shabd-logo

।। ४।।

2 June 2023

10 पाहिले 10
बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाधा येते असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोहोचतो. त्या गहनगूढांचे उत्तर मिळण्याचा हट्ट आपल्या बुद्धीने धरता कामा नये. जीवनाला जी किंमत आहे, जो अर्थ आहे, त्याला कारण जीवनापाठीमागे असणारी ही गूढता आहे. 

जी अनंतता बुद्धीच्या कक्षेत येऊ शकत नाही, अशी अनंतता व अपारता जीवनाच्या पत्नीकडे आहे. म्हणून तर जीवनाला अर्थ आहे, मोल आहे. हे दृश्य जगत् म्हणजेच जर सारे असेल, हे जगत् व मानव जर स्वयंपूर्ण असतील, यांच्या पलीकडे अधिक खोल, उच्चतर, गहन-गंभीर असे जर काहीच नसेल, तर या संसारातील दुःख- क्लेश, नाना प्रकारचे पापताप, केवळ असह्य होतील. आपली बुद्धी अशा प्रकारच्या अतींद्रिय, अति-ऐतिहातिक, दिक्कालातीत सत्यतेची मागणी करते, म्हणून आपण अशी सत्यता मानतो असे नाही. तर जे इंद्रियगम्य आहे, जे दृश्य नामरूपात्मक आहे, ते एका गूढतेने व्यापिलेले आहे व तेथे विचाराची गती कुंठीत होते, म्हणून ती सत्यता आपण मानतो. या विश्वापाठीमागे काहीतरी आहे असे मानणाऱ्या सर्व धार्मिक पद्धती त्या दिव्य शक्तीची भव्य वर्णने करतात; त्या दिव्य तत्त्वाचा आपणाशी असणारा जो संबंध, त्याचे उत्कट वर्णन करतात. परंतु या सर्व धर्मपद्धती जीवनाच्या अंतिम प्रश्नांना हात लावीत नाहीत. या सर्व पद्धती एक प्रकारे बाहेर वावरणाऱ्या आहेत. यांच्यापेक्षा या विश्वाच्या पाठीमागे काहीतरी गूढ आहे; परंतु ते काय आहे ते सांगता येत नाही असे सांगणारी, त्याविषयी मौन धरणारी धर्मपद्धती एका अर्थी त्या खोल प्रश्नांच्या अधिक जवळ आपणास नेते. गूढतेमुळे बौद्धिक विचाराला मर्यादा पडते, तार्किक व्याख्यांना मर्यादा पडते. “त्याच्यासमोर वाणी मागे मुरडते; मनालाही ते न सापडल्यामुळे मागे फिरावे लागते.” बुद्धांचे मौन दर्शविते, की ते एक महान गूढवादी होते. तरीही त्यांच्या अनुयायांनी पुढच्या काळात त्यांच्या मौनाचे नाना प्रकारे व्याख्यान केले, त्या मौनातून नाना मते त्यांनी काढली. मनुष्यामध्ये तत्त्वजिज्ञासू वृत्ती आहे. ती कायमची दडपता येत नाही सिलोनमधील लेखांवर विश्वास ठेवला तर बुद्धांच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्याच शतकात बुद्धधर्मात निरनिराळे अठरा संप्रदाय उत्पन्न झाले होते असे मानावे लागेल. बुद्धांच्या मौनाचे आपण तीन अर्थ करू शकू : ( १ ) कार्यकारणात्मक दृश्य अशा पसाऱ्याच्या पलीकडे काही आहे की नाही याचे ज्ञान त्यांना नव्हते. (२) हे दृश्य जगत् म्हणजेच सारी सत्यता व त्याच्यापलीकडे काही नाही हे त्यांना माहीत होते. ( ३ ) या विश्वात दृश्याच्या पलीकडे काही एक सत्यता आहे अशी त्यांची श्रद्धा होती, परंतु काही नैतिक कारणांमुळे व काही तार्किक कारणांस्तवही अनिर्वचनीय असणाऱ्या अशा त्या वस्तूची व्याख्या देण्याचे ते टाळीत. या तीन शक्यता आपण कल्पू शकतो.

कोणी म्हणतात की, “बुद्धांचे हे मौन त्यांच्या शून्यवादावरचे पांघरूण आहे. सर्वतंत्र स्वतंत्र असे काहीएक नाही. या दृश्य जगापलीकडे शाश्वत असे काही नाही. आत्म्यात चिरंजीव असे काही नाही. निर्वाण म्हणजे शून्यता, अभावाची रात्र." कोणी म्हणतात की, “बुद्ध अज्ञेयवादी होते. वस्तूंतील सत्यता त्यांना ज्ञात झाली नाही, त्या सत्यतेचे ज्ञान त्यांना झाले नाही असे ते मानीत असावेतं. ती सत्यता अज्ञेय आहे. बुद्धांचे मौन म्हणजे न दिलेल्या निर्णयाचे आविष्करण होय." काही असेही म्हणणारे आहेत की “बुद्ध हे गूढवादी होते. आणि इतर सर्व गूढवाद्यांप्रमाणे अनिर्वचनीय अशा त्या स्थितीचे, त्या सत्याचे, वर्णन करायला ते धजत नसत, ती अनिर्वचनीय स्थिती अनुभवायची असते, चर्चावयाची नसते. " अर्वाचीन विवरणकार वरील मतांपैकी आपापल्या वृत्तीप्रमाणे, कलाप्रमाणे, कोणते तरी एक मत स्वीकारतात.

जे कोणी असे समजतात की, बुद्ध हे संशयवादी किंवा अज्ञेयवादी होते, कारण त्यांना अंतिम सत्यता समजली नाही, समजती तर ते वर्णन करते, अशांना बुद्धांच्या शिकवणीतील मर्म समजले असे म्हणता येणार नाही. बुद्धांनी शतदा सांगितले आहे की, “मी शिष्यांना दिले त्यापेक्षा कितीतरी मजजवळ आहे. " बुद्धांच्या या उद्गारांचा वरील समजुतींशी विरोध येईल. बुद्धांची वृत्ती पलंगपंडित संशयवाद्यांची नव्हती. पलंगपंडित संशयवादी त्या अंतिम सत्यतेसंबंधी अस्तिपक्षी वा तास्तिपक्षी उत्तर देता यावे म्हणून संशोधन करीत नाहीत, पराकाष्ठेची धडपड करीत नाहीत. बुद्ध असे नव्हते. तसेच त्यांना ती सत्यता खरोखरच नाही असे वाटते, तर तसे स्पष्टपणे सांगण्याचे नीतीधैर्य त्यांच्याजवळ नव्हते असे मानणेही न्याय्य नाही. बुद्धधर्मग्रंथांत आपणांस पुढील वृतांत एके ठिकाणी वाचायला सापडतो :

कौशांबीस शिंशपवनात बुद्ध राहत होते. शिंशप वृक्षाची काही

पाने हातात घेऊन बुद्ध शिष्यास म्हणाले, “माझ्या हातातील पाने वनात असणाऱ्या पानांपेक्षा कमी की अधिक ?" शिष्य म्हणाले, “महाराज, आपल्या हातातील पाने थोडी आहेत. पलीकडे वनात पुष्कळ आहेत, "

बुद्ध म्हणाले, “मी जे ज्ञान मिळविले ते सारे तुम्हांस सांगितले नाही. जे सांगितले त्यापेक्षा न सांगितलेले किती तरी अधिक आहे. आणि शिष्यांनो, मी ते तुम्हाला का बरे सांगितले नाही? कारण त्याने तुमचे हित नाही. तुमचे पावित्र्य वाढवण्यास त्यामुळे मदत नाही होणार; ते ज्ञान तुम्हाला ऐहिकापासून दूर वळवील असे नाही, ते ज्ञान सर्व इच्छा ताब्यात आणा असे नाही सांगणार, जे जे क्षणिक आहे ते सोडा असे नाही म्हणणार; ते ज्ञान शांतीकडे, प्रकाशाकडे, निर्वाणाकडे नेणारे नाही, म्हणून मी ते सांगितले नाही.'

एकदा मालंक्यपुत्त तर बुद्ध आपल्या आध्यात्मिक प्रश्नांना उत्तरे देत नाहीत म्हणून रागावला. तो बुद्धांना आव्हान देऊ लागला. त्याचं ते करणे अविनयाचे वाटते. तो बुद्धांना म्हणाला, “माझ्या प्रश्नांची उत्तरे छाल तर तुमचा शिष्य म्हणून तुमच्या धर्मात मी राहीन; धर्ममय असे हे भिक्षुजीवन कंठीन; परंतु जर उतरे न द्याल तर धर्म सोडून मी पुन्हा संसारात रमेन. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, तुम्हाला ज्ञान नसेल, तर स्वच्छ सांगा, की मला या गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत. "

बुद्ध शांतपणे म्हणाले, “तुझ्या प्रश्नांची उतरे मी देऊ पाहत नाही. परंतु एक दृष्टान्तरूप गोष्ट सांगतो. विषदग्ध बाणाने घायाळ झालेला एक मनुष्य आहे असे समज. त्याचे मित्र धावत जाऊन वैद्याला घेऊन येतात. तो वैद्य जखमेतून तो बाण आता उपटणार तोच तो जखमी मनुष्य ओरडतो, 'थांब, हा बाण मला कोणी मारला तो कळेपर्यंत मी तो काढू देणार नाही. हा बाण स्त्रीने मारला की पुरुषाने? ब्राह्मणाने, वैश्याने की शूद्राने? बाण मारणारा कोणत्या कुळात जन्मला होता? तो उंच होता, की वामनमूर्ती होता? तसेच हा बाणही कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या जातीचा, ते सारे सांगा. मग हा बाण काढा.' तो जखमी मनुष्य जर असे म्हणाला तर काय होईल? या सर्व प्रश्नांची त्याला उत्तरे मिळण्यापूर्वीच तो मरून जाईल. त्याप्रमाणेच या जगापलीकडे, विश्वापलीकडे काय आहे, वगैरे प्रश्नांची उत्तरे मागणारा शिष्य हे दुःख जगात का आहे? कोठून आले? कधी थांबेल? इत्यादी प्रश्नांची सर्व उतरे मागणारा शिष्य ती उतरे मिळण्यापूर्वीच मरून जायचा एखादा. "

बुद्धांचे उद्दिष्ट अत्यंत व्यावहारिक होते. ते आपल्या श्रोत्यांना नाना तर्कटे व कल्पना रचायला प्रवृत्त करीत नसत. ते आत्मसयमनास प्रवृत्त करीत. ज्या प्रश्नांची उतरे तुम्हाला पाहिजे आहेत, परंतु बुद्धी ज्यांची उत्तरे शब्दांत देऊ शकत नाही, त्या प्रश्नांचे ज्ञान 'माझ्या मार्गाने या व स्वत:च मिळवा' असे ते सांगत. बुद्ध म्हणतात, “आपल्या विचारशक्तीवर ताबा मिळवून जर तिचा आपण नीट उपयोग करू, जर आपण हृदय शुद्ध करू, वासनांना नीट वळण देऊ, तर सद्गुणांची दैवी प्रभा आपल्याभोवती पसरल्याशिवाय राहणार नाही. निष्कलंक जीवनातच, निष्कलंक हृदयमंदिरातच ते परिपूर्ण शिवत्व, तो शाश्वत धर्म स्थापणे शक्य होईल. जो पाहील त्याला ते दर्शन घडेल. " काशीला एका प्रवचनात ते म्हणाले, “माझ्या शिकवणीप्रमाणे जर वागाल, तर याच जन्मात तुम्ही सत्याचे आकलन करू शकाल, त्या सत्याचा साक्षात्कार करून घ्याल," अशा श्रद्धेने व अधिकारवाणीने बोलणाऱ्या बुद्धांना अज्ञेयवादी कोण म्हणेल?

बुद्ध जरी नाना प्रकारच्या बुद्धिहीन भोळ्या विश्वासांच्या बाबतीत, नानाविध खुळ्या समजुतींच्या बाबतीत आक्षेप घेत असत, तरी विश्वातील नैतिक व्यवस्थेविषयी त्यांनी कधी शंका घेतली नाही. आत्मिक जीवनाचे महत्त्व ते मानीत. आत्मिक जीवनाची जी सर्वश्रेष्ठ सत्यता, तिच्यविषयी त्यांनी कधी शंका घेतली नाही. सद्गुणांच्या प्रत्यक्ष आचरणावर ते फार भर देत असत. बुद्धीची कसोटी लावूनच कोणतेही मत घ्या असे ते सांगत. ते असे का सांगत? काहीतरी उत्कट अशी, निश्चित अशी निःशंकता त्यांच्याजवळ होती. त्यांच्याजवळ निःशंक असे सत्यज्ञान होते. नीतीधर्माचा, सद्गुणाचा कायदा हेच त्यांचे परब्रह्म, हीच त्यांची अंतिम सत्यता. मानवी आशा व धडपड यांना हेच त्यांचे उत्तर, ज्या तत्त्वावर जगाच्या सर्व अस्तित्वाचा पाया उभारलेला आहे ते हेच तत्त्व. इतिहासाचा अर्थ तो हा यातच सर्व सृष्टीचा उद्धार आहे.

बुद्धांना सत्यज्ञान झाले होते असे मानण्यावाचून गत्यंतर नाही. त्यांच्या शेकडो उद्गारांवरून तसे मानणे प्राप्त आहे. पुरावा सांगतो, की असे मानले पाहिजे. परंतु असे जर होते, तर त्या सत्यज्ञानाची त्यांनी घोषणा का नाही केली? त्यांना प्राप्त झालेले सत्य अनीश्वरवादी तर नव्हते ? परब्रह्म म्हणून काहीतरी आहे, असे धर्ममय अनुभव घेणारे सांगतात. परंतु अशा धर्मपर व्यक्तीचां तो महान अनुभव खोडून काढण्यासाठी, त्या अनुभवांचे महत्त्व कमी करण्यासाठी म्हणून बुद्धांचे शब्द देण्यात येत असतात. निर्वाण म्हणजे, 'अनंत रात्रीतील अनंत निद्रा' नव्हे का? निर्वाण म्हणजे ईश्वरावाचून स्वर्ग, आत्म्यावाचून अमरता, प्रार्थनेवाचून पावित्र्य. बुद्धांचे सारे तत्वज्ञान यात आले. टी. एच. हक्स्लेला तर बुद्धधर्मात आशा वाटते. तो लिहितो, “जो धर्म पश्चिमात्य अर्थाने ईश्वर मानीत नाही, जो धर्म मनुष्याला आत्मा नाकारतो, जो धर्म अमृतत्वावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा म्हणतो, जो धर्म अशा अमर जीवनाची आशा करणे पाप समजतो, प्रार्थना, यज्ञयाग इत्यादींत जो धर्म अर्थ बघत नाही, मोक्षासाठी फक्त स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा असे जो धर्म सांगतो, ज्या धर्माच्या मूळच्या विशुद्ध स्वरूपात व्रत-वैकल्ये वगैरेंचा गोंधळ नाही, ज्या धर्माने जगातील बाहुबळाची कधी मदत घेतली नाही आणि तरीही जो धर्म आश्चर्यकारक वेगाने जुन्या जगाच्या निम्म्या भागावर पसरला, आणि आजही त्या धर्माला माहीत नसलेल्या अनेक क्षुद्र भोळसट कल्पना जरी त्यात मिसळल्या असल्या, तरीही मानवजातीच्या बऱ्याचशा भागाचा जो धर्म अद्याप प्रभावी पंथ आहे, अशा ह्या बुद्धधर्मातच मला आशा वाटते.” बुद्धकालीन भारतीय मनोबुद्धी जर आपण लक्षात घेऊ तर आपणास असे म्हणावे लागेल, की बुद्धधर्म जर अभावरूप असता तर बुद्धांच्या संदेशाचे स्वागत व स्वीकार होणे ही अशक्य गोष्ट होती. हिंदुस्थानातील धार्मिक वातावरणाशी ज्याचा परिचय आहे, तो असे कधीही मानणार नाही, की अभावाच्या तत्त्वज्ञानामुळे, शून्याच्या तत्त्वज्ञानामुळे, भारतात धार्मिक पुनरुज्जीवन झाले. असे शून्यमय तत्वज्ञान हिंदुस्थानात धार्मिक पुनरुज्जीवन करू शकणार नाही. बुद्ध जरी सर्वश्रेष्ठ देवतेला, त्या परब्रह्माला नाकारीत, तरीही काहीतरी अत्यंत उदात्त असे तत्त्व ते मानीत, असे त्यांच्या अनुयायांना वाटे. त्या परब्रह्माहूनही उच्चतर असे तत्व बुद्धांना प्राप्त झाले आहे असे त्यांचे शिष्य मानीत. इतर देवतांच्या उपासकांनी आपली पूजा देवत्वाच्या दुसऱ्या एका स्वरूपाकडे वळविली. शिव व विष्णु या दोन महान देवतांच्या वाढीचा तो काळ होता. आणि पुढे बुद्धांनाही त्यांच्या अनुयायांकडून देवत्व दिले गेले. बुद्धांचे अनुयायी निरश्वरतेकडे झुकणारे खात्रीने नव्हते.

बुद्धांची शिकवण तत्कालीन संदर्भात जर आपण पाहू, या दृश्य नामरूपात्मक जगाच्या पाठीमागे एखादी परम सत्यता बुद्ध मानीत असत की नाही, असा जर आपण प्रश्न करू, या दृश्य जीवात्म्याच्या पलीकडे अमर असे आत्मतत्व ते मानीत की नाही, असा जर प्रश्न करू, निर्वाण म्हणजे अभावात्मक कल्पना की अमर जीवनाची भावरूप कल्पना असा प्रश्न करू, तर ते अधिक मनोरंजक व बोधप्रद होईल.

(१) धर्माच्या कल्पनेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. इराणी व भारतीय संस्कृतीत प्राचीन काळी ऋत म्हणजे नैतिक व नैसर्गिक अशी व्यवस्था, अशी कल्पना दिसते. या ऋताच्या सत्तेखाली, या कायद्याच्या सार्वभौम सत्तेखाली सर्व वस्तू व व्यक्ती असतात. हे सर्व चराचर ऋताने घातलेल्या मर्यादांप्रमाणे चालते. वैदिक काळातच ऋताच्या या कल्पनेत हळूहळू बाह्य जगच नव्हे, तर नैतिक जगही आले. जी तत्त्वे डोळ्यांपुढे ठेवून मनुष्य वागतो, त्याच्या चालीरीती, कायदे, शिष्टाचार या सर्वाना व्यापून ऋत असते. हे ऋत, ही नैतिक व्यवस्था कोणा देवाने नाही निर्मिली. हे ऋत स्वत:च दैवी आहे. ऋत म्हणजेच देव. ते अन्य देवदेवतांवर विसंबून नाही. वरुण व आदित्य जरी या ऋताचे पालक असले तरी ऋताला स्वयंभू शक्ती, स्वतंत्र दैवी तेज आहे. उपनिषदांमध्ये 'धर्माहून श्रेष्ठतर काही नाही', 'जे धर्ममय आहे तेच सत्य व धर्म म्हणजेच सत्य' अशी वचने आहेत. ऋत (व्यवस्था) व सत्य म्हणजे एकाच सत्यतेची व्यावहारिक व वैचारिक रूपे होत. त्या सत्यमय जगात पूर्ण सुसंवादीपणाचे जग आहं. जेथे सत्यता असते तेथे पूर्णपणे मेल असतो. असंबद्धपणा, विस्कळीतपणा, पार्थक्य, सुसंवादीपणाचा अभाव, विसंगती, इत्यादी गोटी आपल्या या मर्त्य जीवनाच्या खुणा आहेत. मर्त्य जीवनाची ही लक्षणे. परंतु आपणाला व्यवस्थितपणाची प्रीती वाटत असते. सत्याचे संशोधन आपण करीत असतो. ह्यावरून सुसंवादी असे जे ते दुसरे जग, त्याच्याशीही आपले धागेदोरे असले पाहिजेत असे दिसते. ते जे निरुपाधिक तत्व आहे, ते म्हणजेच सत्यता, असे सांगण्यावर उपनिषदांचा भर आहे. सत्य व धर्म यांच्याशी त्या निरुपाधिक तत्त्वाला उपनिषदांनी एकरूप केले आहे. या प्रत्यक्ष जगात कार्यकर अशी जर कोणती प्रभावी शक्ती असेल, तर ती धर्म होय असे बुद्धधर्म अट्टाहासाने सांगतो. निरुपाधिक तत्त्व म्हणजेच सत्य यावर तितका जोर न देता 'निरुपाधिक तत्त्व म्हणजे धर्म' या गोष्टीवर बुद्धधर्माने जोर दिला. उपनिषदांनी उपपत्तीवर, वैचारिक मीमांसांवर भर दिला. बुद्धधर्माने त्याच तत्त्वाच्या व्यावहारिक स्वरूपावर भर दिला. धर्म म्हणजेच सर्व चराचरात भरून राहिलेली व्यवस्था. धर्म म्हणजेच निसर्गातील नियम; कार्यकारणभावाची साखळी म्हणजे धर्म; जातीचे नियम म्हणजे धर्म. धर्मात सारे येते.

“भगवन, कोणाला पूज्य मानावे? राजाधिराज कोण?" कोणी तरी प्रश्न केला.

“धर्म हा राजाधिराज.” बुद्धांनी उत्तर दिले,

धर्म म्हणजे निरपेक्ष, प्रमादातीत न्याय त्या सर्वश्रेष्ठ सत्यमय न्यायाची छाया म्हणजे आपला भौतिक न्याय, मर्त्य न्याय. हळूहळू धर्म हा शब्द वस्तूच्या स्वरूपाला व विशिष्टत्वाला, वस्तूच्या भूमिकेला व कारणालाही लावण्यात येऊ लागला.

ते जे निरपेक्ष तत्त्व त्याचे शेकडो मार्गांनी आपण आकलन करून घेत असतो. प्रत्येक धर्म त्या अंतिम सत्याच्या कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट स्वरूपावर जोर देत असतो. त्या विशिष्ट स्वरूपाला मध्यवर्ती करून इतर रूपे त्याच्या भोवती उभी करण्यात येतात. त्या मध्यवर्ती स्वरूपाच्या संदर्भात इतर रूपाकडे पाहण्यात येते. बुद्धांनी नैतिक अंगावर भर दिला. नीतीचे स्वरूप त्यांनी मध्यवर्ती केले. आकाशातील ज्योतिर्मय गोलांच्या गतीपासून तो जीवनातील लहानशा हालचाली- पर्यंत सर्वत्र हे नीतीचे दर्शन बुद्धांना होते. कधी कधी हे विश्व अव्यवस्थित आहे, या विश्वात काही विचारपूर्वक चालले आहे असे जरी न वाटले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात ती दृष्टी आपण कधीही घेत नाही. हे जगत् म्हणजे ऋताचे अविष्करण आहे, अशी आशा मनात धरून आपण कार्यप्रवृत्त होत असतो आणि अनुभवाने ही आशा अधिकाधिक सफळ होत आहे. या आशेचे समर्थन होत आहे. परंतु हा जो ऋताचा कायदा तो नैतिक स्वरूपाचा आहे. जेव्हा कधी आपले मन त्रस्त व संतप्त झालेले असते, आपले मन अस्ताव्यस्त झालेले असते, तेव्हा हे विश्व म्हणजे सारा ब्रह्मघोटाळा आहे, सारी बजबजपुरी आहे असे क्षणभर आपण मानतो. परंतु वागताना या विश्वात न्याय आहे, निरपेक्ष, पक्षातीत न्याय आहे, अशा दृढ श्रदेने व विश्वासानेच आपण वागतो. नैतिक ध्येये म्हणजे व्यक्तीच्या कल्पनेचे खेळ नाहीत. नैतिक ध्येये म्हणजे उत्क्रांती तत्वानुसार उत्क्रांत होत आलेल्या वस्तू नाहीत. नैतिक ध्येय या विश्वाचा आधार आहेत. विश्वाच्या मुळाशी खोल ती रुतलेली आहेत. धर्म, न्यायता म्हणजे विश्वाचे प्रेरकतत्त्व असे बुद्ध मानतात. आपणही त्या न्यायाला जीवनात आणावे अशी आपणापासून अपेक्षा केली जात असते. प्रत्येक नैतिक ध्येयाची दोन स्वरूपे असतात. एक स्वरूप म्हणजे मनुष्य ते ध्येय प्राप्त करू शकतो हे होय. आणि दुसरे म्हणजे या विश्वात त्या ध्येयाला आधार आहे. नैतिक ध्येय कृतीत आणणे जर आपल्या शक्तीच्या बाहेरचे असेल, तर त्यासाठी धडपड करा असे सांगण्यात काय अर्थ? अप्राप्य ध्येयांचे चिंतन करण्यात एक प्रकारची गोडी असेल; परंतु त्यांना नैतिक नाही म्हणता येणार. प्रत्यक्षात न येणाऱ्या ध्येयांना आपण आपली निष्ठा देऊ शकणार नाही. कोणी म्हणतील की “नैतिक मूल्ये जीवनात आणण्यासाठी जरी आपण पराकाष्ठा केली, तरी हे विश्व आपल्या आशांचा चक्काचूर करील आणि आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्नही विफल केले जातील. जे काही आहे त्याला अधिक चांगले करण्याची आशा करता येणे शक्य नाही." आपणास असे निश्चित आश्वासन मिळाले पाहिजे की, सर्वव्यापी असे तत्त्व आहे व ते नैतिक पूर्णतेकडे जात आहे; आणि त्या आदर्शाकडे जग जावे म्हणून आपण मर्त्य जीवही आपापल्या क्षेत्रात आपापल्या शक्तीप्रमाणे तो आदर्श सफळ व्हावा म्हणून धडपडत आहे. बुद्धांनी असे आश्वासन दिले आहे बुद्ध सांगतात, की ज्यावर आपण निःशंकपणे विश्वास ठेवावा अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे धर्म. ती गोष्ट म्हणजे निरपेक्ष न्यायता. या धर्माला प्रकट केल्यानेच जगाचा उद्धार होईल, जगाची दु:खातून सुटका होईल. ते म्हणतात “जगातील सारे जीव स्वत:ची गुंतागुंतीची विविध रूपे बाजूला करतील.” सर्वांना मोक्ष आहे. त्या परम दशेप्रत सारे पोहोचतील. बुद्ध एकदा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असा परमेश्वर नसतील मानीत. परंतु एक गोष्ट ते सांगतात की, तुमच्या नैतिक धडपडीच्या बाबतीत हे विश्व उदासीन नाही. हे विश्व तुमच्या नैतिक प्रयत्नांस उचलून धरणारे आहे. जे आहे त्यापेक्षा अधिक चांगले प्राप्त करून घेण्याची जी आपली धडपड, तिला धर्माचा पाठिंबा आहे. ऋतसत्याचा आधार आहे. या नामरूपात्मक अखंड प्रवाहाच्या पाठीमागे एक सत्यता आहे. तिच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांस ती उत्तर देते. धर्म म्हणजे केवल अमूर्त कल्पना नव्हे, शून्य नव्हे. या इंद्रियगम्य जगाला निश्चित स्वरूप देणारी, आधारभूत असणारी एक सत्यता खाली खोल मुळाशी आहे. या दृश्य जगातील सारे जरी नाशिवंत असले, तरी असे काही आहे, की जे अविनाशी आहे ते जात नाही, मरत नाही. ते जे अमर असे तत्त्व ते नैसर्गिक व आध्यात्मिक कायद्याच्या रूपाने प्रकट होत असते. या दृश्य जगाचे अतीन्द्रिय स्वरूप ते हेच. त्या थोर नैतिक व आध्यात्मिक स्वरूपाला प्रणाम करा; त्याची पूजा करा. गौतम जेव्हा पूर्णपणे बुद्ध झाले, ज्ञानी झाले, तेव्हा पुढे त्यांनी काय करावयाचे ठरविले? ते म्हणतात, “धर्माने मला जगू दे, धर्माला भजू दे, धर्माला आदरू दे.” धर्ममय अंतर्दृष्टी म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश. अष्टविध मार्गाचे अंतिम साध्य म्हणजे ही पवित्र अंतर्दृष्टी मिळवून घेणे. या जन्मातच हृदयाला मुक्त करणे, बुद्धीला मुक्त करणे, हेच अष्टाविध साधनेचे साध्य. ही जी अंतर्दृष्टी ती एक व्यक्तिविशिष्ट अशी मानसिक अवस्था आहे का? प्रेमवस्तूशिवाय ते प्रेम आहे, अनासक्त प्रेम आहे, असे बुद्धांनी म्हटले आहे. बुद्ध सांगतात की, या जगातच त्या स्थितीत परमश्रेष्ठ सत्यतेचा साक्षात्कार आपणास होत असतो. या इंद्रियगम्य दृश्य जगाच्या पाठीमागे लपलेले जे दैवी तत्त्व, ते त्या स्थितीत आपण प्रत्यक्ष पाहतो, धरतो, अनुभवतो. त्या स्थितीत असताना आपण गोंधळातील व्यवस्था पाहतो, नाशिवंतांतील अविनाशी पाहतो, नामरूपात्मकतेतील सत्यता पाहतो. ही अंतर्दृष्टी मन शांत व निश्चल ठेवून, बाह्य जगाविषयी अनासक्त राहूनच मिळविता येते. आपण नीतीचे वळण लावून घेऊन जेव्हा हृदय विशुद्ध करतो, जेव्हा आपण आपली सारी जाणीवशक्ती त्या खोल असलेल्या तत्वावर सोडतो, त्याच्यावर केंद्रीभूत करतो, त्या वेळेस आपल्यातील सुप्त शक्ती जागृत होतात; आणि एकदम एक नवीन अनुभव येतो. त्या अनुभवांत निर्मल व स्वच्छ अंतर्दृष्टी असते, मोकळा व अनासक्त आनंद असतो. कोणी म्हणतात की, बुद्ध जरी धार्मिक अनुभवास उच्चतम आध्यात्मिक साक्षात्कार मानीत असेल, तरा त्या अनुभवात, त्या साक्षात्कारात सारभूत असे तत्त्व नाही. तो अनुभव एखाद्या ध्येयाचा असा नाही. परंतु असे म्हणणारे बुद्धधर्मातील वचनांचा भंग करतात, त्या वचनांना झुगारून ते उगीचच्या उगीच बुद्धांवर वदतो व्याघाताचा आरोप करतात. बुद्धांनी त्यालाच धर्मं हे निराळे नाव देण्याचे स्वातंत्र्य घेतले. त्या ब्रह्माचे आवश्यक असे नैतिक स्वरूप या संसारात अधिक मोलाचे आहे असे समजून, त्या नैतिक स्वरूपावर दृष्टी खिळविण्यासाठी त्या ब्रह्मालाच बुद्धांनी धर्म या नावाने संबोधिले. धर्माचा पंथ हाच ब्रह्माचा पंथ; धर्मात राहणे म्हणजेच परब्रह्मात राहणे. तथागत म्हणाले, “धर्म माझे शरीर, ब्रह्म माझे शरीर, मी धर्माशी एकरूप आहे, ब्रह्माशी एकरूप आहे. " अष्टविध मार्गाला ब्रह्मयान किंवा धर्मयान अशा दोन्ही नावांनी बुद्धधर्मात संबोधिले आहे.

(२) अनात्मवादी प्रतिपादितात, की आत्मा हा अहं- म्हणजे सतत बदलत जाणारे एक तत्त्व. अलगद दुपम सुत्तांत सत्य वस्तूच्या विनाशाचेच तत्वज्ञान बुद्धांनी शिकविले आहे, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. परंतु बुद्ध तो आरोप तेथे संपूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात, “मी पाच प्रकारच्या अहंचा त्याग करा असे सांगत असतो. शरीररूपाने असणारा, मनोमय असणारा, भावनामय असणारा, प्रवृतीमय असणारा, विज्ञानमय असणारा, असे हे अहं सोडा असे भी सांगतो.” एकदा दुर्बल अशा तीस लोकांचा एक जथा बुद्धांना भेटला. हे लोक आपल्या स्त्रियांसह एका वनात कालक्रमणा करीत असत. त्याच्यापैकी एकाची बायको नव्हती. त्याने एक वेश्या ठेवली होती. परंतु एके दिवशी त्याचे लक्ष चुकवून त्याची सारी चीजवस्तू घेऊन ती पळून गेली. ते सारे तिचा शोध करीत हिंडत होते. त्यांनी बुद्धांनाही तिच्याविषयी विचारले. बुद्ध म्हणाले, “हे तरुणांनो, एका स्त्रीच्या शोधात फिरणे चांगले की स्वत:च्या शोधात, आत्म्याच्या शोधात फिरणे चांगले ?”

“भगवन, आत्म्याच्या शोधात फिरणे चांगले.” ते म्हणाले. धम्मपदात म्हटले आहे, “आत्म्याच्या प्रभू आत्मा. दुसरा कोण प्रभू असू शकणार? ज्याने आत्मसंयमन केले आहे त्याला असा प्रभू मिळतो, की क्वचितच कधी कोणाला तसा मिळत असेल. "

एका सुप्रसिद्ध उताऱ्यात बुद्ध म्हणतात, “ शिष्यांनो, जे तुमचे नाही, त्याचे ओझे का घेता? त्यापासून मुक्त व्हा. आकार, भावना, विचार, इत्यादी गोष्टी म्हणजे तुम्ही नाही. या तुमच्या वस्तू नाहीत. एखादा मनुष्य या जंगलातील गवत, फांद्या, शाखा, पाने सारे घेऊन जात असेल, त्यांचा स्वतः साठी उपयोग करीत असेल, ते सारे जाळून टाकीत असेल, तर तुम्हाला असे वाटेल का की, तो तुम्हाला नेत आहे, तुमचा उपयोग करीत आहे, तुम्हाला जाळीत आहे?”

“नाही महाराज, असे नाही वाटणार” शिष्य म्हणाला.

" का बरे?” बुद्धांनी प्रश्न केला.

“कारण, हे प्रभो, त्या वस्तू म्हणजे आमचा आत्मा नव्हते, त्या आत्म्याच्या वस्तू नव्हते. ' "

“त्याचप्रमाणे जे जे अनात्म आहे त्याचा त्याग करा. सान्या स्कंधांचा त्याग करा. आपल्या आसपास असणाऱ्या वृक्षादिकांचा जसा आत्मरूपाशी संबंध नाही, त्याचप्रमाणे या स्कंधांचा, वासनाविकारांचा, भावना- विचारांचा, मनोबुद्धीचा आत्म्याशी संबंध नाही.” प्लॅटिनस म्हणाला होता, “माझे असे माझ्यात काही ठेवू नका.” मनुष्यामध्ये काहीतरी चिरंतन, स्वयंभू, स्वतःसिद्ध आहे असे बुद्ध मानतात. त्या अविनाशी तत्वाचा नाशिवंत घटकांशी, नाशिवंत स्कंधांशी अनेक ठिकाणी विरोध दाखविण्यात आलेला आहे. बुद्ध जेव्हा प्रश्न करतात, “जे चंचल आहे, नाशिवंत आहे, ते आत्मा असू शकेल का?" तेव्हा जे चंचल नाही, भंगूर नाही, असे आत्मतत्त्व त्यांच्या डोळ्यांसमोर आहे असे स्पष्ट दिसते. बुद्धधर्मातील पुढील महावाक्यात हीच दृष्टी आहे. “हे माझे नाही, मी हे नाही, हे मी नाही.” ही सारी निषेधपर वाक्ये आत्म्याचा अनात्म वस्तूपासून असणारा भेद स्पष्टपणे दाखवीत आहेत. आत्मा ही अशी वस्तू आहे, की या दृश्य जगातील सर्व निश्चित स्वरूपांपासून, दिक्कालाद्यनवच्छिन्न वस्तूंपासून ती संपूर्णपणे अलग आहे. बुद्ध जेव्हा “आत्मदीप व्हा, आत्मशरण व्हा” असे सांगतात, त्या वेळेस त्यांच्या डोळ्यांसमोर हे भंगुर स्कंध नसून, आपल्यातील नाशिवंत अनात्म वस्तू नसून, आपल्यातील विश्वात्मा, परमात्मा त्यांच्या डोळ्यांसमोर असतो. या दृश्य जगातील संघाताहून अधिक असे काही आत्म्यात आहे की नाही? आत्मा म्हणजे का पाचाचा संघात ? पाच स्कंधांचा मेळावा? या प्रश्नाला कायमचे उत्तर देण्यात आले आहे, की आत्म्याचा संबंध शब्दातीत आहे, आत्म्याशी असलेले नाते अनिर्वचनीय आहे. आत्मा या पाचांचा मेळावा की आत्मा या पाचांपासून अलग, हे काहीच सांगता येणे शक्य नाही. सारीपुत्त सतीजवळ वाद करताना म्हणतात, “ तथागत पाचांचा संघातही नाही, किंवा त्यांच्यापासून अलग आहे असेही नाही.” अनेक वचनांतून आत्म्याची शाश्वत धर्माशी एकरूपता वर्णिलेली आहे.

उपनिषदे म्हणतात, “आत्म्याचा, विश्वात्म्याचा शोध करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.” परंतु बुद्ध म्हणतात, “निर्दोष चारित्र्य मिळवा, नवीन व्यक्तित्व उत्क्रांत करा.” कारण आपले सारे जीवनच बदलून टाकल्याशिवाय आपणातील सुप्तात्मा जागृत होणार नाही, प्रकट होणार नाही. जे वास्तविक आपले स्वरूप, जे आपण आहोत ते होणे, हे मानवाचे ध्येय आहे. प्रत्येकाने आत्मरूपाकडे वाढत गेले पाहिजे. आपल्या आत्म्यात वाढत गेले पाहिजे. बुद्ध एक धोक्याची सूचना सदैव देतात, की जरी आपण सत्य दृष्टीने दैवी असलो, तरी प्रत्यक्ष जीवनात दिव्यता प्रकट करणे हे आपले ध्येय आहे. “याच जीवनात आपण शांत होतो, अवाक् होतो, निर्विकार होतो. आत्मा ब्रह्मीभूत होतो व त्या आनंदात आत्मा विहरतो.” विश्वात्मा प्रकट व्हावा म्हणून सारी बंधने, सारे पडदे दूर केले पाहिजेत. त्यासाठी सतत प्रयत्नपूर्वक नैतिक अभ्यास हवा. उपनिषदे म्हणतात, की ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो. बुद्ध म्हणतात, की ज्याने सर्व इच्छांचा त्याग केला, ज्याने वासना जय केला, तो सुखी होतो. ज्याचे जीवन विषयवासनेने बरबटले आहे, भीतीने व द्वेषाने अंध झालेले आहे, क्रोधाने व नीचतेने मलिन झालेले आहे, त्याला ते आत्मदर्शन नाही. त्याला तो ब्रह्मानंद मिळत नाही. बुद्ध ध्येयापेक्षा ध्येयाकडे नेणाऱ्या मार्गावर अधिक जोर देतात. विश्वात्मक स्वरूपाची सत्यता बुद्ध सूचित करतात. हा जो विश्वात्मा, परमात्मा, त्याचा या बदलत्या नामरूपात्मक संघाताशी गोंधळ मात्र करू नये.

बुद्धांच्या काळात जे विचार होते, त्यातूनच त्यांनी निर्वाणाची कल्पना घेतली. निर्वाण म्हणजे आनंदमय असे अंतिम ध्येय. त्या ध्येयासाठी सर्वानी प्रयत्न करावा हा बुद्धांचा विचार उपनिषदांतील मोक्षाच्या विचाराशी समान असा आहे. उपनिषदात व भगवतगीतेत निर्वाण शब्द आला आहे. निर्वाण म्हणजे वासनांचा क्षय, ब्रह्माशी ऐक्य. निर्वाण म्हणजे केवळ नाश नव्हे, केवळ अभाव, केवळ शून्यता नव्हे. निर्वाण म्हणजे वासना - विकारांची आग शांत होणे, विझून जाणे. निर्वाण म्हणजे परिपूर्णतेशी आनंदमय ऐक्य अनुभवणे. निर्वाण प्राप्ती झाली, की कार्यकारणभावाची साखळी तुटते. मग जन्म-मरण नाही. ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मभूत हे शब्द परमोच्च दशा दर्शविण्यासाठी म्हणून बुद्ध वापरतात. ही परमधन्य दशा या जन्मातही प्राप्त करून घेता येते, शरीर पडण्यापूर्वी मिळविता येते. ज्या निर्वाणात जन्म नाही, जरा नाही, आजारपण नाही, मरण नाही; ज्या निर्वाणात दुख नाही, मलिनता नाही, असे ते निर्वाण आपण स्वतः कसे मिळविले, ते बुद्धांनी वर्णिले आहे. विशाख नावाच्या एका मनुष्याने जेव्हा भिक्षुणी धम्मदिना हिला निर्वाण म्हणजे काय असा प्रश्न केला, तेव्हा ती म्हणाली, “विशाख, तू फारच पुढचे प्रश्न विचारतोस. अरे, सर्व धार्मिक जीवनाचा निर्वाण हा हेतू आहे. सर्व धर्ममय जीवनाची इतिकर्तव्यता म्हणजे हे निर्वाण. हे धर्ममय जीवन शेवटी निर्वाणसिंधूत जाऊन मिसळते. ते निर्वाण समजून घेण्याची तुला इच्छाच असेल, तर तू स्वत:च बुद्धदेवांकडे जाऊन त्यांनाच विचार. ते जे काही तुला सांगतील ते नीट ऐक. ” विशाख " बुद्धदेवांकडे गेला. बुद्ध त्याला म्हणाले, “भिक्षुणी धम्मदिना विदुषी आहे; परिणत प्रज्ञा आहे; तिने तुला सांगितले तेच मीही तुला सांगितले असते. तिने उत्तर दिले तेच बरोबर आहे. तेच लक्षात ठेव.” आपण याच जन्मात दुःखाचा शेवट करू शकू. मरणोत्तर स्थितीची अभिवचने देण्यात बुद्धांना समाधान नाही. या जन्मातच ते दिव्यदर्शन होऊ शकते अशी बुद्ध ग्वाही देतात. जे कोणी त्या पवित्र पर्वताच्या शिखरावर चढतात, त्यांची मुखमंडले तेजाने चमकतात. एक दिव्य प्रभा त्यांच्या तोंडाभोवती पसरते. मोगल्लान सारिपुत्ताला म्हणाला, “तुझी बुद्धी निर्मळ झालेली दिसते, निःशंक दिसते. मित्रा, तुझ्या शरीराचा रंगही किती सुंदर व निर्मल आहे. तुला अमृतत्व तर नाही ना मिळाले ?” निर्वाण ही याच जन्मात प्राप्त करून घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि या निर्वाणाचा बौद्धिक व सामाजिक कर्माशी विरोध नाही. निर्वाणात अहंची जाणीव, स्वत्वाची जाणीव संपूर्णपणे नष्ट होते. एकदा दोन शिष्य बुद्धांना म्हणाले, “भगवन्, जो ज्ञानी झाला तो सर्व बंधनातीत असतो. त्याने जीवनाची सारी बंधने तोडलेली असतात. मी अमुक होईन, तमुक होईन, अशी आशा-आकांक्षा त्याला नसते. माझ्यापेक्षा कोणी अधिक चांगला, कोणी कमी चांगला, किंवा कोणी माझ्याबरोबरीचा अशा प्रकारची जाणीव त्याला नसते.” बुद्ध म्हणाले, “जे खरे नाणे आहे, तेसुद्धा अशाच रीतीने ज्ञानाचे स्वरूप वर्णितात. परंतु 'अहं' विषयी ते काही बोलत नाहीत. आपण काय मिळविले ते ते सांगतात परंतु आत्म्याच्या बाबतीत ते मुके असतात."

निर्वाण हे भौतिक नाही. या पृथ्वीशी, या मर्त्य जगाशी त्याचा जणु संबंध नाही. कारण ज्यांना निर्वाण प्राप्त होते ते जन्म- मरणाची खंतच बाळगीत नाहीत. त्याविषयी ते उदासीन असतात. निर्वाण स्वत:बरोबर परमोच्च सुखालाही घेऊन येत असते. थेर व थेरीगाथा यांतील बहुतेक काव्याला निर्वाणाने प्रेरणा दिली आहे मरताना या शरीराचे काय होते? ज्याला निर्वाण मिळाले त्याचे जीवन सर्वस्वी संपले का? की या इंद्रियगम्य जगाजवळचाच फक्त त्याचा संबंध संपतो, आणि ती जी खरी सत्यता, तेथील अस्तित्वाचा आनंद तो मुक्तात्मा अनुभवू लागतो? या प्रश्नाचे उत्तर बुद्ध देऊ इच्छित नाहीत. ते टाळतात. निर्वाण म्हणजे केवळ शून्याकार असे मानावयास धार्मिक ग्रंथातील पुरावा मिळणे फार कठीण आहे बुद्धधर्माच्या ग्रंथातून जेथे जेथे पावित्र्याच्या परमधन्य स्थितीचे अत्यंत वक्तृत्वपूर्ण वाणीने वर्णन केलेले असते, तेथे ते वर्णन खात्रीने शून्यतेचे नसते. नैतिक मार्गाने मिळणाऱ्या परिपूर्णतेचे वर्णन म्हणजे का मरणाचे, जीवनाच्या अभावाचे वर्णन? असे असणे शक्य नाही. निर्वाण म्हणजे शून्यता नव्हे, अभाव नव्हे, उदात्त व उच्च मार्गाचे प्राप्तव्य म्हणजे निर्वाण निर्वाण म्हणजे वासना- विकारांपासून स्वातंत्र्य. निर्वाण म्हणजे अखंड शांती, चिरशांती. देवही ज्याची आशा-आकांक्षा करतात असे जीवन म्हणजे निर्वाण. असे हे निर्वाण शून्यमय कसे असू शकेल ? स्वतःचे अलग अस्तित्व राखणारी सारी बंधने गळून जाणे म्हणजे निर्वाण. ज्या ज्या गोष्टींमुळे आपण भेदभाव निर्मितो त्या सर्व गोष्टींना तिलांजली देणे म्हणजे निर्वाण निर्वाण म्हणजे दिक्कालातीत अशा अनंततेतील, अशा सर्वात्मकतेतील स्थिर असे जीवन. पूर्वीच्या जीवनाचे हे केवळ शुद्धिकरण नसते, तर आजच्या व मागच्या सर्व आकारांचे, सर्व स्वरूपांचे ते समाप्तीकरण असते. निर्वाण म्हणजे जे येथे या क्षणी आहे, त्याहून काहीतरी भिन्न असे जीवन. ज्या वेळेस 'मृत्यूहीन', ‘अंतहीन', 'चांचल्यहीन' अशी विशेषणे निर्वाणास लावण्यात येतात, त्यावेळेस ही विशेषणे आपल्या या क्षणीच्या जीवनास उद्देशून योजिलेली नसतात, तर परिपूर्ण स्थितीची ती निदर्शक असतात; पूर्णपुरुषास, मुक्त पुरुषास लावलेली ती विशेषणे असतात. “ज्याला ते अमृतत्व लाभले त्याला कोणते माप मापू शकेल? ज्या अर्थी जीवनाचे सारे आकार तेथे विलीन होतात, त्या अर्थी वाणीचेही सारे मार्ग तेथे खुंटतात.”

अग्गि-वच्छगोत्त सुत्तामध्ये म्हटले आहे, की इंधन संपताच ज्वाळाही संपते, त्याचप्रमाणे वासना-विकार नष्ट होताच जीवनाचे जळण संपते. परंतु दृश्य अग्नी विझणे म्हणजे संपूर्ण विनाश नव्हे. फक्त विषयवासना विझते. अशांतीची आग विझते. पसेनदि नावाच्या राजाला भिक्षुणी खेमा म्हणते, “राजा, बुद्धदेवांनी हे सारे विवरण करून सांगितलेले नाही."

“बुद्धांनी का नाही सांगितले?” राजा विचारतो.

“राजा, तुला मी एक प्रश्न विचारते व तू त्याचे उत्तर दे. गंगेच्या वाळूचे कण मोजील असा कोणी तुझ्याजवळ आहे का? असल्यास सांग."

“हे पवित्रे, असा माझ्याजवळ कोणी नाही.'

“राजा, समुद्राचे पाणी इतके आहे असे मोजून सांगणारा कोणी तुझ्याजवळ आहे का?”

“हे पवित्रे, असा माझ्याजवळ कोणी नाही. "

“का बरे नाही?"

“कारण, हे पवित्रे, सागर अनंत आहे, अगाध आहे."

“राजा, त्याप्रमाणेच ज्या शरीरामुळे तथागताचे तुम्ही वर्णन करू शकता ते शरीर नष्ट होते. उन्मळून पडलेल्या ताडाच्या झाडाप्रमाणे शरीर शून्य होऊन पडते. ते भविष्यकाळी पुन्हा उठत नाही. नामरूपापासून मुक्त झालेला, देहापासून मुक्त झालेला, हा तथागत, सागराप्रमाणे गहन-गंभीर, अगाध, अनंत असा असतो.”

जो मुक्तात्मा होतो, तो सर्व नाशिवंत संघातांपासून मुक्त होतो. परंतु याचा अर्थ तो शून्य होतो असा नाही. तो काहीतरी सत्य रूपाने, शाश्वत रूपाने असतोच. अवर्णनीय असे ते स्वरूप असते. ज्या वेळेस यमक म्हणाला, की ज्याने सारे पाप धुतले आहे, ज्यांच्यातील सारे असत् नष्ट झाले आहे, असा भिक्षु मरणोत्तर उरत नाही, त्याला मरणोत्तर जीवन नाही, तेव्हा बुद्ध म्हणाले, “हे पाखंड मत आहे. ही नास्तिकता आहे. या जीवनातही संताचा स्वभाव समजणे कठीण आहे. मुक्ताचे चरित्र समजणे बुद्धीच्या पलीकडचे आहे.” एकदा वत्साला बुद्ध म्हणाले, “नामरूपापासून जो मुक्त होतो, तो अनंत होतो. ज्याप्रमाणे सागर मोजता येत नाही, तद्वत् सिद्ध पुरुषही अपरिमेय आहे.”

तर्कातीत अशी ती जीवनाची दशा आहे. त्या स्थितीचे नीट आकलन करता येणार नाही. 'नेति नेति' अशा नकारानेच त्या स्थितीचे वर्णन करता येईल. अशा स्थितीच्या वर्णनात अशी नकारात्मक विशेषणेच पदोपदी येतात. ती दैवी गुहा, तो अनंत ईश्वर, तो पराहीन सागर, ते अनंत वाळवंट, असे शब्द या नेति नेति धर्मतत्त्वज्ञानात येतात. ती जी पूर्ण स्थिती, ती आपल्या ह्या सामान्य जीवनासारखी नसते. परंतु असे असले तरी काहीतरी भावरूप असे प्रत्यक्ष जीवन तेथे असते यात शंका नाही. तेथे सारा शून्याकार नसतो. एवढेच की ती अलौकिक दशा वाणीने वर्णिता येत नाही, मनाने आकलिता येत नाही.

हे जगत् हा संसार म्हणजे सतत फरक होत जाणारा अखंड प्रवाह. परंतु निर्वाणातील जीवनात अखंड शांती. निर्वाण म्हणजे अनंताच्या कुशीतील चिर विश्रांती. सामान्य अशा या मानवी जीवनातील जाणीवेपेक्षा त्या निर्वाणदशेतील जाणीव अशी निराली असते. त्या जाणीवेला निराळेच नाव दिले पाहिजे. तिला अनात्म जगाची नेणीव म्हणा वाटले तर. आपणास या संसारात या अनात्म जगाची जाणीव असते; या बाह्य जगाची जाणीव असते.

उपनिषदात म्हटले आहे, “तो जरी जाणत नसला, तरी सारे जाणतो.” कारण ज्ञाता व जाणणे या गोष्टी अलग कशा करता येतील? जाणणे नष्ट होत नाही, परंतु ज्याला जाणावे असे पृथक काही उरतच नाही. ‘ते पाण्याप्रमाणे पारदर्शक बनते. ते एक आहे, अद्वितीय आहे, साक्षी आहे. ब्रह्माचे जग ते हे.' सारे स्फटिकासारखे स्वच्छ व पारदर्शक आहे. तेथे कसला अंधार नाही, कशाचा विरोध नाही. तेथे चंचलाचे नावही नाही. बृहदारण्यक उपनिषदाच्या त्या सुप्रसिद्ध उताऱ्यात याज्ञवल्क्य आपल्या पत्नीस मैत्रेयीस म्हणतात, “मुक्तात्मा परमोच्च सत्याशी, परब्रह्माशी एकरूप होतो. दुसऱ्या कोणत्याही शब्दांत त्याचे वर्णन करता येणार नाही, ज्याप्रमाणे मिठाच्या खड्याला आतबाहेर निराळेपणा नाही, अंतर्बाह्य त्याची एकच चव, त्याप्रमाणे या आत्म्याला आतबाहेर दुसरे काही एक नसून त्याच्या अंतर्बाह्य एक ज्ञान संपूर्णपणे भरलेले असते. जीवात्मा या पंचमहाभूतांपासून जन्मतो व त्याच्याबरोबर गळतो. मरणोत्तर मग जाणीव नसते.” हे शब्द ऐकून मैत्रेयीची वृत्ती जरा गोंधळल्यासारखी दिसते. तेव्हा यात्रवल्क्य पुन्हा तिला म्हणाले, “गोंधळात पाडणारे असे भी काहीच सांगितले नाही. हे प्रिये, खरोखरच तो आत्मा शाश्वत आहे, अविनाशी आहे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत एक दु सऱ्यास बघतो, एक दुसऱ्याची चव घेतो, एक दुसऱ्यास अभिवादन करतो, एक दुसऱ्याचे ऐकतो, एक दुसऱ्यास स्पर्श करतो, एक दु सऱ्यास जाणतो. परंतु जेव्हा सर्वत्र आत्माच भरलेला असतो, त्या वेळेस आपण दुसऱ्या कोणाला बघावे, कोणाचे ऐकावे, कोणाला स्पर्शावे, कोणाला हुंगावे, कोणाला जाणावे? ज्याच्या शक्तीमुळे आपण हे सारे जाणतो, त्याला आपण कसे जाणावे? त्या आत्माचे नेति नेति असेच वर्णन करावे लागते. तो दुर्बोध आहे. त्याचे ज्ञान होणे कठीण. तो अविनाशी आहे, कारण त्याचा नाश होणे शक्य नाही. तो कोणाशी बद्ध होत नाही म्हणून तो बंधनातीत आहे. तो बंधन जाणत नाही, दुःख जाणत नाही, नाश जाणत नाही. हे प्रिये, त्या ज्ञाताला आपण कसे जाणावे?” तो प्रकाशाचा प्रकाश आहे. एका सुंदर उताऱ्यात म्हटले आहे, “जे प्रज्ञावंत त्या ब्रह्माला स्वतःच्या आत्म्यात पाहतात, त्यांना चिरशांती मिळते. इतरांना नाही. ते ब्रह्म ते हे, असे ते म्हणतात व अनिर्वचनीय आनंद अनुभवतात. तर मग त्याला कसे जाणायचे? त्याला स्वतःचा प्रकाश आहे, की ते ब्रह्म दुसऱ्यापासून प्रकाश घेते; तेथे सूर्य प्रकाशत नाही; चंद्र, तारे प्रकाशत नाहीत; तेथे वीज नाही, अग्नी नाही. जेव्हा आत्मा प्रकाशतो, तेव्हा सारे प्रकाशित होते. त्याच्या प्रकाशाने सारे जगत् प्रकाशित होते. "

उदानामध्ये बुद्धाच्या निर्वाणाच्या कल्पनेचे बरोबर वर्णन आहे. उदानात म्हटले आहे की, “ती जी अंतिम सत्यता, ती तृष्णेच्या, अज्ञानाच्या, द्वैताच्या पलीकडे आहे; तेथे ना आसक्ती, ना मोह. ती सत्यता म्हणजे परतीर; ती सत्यता स्थिर आहे, शाश्वत आहे; कशानेही ती सत्यता विचलीत होत नाही.” असे हे निर्वाण आहे. उदानातील हे वर्णन बुद्धांच्या निर्वाणास तंतोतंत लागू पडते. बुद्धांनीच स्वत: म्हटले आहे की, “असा एक लोक आहे, की जेथे ही पृथ्वी नाही; तेथे वायू नाही प्रकाश नाही; तेथे ही पंचमहाभूते नाहीत; तेथे दिक्काल नाहीत; तेथे कशाचे भान नाही, किंवा कशाचे भान नाही असेही नाही; तेथे ही अनंत जाणीव नाही, तेथे शून्यताही नाही; तेथे ना इहलोक ना परलोक; ना चंद्र ना सूर्य. मी त्याला येणेही म्हणत नाही वा जाणेही म्हणत नाही, ते तिष्ठणेही नाही. तेथे ना गती ना विश्रांती; तेथे ना जन्म ना मरण; तेथे स्थिरता नाही, बदलता अखंड प्रवाह नाही, तेथे आधार नाही, काही नाही; अशी ती स्थिती म्हणजे दुःखाचा अंत.” बुद्धांनी वर्णिलेली ही स्थिती दिक्कालात मावू शकत नाही. ही स्थिती कालाच्या अतीत आहे, सर्व अवकाशांच्या अतीत आहे. ही स्थिती सर्व चांचल्याच्या, सर्व फेरबदलांच्या, स्थित्यंतरांच्या अतीत आहे. त्या स्थितीत कर्म नाही, दुःख नाही. त्या स्थितीत गती वा विश्रांती समानार्थकच आहेत.


इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

6
Articles
महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)
0.0
या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलना नाही. असा परिणाम करणाऱ्या विभूतींत ते अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक यादृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड़ इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे स्थान उच्च आहे. सर्व सुधारलेल्या मानवजातीचे ते वारसा झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल आध्यात्मिक दृष्टी यांच्या कसोट्या लावून पाहू तर निःशंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींयैकी एक आहेत.
1

महात्मा गौतम बुद्ध

2 June 2023
6
0
0

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका म

2

॥ १ ॥

2 June 2023
5
0
0

बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या

3

॥ २ ॥

2 June 2023
1
0
0

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यात शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध

4

॥ ३ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्रष्टेही इतर सामान

5

।। ४।।

2 June 2023
0
0
0

बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाधा येते असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोहोचतो

6

॥ ५ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांच्या स्वतःच्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्

---

एक पुस्तक वाचा