हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके
ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती
भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती
जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती
भव्य सारी जीवने अन् भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे
’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे
- राहत