shabd-logo

बलिदान

2 June 2023

1 पाहिले 1
देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना विचारण्यात आले नाही. काँग्रेस सात प्रांतांत अधिकारावर होती. परंतु काँग्रेसच्या प्रधानांनी राजीनामे दिले. व्हाइसरॉयसाहेबांच्या वटहुकुमांची अंमलबजावणी स्वातंत्र्यासापठी लढणारी काँग्रेस थोडीच करणार? कांग्रेसने सरकारजवळ राष्ट्रीय सरकारची मागणी केली. परंतु नकार मिळाला. महात्माजींनी काँग्रेसची सूत्रे हाती घेऊन सरकारी धोरणाला विरोध म्हणून वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. निवडक सत्याग्रही तुरुंगात गेले. गोप्याही तुरुंगात गेला. त्याच्यादोन मुलांचा सांभाळ जनतेने केला.

परंतु परिस्थिती अधिकच बिकट झाली. जपानने महायुद्धात उडी घेतली आणि भराभर विजय मिळवीत ब्रह्मदेश जिंकून हिंदुस्थानच्या पूर्व हद्दीवर जपान येऊन उभा राहिला. हिंदुस्थानचे काय होणार? स्वतंत्र हिंदुस्थान जपानचा प्रतिकार करायला उभे राहिले असते. चीन देश स्वतंत्र असल्यामुळे वर्षानुवर्षे जपानशी लढत होता. हिंदुस्थान तर अधिकच यशस्वीपणे जपानचा मुकाबला करण्याची शक्यता होती. परंतु जनतेला आपण स्वतंत्र आहोत असे कळताच दसपट, शतपट उत्साह येतो. वाटेल तो त्याग करायला आपण सिद्ध होतो. काँग्रेस देशाचे स्वातंत्र्य मागत होती. इंग्लंडमधून क्रिप्ससाहेब बोलणी करायला आला. प्रथम आरंभ बरा झाला. परंतु साहेब शेवटी आपल्या वळणावर गेला. बाटाघाटीतून काहीच निष्पत्र झाले नाही. महात्माजींना सात्त्विक संताप आला. राष्ट्राने असेल नसेल ती शक्ती उभी करून स्वतंत्र होण्यासाठी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी लिहिले, 'हिंदुस्थान राहिला तर माझे प्रयोग. हा देश आणखी कोणाच्या ताब्यात जायचा असेल तर? मी किती वाट पाहू? परचक्र दारात आहे. आम्ही या क्षणी स्वतंत्र झाले पाहिजे. माझी सारी अहिंसक शक्ती मला उभी करू दे. हिंदुस्थानातील इतर पक्षांनी, इतर संस्थांनी आपापल्या पद्धतीने लढावे. काँग्रेस आपल्या अहिंसक मार्शाने लढेल. परंतु ही परसत्ता दूर करायला सर्वांनी उठले पाहिजे.'

परंतु उठणार कोण? आपसात लाथाळ्या माजवणाऱ्या भाराभर संस्था नि संघटना असतील. परंतु परकी सत्तेशी झगडा करणारी एकच संस्था हिंदुस्थानात आहे. ती म्हणजे काँग्रेस. महात्माजींनी ‘चले जाव' हा मंत्र राष्ट्राला दिला. मुंबईस ऑगस्ट १९४२ च्या आठ तारखेस काँग्रेसची ती ऐतिहासिक परिषद झाली. स्वातंत्र्याचा ठराव, स्वातंत्र्यासाठी लढा करण्याचा ठराव पास झाला. त्या दिवशी रात्री महात्माजी दोन अडीच तास बोलले. त्यांनी आपला हृदयासिंधू ओतला. हिंदी जनतेला नवराष्ट्राचा तो महान नेता म्हणाला, 'उद्यापासून तुम्ही स्वतंत्र आहात. स्वतंत्र आहुति या वृत्तीने सारे वागा.' ते शब्द ऐकताच सर्वांच्या जीवनात जणू नवविद्युत् संचारली

अमर अशी ९ ऑगस्टची तारीख उजाडली. हिंदुस्थानभर स्वातंत्र्याचा अहिंसक संग्राम सुरू झाला. गोळीबारांत, लाठीमारांत

स्वातंत्र्यावीरांचे

बलिदान

होऊ लागले.

गोपाळपूरचा गोप्या कोठे आहे? तो काय करीत आहे?

गोप्या नि त्याचे मित्र, ते पाहा जंगलात जमले आहेत. त्यांनी काही तरी योजना चालली आहे.

'आपण आपला तालुका स्वतंत्र करु या.' दौल्या

म्हणाला.

'परंतु तशी परवानगी आहे का?'

‘परवानगी आहे,आपण अहिंसक रोतीने तालुका स्वतंत्र करु. एकदम छापा घालून बंदुका लांबवू. शेतकऱ्यांचे राज्य स्थापू. जमिनी वाटून देऊ.'

'जमिनी वाटून द्याच्या ?'

'काँग्रेसच्याठरावात नाही का, की शेतकरी नि कामगार यांच्या हाती सत्ता यायची असे?'

‘परंतु शेतकऱ्यांच्या हाती सत्ता देणे म्हणजे काय?”

'काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत त्याची चर्चा झाली होती. शेतकऱ्यांच्या हाती सत्ता देणे म्हणजे त्याला जमीन वाटून देणे. महात्माजी नि जवाहरलाल यांचे या बाबतीत एकमत होते. '

“परंतु जमीन वाटणे म्हणजे समाजवाद नव्हे.'

‘शेतकऱ्याला आधी जमीन वाटूनचद्यावी लागते. मामून सरकारी सामुदायिक शेतीचे तत्त्व त्याला पटवा. रशियात १९१७ मध्ये क्रांती झाली, त्या वेळेस 'शेतकऱ्याला जमीन' ही एक घोषणा होती आणि क्रांती सुरू होताच शेतकऱ्यांनी जमिनी वाटूनही घेतल्या. पुढे आपल्याला मिळेल याची वाटही पाहात ते बसले नाहीत.'

'परंतु महात्माजी काय म्हणतील?'

‘महात्माजींचे हेच मत आहे. तो अमेरिकेतील कोणी पत्रपंडित त्याच्याकडे आठवडाभर होता. त्याने महात्माजींना विचारले की, 'उद्या तुमचा स्वातंत्र्याचा प्रखर संग्राम सुरू झाला तर शेतकऱ्यांनी काय करावे?' महात्माजींनी उत्तर दिले, 'त्यांनी जमिनी आपल्या ताब्यात घ्याव्यात. '

‘परंतु या गोष्टींचा प्रचार सर्वत्र आधीच का झाला नाही?'

' तडजोड होईल अशी आशा वाटत असावी. ते काही असो. आपण आपला तालुका स्वतंत्र करायचा. कोणाला न मारत स्वतंत्र करायचा. शत्रूला निःशस्त्र करून आपण शेतकरी- कामगारांचे राज्य स्वापू.'

'परंतु मिळविलेले स्वातंत्र्य टिकवायचे कसे?'

'एकदा स्वतंत्र झाल्यावर मग आपण शस्त्रांनीही लढलो तरी दोष नहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदुस्थानात का लष्कर ठेवले जाणार नाही? स्वतंत्र हिंदुस्थान जपानबरोबर हातांत शस्त्र घेऊन का लढणार नाही? राष्ट्राध्यक्ष आझाद म्हणाले की मी प्रथम बंदूक हातात घेईन. आपला तालुका एकदा स्वतंत्र केल्यावर स्वतंत्र राष्ट्राचे सारे हक्क मग त्याला प्राप्त होतात. यांत काँग्रेसच्या अहिंसक धोरणाशी प्रतारणा होत नाही; विरोधही नहि. '

सर्वांची मुखमंडळे तेजाने फुलली होती. आपण स्वतंत्र होणार, या विचाराने ते जणू पेटले होते. त्यांनी सर्व योजना केली आणि त्याप्रमाणे ते वीर हातांत प्राण घेऊन निघाले. खरोखरच त्यांनी आपला तालुका स्वतंत्र केला. शिवापूरची मामलेदार कचेरी त्यांनी ताब्यात घेतली. तिच्यावर तिरंगी झेंडा डौलाने फडकू लागला. पोलीस नि:शस्त्र केले गेले; आणि स्वतंत्र तालुक्याचे स्वतंत्र नवे लष्कर उभे झाले. तालुक्यात शेतकऱ्यांना धान्य नव्हतें. काळाबाजार करणारे नि कोठारेवाले यांना तुरुंगात घालण्यात आले. या काळाबाजार करणाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांचा कसा पाठिंबा असे, त्याचे कितीतरी पुरावे मिळाले. जनतेची कोठारे ठायी ठायी सुरू झाली. सर्व तालुक्यांत एक नवीन चैतन्य आले. घरोघर तिरंगी झेंडे होते. झाडांवर, डींगराच्या शिखरांवर तिरंगी झेंडे होते. गावोगावच्या अस्पृश्य बंधूंनाही जमीन मिळाल्यामुलळे तेही हातात तेरंगी झेंडे घेऊन गाणी गाऊ लागले. काँग्रेसचा असा ठराव होता हे आम्हाला माहीतच नव्हते असे ते म्हणाले. मुसलमान जनताही सामील झाली. सारे सुखी झाले. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकी निघत. लहान मुलामुलींच्या प्रभातफेन्या निघत. ठायी ठायी कवायती, ठायी ठायी सेवादले, स्वतंत्र तालुक्यात स्वतंत्र पोलीसव्यवस्था ठेवू लागले. त्यांच्या दंडांवर तिरंगी फति असे.

‘आम्ही स्वराज्यात नीट वागू. आम्ही तुमचेच आहोत.' असे काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी व जमीनदारांनी सांगितले. त्यांनाही मुक्त करण्यात आले. जमीनदारांना २५ एकर जमीन ठेवून बाकीची काढून घेऊन वाटण्यात आली होती.

एक नवीन प्रयोग सुरू झाला. परंतु असे प्रयोग करायला हिंदुस्थानातील तीन हजार तालुके एकदम उठले नाहीत. कोठे कोठे नुसती तुरुंगभरतीची चळवळ सुरु झाली. ही तुरुंगभरतीची चळवळ नाही असे महात्माजींनी पुन्हापुन्हा बजावले होते. ते सांगणे फोल गेले. सरकार बळावले; आणि ठायी ठायी लष्कर जाऊ लागले. स्वातंत्र्याचे प्रयोग नष्ट करण्यात येऊ लागले. बिहारमध्ये, संयुक्त प्रांतातील बालिया जिल्ह्यात, बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात लष्करी सत्तेच्या जोरावर पुन्हा परसत्ता येऊन बसली. हजारो लोक पकडले गेले. किती गोळीबारात मेले. काहींना फाशीची सजा झाली. क्रांतीचा महान प्रयोग झाला. परंतु संपूर्णाणे यश आले नाही.

शिवापूर तालुक्यात काय होणार? लष्कर आले, वर विमाने फिरू लागली. घोडेस्वार दौडू लागले. गरीब जनतेला वेताच्या छड्यांनी बेदम मारू लागले. सर्वत्र नाकेबंदी झाली. लष्करी कायद्याचा धिंगाणा तालुकाभर सुरु झाला. ठायी ठायी जनतेच्या व लष्कराच्या चकमकी झाल्या. स्वतंत्र तालुका लढू लागला. परंतु किती दिवस लढणार?

रात्रीच्या वेळी जंगलात गोप्या, दौल्या, हरबा, तुळशीराम, अप्पा, सय्यद, वसंत, अण्णा, दादा, सारे वीर जमले आहेत.

'आपण आता पांगले पाहिजे. अज्ञातवासात गेले पाहिजे. रानावनात जाऊ, कंदमुळे खाऊ, मधूनमधून जनतेत जाऊ. त्यांना गावराज्ये यापा असे सांगू. त्यांना स्फूर्ती देऊ. आपण आता वनवासी राम झाले पाहिजे.'

'पुन्हा आपण एकमेकांना केव्हा भेटू त्याचा नेम नाही.'

'कोणी पकडले जातील, फाशी दिले जातील.'

‘ते हुतात्मे होतील, कृतार्थ होतील.'

‘तळहाती शिर घेऊन आपण बाहेर पडलो आहोत.

मरेपर्यंत लढू; झगडू.’

'ठरले तर आता. आपण पांगायचे. आपली क्रांती आज यशस्वी नाही झाली तरी उद्या होईल. शभर-दीडशे वर्षे आपण गुलामगिरीत खितपत पडलो होतो. ९ ऑगस्टने थीडी तरी स्वातंत्र्याची हवा दिली. कोठे दोन महिने. कोठे चार महिने. कोठे दोन आठवडे, कोठे एक दिवस या प्रकारे आपण स्वराज्ये स्थापली. एक महान अनुभव आपणास मिळाला. हा अनुभव मोलाचा आहे. हा उद्या उपयोगी येईल. राष्ट्रपुरुषाच्या फुक्फुसांत इतक्या वर्षांनी ही जी स्वतंत्र हवा गेली आहे ती आता त्याला स्वस्थ बसू देणार नाही. येत्या दोन- - चार वर्षांत आपण स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. जगलो तर आपण ते स्वतंत्र्य पाहू. ते स्वातंत्र्य आणण्यासाठी मेलो तर कृतार्थ होऊ. आपल्या या मातीचे सोने होईल.

‘चला तर. फार वेळ येथे बसण्यात अर्थ नाही.'

‘ते पाहा बंदुकांचे आवाज ऐकू येत आहेत. बॅटच्यांचा उजेड दिला की काय?'

'आपणावर छापा का घालणार? आपण येथे आहोत हे

`शत्रूला कसे कळले?”

‘आपत्या देशाला फितुरीचा शाप आहे.'

'चला, उठा. आवाज जवळ येत आहेत.'

सारे एकमेकांना भेटने. सर्वांचे डोळे क्षणभर ओले झाले. परंतु पुन्हा ती तोंडे तेजाने फुलली. त्या जंगलांत क्रांतीच्या मंगल घोषणा मध्यरात्री दुमदुमल्या.

'ऑगस्ट क्रांतीचा विजय असो.'

९ ऑगस्टचा विजय असो.'

'शेतकरी कामकरी राज्याचा विजय असो.'

'काँग्रेस झिंदाबाद. महात्मा गांधीकी जय. '

ते सारे स्वातंत्र्यावीर पांगले. कोण कोठे गेले, कोण कोठे

गेले, ते त्या जंगलाला माहीत; त्या डोंगरांना माहीत.

तालुकायर धरपकडी होत होत्या. तुरुंग भरून गेले. खास तुरुंग उभे करण्यात आले. अनेकांना फटके मारण्यात आले. वनवासी पुढाऱ्यांचा पत्ता कळावा म्हणून गावोगाव जुलूम सुरू झाला. तरुण असणे हाच गुन्हा झाला ! रात्री दोन वाजता छापे यायचे, दोन- दीनशे हत्यारी पोलीस यायचे. दारे उघडायचे. परंतु शेतकऱ्यांच्या बायाही आता धीट झाल्या होत्या. रात्री पोलीस आले तर त्या दार सताड उघडून म्हणतः

"बघ मेल्या कोण आहे का आत! ते वीर का असे घरात लपतात? ते रानात वाघाप्रमाणे राहतात. तुम्ही इथे येता छळायला.' तो कोण चालला आहे एकटाच ? बरीच रात्र झाली आहे. गोळीबार ऐकू येत आहे. अद्याप लोक प्रतिकार करीत आहेत. हा कोण आहे? त्याच्या हातात का ती बंदूक आहे? परंतु ती घेऊन तो कोठे जात आहे? तो सरकारचा हस्तक की स्वातंत्र्याचा सैनिक? रस्त्यात का ते कोणाचे प्रेत पडले आहे? होय. कोणी तरी गोळीबारात ठार झालेला असावा. देशभक्त की देशद्रोही? हरी जाणे. त्या बंदूकवाल्याने आपली बंदूक त्या प्रेताजवळ ठेवली. 'जवळ पुरावा नको.' तो शांतपणे म्हणाला.

तो पुरुष अंधारातून जात होता. सारे रस्ते जणू त्याच्या पायाखालचे होते. कधी तो दाट रानात शिरे, कधी नदीतून त्याला जावे लागे, कोठे जात आहे तो? रात्र आता फार नाही. मुशाफिरा, कोठे जायचे आहे तुला? तू वनवासी राम का आहेस मग आता उजाडेल ना रे? नको इकडे कोठे जाऊ. कोण पाहिजे तुला? कोणाला शेवटचे भेटून घ्यायचे आहे? लौकर भेट.

अरे, ही तर गोप्याची झोपडी. ही बघा. बाहेर तांबू आहे. आणि झोपडीत कोणी आहे का? ते पाहा दोन चिमणे भाऊ. ते जय-विजय तेथे निजले आहेत. दिनू नि विनू. एकमेकांच्या अंगावर हात ठेवून प्रेमाने दोघे झोपले आहेत. चुलीजवळ काटक्याकुटक्या पडल्या आहेत. तवा आहे. पीठ सांडलेले आहे. हे बाळराजेच दळतात की काय?

तो प्रवासी त्या झोपडीजवळ आला. तांबू हंबरली त्याने तिला कुरवाळले.

'तांबू, हंबरू नकोस. कोणाला कळेल आणि पोरे जागी होतील. त्यांगा शेवटचे पाहनू मी जाणार आहे. तू त्यांची आई हो. त्यांना दुधाची धार दे.'

गाईने त्याचे अंग चाटले. तो पुरुष आत शिरला. त्या चिमण्या मुलांजवळ तो बसला. तो खाली वाकला. त्याने त्यांचे मुके घेतले. त्याच्याडोळ्यांतील दोन थेंब त्यांच्या गालावर पडले. परंतु ती बाळे जागी झाली नाहीत. त्याने त्यांच्या अंगावरून हात फिरविला. त्यांच्या अंगावरचे पांघरूण जरा नीट केले आणि त्यांच्याकडे तो पाहात बसला. किती वेळ बसणार हा प्रवासी तेथे? बाहेर झुंजूमुंजू होऊ लागले. दिशा फाकू लागल्या. आणि हे आवाज कसले? घोड्यांच्या टापांचा हा आवाज; आणि गोळीबारही कानी आले. लष्कर आले की काय? तो पुरुष चपापला. त्याने मुलांचा मुका घेतला. तो उभा राहिला.

'सैतान पकडायला आले. घेराणार मला. आता कोठे जाउ? कोठे लपू?' असे म्हणून तो झोपडीच्या बाहेर आला. त्याने झोपडीचे दार लावले. गाईसमोर बरेच गवत होते. त्या गवताखाली लपावे असे त्याच्या मनात आले. पटकन् तो गवतात शिरला. तांबू मुकाट्याने उभी होती. गवताला तोंड लावीना. काही तरी संकट आहे असे तिला वाटले.

ते घोडेस्वार आले. झोपडीला त्यांनी वेढा दिला. लाथ मारून त्यांनी दार उघडले. आत ती दोन बाळे शांतपणे झोपली

होती.

'ती बघा कार्टी झोपली आहेत.'

त्यांना लाथ मारून उठवण्यात आले. त्यांना छड्या मारण्यात आल्या. ली बाळे घाबरली.

'तुमचा बाप कुठे आहे?'

'आमचा बाप?'

'हो, हो, तुमचा बाप तो गोप्या. सांगा लौकर.'

'आम्हाला माहीत नाही. आई गेली, परत आली नाहीं. ताई गेली, परत आली नाही. बाबा गेले, तेही परत आले नाहीत. कोठे आहेत आमचे बाबा! आम्हाला कोणी नाही. आम्ही फक्त दोघे भाऊ आहोत. द्या आमचे बाबा शोधून.'

'पोपटाप्रमाणे बोलायला तुम्हाला बापाने शिकवून ठेवले आहे असे दिसते. बोला, सांगता की नाही?'

त्या पोरांना बेदम मारून एका कोपन्यात फेकून देण्यात आले. त्या झोपडीत त्या शिपायांनी शोधले. परंतु गोप्या सापडला नाही. ते बाहेर येऊन शोधू लागले. एकाने गाईला छडी मारली! गरीब मुके जनावर इतक्यात तिच्या पुढच्या गवतात एकाने काठी घातली, तो तेथे गोप्या आढळला!

'अरे, हा पाहा हरामखोर ! आता गाईसमोर गवतात तोंड लपवतोस? 'चले जाव' गर्जना करीत होतास ना? शेतकऱ्या- कामकऱ्यांचे राज्य स्थापणारे असे गाईसमोर लपत नाहीत. मुर्दाड बेटे! चालले स्वराज्य स्थापायला. ओढा साल्याला. काढा फोडून बेंडखोर.' तो अधिकारी गर्जला.

‘अपमान कराल तर एकेकाला चावून रवाईन. खुशाल गोळी घाला वा फाशी द्या. फाजील बोलू नका.' गोप्या उभा राहून बोलला.

‘बांधा हुरामखोराच्या मुसक्या. चला त्याला घेऊन.'

गोप्याला ते लोक घेऊन गेले. दिनू नि विनू 'आमचे आमचे बाबा!' करीत पाठोपाठ रडत येत होते. त्यांना बाबा, छड्या मारून पिटाळण्यात आले. गोप्याला एका खास लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यात आणखी सहा माणसे होती. पाच परुष होते. एक स्त्री होती. '

सर्वांवर बंड करण्याचा आरोप होता. गोप्या येताच त्यांनी त्याचे स्वागत केले.

रात्रीची वेळ होती. लष्करी अधिकारी की प्रशस्त खोलीत बसले होते. तोंडे त्रस्त नि गंभीर होती.

'थकलो बुवा या धेरपकडी करून. आता यांचे खटले किती दिवस पुरणार?' एक म्हणाला.

'त्या सात जणांचा तर ताबडतोब निकाल लावता येईल. ते तर उघड बंडखोर. पुरावाही आहे.' दूसरा म्हणाला.

'खरेच. त्या सातांची ब्याद काढून टाकावी. बोलवा

एकेकाला.' मुख्य अधिकारी म्हणाला.

ते गोप्याचे लॉकअप उघडण्यात आले. एकाला त्या लष्करी न्यायासनासमोर नेऊन उभे करण्यात आले.

'काय रे, तू होतास की नाही बंडात?'

'आमचे हे स्वातंत्र्याचे युद्ध होते.'

'तू न्यात पुढाकार घेतलास की नाही? शस्त्रे होती की नाही?'

‘माइया स्वतंत्र तालुक्याला तो अधिकार आहे.'

'म्हणजे शस्नेही वापरलीत, लढलेत, गोळीबार केलेत. खरे ना? तुला मरणाची सजा. सकाळी ७ वाजता गोळी घालून याला ठार करा. '

त्याला परत नेण्यात आले नि दुसऱ्याला आणण्यात आले. त्याचा निकाल त्याचप्रमाणे. सहावी स्त्री आली.

'तू तर बाई. आणि बंडात सामील?'

'तुमच्या देशातील स्त्रिया देशासाठी मरायला नाही का

उभ्या राहात?'

'तुही हातात बंदूक घेतलीस?'

‘मी स्त्रियांचे लक्ष्मीपथक स्थापले होते.'

'हिलाही गोळ्या घालून करा. संपले का?

'तो गोप्या अद्याप आहे.'

'आणा त्या हरामखोराला '

ती भगिनी गेली आणि गोप्याला आणून उभे करण्यात 'तू गोण्या ना.' आले.

‘हो.’

'तुझ्याजवळ बंदूक होती. '

'खोटी गोष्ट. तुम्हाला सापडली का माझ्याजवळ?'

'मागे होती की नाही जवळ?'

'ती तर मी टाकून दिली.'

'एका प्रेताजवळ टाकलीस, चोरा. मुद्देमाल जवळ सापडू नये म्हणून. परंतु बावळटा, ही पाहा तुम्हा क्रांतिकारकांची एक चिठी सापडली आहे. क्रांती करायला निघालेत! आणि असे पुरावे मिळतात.'

“जगलो वाचलो नि पुन्हा क्रांती करायची वेळ आली...... तर अशा चुका आम्ही करणार नाही. हा पहिला धडा होता.'

'तू का आता वाचशील?"

'तुम्हाला माहीत.'

'तुला सकाळी सात वाजता गोळी घालून ठार करण्यात

येईल. समजलास?’

'मी कृतार्थ झालो. देशासाठी मरण येणे याहून भाग्याची

गोष्ट कोणती?'

'घेऊन जा हरामखोराला '

'तुमच्या देशात स्वातंत्र्यासाठी मरणाराला हरामखोर म्हणतात वाटते?'

‘चूप.’

गोप्याला आत कोंडण्यात आले. सातीजण आनंदात होती. रात्रभर क्रांतीची गाणी ती गात होती आणि रात्र संपली. सहाचे ठोके पडले. पूर्वेकडे तांबडे फुटू लागले. त्या सातांना नेण्यासाठी शिपाई आले. खोलीचे कुलूप उघडले गेले. त्यांना नेऊन रांगेत उभे करण्यात आले. प्रत्येकासमोर एक खणती ठेवण्यात आली. '

सहा फूट लांब नि चार फूट रुंद खळगा खणा.'

‘परंतु खोल किती?' गोप्याने विचारले.

‘तुमचे देह आत नीट मावतील इतके खोल.'

सातीजणांनी खळगे खणले. खळग्याच्या तोंडाशी ते स्वातंत्र्यवीर उभे राहिले. फडाड एकजण पडला. फडाड्फड् - दुसरा. अशा रीतीने सहा माणसे पडली. सहाव्याला गोळी लागताच नि तो पडताच, सातव्या गोप्या होता तोही पटकन पडला.'

'अरे, तू उठ. तू कसा पडलास?'

'मला चुकून गोळी लागली असे तुम्हाला वाटून, द्याल वर माती ढकलून, असे वाटले. मातीतून उठून पुन्हा उभा राहिलो असतो. वनवासी राम झालो असतो. शेवटच्या क्रांतीची तयारी केली असती.'

'वटवट पुरे.’

गोप्या शांतपणे उभा राहिला. गोळ्या सुटल्या..... ‘महात्मा गांधी की जय!' तो म्हणाला.

त्या साती देहांवर माती ढकलण्यात आली.

लष्करी कोर्टाने भराभर सर्वांचे निकाल लावले. शेकडोंना फटक्यांच्या शिक्षा झाल्या. वास्तविक हे सारे स्वातंत्र्ययुद्धातील कैदी होते. त्यांना त्याप्रमाणे वागविले पाहिजे होते. परंतु त्यांना फटक्यांची शिक्षा देण्यात आली! सुधारलेली सरकारे - परंतु साधी माणुसकीही त्यांना नाही. अनेकांना दहा- दहा वीस-वीस वर्षांच्या सजा झाल्या. तुरुंगात ते खितपत पडले आहेत. परंतु मनाने मस्त आहेत.

देशांतील क्रांती शमल्यासारखी झाली. ती लष्करी कोर्टें गेली. ते तात्पुरते तुरुंग नाहीसे झाले. पुन्हा पूर्ववत् गुलामगिरी सर्वत्र चालू झाली.

ते सात वीर तेथे पडलेले आहेत. वारे त्यांना गाणी म्हणतात. दवबिंदू त्यांची अश्रूंनी पूजा करतात. आजूबाजूची झाडे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. येथील अणुरेणू जणू

स्वातंत्र्याची गाणी गातो. उद्या तेथे स्वातंत्र्यमंदीर बांधले जाईल.

लाखो लोकांना ते स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र होईल. स्वातंऱ्याची

अमर स्फुर्ती गोप्या नि त्याचे साथीदार.... ते स्वातंत्र्यवीर देतील.

उद्या शाहीर त्यांचे पोवाडे लिहितील. कादंबरीकार कादंबऱ्या

लिहितील.... इतिहासकार नवा इतिहास लिहितील.

९ ऑगस्टच्या भारतीय क्रांतीने रक्ताचा नि अश्रूंचा इतका मालमसाला हिंदी राष्ट्राला दिला आहे की तो शतकानुशतके पुरेल

व स्फूर्ती देईल. वंदे मातरम्!
7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा