shabd-logo

प्रकरण ४

22 June 2023

11 पाहिले 11
दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्यामुळे त्यांचे भावांजवळ पटत नसे. भावांचा विलासी स्वभाव पाहून त्यांना राग येई. सेवाविन्मुखता पाहून त्यांना चीड येई. इंगजसरकार परके म्हणून छळते पण तुम्ही स्वजन असूनही छळता तुम्ही घोर पापी आहात असे ते आपल्या 1 बांधवास म्हणत.

मग त्रिंबकराव सुट्टीत कोठे गेले? ते त्यांच्या तालुक्यात खादीसेवा संघ होता त्यात गेले. विलासपूर तालुक्यात काही तरुणांनी एक खादीसेवा संघ काढला होता. पाच तरुण होते. पाचही अविवाहित होते. त्यांचा उत्साह अदम्य होता. त्यांचा क्षणन् क्षण दरिद्रीनारायणाच्या पूजेत जात होता.

विलासपूर तालुक्यात कापूस पुष्कळ होतो. पूर्वीखेड्यापाड्यांतून लोक सूतकातीत असत. बायका पण शेतकामाला जात नसत, मजुरी करीत नसत - जी वृद्ध असत ते घरी वेळ मिळताच सूत कातीत व विणकर ते सूत विकत घेई. बाजारच्या दिवशी आपापल्या घरचे सूत घरचे घेऊन बायका विकत व घर-संसारात भर घालीत.

परंतु आज दहावीस वर्षे हे सारे पारडे बदलले. विलासपूरला दोन गिरण्या सुरू झाल्या. सकाळ झाली नाही तोच त्या गिरण्यांच्या तोंडातून काळाकुट्ट धूर विलासपूर तालुक्यावर पसरे सुख व आनंद मारावयास हा धूर आला. काळेकुट्ट दैन्य व विपत्ती घेऊन आला. सकाळच्या वेळी हा भोंगा होई तर जणू ते मृत्यूला बोलावणे असे खेड्यातील लोकांस मरावयासाठी बोलावणे असे ! सूर्य जीवन देण्यासाठी वर येई व मिल मजुरांना मारण्यासाठी सुरू होई. या गिरण्यांनी खेड्यापाड्यांत दैन्य आणले, दुर्भिक्ष आणले. विणकरांच्या पेठाच्या पेठा बसल्या. विणकर मिलमध्ये मजूर झाले ! पिंजारी परागंदा झाले ! लोढारी दारिद्रयात लोळू लागले ! हाय हाय सुरू झाली.

लोकांना रिकामपणी काय करावे हे समजेना. पावसात कामे संपली म्हणजे काय करावे हे कळेना. फार पाऊस असला व शेतात काम करता येते शक्य नसले म्हणजे पूर्वी घरात बायामाणसे, तारीवर चरख्यावर सुत कातीत आनंदात दिवस जाई. आता दिवस कसा दवडायचा? उन्हाळ्यात पहाटे उठून आठ वाजेपर्यंत नांगरणी करून शेतकरी घरी आले म्हणजे मग घरी काम काय? बाहेर अत्यंत प्रखर ऊन काम फार होत नसे. घरी उद्योग नाही, पूर्वी सूत कातीत. मजुरांची फारच दुर्दशा झाली. उन्हाळ्यात भर उन्हात ते दिवसभर काम करीत व एक आणाही मजुरी त्यांना भेटत नसे.

खेड्यापाड्यांतून विपत्ती आली. दोन्ही मिलमधून तीन हजार मजुरांना काम मिळाले. परंतु खेड्यापाड्यांत पसरलेल्या लाखो लोकांचा धंदा गेला. त्या लाखो घरी पसरलेला पैसा त्या लाखो घरी वाटली जाणारी संपत्ती गट्टलाल शेट व रतनशेट यांच्या घरी जाऊ लागली. त्यांच्या मोटारी उडू लागल्या, बंगले सजू लागले, जलसे होऊ लागले. उन्हाळ्यात महाबळेश्वर, नीलगिरीवर हजारो रुपये खचून ते विलास करू लागले - हवा खाऊ लागले ! ते हवा खात होते का गरिबांचे प्राण खात होते? ते सरबत पीत होते की गरिबांचे रक्त पीत होते?

परंतु देवाला दया आली, खादीचा धंदा पुन्हा वर येणार असे दिसू लागले. खादीचा पवित्र धर्म बुडणार, पवित्र चरखा नाहीसा होणार ऋषीमुनींनी हातात घेतलेला चरखा, तिरुवल्लिमर, कबीर यांच्यासारख्या संतांनी पवित्र केलेला चरखा बुडणार व मिलचे भो करणारे, भगभग करणारे राक्षस, काळाकुट्ट दैन्याचा धूर पसरणारे राक्षस, हजारो लाखो बायाबापड्यांना हायहाय करावयास लावणारे हे मिलचे राक्षस व त्यांचे आसुरी पूजक हे वैभवावर चढणार हे पाहाताच या देवांच्या प्रियभूमीत अवतार उत्पन्न झाला. आपणासाठी भगवान् उत्पन्न झाला. पृथ्वी बुडू पाहणा-या पृथ्वीला वराहरूपाने परमेश्वराने सावरली. बुडू पाहणा-या खादीला, गुप्त होऊ पाहणा- या चरख्याला वर काढण्यासाठी प्रभू आला. मिलची भगभग व भो नाहीशी करून, चरख्याचे ॐ ॐ संगीत निर्माण करण्यासाठी, गरिबांच्या घरात खेड्यापाड्यांत आनंद निर्माण करून तेथे ऐक्याची व शांतीची मुरली वाजवण्यासाठी, आलेले विषारी कालिये- हाकलून लावण्यासाठी यमुनेतून दूर समुद्रात हाकलून लावण्यासाठी आला परमेश्वर आला. अधर्माचा अंधार दूर करण्यासाठी, स्वधर्माचा प्रकाश आणण्यासाठी प्रभू आला.

ज्या नगरीने पूर्वी प्रधान युगात भक्तशिरोमणी सुदामदेवाला जन्म दिला होता व दिव्य भक्ती जगाला शिकवली, ज्या नगरीने मध्यकाळात थोर भक्तनरसी मेहत्याला जन्म देऊन पुन्हा भक्तीचा ध्वज सर्वत्र गाजवला, त्याच नगरीने पुन्हा धर्मप्रकाश देण्यासाठी परमेश्वराला आपल्या घरी आणले. धन्य ती नगरी - त्या नगरीत तो प्राचीन सुदामा शोभला, तेथेच नरसी मेहता शोभला व तेथेच मोहनदास अवतरले. तिघांचे देह दिसावयाला बारके, हाडकुंळे ! सुदामदेव म्हटले म्हणजे हाडन्हाड ज्यांची दिसत आहेत, परंतु डोळे भक्तीचे प्रेमाचे प्रदीप्त आहेत - हृदय अपार विश्वप्रेमाने अपरंपार झाले आहे अशी मूर्ती डोळ्यांसमोर येते. नरसी मेहता तसेच तसेच हे मोहनदास. शरीर हाडांचा सापळा - दरिद्री दुष्काळात सापडलेल्या दरिद्री नारायणाचीच प्रतिमा परंतु जीवनात केवढी प्रतिभा, हृदयात किती प्रेम, किती बंधुभाव, केवढी सेवावृती! सुदाम सुदामदेव झाला. मोहनदास बापूजी झाले महात्मा झाला. गोरगरिबांच्या घरात संगीत सुरू करावयास तो आला. त्याच्या तपश्चयेंस तळमळीस यश आले. ज्या तळमळीसाठी, ज्या ध्येयपूर्तीसाठी त्यांचा जन्म झाला, त्या ध्येयसिद्धीसाठी हजारो बारीकसारीक जीव निर्माण झाले होते. राम ज्या कार्यासाठी जन्म घेतो, त्यासाठी वानरही जन्मलेले असतात ! शिवाजी जन्मतो व मावळेही तयार असतात! महात्मा अवतरतो व स्वयंसेवकही जन्म घेत असतात !

अनेक ठिकाणी खादीची चळवळ चालू झाली. चरखे फिरू लागले. टकळ्या जाता येता सुरु झाल्या. हातकामे चालू झाले. पिंजारी पिंजू लागले. सोभाग्य येऊ लागले - सुख संगीत निर्माण होऊ लागले.

"आई, ही कशाला माळ्यावर अडगळ, जाळून टाक ना हा गाड़ा. " मुलगा आईला म्हणाला.

“अरे तो चरखा राहू दे. तुझी आजी याच्यावर सूत कातीत असे. मी सुद्धा कातीत असे. एक मोडला. एक तरी असू दे घरात. पूर्वीची खूण असू दे. तुला जवळ घेऊन मी चरख्यावर सूत कातीत असे. तू लहान होतास. चरख्याचे घू- घू ऐकून तू गप्प बसत असस व पाहात असस. आता कोणी सूत घेत नाही. पण म्हणून टाकायचा का? गाय जुनी दूध देत नाहीशी झाली तरी टाकू नये. निरुद्योगी म्हातरी माणसे टाकू नये. चरखा आज नसेल उपयोगी तरी राहू दे घरात. इतर का थोडी अडगळ आहे!" आई म्हणाली. “आई त्या नांदेड गावात सूत विकत घ्यायला गांधीचे लोक जातत."

आपणाकडे का येत नाहीत? मी सुद्धा मग कातीन. वेळ जात नाही." मुलगा म्हणाला.

"देवाला दया येईल तर आपणाकडेही ते येतील. मी कातायला." आई म्हणाली. तुला शिकवीन सूत "पण मला येईल का?” मुलाने विचारले.

“हो, येईल तर? अरे लहान लहान आम्ही मुले होतो तेव्हा भराभर कातीत असू. तुला शिकायचे आहे?" आईने विचारले, “त्या घाणेरड्या चरख्यावर?” मुलाने विचारले.

“अरे तो घाणेरडा नाही. त्याला पुसला तर चांगला होईल." आई म्हणाली.

"पण उगीच कशाला काढा. कोणी घेतले तर?” मुलगा म्हणाला.

"पण उद्या आपल्या गावात आले म्हणजे मग का शिकायला लागणार? जवळ आले आहेत तर आपल्या गावालाही येतीलच. तू शिकून ठेव." आई म्हणाली.

जीवन आईजवळ सूत कातायचे शिकू लागला. आई त्याला शिकवू लागली. प्रथम तो सुताकडे लक्ष देई. तर फिरवणे थांबे, दांडा फिरला तर सारा

कापूस सळईवर गुंफला जाई. "मला नाही येणार जा." जीवन म्हणाला.

" अरे येईल, इतक्यात रे काय कंटाळलास?" आई म्हणाली.

मायलेकरे अशा प्रकारे उद्योग करीत होती.

एक दिवस पहाटे जीवनची आई दळीत होती. ती रस्त्यात तिला सुंदर गाणे ऐकू आले. आला देवाचा दूत आला. आपल्या गांधीचा माणूस आला. ती जीवनला उठवू लागली. “जीवन अरे गांधीचा आला रे माणूस एक. "

स्वयंसेवक हिरालाल पुढील गाणे म्हणत होता. पहाटेच्या शांत वेळी ते

फारच सुंदर वाटत होते.

'झोप अता ही पुरे झाली | झोप अता ही पुरे झाली |

झापड कैशी डोळ्यावरती | घोर अशी ही अहा झाली || झोप.|| परावलंबी आळशी दुबळा | त्या जगी ना कोणी वाली || झोप.|| दारिद्रयाने दुष्काळाने | निशिदिन पडला तुम्ही हाली || झोप.|| निर्व्यसनी जो उद्योगी जो | प्रभूवर त्याला सदा पाळी || झोप.|| कलहा मिटवा चरके फिरवा | नष्ट कराव्या बु-या चाली || झोप.|| खायाला ना ल्यायाला ना | गालि कुणाच्या नसे लाली || झोप.|| धनिक लोक ते रस चुंबुनिया | देति तुम्हाला पहा साली || झोप.|| चरका पूजा सतत भक्तिने । माल लक्षुमि तरी घाला || झोप.||

हिरालाल आज जीवनच्या गावाला आला होता. तो गावातील मंदिरात उतरला. त्याच्याभोवती मुले जमली. कोणी वडीलमंडळीही जमली. हिरालालने येथे सूत कातता येते का विचारले. चरके आहेत का? मी दुरुस्त करून देतो. पेळू आहेत का? तो मुलांच्या घरोघर गेला. मी सूत विकत घेईन तो म्हणाला. बायकांना आनंद झाला. कोणा कोणाच्या घरी कापूस होता. हिरालाल पिंजण शिकवू लागला. जीवन पटकन पिंजण शिकला व त्याने इतर मुलांनाही शिकवले. जीवनच्या गावातील बायका सूत कातू लागल्या. पहाटे, गावात चरके सुरू असतात. कोठे जात्यावरची गाणी, तर कोठे चरख्यावरची गाणी ऐकायला येऊ लागले. बायाबापड्यांना दोन दिडक्या भेटू लागल्या. पूर्वी वेळ जाता जात नसे. एकमेका घरची उणी काढण्यात व लावालावी करण्याने वेळ जाई. परंतु आता २६ तास असते दिवसाचे तर बरे असे वाटे.

हिरालाल व त्याचे मित्र यांनी पाच गावे घेतली होती. आठवड्यातून दोन दिवस हिरालाल प्रत्येक गावी राही. त्याने तीन गावे आपणाकडे घेतली होती.

छोटुलाल याच्याकडे दोन गावे होती.

रामभाई, मुकुंद व गोविंदा हे मुख्य ठिकाणी राहत. सोनखेडी येथे त्यांचा आश्रम होता. तेथे सारे सूत जमा होई. परंतु नुसते सूत विकत घेऊन काय करायचे? सोनखेडीला विणकर लोकांची पेठ होती. येथील शेकडो विणकर मिलमध्ये नोकरीला गेले होते व तेथून खोके होऊन क्षयी होऊन, व्यसनी होऊन गावात परत आले होते.

गावात अजून काही विणकर होते. परंतु ते खादी विणावयास तयार होत ना. सूत तुटेल असे ते म्हणत. परंतु रामभाई, मुकुंदा, गोविंदा यांनी त्यांना विणून दाखवली. ते विणकर येऊन पाहात. त्यांनाही वाटेकी आपण विणू यांच्याहून चांगली विणू. ते कलावंत होते. परंपरेचे यश त्यांच्या रक्तामासात होते. महिन्याला शंभर वार खादी विणून द्या. तुम्हाला बारा रुपये देऊ. पुन्हा रुंद असला तर पंधरा देऊ. तुम्ही जास्त विणून दिली तर जास्त घ्या पैसे.परंतु साधारण प्रमाण शंभर वारास बारा रुपये. यांच्याजवळ तरी जास्त विणाई द्यावयास पैसे नव्हते. विणकरांना धंदा नव्हता. त्यांच्या बायकांना पिंजणी वगैरे करता येत असे. सोनखेडीला विणकर विणू लागले. मग टॉवेल, धोतरे, चादरी, पांढरे कोटींग असे कपडे निघू लागले.

परंतु खादी खपवावयाची कशी? विलासपूरला गोविंदाचा एक मित्र होता. त्याने खादी दुकान घातले. परंतु नुसते दुकान घालून खादी थोडीच खपते. ती लोकांच्या गळी बांधावी लागते. रामभाई व मुकुंदा हे आता खादी खांद्यावर घेऊन ठिकठिकाणी फे-या करू लागले. खादी खपली तरच सुत विकत घेता येईल. बायांना दोन दिडक्या मिळतात, विणकर खेड्यात स्वच्छ हवेत राहून विणतील.

खादी जरा स्वस्त झाली तर लोक आणखी घेतील. स्वस्त करावयासाठी काय करावे? आपण काहींनी विणले पाहिजे. रात्रंदिवस विणले पाहिजे. गोविंदा रामभाई, मुकुंदा हे स्वतः विणीत. रात्रंदिवस विणीत. गोविंदास काही सुचत नसे. तो जणू वेडा झाला होता. तो झोपतही नसे. रात्री नीट विणायला दिसले नाही तर तो चरख्यावर भरभर सूत कातीत बसे. मोफत सूत ! काही लोकांनी मोफत सूत कातून दिले तर किती छान होईल, असे त्याला वाटे. विद्याथ्र्यांना या गोष्टीकडे लक्ष दिले तर?

गोविंदाच्या मनात हा विचार आला. परंतु होणार कसे ? एकदा तो खादी खांद्यावर घेऊन चालला होता. त्रिंबकराव आपल्या खोलीत होते. गोविंदाचे गाणे ऐकून ते विरघळले. त्यांनी गोविंदास वर बोलावले. त्याची चौकशी केली. गोविंदाने त्यांना सारी हकिकत सांगितली व म्हणाला, 'तुम्ही विद्यार्थ्यांना रोज सूत मोफत कातून देणारे बघा हे मोफत सूत मिळेल तर थोडी खादी स्वस्त होईल. "

त्रिंबकरावांनी त्याचप्रमाणे प्रयत्न सुरू ठेवले होते व काही विद्यार्थी त्यांना सूत कातून देत. त्रिंबकरावांनी शिक्षकांकडूनही ही सुत वर्गणी घ्यायचे सुरु केले. त्रिंबकराव म्हणजे गोचडी होते. चिकटले की सोडीत नसत.

परंतु अजून कर्तव्याचा पवित्र अग्री पवित्र दीप हृदयांत तितक्या प्रखरतेने पेटू लागला नव्हता. तरी गोविंदा व त्याचे मित्र यांनी आशेने काम चालवले होते. त्यांना कधी त्रिंबकराव मदत करीत.

एखादे वेळेस खादी खपून पैसे आले नसले म्हणजे उद्या बायांना काय देऊ? विणकरांना मजुरी कोठून देऊ? त्यांना नाही कोणत्या तोंडाने सांगू? आशेने असतील बिचारी ! गोविंदाला झोप यावयाची नाही. तो रडे रडे. मग 'त्रिंबकरावांना जाऊन म्हणे' 'आम्ही काय करावे? हे श्रीमंत लोक खादी घेत नाहीत. शाळांतील हे विद्यार्थी घेत नाहीत. तुम्ही शाळेत काय शिकवता ? ७०० विद्यार्थी शाळेत. हे सारे खादी घेतील तर ४००/५०० घरांना खायला देतील ! त्रिंबकराव मी मरू का? जीव देऊ? माझ्या भगिनींना उद्या कोठून पैसे देऊ? त्यांना नाही कसे म्हणू ? आज सूत विकत घेत नाही असे म्हटले म्हणजे रडायला लागतात. नको रे भाऊ असे बोलू माझ्या जवळचे चरखे परत वरती नको दवडू आम्हाला नको रे रडवू." असे म्हणतात. मी विरघळतो. त्रिंबकराव येऊन जाऊन तुम्ही आधार. तुम्हाला तरी मी किती पिळू? पण मी कोणाजवळ जाणार? माझ्या भावना कोणाला कळणार? मला ५० रुपये द्या. कोठूनही द्या."

त्रिंबकराव शाळेत गेले व त्यांनी आपला पगार अॅडव्हान्स निम्मे मागितला व तो गणपतरांनी दिला. कारण गणपतरावांना माहीत होते ते पैसे कोठे जाणार ते. गोविंदा आनंदाने व कृतज्ञतेने भरून गेला. त्याच्या तोंडावर त्या वेळेस दिव्य तेज चमके.

एकदा तर त्रिंबकरावांनी आपल्या डॉक्टर भावास खोटेच लिहिले की “माझी चोरी झाली. सारा पगार गेला. तर २५ रुपये मला पाठव." भाऊ जागला. २५ रुपये आले व ते गोविंदाच्या शत भगिनींच्या घरी गेले. अशा रीतीने काम चालले होते.

7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा