shabd-logo

॥ ५ ॥

2 June 2023

5 पाहिले 5
बुद्धांच्या स्वतःच्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्य अर्थ पाहणे शक्य आहे. इतकेच नव्हे, तर तेच योग्यही आहे. ते जे शाश्वत साधुत्व व शिवत्व, ते जे निरपेक्ष परम पद, त्याचा जर अस्तिरूप अनुभव बुद्धांना आलेला नसता, तर या नाशिवंत भंगुर मानवी जीवनातील उणिवांचा जो गंभीर खोल अनुभव त्यांना आला तोही येणे अशक्य होते. शाश्वताच्या दर्शनाशिवाय या अशाश्वताचे ज्या प्रकारचे दर्शन बुद्धांना झाले, तसे होणे अशक्य आहे.

शाश्वताच्या महान अनुभवाच्या पार्श्वभूमीवरच सापेक्ष व विनाशी अशा जगाची कल्पना नीट येऊ शकते. त्या निरुपाधिक व शाश्वत सत्याचे वर्णन बुद्ध नेति नेति रीतीनेच करतात किंवा अजिबात टाळतात. याचा अर्थ एवढाच, की त्या परम सत्याचे वर्णन करणे वाणीच्या पलीकडचे आहे. ते परम सत्य सर्व कल्पनांच्या विचारांच्या अतीत आहे. ज्याची ज्याची आपण निश्चित कल्पना करू शकतो अशा वस्तुमात्राच्या पलीकडे ते आहे. अद्वैत वेदांताचे जे परब्रह्म किंवा खिस्ती गूढवादी संतांचा जो परमेश्वर, त्याहून बुद्धांचे निर्वाण निराळे करणे कठीण आहे. अशा त्या शाश्वत सत्याच्या थोर आधारावरच बुद्ध हे जगाचे अनुभव तुच्छ ठरवितात.

परंतु जगत् तुच्छ मानायला लावणारा जो तो शाश्वत सत्याचा अनुभव, त्याचे वर्णन करायला बुद्ध नाकारीत. कारण प्रत्यक्ष पुराव्याने ती गोष्ट सिद्ध करणे अशक्य असे. तर्कातीत अशी ती वस्तू आहे. भारतीय मनोबुद्धीला त्या परमश्रेष्ठ सत्याच्या साक्षात्काराचे वर्णन करताना मुके राहणे श्रेयस्कर वाटते. त्या दिव्य अनुभवाला त्या परम सत्याला, तर्ककर्कश व्याख्येत बसविणे, तर्काच्या क्षेत्रात आणणे ही गोष्ट करताना कदाचित क्वचित उपनिषदे दिसतील, काही थोर आचार्यही या सत्स्वरूपाचे अत्यंत सूक्ष्म असे वर्णन देऊ बघतात.

परंतु बुद्धांनी अशा प्रयत्नांचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. ते दुसरे धर्माचार्य एका टोकाला, तर बुद्ध दुसऱ्या टोकाला. अत्यंत तेजस्वी प्रकाश छायेची किंमत उपेक्षितो. बुद्धांनी दिलेली कारणे समजण्यासारखी आहेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात हिंदुस्थानात निर्भय विचार मांडले जात होते, प्रखर भाषा बोलली जात होती, शेकडो प्रकारचे धार्मिक अनुभव सांगण्यात येत होते. मानवजातीच्या इतिहासात विचारांची अशी निर्भयता, वाणीची अशी स्पष्टता व तीव्रता, व धार्मिक अनुभवांची अशी अपार विविधता क्वचितच कोठे आढळते. बुद्धांच्या काळात धर्मभोळेपणाही होता. वितंडवादही होता. समाजात अंधश्रद्धाही होती, प्रखर बुद्धिवादही होता.

अज्ञानी लोकांचा भोळसटपणा व विद्वानांचे वितंडवादी पांडित्य यात स्पष्ट रेषा काढणे कठीण झाले होते. सारा गोंधळ होता. अशा त्या गोंधळाच्या काळात बुद्ध मानवी अनुभव व स्वभाव नीट पारखून घ्या असे म्हणत. केवल आप्तवाक्य म्हणून काही मानू नका, उगीच विश्वास ठेवू नका. बुद्धीला जो पटवील त्याचा अधिकार. ज्याला अंतर्दृष्टी आहे, जो खोल बघतो, तो अधिकारी. प्रत्यक्षाचा खोल अनुभव जो घेतो, अंतर्भेदी दृष्टीने प्रत्यक्षात जो पाहतो, त्याला मानवी स्वभाव कळतो. ज्याने सांगितलेले आपणास पटते, त्याच्यासमोर आपण नमतो. दूरदर्शीपणामुळे, आदरामुळे किंवा भीतीमुळेही पुष्कळ वेळा आपण आज्ञाधारक होत असतो. परंतु यामुळेच जर एखाद्याला आपण मानीत असू, तर त्याची सता आहे, त्याचा खरा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वतः विचार करावा अशी बुद्धांची निक्षून सांगी असे. स्वतःची बुद्धी वापरण्याचे धैर्य प्रत्येकाने दाखवावे असे ते नेहमी सांगत.

नानाविध उपपती व मीमांसा, निरनिराळ्या विचारप्रक्रिया यांच्या चक्रात न पडता प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते प्रत्येकाने पाहावे, असे ते म्हणत. तसेच दुसरीही गोष्ट ते सांगत, प्रत्येकाने स्वतःच्या प्रयत्नाने सत्याचा साक्षात्कार करून घ्यावा, तो अनुभव घ्यावा. निरनिराळ्या मतांचे वादविवाद मनुष्याला पटकन काहीतरी घ्यायला लावतात. या वादविवादांनी माणसे शीघ्रज्ञानी होतात जणू शांतपणे अविरत प्रयत्नाने सत्याचा शोध करणे त्यांच्या हातून होत नाही. सत्य ही अत्यंत पवित्र अशी पुरुषार्थ करून प्राप्त करून घेण्यासारखी वस्तू आहे. चर्चापटूंचे खेळणे म्हणजे सत्य नव्हे जो स्वतःचा ज्ञानप्रकाश पेटवीत नाही, त्याला आत्म्याच्या जगात पाहता येणार नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे बुद्धांना केवळ बुद्धिप्रधान लोकांची करमणूक करायची नव्हती, तर बहुजन समाजाला थोर व उदार असे विचार द्यावयाचे होते. संद्गुणांचे प्रत्यक्ष आचरण हाच धर्ममय जीवनाचा खरा राजमार्ग, असे जनतेस सांगावयास बुद्ध उत्सुक होते.

चौथी गोष्ट म्हणजे, आस्तिकवादी धर्मशास्त्र निरपेक्ष परब्रह्माची सापेक्ष संसाराशी गाठ घालताना त्या निरुपाधिक परब्रह्माला सोपाधिक व सापेक्ष बनविते. हे धर्मशास्त्र ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मांडू लागते. ईश्वर म्हणजे सापेक्ष जगातील जणू एक वस्तू. ईश्वर आहे म्हणणारे व नाही म्हणणारे, दोघेही त्या ईश्वराकडे बाह्य दृष्टीने, भौतिक दृष्टीने पाहू लागतात. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीची अपार गूढता हे लोक ध्यानात घेत नाहीत. ईश्वराला सोपाधिक बनविणारे हे लोक त्याच्याकडे सृष्टीकर्ता, पिता, प्रियकर, सखा इत्यादी नात्यांनी पाहू लागतात. ईश्वराला उपाधीत पाहणारे जे हे धर्मशास्त्र, ते ईश्वराचा सान्त प्रतीके व उपाधी संबंध जोडून सारा गोंधळ निर्मिते.

वास्तविक ते जे दिव्य आध्यात्मिक तत्त्व ते स्वयंभू आहे. ते निरपेक्ष आहे. त्याच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या वस्तूंच्या जवळच्या संबंधाची आवश्यकता नाही. ते स्पयंप्रकाशी तत्व आहे. सृष्टीच्या पसाऱ्याहून, आपल्या मनातील विचाराहून अनंत पटींनी मोठे व निराळ्याच गुणधर्मांचे असे ते तत्त्व आहे. म्हणून बुद्ध अशा साकार परमेश्वरापासून दूर राहतात. ईश्वरासंबंधीच्या या सगुण कल्पना त्यांना पसंत नसत. ईश्वर परिपूर्ण आहे असे मानून, मनुष्य शेवटी कर्मवीर न होता त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून बसणारा होतो.

प्रयत्नांची जागा श्रद्धा बळकावते. प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ खाजगी हितगुज, एक प्रकारची देवघेव, सौदा असे होते. जगातील ऐहिक वस्तू मिळाव्या म्हणून आपण प्रार्थना करू लागतो. स्वार्थाची ज्वाळा अधिकच भडकू लागते. याच्या उलट बुद्धांचे ध्यान आहे. ध्यान म्हणजे स्वतःत बदल करणे. आत्म्याला नवीन बनविणे. जीवनात क्रांती करणे, पाशवी वृती नष्ट करून, परंपरागत आलेल्या सामाजिक वृत्ती, वंशपरंपरागत आलेल्या केवल अनुकरणात्मक वृत्ती नष्ट करून स्वत:चा नवीन विकास करून घेणे.

पाचवी गोष्ट म्हणजे त्या परम सत्याचे स्वरूप तर्कातीत आहे. त्या सत्याविषयी तर्काच्या परिभाषेत बोलण्याचा आग्रह धरणे वेडेपणा आहे. या सर्व गोष्टी सोडून जे निर्वाण उरते ते केवल शून्यमय नाही. ते निर्वाण अस्तिरूप आहे; ते निर्वाण म्हणजे अंतिम सत्यस्वरूप. या अंतिम सत्यालाच धर्म म्हणणे बुद्ध पसंत करीत. परब्रह्माच्या या अंतिम सत्याविषयी बुद्ध नितांत मौन स्वीकारतात. या त्यांच्या मौनाला उपनिषदांत आधार आहे. उपनिषदे उद्घोषितात, “तेथे दृष्टी जात नाही, वाणी जात नाही, मन जात नाही. ते ब्रह्म कसे शिकवावे? हे आम्हाला समजत नाही."

बुद्धांच्या विचारातील काही अपूर्णता मी जाता जाता सूचित करतो. बुद्धधर्माच्या पुढील इतिहासात बुद्धधर्माचा हिंदू धर्माशी संबंध आला तेव्हा या उणिवा दिसून आल्या : (१) तत्त्वज्ञान ही मानवी मनाची एक भूक आहे, आवश्यक अशी गरज आहे आणि जीवनाचे जे अंतिम प्रश्न त्या विषयींचे मत स्पष्ट न सांगणे ही गोष्ट बुद्धांसारख्या थोर विभूतीने जरी उपदेशिले, तरी ती यशस्वी झाली नाही. बुद्धांचे श्रोते ही वृती स्वीकारायला सिध्द झाले नाहीत. निश्चित मार्गदर्शनाच्या अभावी पुढे बुद्धांवर नाना प्रकारच्या आध्यात्मिक विचारप्रक्रिया लादण्यात आल्या. बुद्धधर्माच्या आरंभीच्या वाढीत या गोष्टी दिसून येतात. (२) धर्म म्हणजेच अंतिम सत्यता असे बुद्ध मानीत. परंतु व्यावहारिकदृष्ट्या ही गोष्ट तितकीशी जवळची, प्रत्यक्ष, इंद्रियगम्य अशी वाटेना, धर्म म्हणजेच परमेश्वर ही कल्पना अमूर्त वाटे. व्यवहारात थोडी मूर्त कल्पना हवी. आपण चक्रादी साह्याने प्रार्थना करू शकू, परंतु चक्रांची प्रार्थना करू शकणार नाही. अनुयायांनी पुढे बुद्धांनाच देवत्व दिले. (३) ब्राह्मणधर्मात ज्यांनी जगातील नानाविध अनुभव घेतले, अशांसाठी संन्यास राखून ठेवण्यात आला होता. तिन्ही आश्रमांतून गेल्यावर संन्यासाचा अधिकार. परंतु बुद्धांनी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम यातून गेलेच पाहिजे असे नाही, असे सांगितले. वाटेल तेव्हा जगाच्या बंधनापासून, या उपाधींपासून मुक्त होण्यासाठी संसाराचा त्याग करावा.

बुद्धांच्या विचारांत या अशा तीन अतिशयोक्ती राहिल्या. ज्या लोकांजवळ बुद्धांना झगडायचे होते, त्या काळातील आध्यात्मिक जीवनाला कोणत्या लोकांशी झगडावे लागत होते, तिकडे लक्ष दिले म्हणजे बुद्धांच्या विचारांतील या अतिशयोक्ती आपण समजू शकतो. परमेश्वराला साकार करून त्याला केवळ संसारातील एक वस्तू बनवू पाहणारे सगुणधर्मवादी, विधिनिषेधांचे अवास्तव स्तोम माजविणारे कर्मकांडी, आणि केवळ ऐहिकावरच भर देणारे जडवादी, असे त्या काळात पारमार्थिक जीवनाचे तीन शत्रू होते.

गंभीर आध्यात्मिक भाव, अती उच्च प्रकारचे नैतिक सामर्थ्य आणि अत्यंत योग्य असा बौद्धिक संयम या तीन गोष्टींचे प्रभावी मिश्रण बुद्धांमध्ये होते. स्वतःमधील दिव्यत्वाची मनुष्याला आठवण करून देणाऱ्या ज्या थोर विभूती या भूतलावर क्वचित कधी जन्माला येतात अशांपैकीच बुद्धही एक आहेत. अशांच्या जीवनामुले आध्यात्मिक जीवनाकडे आपण ओढले जातो. अशा विभूतींमुळे आध्यात्मिक जीवन सुंदर व आकर्षक वाटते. आपल्या हृदयात एक प्रकारचा नूतन अभिनव आनंद व उत्साह उचंबळतो. बुद्धांजवळ अलौकिक बुद्धी होती, परिणत प्रज्ञा होती. त्यामुळे परमोच्च सत्याचे त्यांना आकलन होऊ शकले. त्याबरोबरच, त्यांचे हृदय प्रेमाने व कारुण्याने ओतप्रोत भरलेले होते. म्हणून या दु:खीकष्टी मानवजातीला दुःखातून वाचविण्यासाठी त्यांनी सारे जीवन दिले. खरे थोर महात्मे मानवी व्यवहारांत भाग घेतात, सेवेत रमतात. जरी त्यांचे आत्मे दैवी असले, तरी जगाला कंटाळून दूर न जाता या जगातच राहून जगाचा उद्धार ते करू पाहतात. सेवापरायण अशा थोर गूढवादी संतांचीच परंपरा, प्रेममय व सेवामय अशा थोर अध्यात्मवेत्त्यांचीच परंपरा बुद्धांनीही चालविली. त्या परंपरेला त्यांनी प्रतिष्ठा दिली, मान्यता दिली. त्यांचे दिव्य भव्य व्यक्तिमत्त्व, त्यांची ऋषिसम दृष्टी, सत्यदर्शनाची त्यांची उत्कटता जगताला संदेश सांगण्याची त्यांची तळमळ, दु:खीकष्टी जगताबद्दलची त्यांची जळजळीत प्रेमवृती इत्यादी गोष्टींचा जे जे त्यांच्या सान्निध्यात येत, त्यांच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नसे.

यामुळे बुद्धांच्या चरित्राभोवती चमत्कार व कथा यांचे सागर जमले. सामान्य माणसे अशा अद्भूत कथा निर्मून महापुरुषांविषयीचा आपला आदर प्रगट करीत असतात. आदरबुद्धी दाखविण्याचा हाच एक मार्ग त्यांना मोकळा असतो. बुद्ध हे इतर मानवांपेक्षा अनंत पटीनी श्रेष्ठ व थोर होते, ते अलौकिक होते, अद्वितीय होते, ही गोष्ट सामान्य जनता एरव्ही कशाने सांगणार? कशाने सिद्ध करणार आहे? आणि शेवटी तर पुढे पुढे संयमाच्या या थोर आचार्याला, प्रेमाच्या या महान उपदेशकाला, विवेकाचा व शहाणपणाचा मार्ग दाखविणाऱ्या या थोर ऋषीला देवत्व देण्यात येते. जनता त्यांना देव करते. सर्वज्ञ, पूर्णपुरुष, जगद्उद्धारक असे त्यांना मानण्यात येते. जसजसा काळ जात आहे, शतकांपाठीमागून शतके जात आहेत, तसतसे बुद्धांचे मोठेपण अधिकाधिकच तेजस्वी व स्पष्ट असे दिसून येत आहे. साशंकवादीही आज त्यांच्याकडे वळत आहेत. मानवजातीच्या इतिहासात युगप्रवर्तक अशा ज्या महनीय विभूती झाल्या, ज्यांनी स्वत:च्या काळाला व पुढील काळालाही संदेश दिला, अशांपैकीच भगवान बुद्ध हेही एक आहेत.

इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

6
Articles
महात्मा गौतम बुध्दा (चरित्र)
0.0
या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलना नाही. असा परिणाम करणाऱ्या विभूतींत ते अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक यादृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड़ इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे स्थान उच्च आहे. सर्व सुधारलेल्या मानवजातीचे ते वारसा झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल आध्यात्मिक दृष्टी यांच्या कसोट्या लावून पाहू तर निःशंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींयैकी एक आहेत.
1

महात्मा गौतम बुद्ध

2 June 2023
6
0
0

या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका म

2

॥ १ ॥

2 June 2023
5
0
0

बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या

3

॥ २ ॥

2 June 2023
1
0
0

बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यात शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध

4

॥ ३ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्रष्टेही इतर सामान

5

।। ४।।

2 June 2023
0
0
0

बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाधा येते असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोहोचतो

6

॥ ५ ॥

2 June 2023
0
0
0

बुद्धांच्या स्वतःच्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्

---

एक पुस्तक वाचा