shabd-logo

॥ ३ ॥

2 June 2023

14 पाहिले 14
बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्रष्टेही इतर सामान्य जनांप्रमाणे स्थलकालनिबद्ध असतात. सभोवतींच्या आचारविचारांतूनच त्यांच्या कल्पनाही रंगरूप घेत असतात. त्यांच्या वर्तनाची तन्हा आसमंतातल्या परिस्थितीतूनच जन्मलेली असते. अलौकिक बुद्धीचे महात्मे आपापल्या काळातील विचारांत नवीन मौलिक भर घालतात यात शंका नाही. परंतु स्वतःच्या काळाच्या अतीत त्यांनाही जाणे शक्य नसते व ते जातही नाहीत. समकालीन लोकांच्या प्रश्नांना ते उतरे देतात. ती उत्तरेही, परंपरागत वचने व उतरे जी असतात, त्यांना फारशी सोडून नसतात. कधी कधी असे वाटते, की त्यांनी दिलेली उत्तरे नवीन होती. परंतु असे करताना, त्या सत्याकडे आपण ओढले जात आहोत असे त्यांना वाटे, त्या गहन गंभीर सत्यांना प्रकट करीत असता परंपरेने आलेलीच अपुरी भाषा ते वापरतात. त्याच संज्ञा व कल्पना ते वापरतात. स्वतःच्या काळाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असूनही ते स्वतःच्या काळाचेच प्रतिनिधी राहतात. विचार हा कधीही असंबद्ध उड्या मारीत जात नाही. जुन्या विचारांतच नवीन अर्थ दाखवून बुद्धी नवीन कल्पनांकडे जात असते. परंपरा न तोडता बुद्धी पुढे जात असते. ज्यांना ऐतिहासिक दृष्टी नाही अशा टीकाकारांच्या टीकेपासून बुद्धांनाही त्रास सहन करावा लागला आहे. ऐतिहासिक दृष्टी नसल्यामुळे बुद्धांची स्तुतीही केली गेली, निंदाही केली गेली. ऐकोणिसाव्या शतकात विज्ञान व नवज्ञान यांच्या वाढीमुळे युरोपभर संशयवादाची प्रचंड लाट उसळली. आणि या वेलेसच पाश्चिमात्यांना बुद्धधर्म वाढत्या प्रमाणात ज्ञात होऊ लागला. युरोपात या वेळेस प्रत्यक्षवाद, अज्ञेयवाद, नास्तिकवाद, नैतिक पायावर उभारलेला मानवतावाद, इत्यादी वादांना वाढता पाठिंबा मिलत होता. संशयवादी व अश्रद्धावादी वाङमयात बुद्धांचे नाव आदराने उच्चारलेले अनेकदा दिसून येते. नैतिक पायावर मानवतावादाची उभारणी करणारेही म्हणू लागले, की आमच्या विचारसरणीचा पहिला मोठा पुरस्कर्ता बुद्ध होय मानवाचे सुख, मानवाची प्रतिष्ठा, सर्व मानवांचे मानसिक ऐक्य, यांचा पहिला पुरस्कर्ता बुद्ध असे हे सांगतात. मनुष्याला सत्य ज्ञान होणे शक्य नाही असे म्हणणारे, आणि दृश्य जगापलीकडे जाणण्यासारखी अशी सत्यता नाहीच मुळी असे म्हणणारे, दोघेही आपापल्या मताच्या मंडनार्थं बुद्धांची साक्ष काढतात. बुद्धिप्रधान अज्ञेयवादी, जे अस्पष्ट अशा इंद्रियातीत ज्ञानाचा जणू खेळ करू बघतात, तेही बुद्धांचेच उदाहरण पुढे मांडीत असतात, सामाजिक आदर्शवादी, नैतिक गूढवादी, बुद्धिप्रधान भविष्यवादी सारे बुद्धांच्या शिकवणीकडे आकृष्ट होतात व त्यांच्या शिकवणीचा स्वतःच्या समर्थनासाठी उपयोग करतात. बुद्धांच्या शिकवणीचे आजकाल फार महत्त्व आहे. यात शंका नाही. परंतु बुद्ध ज्या काळात वावरले, त्या काळातील परिस्थिती जर आपण नीटपणे समजून घेतली नाही, तर त्यांची शिकवण समजण्याची आशा नाही. आणि ह्यासाठी आपणाजवळ ऐतिहासिक कल्पनाशक्ती हवी. आणि ती असणे सोपी गोष्ट नाही.

बुद्धांनी स्वतःच्या आयुष्यात साध्या शब्दांनी उपदेश केला. ते सोप्या गोष्टी सांगत, साधे विचार सांगत. परंतु नंतरच्या काळात अनेक वादविवाद त्यांच्या साध्या शिकवणीत घुसले. साहजिकच मग बुद्धांच्या उद्गारांकडे पाहतानाही नंतर जी अनेक तत्त्वे व मते त्यांत घुसली व जी आपल्याही डोक्यांत असतात, त्यांचेही प्रतिबिंब त्यात पाहण्याची वृत्ती होते. जो जो थोर विचार असतो, मग तो धार्मिक असो वा तात्त्विक असो, त्यात अनेक अर्थ प्रसवण्याची शक्ती असते. ते अर्थ त्या त्या विचारस्रष्ट्यांच्या मनात असतात की नाही, देव जाणे.

नंतरची अर्थविवरणे दूर करून बुद्धांकडे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील एक महान विचारस्रष्टा या नात्याने पाहणे, त्या काळात सर्वत्र उपदेश देत संचार करणारी बुद्धांची ती सजीव मूर्ती डोळ्यांसमोर आणणे ही गोष्ट कठीण आहे, जरा नाजूक अशी आहे. हे पुनर्रचनेचे कार्य कधीही पुरे होणार नाही हे स्पष्ट आहे. परंतु आपण प्रयत्न करू तर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या एक सर्वसाधारण असे चित्र डोळ्यांसमोर उभे करू शकू. त्या चित्राची बाह्यरूपरेषाच अधिक यथार्थ असणे शक्य आहे. कल्पनेने ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात आपण जाऊ या. काय बरे आपणास दिसते? त्या काळी हिंदुस्थानात विचारांचे शेकडो प्रवाह होते. नाना आचार, नाना रुढी; नाना श्रद्धा, नाना विश्वास; पशुपक्ष्यांची पूजा, जादूटोणा मंत्रतंत्र, असे अनेक प्रकार होते. परंतु या सर्वांचा मिळून एक महान प्रवाह होऊन तो अद्वैतवादाकडे जात होता. सत्य शोधून त्या सत्याशी नीट संबंध जोडणे हा जो मानवी प्रयत्न तो नेहमी बहुधा द्वैतातच, अनेकतेतच परिणत होतो. हिंदुस्थानातही असे द्वैतवादी विचार त्या काळात होते. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टींत या सर्व भिन्न दर्शनांचा एकवाक्यता होती. प्राणी जन्मला तेव्हाच त्याचे जीवन सुरू झाले, किंवा तो मेला म्हणजे त्याचे जीवन संपले असे नाही. अनंत जन्मांच्या साखळीतील हा जन्म एक दुवा आहे; प्रत्येक नवीन जन्म पूर्वीच्या जन्मावरून निश्चित होत असतो; पूर्वीच्या जन्मातील कृत्यांचा ठसा व परिणाम आजच्या जन्मावर होत असतो. पशू, मानव, देव हे सारे आकार त्या साखळीतील दुवे आहेत. सत्कर्मांनी आपण स्वतःला उन्नत करीत असतो, आपण स्वर्ग मिळवितो; दुष्कृत्यांनी आपण अध:पतित होत असतो. ज्या अर्थी सर्व प्राण्यांना मरण आहे; त्या अर्थी खरे सुख स्वर्गात वा पृथ्वीवर शोधण्यात अर्थ नाही. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणे हे धर्ममय पुरुषाचे ध्येय असते; यालाच मोक्ष म्हणतात, ब्रह्मैक्य म्हणतात, निर्वाण म्हणतात.

जन्ममरणातून मुक्त होण्याचे नानाविध प्रकार व मार्ग त्या काळी कल्पिलेले दिसतात. त्यातील चार स्पष्टपणे उमटून पडतात :

(१) वैदिक सुक्ते उद्घोषितात की, ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्याची सर्वोत्तम साधने म्हणजे प्रार्थना व पूजा. ( २ ) प्रथम प्रथम देवतांना साधा हविर्भाग देण्यात येत असे. त्यातून पुढे यज्ञयागांची विशाल प्रक्रिया जन्माला आली. हे यज्ञयाग लोकप्रिय झाले. उपनिषत्पूर्वकाळी हे यज्ञयाग फार गुंतागुंतीचे झाले होते. उपनिषदांनी सांगितले, की हे यज्ञयाग अपुरे आहेत. एवढ्याने भागणार नाही. तरीपण उपनिषदांनी यज्ञयागांचा पूर्णपणे धिक्कार केला नाही. ऐहिक सुखप्राप्तीचा तो एक उपाय आहे, अमृतत्वही त्यामुळे मिळेल. आणि या दृष्टीने यज्ञयाग उपयुक्त, असे उपनिषदे सांगतात. ( ३ ) काही पंथांमध्ये संन्यासधर्म प्रिय होता. संयम, पावित्र्य, ध्यानधारणा, एकाग्रता, मनोनिग्रह इत्यादी साधनांनी मनुष्य विचारशक्ती व इच्छाशक्ती वाढवू शकतो. संन्यासमार्गाचे पुरस्कतें पुढे फसून दुसऱ्याच फंदात पडले. इच्छा दडपून, स्वेच्छेने देहदंड सोसून मनुष्य ऋद्धीसिद्धी मिळवितो, अतिमानुषी अशी अलौकिक शक्ती मिळवितो, असे समजण्यात येऊ लागले. यज्ञापेक्षा तप श्रेष्ठ आहे, ब्रह्मज्ञान मिळविण्याचे ते महान साधन आहे, असे सांगण्यात येऊ लागले. (४) उपनिषदे विद्येवरे भर देतात, अंतर्ज्ञानावर भर देतात, जे सत्य आहे त्याच्या साक्षात्कारावर भर देतात. वासनाविजय करावा, सांसारिक बंधने व स्वार्थ यांच्यापासून दूर असावे, अनासक्त राहावे. ज्ञानाला या सर्व गोष्टींची जोड हवी. विद्या म्हणजे एकाग्रता, एक प्रकारची तन्मयता, अखंड समाधी, हे गाढ चिंतन असते; परमात्म्याशी स्वत:च्या ऐक्याचा तो साक्षात्कार असतो. त्या अनुभूतीने सारी ऐहिक आसक्ती गळून जाते, सारे बंध तुटतात. असे हे चतुर्विध मार्ग होते. बुद्ध आत्यंतिकता टाळतात. त्यांचा ‘मध्यम मार्ग' आहे. देहाची पूजा व देहदंडना यांच्यातील मधला मार्ग त्यांचा आहे. बुद्धांचा दृष्टिकोन चौथ्या प्रकाराशी जुळता आहे. त्यांची शिकवण उपनिषदांतूनच निघालेली आहे. उपनिषदांचे असे मत आहे, की जे जग आपण जाणतो, ते जग, मग ते बाह्य असो वा आंतरिक असो, फारसे महत्वाचे नाही. या जगाला सत्यता नाही. खरी पारमार्थिक सत्यता द्रष्ट्या आत्म्याला आहे. सर्व आत्म्यांचा तो आत्मा आहे. ब्रह्म व हा आत्मा एकच आहेत. या परमोच्च सत्याचे ज्ञान, जीवात्म्याचे परमात्म्याशी हे ऐक्य व त्याचा साक्षात्कार म्हणजे मोक्ष. ही एक जीवनदशा आहे. कोठे जायचे यायचे नाही. विश्रांती घेण्याचे हे एखादे स्थान नाही. जीवनाचा हा एक विशेष गुण आहे. आध्यात्मिक शिकवणीने, व्रतनियमांनी, आध्यात्मिक प्रकाशाने हा गुण, ही मुक्तदशा अंगी येते. हे ध्येय लाभेपर्यंत मनुष्य कर्माने बद्ध आहे. तोपर्यंत ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं' आहे.

जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य हा जो महासिद्धांत, त्याच्या छायेखाली अनेक मतमतांतरे जन्माली आली, त्या त्या भक्तांचे दैवत परमात्म्याशी एकरूप केले जाई. अद्वैताची ती परिभाषा सर्वत्र वापरली जाई.

हे दृश्य नामरूपात्मक जगत् सत्य नाही, हा सिद्धांत बुद्ध स्वीकारतात. तसेच हा दृश्य जीवही शाश्वत नाही. जीव व जगत् या दोहोंतही एका अभंग कायद्याने सारखा बदल होत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे, की या सतत बदलणाऱ्या कालबद्ध जीवनातून मुक्त होणे; या जीवनाच्या पलीकडे जाऊन निर्वाण प्राप्त करून घेणे. बुद्धिप्रामाण्य न मानणाऱ्या अनेक आग्रही धर्ममतांना बुद्ध किंमत देत नसत. परंतु या विश्वात खरोखर काही भावरूप, सद्रूप असे आहे की नाही; व्यक्तीत वा त्या निर्वाण दशेत काही सत् असते की नाही, ते सांगण्याचे बुद्ध टाळीत. या जगातील जीवन किती अपूर्ण; येथे किती भेद, बंधने, दु:खे, आणि त्या मोक्षदशेत किती निस्सीम आनंद; असे उपनिषदे सदैव सांगत असतात. बुद्धांच्या व उपनिषदांच्या शिकवणीत फरक असलाच तर तो संसाराविषयीच्या, जगाविषयीच्या दृष्टिकोनात नसून, मोक्षदशेसंबंधीच्या, निर्वाणासंबंधीच्या कल्पनेत आहे.

बुद्धांच्या मौनाचा अर्थ काय, या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी या मौनापाठीमागे असणाऱ्या बुद्धांच्या हेतूकडे जरा वळू या. बुद्धांच्या शिकवणीचे सार नैतिक श्रेष्ठतेत आहे. जीवनासंबंधीच्या व विश्वासंबंधीच्या त्यांच्या कल्पना, त्यांच्या अत्यंत व्यावहारिक अशा कर्ममय दृष्टिकोनातून निघालेल्या आहेत. प्रत्येक वस्तूचे अस्तित्व कोणत्यातरी कारणावर अवलंबून असते. ते कारण दूर करू तर कार्यही दूर होईल याज्ञिकांनी, धर्मोपाध्यायांनी बुद्धांच्या काळात यज्ञयागात्मक अगडबंब विधींचे उपाय सुचविले होते. परंतु त्यांनी रोग बरा होणार नव्हता. दुःखाचे मूळ उपटून टाकायचे असेल, तर हृदय शुद्ध करणे हा उपाय आहे. नीतीचा कायदा पाळणे हा उपाय आहे. त्या नीतीचे महत्त्व जी जी तत्त्वज्ञाने कमी लेखीत, ती सारी तत्त्वज्ञाने बुद्ध झुगारून देत.

उपनिषदांची घोषणा जर सत्य असेल, जर आपण मुळात दैवी असू, तर आपणास मिळविण्यासारखे काय उरले? डोळ्यांसमोर ध्येय ठेवून तदर्थ धडपड करण्यासारखे काय राहिले? जैन व सांख्य तत्त्वज्ञाने अनेक जीव मानतात. हे अनंत जीव प्रकृतीच्या पसाऱ्यात पडलेले आहेत. यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी योगाचरणाचा मार्ग दाखविला. उपनिषदांप्रमाणे एक विश्वात्मा माना किंवा सांख्य दर्शनाप्रमाणे अनेक पुरुषवाद माना. दोघांचेही आत्म्यासंबंधीचे, पुरुषासंबंधीचे अंतिम वर्णन एकच आहे. हा आत्मा, हा पुरुष शाश्वत आहे; अज, अव्यय आहे. परंतु आपण नीतीला जेव्हा प्राधान्य देतो, तेव्हा काहीतरी सुधारावयाचे आहे असे गृहीत असते. मनुष्य मुळात दैवी नाही. त्याला दैवी व्हायचे आहे. सद्विचार, सत्कर्मे, सद्वाणी यांच्या सतत अभ्यासाने, प्रयत्नपूर्वक रीतीने ही दैवी स्थिती उभारावयाची असते. मनुष्य हा एक प्रत्यक्ष, दृश्य असा धडपडणारा प्राणी आहे. जेथे सर्व संशय फिटतात, सारे बंध तुटतात, अशा त्या अतीन्द्रिय शाश्वत ज्ञानावस्थेच्या कथा या धडपडणाऱ्या मानवी प्राण्यास सांगण्यात काय अर्थ? ही वर्णने ऐकून त्याला कितीसे समाधान लाभणार? या प्रत्यक्ष चालत्या बोलत्या सांसारिक मनुष्याला नीती मिळवायची आहे, त्या अतीन्द्रिय आत्म्याला नाही मिळवायची. हे सारे दृश्य जगत् अनात्म आहे, जगातील वस्तूंत वा व्यक्तींत ते शाश्वत सत्य नाही असे सांगणे म्हणजे केवल वैचारिक उत्पत्ती नाही; किंवा जगाच्या भंगुरत्वासंबंधीचा हा एक भावनापूर्ण उद्गार असेही नाही, तर सर्व नीतीचा पाया या म्हणण्यात आहे. प्रयत्न व निश्चय यांच्या जोरावर आत्मा उभारावयाचा आहे, निर्मायचा आहे. अनात्म पसाऱ्यातून नीतीधर्माच्या पालनाने आत्मा निर्माण करा. आत्मा ही अशी वस्तू आहे, की जी उत्क्रांत होत असते, वाढत असते, विकसित होत असते.

कष्टपूर्वक प्रयत्नांनी प्राप्त करून घेण्यासारखी ही गोष्ट आहे. आपोआप अनुभवायला मिळणारी ही वस्तू नाही. आपला हा जीवात्मा म्हणजे आपणास दग्ध करणाऱ्या भावनांचा, ज्यांचा आपण ध्यास घेतो त्या वासना-विकारांचा, आपली पिच्छा न सोडणाऱ्या अनेक इच्छांचा, जे अनेक निर्णय आपण घेतो त्या निर्णयांचा एक गोळा आहे. या सर्व गोष्टींमुळेच आपल्या जीवनाला एक प्रकारचा रंग चढला आहे. यामुळेच जीवनाचे हे नाटक चालले आहे. या वासना-विकारांत, या इच्छांत, या भावनांत, शाश्वत असे काही नाही. निरपेक्ष, न बदलणारे असे काही नाही म्हाणून तर आपण आज जसे आहोत त्याहून निराळे होणे शक्य आहे. व्यक्तीची सत्यता त्याच्या सर्जनात्मक संकल्पशक्तीत आहे. भावनांचा कोलाहल जेव्हा आपण शांत करतो, वस्तुजाताचा प्रवाह थांबवितो, शारीरिक वासना व भुका यांना गप्प करतो, त्या वेळेस आपणास आपल्यामधील आत्मसामर्थ्याचा साक्षात्कार होतो; एक प्रकारच्या आपल्या आत्मशक्तीची प्रतीती येते. आत्मा पथभ्रष्ट झाला, तर स्वार्थी बनून दुसऱ्यांचे नुकसान करायला प्रवृत्त होतो. जगातील दु:खाचे मूळ वासना-विकारांनी भरलेल्या अहंभावात आहे. अहंकारी असणे म्हणजे ज्याला अजून डोळे फुटले नाहीत अशा प्राथमिक अवस्थेतील अविकसित जीवाप्रमाणे असणे होय. केवळ स्वार्थ पाहणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या सत्यतेविषयी आंधळे असणे. आपल्या शारीरिक व मनोमय कोशांतून जेव्हा आपण बाहेर पडतो, स्वत:च्या शारीरिक इच्छा-वासनांच्या आसक्तीतून जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हाच आपली खरी वाढ होऊ लागली असे समजावे. वासना-विकारांनी बरबटलेल्या अशा या दृश्य जगाचा जेथे मागमूसही नसतो, अशा त्या अति उदात्त व महनीय अशा स्थितीत आपल्या जीवनाची मुझे आहेत हे समजणे म्हणजे वाढू लागणे. अहंकारापासून मुक्ती म्हणजे सर्व सजीव सृष्टीविषयी सौम्यवृत्ती होणे; सर्व सचेतन सृष्टीविषयी अति खोल व थोर सहानुभूती दाखविणे. अहंचा त्याग म्हणजे आपले संपूर्ण स्वरूप प्राप्त करून घेणे; या विश्वाच्या सुसंवादी रचनेतील स्वतःचे निश्चित व व्यवस्थित स्थान जाणणे.

‘अहं— शाश्वत व अभंग आहे असे बुद्ध मानीत नाहीत. तसेच मनुष्य मेला की सारे संपले हेही मत ते स्वीकारीत नाहीत. जर मरणाने सारा खेल खलास होत असेल, तर मग आत्मसंयमन वगैरे करून या क्षणभंगुर जीवनातील ओझे वाढवा का, असे पुष्कळांना वाटण्याचा संभव आहे. आपला हा अहंकारी जीवात्मा म्हणजे एक मिश्रण आहे. तो सदैव असतो, परंतु बदलत असतो.

अति दैवी गोष्टींचा विचार करू लागल्याने मनुष्याचे लक्ष नैतिक मूल्यांपासून चलित होते. त्याची शक्ती, त्याची एकाग्रता यांना फाटे फुटतात. सभोवतालची प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्या नैतिक मूल्यांचा अधिकाधिक अनुभव घेणे ही गोष्ट बाजूस राहते. मनुष्याला ज्या शक्ती मिळालेल्या आहेत, त्यांचा उपयोग जीवनातील सत्यम्- शिवम्-सुंदरम् वाढविण्याकडे मनुष्य करीत नाही असे बुद्धांना दिसून आले आणि याचे कारण काय? तर मनुष्य दुसरी कोणतीतरी दैवी शक्ती, बाहेरची शक्ती सारे करील, असे मानीत असतो. जे काम वास्तविक मनुष्याने करायचे असते, ते बाहेरची शक्ती करील असे जोपर्यंत तो मानतो, तोपर्यंत तो स्वतः आपल्या शक्तीचा उपयोग करून जीवन अधिक सुंदर व मंगल करावे म्हणून झटत नाही. बुद्धांना ही गोष्ट दिसून आली. काहीतरी दैवी चमत्कार होऊन एकदम आपला स्वभाव उदात्त व उन्नत होईल, असे मनुष्यास वाटत असते. परंतु बाह्य शक्तींवर विसंबणे, म्हणजे मानवी प्रयत्न सोडणे. बहुजन समाजाच्या दैवतांना बुद्ध नाकारीत नसत. परंतु हे देव नसून देवदूत आहेत असे ते म्हणत. या देवांना या देवदूतांनाही स्वत:ला सुधारण्याची जरुरी असते; हे देव, देवदूतही दृश्य नाशिवंत वस्तूंपैकीच, असे बुद्ध समजत. बुद्धांच्या शिकवणीवरून व प्रत्यक्ष त्यांच्या जीवनावरून ते प्रयत्नशील, कर्मप्रवण अशा जीवनाचे पुरस्कतें दिसतात. सान्या विश्वाचे कायद्याने नियमन होत असते. माणसा-माणसांच्या जीवनात जे आश्चर्यकारक अप्रमाण दिसते, त्याला दैवी शक्ती जबाबदार नाहीत असे बुद्ध म्हणत. ईश्वर म्हणजे मूर्तपुरुष अशी कल्पना बुद्ध स्वीकारीत नाहीत. आपल्या झगड्यांत ईश्वर भाग घेत असतो, विश्वाच्या व्यवहारात ढवळाढवळ करणारा हा कोणी सुलतान आहे, अशा प्रकारच्या ईश्वरविषयक कल्पना बुद्धांच्या नव्हत्या. ईश्वरावर जोर देणे म्हणजे मानवाचे स्वातंत्र्य हिरावून घेणे होय, असे त्यांना वाटे. बुद्धांना महत्त्वाची गोष्ट वाटत होती ती ही, की ईश्वर अतिमानवी प्रांतांत कशा रीतीने आविर्भूत होत असतो हे महत्त्वाचे नसून व्यक्तीत, या प्रत्यक्ष दृश्य जगात, तो विश्वात्मा कशा रीतीने प्रकट होत आहे ही गोष्ट त्यांना महत्त्वाची वाटत होती. या विश्वाचे नियमन धर्म करतो, नैतिक कायदा करतो. हे जग देवांनी, देवदूतांनी नाही बनविले; तर मानवांच्या स्वेच्छेने ते निर्माण झाले आहे, बनले आहे.

मानवी इतिहास म्हणजे मानवी जीवनाचा सामग्र्याने झालेला परिणाम; मानवी इतिहास म्हणजे मानवांना घेतलेले निर्णय, मानवांचे अनुभव. ज्या परिस्थितीत आपण जन्मतो, ती परिस्थिती भूतकाळातील अनेक स्त्री-पुरुषांच्या कृत्यांतून निर्माण झालेली असते आणि आपणही सर्वजण आपापल्या शक्तीप्रमाणे आपल्या कर्मांनी व संकल्पांनी इतिहासातील पुढचा क्षण काय येणार? ठरवीत असतो. मानवी इच्छाशक्ती कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् अशी सार्वभौम वस्तू नाही ही गोष्ट बुद्ध जाणतात, इतर कोणापेक्षाही अधिक यथार्थाने जाणतात. मनुष्य जरी स्वप्रयत्नांनी स्वतःच्या इच्छाशक्तीने सभोवतीचे जग बदलतो, त्याला आकार देतो, तरी हे जगही पदोपदी आपणास अडथळे करीत असते यात शंका नाही. आपणास सभोवतीच्या सजीव - निर्जीव सृष्टीशी सारखी टक्कर द्यावी लागत असते, ही गोष्ट बुद्ध जाणुन आहेत. मनुष्य व परिस्थिती यांची अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया सारखी सुरू असते व यातूनच इतिहासाचे महावस्त्र विणले जात असते. मानवी प्रयत्नाला म्हणूनच महत्व आहे, किंमत आहे. मानवी प्रयत्न उपेक्षणीय नाही.

धर्माच्या आजच्या स्थितीपेक्षा धर्माची जी आदर्श स्थिती, ते धर्माचे ध्येय आहे. सर्व ध्येयात्मक हेतुंचे परमैक्य म्हणजे धर्म. सर्व ध्येयांची बेरीज म्हणजे धर्म. हे ऐक्य आपणास कर्मप्रवृत्त करीत असते. आपणात इच्छा निर्मित असते. धर्माची आपणावर सत्ता असते, कारण धर्मात अशी एक स्वयंभू शक्ती आहे. आपणाहून भिन्न, आपणाहून पृथक् अशा व्यक्तींच्या जीवनात साक्षात्कृत असा धर्म दिसतो म्हणून नव्हे. धर्माला सत्यता आहे, कारण आपल्या कर्मावर त्याची सत्ता आहे. धर्म ही नि:संशय कर्मप्रेरक शक्ती आहे. आणि यासाठी धर्माला महत्त्व व सत्यता आहे. धर्माला अस्तित्वच नाही असे बुद्ध कधीच म्हणत नाहीत. धर्माला स्वतंत्र अस्तित्वही असेल; परंतु सृष्टीच्या पलीकडे असणाऱ्या एखाद्या पुरुषोत्तमाशी धर्म जोडणे त्यांना पसंत नाही. धर्म किंवा नीतीचे ध्येय निसर्गाच्या पलीकडे आहे. ह्या गोटी मनुष्याच्या स्वभावाच्या बाहेरच्या आहेत असे मानणे, म्हणजे नैसर्गिक साधने निःसत्त्व व भ्रष्ट आहेत असे मानणे होय. धर्म ही अशी बाह्य वस्तू मानणे, म्हणजे मनुष्य स्वभावतः दुष्ट व पापी आहे व त्याचा उद्धार म्हणजे ईश्वरी कृपा होय, असे मानण्यासारखे आहे. मानवी स्वभावातील सुधारणा मानवी प्रयत्नांनी घडून आली आहे. मानवी प्रयत्नांचा हा नैसर्गिक परिणाम आहे, असे मग म्हणता येणार नाही अतिमानवी शक्तीमुळे हे एकदम फरक झाले, एकदम क्रांती झाली, असे मग मानावे लागेल. धर्माकडे मनुष्याचा ओढा असतो याचा अर्थ बुद्ध असा करतात, की धर्म मानवी कर्मातून प्रकट होत असतो. न्यायी असावे, दयाळू असावे असे आपणांस वाटते व आपण तसे वागू लागतो. या नैसर्गिक सत्कर्माची ओढ प्रत्यक्ष कर्माद्वारे जसजशी अधिकाधिक प्रकट होत जाईल, तसतसे जग अधिक सुंदर व मंगल होईल. जगातील अव्यवस्था, निर्दयता, जुलूम कमी होतील. धर्म हे जीवनातील प्राणमय तत्व आहे. कर्ममय धर्म जगाला उभारीत असतो. बुद्धांच्या धर्मात, त्यांच्या शिकवणीत, वैयक्तिक निष्ठेला वाव नाही, प्रेमाची खोल, गंभीर पराकाष्ठा नाही; प्रेमाचे वेड नाही, सांसारिक प्रेमाप्रमाणे दिसणारे जिवाशिवाचे हितगुज नाही; आत्म्या - आत्म्यातील जिव्हाळ्याचे संवाद नाहीत; तर मग बुद्धांचा धर्म म्हणजे काय? या दृश्य पसाऱ्यापलीकडे व्यापून राहिलेली जी सत्यता, तिचे दर्शन म्हणजे धर्माचा गाभा, धर्माचे रहस्य; स्वत:हून मोठे, स्वत: पलीकडे काहीतरी आहे असे आतून वाटणे व त्याच्याशी सत्यरूप असणे हा धर्माचा प्राण, हे धर्माचे सत्य स्वरूप बुद्धांमध्ये हा धर्माचा प्राण आहे. त्यांच्यात ही धर्माची सत्यता आहे.

इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

6
Articles
महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)
0.0
या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलना नाही. असा परिणाम करणाऱ्या विभूतींत ते अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक यादृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड़ इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे स्थान उच्च आहे. सर्व सुधारलेल्या मानवजातीचे ते वारसा झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल आध्यात्मिक दृष्टी यांच्या कसोट्या लावून पाहू तर निःशंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींयैकी एक आहेत.
1

महात्मा गौतम बुद्ध

2 June 2023
6
0
0

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका म

2

॥ १ ॥

2 June 2023
5
0
0

बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या

3

॥ २ ॥

2 June 2023
1
0
0

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यात शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध

4

॥ ३ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्रष्टेही इतर सामान

5

।। ४।।

2 June 2023
0
0
0

बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाधा येते असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोहोचतो

6

॥ ५ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांच्या स्वतःच्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्

---

एक पुस्तक वाचा