shabd-logo

प्रकरण ६

22 June 2023

5 पाहिले 5
“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कसा जाशील? दिवाणजींना बरोबर घे. तुला

चोर गाठतील, फसवतील एकटा नको जाऊ. आपल्या पेढीवाल्याकडे उतरा. हुकुमचंदजीकडे उतरा” वडील रतनशेट म्हणाले.

“बाबा पैसे?” बाबू म्हणाला.

“अरे किती हवेत? पाचशे रुपये घेऊन जा. तेथे लागले तर हुकूमचंद आहेतच. म्हणजे झाले ना. मुंबईत जप हो. पुन्हा लगेच परत ये." रतनशेट म्हणाला.

बाबूला आनंद झाला. बाबू दिवाणजीकडे गेला. दिवाणजींना बाबू म्हणाला, "दिवाणजी, मी एक गुप्त गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? तुम्हाला माझ्याबरोबर मुंबईस यावयाचे आहे.” “हो, शेट म्हणाले ” दिवाणजी म्हणाले. “पण मुंबई म्हणजे सोनखेडी. आपण गुप्तपणे सोनखेडीस जाऊ. तेथे दोन दिवस मला राहावयाचे आहे. तुम्ही बाबांना सांगू नका. आपण गंमत करू,” “पण शेटजी रागावतील मला. कामावरून दूर करतील” “त्याची व्यवस्था मी करीन. मी सारे कसे ते ठरवले आहे. माझ्या कटात सामील व्हा ना दिवाणजी.” बाबूने कळवळून विचारले. शेवटी दिवाणजींना ईश्वराने सद् बुद्धी दिली.

मोटारीत बसून दिवाणजीव बाबू स्टेशनवर गेले. मोटार परत गेली. पुढच्या स्टेशनचीच दोघांनी तिकिटे काढली. सेकंड क्लासची तिकिटे ! दोघे आगगाडीत बसले. नोकराने सामान दिले. निघाली गाडी.

पुढच्या स्टेशनवर बाबू व दिवाणजी उतरले. सायंकाळचे सात वाजले होते. बाहेर मोटार लॉरी होती. सोनखेडीला मोटार जात नसे तरी सोनखेडीपासून एक मैलापर्यंत जात असे. तेथून चालत जावे लागले असते.

दिवाणजी व बाबू मोटारीत बसले व वाटेत उतरले. सोनखेडीला आता पायांनी जावयाचे होते. अश्विन कृष्णपक्ष. बाहेर काळोख होता. परंतु बाबूच्या हृदयात 'अंतरीचा ज्ञानदिवा अंतरीचा प्रेमदिवा' पेटला होता. कधी पायांनी न चालणारा बाबू हरणाप्रमाणे उड्या मारीत होता. उत्कट इच्छा, उत्कट नि:स्वार्थ इच्छा संकटांचा चूर करते. दुःखाची सुखे करते. अंधाराची प्रभा करते.

सोनखेडी गावातील झाडांतून दिवे दिसू लागले. शेतकरी घरी जात होते. शेंगाची राखण चालली होती. पीक कोठे होते म्हणा. पीक तर बुडाले गोरगरिबांची जास्त दुर्दशा झाली होती. देवाने प्रथम चांगला पाऊस पाडला. भरलेली पिके दिसत होती. परंतु पुन्हा वारपाऊस झाला व दिलेले देवाजीने धुळीत मिळवले. देवाने सांगितले " मी अजून देणारा आहे. पूर्वीचाच विपुल देणारा प्रभू तो मी आहे. परंतु तुम्ही लायक नाही. तुम्हाला शिक्षा केली पाहिजे तुम्ही भांडता, आळशी झालात. ही मी दिलेली देणगी मागे घेतो.” तरी पण जे रुपयात आणा पीक राहिले त्याचीच शेतातून गरीब शेतकरी आगटी पेटवून राखण करीत होते.

बैल घरी येत होते. त्यांच्या घटा वाजत होत्या. गावात गर्दी दिसत होती. तो दिवाणजी व बाबू गावात शिरले.

'आश्रम कोठे, आश्रम कोठे' बाबूने विचारले.

“तो खाली आहे. उजव्या हाताला वळा, तुम्हाला तेथे प्रार्थना ऐकू येईल प्रार्थना सुरूच असेल.' तो मनुष्य म्हणाला.

बाबू व दिवाणजी आश्रमाजवळ आले. त्यांनी आत डोकावले. आत काही मुले, काही वडील मंडळी त्रिंबकराव, स्वयंसेवक प्रार्थना म्हणत होते. गोविंदा प्रार्थनेचे पद सांगत होता.

'कान्हा लाज राखो मेरी
 तू गोवर्धनधारी || कान्हा. ||
 हम गरिब तुम करुणासागर
 दुष्ट करिल बलंजोरी || कान्हा. ||
 मीराके प्रभू गिरीधर नागर
 तुमता मै छोरी || कान्हा. ||
 हे पद सांगून मग पुढील अभंग सांगण्यात आला.
 “पडता जडभरी | दासे आठवावा हरी
मग तो होऊ नेदी शीण | आड घाली सुदर्शन"

 दिवाणजी व बाबूबाहेर उभे राहून प्रार्थना ऐकत होते. प्रार्थना संपली होती. गोविंदा साश्रु आळवीत होता.

दिवाणजी व बाबू यांनी आत पाऊल टाकले. कोण हे पाहुणे? बाबू एकदम जाऊन त्रिंबकरावांच्या पाया पडला." काय रे, तू कोठे इकडे गरीब तू लोकांत?” त्रिंबकरावांनी विचारले.

“तुम्ही गरीब नाहीत. तुम्ही सारे श्रीमंत लोक आहात. कारण हजारो गरिबांची हृदये तुम्ही जोडली आहेत, व लाखो गरिबांची हृदये तोडणा-या पित्याचा मी मुलगा आहे, त्या पापसंचित पैशावर चैन करणारा भिकारडा आहे. मी दोन दिवस तुमच्या सहवासात राहायला आलो आहे.” बाबू म्हणाला. "बसा, दिवाणजी बसा ” त्रिंबकराव म्हणाले. त्रिंबकरावांनी बाबूची ओळख करून दिली.

“हा रतनलाल शेटचा मुलगा आमच्या शाळेत आहे. मी याचा वर्गशिक्षक आहे." त्रिंबकराव म्हणाले.

“त्या मिलमध्ये ज्यांचे पुष्कळ भांडवल गुंतलेले आहे तेच ना?” गावातील एका माणसाने विचारले.

"हो." दिवाणजी म्हणाले.

“गोविंदा, बाबू मोठा थोर मनाचा दोनतीन वर्षापूर्वी त्याचे दत्तकविधान झाले. हजारो रूपये तेव्हा खर्च झाले. मी एकदा वर्गात शिकवताना त्यांचा उल्लेख केला व म्हटले, एवढ्या पैशात दोनचार उत्कृष्ट खादी आश्रम सतत चालले असते. हजारो गरिबांची कायमी पोटे भरली असता तेव्हा बाबू रडू लागला. तो उठून म्हणाला, “मी काय करणार?” त्रिंबकराव सांगत होते.

“मी तुम्हाला पाहिले आहे. “हृदय जणू तुम्हा ते नसे" हे गाणे म्हणून त्या दिवशी माझ्या दत्तकविधानाचे दिवशी आमच्या बंगल्यावरून तुम्ही जात होता. मी वरून ऐकत होतो. तुम्हाला रस्त्यातून नोकरचाकरांनी घालवले. मी लहान, मी रडत बसलो. सर्वांना वाटले मी आजारीच आहे व डॉक्टरांनी औषधही पाठवले. बाबू म्हणाला.

सर्व मंडळी हसू लागली. बाबूचे कौतुकही वाटले. “परंतु तुम्हाला जेवायचे असेल.” गोविंदा म्हणाला.

“आम्ही संध्याकाळी सहा वाजता जेवूनच बसलो. शिवाय बरोबर फराळाचे दहा मुलांना पुरेल इतके आहे. या मुलांना वाटून द्या सारे. दिवाणजी तुम्हाला खावयाचे आहे का?” बाबूने विचारले.

“काही नाही. इच्छा नाही. पण शेटजी रागावणार नाही ना?" ते म्हणाले.

“म्हणजे तुम्ही शेटजींना सांगून नाही का आले?” त्रिंबकरावांनी विचारले. “हो, विचारूनच आलो. जास्त दिवस राहिलो तर बाबा रागवतील. परवा आम्ही परत जाऊ." बाबू म्हणाला.

“या रे मुलांनो, या खाऊ खायला" असे म्हणून बाबूचा करंडा त्रिंबकरावांनी सोडला. सारी मुले भोवती बसली. त्यांना त्रिंबकरावांनी वाटून दिला. मुलांची जणू दिवाळीच झाली. त्या मुलांना खाताना पाहून बाबुला मांस आल्यासारखे वाटत होते. अंगावर मुठभर“ तुमचे तेलातुपातले फराळाचे संपवले. परंतु तुम्हाला उद्या आमच्याकडे नुसते उकडलेले व मीठ घातलेले खावे लागले.” गोविंदा म्हणाला.

“मग त्यात काय झाले? ते तर चांगले असे आरोग्यशास्त्र आहे. तेलकट काही चांगले नाही.” बाबू म्हणाला.

“शिवाय जगातील निरनिराळ्या पदार्थाची चव नको का मिळायला? बाबू उद्या येथील चव घेईल दोन दिवस गंमत होईल” त्रिंबकराव म्हणाले. गोविंदा रात्रीही जाऊन विणावयास बसला. हे सूत चांगले होते. फार तुटत नव्हते व तो अगदी हलक्या हाताने घोटा फेकीत होता. बाकीची मंडळी सूत कातीत बसली. “बाबू, तुला येते का सूत कातायला" - त्रिंबकरावांनी विचारले. “हो, मला येते परंतु मी कातीत नाही. मी बसू त्या चरक्यावर. दिवाणजी तुम्ही झोपा नाही तर " बाबू म्हणू लागला. दिवाणजीसाठी आंथरुणांची व्यवस्था झाली ते अंथरुणावर पडले. मुले सूत कातू लागली. त्रिबंकराव गाणे म्हणत होते.

“हे सूत जोडी आपणाला दरिद्रदेवाशी
 हे सूत करि एकरूप भारतदेशाशी
 हे सूत काढून होऊ आपण देवाजीला प्यार
 देवा सोडिल मंग वरतुन सुखामृत धार
 सूत काढा सुत काढा पळ व्यर्थ न दवडावे
 सूत काढा सुत काढा राष्ट्र वैभवी चढवावे
 सूत काढा सुत काढा खादि स्वस्त ही करावी
 सूत काढा अश्रुधारा दीनांची पुसावी
 खादी आहे गरिबा कामधेनू भली
 खादी आहे कल्पतरूची सुखवेली
 खादी जण चिंतामणीच गरिबाला
 खादी सारे बंधू अंगावर घाला
 चरका फिरवा गरगर ऋषींनी फिरवीला
 चरका फिरवा साधू संतांनी हा धरिला
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे जीवन
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे कल्याण
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे मंगल
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे उज्वल
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे भूषण
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे पोषण
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे सुखठेव
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे महादेव
 चरका आहे आपल्या राष्ट्राचे मोक्ष रे
 चरका पूजी जो जो सदैव तो तरे
 नका करू चरका कधी अता दूर
 घरोघरी घुमुंदे ॐ काराचा सूर
घरोघरी चालू दे चरक्याचे संगीत
 येईल मग लक्ष्मी घरात धावत
 भाग्यलक्ष्मी गेली सातासमुद्रा पैलाड
 परि येईल धावून तुमचे मुखावर लाड
 नको गप्पा, भांडणे, आळस ती चैन
 चरका फिरवा जाईल राष्ट्राचे दैन्य
 या रे बंधु भगिनी खादीला घालाया
 या रे बंधुभगिनी खादीस खपवाया
 खादी घ्याल गरिबा खायाला तरि मिळे
 नाहीतर त्यांचा भुकेने जीव जळे
 खादी घेऊन गरिबा खायास दोन घास
 खादी मिटविल बंधुचा अनंत तो त्रास ||
 बंधुभाव हृदयी आपुल्या धरावा
 दयाधर्म हृदयी आपुल्या स्मरावा
 दया दाखवुनिया परमात्मा जोडावा
 दया दाखवुनिया स्वमोक्ष मिळवावा
 नका राहु कुणि आता मुळी उदासीन
 घ्यारे मनी सारेजण एक झणी आण
 खादीविण दुसरे वस्त्र न तनु घालो
 हाच एक निश्चय समस्त मन बोलो
 लागतो सर्वांच्या मी गरीब पायासी
 नका दूर लोटू पवित्र खादीसी || हे सूत. ||

बाबू कसा पण ऐकत होता. “हे काय थांबलेत मला वाटले की हे गाणे संपणारच नाही व सारखा आमचा चरका फिरतच राहील - " बाबू म्हणाला. “आता आपण झोपू, गोविंदा, तू सुद्धा झोप. अलीकडे प्रकृतीसुद्धा तुझी बरी नाही. अरे जगाल तर काम कराल. आधीच कार्यकर्त्यांची, सेवेस वाहून घेणा-यांची आपल्या अभावी देशात वाण, जे आहेत दोनचार त्यांनी शरीर सांभाळून काम केले पाहिजे. भारतात एके ठिकाणी तो विश्वामित्र म्हणतो, “जीवन धर्ममवाप्नुयात्” आधी जिवंत राहा व मग धर्म जोडा. शरीर मोलाचे आहे. त्याची सुद्धा पूजा अवश्य आहे. शरीराला विश्रांती देणे म्हणजे यशच आहे. ते पवित्र कर्तव्यच आहे " त्रिंबकराव म्हणाले.

आपली सारी मंडळी झोपली. बाबूला त्या वातावरणात किती आनंद होत होता. त्याच्या मनात अनेक विचार येत होते. त्याला झोप लागेना. गोविंदाला झोप येत नव्हती. त्याला वाटले सारे मंडळी झोपली. तो उठला व हिंडू लागला. मधूनमधून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात आहेत. त्या दिव्य दृश्याकडे बाबू पाहात होता. त्याच्याने आता अंथरुणावर लोळवेना. तो उठला व तंद्री लागलेल्या गोविंदाजवळ जाऊन बसला.

“तुम्ही का रडता ? त्या दिवशी तुम्हाला घालवले माझ्या लोकांनी ते मनात घेऊन सांगा - मी परका नाही" बाबू हृदयास जाऊन मिळतील अशा त-हेने प्रेममय आस्थामय शब्द बोलला.

“मी काय सांगू? दोन दिवसांनी दिवाळी आहे.” गोविंदा म्हणाला. “दिवाळी म्हणजे तर आनंदाचा दिवस. आनंद येणार." बाबू म्हणाला.

“शहरातील धनाधीक लोक, सावकार व सरकारी लठ्ठ पगार घेणारे अंमलदार यांना दिवाळी. यांना रोजच असते परंतु आणखी जास्त खातील. मजा करतील, परंतु गरिबांकडे उपासमारीने व्हायची. यंदा पीकही आलेले गेले. कसली आहे दिवाळी. खादी तर खपत नाही. ही पाचशे रुपयांची खादी शिल्लक आहे. खादी खपली नाही तर गरीब बायांचे सूत विकत घेता येत नाही. परवा आम्ही गरीब आयाबहिणींना नाही म्हटले. त्या रडू लागल्या. त्यांनी मुद्दाम जास्त सूत कातले होते. दिवाळीचा दिवा लागावा, घरात गोड घास व्हावा म्हणून. परंतु आम्हा दुष्टांना त्यांना नाही म्हणावे लागले. आम्ही अभागी आहो, पापी आहो- मग रडू नको तर काय करू? " गोविंदा म्हणाला. “किती पाचशे रुपयांची खादी आहे? बरीच आहे." बाबू म्हणाला.

“बरीच कशाने? तुमच्या मिलचा कपडा रोज हजारो रुपयांचा खपतो. खादी म्हणून बरीच का? कोठे एखाद्या शर्टाची खादी घेतली तर लोकांना ती बरीच वाटते. ते एखादा आमचा हातरुमालच अगदी नाही म्हणायला लाज वाटते म्हणून घेऊ पाहतात आणि इतर कपडे शेकडो रुपयांचे घेतात. खादी थोडी घेतली तरी ती त्यांना बरीच वाटते. " गोविंदा म्हणाला.

"गोविंदा मी तुमची खादी उद्या खपवून देतो, का आत्ताच देऊ?" बाबू म्हणाला.

“निराश माणसाची अशी थट्टा नका करू" गोविंदा म्हणाला.

बाबूने खिशातून पाकीट काढले व त्यातून शंभराच्या पाच नोटा गोविंदासमोर ठेवल्या. “त्या साऱ्या खादीची विक्री मी केली आहे- मला बाबांनी हे पैसे दिले आहेत, द्या माझ्या नावाचे बिल. बाबू म्हणाला.

“तुम्हाला खादीसाठी पैसे दिले वडिलांनी?” गोविंदाने विचारले.

“मला मुंबईस जाऊन दिवाळीसाठी दारू आणण्यासाठी व आवडतील ते कपडे विकत घेण्यासाठी इतर वस्तूंसाठी बाबांनी हे पाचशे रुपये दिले होते. मुंबईहून सामान खरेदी करून आम्ही लगेच परत फिरणार होतो. तुमची सोनखेडी हीच आमची मुंबई. येथेच राहू एकदोन दिवस व जाऊ. मी थट्टा नाही करीत" बाबू म्हणाला.

हा बाबू श्रीमंतांचा मुलगा हे गोविंदा विसरला व गोविंदाने प्रेमभराने बाबूला मिठी मारली. “देवाने तुला पाठवले. तू देवाचा दूत आहेस. तु दामाजीचा विठूमहार आहे, तू देवच आहेस- दीनबंधू आहेस” गोविंदा भावनावश होऊन बोलू लागला.

“गोविंदा, आता तूझोप. गुरुजींचे मघाचे शब्द लक्षात ठेव.” बाबू म्हणाला. दोघे नवीन मित्र झोपले. किती पवित्र व आनंदी ती झोप. पहाटेची वेळ झाली. आश्रमवासी उठले. मुखप्रक्षालन करून प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर त्रिंबकरावांना गोविंदाने सांगितले, “मला काल रात्री देव भेटायला आला होता. "

“मग आम्हाला का नाही उठवले? आम्हा पाप्यांना पाहून देव पळतो वाटते? त्याला धरून का नाही ठेवलास ? या मागावर खादी विणायला का नाही बसवलास? कबीराचे शेले विणी, सावतामाळ्याची मोट चालवी, जनाबाईंची चंद्रभागेच्या थडीस धुणे धुवी, नामदेवाच्या मागे टाळ वाजवी, तो लबाड तुझी खादी नाही वाटते विणणार | त्याच्या हाताचा स्पर्श झालेली खादी मग साऱ्या लोकांना ती आवडली असती, ते मोहित झाले असते - आमच्यासाठी कारे नाही त्याला ठेवलेस - स्वार्थी आहेस.” त्रिंबकराव म्हणाले.

“आशेचा देव भेटला वाटते" हिरालालने विचारले.

“नाही. अगदी खराखुरा साकार देव - मूर्त देव. त्याने मला मिठी मारली -

मी प्रेमाने त्याला भिजवले' - गोविंदा म्हणाला. “मग आलेला देव माघारा कसा दवडलास ? देव एकदा आला म्हणजे जात

नाही असे म्हणतात ना?” मुकुंदाने विचारले. “चुकले तर जाणार नाही वाटते?" - रामभाई म्हणाला.

“एकदा देव भेटल्यावर चुकेल कसे? सूर्यमालामध्ये म्हणजे अंधार चुकून तरी कसा घुसेल” मुकुंदा म्हणाला. "पण ढग येतात व त्याला आवडतात ना " - रामभाई म्हणाला.

"तुमचा वाद जाऊ दे. मी देवाला येथे झोपायला सांगितले होते. तो दमून गेला होता. पंढरपुराहून आला की काय कोणास माहीत? त्याचा गुरुडसुद्धा कोठे दिसत नव्हता - मी म्हटले देवा झोपतो झोपला म्हणून मी झोपलो.” गोविंदा म्हणाला.

“मग तो गेला कोठे? तू त्याचे पाय चेपीत नाही बसलास म्हणून तो गेला.” - त्रिंबकरव म्हणाले.

“तो आहे. गेला नाही. माझ्या डोळ्यांना दिसत आहे. तो आता जाणार नाही. आपणास अंतर देणार नाही. " गोविंदा म्हणाला.

“आम्हाला नाही देव दिसत तो" - गोविंदा म्हणाला.

दिवाणजी बाहेर गेले. त्यांना अजून शौचास वगैरे जावयाचे होते. मंडळी बसली होती.

“मी दाखवू देव - दाखवू” गोविंदा म्हणाला.

“गोविंदा, तुम्ही थट्टा करता. या थट्टेने मी मरेन गुदमरेन" बाबू म्हणाला. " अरे कळला देव. आमच्या डोळ्यांना दाखवावयास लागला शेवटी.” त्रिंबकराव म्हणाले.

“हा देव पाचशे रुपये खादी विकत घेण्यासाठी घेऊन आला आहे. देवदूत पाचशे रुपये घेऊन आला आहे'- गोविंदा म्हणाला.

गोविंदाने बाबूचा सारा कट, त्याचे सरे कारस्थान उघडकीस “चांगलेच वडिलांना फसवलेस बाबू” त्रिंबकराव म्हणाले.

आणले.

“फसवले कोठे? ही खादी हेच माझे कपडे व हेच माझे फटाके, बाबांनी पाचशे रुपये खर्चावयास दिले. मी मला आवडली गोष्ट त्यात खर्च केले. " - बाबू म्हणाला.

आज बाबू गावात हिरालालबरोबर हिंडला. त्याने गोरगरिबांची स्तिथी पाहिली. गरीब मनुष्य म्हणजे कसा प्राणी असतो हे त्याने पाहिले. त्याला खेड्यातील लोकांच्या दुख:स्थितीची कल्पना आली. बाबू गावात हिंडत होता. परंतु त्रिंबकराव विलासपूरला गेले व त्यांनी त्या नोटांचे पैसे करून आणले, नाणे आणले. गोविंद, हिरालाल हे मग शेजारच्या त्यांच्या खेड्यांतून गेले. त्या आयाबहिणींना अति आनंद झाला. त्या साऱ्याचे सूत विकत घेण्यात आले. बायांच्या तोंडावर किती कृतज्ञता होती. “देव तुमचे कल्याण करो रे. दादा तुमच्या हाताला यश देवो,” असे आशीर्वाद त्या आयाबहिणी देत होत्या. आशीर्वादाहून दुसरे जगात थोर काय आहे?

बाबू व दिवाणजी विलासपूरला परत गेले. त्यांना स्टेशनवर नेण्यासाठी मोटार आली होती. त्यांनी खादीचे गठ्ठे मोटारीत घातले. घरी आला बाबू “बाबू काय काय आणले मुंबईहून कापड ?" वडिलांनी विचारले.

“जे आपल्या येथील गिरण्यात होत नाही, असे सुंदर कापड आणले आहे. जिवंत कापड आणले आहे” - बाबू म्हणाला.

“जिवंत म्हणजे त्या कापडात हृदय असते, प्रेम असते, कळकळ असते, पूज्यता असते, भावना असतात, असे कापड आणले आहे. गरम नसूनही ऊबदार आहे, लोकरीचे नसून ऊब देते. ही ऊब प्रेमळ, स्नेहाची. बाबा खरेच जिवंत कापड आहे."- बाबू म्हणाला.

“पाहू, सोडा तरी. रामा हे सोड रे कापड " - रामाला हाक मारून शेठ म्हणाले. रामा कापड सोडू लगला. बाबूची मुद्रा कावरी बावरी का व्हायला लागली. पुन्हा त्याने मनात धीर धरला. आले तोंडावर तेज आले. डोळे चमकले खादीची ताके बाहेर पडली.

"हे रे काय?" शेटजी आश्चर्याने म्हणाले.

“हे गोरगरिबांचे शुद्ध हृदय, त्यांचे निर्मळ जीवन, त्यांचे प्रेम बाबा,

धोतरजोडा मी उद्यापासून नेसणार आहे.” बाबू म्हणाला “अरे, हा तुला झेपेल तरी का?” शेटजी म्हणाले.

“बाबा, त्याला झेपत नाही त्याने जगावे तरी का? न झेपायला काय झाले? मी का सुकुमार अळुमाळ दुबळा आहे. मी नवजवान नाही? मला का खादी पेलणार नाही? बाबा, आणि हा कोट शिवीन, याचे चार सदरे शिवीन. या दोन चादरी होतील. आपल्या दुकानातील सर्व बैठकीच्या गाद्यांना व तक्क्यांना याच खोळी करू. बाबा, सारे उपयोगी कापड आहे. स्वच्छ, निर्मळ, जिवंत, ना मजुरांना रडवणारे, त्यांच्या रक्ताने रंगलेले. ही पवित्र खादी ओह. बाबा, मी या दिवाळीपासून खादीच वापरण्याचा निश्चय केला आहे. खादी म्हणजे देशाची लक्ष्मी, खादीची कास सोडली म्हणून देश भिकारी झला. लक्ष्मीला उगीच खोटीच का करायची? लक्ष्मीपूजा खरीखुरी तेव्हाच होईल. जेव्हा खेड्यापाड्यांतून असलेली लक्ष्मीलापण सांभाळू, ती वाढवू, खादी ही आपली लाखो खेड्यांची संपत्ती त्यातच आपले भाग्य. आपली श्रीमंती.

“बाबू, हे कसले तुला वेडेवाकडे चाळे लागले? ही खादी जाडीभरडी. पुन्हा सरकारला आवडत नाही. सरकारच्या डोळ्यात आपण खुपता कामा नये. आपले अनेक धंदे अनेक ठिकाणी आपण गुंतलेले. बाबू, अशाने वाईट होईल. अरे हे सारे तुझ्यासाठी मला करावयाचे. ही सारी धनदौलत तुझी. परंतु तूच जर असा बेसावधपणे वागू लागलास तर कसे होणार?"

" बाबा यात ही धोका नाही. यात राजकारण नाही. सरकारसुद्धा वरून खादीला विरोध करत नाही. ज्या संस्था केवळ खादी काम चालवीत आहेत. त्यांना सरकारने दगा दिला नाही, हात लावला नाही. बाबा, मी तर पुढेमागे खादीच्याच कामाला वाहून घेईन. ती एक प्रकारची गिरणीच. खादीच्या गिरणीचे मजूर घरोघर जाऊन काततील, विणतील. आम्ही तो माल खपवू विकू जणू खादीची व्यापकच विशाल गिरणी. मी या गिरणीचा मालक होणार आहे असे मी ठरवले आहे." बाबू म्हणाला.

“माझे डोळे मिटी मग तू काय ते कर.” रतनलाल म्हणाले.

“बाब, असे का बरे म्हणता? मजवर रागावला होय?” बाबूने प्रेमाने विचारले?

"मला काही समजत नाही. आम्हा म्हाता-यांचे काय? दस गेले व पाच राहिले. आता तुमचेच राज्य आहे. तुम्ही म्हणाल ते खरे. काही करा परंतु सुखाने नांदा. " रतनशेट म्हणाले.

“बाबा, तुमचे मजवर प्रेम नाही ? तुमचे प्रेम माझ्यावर होते म्हणून ना तुम्ही मला दत्तक घेतलेत? मला बाबा मिळाले, आई मिळाली म्हणून मला किती आनंद झाला होता. तुमचे माझ्यावर प्रेम नाही. माझे खरे बाबा तुम्ही नाही ?” बाबूने विचारले.

" काय रे वेड्यासारखे विचारतोस. चला आपण फिरायला जाऊ. " रतनशेट म्हणाले.

सायंकाळची वेळ होत आली होती. मोटारीतून बापलेक फिरावयास गेले होते. बाबू अनेक गोष्टी पित्याला समजावून सांगत होता.

7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा