shabd-logo

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023

5 पाहिले 5
गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी दिसले नाही तरी जरा हातभर वाळू खणताच खाली निर्मळ पाण्याचा झरा मिळतो. तसेच गोप्या नि मंजी यांचे असे. त्यांच्या हृदयात भरपूर प्रेम होते. एखादेवेळेस ते प्रकट होई. मंजी गेल्यावर गोप्याला चार दिवस काही सुचेना. तो बाहेर गेला नाही. तो मुलांना जवळ घेई. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करी. चार दिवस त्यानेच घरात स्वयंपाक केला. तो मुलांना जेवू घाली नि मग स्वतः तुकडा खाई. रात्री मुलांना थोपटीत बसे. जणू आईबापाचे दोघांचे प्रेम त्या पिलांना तो देत होता.

गोप्याच्या जीवनात मंजी खूप खोल गेलेली होती. त्याला पूर्वी कल्पनाही नव्हती. परंतु मंजी गेली नि त्याला सारे कळून आले. स्वतःच्या हृदयातील काही तरी तुटले, असे त्याला वाटले. आपल्या जीवनातील भाग जणू कापला गेला असे त्याला वाटले. दोन झाडे शेजारी शेजारी उभी असावीत. ती स्वतंत्र दिसतात. अलग दिसतात. परंतु खाली जमिनीत पाहू तर त्यांची शेकडो मुळे एकमेकांत गुंतून गेलेली दिसतील. गोप्या नि मंजी यांची जणू हीच तन्हा होती. तिच्या जीवनात तो, त्याच्या जीवनात ती, याप्रमाणे मिसळून गेली होती. मंजीचा जीवनवृक्ष उन्मळून पडला. परंतु गोप्याच्या जीवनवृक्षालाही जोराचा धक्का बसला. त्याला चैन पडेना. त्याला अस्वस्थ वाटे, अशांत वाटे. त्याचे डोळेही भरून येत. मुलांना झोपवून तो रात्री बाहेर येऊन बसे. त्याला शेकडो आठवणी येत. एके दिवशी तो असाच बाहेर उदासीनपणाने बसला होता. परंतु त्याची मुलगी तारा - ती आज जागी होती - ती हळूच उठून आली. ती बापाजवळ आली नि म्हणाली,

‘बाबा, चला आत. तुम्ही झोपा. आई गेली. तुम्हीही का जाणार? आम्हाला सोडून नका जाऊ. असे बाहेर नका बसत जाऊ. चला आत. आमच्याजवळ झोपा.'

'चल, बाळ !' असे म्हणून तो आत गेला.

काही दिवस गेले. दुःख ओसरले. ताराही आता मोलमजुरी करी. दिन हातात टोपली घेऊन शेण गोळा करायला जाई. शेतकऱ्याच्या घरी कोणी आळशी नसते. आळशी राहून त्याचे भागेल कसे?

एके दिवशी गोप्या शेतात होता. तो त्याच्याकडे त्याचा एक मित्र आला.

'काय हरबा, आज इकडे कुठे?'

'तुइयाकडेच आलो गोप्या. तुझी सध्या जरा ओढाताण आहे. कर्जही झाले आहे तुला. एक गोष्ट सुचवायला आलो आहे.'

'कोणती गोष्ट?'

‘अरे, शिवापुरात एक पेन्शनर गृहस्थ आहेत. मिलिटरीतील आहेत. त्यांना घरी काम करायला एक मुलगी हवी आहे. तुझी तारा जाईल का? त्यांच्याकडेच राहायचे.

त्यांच्याकडेच जेवायचे. जवूनखाऊन दहा रुपये देणार आहेत. तुला मदत होईल आणि तुझ्या दिनूला जरा शाळेत घाल की. दोन अक्षरे शिकू दे त्याला.'

'तारा अजून लहान आहे.'

'लहान कशाने ? बारा वर्षांची आहे. तिचे लगीन हवे करायला. जाऊ दे शहरात. जरा हुशार होईल. त्यांच्या घरी लिहायला वाचायलाही शिकेल. माझें ऐक. '

‘मी विचार करून कळवितो. तुझ्या बायकोची प्रकृती

कशी आहे?'

"ती लागली पुन्हा दळणकांडण करायला.'

'तुझा गोविंदा शाळेत जातो वाटते?'

'घातला आहे शाळेत. अरे, मीसुद्धा रात्रीच्या शाळेत शिकायला जातो. गोप्या, शिकले पाहिजे बघ.'

'लहानपणी मी दोन पुस्तके वाचली नि पुढे बंद केले.'

'तू वाचायची सवय ठेव. तुला वर्तमानपत्र आणून देत जाईन. तुला लवकर येईल. मला जड जाते.'

‘शेतकऱ्याला कुठे आहे वेळ वाचायला नि लिहायला?'

'परंतु असे म्हणून चालणार नाही. येतो आता. गोप्या, तू विचार कर. ताराला पाठव. काही हरकत नाही.'

हरबा गेला. गोप्या दोन प्रहरी घरी आला. तारा गवत कापायला गेली होती. ती आता सांजवल्याशिवाय थोडीच घरी येणार होती?

गोप्या घरी विचार करीत बसला. ताराचा विचार करीत होता. दिनू-विनू जवळच होते.

‘पोरांनो, तुम्ही खाल्लीत का भाकर?'

'हो, कधीच खाल्ली भाकर.'

'तुमची ताई कोठे गेली गावाला, तर चालेल का?'

'कुठे जाणार ताई? तिच्याबरोबर आम्हीही जाऊ.

'तुम्ही लहान आहात. तुम्ही मोठे व्हा. मग तुम्ही जा.'

'ताई गेल्यावर भाकर कोण भाजील?'

'मी भाजीन.'

'तुम्ही कोठे गेलेत म्हणजे ?'

‘मग तुम्ही भाजा. काटक्या-कुटक्या चुलीत घालाव्या.

विस्तव करावा. तवा चुलीवर टाकावा. करावी भाकर.'

'पण तांबूचे दूध कोण काढील?'

'दिनू काढील. परवा बकरीला धरून नव्हता का दूध

काढीत?” ‘बकरी लहान असते, बाबा !'

'आपली तांबू गरीब आहे. तुम्हीसुद्धा तिचे दूध काढाल.'

‘आम्ही जातो बाबा, नदीत डुंबायला. मासे धरायला.'

'मासे पकडता येतात का?'

'आम्ही असा आकडा टाकतो मजा. चल दिनू !'

पोरे उड्या मारीत गेली. गोप्या घटकाभर झोपून पुन्हा शेतावर गेला.

रात्री ताराजवळ बोलणे काढले.

‘जाईन, बाबा. तुम्हालाही मदत होईल आणि दिनू, शाळेत जाऊ दे. मीही तिकडे शिकता आले तर शिकेन. काम करीन. सर्वांची आवडती होईन.

'तू अजून लहान आहेस. '

‘गवत कापायला जाते. आता का लहान ?'

'मी मधून मधून येऊन तुला भेटत जाईन. आपल्या गावची माणसे शिवापूरला जातात येतात. त्यांच्याबरोबर खुशाली कळवीत जा.'

'केव्हा जायचे बाबा?'

‘परवाच्या दिवशी निघू गुरुवार आहे. तुझ्या आईचे नि माझे लग्र गरुवारी लागले होते. '

'आईचे हाल झाले, बाबा. नाही का?'

'तुम्हा मुलांचे तसे न होवोत.'

आणि गुरुवारी तारा जायला निघाली. तांबूच्या दुधाबरोबर भाकर खाऊन ती निघाली. सकाली सर्वांनीच बरोबर भाकर खाल्ली. दिनू, विनू, गोप्या, तारा सर्वांनीच एकत्र जेवाण केले. गाही तयार होती.

'ताई, चाललीस ?' दिनूने रडत विचारले.

'ताई, मी येऊ?' बिलगून विनूने विचारले.

‘पुढे तुम्हाला नेईन. सध्या घरीच राहा. मला पोचवून बाबा रात्री परत येतील. नाही तर उद्या सकाळी येतील. तुम्ही भांडू नका. घरी काम करा. दिनू, तू शाळेत जा. मी पैसे पाठवीन. पुस्तके घ्या. हुशार व्हा. '

'ताई, तू पुन्हा कधी येशील !'

‘आई गेली ती परत आलीच नाही. देवाकडे गेले म्हणजे परत नाही का गं येत?'

‘विनू, आर्हं देवबाप्पाकडे आहे. परंतु मी येत जाईन.'

"किती दिवसांनी येशील?"

'येईन लवकरच. तुम्हाला भेटून जाईन. खेळणी

आणीन : खाऊ आणीन.'

‘मला भोवरा आण.'

'मला टोपी आण. गांधीटोपी. ढवळी. '

'आणीन.'

'चल तारा, उशीर होईल. '

भावांना जवळ घेऊन त्यांचे मुके घेऊन तार निघाली. ती गाडीत बसली. दोघे भाऊ दारात उभे होते.

'घरात राहा. बाहेर नका जाऊ. तांबूला पाणी पाजा.'

असे म्हणून गोप्या गाडी हकायला बसला. निघाली गाडी.

ताराचे डोळे भरुन आले.

‘ताई, ताई,’ करीत मुले रडत धोवून आली. शेवटी ती चिमणी मुले झोपडीत परत आली. दिवसभर ते लहान भाऊ खेळले, पाण्यात डुंबले. त्यांनी तांबूला पाणी पाजले आणि संध्याकाळी दिनू, तांबूचे दूध काढायला बसला. त्याने वाटीभर दूध काढले. दोघे भाऊ प्याले. भाकर खाऊन झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी उजाडताच गोप्या घरी परत आला. त्याने आज दिनूला शाळेत घातले. घरी लहान विनूच असे. मधून मधून तो ताराला भेटून येई. तिच्याकडूनही कधी खुशाली येत असे.

परंतु एके दिवशी दिनूला ताप आला. शाळेतून तो घरी आला. अंथरुणात पडून राहिला. संध्याकाळी गोण्या घरी आला तो अंथरुणात बाळ तापाने फणफणत होता.

‘आग बाबा, आग होते अंगाची. पाण्यात बुडवा मला. नदीत नेऊन ठेवा.' दिनू तडफडून म्हणे.

'काय करू, बाळ !' गोप्या खिन्नतेने म्हणाला.

त्याच्या मनात आले की ओले कापड घालावे अंगावर. तो उठला. त्याने एक कपडा भिजवला आणि दिनूच्या अंगावर ठेवला. वरून पांघरूण घातले. थोड्या वेळाने तो कपडा काढून, पुन्हा भिजवून अंगावर ठेवला. गोप्या असे करीत होता. तासाभराने ताप कमी झाला.

'कसे वाटते, बाळ?'

'बरे वाटते आता. उद्या निघेल का ताप ?'

‘निघेल बरे. पडून राहा.'

सकाळ झाली. गोप्याला एके ठिकाणी गवत कापायला जायचे होते.

'मी जाऊ का कामाला, बाळ?' त्याने विचारले.

'जा बाबा. मला बरे वाटते.'

आपला विळा घेऊन गोप्या कामाला गेला. परंतु त्याला उशीर झाला होता. इतर कामकरी केव्हाच आले होते. ते गवत कापीत होते. मालक तेथे उभा होता.

'गोप्या, इतक्या उशिरा कामाला यायचे का रे? मजुरी

मात्र सबंध दिवसाची मागशील. बाकीचे मजूर केव्हाच आले. तू

आलास

आत्ता. '

“पोरगा तापाने रातभर फणफणत होता. रागावू नका.'

"बरे लाग कामाला. सपासप गवत काढ. '

गोप्या गवत कापू लागला. परंतु त्याच्या विळ्याला धार नव्हती. विळ्याला धार लावायला त्याला वेळच झाला नाही. भराभर गवत कापून होईना. मालकाचे त्याच्याकडे लक्ष होते.

'गोप्या, कामाची वेठ मारायला आलास वाटते? त्या विळ्याने लोणी तरी कापेल का? कामाला यायचे तर धार नको होती का लावून ठेवायला?'

'अहो, पोरगा घरी मरतो आहे, धार केव्हा लावू?डोळ्याला धारा लागल्या होत्या. '

‘मग कामाला कशाला आलास? हो चालता. तू घरी जा. उद्या नीट धार लावून मग कामाला ये. खरेच सांगतो. आज कामावर तू नकोस. ऊठ. जा घरी.' ,

गोप्या खिन्नपणे घरी निघून गेला. त्याला मुलगा दिनू

तेथे बाहेरच होता विनूही खेळत होता.

‘बाबा आलेतसे लौकर?' दिनूने विचारले.

'तुझी आठवण येई म्हणून आलो. ताप नाही ना?'

'नाही. आता छान वाटते.'

'दोन दिवस शाळेत जाऊ नकोस. लांब पडते तुला शाळा. '

‘परंतु मला गंमत वाटते. ते नवीन मास्तर आले आहेत. ते

गोष्टीही सांगतात. गाणी शिकवितात. '

'कसली असतात गाणी. '

'तिरंगी झेंड्याची, गांधीबाप्पांची. ते आम्हाला गांधीबाप्पांचं चित्र देणार आहेत. आपल्या झोपडीत लावू. हं. बाबा ! तुम्ही पाहिले आहेत का गांधीबाप्पा?'

‘मी कोठून पाहू?”

"आपल्या गावाला येतील का ते?"

‘मी काय सांगू, बाळ?’

गोप्या आज घरातच पडून होता. त्याच्या मनात कसले तरी विचार चालले होते. परंतु किती वेळ तो असा पडून राहणार? तो उठला. त्याने आज आपली झोपडी नीट झाडली. नंतर त्याने अंगण सारवले.

'बाबा, सारे स्वच्छ करता आज?'

‘अरे तुमची आई होती, ती सारे स्वच्छ ठेवी. मला वेळ होत नाही नि सारे जमत नाही.'

‘ताईसुद्धा रोज झाडायची.' दिनू म्हणाला.

‘बाबा, ताई कधी येणार?' विनूने विचारले.

‘आणू दोन महिन्यांनी.’ गोप्या म्हणाला.

असे दिवस जात होते. गोप्या अलीकडे फार कष्टी दिसे.

का बरे? तारा तिकडे बरी आहे ना? मुले तर बरी दिसतात. परंतु गोप्याचे कशात लक्ष नसे. तो राहून राहून विचारमग्र होई.

एके दिवशी दिनू शाळेतून सायंकाळी घरी आला. तो

दारात काही तरी पडलेले होते. दिनूने ते उचलले. काय होते ते? आणि तेथे एक दुसरे पुडकेही पडलेले होते. काय होते त्यात? एक तर ते पत्र होते. पाकीट होते. कोणाचे पत्र ? ताई कधी पत्र पाठवीत नसे. तिला लिहिता येत नव्हते. का ती लिहायला शिकली?

लहान विनूला घेऊन गोप्या शेतावरून घरी आला. त्याने विनूला खांद्यावरून खाली ठेवले.

‘दादा, ही बघ माझ्या कानात फुले !' विनू म्हणाला.

'छान दिसतात.' दिनू म्हणाला.

'काय रे ते हातात ?' गोप्याने विचारले.

“बाबा, हे पत्र ना हो? कोणाचे आले आपल्याला पत्र? ताईचे? कोणाचे बाबा? आपल्याला कधीसुद्धा कोणाचे पत्र येत नसें. आज हे पहिलेच पत्र. नाही का, बाबा? आणि हे पुडके पाहा. त्याच्यावर तिकीट आहे. पत्राबरोबरच हे पुडकेही आले; होय ना बाबा?'

‘किती रे बडबड ! दे ठेवून ते पत्र नि पुडके. तुम्ही निजल्यावर वाचीन. भराभर वाचायला थोडेच येणार आहे? एकेक अक्षर लावून वाचावे लागेल आणि तुझे अजून 'गमभ 'न' च चालले आहे ना?'

'नाही काही; 'सगुणा, दुधाची वाटी आण' येथपर्यंत

झाले आहे, बाबा.'

‘लौकर शहाणा हो, म्हणजे ताईला तू पत्र लिहिशील. तिला किती आनंद होईल?'

'बाबा, ताईला बोलवा ना घरी.'

‘बोलवू हो.’

रात्री दिनू, विनू झोपले आणि गोप्याने ते पाकीट फोडले. ठसठशीत अक्षरात ते पत्र होते. तो ते पत्र वाचू लागला. पुढीलप्रमाणे ते पत्र होते.

‘वंदे मातरम्’

“प्रिय गोप्यादादा यांना

दौल्याचे दंडवत.

तुम्ही मला झोपडीतून घालवून दिले होते. मी दौल्या. तुमचा मुलगा सोन्या, याचा मी मारेकरी. तो ठार मराया म्हणून मी काही तो लोखंडी तुकडा फेकून मारला नव्हता. मला त्या वेळेस किती वाईट वाटले. तुम्ही मला जा म्हणून सांगितलेत. मी गेलो. तुमच्यावर तरी ओझे कशाला असा मी मनात विचार केला. तुमचा संसार वाढत होता.

आज मी हे पत्र का बरे लिहीत आहे? तुम्हाला अतिदुःखाची अशी वार्ता कलविण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. तुमची तारा येथे शिवापुरात होती. मी या शिवापुरात राहतो. मी एक टांगेवाला आहे. माझा धंदा नीट चालला आहे. मी तुमच्याकडून गेलो. लिहावाचायला शिकलो. मला पुष्कळ काळू लागले. मी सभांना जाऊ लागलो. मला कांग्रेसचे प्रेम वाटू लागले. मी टांगेवाल्याचे युनियन स्थापले आहे. मी सेक्रेटरी आहे. मी सभांतून बोलतो. एकदा काँग्रेसच्या चळवळीत तुरुंगातही जाऊन आलो.

परंतु मी हे काय लिहीत बसलो? माझीच हकीगत सांगत सुटलो ! या गोष्टी एवढ्याचसठी लिहिल्या की, तुमच्याकडून मी गेलो त्यामुळे माझे कल्याणच झाले. मला जणू नवीन दृष्टी आली.

तुमची तारा येथे कामाला राहिली. एखादे वेळेस तारा मला भेटत असे. ती तळ्यावर धुणी धुवायला जात असे. किती तरी धुणे असे. ती दमून जाई. ती कधी भाजी विकत घेण्यासाठी बाजारात येई, तेव्हा तिची माझी भेट होई. मी तिच्याजवळ अनेक गोष्टी बोलत असे. तू लिहायला शीक म्हणून मी तिला सांगत असे. मी तिला पाटीपुस्तके दिली आणि मिळेल तो वेळ ती शिकण्यात

दवडी. मी तिला गाणी लिहून दिली. ती तिने पाठ केली. तुमची तारा मनाने, बुध्दीने वाढत होती.

परंतु धन्याला ह्या गोष्टी सहन झाल्या नाहीत. काम करता करता, केर काढता काढता, पाळण्यात मुले आंदुळताना किंवा झोपाळ्यावर त्यांना घेऊन बसताना तारा कांग्रेसची गाणी गुणगुणे. तिरंगी झेंड्याची गाणी म्हणे. त्या मिलिटरी पेन्शनर माणसाला भय वाटले. आपण राजद्रोही ठरायचे असे त्याला वाटले. तो ताराला म्हणाला, 'खबरदार अशी गाणी म्हणशील तर ! पोलिसांच्या ताब्यात देईन.' तिचे शिकणे सवरणे बंद करण्यात आले. तारा दुःखीकष्टी झाली.

बरेच दिवसांत तिची माझी गाठ पडली नाही. परंतु काल अकस्मात ऐकले की तारा तळ्यात बुडून गेली. ताराचा पाय का घसरला? का तिने जीव दिला? तिचा त्या घरात छल का होई? मारहाण का होई? तिचा कोंडमारा का होई? तिला काम तरी किती करावे लागे ! तिला दळायलाही लावीत. तिच्या हाताला आलेले फोड मी एकदा पाहिले होते. आणि तशा हातांनी पुन्हा धुणी धुवावी लागत. आणि हे सारे दुःख ती कोणाजवळ सांगणार? तुम्हाला तिने या गोष्टी कधी कळवल्या नसतील. ती तुम्हा सर्वांसाठी, लहान भावंडांसाठी स्त: चे बलिदान करीत होती. गरीब बिचारी तारा ! किती गुणाची ! संधी मिलती तर ती मोठी पुढारी झाली असती. तिला वाटे, तिरंगा झेंडा हाती घ्यावा. प्रभातफेरी काढावी. ती शिकत होती. पटकन् तिचे पाठ होई. परंतु एक कळी कुस्करली गेली. माझे डोळे पुन्हा भरुन येत आहेत.

गोप्यादादा, तुमचे डोळेही मरून येतील. तुम्हाल ! मोठा धक्का बसेल. परंतु मी सांगतो की शोक आवरा, शांत व्हा. तुम्हीच स्वत:चे डोळे पुसा. ताराच्या लहान भावंडांची तुम्ही समजूत घाला. त्यांच्यावर अधिकच प्रेम करा. तारा गेली. आता रडून काय होणार? शोक करून काय होणार? आता तुम्ही विचार करायला लागा. तुमची मंजी तुम्हाला सोडून गेली. तुमची तारा गेली. या दुःखद घटनांचा तुम्ही मनात विचार करा. मंजी का मेली? एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे ही गोष्ट निराळी. जगात कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही. परंतु मंजी इतक्या लवकर खचित मेली नसती. ती उपासमारीने मेली. तारा मला घरची स्थिती सांगत असे. मंजी मुलांना पोटभर वाढी नि स्वत: तशीच निजे, आणि उपाशी पोटी शेतात काम करायला ती जाई. त्यातच पुन्हा पुन्हा येणारी बाळंतपणे, वेळेवर औषध नाही. मंजीला काही दिलेत का औषध ? रानातून पाला आणलात नि रस पाजलात. त्या सावकाराने आपल्या बायकोला असाच रस पाजला असता का? जगात नाना प्रकारचे शोध लागत आहेत. नाना उपचार असतात. आरोग्यधामे असतात. परंतु गरिबाला ती कशी मिळणार?

वास्तविक जगात सारी संपत्ती आपण निर्माण करतो. शेतकरी धान्य पिकवितो; शेंगा, कापूस सारे तो पिकवितो; ऊस तो पिकवितो; मळे तो करतो; परंतु त्याची स्थिती कशी आहे? शेतकरी जगाचा पोशिंदा. परंतु जगाला पोसणारा घरी उपाशी असतो ! हा अन्याय आहे. आधी तुम्हाला पोटभर मिळाले पाहिजे. उरले तर सरकार नि सावकार, जमीनदार नि इनामदार यांना. श्रमणाऱ्यांचा पहिला हक्क. शेतकऱ्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. जगाला आपण आधार देतो. परंतु आपण निराधार असतो. आणि बाकी सारी प्रतिष्ठित बांडगुळे - त्यांना बंगले आहेत; त्यांना औषधे आहेत. खाण्याची चंगळ आहे; हवेशीर ठिकाणी राहायला जागा आहेत. आपण ही स्थिती बदलायला पाहिजे.

मंजी, गरीब बिचारी मंजी ! मला तिच्या किती आठवणी येतात. मला जगात कोणी नव्हते. मंजीचे आईबाप मेले; परंतु मंजी मोलमजुरी करून मला पोशी. तिचे माझ्यावर किती उपकार ! मी तिच्या सोन्याचे प्राण घेतले तरी ती मला रागाने बोलली नाही. कारण माझ्या मनात दुष्टता नव्हती हे तिला माहित होते. मंजीच्या आठवणी मी किती सोंगू? तुमचेही तिच्यावर किती प्रेम? अशा मंजीला उपासमारीने मरण यावे, औषधपाणी न मिळाळ्यामुळे मरण यावे ! हरहर ! परंतु आपल्या देशात कोट्यावधी श्रमणाऱ्यांच्या घरांतून हीच दशा आहे.

आणि तारा?तिचे मरण अधिकच दुःखकारक आहे. मंजीने थोडा अधिक संसार केला. तारा तर अल्लड बाला ! तिचे खेळण्याचे हे वय ! दोऱ्यांवरून उड्या मारण्याचे वय ! मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे, वनभोजनास जायचे हे वय ! शाळेत शिकायचे हे वय ! परंतु अशा वयात तिला रानात गवत कापायला जावे लागे, उन्हात करपावे लागे. अशा बालवयात घर सोडून, भावंडे सोडून परक्याकडे काम करण्यासाठी तिला राहावे लागले; आणि तिथे किती कष्ट, किती अपमान, किती यमयातना ताराच्या या मरणाने आपले डोळे उघडले पाहिजे. तिचे मरण जळजळीत निखाऱ्याने आपल्या जीवनात लिहिले पाहिजे. हिंदुस्थानभर हा अन्याय चालला आहे. जगाला पोसणारा उपाशी मरत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.

कशी बदलायची ही परिस्थिती? तुम्ही काँग्रेसचे नाव ऐकले असेल. महात्मा गांधींचे नाव ऐकले असेल. पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव ऐकले असेल. काँग्रेस आपल्या देशात स्वराज्य आणण्यासाठी धडपडत आहे आणि ती गोरगरिबांचे स्वराज्य आणणार आहे.

महात्माजी तर म्हणतात की, सारी जमीन गोपाळाची आहे. गोपाल म्हणजे भगवान. गोपाल म्हणजे शेतकरी. ही सारी जमीन शेतकऱ्याला वाटून दिली पाहिजे. जो कसतो त्याची जमीन. लोडाजवळ बसणारे ऐदी शेणगोळे, त्यांचा काय म्हणून अधिकार? महात्माजींचे एक थोर अनुयायी आहेत. ते एकदा म्हणाले होते की, स्वराज्यात सारी जमीन वाटून देऊ. फार तर पंचवीस एकर जमीन एका कुटुंबाजवळ असावी. बाकीची काढून घेतली पाहिजे.

आज ना उद्या काँग्रेस परकीय सत्ता दूर करील नि खरे स्वराज्य आणील. आधी परकी सत्ता दूर करायला हवी. ही परकी सत्ता दूर करायला आपल्या देशात एकच संस्था धडपडत असते. ती संस्था म्हणजे काँग्रेस या काँग्रेस संस्थेत आपण सर्वानी शिरले पाहिजे. ठायी ठायी काँग्रेसच्या झेड्याखालचे शेतकरी-संघ, कामगार- संघ उभे केले पाहिजेत. आपले लढे काँग्रेसच्या मध्यस्थीने सोडवून घेतले पाहिजेत आणि काँग्रेसची प्रचंड चळवळ आली तर तीत सामील झाले पाहिजे.

गोप्यादादा, कदाचित् काँग्रेसची फार मोठी चळवळ येईलही. आपण शेतकऱ्यांनी संघटित होऊन राहिले पाहिजे. अधिक काय लिहू?

मी या पत्राबरोबरच एक पुडके धाडीत आहे. त्यात हस्तपत्रके आहेत. कांग्रेस शेतकरी संघाच्या जाहिराती आहेत. तुम्ही वाचून दाखवा. प्रसार करा. आपण आता उठले पाहिजे. शेतकऱ्यांत चळवळ करा. मला शेतकऱ्यांतच उभे राहिले पाहिजे.

तुमचे दुःख मी जाणू शकतो. ताराच्या मृत्यूची वार्ता ऐकून तुम्ही विव्हल व्हाल. परंतु दुःख आवरा. ताराचे दोन लहान भाऊ आहेत. त्यांना तुमच्याशिवाय कोणाचा आधार ? खरे ना? मी तुमच्या सांत्वनासाठी येणार होतो. परंतु सोन्याच्या मरणाच्या वेळचा तो प्रसंग आठवतो नि मी यायला शरमतो. तुम्ही मला त्या अपराधाची क्षमा करा.

तुम्ही नि मी उद्या स्वातंत्र्याचा लढा आला तर त्यात सामील होऊ. कोट्यवधी लोकांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली आपण उभे राहू. त्या लढ्यात मरण आले तरी सुखाने मरू. वंदे मातरम् - तुमचा दौल्या.

गोप्याने तै पत्र वाचले. किती तरी वेळ त्याला ते पत्र वाचायला लागला. काही काही ठिकाणचा त्याला अर्थही नीट पटकन् समजेना. परंतु शेवटपर्यंत त्याने ते पत्र वाचले तो विचार करीत बसला. परंतु शेवटी त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याने हंबरडा फोडला. 'तारा, तारा, कोठे आहेस तू बाळ? तारा, तारा.'

गोप्याला भान राहिले नाही. तो ओक्साबोक्सी रडू लागला. दिनू जागा झाला. विनू जागा झाला. ती मुले रडू लागली.

'बाबा, का रडता बाबा?' दिनूने विचारले.

'तारा गेली. तळ्यात बुडून मेली. तुमची ताई गेली, बाळांनो तुमची आई गेली, तुमची ताई गेली. अरेर ! कशाला मी तिला दूर पाठविले? दुष्ट आहे मी. पापी आहे मी. लहान गुणी पोर. तिला परक्यांकडे मरमर मरतो काम करायला मी पाठविले. मंजी काय म्हणेळ वरती? अरेरे ! गेली रे तुमची ताई. आणणार होतो दोन महिन्यांनी घरी. आता कोठून आणू? गेली. अभागी पित्याला सोडून गेली. माझी आई दुर्दैवी होती म्हणतात. मीही का दुर्दैवी आहे? अरेरे ! तारा, बाळ, कोठे आहेस तू? गेलीस सोडून. लाडक्यांनो, सोनुकल्यांनो, या जवळ. तुम्हाला तरी घट्ट धरून ठेवू दे. काय करू? देवा ! हे दारिद्य ! या दारिद्रद्यामुळे हे सारे दुःख. काय आम्हा गरिबांची ही दशा !'

'बाबा, नका रडू. ताई येईल. '

'नाही रे येणार, बाळांनो ! ती गेली. कायमची गेली. '

'परंतु, मेईन म्हणून सांगून गेली ताई. ती येईल. भोवरा घेऊन येईल. गांधीटोपी घेऊन येईल. हे खोटे पत्र. ताई येईल. बाबा रडू नका, आमच्याजवळ निजा तुम्ही.'

ती लहान मुले बापाला धीर देत होती. दिनू नि विनू बापाचे अश्रू पुशीत होते. करुण, करुण असे दृश्य ते होते. दोन्ही मुलांना जवन घेऊन गोप्या अंथरुणात पडला. त्याच्या एका

बाजूस विनू होता, एका बाजूस दिनू.

'बाबा, माइयाकडे तोंड करा.' विनू म्हणाला.

‘माझ्याकडे करा.’ दिनू म्हणाला.

'दिनू, तू मोठा आहेस. लहानाची समजूत आधी

घालायला हबी. खरे ना?'

‘ताई आम्हा लहान भावांची समजूत घालायची. ताई

येईल. खाऊ घेऊन येईल. बाबा, खरेच येईल ताई. '

'तुमचे शब्द खरे ठरोत. देवाकडे गेलेले माणूस परत

नाही येत बाळांनो.’

‘आईला आणायला ताई गेली असेल. दोघे एकदम येतील. आई नि ताई. गंमत.' मुले म्हणाली.

7
Articles
गोप्या
0.0
येरवडा तुरूंगात Meak Heritage या नावाची एक सुंदर कादंबरी मी वाचली. फिनलंडमधील एका विख्यात लेखकाची ती कृती. त्या गोष्टीतील शेवटचा भाग आपल्याकडील १९४२ च्या ९ ऑगस्टनंतरच्या भागासारखाच आहे, या कादंबरीतील गोष्ट मी तुरूंगात व बाहेर अनेक ठिकाणी सांगितली. अनेक छात्रालयांतून सांगितली. सर्वांना ती आवडे. ती गोष्ट मी जशी सांगत असे, तशीच लिहून काढून आज प्रसिध्दीसाठी देत आहे. मूळची कादंबरी माझ्याबरोबर नाही. फक्त सूत्र आहे. मूळच्या सूत्राचा आधार घेऊन माझ्या भाषेत मी मांडून देत आहे. आवडत्या गोष्टी तील हा दुसरा भाग सर्वांना आवडो. – साने गुरुजी
1

गोप्याचा जन्म

1 June 2023
1
0
0

गोप्याचा जन्मत्या गावचे नाव गोपाळपूर गाव सुंदर होता. गावाला नदी होती. नदीचे नाव गुणगुणी. उन्हाळयातही नदीची गोड गुणगुण सुरू असे. नदीच्या काठाने किती तरी मळे होते. गावची जमीन सुपीक होती. काळीभोर जमीन. प

2

मामाच्या घरी

1 June 2023
0
0
0

गोपाळचा बाप मरण पावला. सावित्री मुलाकडे पाहून दिवस कंठीत होती. पुन्हा ती एकटी झाली. आपण दुर्दैवी आहोत, असे पुन्हा तिच्या मनात सारखे येऊ लागले. हा बाळ आपल्याजवळ राहिला तर त्याचेही बरेवाईट व्हायचे, असे

3

गोप्याचा संसार सुरू झाला

1 June 2023
1
0
0

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या

4

मंजी देवाघरी गेली

1 June 2023
1
0
0

झोपडीतील सुखाचा संसार सुरू झाला. मंजीला मोलमजुरीची सवय होतीच. तीही भरपूर काम करी. गोप्या तिचे कौतुक करी. ते पहिले प्रेमाचे दिवस होते. एक-दोन वर्षे गेली. मंजीला पहिला मुलगा झाला. गोप्याने तेथे अंगणात ल

5

संसारातील आणखी दुःखे

1 June 2023
1
0
0

गोप्याला अती दुःख झाले. आज बारा वर्षे मंजी त्याची संसारातील सोबतीण होती. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. संसाराच्या रखरखीत परिस्थितीत हे प्रेम पुष्कळ वेळा दिसून येत नसे. परंतु नदीच्या पात्रात पाणी

6

गोप्या प्रचारक होतो

1 June 2023
0
0
0

चार दिवस गोप्याला काही सुचले नाही. तो घरातून बाहेरही पडला नाही. परंतु चार दिवस घरात राहून तो विचार करीत होता. ते पुडके त्याने फोडले होते. त्यातील हस्तपत्रके त्याने पाहिली. त्याने त्यातील मजकूर वाचून प

7

बलिदान

2 June 2023
0
0
0

देशातील व जगातील परिस्थिती झपाताड्याने बदलत होती. जगात महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड त्या युद्धात पडले आणि हिंदुस्थानालाही त्या आगीत ओढण्यात आले. एका अक्षरानेही देशातील जनतेला किंवा जनतेच्याप्रतिनिधींना

---

एक पुस्तक वाचा