shabd-logo

मंजी देवाघरी गेली

1 June 2023

8 पाहिले 8
झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात लहानसा मांडव घातला होता. मांडवात त्याने पाळणा टांगला होता. त्या पाळण्यात त्याचा तो पहिला मुलगा वाढत होता. मंजी पुन्हा कामावर जाऊ लागली. दौल्या घरी बाळाला सांभाळी. वर्षे दोन वर्षे गेली आणि आता एक सुंदर मुलगी झाली. असा गोप्याचा संसार वाढत होता. भराभर वर्षे जात होती. एखादे वेळेस शेत नीट पिके. एखादे वर्षी पिकत नसे. घरात आता अडचण भासे. कर्जही होऊ लागले. मंजी सचिंत होऊ लागली.

एके दिवशी मंजी व गोप्या दुसरीकडे कामाला गेली होती. घरी लहान लहान दोन मुले. मोठा मुलगा पाच वर्षांचा होता. दौल्या त्यांची काळजी करणारा. परंतु मोठया मुलाचे नि दौज्याचे भांडण झाले. तो मोठा मुलगा कोठे तरी जाऊ पाहात होता. दौल्या जाऊ देईना. तरी तो सोन्या पळालाच. दौल्याने तेथे एक लोखंडी तुकडा होता तो जोराने फेकून मारला. सोन्याच्या डोक्यात तो लोखंडी तुकडा बसला. सोन्या धाडकन् जमिनीवर पडला. रक्ताची धार लागली. दौल्याने त्याला उचलून घरात आणले. त्याला काही सुचेना.

सायंकाळी मंजी घरी आली. गोप्या बापूसाहेबांकडे काही कामासाठी गेला होता. मंजी घरी आली तो हा प्रकार. ती बाळाला मांडीवर घेऊन बसली. परंतु बाळाचे प्राण केव्हाच निघून गेले होते. संसारातील तो पहिला मोठा धक्का होता. मंजीच्या डोळ्यांतून प्रथम पाणीच येईना, परंतु शेवटी हुंदका आला.

‘सोन्या, सोन्या....' ती करीत होती.

आणि आता गोप्याही आला. तो आला, तो घरात सारे शांत होते. तो भीतभीतच आला.

‘काय ग मंज्ये?'

'सोन्या गेला. '

तिला बोलवेना. गोप्या कपाळाला हात लावून बसला. त्याने सोन्याकडे पाहिले. त्याचे डोळे भरून आले. त्यांचा पहिला मुलगा असा अकस्मात जावा!

‘दौल्या, तू राक्षस आहेस. तू येथे राहू नकोस. उद्या आणखी कोणाच्या काही कपाळात घालशील. तू चालता हो. आता मोठा झाला आहेस. जा; कोठेही पोट भर. येथे नको आमच्याकडे. मंज्ये, हा दौल्या जाऊ दे. मी त्याला येथे ठेवणार नाही. माझ्या सोन्याचा हा मारेकरी. एखादे वेळेस माझ्या हातून काही व्हायचे. नको हा खुनी पोरटा डोळ्यांसमोर.'

‘मी काय सांगू?”

'दौल्या, हो चालता.'

'हा मी चाललो, तुम्ही सुखी राहा.'

असे म्हणून खरेच दौल्या गेला. कोठे गेला? कळेल, पुढेमागे कळेल. आज त्याच्या पाठीमागून जाण्यात अर्थ नाही.

गोप्या बाळाला घेऊन गेला. त्यानेच खळगा खणला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. हातांनी बाळाचा देह त्याने भूमातेच्या स्वाधीन केला. तो परत झोपडीत आला. मंजी अश्रुसिंचन करीत बसली होती.

'मंज्ये, रडू नकोस. किती रडशील?'

ती रात्र गेली. एक दोन दिवस मंजी घरातच होती; परंतु किती दिवस अशी घरी राहणार गरिबाला शोक करीत बसायला वेळ नसतो. दुःखप्रदर्शनाला अवसर नसतो. ती पुन्हा मोलमजुरीला जाऊ लागली.

शेतीचे धान्य घरी आले म्हणजे मंजी त्यांतले गोप्याला

न सांगून चोरून विकी. मुलीला काही दागिना करावा असे तिच्या मनात होते परंतु गोप्याला ही गोष्ट कळली. तो रागावला.

'तू चोरून धान्य विकतेस आणि चैन करतेस. समजले मला. अशी चोरटी आहेस एकूण!'

'कणाची चोरी? घरचे धान्य विकले तर ती का चोरी?'

‘हे माझे धान्य आहे.’

‘आणि मी नाही शेतात मरत? बाळंतपणात मरावे. तिकडे शेतात मरावे. तरी या दाण्यांवर माझी सत्ता नाही. मूठभर घेईन म्हटले तर ती लगेच चोरी झाली ना ? आणि चैन कसली केली? तुमच्याच या मूलीला एखादा लहान दागिना करावा म्हणून विकले थोडे धान्य. तुमच्या बापाने तुम्हांला लहानपणी कर्ज काढून सजवले होते. मी काही कर्ज काढायला तर नाही ना सांगितले?'

'तू तुझ्या मुलीला सजवणार. मला का नाही

सांगितले?’ ‘तुम्ही लहान वाटते असा सजायला? काही तरीच बोलता. आणि माझी मुलगी ही तुमची नाही वाटते? ती काय परक्याची आहे?' 

‘मी पण आता थोडी ऐट करणार आहे. तुम्ही ऐट करणार नि मी भिकाऱ्यासारखा कसा राहू?'

आणि गोप्याने ऐट करायची असे ठरविले. परंतु ऐट करायची म्हणजे काय करायचे ते त्याला सूचना. शेवटी खिशातले एक घडयाळ विकत आणायचे, जाकिट करून त्याच्याखिशात ते ठेवायचे असे त्याने ठरविले.

आठवडयाच्या बाजाराचा दिवस होता. तालुक्याच्या मुख्य गावी आज बाजार होता. गोप्या गेला. बरोबर पंधरा- वीस रुपये घेऊन तो गेला. त्याने एक सुंदर जाकीट विकत घेतले आणि घडयाळांच्या दुकानात तो गेला. एक घडयाळ त्याने खरीदले. घडयाळासाठी एक गोफ त्याने घेतला आणि घरी परत यायला तो निघाला. रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. मुले झोपी गेली होती. मंजीही अंथरुणावर पडून राहिली होती. गोप्या आला. मंजी उठली नाही. तो रागावला. त्याच्या बापाचा मानी स्वभाव त्याच्यामध्येही होता. तो स्वभाव आज जागृत झाला. तो एकदम उसळून म्हणाला, ऊठ की सटवे जरा. पडून राहिली आहे नुसती म्हशीसारखी. ऊठ, माझे घडयाळ बघ. माझी ऐट बघ. हे जाकिट बच. '

‘घरात मुलांना खायला नाही नि तुमची ऐट बधू वाटते?' 'जास्त बोलू नकोस फाजिलपणे. ऊठ आधी!'

मंजी काही बोलली नाही. गोप्या फार संतापला, तो तिला मारायला धावला. परंतु ते घडयाळ खाली पडले नि फुटले, गोप्या पाहातच उभा राहिला. मंजीही आता उठली.

'करायचे काय ते घडयाळ ? किती पैसे दिलेत ? घरात आज या बाळाला ताप आला आहे. मुलांना औषधपाणी करायलाही पैसे नाहीत. तुम्हाला हवीत घडयाळे.'

गोप्या खाली बसला. लहान मुलाच्या अंगाला हात लावून पाहिला.

'केव्हा आला ताप?'

'मी शेतातून आले तो तो पडून राहिला होता. '

‘तारा बरी आहे ना?”

‘ती दोघे निजली आहेत. विनूचेच बरे नाही.'

इतक्यात विनू विव्हळू लागला. गोप्याने त्याला उचलून घेतले. ‘उगी हो बाळा' असे म्हणू लागला.

‘मुलांना थोडा खाऊबिऊ तरी आणायचा.'

‘आज माझी ऐटच मला दिसत होती. मी मूर्ख आहे. तू पोरांसाठी तडफडतेस. मी केवळ स्वतःकडे पाहतो. मंज्ये, तुझा हा गोप्या नालायक आहे. तुला मघा मी बोललो. तुला मारणार होतो. आणि तुझ्या या मुलांची तू आई. मी तुझ्यावर किती प्रेम करीत असे! तुझ्या केसात घालायला मी वेणी गुंफीत असे. तुझ्या झोपडीत ती तुला मी आणून देत असे. तू गोड हसत असस. कोठे गेले ते प्रेम, ते गोड हसणे ?'

'प्रेमाचा पाऊस दोन दिवस असतो. संसारात पुढे सारे नाहीसे होते. सारे सुकून जाते. आता आपण या पोरांवर प्रेम करायचे. त्यांच्यासाठी जगायचे. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ; तुमच्या झोपडीत मी आपण होऊन आले. हक्काने येथली दोन फुले मीच आधी तोडली. संसारात रागलोभ, कधी गोड़ी, कधी भांडणे असे सारे चालायचेच बसा. भाकर खायची आहे ना? उठून कुठे जाता?”

'नको भाकर, आज पोट भरून आले आहे; आणि मंज्ये अलीकडे का तुलाही बरे वाटत नाही? तूही जरा वाळल्यासारखी दिसतेस.'

'जरा बरे नाही वाटत. परंतु असे चालायचेच. कामावर जायला हवे. चार धंदे करायला हवेत. संसार चालायला हवा ना? तुम्ही हातपाय धुऊन या नि भाकर खा.'

मंजीने विनूला तेथेच थोपटून निजविले. तिन गोप्याला भाकर वाढली. चटणी होती, कांदा होता.

'तू खाल्लीस का भाकर?'

'मला नको.’

‘माझ्याबरोबर खा. ये. आज जुने दिवस आठवतात. आपण बाहेर अंगणात बसून चांदण्यात खात असू, आठवते?”

'आणि आपल्या सोन्याचा पाळणा मांडवात होता. आज सोन्या असता तर दहा वर्षांचा असता. नाही का? ताराला आता आठवे वरीस लागेल. दिनू पाच वर्षांचा आणि हा विनू. आता नको बाळंतपणे आणखी. '

‘ते का आपल्या हाती असते? तू थकून गेलीस हो मंज्ये' भाकरी खाऊन झाली. मंजी विनूजवळ बसली होती.

'तू झोप. मी बसतो बाळाजवळ.'

मंजीने आढेवेढे घेतले नाहीत. ती तेथे कांबळ्यावर पडली. तिला झोप लागली. गोप्याने तिच्या अंगावर गोधडी घातली. बाळ विनू झोपला होता. ताप जरा कमी झाला होता. गोप्याने दिवा मालवला. तो मंजीचे पाय चेपीत बसला. मंजीला जाग आली. परंतु तिने आढेवेढे घेतले नाहीत. पुन्हा बऱ्याच दिवसांनी ती प्रेमाचा ओलावा चाखीत होती. थोडया वेळाने गोप्या उठला. तो बाहेर अंगणात आला. बाजूला गाय होती. तिला थोडा चारा त्याने टाकला. समोर नदी दिसत होती. वरती चंद्र होता. सारे वातावरण पवित्र, निर्मळ, शांत होते. बरीच रात्र झाली होती. झाडावरून टपटप दवबिंदू पडत होते आणि गोप्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो घरात गेला. बाळाला जवळ घेऊन तोही झोपला. सकाळी मंजी उठली तरी तो झोपलेला होता.

काही दिवस गेले. घरात ओढाताण असे. पोटभर खायला मिळत नसे. मंजी मुलांना वाढी. पतीला ठेवी नि स्वतः उपास काढी. शेतात दागे यंदा फार झाले नाहीत. खंडही पुरा देता आला नाही. बापूसाहेब रागावले. ते एके दिवशी येऊन म्हणाले,

'गोप्या, शेत तुझ्याकडून काढून घेतले पाहिजे. मागील वर्षांची बाकी आहेच, या वर्षी दाणा घातला नाहीस. असे कसे चालेल?'

'आमच्या घरात तरी का आम्ही कोठारे भरून ठेवली आहेत? शेत पिकले म्हणजे का देत नाही? घरात आम्हालाही खायला नाही बघा. कसा तरी आला दिवस ढकलतो.'

‘मंजी कुठे गेली? ती अलीकडे तोंड दाखवीत नाही.'

‘कसे दाखवायचे तोंड? तुमची बोलणी ऐकून घ्यायला का येऊ? तुमचे सारे देणे देऊ. मग तोंड दाखबू.' मंजी बाहेर येऊन म्हणाली.

'इथली बाग वगैरे कोठे गेली?'

'संसाराची होळी होऊ लागल्यावर बागा फुलवायला कुठला वेळ आणू? दिवसभर राबावे, उपाशी पडावे. कोठली फुले नि फळझाडे? शेतकऱ्याचा संसार असाच चालायचा.'

'अरे, पुढील वर्षी पाऊस नीट पडेल, भरपूर दाणे होतील. शेतकऱ्याने कधी हिंमत सोडू नये. समजलास?'

'तो कधी सोडतो दादा धीर? पाऊस येवो न येवो; तो शेत तयार करून ठेवतो. आशेवरच तो जगतो. आकाशाकडे त्याचे डोळें असले, तरी तो स्वस्थ बसत नाही. त्याचे काम सुरूच असते.'

बापूसाहेब गेले, गोप्या शेतात गेला. मंजी आज घरीच होती. तिने घरात दाणे होते ते दळले. ते जाते तिला एकटीला ओढवत नसे. तारा हात लावी. परंतु ली मुलीला म्हणायची, ‘नको तारा, तू जा विनूला घेऊन. जा नदीकाठी. आणा रानफुले गोळा करून.

काही महिने गेले, एके दिवशी गोप्या घरी आला तो मंजी अंथरुणावर होती.

"काय गं, बरे नाही का वाटत?'

'आज घरले अंथरूण. इतके दिवस कसे तरी ढकलले. परंतु आज इलाज चालेना. पाय उचलेना. काय करायचे?'

'तुला औषध द्यायला हवे.'

'कोठून आणायचे औषध ? औषधाला पैसे हवेत. गरिबांनी असेच पडून राहायचे. बरे वाटले म्हणजे उठायचे. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मला आता कामाला जाता येणार नाही. एकटया तुमच्यावर भार.'

' असे मनात नको आणू मी तुला आधीच विसावा दिला पाहिजे होता. तुझे अंग दुखे, कमर दुखे. तरी तू कामाला यायचीच. मी लक्ष दिले नाही. थांब. आज मी एका सावकाराकडे जातो. पंचवीस रुपये मागतो. एक डॉक्टर आणतो. तो सुई टोचील. बरी होशील.'

'कोण देणार पंचवीस रुपये? काही दागदागिना गहाण ठेवला तर पैसे मिळतील. आपल्याजवळ काय आहे?"

'तो सावकार बरा आहे म्हणतात. या गायी नाही राहात. तो चार कोसांवर एक गाव आहे, तेथे राहतो.'

‘मला माहीत आहेत ते. तुमच्या वडिलांवर ते लोभ करीत असत. होय ना? सारे सावकार तुमच्या वडिलांवर लोभ करीत आणि लोभामुळे सारी शेतीवाडी, सारे घरदारही त्यांनी घेतले. सावकाराची माया उगीच नसते. त्याचे प्रेम वरपांगी असते; त्याचे गोड शब्द वरवर असतात. कुळाचे सारे केव्हा

घशात घालायला मिळेल इकडे त्याचे लक्ष असते. तुम्ही या जाऊन. तो पैसे देणार नाही'

गोप्या तिसरे प्रहरी जायला निघाला दिवे लागताना तो सावकाराच्या घरी पोचला. श्रीपतराव अंगणात आरामखुर्चीत होते.

'रामराम' गोप्या म्हणाला.

' रामराम. गोप्या. तिन्हीसांजा रे कोठे इकडे?'

‘बायको फार आजारी आहे. तुमच्याजवळ थोडे पैसे मागायला आलो आहे बघा. डॉक्टर न्यायला हवा. जवळ दिडकी नाही. बायकोने अंथरुण धरले. घरात मुलेबाळे. कसे करायचे? द्या थोडे पैसे. पंचवीस रुपये तरी द्या. बायको बरी होऊ दे. तुमचे पैसे लौकरच देऊ. ठेवणार नाही.'

‘अरे, कोठून देणार पैसे? ते बापूसाहेब तुझ्याकडची जमीनसुद्धा

काढून घ्यायला हवी, असे म्हणत होते. तू दोन वर्षे खंडही पुरा देत नाहीस. आणखी हे कर्ज कशाला?'

‘शेतात पिकलेच नाही. घरी आम्हालाही खायला नाही. बायको उपाशी राहात असे. बापूसाहेबांना बोलायला काय? तुम्ही द्या पैसे. एवढी अडचण दूर करा. बायको हिंडती फिरती होऊ दे. दया करा.'

'गोण्या, डॉक्टरच्या एका इन्जक्शनाने का गुण येणार आहे? एकदा सुई टोचून भागत नाही. पाचपाच दहादहा वेळा सुई टोचून

घ्यावी लागते. कोठून आणशील इतके पैसे? अरे, गरिबांनी या डॉक्टरांच्या नादी लागू नये. झालडपाल्यांची औषधे तुम्ही करावी. पाले आणावे, मुळे आणावी. काढा करावा; रस काढावा. डॉक्टर नको, कोणी नको. पाल्याला, मुळांना काही तोटा नाही. जावे जंगलात, आणावी भरपूर औषधे. मी सांगतो तुला औषध. काय होते तुझ्या बायकोला?'

'सारे अंग दुखते. दुसरेही काही दुखणे आहे. काय काय सांगू?”

'सारे माझ्या लक्षात आले. मी सांगतों औषध. तुझ्या झोपडीत पत्नीकडे जंगल आहे. जंगलात जा आणि कातरपानांची वेल असते ती माहीत आहे ना?'

‘हो. पुष्कळ आहे ती वेल.'

‘बस्स. त्या वेलीचा पाला आण. दिवसातून तीन वेळा बोंडले बोंडले रस बायकोला दे. सात दिवस असे कर ठणठणीत बरी होईल. अरे, देवाने गरिबांसाठी जिकडे तिकडे उपाय ठेवले आहेत. त्या सुया आणि टॉनिके सारे श्रीमंतांचे चोचले आणि एकदा घरात डॉक्टर आला की तो बाहेर पडत नाही डॉक्टर म्हणजेच जणू रोगाची साथ. तू त्या डॉक्टरांच्या फंदात पडू नकोस. आता आला आहेस तर पोटभर जेवून जा. रात्री वाटले तर येथेच झोप. पहाटे उठून जा. बायको फारच आजारी असेल तर आताच जा. परंतु जेवल्याशिवाय जाऊ नकोस. तुझा बाप बाळा हक्काने जेवायला यायचा. आमच्याकडचे लोणचे त्याला फार आवडे. जा. हातपाय धू. विहिरीवर बादली आहे. '

गोप्या सावकाराच्या भाषणाने खूष झाला तो पोटभर जेवला. रात्री तेथेच तो झोपला. पहाटे उठून तो गेला. तो आधी घरी गेला नाही. तो परभारे जंगलातच गेला. त्या कातरवेलीचा पाला त्याने गोळा केला. तो पाला घेऊन तो घरी आला. तारा अंगणात होती.

'काय तारा, आई कशी आहे?"

“बरी नाही आई. तुमचीच वाट पाहात आहे.'

गोप्या झोपडीत शिरला. मंजी विव्हळत होती. कण्हत होती.

'आणलात का डॉक्टर?'

'मी औषध घेऊन आलो आहे. कातरवेलीच्या पाल्याचा

रस सात दिवस घ्यायचा. रोज तीन वेळा मी तुला रस काढून देतो हं. होशील, लौकर बरी होशील.' असे म्हणून गोप्याने पाल्याचा रस काढला. जवळ जवळ दोन बोंडली रस निघाला.

'थोडा जास्त होईल. परंतु गुण लवकर येईल. घे हा रस.

वर हे सुपारीचे खांड खा.'

मंजीने तो रस घेतला. वरती थोडे पाणी ती प्याली. ती

पडून राहिली. गोप्या जवळ बसला होता.

'मी जाऊ का शेतात?'

‘जा. घरी बसून कसे होईल?'

“पोरे जेवली का? तू काही खाल्लेस का ?'

'माझी वांच्छा नाही. तुम्ही भाकर खाऊन घ्या.'

'मला भूक नाही आज. काल श्रीपतरावांकडे दोन दिवसांचे जेवून घेतले आहे. तू पडून राहा. मी सांजचा येतो. धीर नको सोडू.'

गोप्या निघून गेला. तारा आईजवळ होती. दिनू नि विनू बाहेर खेळत होते. मंजीच्या पोटात मनस्वी कळा येऊ लागल्या. ती रडू लागली. तारा घाबरली.

‘आई, बाबांना बोलावू का?'

'नको बाळ. तू जवळ आहेस तेवढी पुरे.'

मंजी उठून बाहेर शैचाला गेली. परत आली. परंतु अंथरुणावर पडते न पडते तो पुन्हा कळ आली. पुन्हा ती शौचाला गेली. अतिसार जणू सुरू झाला. ती आता बाहेर जाऊन जाऊन गळून गेली. परंतु आपल्या पायी ती बाहेर जात होती. तेथे घरात कोठे बसणार?

सायंकाळ झाली. देव मावळला. परंतु गोप्या अद्याप घरी आला नाही.

'तांबू आली का घरी?' मंजीने विचारले.

'आली. बांधली.' तारा म्हणाली.

'तू दिनू- विनूला भाकर दे. तूही खाऊन घे त्यांच्यासाठी

झाकून ठेव.

‘आई, तुला काय देऊ? पुन्हा रस काढून देऊ?"

‘मला पोटभर पाणी दे. जीव सुकला. '

ताराने आईच्या तोंडात पाणी घातले. नंतर ती उठली. तिने भावंडांचे जेवण केले. एका घोंगडीवर ते दोघे छोटे भाऊ झोपले. तारा आईजवळ होती.

'तूही झोप. दमलीस. मला काही लागले तर उठवीन.'

'आई, तू बाहेर जाऊन दमली असशील.' तू

'मला जाववले नाही तर तुला हाक मारीन. मग हात धरून ने नि बसव अंगणाच्या कडेला. जाववेल तोवर मी जाईन.

तू झोप आता.'

ताराही झोपली, तीन मुले तेथे झोपली होती. मंजी मधून मधून शौचास जात होती. एकदा ती शौचाहून आली नि जरा अंथरुणात बसली. तिने आपल्या तिन्ही लेकरांकडे पाहिले. ती उठली. तिने दिनू नि विनू यांचे मुके घेतले. त्यांच्या डोक्यावरून, तोंडावरून, साऱ्या अंगावरून तिने आपला हात फिरविला. नंतर ती ताराजवळ बसली. तिच्या केसांवरून तिने हात फिरविला.

'गुणी पोर' असे म्हणून तिचा तिने मुका घेतला. इतक्यात कळ आली पोटात. ती पुन्हा बाहेर जाऊन आली. आणि अंथरुणात पडून राहिली. आता ती अगदीच थकली.

बाहेर जागे आता शक्य नव्हते. तिच्या डोळ्यांत पाणी आले. तो पुन्हा पोटात कळ! ती उठली; परंतु उभे राहवेना. ती मटकन् खाली बसली.

'तारा, तारा,' तिने हाक मारली.

‘काय आई?' तिने एकदम उठून विचारले.

'मला नाही ग बाहेर जाववत. माझा हात धरून ने. मी तुला इतका वेळ उठविले नाही; हाक मारली नाही. दिवसभर तू दमतेस. परंतु तुझ्या आईला आता शक्ती नाही हो. घर मला. मी कधी तुला काम सांगत नसे. करवत असे तोपर्यंत करीत होते. परंतु आता नाही इलाज. गरीब आईबापांना देव कशाला देतो मुले ?'

'आई, चल, मी तुला धरते. '

ताराने आईला हात धरून नेले. अंगणाच्या कडेला ती बसली. बसवेना. तिने तेथेच डोके टेकले. शेवटी कशी तरी एकदाची पुन्हा ती घरात आली. तारा पाय चेपीत बसली. ती मुलगी रडू लागली.

'ते नाही का अजून आले घरी?'

'नाही, आई.’

'यांना काळवेळ काही समजत नाही.'

'सारे समजते. हा बघ मी आलो. बरे वाटते की नाही?

तारा, कसे आहे ग?' गोप्या येऊन म्हणाला.

'बाबा, आईचे अधिकच आहे. सारखे शौचाला होते. आई अगदी गळून गेली आहे.'

'आता मी आलो आहे. मी बरी करतो. तू नीज पोरी. '

तारा अंथरुणावर पडली. गोप्या जवळ बसला. तो तिचे अंग चेपति होता.

'तुम्ही भाकर खा नि मग बसा.'

'आज पोट भरलेले आहे.

‘मी सांगते भाकर खा. आज सांगेन. पुन्हा नाही सांगणार ! आज मला नाही म्हणू नका. माझे सारे ऐका. जा उठा. पोटभर भाकर खा. माझ्या वाटची पण खा. खरेच जा.'

गोप्या उठला. त्याने भाकर खाल्ली. त्याचे डोळेही भरून येत होते. तो चूळ भरून पुन्हा मंजीजवळ येऊन बसला.

"पोटातील कळा आता थांबल्या.' ती म्हणाली.

‘आता बरी होशील. सारी घाण निघून गेली. '

'तुम्ही पडा.'

'तुइयाजवळ बसून राहतो. तुला झोप येते का?'

‘मला आता अखेरचीच झोप लागणार आहे.'

‘असे नको बोलूस.’

'खोटी आशा नको. माझा जीव आत ओढत आहे. तुमची मंजी घटकेची सोबतीण आहे. जपा तुम्ही सारी. गोड आहेत पोरे. ताराचे लगीन झाले म्हणजे मग काही फार पसारा नाही. वाटले तर पुन्हा लगीन करा.'

'तू बोलू नकोस. माझ्या मांडीवर डोके ठेव. मंज्ये, तुला मी सुख दिले नाही.'

किती तरी सुख दिलेत. सोन्यासारखी मुले दिलीत. प्रेम दिलेत. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. पुसा डोळे. पुरुषांनी रडू नये. तुमचे प्रेम आठवते. ती फुले आठवतात. . केसात घातलेली वेणी आठवते. '

‘तू बोलू नकोस.’

'हे शेवटचे बोलणे. पुन्हा का मी बोलायला येणार आहे? जपा सारी. सांभाळा. तांबूला कधी विकू नका. दिनू, विनू यांना तिचा फार लळा. '

मंजी थकली. हळूहळू बोलणे संपले. डोळे मिटून ती पडली होती. बाहेर पहाट झाली. टपटप दवबिंदू पडत होते. तिकडे कोंबडा आरवला आणि मध्येच तांबू हंबरली, का बरे ? तांबू का कोणाला हाक मारीत होती? का तिला यमदूत दिसले?

'तारा, दिनू, विनू, गोड पोरे, देव सुखी ठेवो. तुम्ही जपा. सुखी राहा. राम.' मंजीने राम म्हटला.
7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा