shabd-logo

॥ २ ॥

2 June 2023

30 पाहिले 30
बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यात शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध जीवन आखले पाहिजे. कशाचाही अतिरेक असता कामा नये. अति देहदंड नको किंवा देहाचे फाजील लाडही नकोत; मधला मार्ग घ्यावा, असे प्रवचनाच्या आरंभी सांगून दुःखासंबंधीची चार सत्ये त्यांनी सांगितली आहेत. आणि नंतर दुःखनिरसनाचा उपाय त्यांनी सांगितला आहे.

( १) जनन म्हणजे दुःख; मरण म्हणजे दुख, रोग म्हणजे दुःख; अप्रियाची प्राप्ती म्हणजे दुःख; प्रिय वस्तूचा वियोग म्हणजे दुःख. जननमरण, रागद्वेष या विश्वव्यापक गोष्टी आहेत. त्या सर्वत्र आहेत, सदैव आहेत. जीवनात मेळ नसून विसंवादपणा आहे, त्यांच्या त्या खुणा आहेत. मनुष्याच्या दुःखाच्या मुळाशी विरोध आहे, झगडा आहे. आपल्या आध्यात्मिक रोगाच्या मुळाशी स्पर्धा असते. या यर्व क्षणिक व अशाश्वत जगात, या दृष्य पसाऱ्यात हा झगडा सर्वत्र भरून राहिला आहे. अशा या विरोधातून सुटका करून घेणे शक्य आहे व सुटका करुन घेतलीच पाहिजे.

(२) प्रत्येक वस्तूला कारण असते; प्रत्येक वस्तूचा परिणामही घडतो; हे साधे तत्त्व या सर्व विश्वात भरून राहिलेले आहे. देव व मानव स्वर्ग व पृथ्वी या सर्वाचा व्यवहार या एका तत्त्वानुसार चालला आहे. अमर्याद अवकाशात पसरलेले जे हे अनंत विश्व, या विश्वातील या अनंत ग्रहमाला, ही अनंत ब्रह्मांडे, आणि ह्यात पदोपदी होणारे हे अगणित फेरबदल, यांनाच केवळ कार्यकारणभावाचा कायदा लागू आहे असे नाही; तर मानवी जीवनात, ऐतिहासिक घटनांतही हाच कायदा कार्य करीत आहे असे दिसून येईल. दु:खाचे मूळ शोधून तेच जर उपटून टाकले गेले, तर दुख आपोआपच नाही होईल. दु:खाचे मूल कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे जगण्याची धडपड, जीवनाची हाव. कार्यकारणभावाच्या साखळीचे बारा दुवे यानंतर सांगण्यात आले आहेत व तेथे या गोष्टीचा अधिक विस्तार करण्यात आला आहे. अज्ञान व तृष्णा एकत्र बांधलेली आहेत, एकाच घटनेची तात्त्विक व व्यावहारिक अशी ही दोन रूपे आहेत. अज्ञानामुळे जीवनात बिघाड उत्पन्न होतो जीवनातील सर्वांगीण व्यवस्थेत भंग होतो. हे ज्ञान अतिरेकी व्यक्तिवादाच्या रूपाने प्रकट होते, स्वत:ला जगापासून अलग करण्याच्या रूपाने प्रकट होते, जगातील सुसंवादित्वाविरुद्ध बंड करण्याच्या रूपाने ते प्रकट होते. आणि त्यामुळे मग नानाविध वासना जन्मतात. अनेक प्रकारची हाव सुटते. आत्मा बद्ध होतो, जखडला जातो. आत्मा वासनांचा दास होतो, रडकुंडीस येतो. या बंधनातून मुक्त होण्यासाठी आत्मा धडपडतो. त्यातून मुक्त होता आले तर आत्मा आनंदेल. अज्ञानाचा नाश अंतर्ज्ञानाने, सहजस्फूर्त देवी ज्ञानाने होतो. वासनांचा नाश नैतिक धडपडीने, उत्तरोत्तर वर जाण्याच्या अविरत प्रयत्नशीलतेने होतो.

पूर्वग्रह नसणे ही गोष्ट सापेक्ष आहे. आपण संपूर्णपणे पूर्वग्रह विरहित आहोत असे स्वतः बुद्धही म्हणू शकले नसते. कर्म व पुनर्जन्म ही तत्त्वे ते जणू स्वतः सिद्धच मानतात. गृहीत सत्ये समजून स्वीकारतात. मनुष्य वागेल तसा बनेल. आपणच आपले भले वा बुरे नैतिक जग निर्मित असतो. प्रत्येक विचार, भावना, संवेदना, संकल्प यांचा परिणाम आपणावर, आपल्या वाढीवर, आपल्या विकासावर होत असतो. मानवजात सदैव स्वत:ला रंगरूप देत आहे; आकार देत आहे. त्या अदृश्य भूतकाळातून, भूतकालीन विचारांतून व घडामोडींतून आज जे आहे ते निर्माण झाले आहे. शाश्वत न्यायीपणाच्या सार्वभौम सत्तेखाली हे सर्व जीवन चालले आहे, असे बुद्धांस दिसते. आपल्या कर्माचे परिणाम आपणास कधीही चुकविता येणार नाहीत. दुःख, रोग, हानी, निराशा, अपयश, प्रेमाच्या वेदना व जखमा, हेतुंची, मनोरथांची विफलता, या सर्वांत नैतिक तत्व ओतप्रेत भरलेले आहे. नैतिकदृष्ट्या या सर्वांना महत्व आहे. नैतिक कार्यकारणभावामुळे या सर्व गोष्टींना निश्चितता प्राप्त होत असते. स्वार्थाचे शासन होते; नि:स्वार्थीपणाला पारितोषिक मिळते. मनुष्याला आज ना उद्या स्वतःच्या कृत्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे बुद्ध नि:शंकपणे म्हणत. त्यांची ही निश्चितता खोल व गंभीर होती. एझिकेलच्या अर्थपूर्ण शब्दांत म्हणायचे झाले तर, “आपणास आपल्या दुष्टपणाची लाज वाटेल आपल्या दुष्टपणामुळे आपणास स्वत:चा वीट येईल.” बुद्ध म्हणतात, “माझे कर्म हीच माझी मिळकत, हीच माझी संपत्ती, हाच वारसा. माझे कर्म म्हणजेच मला धारण करणारा गर्भाशय, माझे कर्म म्हणजेच माझी जात, माझा वंश. माझे कर्म म्हणजेच माझा आधार. "

कर्माचा जो हा कठोर कायदा, त्याचेही एक तारक असे सुंदर रूप आहे. कर्माच्या या कायद्यामुळे अंगावर काटा उभा करणाऱ्या भेसूर नरकाग्नीच्या छाया नष्ट होतात. शासन भोगण्याचे, कष्ट भोगण्याचे कोणतेही स्थान कायमचे नाही. स्वर्ग किंवा नरक सान्त व नाशिवंत वस्तूंतच अंतर्भाव होतो. स्वर्गसुख व नरकयातना कितीही दीर्घकाळ टिकणाऱ्या व उत्कट असोत, एक दिवस त्यांचा अंत होईल. त्यांचा अंत केव्हा, कधी, कसा व्हायचा ते आपणावर अवलंबून आहे. प्रत्येक नीच प्रवृतीला तिच्यावर संस्कार करून उच्च बनविणे, प्रत्येक क्षुद्र हेतूस ताब्यात ठेवणे, हीनदीन करणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या दुबळेपणास जिंकून घेणे, अशा रीतीने प्रयत्न करीत गेले पाहिजे. कर्माच्या कायद्याचा असा मात्र अर्थ करता कामा नाही, की जगातील दुःख वा दारिद्र्य हा ज्याच्या-त्याच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे आपणास त्याच्याशी काही कर्तव्य नाही. जर कोणास असे वाटेल, सर्व सजीव सृष्टीचे जे व्यापक बंधुत्व, त्याचे विशाल प्रतिबिंब जर कोणाच्या हृदयात पडणार नसेल, तर त्याच्या बाबतीत कायदा कठोरता दाखवील. दया व क्षमा यांचा कर्ता होण्याचे जो नाकारतो. त्याच्या बाबतीतही कर्माचा कायदा निष्ठुर होईल. हा जो कर्माचा कायदा तो कोणा अधिष्ठात्री देवतेकडून चालविला जात असतो. लहरी देवदेवतांचे गोंधळात पाडणारे बंड येथे नाही. 'ईश्वरी अन्याय' असले गूढ शब्दप्रयोग येथे नाहीत.

मनुष्यप्राणी म्हणजे रूप, वेदना, संज्ञा यांचा संघात आहे. रूप म्हणजे हा देह, ही इंद्रिये, शरीराची हालचाल करण्याची शक्ती. वेदना म्हणजे भावना; संज्ञा म्हणजे विचार. तसेच ज्या पंच विषयांच्या द्वारा आपण बाह्य जगाशी परिचित होतो, त्यांचाही अंतर्भाव यात आहे. आणि आजच्या आपल्या वृत्ती, आवडीनिवडी, नानाविध शक्ती ज्या भूतकालीन कर्मातून निर्माण झालेल्या संस्कारामुळे आपणास प्राप्त झालेल्या असतात, त्या संस्काराचाही वरील संघांतात समावेश असतो. या संस्कारांमुळेच पूर्वजन्मातील सत्कर्माचा वारसा या जन्मी आपणास प्राप्त होत असतो. आणि या सर्वांच्या डोक्यावर ते विज्ञान असते. हे विज्ञान आपल्या सर्व मानसिक क्रियाकर्माना व्यापून असते. इंद्रियगम्य कल्पनेपासून तो इंद्रियातील ध्यानापर्यंत या विज्ञानाचा पसारा व प्रभाव असतो. मनुष्याचे आंतरिक जीवन म्हणजे वासना, विचार, रागद्वेष यांची एक अखंड परंपरा. या सर्वांना एकत्र राखणारा हा शरीराचा बंध जेव्हा मरणसमयी गळून पडतो, तेव्हा अदृश्य अशा शक्ती एक नवीन व्यक्ती सृजितात. ही व्यक्ती मनोमय जणू असते व मृतात्म्याचे जीवन पुढे चालवते. त्या पूर्वपुरुषाने जे काही बरेवाईट केले असेल, त्याची कटु वा मधुर फले भोगावयास ही लिंगदेहात्मक व्यक्ती उभी राहते. या व्यक्तीला वासनात्मक पुरुष म्हणा वाटले तर. या दृश्य व्यक्तीला बनविणाऱ्या सर्व अंतर्बाह्य अणुरेणूंत सारखा बदल होत असतो. परंतु बदल होत असला तरी त्यांचा निःशेष नाश होत नाही. जोपर्यंत त्यांना सर्वत्र एकत्र ठेवणारी शक्ती नष्ट होत नाही, पुन्हा जन्मास यावे असे वाटणारी वृत्ती जोपर्यंत नष्ट होत नाही, जोपर्यंत जीवनाची असोशी आहे, पुन्हा स्वतंत्र अस्तित्व असावे अशी जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत व्यक्तीला बनविणाऱ्या घटकांत बदल होत असला तरी त्यांचा संपूर्ण नाश होत नाही.

जर शाश्वत, अविचल असा आत्मा नसेल, तर अनात्म्याने केलेल्या कर्मांचा कोणावर परिणाम होतो? बुद्धांचे उत्तर असे की, “जो वासनांचा दास आहे, तो मनाच्या पलीकडे कसा जाईल ? ” बुद्धधर्माच्या आरंभीच्या पुस्तकांतून या अडचणींचा नीट उलगडा केलेला दिसत नाही. एकच उत्तर देण्यात येते की, मानसिक अखंडता असते. ज्याला आत्म्याचा स्वभाव समजला आहे, अनेक जन्मांतून हा जीवात्मा चालला आहे है जो समजून आहे, त्याला कोणताही एक जन्म, जरी त्या जन्माचे परिणाम पुढील भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असले, तरी फारसा महत्त्वाचा वाटणार नाही.

(३) अज्ञानाचा निरास होण्यासाठी कठोर नीती आवश्यक आहे. शील व प्रज्ञा यांचा अविभाज्य संयोग आहे. सदाचार व सहजस्फूर्त अंतर्दृष्टी यांचे कधी न तुटणारे ऐक्य आहे. परंपरा स्मृती, विधिनिषेध, रूढी, नीतिनियम, इत्यादींविषयी बुद्ध कधी बोलत नाहीत. सुखी होण्याचा मार्ग म्हणजे हृदय मांगल्याने भरून ठेवणे. ज्याच्याजवल मंगल हृदय आहे आणि सत्कर्माच्या रूपाने प्रकट होणारे मन आहे, त्याच्याजवळ सुखाचा मार्ग आहे. मनाचे मांगल्य, विचारांतील व आचारांतील निर्मळ, निर्भेळ असे शिवत्व, हा बुद्धांच्या धर्माचा पाया आहे. बुद्धकल्पित परिपूर्ण, अव्यंग जीवनात देवदेवतांची अडगळ नाही; बाहेरच्या शक्तीशी संबंध नाही. तुमचे बरेवाईट तुमच्या स्वाधीन आहे असे ते सांगतात. ते शिष्यांना अनेकदा पुढील उपदेश देताना आढळतात, “शिष्यांनो, इकडे या. दुःख दूर व्हायला हवे असेल, तर पवित्र जीवन जगा. "

पूर्णतेकडे जाण्याचा सोपान म्हणजेच बुद्धांनी सांगितलेला अष्टविध मार्ग. पहिली पायरी म्हणजे सम्यक दृष्टि असणे; चार सत्यांचे ज्ञान असणे. हे ज्ञान म्हणजे उपनिषदांतील ज्ञान नव्हे, देव वगैरे मानणाऱ्यांच्या श्रद्धेशीही या ज्ञानाचा संबंध नाही. परंतु केवल बुद्धीने सत्याचे आकलन केल्याने ज्ञान जिवंत होत नसते. जी सत्ये आपणास कळली ती स्वतःच्या जीवनात आपण प्रकट केली पाहिजेत, सिद्ध केली पाहिजेत, अनुभवली पाहिजेत, शोधली पाहिजेत. असे केल्यानेच ज्ञान सजीव होते, प्राणमय होते. पहिले पाऊल म्हणजे सदैव जागरूक असणे, भानावर असणे. ज्या मार्गाने गेल्यास आपण सत्यच्युत व ध्येयच्युत होऊ, तो मार्ग चुकूनही न घेण्याची सदैव दक्षता म्हणजे ही पहिली पायरी. केवल तात्पुरता मनात बदल होणे असा येथे अर्थ नाही. तर आत्म्याच्या खोल आंतरिक जीवनावर परिणाम घडवणारे मूलग्राही परिवर्तन, एक नवीन योजना, असा याचा अर्थ.

ही पहिली पायरी दुसऱ्या पायरीकडे नेते. दुसरी पायरी म्हणजे सुखभोगांच्या त्यागाचा निश्चय; कोणासही अपाय न करण्याचा, कोणाचाही द्वेषमत्सर न करण्याचा निश्चय. सम्यक भाषणासाठी असत्य, निंदा, शिव्याशाप, लागेल असे बोलणे, वायफळ गप्पा यांचा त्याग करायला हवा. सम्यक् आचार म्हणजे कोणतीही हिंसा न करणे; जे आपणास लाभलेले नाही त्याविषयी उदासीन असणे; शारीरिक सुखभोगांस मर्यादा घालणे, शरीराचे फार चोचले न पुरवणे सम्यक जीवन म्हणजे जगण्याचे जे जे निषिद्ध प्रकार, त्यांनी उपजीविका न करणे; उदाहरणार्थ, उंटावर किंवा बैलावर माल लादून व्यापार करणारे लमाण न होणे; दासांचा व्यापार न करणे; खाटिक न होणे; मादक पदार्थ, विषारी पदार्थ यांचा व्यापारी न होणे; जकातदार किंवा खानावळवाला न होणे. बुद्धांनी सैनिक होण्यास कधीही संमती दिली नाही. भिक्षूंनी कधीही सैनिक होऊ नये, असे त्यांनी आज्ञापिले.

बुद्धांचा जो हा अष्टविध मार्ग आहे, तो नीतिनियमांची एक जंत्री नाही. जीवनाचा हा विशिष्ट मार्ग आहे. सम्यक प्रयत्न म्हणजे ज्या दुष्ट प्रवृत्ती मनात दृढमूल झालेल्या असतील, त्या नष्ट करणे व सत्प्रवृत्तींना पोसणे; उत्तरोत्तर अधिक पूर्णतेकडे जाणे. मनोविकासाचा हा आरंभ आहे. आत्मपृथक्करणाची सवय असणे चांगले. आपल्या वरवरच्या मानसिक जीवनाच्या खाली मनाचा जो अपरंपार भाग आहे, त्याची नीट कल्पना येण्यासाठी आत्मपरीक्षण फार उपयोगी पडते. दुष्ट वासना-विकार, नाना लोभ, स्वार्थ, तृष्णा, यांची खोल गेलेली पाळेमुळे खणून काढण्यास आत्मपरीक्षणाची आवश्यकता असते. गुंतागुंतीच्या या मानसिक व शारीरिक यंत्रात मेळ राहावा, समतोलपणा राहावा म्हणून आत्मपृथक्करण हे एक मोठे प्रभावी साधन आहे. मनुष्य दुसऱ्याचीच वंचना करतो असे नाही, तर स्वतःचीही वंचना करतो. आपण निरनिराळी मते अंगिकारतो, निरनिराळे विचार स्वीकारतो; याच्या मुळाशी केवल शुद्ध निःस्वार्थ हेतूच असतो असे नाही. जीवनात अपयश आलेले असते; मनोरथ विफल झालेले असते; एक प्रकारचा संताप व वैताग आलेला असतो; आणि ह्यामुळे आपण मते बदलतो. आपले विचार बदलतात. आपला अहंकार दुखावला गेला, तर आपण सूडबुद्धीने प्रेरित होतो; आपण जुलमी होतो. आपल्या प्रेमाला प्रतिप्रेम मिळालेले नसते म्हणून किंवा खाली मान घालावयास लावणारे एखादे शारीरिक व्यंग असले तर आपण सूड घेण्यास उभे राहतो, जगावर संतापतो. मानवप्राण्यासंबंधी विशेष लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तो वारंवार स्वतःचीही वंचना करीत असतो. आपणांपैकी बहुतेक काळाच्या हातातील बाहुली असतात. आपण परिस्थितीचे जणू दास असतो. आपले विचार, आपल्या भावना एका रूढ ठरीव साच्याप्रमाणे असतात. आत्मपरीक्षणानेच ही चाकोरी सोडून आपण बाहेर पडू शकतो. ज्या रूढ सवयींच्या आधारावर आजपर्यंत मन अवलंबून होते, ते आधार काढून घेऊन, ते नष्ट करून मनाला स्वावलंबन शिकवण्यात येते. आपण आत्मसंशोधन करू लागतो. आत्मरूप पाहण्याचे आपण प्रयत्न करू लागतो. आध्यात्मिक विकासाच्या मार्गात असत् वासनांचा जितका अडथळा, तितकाच आलस्य व कर्मशून्यता यांचाही होतो. सम्यक अवधानता म्हणजे वृत्ति स्थिर होतील अशा रीतीने शरीराकडे व मनाकडे पाहणे. एक प्रकारची अविचल अशी वृत्ती राहील असे करणे. सदैव दक्षता ठेवणे, जागृत असणे, खिन्न न होणे, आदळआपट न करणे. सारखे या गोष्टीमागे, त्या गोष्टीमागे, असे धावपळ करीत न हिंडणे. एक प्रकारचा स्वतःवर ताबा, स्वतःचे स्वरूप समजून घेऊन स्वतःला ताब्यात घेणे. आणि असे केले म्हणजे मग कोणतीही क्रिया केवल यांत्रिक होत नाही. अनावधानतेने कोणतेही कर्म होत नाही. सारे व्यवहार डोळस होतात, बुद्धीपूर्वक होतात. जणू शाश्वततेच्या प्रकाशात वस्तूंचे स्वरूप पाहून आपण वागतो. आणि सम्यक चिंतन हे चतुर्विध आहे. अशी एक विचित्र समजूत झालेली आहे, की बुद्धांनी सम्यक जीवन जगण्यासाठी जो उपाय सुचविला तो म्हणजे कर्मशून्यता, वासनांचा त्याग, कमीत कमी इच्छिणे व कमीत कमी खर्च करणे. परंतु असे वास्तविक नाही. बुद्धांचा उपाय म्हणजे कर्मशून्यता नसून उलट प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. ते तारक असे परमसत्य मिळविण्याचा दृढ निश्चय, तत्प्राप्त्यर्थ अखंड प्रयत्नांची आवश्यकता, सद्गुणांच्या अभ्यासात अनेक जन्म दवडणे, पदोपदी परमोच्च ध्येयापासून खाली घसरणाऱ्या मनास तसे होऊ न देणे, तीच तीव्र उत्कटता व प्रखरता टिकवणे, इत्यादि ज्या गोष्टी बुद्ध सांगतात त्यांचा अर्थ काय? या सर्वांचा अर्थ एवढाच, की मानवी इच्छाशक्ती दिव्य पराक्रम व परम पुरुषार्थ संपादण्यास समर्थ आहे. ध्यान म्हणजे सावधान असण्याची स्थिती, ध्यान म्हणजे इच्छाशक्तीचा प्रयत्न; म्हणजे समाधी नव्हे, ध्यान म्हणजे पराकोटीस गेलेला प्रयत्न, पराकाष्ठेची धडपड, ध्यान म्हणजे मनाची अशी एकाग्रता, की जीत इच्छाशक्ती व विचार एकरूप होतात. बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे जो-तो स्वतःचा तारक आहे, स्वतःचा उद्धारक आहे. ज्याने-त्याने स्वतःचा मोक्ष मिळवून घ्यावा. शेवटच्या क्षणी मनुष्य एकटा असतो. फक्त त्याची इच्छाशक्ती त्याच्याजवळ असते. अशा वेळेस जगातील सारी इच्छाशक्ती त्याला पाहिजे असते. जो प्रचंड व उत्कट प्रयत्न त्याला त्या वेळेस करायचा असतो, त्या वेळेस अतूट इच्छाशक्तीची निवांत आवश्यकता असते. अशी एक सर्वसाधारण समजूत आहे, की तो जो दिव्य आध्यात्मिक अनुभव, तो मिळवायचा नसतो; तर गुरुकृपेने तो प्राप्त होत असतो. परंतु ही समजूत चुकीची आहे. या समजूतीची अर्थ इतकाच, की कोणतेही महान अनुभव हे एक प्रकारे दिलेलेच असतात. योगी हा कर्मशून्य नसतो; परंतु स्वीकारणारा असतो. त्याचे जीवन म्हणजे पराकाष्ठेचा संयम. त्याचे जीवन बांधीव असते. ते व्रती जीवन असते. या अष्टाविध मार्गातील शेवटची पायरी म्हणजे सम्यक् चिंतनाची सम्यक् चिंतन हेच अंतिम साध्य, प्राप्तव्य. अष्टविध मार्गाचा मुकुटमणी म्हणजे हे चिंतन. ज्या वेळेस मन व इंद्रिये वारेमाप भटकत नसतात, चंचल विचार स्थिर झालेले असतात, त्या वेळेस आत्म्याची परमोच्च व परम विशुद्ध अशी स्थिती प्राप्त होते. त्या वेळेस आत्मा स्वत:चा निरुपाधिक असा अमर्याद आनंद उपभोगतो. परमोच्च जीवन ते हे. या वेळेस अज्ञान अस्तास जाते; तृष्णा शांत होते. त्यांची जागा अंतर्ज्ञान व पावित्र्यही घेतात. मनाने मनासाठी निर्मिलेली ती परमशांती असते. मनाने मनासाठी निर्मिलेला तो परमानंद असतो. ती एक प्रकारची शांत अशी निर्विकार समाधी असते. आत्म्याचे निरामय व सत्य स्वरूप ते हे. उच्चतर जीवनाची अशा वेळेस पूर्वरुची कळते. थोडीशी गोड कल्पना येते. त्या परमोच्च जीवनाशी तुलना केली असता आपले हे दैनंदिन जीवन केवल फिकट, रोगट व रडके वाटते. त्या परमोच्च जीवनात एक प्रकारचा मोकळेपणा अनुभवास येतो. स्वातंत्र्य व ज्ञान यांचा अमर्याद असा प्रत्यक्ष अनुभव तेथे येतो.

बुद्धांनी भिक्षूंसाठी व सामान्य जनांसाठी एक चालचलाऊ जीवनप्रणाली दिली आहे. कूतदंत नावाच्या ब्राह्मणाजवळ बोलताना बुद्धांनी सर्वांना बंधनकारक असे पाच नैतिक नियम सांगितले : हिंसा न करणे; जे आपणास लाभलेले नाही त्याविषयी उदासीन असणे; वासनाविकारांचे लाड न पुरवणे; असत्यापासून दूर राहणे; आणि पाचवी गोष्ट म्हणजे मादक पदार्थ न सेवणे. बुद्धांनी कर्मापासून दूर राहा असे कधीही सांगितले नाही. एकदा एका सामान्य जैन मनुष्याने बुद्धांस विचारले, “आपण अ-कर्मता शिकविता का?” बुद्धांनी उत्तर दिले, “यति गौतम कर्मशून्यता मानतो असे प्रांजलपणे कोण बरे म्हणू शकेल? वाईट करू नका एवढेच मी सांगतो. काया-वाचा-मने करून काहीही वाईट करू नका. नाना प्रकारची दुष्ट व पापमय कर्मे असतात त्यांपासून परावृत व्हा, ती करू नका, असे मी उद्घोषित असतो... शरीराने, मनाने, वाणीने सत्कर्म करा असे मी सांगत असतो. नानाविध जी भली भली सत्कर्मे आहेत ती सदैव करा. हेच तर भी अट्टाहासाने सांगत आहे.” बुद्धांच्या नैतिक योजनेत सत्कर्मापेक्षाही प्रेमाला अधिक महत्त्व आहे. “जे प्रेम हृदयाला मुक्त करते त्या प्रेमाची सोळावा हिस्साही किंमत सारी सत्कर्मे मिळून होणार नाही. कारण हृदयाला मोक्षसुख देणाऱ्या प्रेमात सारी सत्कर्मे असतातच. प्रेम प्रकाशते, प्रकाश पसरविते, तेज देते.” ते पुन्हा अन्यत्र म्हणतात, “ज्याप्रमाणे माता स्वत:चा जीव धोक्यात घालूनही आपल्या एकुलत्या एक मुलाला जपते, त्याप्रमाणे प्रत्येकाने सर्व मानवांविषयी निस्सीम प्रेम मनात बाळगावे.“ सर्व प्राण्यांविषयी, सर्व सजीव सृष्टीविषयी एक प्रकारचा आदर, एक प्रकारचा पूज्यभाव बुद्धांच्या नीतीत आहे. जो खरा बुद्धधर्मी आहे, तो केवळ गंमत म्हणून प्राण्यांना मारणार नाही, खाण्यासाठी हिंसा करणार नाही. तीर्थक् योनीतील जीवही त्याची जणू भावंडे, पशुपक्षीही सखे-सोयरे आहेत. आपण मानवप्राणी या इतर सर्व प्राण्यांवर सत्ता चालविण्यासाठी जन्मलो आहोत असे त्याला वाटत नाही. मन शांत व गंभीर ठेवावे, प्राणीमात्राविषयी प्रेम व सहानुभूती बाळगावी, असे बुद्धांनी अनुशासिले आहे. बुद्ध कधीही पापाविषयी बोलत नाहीत. पाप म्हणजे अज्ञान, मूर्खता असे ते म्हणतात. आणि अज्ञान व मूर्खता ज्ञानाचा प्रकाश आणून, सहानुभूती दाखवून दूर करता येतात.

४) जेव्हा व्यक्ती अज्ञान जिंकते, पुनःपुन्हा पक्षात्ताप करायला लावणाऱ्या कर्माची शक्ती नष्ट करते. जेव्हा व्यक्ती निरिच्छ होते, ज्या वेळेस कशाचेही सुख-दुःख वाटत नाही. जेव्हा पूर्ण प्रकाश प्राप्त झालेला असतो, अशा वेळेस ती व्यक्ती जणू निराळ्या अशा जगात जाते. ते नूतन जग साकार व निराकार अशा दोहोंपासून मुक्त असते. तेथे दु:खही नाही, आनंदही नाही. ती स्थिती मानवाला कल्पिता येणे शक्य नाही, ती स्थिती म्हणजे मुक्ती. ती स्थिती म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका. ती स्थिती म्हणजे निर्वाण. निर्वाणाचे स्पष्टीकरण करण्याचे बुद्ध नाकारीत. निर्वाण म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात फारसा अर्थ नाही. त्या निर्वाणदशेची वर्णने एक प्रकारे अर्थशून्यही असतील. ते निर्वाण वर्णायला वाणी असमर्थ आहे. परंतु असे ते निर्वाण कसे प्राप्त करून घ्यावे, ही गोष्ट बुद्ध सांगतात. जे माझ्या मार्गाने येतील, त्यांना 'याचि जन्मी, याचि डोळा' ती कृतार्थ दशा प्राप्त होईल, ते धन्य दर्शन घडेल, असे बुद्ध सांगत आहेत. बुद्धांनी नानाविध विधींचे अवडंबर माजविले नाही. तपश्चर्या, देहदंडना, देव एक की अनेक, इत्यादी गोष्टींविषयी त्यांनी कधी काही सांगितले नाही. माझी पूजाअर्चा करा असेही कधी त्यांनी म्हटले नाही. बुद्ध हे सत्याचे शोधक, सत्याचे उपासक व उपदेशक आहेत. त्यांनी आपली शिकवण नैतिक नियमांवर उभारलेली आहे. त्यांच्या शिकवणीतील मध्यबिंदू, मुख्य प्राणमय वस्तू म्हणजे नैतिक जीवन. समकालीन तत्वज्ञानी वावदुकांजवळ आध्यात्मिक वादविवाद करताना ते दिसत नाहीत. जग अनंत आहे की सान्त आहे? अमर्याद आहे की समर्याद आहे? आदी आहे की अनादी आहे? हे जग दिक्कालाद्यनवच्छिन्न आहे की नाही? ज्याला सत्य ज्ञान मिळाले त्याचे विशिष्ट असे पृथक् अस्तित्व व्यक्तित्व उरते की नाही? मरणोतातर त्याला जीवन आहे की नाही? इत्यादी प्रश्नांची चर्चा ते करू इच्छित नसत.

बुद्धांजवळ नाना मीमांसा नाहीत, निरनिराळ्या उत्पत्ती नाहीत. अनंत काळापासून माझ्याजवळ असलेले ते स्वयंभू, स्वयंप्रकाशी ज्ञान ते घेऊन या भूतलावर मी आलो आहे, असा दावा ते कधीही करीत नाहीत. जातकात ज्या गोष्टी आहेत, त्यावरून बुद्धांनी अनेक जन्म घेऊन अति कष्टाने व प्रयत्नाने ज्ञान मिळवले होते असे दिसते आध्यात्मिक उन्नती कशी करून घ्यावी याची एक योजना ते आपल्या अनुयायांना देतात. एखादी मतप्रणाली न देता ते मार्ग दाखवितात त्यांचा एखादा संप्रदाय नाही, एखादा नवीन धर्मपंथ नाही. एखादे तत्त्वज्ञान स्वीकारणे, एखादा संप्रदाय अंगीकारणे म्हणजे सत्यशोधनास रजा देणे असे त्यांना वाटे. सर्व संशोधन झालेच आहे, मी या पंथाचा आहे, असे म्हटले की मग सारे आटोपले ! कधी कधी सत्य गोष्टीकडेही आपण डोळेझाक करतो; त्याचा स्वीकार करायला तयार नसतो. त्यांच्याविरुद्ध आपल्याजवळ पुरावा असतो म्हणून नव्हे, तर ती विशिष्ट उत्पत्ती आपल्याविरुद्ध असते म्हणून बुद्धांनी स्वत: ज्ञान मिळवले. त्यांना स्वतः आलेला जो शब्दातीत अनुभव, त्यापासून त्यांच्या शिकवणीचा आरंभ आहे. बुद्धांचे कोणतेही तत्त्वज्ञान असो, त्यांची कोणतीही मतप्रणाली असो, त्या सर्वांचा संबंध तो अनुभव मिळविण्यासाठी आहे. त्यांचे जे काही तत्त्वज्ञान आहे, ते त्या अनुभवाप्रत पोहोचण्याच्या मार्गासंबंधी आहे निरनिराळ्या उत्पत्ती, नाना मीमांसा यांविषयी बोलताना बुद्धांनी एकदा एक मार्मिक उपमा दिली होती, “अंड्यात असणाऱ्या पिलाने बाहेरच्या जगाविषयी केलेल्या कल्पना जितक्या मौल्यवान असू शकतील, तितक्याच मौल्यवान या नानाविध उत्पत्ती व मीमांसा असतात.” सत्य समजून घेण्यासाठी सत्याकडे जाणाऱ्या मार्गाने आपण चालत गेले पाहिजे.

बुद्धाची ही जी दृष्टी, तीच जगातील काही थोर अशा विचारवंतांचीही होती तरुणांना बिघडवितो असा सॉक्रेटिसवर आरोप होता. त्या आरोपाला उत्तर देताना सॉक्रेटिस म्हणाला “माझे विशिष्ट असे तत्त्वज्ञान नाही. अमुक एक ठरीव साचाचे सत्य माझ्याजवळ नाही. माझ्या एखाद्या विशिष्ट तत्त्वज्ञानामुळे मेलेटसच्या शिष्यांचे किंवा त्याच्या इतर आप्तेष्टांचे नुकसान झाले आहे, असा पुरावा त्याने मांडला नाही. " ख्रिस्तासही ठरीव साचाची ठोकळेवजा मते मुळीच आवडत नसत त्याने एखादा नवीन धर्म शिकविला, एखादा नवीन पंथ स्थापला असे नाही. जीवनाचा एक नवीन मार्ग दाखविणे एवढाच त्याचा हेतू, ख्रिस्ताचा क्रॉस एखाद्या संप्रदायाची, आग्रही पंथाची निशाणी नसून एका नवपंथाची निशाणी होती. क्रॉस धारण करणे म्हणजे शिष्यत्वाची दशा. जगातील असाधुतेला साधुत्वाने जिंकून घेण्याची ती एक नवीन साधना होती. क्रॉस स्वीकारणे म्हणजे ही नवीन दृष्टी घेणे, हा नवीन पंथ अनुसरणे. क्रॉस हाती घेणे म्हणजे स्वत:ला चिकटून असणारी अहंता दूर करणे; मोठेपणाच्या व वैभवाच्या ज्या ऐहिक कोत्या कल्पना त्या दूर फेकणे. सेंट पॉल आपणास आत्म्याला आवडणारी फले देतो. प्रेम, आनंद, शांती, अनंत कष्ट, सौम्यता, स्निग्धता, चांगुलपणा, श्रद्धा, नम्रता, संयम इत्यादी गोष्टी तो देतो. हा आत्महंसाचा मौक्तिक चारा आहे. या आत्म्याच्या गोष्टीची तद्विरुद्ध अशा शारीरिक गोष्टींशी तो तुलना करतो. द्वेष, मत्सर, असूया, आसक्ती, आकारपूजा, क्रोध, झगडे, स्पर्धा, वितुष्टे, मारामाऱ्या, ही अनात्म्याला, देहाला आवडणारी फले. सेंट थॉमस अँक्विनास याने आयुष्याच्या अखेरच्या वर्षी अखंड समाधिसुख अनुभविले. त्याचा कार्यवाह रेजिनॉल्ड याने, “तुम्ही आणखी काही लिहा.” असे त्याला परोपरीने सांगितले. परंतु त्याने नाकारले. 'सौंदर्याचा साक्षात्कार' या कवितेत कवी रॉबर्ट ब्रिजेस याने सेंट थॉमसच्या या समाधीचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.

“ नेपल्स येथे एकदम भावमत्त होऊन तो पडला. जणू त्याची समाधी लागली त्या प्रार्थनेच्या वेळेस मानवजातीच्या सर्व पापांपासून तो जणू मुक्त झाला असे मनात येऊन मला किती आनंद होत आहे! कारण त्यानंतर ॲरिस्टॉटल किंवा ख्रिस्त यांच्याविषयी तो काही बोलत नसे, लिहीत नसे. त्या भावान्मत्त स्थितीच्या वेळेस त्याला समोर का खिस्त दिसत होता? ॲरिस्टॉटल का दिसत होता ? कोणीही दिसले असो; एक गोष्ट खरी, की पुनश्च एकही शब्द त्याने लिहिला नाही. त्याने दौत - टाक दूर सारली. त्या दिवशी तो श्रवणातीत झाला होता. अपुरे राहिलेले लिखाण त्याने पुरे करावे म्हणून रेनॉल्डसने आपली सारी मैत्री पणास लावली असती, खूप आग्रह त्याने केला असता. परंतु आपले बोलणे त्या भावोन्मत्ताला कळत कुठे होते? तो ऐहिकाच्या अतीत गेला होता. निराळ्या जगात होता. एकदम एक श्वास घेऊन तो रेनॉल्डसला म्हणाला, “हे बघ तुला मी एक गुप्त गोष्ट सांगतो. मी जिवंत असेपर्यंत ती तू कोणासही सांगू नकोस. माझे लिहिणे आता संपले. अशा काही दिव्य गोष्टीचा मला साक्षात्कार झाला आहे, की आजपर्यंत जे काही मी लिहिले वा शिकवले ते मला सारे क्षुद्र वाटत आहे. आणि माझ्या ईश्वरावर माझी श्रद्धा आहे. ज्याप्रमाणे माझी मते संपली. सांगणे शिकविणे संपले, त्याचप्रमाणे हे जीवनही एकदाचे संपो..."

बुद्धांचे जीवन व त्यांची शिकवण यासंबंधी प्राचीनतम अशा परंपरेतून मिळणारा संशयातीत पुरावा आपण पाहिला. त्या वेळच्या धर्मिक जगात बुद्धांचा स्वभाव व त्यांची शिकवण नीट जुळत होती. त्याची ती मूर्तिमंत साधेपणाची वृत्ती, त्यांचे सेवामय प्रेम, सर्वांच्या सेवेस धावण्याचा स्वभाव, हाच त्यांनी दाखविलेला सुखाचा मार्ग. दुःखातून मुक्त होण्याचा त्यांनी जो हा साधा, प्रेममय नि सेवामय असा मार्ग दाखविला, त्यामुळेच त्यांना जगाचे उद्धारक असे म्हणण्यात येऊ लागले त्यांचे समकालीन लोक ‘जगाचे तारक' अशा रितीने त्यांना संबोधू लागले. अंतिम प्रश्नाचे निश्चित उत्तर देण्याचे ते नाकारीत. कारण या अंतिम प्रश्नाच्या उत्तराची नीट व्याख्या करणे अशक्य होते. परंतु बुद्धांच्या या करण्यामुळे पुढे मतमतांतरे फार माजली. ज्यांची वृत्ती अति उत्कट नाही, अशांसाठी जरा कमी तात्त्विक व कमी कडक असे नवीन प्रकार पुढे बुद्धधर्मात रूढ झाले. कारण अशांचीही धार्मिक तहान भागविणे प्राप्त होते, योग्य होते.


इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

6
Articles
महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)
0.0
या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलना नाही. असा परिणाम करणाऱ्या विभूतींत ते अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक यादृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड़ इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे स्थान उच्च आहे. सर्व सुधारलेल्या मानवजातीचे ते वारसा झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल आध्यात्मिक दृष्टी यांच्या कसोट्या लावून पाहू तर निःशंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींयैकी एक आहेत.
1

महात्मा गौतम बुद्ध

2 June 2023
6
0
0

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका म

2

॥ १ ॥

2 June 2023
5
0
0

बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या

3

॥ २ ॥

2 June 2023
1
0
0

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यात शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध

4

॥ ३ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्रष्टेही इतर सामान

5

।। ४।।

2 June 2023
0
0
0

बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाधा येते असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोहोचतो

6

॥ ५ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांच्या स्वतःच्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्

---

एक पुस्तक वाचा