shabd-logo

प्रकरण ३

22 June 2023

7 पाहिले 7
वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्याग करणे, कष्ट सोसणे. तुम्ही जाडीभरडी खादी वापरण्यासही तयार नाही. जरा महाग पडली तर पडली. चिवडा घेऊ नका, नाटकाला जाऊ नका, सिनेमाला जाऊ नका. पुण्याच्या तीनचार कॉलेजमध्ये मिळून तीन हजार विद्यार्थी धरले तर दररोज आणा दोन आण यांचे चिवडा चहात जात असतील. म्हणजे रोज १०० रुपये एका पुण्यातील फक्त कॉलेजातील विद्यार्थी चहा, चिरुट, सिगारेट, चिवडा, भजी यांत जात असतील. म्हणजे महिना ३००० रुपये ! वर्षाला ३६००० रुपये एका पुणे शहरातील फक्त कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे अनाठायी जात आहेत ! नाही त्याने शरीराला पुष्टी, ना आरोग्य, ना समाधान! उलट तामसी व उत्तेजक पदार्थ खाऊन व्यसनोन्मुख होतात ! ३६००० रुपयांची खादी घालतील तर किती गरिबांचे पोट भरेल ! वर्षाला २५ रूपयात गरीब पोट भरतो. ३६००० रुपयात १५०० लोकांचे पोट भरेल. १५०० लोकांनी विणलेली खादी घ्या. फुकट नका देऊ त्यांना ३६००० रूपये ! अरे विचार करा, तुम्हाला हृदयच नाही. तो एक स्वयंसेवक गाणे गात येतो ना - “हृदय जणू तुम्हा ते नसे | हृदय जणू तुम्हा ते नसे |”

बाबूला तो गाण्याचा चरण आठवला. त्या दिवशीचे ते घरचे नाच, तमाशे आठवले. बाबुला लाज वाटली.

आज मामलेदारांचा मुलगा नवीन धोतर नेसून आला होता. खास विलायतचा धोतरजोडा होता. त्रिंबकरावांच्या ते लक्षात आले व त्यांनी म्हटले “ललित, मी वर्गात इतके सांगतो तरी विलायती धोतर नेसून आलास ना? अरे शिकता तरी काय? मनावर जर काही संस्कार होत नसेल, माणुसकी, उदारता, आजूबाजूच्या देशस्थितीचा विचार काहीच हृदयात येत नसेल तर शिकता तरी काय? असे फुलपाखरी तरुण तुम्ही किती दिवस राहणार?

“मी विलायतीच नेसेन. बाबांची नाहीतर नोकरी जाईल - बाबा मला म्हणतात खादीबिदीच्या बंडात तू नको पडू-" ललित म्हणाला.

मुलं हसू लागली. “हसू नका. तुम्ही त्याच प्रकारचे, ललितला वडिलांची आडकाठी नसती तर त्याने खादी घातली असती असे वाटते, परंतु तुम्हाला तितकी वडिलांचीही आडकाठी नसेल तर तुम्ही काय करता ? हिंदुस्थान दुर्दैवीच देश आहे. परमेश्वराला हिंदुस्थानाला धडे शिकवावयाचे आहेत. अजून तुम्ही शिकत नाही. जोपर्यंत धडे शिकणार नाही, तोपर्यंत गुलाम राहा- गुलाम. ललित, अरे वडिलांजवळ झगडावे जरा. पुष्कळ सरकारी नोकर आता खादी वापरतात. बारीक खादी तर समजतही नाही. ही खादी आहे की काय आहे. असे भिऊन कसे चालेल? सध्या भिऊन चालणार नाही." त्रिंबकराव सांगत होते.

शाळेच्या चालकांना आज मामलेदारांकडून बोलावणे आले होते. शाळेच्या चालकांचे नाव गणपतराव असे होते. गणपतराव मोठ्या शिताफीने वादळी हवेतून शाळेची नाव हाकवून नेत होते. आपल्या शाळेत राष्ट्रीय भावना खेळवल्या जाव्या असे त्यांना वाटेत असे. राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षक म्हणून मुद्दाम ते शाळेत घेत. त्यांना उतेजन देत. शाळेतील सारे शिक्षक खादी वापरीत परंतु आजं गणपतरावांना का बरे बोलावणे आले होते?

मामलेदार साहेब घरी गादीवर बसले होते. शिपायाने आत जाऊन

सांगितले की, शाळेचे प्रमुख गणपतराव आले आहेत. “या, आत या गणपतराव मामलेदारसाहेबांनी खुर्ची दिली. आपण एका खुर्चीवर बसले. " शाळा चांगली चालली आहे ना? मॅट्रिकचा निकाल यंदा चांगलाच लागला. शेकडा सत्याहत्तर पास झाले होय ना " मामलेदारसाहेबांनी - सूतोवाच केले.

“हो. सारे शिक्षक मेहनती आहेत. रात्री दिवसा दीडशे मुलांचा वर्ग घेतात. खटपट करतात. त्याचा हा परिणाम आहे. शाळेत चांगले शिक्षक असले तर शाळा नाहीतर दगड व बाके - " गणपतराव, म्हणाले.

“हली मुलांची संख्या किती आहे - शाळेत” मामलेदारांनी विचारले. “मुलांची संख्या सातशे आहे. मुलांकडून तुट नाही. शाळेची इमारत पुरी पडत नाही म्हणून मुलांना नाही म्हणावे लागते. सरकार तर ग्रँटही वाढवीत नाही. मुलांना नाही म्हणताना मोठे वाईट वाटते. छात्रालयात तर एकेका खोलीत पाच पाच मुले ठेवली आहेत. आईबाप मुले ठेवूनच जातात. म्हणतात तुमच्या व्हरांड्यात ठेवा, अंगणात ठेवा मुले, तरी चालेल. एकीकडे हृदय भरून येते, की लावलेल्या झाडाला जशी पालवी फुटावी तरी एकीकडे वाटते - शेवटी पैशाची जरूर पडतेच." गणपतराव म्हणाले.

“तुमच्या काही चुकांमुळे ग्रँट मिळत नाही. सरकारचे बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असते." मामलेदार साहेब म्हणाले. “तसे काही चुकत असेल तर सांगा. आम्ही सुधारू” गणपतराव नम्रतेने म्हणाले.

“हे पाहा काही शिक्षक आपल्या उत्साहाच्या भरात मर्यादेचे अतिक्रमण करतात व भलतीकडेच वाहतात. वर्गात ठरलेले पुस्तक शिकवण्याऐवजी ते नकोत त्याही गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवतात - आमचा ललित काल सांगत होता - कोणी त्रिंबकराव म्हणून एक तरुण शिक्षक आहेत का? मामलेदारांनी प्रश्न विचारला.

"हो आहेत. मोठे उत्साही. ध्येयप्रवण आहेत. त्यांची तळमळ व कळकळ अलोट. मुलात रंगून जाणारे. त्यांच्याबरोबर खेळतील. नाचतील. मुलात मुलांसारखे वर्गात थोर गुरूसारखे. ती म्हणजे मोठीच जोड आम्हाला मिळाली आहे" गणपतराव म्हणाले.

“तसे ते असतील चांगले. परंतु अति तेथे माती. काल आमच्या ललितच्या धोतरावरही त्यांनी टीका केली. म्हणे विलायती का घेतले? खादी का घेत नाहीस? वडिलांजवळ भांड! गुरुजी आईबापांबरोबर भांडावयास का शिकवायचे?” मामलेदारांनी खोचून विचारले.

“कधीकधी तेही शिकवावे लागते. भरत कैकयीजवळ भांडला हे आख्यान शिकवताना सत्यासाठी आईजवळही भांडा, असे नको शिकवायला? प्रल्हादवरचे वामनपंडितांचे सुंदर आख्यान येरवी कसे शिकवता येईल. जे गुरू सत्याची बाजू घ्यावयास सांगणार नाही, ते गुरूच नाहीत. “हे तो गुरू पापतरू म्हणावे.” असे त्या कवितेत आहे. गुरूंनी का पापतरू व्हावयाचे? असे आईबापाजवळ प्रेमाने झगडा ह्याचा अर्थ आईबापांना सोडून जा असा नाही. त्रिंबकरावांनी सदिच्छेने सांगितले असेल तसा आपण गैरसमज करून घेऊ नये. त्रिंबकराव असे व्यक्तिविषयक कधी सांगणार नाहीत मोघम सांगितले असेल” गणपतराव त्यांची बाजू घेऊन म्हणाले.

“अहो मोघम नाही अगदी स्पष्ट ललितला बोलून दाखवले. मुले त्याला हसली. त्याला हसली म्हणजे मलाच हसली. माझाच तो पाणउतारा झाला. असे शिक्षक नसलेले बरे. नाकापेक्षा तो जड काय कामाचे? ज्याने त्याने आपली मर्यादा ओळखून नको का राहावयाला? तुम्हाला ग्रँट तर पाहिजे - सरकारची मदत पाहिजे व सरकारच्या विरुध्द उघड उघड शिकवणारे शिक्षकही पाहिजेत? हे कसे, प्रामाणिकपणा काही नको का? सरकारच्या विरुध्द शिकवावयाचे असेल तर सरकारची पै घेऊ नका " मामलेदार म्हणाले.

“सरकारचे पैसे म्हणजे प्रजेचे, शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यांनी दिलेल्या पैशातील पैसे आम्ही ग्रँट म्हणून घेतो व त्यातून शेतकऱ्यांनी विणलेली खादी घ्या असे सांगतो? यात अप्रामाणिकपणा कोठे आहे? शेतकऱ्यांचाच पैसा आम्ही घेतो व शेतकऱ्यांची सेवा करा असे शिकवितो. सरकारचा पैसा म्हणजे का कलेक्टराच्या घरातील पैसा - इंग्लंडमधील मँचेस्टरांच्या गिरणीवाल्यांचा पैसा. चर्चिल साहेबाचा पैसा. माफ करा. मला तरी समजत नाही काय करावयाचे ते." गणपतराव म्हणाले.

“तुम्हाला सारे समजते. तुम्ही हे शिक्षक काढून टाका. त्रिंबकरावांसारखे धोकेबाज शिक्षक काढून टाका - " मामलेदार म्हणाले.

“धोकेबाज म्हणजे काय? का बाँब करायला शिकविले, पिस्तुले झाडण्याला शिकविले? येऊन जाऊन खादी वापरा असे सांगितले. हिंदुस्थानचा १९२९ / ३० चा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. त्यात सरकारने आपण होऊन सांगितले आहे की, सरकार खादीला उत्तेजन देत आहे व सरकारने दिले पाहिजे' सरकार उत्तेजन प्रत्यक्ष देवी, न देवो परंतु लाजेस्तव जगासाठी म्हणून का होईना ते वाक्य लिहावे लागले. म्हणजे खादी सरकारमान्य आहे. तुम्ही एवढे भिता का ? रावसाहेब त्रिंबकराव फार थोर आहेत हो - राहू द्या. त्यांना मी दोन शब्द सांगेन." गणपतराव जरा सूर खाली आणून म्हणाले. त्यांना तुम्ही काढूनच टाकले पाहिजे - “ रावसाहेब म्हणाले..

'माझ्याने होणार नाही. मला काही हृदय आहे की नाही?' गणपतराव म्हणाले.

'तुम्ही संस्थेचे आहात. संस्थेचे हित ते तुमचे हित. त्यावेळेस तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही. स्वतंत्र इच्छा, मन हृदय नाही' - रावसाहेब म्हणाले. 'बरे मी विचार करतो' गणपतराव म्हणाले.

"चहा घेता का, ललित !' रावसाहेबांनी ललिताला हाक मारली.

'काय बाबा?' ललित येऊन लाडाने विचारता झाला.

"अरे तुझे मास्तर आले आहेत. त्यांना चहा आणशील की नाही' ललितला वडील म्हणाले.

“मी चहा घेत नाही. आता जेवायची वेळ झाली आहे. दूध वगैरे सुद्धा नको' - गणपतराव म्हणाले.

‘बरे ही सुपारी व वेलची तरी घ्या' असे म्हणून सुपारी लवंग वेलदोडा रावसाहेबांनी दिला.

'गणपतराव जावयास उठले बरे असा - नमस्कार - काही कमीजास्त बोललो असेन तर माफ करा' ते म्हणाले.

'अहो, तसे एखादवेळेस मनुष्य बोलतोच ते का लक्षात धरावयाचे असते ?' - मामलेदार म्हणाले.

गणपतराव घरी आले. त्यांना अत्यंत वाईट वाटले. काय करावे त्यांना समजेना. संस्थेचे खरे हित कशात? नावाची दगडी पाषाणी संस्था ठेवण्यात अर्थ काय? - काय करावे? त्रिंबकरावांना त्यांच्याने काढून टाकवले नाही.
7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा