shabd-logo

गोप्याचा जन्म

1 June 2023

28 पाहिले 28
गोप्याचा जन्म
त्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. परंतु जमीन जमीनदारांच्या हातांत होती, सावकारांच्या हातांत होती; शेतकरी नावाचेच शेतकरी होते. ते जवळजवळ शेतमजूर झाले होते. दिवसभर राबावे, कष्टावे; परंतु पोटभर खायला नसावे, अशी त्यांची स्थिती होती.

त्या गोपाळपुरात एक सुखी शेतकरी होता. त्याचे नाव बाळा. त्याचे घरदार होते. त्याची शेतीवाडी होती. परंतु त्याला एक दु:ख होते. त्याला मूलबाळ नव्हते. त्याची पहिली बायको मेली. त्याने आशेने दुसरे लग्न केले. काही वर्षे गेली; परंतु मूलबाळ झाले नाही आणि ही दुसरी बायकोही मरण पावली. बाळाने तिसरी बायको केली. काही वर्षांनी तीही मूलबाळ न देता देवाघरी गेली. बाळा दुःखी असे. मेल्यावर आपणाला पाणी कोण देईल असे मनात येऊन तो कष्टी होई. प्रत्येक नवीन लग्न करताना त्याला थोडीफार शेतीवाडी विकावी लागे. हळूहळू तो गरीब झाला. तरीही पुन्हा लग्न करण्याची त्याला इच्छा होती. तो एका सावकाराकडे थोडे पैसे मागण्यासाठी गेला. सावकार पैसे देईना.

'नाही म्हणू नका. पुन्हा लग्न करायचा माझा विचार

आहे. गरिबाचे लग्न करून द्यावे. पुण्य जोडावे.' बाळा

म्हणाला.

‘अरे, लग्न करणार तरी किती वेळा ? आणि आता तू म्हातारा झालास. तुझे लग्न लावून पुण्य मिळण्याऐवजी पाप मात्र पदरात यायचे. तू उद्या मेलास तर तुझ्या बायकोचे काय होईल? काय खाईल? सारी शेतीवाडी तर तुझी गेली. आता हे घर फक्त राहिले आहे. आता या लग्नाच्या फंदात पडू नकोस.' सावकार म्हणाला.

'मी तर पुन्हा लग्न करणार.'

“अरे, तुला कोण देणार मुलगी?'

'आपल्या देशात मुलींना तोटा नाही प्रेताजवळसुद्धा लग्ने लावायला मुली मिळतील.'

अशी बोलणीचालणी बराच वेळ चालली आणि बाळा थोडे पैसे कर्ज म्हणून घेऊन गेलाच. तो लग्नाच्या खटपटीत गर्क झाला. परंतु त्याला बायको मिळेना. लोक त्याला चिडवीत, हसत. बाळाही त्यांच्यावर संतापे

'लग्न लावून दाखवीन तरच मी खरा बाळा' असे तो म्हणे. एके दिवशी सायंकाळी तो एकटाच नदीकाठाने फिरत जात होता. आपल्या विचारांत तो गुंग होता. तो बराच दूर आला. जरा अंधार पडू लागला होता. नदी वाहत होती. त्या बाजूला खोल डोह होता. बाळा जात होता, तो त्याला नदीतीरी कोणी तरी दिसले. कोण होते तेथे? अशा अंधारात त्या डोहाच्या बाजूला कोण आले होते?

'कोण आहे?' बाळाने विचारले.

‘मी एक दुर्दैवी स्त्री आहे.’'

'या बाजूला कशाला

'डोहात आधार मिळतो का पाहायला.'

'तू का जीव देणार? तुला का कोणी नाही ?'

‘मला कोणी नाही. मी या गावची नाही. मी दूरची आहे. काही महिन्यांपूर्वी माझा नवरा मरण पावला. दिरांनी मला घालवून दिले. मी भावाच्या घरी गेले. भावानेही मला थारा दिला नाही. मी या गावी आले. मोलमजुरी करते. एका झोपडीत राहते. परंतु तेथे मला कोण आहे? प्रेमाचे, मायेचे मला कोण आहे?कोणी गोड शब्द बोलायला नाही. कोणी विचारपूस करायला नाही. दिवसभर मी काम करते. संध्याकाळी कधी नदीकाठी येऊन बसते नि रडते. आज मला फारच एकटे वाटले, आणि डोहात जीव घावा असे ठरवून आले. तुम्ही माझी कशाला चौकशी करता? दुर्दैवी माणसाची कोणी विचारपूस करू नये. माझे दुर्दैव तुम्हालाही बाधायचे. जा, माझ्यापासून दूर जा.'

'तुला जगात खरोखरच कोणी नाही?'

'खरीखरच कोणी नाही.'

'तर मग तू माझी हो. मीही एकटाच आहे. मला मूल ना बाळ. तीन बायका मेल्या. तू माझी चौथी बायको हो. तुला मी मला तू. तुझ्याजवळ मी गोड बोलेन, माझ्याजवळ तू गोड बोल आणि मला मुलगा दे. तीन बायका केल्या. परंतु फुकट. मूलबाळ न देता त्या मेल्या. तू तसे करू नकोस. चल माझ्याबरोबर. मी तुझ्याशी लग्न लावतो.'

'असे कसे होईल? मी एक दुर्दैवी दरिद्री बाई.'

'मी तरी कोठे मोठा कुबेर आहे? दुर्दैवाची मला भीती नाहीं. चल, कदाचित् सारे चांगले व्हायचे असेल. मला नाही म्हणू नकोस. मला बायको मिळत नाही म्हणून मी दुःखी आहे. माझे दुःख, माझे दुर्दैव तू दूर कर.'

'तुम्ही थट्टा करता की मनापासून बोलता?'

'मी नेहमी मनापासून बोलत आलो आहे. लपंडाव वगैरे माझ्याजवळ नाही. शेतकऱ्याजवळ का लपंडाव असतो? शेतकरी साधा सरळ माणूस. चल, रडू नको. माझी बायको हो नि सुखी हो. मलाही मुलगा देऊन सुखी कर.'

'चला. तुमच्याबरोबर येते. '

'छान. चल.'

ती दोघे गावात आली. ती दुर्दैवी स्त्री आपल्या झोपडीत गेली. दुसच्या दिवशीच त्या दोघांचे लग्न लागलें. बाळाच्या घरी त्याची नवी बायको राहयला आली. सावित्री तिचे नाव. ती कष्टाळू होती. तिने घरची झाडलोट केली. सारे स्वच्छ केले. पुढचे अंगण सारवले. तुळशीवृंदावन रंगवले. बाळाच्या घराला कळा आली.

'मिळवली की नाही बायको?' तो लोकांना मिशविर

पीळ देऊन म्हणे.

‘परंतु उद्या त्या बायकोचे काय होईल? घरदार सावकाराच्याताब्यात जाईल. तू जाशील मरून. तुझ्या बायकोचे हाल मग कुत्राही खाणार नाही.' लोक म्हणत.

'नाही तरी ती काय मोठी सुखात होती? नदीत जीव घायला निघालेली ती एक भिकारीण. थोडे दिवस तरी मी तिला सुख देत आहे. मझ्या मोठ्या घरात ती आनंदाने राहत आहे आणि लवकरच तिला मूल होईल. माझे हेतू पूर्ण होतील मी मेलो तरी तिच्याजवळ तिचे बाल राहील त्याच्यासाठी ती जगेल जगण्यासारखे तिच्याजवळ काही नव्हते. आता असे तिला वाटणार नाही. मी तिला इतर इस्टेट जरी ठेवली नाही, तरी ही अमोल संपत्ती देऊन जाणार आहे. 'असे बाळा त्यांना उत्तर देई.

सावित्री घरातील सारे काम करी. ती थकून जाई. एके दिवशी तिला बरे नव्हते. ती आडवी इगली होती. बाळा बाहेरून आला तो संतापून आला होता. कोणी तरी त्याचा अपमान केला होता. अपमानाचा सूड घ्यायला घरातील बायकोशिवाय दुसरी जागा त्याला नव्हती तो आला तरी सावित्री उठली नाही बाळाला तो अधिकच अपमान वाटला.

'मी बाहेरून आलो, दिसत नाही का? ऊठ की जरा. बाहेर त्या गाईला चाराही घातला नाहीस. तिचे शेणही ओढून ठेवले नाहीस. मोलमजुरी ना करीत होतीस येथे सुखात लोळायला आलीस? ऊठ. '

‘मला बरे वाटत नाही. पोटही जरा दुखत होते. पुरुषांना काय कळे?'

‘अधिक बोलू नकोस. बायका नि गोठ्यातील गायी सारख्याच. ऊठ, का मारू कमरेत लाथ? तीन बायका मेल्या; परंतु माझ्यापुढे त्या ब्र काढीत नसत. थरथरत असत. तू चुरूचुरू बोलतेस. झोडपूरन काढीन. ऊठ.'

बिचारी सावित्री उठली. जगात कोणी प्रेम करायला नाही म्हणून तिने हे लग्न केले. परंतु येथे निरालेच धिंडवले सुरू झाले. ती गोठ्यात गेली. गायीला पाणी पाजले; तिला चारा घातला; शेण ओढून ठेवले. ती घरात आली. दाव्याला बांधून ठेवलेली गाय; आपणही तशाच, असे तिच्यामनात आले. लग्नापूर्वी ती स्वतंत्र होती. आज तेही स्वातंत्र्य राहिले नाही. या नव्या नवऱ्याच्या लहरीप्रमाणे तिला राहणे प्राप्त होते.

काही दिवस गेले. सावित्री आता लौकरच बाळंतीण होणार असे दिसत होते. एके दिवशी रात्री भाकर खाताना बाळा तिला म्हणाला,

'मुलगा झाला तर बरे आहे. मुलगी झाली तर बघ. तुला त्या मुलीसह देईन विहिरीत ढकलून; नाही तर त्या गुणगुणीच्या डोहात. त्या डोहातच जीव घायला जात होतीस. होय ना? विचार करून ठेव. पोटी मुलगा आला पाहिजे त्याचे नाव गोपाल ठेवीन. या गोपाळपूरचा तो राजा होईल. समजले ना?'

'परंतु माझ्या हातचे का आहे?'

‘मग कोणाच्याहातचे? जास्त बोलू नकोस. माझी इच्छा

पुरी कर. मला मुलगा हवा आहे. ती किती वर्षाची माझी इच्छा आहे. ती इच्छा पुरी व्हावी म्हणून मी पुन्हापुन्हा लग्ने केली. ती इच्छा का तू पुरी नाहीं करणार? तेवढ्यासाठी तर तुझ्याशी लग्न केले. भिकारीण तर होतीस. परंतु वाटले, की तू मुलगा देशील, याद राख !'

सावित्री भीत होती. ती डोळयांत पाणी आणून देवाला म्हणे, ‘देवा नारायणा, मुलगा होऊ दे. त्यांची इच्छा पुरी होऊ दे. आणखी हाल आता नकोत.'

एके दिवशी रात्री तिचे पोट दुखू लागले. देवा, मुलगा दे, मुलगा दे, असे ती मनात म्हणत होती. या वेदनांतही पतीची इच्छा तिच्या डोळ्यांसमोर होती आणि खरेच तिला मुलगा झाला. बाळाचे रडणे बाहेर ऐकू आले.

मुलगा की मुलगी?' बाळाने बाहेरून विचारले.

‘मुलगा.' सुईण म्हणाली.

'शाबास!' तो म्हणाला.

कर्ज काढून बाळाने गावात साखर वाटली. लोक त्याला हसत होते. परंतु बाळाचे तिकडे लक्ष नव्हते.

'अरे मुलगा झाला, परंतु उद्या तो खाईल काय ? तुला स्वर्गात पाणी मिळेल. परंतु मुलगा येथे उपाशी मरेल त्याचे काय? शेतभात राहिले नाही. घरदार सावकाराकडे जाईल. पोराला भीक मागावी लागेल. साखर वाटतो आहे! काही अक्कल आहे का?' लोक म्हणत.

'माझा मुलगा पराक्रमी होईल. या गावचा राजा होईल. गोपालपूरचा राजा. त्याचे नाव मी गोपाल ठेवणार आहे. जणू हा त्याचाच गाव. तो शेतकऱ्यांचे राज्य स्थापील. गोरगरिबांना सुखी करील.' बाळा म्हणे.

आज मुलाला पाळण्यात घालायचे होते. बाळाने रंगीत पाळणा टांगला होता. त्याने थाटाने बारसे केले आणि खरोखरीच मुलाचे नाव गोपाळ ठेवण्यात आले. गोपाळ वाढू लागला. लहानाचा मोठा होऊ लागला. एका सावकाराकडून आणखी थोडे कर्ज बाळाने आणले. गोपालाला त्याने बाळलेणे केले. सुंदर केले. तो लहान बाळसेदार गोपाळ मोठा सुंदर दिसे. त्याचे डोले काळेभोर होते. बाळाला मुलाचे वेड लागलें. गोपानाला घेऊन तो सर्वत्र जाई. सर्वाना तो दाखवी

दुपारी जेवण झाल्यावर बाळा त्याला जवल घेऊन बसे. तो चिमुकला गोपाल बापाच्या मिशा ओढी. बापाचा आनंद गगनात मावत नसे. गोपाल रांगू लागला. घरातील सामान तो उडवी. पाटीतील दाणे फेकी. सावित्री त्याला खोटे रागे भरी. बरंतु बाळाला ते सहन होत नसे

'खबरदार त्याला रागे भरशील तर ! तो माझा सलगा आहे. माझी इच्छा पुरी करायला तो जन्मला आहे. त्याला चापट मारशील तर तुझी चामडी लोळवीन, समजलीस अशी धमकी बाळा सावित्रीला देत असे

गोपाळला आता पाय फुटले. तो रस्त्यात जाई. आई त्याला शोधीत फिरे. मग ती त्याला उचलून आणी. गोपाल गायींच्या गोठ्यात जाई. गवताशी खेले. गायीच्या शेणात हात भरी. सावित्री त्याला उचलून आणी. मोठा खोडसाळ होता गोपाळ.

बाळा कधी त्याला जवळ घेऊन बोलायला शिकवी. आई, बाबा, असे म्हणायला शिकवी. तो चिमणा गोपाळ हसे आणि बापाला अधिकच स्फूर्ती येई. बाळा आपल्या मुलाला

म्हणे,

‘गोपाळ, तू पुढे मोठा हो. होशील ना मोठा? तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस. आजकाल शेतकऱ्यांची मान खाली झाली आहे. तू ती उंच कर. शेतकऱ्यांचे राज्य स्थापन कर. शेतकरी म्हणजे पाताळात दडपलेला बली राजा. या पाताळात दडपलेल्या शेतकऱ्याला वर आण. या गोपाळपूरचा तू राजा हो. शेतकऱ्यांचा राजा, करशील हे सारे? पित्याची इच्छा पूर्ण करशील ना? काय रे?'

बापाचे बोलणे ऐकून बाळ हसे; बापाचे डोले झाकी. त्याचे ते भले मोठे नाक तो ओढी. विशेषत: त्या मिशा बान गोपाळला फार आवडत. त्या दोन्ही हातांनी तो घरी आणि गोड गोड हसे. बाळा सावित्रीला हाक मारून म्हणे,

‘हा बघ हसतो. याला सारे समजते. माझे बोलणे ऐकून लबाड हसतो. लहानसा आहे तरी त्याला सारे समजते. उद्या शाळेत जायला लागला म्हणजे किती समजू लागेल! शहाणा होईल, बाळ हुशार होईल. होशील ना रे?"

असे म्हणून बाळा मुलाचे मुके घेई.

गोपाळ दोन तीन वर्षांचा झाला. परंतु बाळा आता आजारी पडला. सावित्री नवऱ्याची सेवा करीत होती. घरात पैसा नाही. सावित्री मोलमजुरी करून चार दिडक्या मिळवून आणी आणि गाडा ढकलीत होती. परंतु बाळा बरा होईल कोणाला वाटत नठहते आणि शेवटची घटका आली.

माझ्याजवळ गोपाळ दें.' तो क्षीण स्वरात म्हणाला.

'हा घ्या !' सावित्री म्हणाली.

क्षीण हातांनी पित्याने मुलाला जवळ घेतले. गोपाळचा मुका घेऊन तो म्हणाला, मोठा हो राजा. शेतकऱ्यांची मान उंच कर. देवाघरी जाणाच्या तुझ्या पित्याची हीच इच्छा. ती पूर्ण कर. '

बाळ हसला.

‘बघ त्याला समजते.’ मरणोन्मुख बाळा म्हणाला.
7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा