझ्या भाग्याची कमाल नाही तर माझ्या जीन्स आणि टी - शर्टची कमाल आहे. मी मनातल्या मनात म्हणालो , “ ही रोज हेच कपडे घालते की काय ?” ती उतरली त्याच स्टॉपवर दुसरी एक तरुणी बसमध्ये चढली ती नेमकी माझ्या जवळ येऊन मला म्हणाली, मी येथे बसू का ? त्यावर मी थोड्या रागातच म्हणालो, ही बस काही माझ्या बापाची नाही ! त्यावर उलट उत्तर देत ती म्हणाली, “माझ्या बापाचीही नाही म्हणून तुम्हाला विचारलं.” त्यांनतर ती हळूच माझ्या बाजूला बसली. मी खिडकीतून बाहेर पाहत असताना ती म्हणाली, “ मला वाटतं मी तुम्हाला कोठेतरी पाहिलं आहे ! हो ! आठवलं तुमचा फोटो कोणत्यातरी वर्तमानपत्रात पहिला आहे ! हे ऐकून आमच्या पूढे बसलेली तरुणी मागे वळून म्हणाली, हा काय तुला शाहरुख खान वाटला याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला. त्यावर माझ्या बाजूची तरुणी तिला म्हणाली , ए ! चिमणे गप्प बस !! सारखी मध्ये मध्ये चिवचिव करतेस ! तुम्ही वर्तमानपत्रात लेख लिहिला का ? तिने माझ्याकडे पाहत प्रश्न विचारला. त्यावर मी म्हणालो, “वर्तमानपत्रात लिहिणं तर सोडा मी ते वाचतही नाही.” त्यावर तिने का वाचत नाही ? असा प्रश्न केल्यावर मी म्हणालो, त्यासाठी आगोदर लिहिता वाचता यायला लागतं ! त्यावर ती हसून म्हणाली , हो ! आपल्या देशातील निम्मे लोक निरक्षर आहेत पण हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही काहीच करत नाही ! त्यावर पुढची तरुणी म्हणाली, साक्षरता मोहीम काढतो ती शिकलेल्या लोकांची ! तिच्याकडे लक्ष न देता तिने मला पुन्हा प्रश्न केला , “ तुम्ही शिकला का नाहीत ? “ त्यावर पुढची तरुणी पुन्हा मधेच म्हणाली, “आपल्या देशाला शिकलेल्या लोकांपेक्षा शिलवान लोकांची जास्त गरज आहे म्हणून असेल. पण हे शिलवान आहेत हे तुला कोणी सांगितलं ? त्यावर ती तरुणी म्हणाली, “ते फक्त शिलवानचनाही तर विश्वामित्रही आहेत. हवं तर विचार त्यांना ! त्यावर ती म्हणाली, “ खरंच तुम्हाला कोणी मेनका भेटली नाही ? या बस नंबर ★★★ ची जर तुमच्यावर कृपा झाली तर नक्कीच तुम्हालाही भेटेल एक मेनका कारण तुम्ही अशिक्षित असलात तरी तुमच्या चेहऱ्यात एक वेगळं तेज आहे. तुमची नजरही शोधक आहे. एखाद्या लेखकासारखी ! मिस्टर स्वप्नील जाधव ! तिनं माझं नाव घेताच मी म्हणालो, तू मला ओळखतेस ? त्यावर ती हसून म्हणाली, “ हो ! ओळखते !! मी वर्तमानपत्रातील तुमचे सर्व लेख वाचले आहेत, तुमचा कविता संग्रह ही आहे माझ्याकडे , दिवाळी अंकातील तुमच्या कथा ही वाचल्या आहेत. आज बसमध्ये तुम्हाला पाहून खरंच खूप आनंद झाला होता. पण तुम्ही इतके विनोदी असाल असं वाटलं नव्हतं. त्यावर मी म्हणालो, मलाही खूप आनंद झाला ! मिस प्रतिभा पवार ! त्यावर ती हसून म्हणाली ,पण तुम्ही मला कसे ओळखता ? त्यावर मी म्हणालो, ही पुढची चिमणी आणि तुझी मैत्रीण म्हणजे सोनल माझी बहिण आहे. त्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि ती सोनलकडे पाहत म्हणाली, “ काय ? चिमणे ! तू मला कधी सांगितले नाहीस की हे तुझे दादा आहेत म्हणून. त्यावर ती म्हणाली, “ तू विचारलं नाहीस आणि मी सांगितले नाही.” पण मी तुमच्या घरी येते तेव्हा ते कधी दिसले नाहीत? त्यावर ती म्हणाली, “ तो विश्वामित्र आहे ना ! तूच काय ? माझी कोणतीही मैत्रीण घरी आल्यावर तो बाहेर येत नाही !! पण तुला पाहिल्यावर त्याने तुझे नाव मात्र विचारले होते ! तिचे बोलणे समजून न समजल्यासारखे करत प्रतिभाने मला प्रश्न केला, तुमच्या पुढच्या कथेचं नावं काय असेल ? त्यावर पुन्हा सोनल म्हणाली, “माझ्या प्रिय मैत्रिणी..याच्या पुढच्या कथेच नाव नक्कीच बस नंबर ★★★ असेल, त्या कथेची नायिका तू असशील तर नायक हा असेल आणि असून अडचण आणि नसून खोळंबा मी असेन... त्यावर ते सारेच मनमुरादहसले...
लेखक - निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए ,बी - विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई - ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058