shabd-logo

प्रकरण ७

22 June 2023

13 पाहिले 13
गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार साजरा करावा हे हिंदू जनतेला जितके माहित आहे, तितके अधर्मीयांस क्वचितच माहित असते. हिंदू संस्कृती समाधान व शांती शिकवणारी आहे. कारण शेवटी समाधान व शांती ही मानूनच घ्यावी लागतील. शेवटी मनातच आहेत, वस्तूच्या पसाऱ्यात नही.

दिवाळी संपली. लक्ष्मीपूजन झाले. उद्या भाऊबीज होती. गोविंदाच्या मनात एक कल्पना आली. आश्रमभाऊबीज म्हणून ओवाळणी मागावी. आश्रम संस्था ही जणू बहीण हिला ओवाळणी नको का भावांनी द्यावयास. त्रिंबकरावांस ती कल्पना पसंत पडली होती व बाबूलासुद्धा आवडली होती.

भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी गोविंदा व त्याचे सहकारी हे विलासपूर शहरात प्रमुख घरी गेले. मुकुंदाने एक आश्रम-भगिनींचे काल्पनिक चित्र काढले होते. तिच्या हातात ताट दिले आहे - ती ओवाळीत आहे व हजारो बंधू मुसलमान, ख्रिस्ती, पारशीही त्या ताटात ओवाळणी घालीत आहेत असे दाखवत होते. वकील, डॉक्टर, व्यापरी सर्व मंडळीकडे ते गेले. हिंडता हिंडता रतनशेटकडेही आले. रतनशेट गादीवर बसले होते. त्यांच्याजवळ बाबूही होते. कसला तरी खेळ चालला होता. तो हे पंचपांडव तेथे आले. “बहिणीला ओवाळणी घाला” - असे त्या सुंदर चित्रावर लिहिले होते. त्यांच्या गळ्यात होते. त्यावरही संस्थेस ओवाळणी घाला असे लिहिले होते.

बाबूने त्यांचा सत्कार केला. त्या स्वयंसेवकांनी सारी हकिकत सांगितली. संस्थेचा अहवाल पाच वर्षांचा वाचावयास दिला. “मग काय म्हणणे” रतनशेठनी विचारले.

“दुसरे काय? ही संस्था मूर्तिमंत दरिद्री हिंदभगिनींच आहे. तिला चोळी बांगडी द्या. ती दुसरे काय मागेल? तिला वर्षभर अब्रूने दिवस काढता येतील असे करा . " गोविंदा म्हणाला.

"कोणी ओवाळणी घालायची?" शेटजींनी विचारले.

“या भगिनीचे लहान मोठे सारचे भाऊ. साऱ्यांनीच ओवाळणी

घालायची. " गोविंदा म्हणाला.

“बाबा, तुम्ही आधी घाला. मग मी " बाबू म्हणाला.

“माझे पाच रुपये घाला. " शेटजी म्हणाले.

“मझी ही गळ्यातील कंठी घ्या.” बाबू कंठी त्या तसबिरीला घालीत म्हणला.

"वेडा कुठला द्या हो ती काढून त्याचे काय ऐकता. पाच रुपये त्याचे द्या.

बाबू, दहा रुपये ना दिवाणजींना त्यांना द्यायला सांग." शेटजी म्हणाले. "बाबा, मी कंठी दिलेली तुम्ही घेतलीत. दिले दान घेतले दान हे वाईट. बाबा, अब्रू जाणार. असे का बरे ? मला जेवण गोड वाटणार नाही. बाबा, मी नवा दागिना मागणार नाही. गरीब बहिणीच्या सुखासाठी जर हे दागिने नसतील तर काय चाटावयाचे ते? त्यांनी की मी सुंदर दिसतो? मग देवानेच नसते दागिने घालून पाठविले. हा संपत्तीचा अपव्यय आहे. बाबा, द्याना ती

कंठी, मी घालणार नाही.” बाबू म्हणाला.

“बाबू, अशाने तुझे पुढे कसे होणार?" शेटजी म्हणाले. “ हजारो भगिनींच्या आशीर्वादाने माझे मंगलच होणार व तुमच्याही पदरी

पुण्यच पडणार." बाबू म्हणाला.

“माझा नाइलाज आहे. घ्या ही कंठी" शेटजी म्हणाले.

“आम्ही ऋणी आहोत. परंतु शेटजी, अजून आमची संस्था गरीब आहे. आणि ही कंठी चोरून आणली असेही म्हणायचे. शेवटी आम्ही ती विकणारच तर तुम्हीच ती विकत घ्या व आम्हाला योग्य ती किंमत द्या.” गोविंदा अत्यंत नम्रतेने म्हणाला.

“नाहीतर सभा करून तेथे हिचा लिलाव करू. किंमत जास्त येईल " रामभाई

म्हणाला.

“माझ्या नावाचा डांगोरा मला नको." बाबू म्हणाला. “उद्या सभा ठेवावी. " हिरालाल म्हणाला.

“बाबू, तुझ्या नावासाठी नाही तर दुसऱ्यांना उदाहरण मिळावे म्हणून, त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून.” गोविंदा म्हणाला.

“उद्या नको. आपण कोणीतरी मोठे पुढारी बोलवू. जमनालालजींना बोलवू. त्यांना आपला अहवाल पाठवू नाहीतर आपण दोघेजण त्यांच्या भेटीस जाऊ. ते येतील व मग सभेतच बाबू तू ही कंठी दे मग मजा येईल. इतरांस स्फूर्ती होईल" गोविंदा म्हणाला.

नमस्कार करून स्वयंसेवक निघाले. बाबू पोचवायला गेला.

“बाबू तु दीनबंधू बाबू आहेस. आमचा आधार आहेस." असे म्हणून प्रेमाने गोविंदाने त्याचा हात आपल्या हातात घेतला. पाची बंधू आश्रमात गेले. त्यांचे काम पुन्हा सुरु झाले. जीवन सुत गोळा करू लागला. खादी विणली जाऊ लागली.

त्रिंबकराव पुन्हा शाळेत आपल्या कामावर रुजू झाले. बाबूबद्दल त्यांना फार प्रेम वाटे. बाबू एक दिवस वडिलांना म्हणाला, 'माझे इंग्रजी व संस्कृत कच्चे आहे. मी शिकवणी ठेवू? ते त्रिंबकराव छान शिकवतात.” “हो ठेव.” वडील आनंदाने म्हणाले. मुलाचे अभ्यासात चित्त रमत आहे हे पाहून त्यांना समाधान वाटले.

त्रिंबकराव बाबूला शिकवण्यासाठी येऊ लागले. कधी ते गुरुशिष्य दोघे मोटारीतून फिरावयास जात. कधी पायीच जात. “पायांचा काय उपयोग? आपण पाय असून पंगू का व्हावे?" त्रिंबकराव म्हणावयाचे व बाबूला ते पटे.

त्रिंबकराव बाबुबरोबर सुंदर सुंदर पुस्तके वाचीत. त्याला सद्विचार देत, त्याला विचार करावयास लावीत. बाबू प्रगल्भ होऊ लागला. कधी कधी त्रिंबकराव बाबुला म्हणत, “बाबू तु खूप हिंड. प्रवास कर. निरनिराळ्या संस्थांतून राहा. गुरुकुल, शांतीनिकेतन, अभयाश्रम वगैरे संस्थांतून जाऊन ये. कोठे काय चालले आहे, काय प्रयोग चालले आहेत ते पाहा. श्री. राजगोपाला चारियर यांचा आश्रम पाहा. गंगेच्या गंभीर तीरावरील राजेंद्रप्रसादांचा आश्रम पाहा. हिमालयातील रामतीर्थांची समाधी भूमी टिहरी तेथील आश्रम पाहा. तू बेतूरला जा. तेथे श्रीरामकृष्णाचे शिष्य आहेत. त्यांची कार्य करण्याची पद्धती बघू. गुरुकुले आर्य समाजाची पाहा. महात्माजींचा आश्रम तेथे जा. अमृतलाल ठक्कर यांचे भिल्ल सेवा मंडळ ते पाहा. हरिजन सेवाश्रम व नवीन चर्मालये, दुधालये, गोशाळा, मधुसंवर्धन शाळा पाहा. नवीन हिंदुस्थान, नवभारत रुजत आहे, नाचत आहे, स्फुरत आहे, उठत आहे, उड्या मारीत आहे ते पाहा. हेच विशाल शिक्षण. जेथे तुला आवडेल तेथे काही दिवस राहा. थोरामोठ्यांचा परिचय करून घे. तुला पुढे नोकरी थोडीच करावयाची आहे. विचारांनी प्रगल्भ हो. अनुभवाने दृढनिश्चयी हो. मनात जीवितकार्य ठरव." त्रिंबकराव अनेक गोष्टी बाबूच्या मनात भरवावयाचे.

गोविंद व हिरालाल हे वर्ध्याला जमनालालजीस भेटावयास गेले होते. तो महापुरुष नुकताच विश्रांतीसाठी वर्ध्याला आला होता. गोविंदाने नम्रपूर्वक आपले काम सांगितले. तो अहवाल दिला. जमनालालजींना त्या असहाय तरुणांचे काम पाहून अचंबा वाटला. ना कोठे गाजावाजा, ना जाहिराती. महाराष्ट्राला गाजावाजा करणे साधतच नाही व त्याला फारशी इच्छाही नसते. कोणी गाजावाजा करू पाहतात. परंतु त्याला लोक हसतात. जमनालालजींचे ते थोर हृदय. मुलांची उत्कटता व सेवापरता पाहून तो पहाड विरघळाला. मी येईन असे त्यांनी कबूल केले.

गोविंदा व हिरालाल विलासपूरला आले. त्यांनी त्रिंबकरावास सारी हकिकत सांगितली. त्रिंबकरावास अत्यानंद झाला. शाळेतील काही विद्यार्थी स्वयंसेवक कामे करण्यास तयार झाले. रस्ता श्रृंगारण्यात आला. पताका, तोरणे लावण्यात आली. सुंदर सुंदर वाक्ये लावली होती. बाबूकडे जमनालालजी उतरावयाचे होते. रतनशेटची व त्यांची ओळख होती. बाबूने गडीमाणूस पाठवून मंडप तयार करवला. मंडप सुशोभित केला होता. आम्रपल्ल्व लावले होते. झेंडूची तोरणे लावली होती. खादीच्या सुताचे सुंदर हार लावले होते. मंडप छानदार, साधा परंतु मनमोहक दिसत होता. तेथे आसन सजवले होते. विलासपुरात जणू चैतन्य आले होते. गोविंदाच्या मित्रांनी आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी आमंत्रणे दिली. सभेत अध्यक्ष कोण होणार? गावात नगीनदासशेट म्हणून एक अत्यंत धनाढ्य श्रीमान व्यापारी होता. ते अध्यक्ष ठरले. व्यापाऱ्यांनी त्यांना गळ घातली. जमनालालजींची ओळख करून देण्याचे काम शेवटी त्रिंबकरावांवर आले. अनुमोदन देण्याला एक वकील तयार झाले. रतनलाल शेटही अनुमोदन देणार होते. आभार गोविंदाच मानणार होता.

स्वयंसेवकांची पथके तयार झाली. मोटार सजवण्यात आली होती. लेझीम खेळणारी मुले तयार होती. पद्ये कोणती मिरवणुकीत म्हणायची ते ठरले होते. विशेषतः खादीवरचीच पदे म्हणण्यात येणार होती.

ती पाहा स्टेशनवर तुफान गर्दी लोटली आहे. विद्यार्थी जमले आहेत. पांढऱ्या टोप्यांचा समुद्र दिसत आहे. मध्येच कोणाची काळी टोपी माशाच्या तोंडाप्रमाणे त्या श्वेतसमुद्रावर दिसत होती ती परस्थ प्रवाशांची, स्टेशनवरच्या नोकराची असे.

बाहेर मोटार सज्ज आहे. मोटारीत जमनाललजींबरोबर नगीनदासशेट व रतनशेट बसणार होते. हजारो लोकांचे गाडीकडे लक्ष होते. आज हटकून गाडी उशिरा यावयाचीच. विद्यार्थी म्हणत होते. “सिग्नल पडला पाच मिनिटांत येईल गाडी. " कोणी म्हणे, आली धूर दिसू लागला. आवाज ऐकू येऊ लागला. आली जवळ आली. उत्सुक अधीर मंडळी झाली. पीछे हटो- गिर जायगा पोर्टर म्हणत होते. टणटणटण-घंटा वाजला. फुसफुस भगभग करीत गाडी आली. “देशभक्त जमनालालजी की जय, महात्मा गांधी की जय, अल्लाहु अकबर, लोकमान्य टिळक महाराज की जय' सारे स्टेशन दुमदुमून गेले. जमनालालजींची ती उंच सौम्य मूर्ती त्या जनसागरात स्वच्छ दिसत होती. त्या जनसागरात त्या जमनादासाचे मस्तक उंच शोभत होते. त्यांच्या गळ्यात सुताचे फुलांचे हार घालण्यात आले. कोमल स्मित त्यांच्या मुद्रेवर होते. आले बाहेर आले. मोटारीत बसले. मिरवणूक तयार झाली. मुलींचाही मेळा आहे. मुलांचा मुलींना मत्सर वाटला. आपणही तयार होऊ असे त्यांनी गुप्त ठरवले होते. जयजकारात मिरवणूक सुरू झाली. गीते म्हणण्यात येऊ लागली. लेझीम वाजू लागले. वाटोवाट जमनालालजींना हार घालण्यात येऊ लागले. फुले उधळण्यात आली. बायकांनी काष्ठा व बतासे उधळले. मोठ्या थाटाने मिरवणूक चालली होती. १५ वर्षांपूर्वी लोकमान्यजी विलासपूरला आले होते. स्वराज्यफंडाच्या दौ-याच्या वेळेस.

त्यानंतर अशा देशभक्तांचे स्वागत करण्याचा हा पहिलाच प्रसंग. महात्माजी अजून विलासपूरला आले नव्हते. सूर्य आला नव्हता. आज अरुणोदय झाला होता अरुणागम झाला होता.

गोविंदा, बाबू, हिरालाल पदे म्हणत होते. पुढील पद जमनालालजींना फारच आवडले.

खरोखर गांधि थोर मूर्ति | अवतार प्रभूचे गमति देशभक्तीची मंगल गंभिर मंदाकिनी जे असती

|| खरो ० ||

धार्मिक्याची, माधुर्याची, त्यागाची जे स्फूर्ति || खरो ० ||

अनाथदीनां मायबापासे सकलही हरती आर्ती

चंदनापरी जनसेवेस्तव निशिदिन तनु झिजविती || खरो ० ||

चरख्याची जे पूजा करिती विणकर आपण बनती

खादीसाठी गरिबांसाठी वेडे जणू जे होती. || खरो ० ||

दरिद्रजनता नारायणसम सदैव अंतरि धरिती

तत्पूजेस्तव तनमनधन हे अविरत जे श्रमवीती || खरो ० ||

सेवेचा सत्पंथ आपणा सकळा दावुनी देती

भारतदेशा वैभवाकडे मुक्तिकडे ते नेती || खरो ० ||

मोठमोठ त्यागी सेवक जमविती आपणा भवती

वेडा होऊनि वेड लावितो, पेटवि हृदयी ज्योति || खरो ० ||

कोळशाचि हा करी माणिके राजे फकीर बनती

त्यागोन्मुख करी विलासरक्ता कर्तव्य शिकवती || खरो ० ||

असा थोर मोहरा लाभला होवो जागृती चित्ती

गांधिमहात्मा सांगेल तसे पाऊल पडू दे पुढती || खरो ० ||

अशा प्रकारची गाणी म्हणत मिरवणूक शांतपणे पार पडली. नऊ वाजता मिरवणूक खलास झली. कापडाच्या व्यापारी मंडळींची चर्चेसाठी सभा होती. परदेशी माल न आणण्याबद्दल जमनालालजींनी परोपरीने सांगितले. पहिला माल संपला म्हणजे पुन्हा मागवणार नाही असे व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमणे गुळगुळीत आश्वासन दिले. शब्दांना आजकाल किंमत आहे कोठे? आपण कोणासमोर बोलत आहेत कोणाला आश्वासन देत आहोत हे लोक मागून विसरून जातात. आज शपथ घेऊन उद्या लगेच मोडणारे हे नवीन भीष्मप्रतिज्ञ लोक समाजात फार झाल्यामुळे तर समाजाचे पाऊल पुढे पडत नाही.

मोटारीत बसून सोनखेडीचा आश्रम ही मंडळी पाहून आली. जेथे मोटार थांबते एक टांगा ठेवला होता. त्यातून जमनालालजी व दोघे धनाढ्य व्यापारी सोनखेडीस गेले. तेथील विणकर लोक जमले होते. आश्रमातीलही मागकाम पहिले. खादी पहिली. सुताचे व प्रकार पाहिले. जीवनने सारी उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. जमनालाल प्रसन्न झाले. त्यांनी तेथील विणकरांनादोन शब्द सांगितले. “जरा कष्ट करा. बुडालेला धंदा वर काढायचा आहे. तुम्हीही थोडी कळ सोसा, सुत तुटले तरी रागावू नका. जरा मजुरी कमी मिळाली तरी प्रेम, शुद्ध हवा, शुद्ध प्रकाश, या दुसऱ्या अनेक गोष्टी तुम्हास मिळतील. त्यांची कोण किंमत करीत? तुम्ही खरेदेवाची उपासना करणारे, गरीब भगिनींच्या सुखात भर घालणारे व्हा. विणाल ते उत्कृष्ट विणा. त्यात हृदय ओता. राष्ट्राची मनोवृत्ती खेचून घ्यावयाची आहे. जो आपल्या कार्यात जास्त त्याग, प्रेम ओतील. जास्त दक्षता व निष्ठा ओतील तो जगाचे मन ओढून घेईल. तुम्हाला माझे शत प्रणाम आहेत.” विणकरांनी जमनाजीलालजींना सुताचे हार घातले. मंडळी परत विलासपुरास आली.

सायंकाळी सहा वाजता समारंभ होता. आश्रमाच्या मदतीसाठी हा समारंभ होता. हजारे लोक जमले होते. सर्वत्र नीट व्यवस्था होती. पाणी शिंपल्यामुळे धूळ वगैरे उडत नव्हती. दिवाबत्तीची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. स्त्रियांची एका बाजुस व्यवस्था होती. स्वयंसेवक उत्कृष्ट काम करीत होते. मंडळी आणखी येतच होती. सहा वाजण्यास पाच मिनिटे आहेत. ती पाहा मोटार ओली. जमनलालजी, नगीनदास शेट, रतनशेट आले. गोविंदा व इतर स्वयंसेवकांनी मार्ग केला. व्यासपीठावर मंडळी गेली. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. जयजयकारांनी मंडप पडतो की काय असे भासले.

अस्तास जाणाऱ्या सूर्याचे मंद किरण त्या शुभ्र टोप्यांवर पसरले होते. फार रम्य दृश्य दिसत होते. सूर्य आशीर्वाद देत होता. शुभ्र चिंतीत जात होता. हळूहळू जात होता.

सभा तटस्थ झाली. शांत झाली. ते पाहा वंदनाचे गीत झाले व रघुपति राघव राजाराम धून सुरू झाली. शांत पुन्हा शांत.

त्रिंबकराव जमनलालजींची ओळख करून देण्यासाठी उठले. ते म्हणाले, “सूर्याची ओळख करून द्यायला नको. सुर्यमालेभोवती प्रदक्षिणा करीत फिरणारे गुरु, शुक्र यांचीही ओळख करून द्यायला नको. महात्माजींनी १९१९ पासून कर्तव्यक्षेत्रात हिंदी कर्तव्यक्षेत्रात, हिंदुस्थानातील अफाट कर्तव्य क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्यांनी जे थोर लोक आपल्याभोवती आपल्या प्रेमशक्तीने, त्यागशक्तीने, तपस्याबलाने ओढून घेतले. त्यातीलच श्रीमंत जमनालालजी आहेत. आज दहा वर्षे सारखी सेवा ते करीत आहेत. नबाबाचे ते देशासाठी भिकारी झाले. त्यांच्या गाद्यागिरद्या गेल्या तलम वस्त्रे गेली. ते घोंगडी व जाड्याभरड्या खादीचे भक्त झाले. स्वतः कातू लागले. यांच्या मातुश्री वृद्ध आहेत तरी त्यांना रोज पाहा सहा तास कातल्याशिवाय समाधान होत नाही. यांच्या पत्नी तशाच. मुलेबाळे तशीच. सारे कुटुंबाच्या कुटुंब जणू आश्रम झाले आहे. कुटुंब म्हणजे आश्रमच. कुटुंब म्हणजे एका ध्येयाची पूजा करणाऱ्या व्यक्तींचा छोट्या मोठ्या व्यक्तींचा समुदाय. प्रेमाने व कर्तव्याने एकच दृढ बांधलेला समुदाय. हरिश्चंद्र-तारामती रोहिदास एका आश्रमातल, एका ध्येयाच्या पूजेत रममाण झालेली तसेच राम सीता भरत लक्ष्मण, तसेच पाच पांडव द्रौपदी. कुंती व सुभद्रा वनात गेली नाहीत. तरी गरीब विदुराकडे राहिली. कुटुंब म्हणजे एका भावनेने भारलेला पवित्र यात्रेकरूचा जथ्था. या प्राचीन कुटुंबाप्रमाणे, जमनालालजीचे सारे कुटुंब आहे. अशी कुटुंबे कोठे आहेत आज? पती, पत्नी मुले एकाच ध्येयाची पूजा करीत आहेत. का? त्यांना खाणे पिणे यापलीकडे ध्येय आहे. जमनालालजी गरिबांशी एकरूप झाले आहेत. खादी कार्याला त्यांनी जीवन दिले आहे. अखिल भारतीय चरखा संघाचे ते जीव आहेत. महात्माजींचे उजवे हात आहेत. ते आजकालचे थोर संत आहेत. संत म्हणजे अंगाला भस्म फासतो तो नव्हे. संत म्हणजे अनाथदीनांच्या कल्याणासाठी झिजतो तो. जे का रंजले गांजले | त्यांशी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा असे हे साधू आहेत खादी क्षेत्रातले साधू आहेत. देशाच्या विराट संसारातील साधू आहेत. गरिबांची सेवा करणारे, दरिद्रीनारायणची पूजा करणारे साधू आहेत. थोर पुरुषांची नावे ही पवित्र असतात. त्यांचा जयजयकार केल्यानेही आपणास स्फूती येते. मग त्यांचे प्रत्यक्ष दर्शन किती परिणाम करील, पावन करील, उन्नत करील? या थोर पुरुषाच्या त्यागातील एक कण तरी आपल्यात आणू या. ते सांगतील ते हृदयसंपुष्टात जपून ठेवून त्याप्रमाणे जीवनास वळण देऊ या. मी जास्त काय सांगू?” त्रिंबकराव खाली बसले. टाळ्या, रतनशेटांनी दोन शब्द सांगितले. “आम्हा व्यापा-यांना थोर उदाहरण आपण घालून दिले. व्यापाऱ्यांनी केलेली पापे आपण आपल्या त्यागाने धुऊन टाकीत आहात. आम्हाला उद्धरीत आहात. आपले थोर उपकार आहेत. आपले शब्द ऐकण्यास सारे अधीर आहेत. मी कशाला वेळ घेऊ." असे ते म्हणाले.

ती भव्य व शांत मूर्तीउभी राहिली. “मित्रांनो, बंधुीगिनींनो, माझी स्तुती केली. ती माझी नसून महात्माजींची आहे. त्यांचीही नसून थोर कार्याची, ध्येयाची ती स्तुती आहे. या तालुक्यातील स्वयंसेवकांचे काम पाहून मला फार आनंद झाला. एका कोपऱ्यात हे काम चालले होते, इतक्या आस्थेने चालले होते, इतक्या तपस्येने चालले होते हे मला माहीत नव्हते. परंतु जगाला माहित नसले म्हणून कार्याचे महत्व कमी होत नाही. आकाशात अत्यंत दूर दृष्टीस न दिसणारे अनंत प्रचंड तारे आहेत. ते दिसत नसले तरी विश्वात त्यांचे काम चाललेच आहे. फुल कोठे कोपऱ्यात का फुलेना, त्याचा गंध, परिमळ वाऱ्यात मिसळून सर्व जागाला मिळतच आहे. गाजावाजा न करता आस्थापूर्वक केलेले काम, श्रद्धापूर्वक केलेले काम फार थोर आहे. या स्वयंसेवकांनी मोठी कामगिरी चालवली आहे. या पाच वर्षात त्यांना उपास पडले. त्यांना आपत्ती आल्या. परंतु ते डगमगले नाहीत. रात्रंदिवस ते खादी विणीत की खादी स्वस्त व्हावी व खपावी. ती खपून पैसे हातात यावे व गरीब आयाबहीनींचे सुत पुन्हा विकत घ्यावे. खादीच्या फेऱ्या घालत, पायपिट करीत. लोकांचे कटू बोल व उपहास सहन करीत. संकटातूनच जी वाढ होते ती खरी होते. वटवृक्षासारखा प्रचंड वृक्ष त्याची मुळे दगड धोंड्याशी झगडत असतात. लहानपणीच ती मुळे दगडांशी झुंज घेतात !” “ओले मूळ भेदी खडकाचे अंग” जिवंत झाडाचे मूळ फत्तरांना फोडील - जिवंत श्रद्धा हृदयाचे कातळ, हृदयाचे खडक फोडील. खरी सेवा हृदयात रुजेलच रुजेल. जगात शेवटी कळकळ जिंकून घेते, तळमळ विजयी होते.

हे पाच वीर गोरगरिबांसाठी सुखत्याग करून असे झगडत असता तुमचे काहीच कर्तव्य नाही का? ते खादी तयार करतील ती विकतही तुम्ही घेणार नाही का? तुम्हाला हृदय नाही? बहिणींची अबू, त्यांचे अश्रु, त्यांची भुकेलेली बाळे ही तुम्हाला दिसत नाही? इतर सारे वारेमाप होणारे खर्च कमी करून खादी नाही घेता येणार? खादी म्हणे महाग ! अरे दोन दिडक्या देशासाठी म्हणजेच देवासाठी जास्त द्यावयास तुम्ही तयार नाही का? गरिबांना त्यांची खादी घेऊन द्याच द्या. अत्रदानासारखे पुण्य नाही. अगदी मोफत अत्रदान तुमच्याजवळ कोणी मागत नाही. खादी घेऊन अन्नदान करा. कर्तव्यबुद्धी थोडीतरी हृदयात जागो. असे कसे अजगर आपण सारे झालो. आज महाराष्ट्रात ६० वर्षे स्वदेशाची घोषणा चालली आहे. १८८० च्या सुमारासच तुमच्या महाराष्ट्रातील रावसाहेब मंडलिक कलकत्याला गेले होते. त्यांच्या अंगावरील जाडी खादी पाहून कलकत्यातरील राजे त्यांना म्हणाले, “ अशी जाडी काय वापरता वस्त्रे.” ते म्हणाले, “ज्या दिवशी माझ्या आयाबहिणी पुन्हा बारीक काततील व विणकर बारीक विणील त्या दिवशी मी तलम वस्त्रे नेसेन तोपर्यंत हीच मला प्रिय” सार्वजनिक काका म्हणजे स्वदेशी मंत्राचे द्रष्टे ऋषी. पूज्य लोकमान्यांचे स्मरण होताच मूर्तिमंत देशभक्ती व त्याग व कष्ट उभे राहातात डोळ्यांसमोर. अरे, दोन दिडक्या का जास्त देववत नाही? ज्या खादीसाठी महात्माजी आजे १५ वर्षे रात्रंदिवस ओरडत आहेत, ते वेडेपिसे झाले आहेत, ती खादी अजून तुमच्या अंगावर दिसू नये का? देशबंधू दासांसारखेही खादी वापरू लागले व तुम्हाला ती वापरावयास लाज वाटते का? तुम्ही कोण? देशबंधूपेक्षा का जास्त मान व लायकीचे तुम्ही आहात? मान परदेशी वस्त्राने, तलम वस्त्राने वाढत नाही. योग्यता अलंकारांनी वाढत नाही, नटवेगिरीने वाढत नाही. 'त्यागेनैकेन अमृतत्व मानशुः ' -त्यागाने अमर कला मिळते, सौंदर्य मिळते- अरे थोडा, दोन दिडक्यांचा त्याग करा. जाड खादी का खुपते? अरे कृष्णाने वणवा गिळला रे, शंकरांनी विषय गिळले, रामाने वल्कले परिधानली रे, तुम्हाला खादी जाड वाटते. तुम्ही व तुमच्या बायका या. राम व सीता याहून सुंदर व सुकुमार आहेत का ? सीतासावित्री वल्कले नेसल्या. जाड झाडांच्या साली. त्याहून खादी बरी खरेच बरी नाही? किती तुम्हाला सांगावे, किती ओरडावे. तुमच्या हृदयात स्वजनांसाठी थोडी त्यागबुद्धी उत्पन्न झाल्याशिवाय तुम्ही स्वतंत्र होणार नाही हे लक्षात घरा.

या आश्रमाच्या खादीसाठी पाठीस लागून त्यांना सतावा यातच त्यांचा आनंद आहे. या आश्रमाची खादी घ्या व या आश्रमाला आर्थिकही मदत करा. त्यांचा निर्वाह कसा चालायचा? त्यांना पुस्तके, सामान हजारो गोष्टी लागतात, प्रवास करावा लागतो, निराळे आश्रम पाहावे लागतात. कोठून गरीब ते आणणार पैसे? त्यांना काही उन्हाळ्यात मौज मारावयास जाण्यासाठी पैसे नको आहेत. सेवेच्या कामाला जास्त लायक होण्यासाठी त्यांना पैसे पाहिजे आहेत. ते काम वाढवतील, पसारा वाढवतील. दहा गावांची वीस गावे हाती घेतील. द्या. त्यांना मदत द्या. देश दरिद्री असता अंगावर दागिने काय घालता? देश गुलाम असता अलंकार कसले मिरवता? जगात तुम्ही पशू मानले जाता, उंदीर कोणी तुम्हाला म्हणतो कोणी कुत्रे म्हणतो. याची लाज नाही वाटत? याची चीड नाहीत येत? हे म्हणवून घेण्यात का पुरुषार्थ वाटतो? कसला मान आहे जगात तुम्हाला, तुमच्या राष्ट्राला ? पहिल्याने मुक्त व्हा. स्वावलंबी व्हा. त्यासाठी हे सारे खोटे अलंकार फेकून द्या. या मुद्या, अंगठ्या, बांगड्या, हारा यांनी का शोभा येते? खरी शोभा मानवाचे सुख वाढवणे यात आहे. भाऊ उपाशी असता बहीण नाकात नथ घालून बसेल का ती विकून टाकील? मुले अन्नान्न करीत मरत असता आईबाप दागिने उराशी धरून बसतील का ते फेकून देतील? तुमचे बंधू तुमची मुले आज उपाशी आहेत. त्यांच्यासाठी द्या - द्या दागिने. कोणी नाही? कोणी नाही मोह फेकून द्यायला तयार. ते पाहा आकाशातून तारे पाहावयास जमू लागले आहेत. तुमचे सुख पाहण्यासाठी नक्षत्रमंडळी आकाशमंडपात जमू लागली. काय, त्यांच्यासमोर माना खाली घालणार? आणा मदत (बाबू आपली कंठी काढून नेऊन देतो) शाबास, शाबास, सभेची लाज राखली सभेची लाज राखली गेली. दिव्याने दिवा पेटतो म्हणतात. दुसरा कोणी नाही? या भावाचे अनुकरण करण्यास दुसरे भाऊ व भगिनी पुढे नाही येत? मुलींनी मेळा केला होता. आता मोत्याच्या बांगड्या घेऊन नाही पुढे येत? (एक मुलगी पुढे येते व बांगड्या देते) शाबास बेटा, काय तुझे नाव (विमल देशपांडे) शाबास विमल, आज खरी विमल झालीस. निर्मळ झालीस, अंगावरची घाण काढलीस.. पण आईबापांची परवानगी आहे ना? (होय. माझ्या आईने मला सांगितले) या त्यागासाठी पुढे या. (कोणी चांदीची सोन्याची बटणे आणतो, कोणी रिस्टवॉच देतो. काही अंगठ्या देतात) देव प्रसन्न झाला आहे. तुम्ही जिवंत आहात, भारत मातेचीच लेकरे शोभत आहात. सत्वशील हरिश्चंद्र अजून थोडाफार हृदयात जागृत आहे. या कंठीचा मी लिलाव करतो. कोण घेतो.

(दोनशे) दोनशे-दोनशे (अडीचशे) अडीचशे - अडीचशे (तीनशे ) तीनशे तीनशे (साडे तीनशे नगीनदास म्हणतात) साडेतीनशे-साडेतीनशे नगीदासांना ही देतो. बाकीचे दागिने विकून योग्य ती रक्रम जमा होईल हे घड्याळ मात्र आताच विकावे कोण घेतो. ( वीस रुपये) वीस रुपये, वीस रुपये (पंचवीस) पंचवीस पंचवीस, पंचवीस, मोठे छान आहे घड्याळ (तीस) तीस तीस - अच्छा हे तीसला देऊन टाकतो.

मित्रांनो, असेच गरिबांना साहाय्यं करा. ही संस्था तुमची आहे. संस्था म्हणजे तुमची भगिनी आहे. तिला तुम्ही उघडी पडू देऊ नका. हा तुमच्या तालुक्यातील निर्मळ सेवा झरा स्वतःच्या औदासिन्याने सुकवू नका. वाढू दे. काम वाढू दे, व्याप वाढू दे. गोरगरिब हसू दे, सुखाने दोन घास खाऊ दे. देश स्वावलंबी होऊ दे. त्यातून धैर्य येईल, आत्मविश्वास येईल, स्वाभिमान येईल. अंती स्वातंत्र्य येईल. मी या मुलाचे कौतुक करतो. त्यांचा गौरव करतो. यांचा आश्रम दरवर्षी जितकी खादी विणून घेईल ती खादी विष्णावयाचा जो खर्च येईल. त्यातील एक तृतीयांश खर्च अखिल भारतीय चरखा संघ देईल. मग दोन हजार विणणारी झाली. तर सहाशे सहासष्ट रुपये देऊ. आणखी इतर तरुणांनी यां कामाला वाहून घ्यावे. सेवा करणे याहून धन्यकाय आहे? ज्याला सेवा करावयास मिळाली त्याचे जीवित सफळ झाले कृतकृत्य झाले. मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. ईश्वर तुम्हास सद्बुद्धी देवो देशाचे मंगल वाढो.”

टाळ्यांचा प्रचंड कडकडात झाला. शांत झाले सारे, गोविंदा आभार मानावयासाठी उभा राहिला. “ मी लहान मुलगा मी काय बोलू? उतेजनाचे दोन शब्द ऐकले म्हणजे मुलांचा उत्साह दसपट वाढतो, त्यांना हुरूप चढतो. थोर जमनालालजींनी आम्हाला ऋणी केले. शतकामे दूर ठेवून ते एका शब्दासरशी आले. आम्हा बाळगोपाळांचे कौतुक करते झाले. आम्हास मदत देते झाले, तुमच्या हृदयात ज्योती पेटवते झाले, स्फूर्ती देते झाले. वार्षिक मदतीचे अभिवचन देते झाले. किती आभार मानू? कार्य जास्त वाढवूनच त्यांचे खरे आभार मानता येतील, आजचे अध्यक्ष त्यांनी हजा ररुपयांची देणगी जाहीर करण्यास सांगितले आहे व रतनशेट यांनी तीनशे रुपये दिले आहेत. मी किती आभार मानू? आम्हा मुलांवर तुम्ही एवढा विश्वास टाकला याबद्दल डोळ्यांत अश्रु येतात. प्रभू आमच्या या लहानग्या हातांनी सेवा घेवो. संस्था आता खंबीर पायावर उभी राहील. आजचे अध्यक्ष हे तसेच रतनशेट, तसेच थोर गुरुजी त्रिंबकराव ज्यांनी आमची संस्था तनमनधन देऊन जगवली हे कोणासही माहीत नाही. या सर्वांचा मी आभार आहे. सर्व बंधूभगिनींचा तर मी, माझे मित्र चिरसेवकच आहोत. अशीच आम्हास स्फूर्ती द्या आशीर्वाद द्या. साहाय्य द्या व त्यांना साकार करण्यास परमेश्वर लायक करो. आता वंदेमातरम गीत होऊन सभा समाप्त होईल. "

सारी मंडळी उभी रहिली. ते राष्ट्रगीत म्हणण्यात आले. जयजयकार झाले. सभेचे विसर्जन झाले. लोक घरोघर कौतुक करीत गेले. अपूर्व समारंभ झाला. दागिन्यांच्या फेकाफेकीचा दिव्य प्रसंग घडला. विलासपूरला जणू जरा कळा चढली, त्यागाचे तेज चढले. आपण त्याग केला नसला तरी आपल्या गावाने केला याचाहीसाऱ्यांना अभिमान वाटतो.

जमनालालजी रात्रीच्या दहाच्या गाडीने अहमदाबादकडे जाणार होते. संबंध दिवसभर ते दमले होते. विश्रांती कोठे होती? विश्रांती? जिवंतपणी विश्रांती नाही. थोराला मरणोत्तर विश्रांती असे न्यायमूर्ती रानडे म्हणत तेच खरे, जमनालालजींनी भोजन केले. निरनिराळे विनोद व गप्पा ते करीत होते. “बाबूचे लग्र नाही का करायचे” त्यांनी विचारले. “नाही म्हणतो एवढ्यात करावयाचे –” रतनशेठ म्हणाले " नका करू एवढ्यात, मोठा होऊ दे. बाबू पुढे सेवा कर बरे का भुलू नको विसरू नको लग्र वगैरे कर - फकीर नको व्हायला; परंतु लग्र करून सेवेलाच वाहून घे" जमनालालजी म्हणाले. “मनात तर आहे. देव बुद्धी कायम ठेवील तेव्हा खरी - "बाबु म्हणाला, "अरे देव सद्बुद्धीच सदैव देत असतो आपण ती ठेवीत नाही - आपण ठेवू तेव्हा खरे असे म्हटले पाहिजे. देवावर लबाडा ढकलतोस का रे - " हसत जमनालालजी म्हणाले.

गोविंदा, हिरालाल साऱ्यांच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवले. 'अडचण येईल तेव्हा कळवा' असे म्हणाले. ते पाया पडू लागले. “ओ, हे काय असे नको” जमनालालजी म्हणाले. त्रिंबकरावांचा होत प्रेमाने जमनालालजींनी हातात घेतला व म्हणाले 'तुम्ही कायमचेच या प्रवाहात मिळा ना. इकडे तिकडे कशाला?' दोन देवांची पूजा नीट करता येत नाही. “पाहू या पुढे कसे होईल ते.” त्रिंबकराव म्हणाले.

शेटजी जाण्यास निघाले. शेटजी नाही भाईजी निघाले. शेटजी हा शब्द जमनालालजींस आवडत नसे. त्या त्यागमूर्तीस तो शब्द रुचत नसे. ते थोर भाईजी निघाले. स्टेशनवर मोटार आली. गोविंदा बाबू त्रिंबकराव साऱ्यांचे अश्रुने डोळे भरून आले. गाडी निघणार इतक्यात गाडीत पटकन शिरून बाबू शेटजीच्या पायावर डोके ठेवले. “वेडा, पुढे चांगला हो.” ते म्हणाले. “तो आमचा दीनबंधू बाबू होणार आहे.” गोविंदा म्हणाला. “व्हा दीनबंधू व्हा. दीनसेवक व्हा.” जमनालालजी म्हणाले. सुटली गाडी. “महात्मा गांधी की जय, देशभक्त जमनालालजी की जय" गर्जना झाली. गेली थोर विभूती चैतन्य देऊन, उत्साह देऊन, संजीवन देऊन गेली. अन्यत्र गेली.

गोविंदा, हिरालाल बाबू, बाबुकडचे गडी मंडप मोडण्यात गुंतले होते. इतर स्वयंसेवकही आले होते. सर्व सामान एकत्र करण्यात आले. रात्रीचे दोन बाजूने गेले होते. उदयिक ज्यांचे त्याचे सामान पोचवायचे ठरले. आता विश्रांती घ्यावयाची. दिवसभर सारी मंडळी थकून गेली. स्वयंसेवकांना सकाळी दुग्धपानास बाबूने आमंत्रण दिले. स्वयंसेवक घरोघर गेले. गोविंदा व त्याचे सहबंधू हे बाबूकडेच निजावयास आले. बाबूने साऱ्याच्या अंथरुण पांघरुणाची व्यवस्था केली. बाबुही त्यांच्या जवळच निजला. जाजम लांबलचक आंथरले होते. त्यावर तोही निजला. निजता निजताही गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. बाबू गोविंदाला काही विचारीत आहे. “गोविंद, तू नाही का रे कधी करणार?" बाबूने विचारले. “ मी काहीच ठरवले नाही परंतु बहुतेक मी करणार नाही. सडाच बस. “गोविंदा म्हणाला. " गोविंद मी लग्न करीन परंतु अजून अवकाश आहे. मला योग्य वधू मिळेल तेव्हाच करीन. जमनालालजीमला अनुरूप वधू देतील. किती रे साधे प्रेमळ. जणू वडिलांसारखेच वाटतात नाही?” बाबू म्हणाला “आमच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा माझ्या डोळ्यात भक्तिप्रेमाचे, कृतज्ञतेचे अश्रु आले होते. भक्तांच्या पाठीवर ध्रुवाच्या पाठीवर तो जगन्नाथ प्रेमाने हात फिरवीत असेल तेव्हा त्यांना काय वाटत असोल याचा परार्धांर्श अनुभव जणू आला. माझ्या मायबापाची मला आठवण झाली.” गोविंदा म्हणाला. “तुझे आईबाप नाहीत का?” बाबूने विचारले. “नाही. जंगलातले वृद्ध नाही ते हेच माझे आईबाप. इतर मुलांचे मायबाप तेच माझे. बाबू तू मात्र आम्हाला अंतर देऊ नको. मी तू म्हणतो म्हणून रागावू नको. मला तुम्ही असे तुला म्हणवत नाही.” गोविदा म्हणाला. “तेच चांगले. मी व तू आता निराळे नाही. गोविंद, माझ्या मनात खूप हिंडावेसे वाटते. तू येशील?” हिंदुस्थानातील ग्रामसंघटनांचे प्रयोग, खादी संस्था, शिक्षण संस्था पाहून. येशील? तू बरोबर आलास तर मला किती आनंद वाटेल. आपण कोण? परंतु कसे एकत्र आलो? तू त्या माझ्या दत्तकविधानाचे दिवशी ते गाणे म्हणत होतास मला वाटले तू माझा भाऊ. तुला येऊन मिठी मारावी परंतु आलो नाही पुढे तुला जणू विसरलो. परंतु बीज मरत नाही. ते हृदयात वाढतच असते. तू माझ्या हृदयाच कोपऱ्यात वाढत होतास. व एक दिवस तुझे सुंदर वाढलेले हाड हृदयाच्या बागेत दिसले. येशील माझ्याबरोबर?" बाबूने गोविंदाचा हात हातात घेऊन म्हटले. “नको, तो मोह नको. तू ऐक. तू ती अनुभव संपत्ती घेऊन ये. एक पाहून आला तरी पुरे. मी गेलो तर येथे कामाला कोण? आम्ही पाच पंचप्राण आहोत. एकही गेला तर बाकीचे चार मरतील व मी एकट्याने हिंडायला जाणे बरे नाही. कधीही मत्सराचे बीज उगवेल. असे वागता कामा नये. आमच्या कोणाच्या मनात मत्सर येईल असे नाही परंतु जगात फार जपून व सावधानगिरीने वागावे लागते. मत्सर फार सूक्ष्म आहे. नारूचा जंतू जसा केव्हा पायाबरोबर पोटात नाईल त्याचा नेम नसतो. त्याप्रमाणे हे मत्सराचे जंतु फार सूक्ष्म केव्हा जीवनात प्रवेश करतील याचा नेम नसतो. बाबू तू गेलास म्हणजे मीच गेल्याप्रमाणे आहे. मी आहेच तुझ्याजवळ तुझ्या हृदयात. नाही? गोविंदा म्हणाला.”हो, हो” बाबू म्हणाला "आपण आता निजू हां” गोविंदा म्हणाला. “निजू” बाबू म्हणाला. ते सेवेला वाहून घेतलेले जीव तेथे थकून निजले होते. परमेश्वर त्यांच्या भोवती कौतुकाने फिरत होता. वाऱ्याच्या रूपाने त्यांना कुरुवाळीत होता.

मिळालेल्या तीन हजार रकमेचा निधी करून खादी सेवासंघ ही कायमची संस्था नोंदली गेली. खादी हेच तिचे काम. मर्यादित व निश्चित क्षेत्र. गोविंद, हिरालाल, रामभाई, मुकुंदा, जीवन सारे उत्साहाने कामे करू लागले..

गणपतरावांनी आज रोजच्याप्रमाणे शाळेचे टपाल पहिले. एक सरकारी खलिता आलेला होता. गणपतरावांनी तो फाडला. आतील मजकूर वाचून त्यांना वाईट वाटले. तुमच्या संस्थेत त्रिंबक यशवंत जोशी म्हणून जी व्यक्ती आहे, ती काढून टाका. नाहीतर ग्रँट बंद करण्यात येईल असे वरच्या शिक्षणाधिका-यांकडून लिहून आले होते. मामलेदारांचे हे सारे कारस्थान हे गणपतरावांच्या ध्यानात आले. त्रिंबकरावांना निरोप देणे आता प्राप्त होते. काय करणार? मोलवान जमलेली माणसे स्वत:च्याच हाताने दूर करावयाची? आपणच हरांसाठी जमवलेली, वेचून आणलेली सुंदर सुगंधी फुले फेकून द्यायची? याहून कठीण व दुष्ट दुसरे काय? याहून दुर्दैव ते कोणते?

तास संपला होता. शिक्षक आपापली पत्रे पाहात होते. गणपतरावांनी तो खलिता त्रिंबकरावांच्या हाती दिला. दोघांच्या डोळ्यात पाणी आले. “मला याची स्वप्ने पडू लागलीच होती. शेटजी परवा म्हणाले, दोन देवांची पूजा नीट करता येत नसते. अव्यभिचारिणी भक्तिशिवाय फळ नाही. प्रभू मला अव्यभिचारिणी खादीसेवा करावयास नेत आहे. चांगले आहे. येथे मुलांच्या मनात बी पेरता येई म्हणून आनंद होत असे परंतु त्याची इच्छा. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमचे किती प्रेम, मजवर किती विश्वास मला पगारा कधीही द्यावा - तुम्ही मला जणू स्वतःच्या लहान भावाप्रमाणे वागवलेत. तुमचे व इतरांचे प्रेम मी कधी विसरणार नाही. या लहान संस्थेतून आपण वेगळे झालो, तरी समाज या मोठ्या संस्थेचे आपण घटक आहोतच.” त्रिंबकराव म्हणाले.

त्रिंबकराव वर्गावर जावयास निघाले. आजचा शेवटचा तास माझा शेवटचा तास. त्यांचे हृदय भरून आले. वर्गात गेले, परंतु त्यांच्याने बोलवेना. काय बरे झाले? मुले स्तंभित झाली. बाबू चकित झाला. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, हा माझा शेवटचा तास आहे. उद्यापासून मी या लहान शाळेत तुम्हाला भेटू शकणार नाही. बाहेरच्या विशाल देशाची कशी स्थिती. हे यावरूनच ओळखा. खादीसारख्या कामात भाग घेणारा शिक्षक सरकारला नको. आपल्याला आज सर्वांकडून बांधले आहे. यातून तुम्ही बाहेर पडा.

शिकून गुलाम नका होऊ. हमाली करा, शेतात खपा, भूमातेची पवित्र धूळ अंगाला लागू दे. खादी विणा. शिकणे म्हणजे चार विचार मनात खेळवण्यासाठी असते. ते नोकरीसाठी नसते. मनाची वाढ करणे म्हणजे शिक्षण. तुम्ही बी. ए. एम. ए. होऊन हमाली केली तर त्यात भूषण आहे. स्वातंत्र्य आहे. त्यातच आहे. त्यातच ज्ञानाचा व विद्येचा मान आहे. कारकुनी करून, गुलामगिरी पत्करून ज्ञानाचा उपर्मद नका करू, अपमान नका करू. मी तुम्हाला कधी कमी अधिक बोललो असेन तर क्षमा करा. ते विसरा. उपनिषदात म्हटले आहे - “याति यस्मांक सुचारितानि ताति त्वं करू - तो इतराणि” जे माझ्यात थोडेफार चांगले पाहिले असेल ते घ्या. वाढीस लावा. तेवढेच स्मरा, बाकीचे विसरा. तुमच्या प्रेमाचा मी कायमचा ऋणी आहे. ललित, तुला मी कधी बोललो असेन. परंतु मत्सराने नाही. मी माझ्या सख्ख्या भावांनाही बोलतो. काही मनात किंतु बाळगू नका. निर्मळ व विशुद्ध मनाने आपण परस्परांचे निरोप घेऊ या. भावी आयुष्यात जर एकमेकास आपण भेटलो तर या मधुर स्मृती त्या वेळस काढूया. मी काय सांगू दुसरे ?” अशा निरनिराळ्या गोष्टी करण्यात तास गेला. दुसऱ्या वर्गावर आता त्रिंबकराव गेले. तेथेही त्यांनी मुलांचा निरोप घेतला.

शिक्षकांना ही वार्ता मधल्या सुट्टीत समजली व सर्वांना वाईट वाटले. त्रिंबकराव मनमिळाऊ, सदैव उपयोगी पडणारे, प्रेमळ होते. कोणाच्याही मनात त्यांचेविषयी द्रोह, मत्सर नव्हता. ही सरकारची ग्रँटच कशाला, असे उद्गार अनेकांनी काढले. परंतु ग्रँट बंद करावयाची म्हणजे शाळेचा तितका खर्च कमी करायला हवा. काही शिक्षकांनी मग आपले पगार कमी करायला हवे. व पत्रासच्या वर कोणी पगार घेऊ नये असे ठरवायला हवे. परंतु इतकी स्वातंत्रप्रियता सर्वांच्या ठाई नव्हती. त्रिंबकरावांनी सर्व सहकरी शिक्षकांचा निरोप घेतला. शाळा सुटली व त्रिंबकराव आजही रोजच्याप्रमाणे मुलांत खेळले. सायंकाळी ते आपल्या खोलीत गेले. आता उद्यापासून काय? हा प्रश्न त्यांच्या डोळ्यांसमोर होता. बाबूला शिकवायला ते जातच असत. तेवढ्या पैशांवरही त्यांना जगता आले असते. इतर वेळ तेथेच राहून काहीतरी लिहिण्यात घालवावा, खादी विकावी, गावात खादीची फेरी काढावी, येथे मुलाचे खाजगी मोफत वर्ग घ्यावे व जर कोणी दिले काही तर ते खादी कार्याला द्यावे असे त्यांनी मनात ठरवले.

दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हा कार्यक्रम सुरु झाला. सकाळी बाबूला शिकवायला जात. दुपारी काही ग्रंथ वाचीत व लिहीत. सायंकाळी खादी विकावयासाठी फेरी काढीत. खादीभांडारातील खादी हातगाडीवर घालून खादीची गाणी म्हणत ते निःशंक सर्वत्र हिंडत. त्यांना त्यात लाज वाटत नसे. रात्रीचा वर्ग त्यांनी सुरु केला. सोमवार, मंगळवार गणित, बुधवार गुरुवार संस्कृत, व शुक्रवार शनिवार इंग्रजी असे विषय ते शिकवित. रविवारी सकाळी ते मुलांना व्याख्यान देत व कोणत्याही विषयावर बोलत. कधी एखादा कवी, कधी राजकारण, कधी स्वदेशी, कधी समाजसत्तावाद, कधी भारतीय संस्कृती - अनेक विषयांवर ते बोलत. याप्रकारे विद्याथ्र्यांशी त्यांनी आपला संबंध ठेवला. हा सबंध सरकार कसा मोडणार? त्रिंबकरावांना तुरुंगात डांबून परंतु तसे सरकारला अद्याप करता येत नव्हते.

बाबूची मॅट्रिकची परीक्षा झाली. बाबूने आता हिंदुस्थानभर हिंडावे असे त्रिंबकरावांनी सुचवले. “तुम्हीही माझ्याबरोबर चला, तुम्ही आलेच पाहिजे.” बाबूने आग्रह धरला. “ मी गरीब माझ्यासाठी खर्च कशाला करतोस?' त्रिंबकरावं म्हणाले. “तुम्ही बरोबर असलेत तर माझे रक्षण कराल, मला मार्ग दाखवाल, कितीतरी कराल. तुम्ही असे व परक्यासारखे का बोलता?” बाबू म्हणाला. “प्रथम आपण शांतिनिकेतनमध्ये जाऊ. तेथे तुला वाजवण्यास शिकण्याची हौस आहे, तर थोडे शीक व ग्रामसंघटनेचा तेथ एक भाग आहे. त्यातही नाव द्यावे. पाचसहा महिने तेथे राहू. मग अभ्याश्रमात जाऊ. खादीप्रतिष्ठान पाहून. अन्य संस्था पाहू.” गुरुशिष्यांचे ठरले. शांतीनिकेतन आधी विचारण्यात आले. त्रिंबकराव केवळ गाईड म्हणून मार्गदर्शक या नात्याने येणार होते. याप्रमाणे सर्व खुलासा तेथे कळवण्यात आला. तिकडून परवानगी आली व दोन खोल्या आपणा दोघांसाठी ठेवतो असे लिहून आले.

बाबू आता दूर जाणार होता. परंतु रतनशेटनी फार आढेवेढे घेतले नाहीत. “प्रकृतीस जप. उगीच खाण्यापिण्याची आबाळ करू नको. मास्तर तुम्ही याची काळजी घ्या. तुमच्या हातात दिला आहे. पत्र आठ दिवशी पाठवीत जा." वगैरे वडिलांनी सांगितले. आईचा निरोप घेतला. बांधाबांध झाली. गुरुशिष्य यात्रेला निघाले. अफाट भारत देश पाहाण्यास निघाले. सुंदर सुंदर ग्रंथ त्यांनी बरोबर वाचावयास घेतले होते. त्यांनी सुंदर दृश्यांचे फोटो काढण्यासाठी फोटो काढण्याचे सामानही बरोबर घेतले होते. बाबू फोटोग्राफी शिकला होता. हायस्कूलमधील ड्रॉईंग शिक्षकांजवळ बाबू ही विद्या शिकला होता. विलासपूर सोडून ही जोडी निघाली.

महाराष्ट्र व बंगाल दोघांत किती फरक आहे? फरक आहे. परंतु साम्यही आहे. महाराष्ट्रात जिकडे तिकडे डोंगर, किल्ले, पर्वताची शिखरे, दरीखोरी, जंगले, लहान खळखळ करणाऱ्या नद्या, बंगालमध्ये प्रचंड नद्या गंभीर, विशाल पाचपाच मैल रुंद, गंगा, सप्तपुत्रा, मेघना, पंप्रा-गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या फाट्यांनी बनलेल्या अनेक नद्यांची जाळी बंगालभर आडवी उभी पसरली आहेत. गलबते बोटी या नद्यांतून रात्रंदिवस येत असतात. इतर प्रांतातील नद्या बंगालला मिळाल्या. महाराष्ट्रातील नद्या इतर प्रांतात इतर प्रांतांना मिळाल्या. महाराष्ट्राने कृष्णा, गोदा- निजामच्या राज्याला दिल्या, आंध्र प्रांतास दिल्या. आंध्र प्रांतास महाराष्ट्रातील सत्व गोदा व कृष्णा यांनी नेऊन दिले. आंध्र प्रांतास चैतन्य नेऊन दिले. शौर्य धैर्य त्याला नेऊन दिले व स्वतः जणू महाराष्ट्र निर्धन झाला. निर्धन झाला? नाही. सह्याद्री जोपर्यंत आहेत तोपर्यंत या धनाचा पुरवठा महाराष्ट्रास होईल. परंतु इतर प्रांतासह गोदा कृष्णाचे पाणी हे स्फुर्तिजल नेऊन देतील. बंगालमध्ये काशी, मथुरा, हरद्वार, प्रयाग, बुद्धगया या आर्यावर्ताचे मध्यहिंदुस्थानचे सर्व पुण्य सौभाग्य जणू येऊन साचले. गंगा यमुना यांच्या तीरावर फार पुण्यकृत्ये झाली. हजारो याग झाले. ऋषिमुनींनी तपस्या केल्या. हिमालयात अनेक मुनिवरांनी ध्यानधारणा केल्या. शंकराच्या जटाजुटातील ते सारे पावन पाणी बंगालभर पसरले आहे. बंगाल साऱ्या उत्तर हिंदुस्थानची पुण्याही, संस्कृती, बुद्धी, धर्म, तपस्या एकत्र जणू केली आहेत. महाराष्ट्राने दिले, बंगाने जमा केले. परंतु बंगालच्या एका बाजूला अफाट समुद्र आहे. महाराष्ट्राच्या एका बाजूला अफाट समुद्र आहे. महाराष्ट्राच्या काही भागत पाऊस भरपूर पाऊस पडतो. भात पिकतो. जस बंगालमध्ये आहे, बंगालमध्ये साधू झाले, मोठमोठे न्यायशास्त्रवेते झाले, धर्मप्रवर्तक झाले. बंगालमधील विशाल नद्यांमुळे तेथील लोकांची हृदये विशाल झाली, महाराष्ट्रातील उत्तुंग पर्वतशिखरांनी महाराष्ट्राचे विचार उंच नेले. बंगालमध्ये विचार जास्त डोक्यात रमू लागले. एक भावनेने वेडा झाला, एक विचाराने वेद झाला. एकाला भावनांनी विचार शिकवले, एकाला विचारातून भावना मिळाल्या. एकाच्या डोक्याशी पर्वत आहे, एकाच्या हृदयाशी पर्वत आहे. एकाचे डोके पर्वताप्रमाणे स्थिर, परंतु हृदय नाचणारे, एकाचे हृदय स्थिर परंतु डोके नाचणारे. समुद्र दोघांच्या जवळ स्फूर्ती देण्यास उभा आहे. फिकीर मत् करो. मामनुस्मर युद्धच असे सांगावयास उभा आहे. बंगाल पूर्वी मलमलीसाठी प्रसिद्ध, महाराष्ट्र रनविद्येसाठी प्रसिध्द बंगाल कलापूजक होता, मोकळ्या मनाचा, सरळ हृदयाचा, महाराष्ट्र आतल्या गाठीचा, जरा तिरसट व एकांडे शिलेदारी वृत्तीचा. बंगाली मनुष्य अघळपघळ, स्वस्थ, जरा सुखासीन, विडा खाऊन तोंड रंगलेला, अंगावर चादर, डोक्यावर काही नसलेला रंगेल, दिलदार असतो. महाराष्ट्रीय मनुष्य ठाकठीक, संयमी, अस्ताव्यस्त न पडलेला घोंगडीवाला, डोक्याला रुमाल बांधलेला, हाता काठी, पायात वाहणा, तोंडात फार तर सुपारीचे खांड असा असतो.

बंगालमध्ये गेल्या शतकात केवढाल्या थोर व्यक्ती झाल्या. महान विभूती झाल्या. त्रिंबकराव बाबूला सांगत होते, प्राचीन काळातील चैतन्य व गदाधर जावोत; परंतु हल्लीच्या अर्वाचीन काळातील पाहा थोर थोर तारा मंडळ, राजा राममोहन रायांपासून आरंभ झाला. थोर व्यक्तीचे पीक आले. राममोहन, विद्यासागर, केशव चंद्रसेन, प्रतापचंद्र मुजुमदा, देवेंद्रनाथ, रवींद्रनाथ, शिशिरकुमार घोष, सुरेंद्रनाथ, अरविंद, अश्विनीकुमार, वीरेंद्र, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, नागमहाशय, मायकेल मधुसूदन दत्त, नवीनचंद्रसेन, तरुलता दत्त, शरदचंद्र, दिलीपचंद्र राय, अनेक खुदीराम, ज्योगींद्र, जनींद्र, गोपानाथ यांच्यासारखे हुतात्मे, आशुतोष मुकर्जी, जगदीशचंद्र बोस, प्रफुल्लचंद्र, देशबंधू दास, सुभाषचंद्र, गुप्तसेन अबूल अलम आझाद, अंबिकाचरण मुजुमदार, लालमोहन घोष, ब्रह्मबांधव उपाध्यय भूपेंद्रनाथ भूदेव मुकर्जी, दासनिहारी घोष, महंद्रलाल, मतिलाल घोष, अवनींद्रनाथ टागोर, श्यामसुंदर चक्रवर्ती, विपिनचंद्र पाल, सरोजिनी देवी, सरला देवी, 'रामानंद चतर्जी एक का दोन निरनिराळ्या क्षेत्रातील थोर विभूती मला, वाङ्मय, शास्त्रे, राजकारण, धर्म सर्व क्षेत्रात चमकलेल्या पूज्य व वंद्य विभूती ! त्याग. बंगालने जितका त्याग स्वदेश सेवेत ओतला तितका इतर प्रांतांच्या वाट्यास क्वचितच असेल. त्यागात बंगालचा पहिला नंबर आहे . सेवेस जीवन वाहिलेले जितके बंगाली तरून दाखवता येतील, तितके अन्य प्रांतात दाखवता येणार नाहीत. पावन व विशाल गंगेची मुले ती. विशाल, निरभ्र आकाशातील चंद्राच्या शुभ्र ज्योत्स्नेवर पोसणारी मने ती. अफाट मोकळ्या मैदानावर नाचणारी लेकरे ती - ती त्यागासाठी भराभरा पुढे आली. रामकृष्णांनी साऱ्या बंगालचे हृदय शुद्ध केले. राष्ट्रात सुद्धा श्रमविभाग असतो. कोणी राष्ट्रमंदिरापुढचे आंगण झाडतो. कोणी अंगणाभोवती झाडे लावतो कोणी काही करतो. रामकृष्णांनी हृदय शुद्ध केले. गाभा-यात दिवा लावला व त्या दिव्याचा प्रकाश सर्व मंदिरांत भरला.

भागीरथीवरील शीतलवाऱ्यांनी पवित्र होणारी ती रंगभूमी बाबूने पाहिली हिरवीनिळी भाताची शेते पाहिली. उंच तरुराजी पाहिल्या. कमळे दिसू लागली. पावनभूमी तो पाहू लागला. त्याने वंदन केले. आपण येथून महाराष्ट्रात भावनांनी हेलावणारे हृदय घेऊन जाऊ असे त्याने मनात ठरवले.

शांतिनिकेतनमध्ये ही जोडी आली. ज्या स्थानी महर्षी देवेंद्रनाथ टागोर तासन् तास, दिवसानुदिवस ध्यान धरून राहत, परमात्म्यात विलीन होत त्या पवित्र जागी परमात्मा व जीवात्मा यांच्या मीलनस्थानी गुरुदेव कवींद्र रवींद्रनाथांनी मुलांमुलींची मने फुलवण्यासाठी बाग तयार करणे चालवले होते. येथे पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीची कलमे लावून नवीन रंगी सुरंगी संस्कृतिपुष्पे ते फुलवणार होते. ते मुख्य माळी. प्रेमपूर्ण माळी. त्यांच्या हाताखाली तर माळी जमा झाले. फुले फुलू लागली. बाग उठू लागला. भरू लागला. पाखरे नाचू लागली, कुंजन करू लागली, कमळे फुलू लागली; भुंगे गुंजारव तेथे करू लागले. लहानशा शांतीनिकेतनाचे विश्वभारतीत रुपांतर झाले. लहानशा अंकुराने त्रिभुवन व्यापले. कल्पनासृष्टीतील रवींद्र येथे प्रत्यक्ष सृष्टीत खेळत होता. कल्पनासृष्टीतील फुले, फळे येथे प्रत्यक्ष सृष्टीत फुलवू, पिकवू पाहत होता. कल्पनासृष्टीतील कवी येथे माळी झाला होता, शेतकरी झाला होता, गवंडी झाला होता, शिल्पकार झाला होता.

स्थानाला व्यक्तीने माहात्म्य येत असते. तपस्येने महात्म्य येत असते. काशीत शिवाची तपस्या, बुद्धगयेला भगवान बुद्धांची, प्रयागला गयासुराचे बलिदान ! बेवूरला रामकृष्णाची, शांतिनिकेतनमध्ये देवेंद्रनाथांची व रविंद्रनाथांची !

जसेजसे शांतीनिकेतन जवळ येत होते, तसेतसे बाबूचे हृदय नाचत होते. नवीन मित्र, नवीन स्नेही, नवीन वातावरण, निराळे जग. त्याने थोडाथोडा बंगालीचा अभ्यास सुरू केला होता. गाडीत ते दोन दिवस मधूनमधून चालचलावू वाक्ये पाठ करीत होते. आले शांतिनिकेतन आले.

व्यवस्थापक अत्यंत सभ्य होते. त्यांनी लगेच व्यवस्था लावून दिली. त्रिंबकराव व बाबू यांच्या शेजारी शेजारीच खोल्या होत्या. नवीन जीवन सुरु झाले. नवीन अनुभवासाठी म्हणून तर ते तेथे आले होते.

बाबूसंगीत वर्गात जाऊ लागला. विशेषतः वादन त्याला आवडे. सतारीचा थोडाफार अभ्यास करण्याची त्याला इच्छा होती. त्याच्या वडिलांना सतार फार आवडत असे. बाबू संगीत-वादन शिकू लागला. त्रिंबकराव ग्रामसंघटनेच्या वर्गाला जात. मुलांबरोबर शेजारच्या खेड्यांतून जात. खेड्यात कशी सेवा करावयाची ते शिकत होते. काही मंडळींनी एका खेड्यातील रस्ते दुरुस्त करण्याचे ठरवले होते व गटारे बांधावयाचे ठरवले होते. कधी मॅजिक लॅटर्न द्वारा बालसंगोपन शिकवण्यात येई, गोपालन शिकवण्यात येई. बंगालमध्ये म्हशीचे दूध पिणे निषिद्ध मानतात हे पाहून त्रिंबकरावास आश्चर्य वाटले. गोपालनास ही गोष्ट आवश्यक आहे असे त्यांना वाटले. म्हशीचे दूध पिणे - विदेशी वस्त्र वापरणे याप्रमाणे निषिद्ध मानले पाहिजे. म्हैस हा चीनमधील दलदलीत राहणारा प्राणी आहे. हिंदुस्थानचे राष्ट्रीय जनावर म्हणजे गाय गोपालकृष्णाची, बन्सीधराची गाय.

त्रिंबकराव वाचीत. विशाल ग्रंथालय तेथे होते. वाचनालय प्रचंड होते. हिंदुस्थानातील व जगातील शेकडो ठिकाणची व शेकडो भाषांतील वर्तमानपत्र व मासिके व नियतकालिक येथे येत. गुरुदेवांना इटलीत, जर्मनीत त्या त्या राष्ट्रांतील पुस्तक कंपन्यांनी दिलेले उत्कृष्ट ग्रंथसंग्रह तेथे होते; इस्लामी संस्कृतीवरचा भरपूर ग्रंथसंग्रह होता. रवींद्रनाथांसंबंधी आतापर्यंत जगातील ज्या ज्या भाषेतील वर्तमानपत्रात व मासिकात जे काही लिहिले गेले ती सगळी कटींग्स एके ठिकाणी करून ठेवलेली चिकटबुके त्यांचे बारा प्रचंड खंड होते तेथे ! रवींद्रनाथांकडे जग कसे कसे पाहत आहे हे या खंडात दिसून येईल.

तेथे बालविभाग, बालिका विभाग होता. नंतर मध्यम श्रेणी, नंतर उच्च श्रेणी अशापायऱ्या होत्या. मुलांवर बंधने नसत. मुले झाडावर बसत, झाडाखाली बसत. विशाल आकाश, विशाल धर्तीचे यांचेच मुख्य शिक्षण दिले जाते. निसर्ग हा सर्वात थोर गुरु तेथे होता. नंतर निसर्गात तल्लीन होणारे कविवर हे दुसरे गुरु नंतर इतर.

कधीकधी प्रार्थनांना जेव्हा गुरुदेव असत व ते स्वतः एखादे गीत म्हणत. त्या वेळेस केवढा पूज्य भाव हृदयात जमा होई. पावित्र्याचा खोल ठसा जीवनावर उमटे जणू मनाचे अणुपरिमाणू निराळे होऊन जात.

बाबूची सतार वादनात भराभरा प्रगती होऊ लागली. तो रात्री पहाटे तिच्यावरच मेहनत घेई. तो इतर जणू विसरला. एकदा थोडी कला हस्तगत करून घेऊ मग आपण घरी वाढवू असे तो मनात म्हणत होता. बाबूच्या बोटात मधुरता होती. तो असे कोमल सूर काढी ते फार गोड लागत. बोटे बिजलीसारखी त्यांची चमकू लागली. आजपर्यंत जणू त्याचा हा गुण सुप्त होता, मनुष्याच्या पूर्वजन्मीचे अनेक संस्कार जणू निद्रीत असतात. ते केव्हा प्रकट होतील याचा नेम नसतो.

त्रिंबकरावांना तेथे महाराष्ट्रीय संस्कृतीवर व्याख्यानमाला गुंफण्यास सांगण्यात आले. त्रिंबकरावांची तेथे सर्वांजवळ ओळख झाली. त्रिंबकरावांचा साधा तपस्वी स्वभाव, त्यांची विरक्ती व भक्ती, प्रेमळता, त्यांचे कविहृदय यामुळे ते जणू बंगालीच आहेत असे वाटले, एक दिवस तेथील ग्रंथालयाचे प्रमुख कालीचरण त्यांना म्हणाले, “तुम्ही बंगालमध्ये जन्मायचे ते तिकडे कोठे गेलेत” बंगालचे हृदय महाराष्ट्रात ओतण्यासाठी बंगालची भागीरथी, तापी गोदेत ओतण्यासाठी. पूर्वी आपणात अशी पद्धत होती की काशीची गंगा रामेश्वराच्या देवावर नेऊन ओतावयाची व तेथील वाळू महादेवाला काशीत नेऊन वाहावयाची. हेतू हा की, उत्तरेकडची संस्कृती दक्षिणेकडे न्यावयाची दक्षिणेकडची उत्तरेकडे. चैतन्य दक्षिणेत प्रवासात गेले, शंकराचार्य, उत्तरेकडे दिग्वीजयासाठी आले. संस्कृतीची देवाण-घेवाण करावयाची, वाढावयाचे. विश्वभारतीचे हेच ध्येय आहे. भारताचे ध्येय जे आज आपण विसरलो. ते विश्वभारतीद्वारा गुरुदेव पुन्हा तरुणांसमोर - तरुण उद्योन्मुख भारतासमोर ठेवीत आहेत. “तेलगु भाषेत, त्रिंबकबाबू, भारती म्हणून कवी झाला त्याच्या एका काव्यात त्याने हेच विचार प्रकट केले. कावेरी गोदेच्या हातात हात घालील. मदुरा काशीला मिळेल. महाराष्ट्र काव्यगंगा तामिळ काव्याला भेटायला येईल. हिंदी शब्द दक्षिणेस येतील व तेलगू तामीळ उत्तरेकडे जातील ! महाराष्ट्रातील, उत्तरेकडील संस्कृती त्रिचनापल्ली, कांची, कुंभकोणम् येथे मिळू लागेल. विजयनगरची संस्कृती वरती जाईल. भारत एक होईल. एक विराट संसार, प्रचंड गगनचुंबी शतमनोऱ्यांचे भारताचे संस्कृती मंदिर !”

कालीचरण म्हणाले, “डोळे आनंदाश्रूनी भरून येतात, हृदय गहिवरते, तनु पूलकित होते.” त्रिंबकराव म्हणाले, “रामाला जेव्हा भरत भेटला तेव्हा असेच तुलसीवासजींनी वर्णन केले आहे."

“राजीवलोचन स्त्रवत जल तन ललितपुलकावली वनी” रामाला भरत भेटला ध्येय भेटले हृदय भेटले ! रामाला जेव्हा भरत भेटतो, जीवाला जेव्हा ध्येय भेटते, आत्मारामाला ध्येयभरत भेटतो तेव्हा हृदयाची अशीच स्थिती होते. असे चालता चालता एक दिवस त्रिंबकरावांवर हा प्रसंग आला. महाराष्ट्रीय संस्कृतीवर व्याख्यान देण्याचे ठरले. त्रिंबकरावांनी सारी महाराष्ट्रसंस्कृती डोळ्यसमोर आणली. निरनिराळे महाराष्ट्रीय संस्कृतीतील प्रवाह पहिले. डोळ्यांसमोर उभे केले. एक वारकरीपंथाचा प्रवाह, एक धारकरीपंथाचा प्रवाह; महाराष्ट्र म्हणजे युध्दसंस्कृती आहे. अंत:करणात झगडणारे संत व बाहेर स्वातंत्र्यासाठी झगडणारे शूर महाराष्ट्र संस्कृती म्हणजे मोक्षाची संस्कृती, अंतर्बाह्य मुक्तीची संस्कृती. महाराष्ट्रासंस्कृतीचे प्रतिनिधी पुरुष त्यांनी डोळ्यांसमोर आणले. ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, शिवाजी, वामन व मोरोपंत, पोवाडेवाले, पेशवे, रामशास्त्री, मुक्ताबाई, जिजाबाई, उमाबाई, अहिल्याबाई, लक्ष्मीबाई पंचकन्या आठवू लागले. महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे काय? समुद्र, किल्ले, दरीखोरी, गुफा व लेणी, गुहा म्हणजेमहाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र परमार्थपर आहे. शिवाजी महाराजांनी ताजमहाल बांधले नाहीत, रंगमहाल बांधले नाहीत; परंतु प्रतापगडाच्या देवीचे मंदिर सोन्याने मढविले. पेशव्यांनी बांधलेला शनिवारवाडा त्याला सोन्याचांदीचा स्पर्श नव्हता; परंतु पर्वतीला सोन्याचे कळस चढवले. देवाच्या मूर्ती सोन्याचांदीच्या केल्या. महाराष्ट्राचे वैभव हे देवांचे वैभव, धर्माचे वैभव.

त्रिंबकरावांनी महाराष्ट्रीय संस्कृतीचा इतिहास यावर सुंदर व्याखाने दिली. आठवड्यातून दोन व्याखाने देत. दोन महिने मिळून पंधरा व्याखाने झाली. विश्वभारतीने ती व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. त्रिंबकरावांनी त्याचे मराठी भाषांतर जास्त वाढवून प्रसिद्ध केले. विश्वभारतीने महाराष्ट्रीय वाड्मयात भर घालण्याला संधी दिली! महाराष्ट्रावर तिचे थोर उपकार ! महाराष्ट्रातील तरुणांनाच नाही वृद्धांनाही ते पुस्तक फार आवडले.

“तुम्ही विश्वभारतीतच राहा ना. महाराष्ट्राचे इंटरप्रीटर महाराष्ट्रीय हृदयाचे, महाराष्ट्रीय मनाचे अविष्कार करणारे तुम्ही येथे राहा. महाराष्ट्राचा अर्थ आम्हाला सांगत जा. महाराष्ट्र कसा वाढत आहे ते सांगत जा. महाराष्ट्रातील वाढत्या भावनांचा, वाढत्या विचारांचा इतिहास सांगा." परंतु त्रिंबकरावांनी ते मान्य केले नाही. “आज माझी अन्यत्र जरूर आहे. माझे हृदय मला अन्यत्र जावयास सांगत आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून असलेल्या बंधुभगिनींच्या दारिद्रयाची अजून कोठे मी ओळख करून घेतली आहे? तेथे जाऊ दे. आधी तेथे जाऊ दे. आज सर्वांचा प्रथम धर्म आत्ममुक्ती हा आहे. दारिद्रयपूजन हा आहे. ज्याला ते जमणार नाही त्याने इतर मग स्वधर्म अवलंबावे; परंतु माझा स्वधर्म तरी तोच आहे. "

त्रिंबकरावांप्रमाणेच बाबूही प्रिय होऊ लागला. तो तेथे खेळे, पोहावयाला जाई. कधी वनविहारास जाई. गमतीच्या गोष्टी सांगे. त्याला नकला येत असत. महाराष्ट्रातील मोट तो नाकाने चालवून दाखवी तेव्हा, तर खरी मजी येई. कधीकधी तो नाकाने सतार वाजवी. महाराष्ट्रातील गंमती सांगे. आपण फटाके म्हणून खादी कशी नेली हे सांगे व ती गोष्ट ऐकून मंडळी खूप हसली.

बाबू आता बंगाली नीट बोले, वाची व लिही. चांगली चांगली बंगाली पुस्तके तो मुळांतून तो वाचू लागला. त्रिंबकराव तेथे उर्दू शिकले. हिंदू माणसास आपले बांधव जे मुसलमान त्यांची भाषा आलीच पाहिजे असे ते म्हणत. अशाप्रकारे गुरुशिष्य दोघे मानसविकास करून घेत होते.

बाबूबरोबरचरखा होता. बाबूचरख्यावर नियमित सूत काती. तेथील काही विद्यार्थी या सूत संस्कृतीस नावे ठेवीत; परंतु बाबू म्हणे, “प्रफुल्लचंद्र राय यासारखे शास्त्रज्ञही या चरख्याची आज वृद्धपणी उपासना करतात ते का वेडे म्हणून? त्यांना मंत्रविद्या व शोध यांची महती कळत का नाही? खादीची जरुरी मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे व पुढे त्याच कामाला मी वाहून घेणार आहे.” मग हे सतार वादन व बंगाली वाचन कशाला? हलधरने विचारले. “खेड्यातील माझ्या बंधू भगिनीस रात्री - चांदण्या रात्री आनंद देण्यासाठी. मी त्यात खादी नेईन व संगीत नेईन" बाबू म्हणाला. बाबूने काही बंगाली बाबूस सूत कातावयास लावले. नवीन चरखे तेथे आले. बाबूला आनंद झाला.

कधी बाबू महाराष्ट्रीय पक्वाने करावयाचा व आपल्या मित्रांना करून द्यायचा. ते मिटक्या मारून खात. बंगाली रसगुल्ला व संदेश बाबूही आवडीने खाई. त्रिंबकरावांनी पुरणाच्या पोळ्या भाजल्या एकदा. त्रिंबकराव आईजवळ लहानपणी शिकले होते. पुरणाचा गोळा लहानशा पारीत जिरवण्याची ती अजब कला पाहून बंगाली बाबू हसत. थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ हे जसे उत्कृष्ट व श्रेष्ठ मानतात, तसे थोड्या कणकेत खूप पुरण जो भरतो तो' उत्कृष्ट पोळी भाजणारा. विचारांची मेजवानी चालली होती व या बाह्य पक्क्वानांच्याही मेजवान्या चालल्या होत्या. जीभ, कान रंगे; तर बंगाली पक्क्वाने खाऊनही विरघळे. कान बंगाली संगीताने रमत. डोळे बंगाली वेषाने, बंगालच्या दृष्टीसौंदर्याने रमत. मजा चालली होती. धान्याची भाकर व मनाची भाकर दोन्ही खाऊन तनमन पुष्ट होत होते.

भाद्रपद महिना होता. अजून पूजा दिवस यावयास अवकाश होता. जिकडे तिकडे सस्यशामला वंगभूमी सुंदर वाटत होती. भाताची शेते हिरवी काळी डोलत होती व वारा वाहू लागला म्हणजे जशा लाटा नाचतात तशा त्या शेतांवर त्या हिरव्या लाटा नाचत. शेतकरी खेड्यापाड्यातील घरात आनंदाने बसले होते. कामेधामे संपली होती. चरखे आता सुरु झाले. रिकामपणी चरखे सुरु झाले. जेथे चरख्याचा संदेश जाऊन पोचला होता तेथे चरखे सुरू झाले. जेथे चरखा नव्हता तेथे इतर उठाठेवीत, भांडणांत वेळ जात होता.

परंतु एकाएकी बंगालमध्ये पूर आले. नद्यांना प्रचंड पूर आले. हिमालयाच्या उतरणीवर प्रचंड पाऊस पडला. पद्मा, मेघना सर्वत्र पसरल्या. सर्वनाशी पद्मा काळाप्रमाणे विशाल जबडा पसरून शेकडो गावे गिळंकृत करू लागली. गायी,गुरे,झाडेमाडे, पशुपक्षी, स्त्रीपुरुष, लहान बाळे सर्वत्र पोटात गिळू लागली पद्मा. सर्वत्र हाहाकार उडाला. भीषण दृष्ये, भयंकर देखावे. मैदानाचे समुद्र झाले. झाडे माडे त्यांचे अग्रभाग पाण्यात माशासारखे दिसत होते. लाखो साप शेकडो रंगाचे हरे, काळे, पिवळे, पांढरे, पट्ट्यांचे झाडावरून चढले होते. एकमेकांच्या अंगावर लपेटून बसले होते. त्या पाण्यातून नौका टाकून त्या सापांना पकडण्यासाठी रानटी लोक ते पाहा प्राणाचे मोल देऊन खेळकरीत आहेत. कोठे आर्त स्वर कानी येत आहेत. गावात पाणी शिरले अशी हाकाहाक होते आहे तोच पाणी घरातून शिरत आहे, घरे पडत आहेत. पाळण्यातील निजलेली मुले तशीच नंद्यांच्या हालत्या झुलत्या पाण्यावर त्या मोठ्या पाण्यावर वाहत गेली. बंगालभर हाक गेली. तो बंगालचा सखा गोरगरिबांचा आधार ती प्रफुल्लचंद्राची वृद्ध मूर्ती उभी राहिली. स्वयंसेवाकांना त्यांनी बोलविले. पूर ओसरला, जिकडे तिकडे पडापड. गावे होती की नव्हती अशी स्थिती काही ठिकाणी झाली. घरांची ज्योती, पाये होते काही विटादगड होते यावरून गाव होते अशी कल्पना होत होती.

ठिकठिकाणी साहाय्यमंडळे, आधारगृहे उघडण्यात आली. पैसे, धान्य, कपडे यांची जमवाजमव सुरू झाली. बाबू व त्रिंबकराव यांनी स्वयंसेवकात नाव नोंदवले व ते गेले. ते ठिकठिकाणी हिंडून मदत जमवू लागले. कोणाला कपडे, कोणाला धान्य, कोणाला गुरे विकत घेण्यास पैसे, कोणाला झोपडी बांधावयास द्रव्य, काय नको होते? गरिबांची दशा पाहून हृदय तीळतीळ तुटे मदत कोठवर पुरणार?

फाटके वगैरे कपडे जी मदत मिळाली होती, ते शिवून देण्यासाठी एक भगिनी मंडळही बसले होते. फाटक्या कपड्यांना टाके घालून गरिबांना देण्यात येत असत. त्या भगिनी मंडळात ती पाहा एक मुलगी स्वयंसेविका म्हणून आली आहे. कसे भराभरा टाके घालीत आहे. “अगं, मृणालिनी नीट घाल गं टाके, अशी वेठ नको मारू." ती म्हणाली, “हं वेठ मारला असे वाटते? तुझे फारच किती कपडे पडले आहेत जणू पर्वत” मृणालिनी म्हणाली. “अगं त्या गरिबांच्या अंगावर चार दिवस तरी राहावयास नको का? मी काही तुझा अपमान करण्यासाठी नाही म्हटले.” माया म्हणाली. “देव तरी बाई कसा असा दुष्ट. या गरिबांनी काय केले होते?” हेमलता म्हणाली. “गरिबांचे पातक नाही. हे आपले श्रीमंत पातक आहे. श्रीमंताच्या हृदयात प्रेम उत्पत्र करावयाचे आहे, म्हणून हे निष्पापाचे बलिदान चालले आहे. श्रीमंतांना सेवेचे धडे देण्यासाठी परमेश्वर शेवटी अशा भीषण शाळा उघडतो. स्मशानात आपणास बसवून तो प्रेम शिकवू इच्छितो! तरी मृणालिनी धडा शिकत.” माया म्हणाली.

“हो, धडा शिकायचा नसता तर आले असते वाटतं शाळा सोडून, मॅट्रिकची परीक्षा आहे म्हटलं यंदा माझी" मृणालिनी म्हणाली. “मॅट्रिक होऊन काय गं करणार?" मायेने विचारले.

“ते नाही अजून मी ठरवले." मृणालिनी म्हणाली. “मायेचे आपले बरे आहे. मायेने सूतिकशिक्षण घेणे चालविले आहे. माये, लग्न नाही का गं तू करणार?” हेमलतेने विचारले. "मी कोणत्या तरी आश्रमाला वाहून घेईन. नाहीतर बाबांच्याच आश्रमाला वाहून घेईन. तेथे रुग्णालय आहे." माया म्हणाली.

“अभयाश्रम किती छान काम करतो आहे. अभयाश्रमाने प्राथमिक शिक्षणाच्या शाळा चालविल्या आहेत; खादी काम आहेच. माये, अभयाश्रमातच तू राहणार? अविवाहितच राहणार?” हेमलतेने पुन्हा विचारले.

“अगं ते बघ आले कपडे नेण्यासाठी शिवा चटाचट" माया म्हणाली. बाबू, हलघर दोघे येत होते. “किती झाले कपडे शिवून?" बाबूने विचारले, “हे या बाजूचे, हे घ्या” मायेने म्हटले. “एवढेच का, आम्ही पुरुषांनी यापेक्षा पटापट शिवले असते.” बाबू म्हणाला. “तोंडाने नको, प्रत्यक्ष शर्यत लागू दे.” माया म्हणाली.

“हलधर, बसू रे पंधरा मिनिटे. पाहूया कोण जास्त शिवतो ते?” बाबू म्हणाला.

“येथे शर्यत लावता कशी येईल? काही कपडे कमी फाटके, काही चिंध्या तुम्ही ते कपडे घेऊन जा. इथे आमच्या कामात अडथळा नको.” माया म्हणाली.

"आम्हि अडथळा थोडाच करतो. " हलधर म्हणाला.

बाबूने कपडे उचलले “चल हलधर तिकडे ती मुले कुडकुडत आहेत. तो मुलगा अगदी लहान. त्याला अंगात घालण्यासारखे लहान नाही का आंगडे?” “तुम्ही जा. मी आणून देते सापडले तर " माया म्हणाली. गेले. हलधर बाबू गेले. ते कपडे देण्याचे काम करीत होते. कपडे सॉर्टिंग करीत. धोतरे, सदरें, कोट एका बाजूला काढीत.

बाबूने आपल्या वडिलांना इकडील दुःस्थितीचे वर्णन करून पाठवले व आपल्या मिलतर्फे काही कापडाच्या गाठी पाठवण्यास लिहिले. बाबूच्या वडिलांनी पाच हजार रुपयांचे कापड पाठवून दिले. बाबूला आनंद झाला होता. ते कापड अजूनपर्यंत मिळाले नव्हते.

"ही पाहा दोन लहान आंगडी आहेत. हे त्या मुलाला होईल हो” असे म्हणून मायेने त्या मुलाला ते आंगडे लेववले व त्या मुलाचा तिने मुका घेतला. “सोनार चांद ” ती म्हणाली. “तुम्ही आपल्या कामाला जा. येथे आम्ही आहोत कपडे द्यायला. "बाबू म्हणाला.

“लहान मुलांना कपडे घालणे हे तुम्हाला नीट करता येणारच नाही. हे आम्हा बायकांचेच काम हे आमचेच कोमल हात करू जाणे.” तुम्ही त्या मुलाला रडवला असता, हे अंगातले घालताना. आपण पाहूयाच हे दुसरे आंगडे त्या मुलाला घाला बरे. आणा बाई बाळ आणा हा घाला. होऊ दे परीक्षा. माया म्हणाली.

"त्यात काय आहे" असे म्हणून बाबू त्या मुलाला ते आंगडे घालू लागला. ते मूल हात हालवी, मान नाचवी बाबूला ते जमेना. "ये रे हलधर धर याला.” हलधर बकोटी हातात येईल.” त्याची आई म्हणाली. मूल रडू लागले. “नापास, ते बाळ सांगत आहे तुम्ही नापास.” काम त्याने करावे. “आम्हाला थोडेच मुलांना खेळवायचे आहे, ज्याचे काम त्याने करावे.” बाबू म्हणाला. "ते काही म्हणा, सेवा ही स्त्रीच करू जाणे. आज हजारो वर्षांची ती आमची कमाई आहे म्हटलं" माया म्हणाली. "तुम्ही जा येथे वादविवाद का करायला आला आहात, का कपडे शिवायला. ते कपड्यांचे ढीग तर उठत नाही अजून तरी दहा जणी शिवीत आहेत. " बाबू म्हणाला. “मग थोडे येथे आणून देऊ का? येथे मध्ये वेळ सापडला म्हणजे शिवावे." माया म्हणाली. "खरेच, येथेही आणा काही." हलधर म्हणाला. -

बसल्या बसल्या हलधर बाबू कपडे शिवू लागले. असे दिवस जात होते. बायू कडच्या कपड्याच्या गाठी आल्या. शटिंग व धोतरे व लहान पातळे त्याने मागवली होती. गाठी फोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून आलेली प्रेमाची मदत.

"ही तुमच्या गावची मदत होय ना.” मायेने विचारले.

"हो, माझ्या महाराष्ट्रातील, माझे मित्र आणखी पाठवणार आहेत. महाराष्ट्र जरी दगडधोंड्यांचा असला तरी काही अगदी थंड नाही. त्या दगडा धोंड्यातही दया व स्नेह यांच्या गोदा कृष्णा वाहात आहेत. " बाबू म्हणाला.

"पण कोणी म्हटले तुम्ही थंड आहात निष्प्रेम आहात म्हणून. एका महाराष्ट्रीय योगिनीनेच कलकत्त्यात प्रथम मुलींना शिकवण्याचे यज्ञकर्म सुरु केले. ज्या महाराष्ट्रात संत झाले, शूर नरवर झाले, तो का थंड! तुमच्यावरून

आम्हाला महाराष्ट्राची कल्पना येते." माया म्हणाली. “एका माझ्यावरून?" बाबू म्हणाला.

“हो माझ्यावरून ?” बाबू म्हणाला.

“तुम्ही यांच्या गुरुजींनी प्रसिद्ध केलेले ते महाराष्ट्रीय संस्कृती हे पुस्तक वाचले वाटते. " हलधराने विचारले.

“बाबांनी त्याचे बंगाली भाषांतर केले आहे. ते अजून हस्तलिखितच आहे. ते मी वाचले. कारण त्याची सुवाच्य छापावयासाठी प्रत मीच लिहिली माझ्या हातांनी. " माया म्हणाली.

“अक्षर सुंदर आहे असे सांगाना थोडक्यात " बाबू म्हणाला.

“हा महाराष्ट्रीय खवचटपणा." माया म्हणाली.

“आज सायंकाळचा स्वयंपाक मीच करतो. चांगली झणझणीत महाराष्ट्रीय भाजी करतो." बाबू म्हणाला. “नको, नको. बंगाल झणझणीत आहे. झणझणीतपणा महाराष्ट्राला आज थोडा घेऊ दे." माया म्हणाली. “माया, चल लवकर. मग रात्र होते. " हेमलता म्हणाली.

बंगालमधील अधिक महिन्यातील पूजादिवस आले. बंगालमधील हा सर्वात मोठा सण होय. यावेळेस एकमेकांस देणग्या देतात. ख्रिस्ती लोकांच्या नाताळाप्रमाणे या सणात प्रेमाने परस्परांस प्रेमचिन्हे देतात. सर्वत्र उत्साह व आनंद असतो. परंतु पुरात सापडलेल्या लोकांना कसला आहे आनंद? त्यांना ना उरले घर, ना दार, ना धान्य, ना वस्त्र, ना पैसा ना काही. मोठ्या कष्टाने लोकांनी आपापली घरे उभारली, झोपड्या उभारल्या. बंगालमधील लोकांना पुराची जणू सवयच झालेली आहे. ते अशा हालअपेष्टांना तयार जणू असतात. रेल्वे बंगालभर पसरल्यामुळे हे असे पूर फार येतात. कारण रेल्वेमुळे इकडचे पाणी तिकडे जात नाही. रेल्वे उंच रस्ता बांधून नेली आहे. त्यामुळे एका बाजूला पाणी तुंबते. सपाट बंगालभर पूर्वी पाणी सर्वत्र पसरे व एकच ठायी तुंबत नसे. परंतु रेल्वेमुळे पूर्वीचे पाण्याचे सहज प्रसरण होत नाही व मग असे पूर येतात.

पूजादिनांमुळे काही स्वयंसेवक घरी गेले, काही स्वयंसेविकाही गेल्या. बाबूला थोडेच कोठे जावयाचे होते? तो तेथेच काम करीत होता. त्याला त्यातच आनंद होता.

पुढे काही दिवसांनी हे काम बंद झाले. स्वयंसेवक व सेविका यांचा फोटो घेण्यात आला. गेली सारीजने पुन्हा आपापल्या कामाला निघून गेली.

त्रिंबकराव व बाबू पुन्हा शांतिनिकेतनमध्ये आले. तेथे त्यांचा अभ्यास सुरू झाला. जवळजवळ वर्ष तेथे त्यांनी काढले. मग तेथून निरोप घेऊन ते निघाले. ते कोमिल्लाजवळ असलेल अभयाश्रममध्ये आले. बंगालमध्ये कोमिल्ला शहराच्या देशभक्तीला तुलना नाही. या शहराने स्वराज्यार्थ अनेक बळी दिले. अंदमानातले अत्यंत हाल व कष्ट सोसून वेडा झालेला उल्हासकर दत्त तेथे अजून नजरेस पडतो व हृदय पिळवटून निघते. अभयाश्रम हे कोमिल्लाचे भूषण आहे. कलकत्त्यास सरकारी टांकसाळीत हजार रुपये पगार घेणारे डॉ. प्रफुलचंद्र घोष हे या आश्रमाचे जीव. त्यांनी १९१९ मध्ये असहकारतेच्या वेळी राजीनामा दिला व दीनसेवेस वाहून घेतले. अभयाश्रमाचे रुग्णाय आजूबाजूला प्रसिद्ध आहे. गोरगरिबांचा तो आधार खादीही येथे सुंदर रंगवली जाते, तयार केली जाते. या आश्रमात बाबू व त्रिंबकराव आले. बाबूखादीचे रंगकाम शिकू लागला व इतरही गोष्टींचे परिशीलन करीत होता. येथील रुग्णालयाची व्यवस्था, तेथील बाग व मळा, तेथील मुलांची शाळा यांचे कामकाज तो पाहात होता. मायेचे वडील आनंदमोहन यांना एकच अपत्य होते व ती माया. त्यांची पत्नी निवर्तली होती व त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. १९१९ मध्ये त्यांनी आली नोकरी सोडून आश्रमास वाहून घेतले. यावेळेस त्यांचे वय चाळीस होते म्हणा ना. माया आता सतरा वर्षांची झाली होती व तिने सेविका व सूतिका शिक्षण घेण्याचे ठरवले होते. ती पुढे आश्रमास वाहून घेणार होती.

आनंदमोहन यांचा स्वभाव अती मनमिळाऊ होता. शाळेमध्ये ते मुलांना फार प्रिय. बाबूही कधी त्यांच्याजवळ निरनिराळ्या विषयांवर बोले व चर्चा करी. एक दिवस बाबू म्हणाला, “भिन्नभिन्न प्रांतांतील मुलामुलींची आता लग्ने लागली पाहिजेत, म्हणजे संस्कृती परिपोष जास्त होईल, निराळी प्रजा उत्पन्न होईल. बंगाल व महाराष्ट्र, आंध्र व महाराष्ट्र, आंध्र व तामीळ यांचे मिश्रविवाह झाले पाहिजेत.” “बाबू, विवाहाला अडचणीसुध्दा असतात. तुमचा महाराष्ट्र किती दूर. मुलीला माहेर पाठवणे किंवा परत आणणे म्हणजे किती त्रांसाचे दगदगीचे व खर्चाचे जवळपास सोयरीक असली म्हणजे सर्व आत्पेष्टांस वरचेवर भेटता येते.” आनंदमोहन म्हणाले, “आता आगगाडी आहे, त्रास व दगदग कोठे आहे? दोन दिवसही लागत नाही. विलासपूरहून कलकत्यास यावयास !" बाबू म्हणाला. “तू श्रीमंत आहेतस तसे दुसरे थोडेच आहेत. नुसती मुलीला न्यावयाची आणावयाची तर शंभर रुपये पाहिजेत. शंभर रुपयांत चार माणसांचा गरीब मनुष्य वर्षभर चरितार्थ चालवतो !” आनंदमोहन म्हणाले. “गंगा हिमालयापासून इकडे दूर बंगालमध्ये आली पित्याला सोडून, माहेर सोडून इकडे सागरास मिळण्यासाठी आली. तिला माहेरी जाण्याची इच्छाही होत नाही. अनंत प्रेमतरंगांनी सागर तिला आनंदवतो. तिला जणू माहेरी जाण्याची इच्छाही होत नाही.” “बाबू म्हणाला. “हे काव्य झाले. पतीने कितीही प्रेम दिले तरी मानवी जीवनात - या अपूर्ण मानवी जीवनात माहेराच्या केवळ निर्मळ अशा मातृपितृ प्रेमाची बंधुप्रेमाची मुलीस आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तिची मुलेबाळे मोठी झाली म्हणजे कदाचित् हो आठवण कमी होईल. तरी आईबापांना भेटावेस मुलीला वाटेलच वाटेल. मुलीला वाटले नाही तरी आईबापांना वाटेल.” आनंदमोहन म्हणाले. “दुरून मुलीचे त्यांनी कौतुक करावे, प्रेमपूर पाठवावे, काहीप्रेमाचा खाऊ खूण पाठवावी म्हणजे झाले." बाबू म्हणाला. “तुम्हाला बंगाली वधूशी लग्न करावाचे आहे वाटते? मग आमच्या बंगालमध्ये तुम्हीच राहाना. तुम्हाला तुमच्या आईबापांपासून दूर राहावते का पाहू? मुलीने मुलांकडे जावयाचे तर मुलाने मुलीकडे आले म्हणून काय झाले? आमचा बंगाल चांगला आहे. इकडेच राहा तुम्ही काम करण्यासाठी. "आनंदमोहन म्हणाले. “आमच्या महाराष्ट्राला फार जरुरी आहे. महाराष्ट्रात भरपूर सेवेकरी असते तर मी येथे राहिलो असतो. आज महाराष्ट्रालाच बाहेरची जणू जरूर आहे. बाहेरचे दूध लावून जसा गुरांना पान्हा फोडतात, तसे बाहेरचे स्नेहदुग्ध पिऊन जर महाराष्ट्राच्या हृदयाला पान्हा फुटला तर फुटला. " बाबू म्हणाला.

त्रिंबकराव व बाबू हे अभयाश्रमाहून मग अन्यत्र गेले. खादीप्रतिष्ठानचे त्यांनी कामपहिले. खादीप्रतिष्ठान, बंगालमधील खादी आधी खपविते. बंगालमधील खादीच्या किंमतीत देण्यास परवडेल त्याहून स्वस्त खादी परप्रांतीय आणून विकू नये असा जणू तिकडे निर्बंध घातला आहे. जर बाहेरची स्वस्त खादी येईल तर बंगालमधील खादी खपणार नाही व गोरगरिबांस दोन घास मिळणार नाहीत. स्वदेशी धर्म हा शेवटी संकुचित करावा लागतो. ध्येयवाद हा शेवटी मर्यादित करावाच लागतो. म्हणून ख्रिस्ती धर्माने सांगितले. बाबा शेजा-यावर प्रेम कर. कारण आपल्या रोजच्या जीवनात. साऱ्या विश्वावर प्रेम करण्याचा काय उपयोग? विश्व दूर असते, राष्ट्र दूर असते, प्रांत, जिल्हा, तालुका दूर असतात, आमचा गावही दूर असतो. शेजारी हा सर्वांत जवळ, त्याच्यावर प्रेम करू या सर्व आपापल्या शेजा-यावर प्रेम करतील तरी सारे सुखी होतील.

बंगाली लोकांनी आधी आपल्या घराशेजारी तयार झालेली खादी घेणे हे कर्तव्य होते व त्यांनी स्वीकारलेले पाहून बाबूला आश्चर्य व आनंद वाटला. महाराष्ट्रातसुद्धा ही वृत्ती पाहिजे. विलासपूरला लोकांनी आंध्र प्रांतातील तलम खादी वापरण्याचे आधी शेजारी सोनखेडीस तयार झालेली जाडी खादी वापरली पाहिजे. खादीप्रतिष्ठानची व्यवस्था, त्यांचे विचारप्रसाराचे काम, लहान लहान हस्तपत्रिका प्रसिद्ध करणे बाबूला सारे आवडले. बाबू व त्रिंबकराव इकडे याप्रमाणे रंगले असता, तिकडे रतनशेट खंगत चालले होत. त्यांनी बाबूला परत ये असे कितीदा लिहिले. परंतु एक दिवस तारच आली व बाबू आणि त्रिंबकराव यांना जाणे प्राप्त झाले.

बंगालमध्ये जवळजवळ दीड दोन वर्षे ते राहिले. अनेक अनुभव त्यांनी घेतले. अनेक मित्र जोडले. शतस्मृतिभार बरोबर घेऊन तेजात होते. अनुभवगंगा घेऊन जात होते. गुरुशिष्यांच्या मनात अनेक तरंग खेळत होते, प्रत्येकाच्या हृद्यात नाना व्यक्ती येऊन उभ्या राहात होत्या. अदृश्य होत होत्या. जणू हृदयाच्या पाश्र्वभूमीवर पडद्यावर स्मृतिदेवी चलचित्रपट बोलका चलचित्रपट दाखवीत होती.

“बाबा, तुम्ही बरे न व्हाल असे का बरे म्हणता? डॉक्टर वासुदेव म्हणाले की, तसे भिण्याचे कारण नाही म्हणून " बाबू वडिलांना सांगत होता. आश्वासन होता. “नाही रे, आता यातून बरा होणार नाही. मला आपले वाटते आहे की यातून निभावणार नाही. तू जप. उगीच उधळपट्टी करू नको. सरकारच्या विरुद्ध उगीच जाऊ नको. आपला धंदा बरा की आपण बरे. समजलास ना.” रतनशेट म्हणाले. “बाबा, खादीचे काम कोणाच्या डोळ्यात न खुपणारे आहे. मी आपला त्याला वाहून घेईन. गाजावाजा नको, काही नको.” बाबू म्हणाला " जपून राहा एवढेच सांगतो. नाहीतर पुढे वाईट दिवस यावयावे. " रतनशेट म्हणाले. दिवसेंदिवस रतनशेट क्षीणशक्ती होत चालले. एक दिवस पहाटेच्या वेळेस रतनशेट इहलोक सोडून गेले. त्यांच्या प्रेतयात्रेला अनेक प्रमुख लोक जमले होती.

बाबूने क्रियाकर्म केले. गोरगरिबांना दानधर्म केला. गोविंदाच्या खादीसेवासंघास मोठी देणगी दिली, आणि तेथील हायस्कूल जरसरकारी ग्रँट बंद करणार असेल तर मोठी देणगी मी देतो असे त्याने कबूल केले. शाळेने युनिव्हर्सिटीशी संबंध ठेवावा. परंतु इतर बाबतीत स्वतंत्र राहावे असे त्याने सुचवले. शाळेच्या काही मंडळींनी असे ठरवले की या शाळेला जोडूनच टेक्निकल स्कूल चालवावे व त्यासाठी बाबूने देणगी द्यावी. ही शाळा आहे तशीच राहू दे. परंतु ज्या मुलांना केवळ कारकुनी नको असेल ते धंदेशाळेत जातील. बाबूने “रतनलाल टेक्निकल स्कूल इंस्टिटयूट" स्थापन करण्यासाठी पन्नास हजार रुपये दिले व ती संस्था सुरू झाली. सुतारकाम, ड्रॉईंग काम, विणकाम, चटया विणणे, पंखे तयार करणे, खेळणी वगैरे धंदे शिकवायची तेथे सोय करण्यात आली. वृंदावनला जसे प्रेम महाविद्यालय आहे तशा प्रकारचे जणू हे स्थान झाले. अनेक विद्यार्थी तेथे येऊ लागले. विलासपूरचे महत्त्व वाढले.

त्रिंबकराव गोविंदाच्या आश्रमास जाऊन आता मिळाले. आता पैशांची तूट नव्हती. काम जोराने सुरू झाले. उत्साह खूप वाढला. त्या पाच तरुणांना आपल्या आजपर्यंतच्या श्रमांचे, तपस्येचे फळ मिळाले. असे वाटू लागले.त्यांनी आपला पसारा वाढवला. बाबू तेथील मिलमधले आपले शेअर कमी करीत होता व ते भांडवल इकडे गुंतवणूक लागला होता. त्याच्या मनात विलासपूरला एक धर्मार्थ दवाखाना काढावयाचा होता व तेथे प्रसूतीसदन जोडावयाचे होते. त्याने बांधकाम तर सुरु केले होते. योग्य डॉक्टर मिळविण्याची तो खटपट करीत होता. परंतु एकाएकी ती गोष्ट सफल झाली. त्रिंबकरावांचे वडील बंधू आता जरा निराळ्या वृत्तीचे झाले होते. तेच त्या दवाखान्याला येऊन मिळाले. त्यांचे नाव करुणाकर. डॉ. करुणाकर ह्यांचा ऑपरेशनमध्ये हातखंडा असे, अत्यंत उत्कृष्ट ते डॉक्टर होते. आता सेवेची त्यांच्या कौशल्यास जोड मिळाली. बाबूला अत्यानंद झाला.

परंतु आनंदापाठोपाठ दुःख ठेवलेले असते. त्रिंबकराव एकाएकी आजारी पडले. ते उन्हातून जात होते. पायात ते घालीत नसत. खानदेशाचा व-हाडचा तो उन्हाळा. परंतु त्रिंबकरावांचे व्रत होते. त्या उन्हात ते घेरी येऊन पडले व पुढे त्यांना ताप येऊ लागला. ते काळे पडले. त्यांना बाबूच्या नवीन रुग्णालयात आणले होते. परंतु आपला वडील भाऊ सेवेला देऊन लहान भाऊ निघून गेला.

गोविंदा व बाबू यांना अत्यंत वाईट वाटले. साऱ्या विलासपूरला वाईट वाटले.शाळेला हजर सुट्टी देण्यात आली होती. प्रेतयात्रेला सारे विद्यार्थी हजर होते. आश्रमवासी सारी मंडळी हजर होती. त्रिंबकरावांचे जणू जीवितकार्य संपले होते. ज्योति पेटवून ते गेले.

बाबू आता जरा खिन्न असे, त्याला त्रिंबकरावांच्या कितीतरी आठवणी येत. एक दिवस बाबूची आई त्याला म्हणाली, “बाबू, तू लग्न कर नारे आता. असा दुःखी कष्टी का राहतोस? चाललेच आहे हे असे जग. त्याला काय करावयाचे?” - “मला लग्न नको काही नको. मरण केव्हा येईल याचा नेम नाही. त्रिंबकराव गेले. गुरुजी गेले. माझ्याच्याने जगवेल असे मला वाटत नाही. जणू माझी प्राणकळा गेली, चित्कळा गेली असेच मला वाटते आहे.” बाबू म्हणाला.

दिवस चालले होते. गोविंदाच्या आश्रमाला आता अनेक कामे करणारी माणसे मिळाली होती. त्यांना पगार थोडाथोडा देण्यात येई. खेड्यातील जीवनासारखी ती शुद्ध मुले होती. सूत आणले, खादी घेणे, रंगवणे कामे सुरु झाली. आता खादी रंगवण्यात सुद्धा येऊ लागली व ती दूरवर जाऊ लागली.

“माया, काय एवढे त्या फोटोत पाहात आहेस" आनंदमोहनानी विचारले. " काही नाही. त्या वेळची आपली आठवण आली बाबा. दोनतीन वर्षे झाली, नाही बाबा? केवढा भीषण प्रसंग. ती लहान मुले कशी काकडत असत ते अजून मला दिसते आहे. भुकेलेले आईबाप आधी मुलांच्या तोंडात कशी भाकर घालीत ते वात्सल्य तो प्रेमळ देखावा अजून दिसतो आहे. माझ्या डोळ्यासमोर. बाबा, त्यावेळेची चिरस्मरणीय गोष्टसांगू? एकशेतकरी, त्याची बायको व एक त्यांची मुलगी तिघे बसली होती. त्यांचा एक मुलगा पुरात वाहून गेला होता. आम्ही त्यांना खावयास चणे फुटाणे दिले. ती तिघे तेथे खात होती. तो तेथे आणखी एक म्हातारा आपल्या मुलास का नातवास घेऊन आला. आम्ही तेथे नव्हतो. दूर गेलो होतो. चणेकुरमु-यांची पोटी स्टोरमधून आणण्यास गेलो होतो. त्या शेतकऱ्याने आपल्या पदरातले चणेकुरमुरे त्या म्हाता-याच्या मुलास नेऊन दिले. म्हातारा म्हणाला, “तुम्ही खा दादांनो, आमच्या नशिबी असले तर मिळतील.” “अरे मुलाला खाऊदे हो. आमचा मुलगा असता तर तोही यातला वाटेकरी नसता का झाला?” त्याला नसते का मी दिले? गेला वाहून गेला, डोळ्यादेखत हो.” शेतकरी रडू लागला. “कसा होता दिसायला. मला मदत करायचा. तळ्यावरून घडा भरून आणायचा. एकदिवस घडा पाय घसरून फुटला तर मी त्याला मारले होते. म्हणाला, "मी का बळेच फोडला" म्हणून तर नसेल गेला? म्हणून तर देवानं नाही नेला सोन्याला माझ्या.” बाबा त्यांचे शब्द ऐकून मी विरघळले.”

“माया, दुष्काळसुद्धा रमणीय आहेत. माणसातले सुंदर व उदार भाव प्रकट करणारे दुष्काळ, मानवाची रमणीय हृदये दाखवणारे दुष्काळही तितके वाईट नाहीत." आनंदमोहन म्हणाले.

“ त्यावेळेस ते आमच्याबरोबर एक महाराष्ट्रीय स्वयंसेवक होते. किती कामाचा त्यांना उरक. आपल्या बंगाली लोकांची मच्छरदाणी व उशी पाहून ते म्हणत, तुम्ही बंगाली लोक विलासप्रिय आहात. मी त्यांना सांगे, बंगालमध्ये मलेरिया फार. डास अती. मच्छरदाणी येथे चैनीची वस्तू नसून अत्यंत आवश्यक वस्तू आहे. तेव्हा त्यांना ते पटले. मला मच्छर चावून जेव्हा गांधी अंगावर उठल्या तेव्हा अनुभवाने पटले. म्हणायचे महाराष्ट्रात मच्छरदाणी, गादी गिरदी श्रीमंतीची लक्षणे समजतात. महाराष्ट्रात एक घोंगडी घातली म्हणजे खलास, स्वयंपाक असा छान करायचे. हा पाहा त्यांचा फोटो. डोक्याला काही नाही तरी महाराष्ट्रीय वळण फोटोवरूनही दिसून येत आहे नाही?" माया म्हणाली.

“ते आश्रमात आपल्या मग राहिले होते. माझ्याशी वादविवाद करायचे. मनाचे मोठे सरळ व थोर. एक दिवस माझा हात दुखत होता तर माझे कपडे धुऊन दिले. त्यांनी माझे अंथरुण झाडून घातले, मच्छरदाणी लावून दिली. मी म्हटले, जणू माझ्या मुलांप्रमाणेच सेवा करत आहात. तेव्हा ते हसले” आनंदमोहन म्हणाले.

“मी जाते, बाबा दवाखान्यात आज लवकर बोलावले आहे." असे माया निघून गेली. म्हणून मायेचे या महाराष्ट्रीय तरुणावर प्रेम का आहे? त्या वसंतकुमारांच्या मुलाचेही मायेवर प्रेम आहे. वसंतकुमार माझे लहानपणापासूनचे मित्र. त्यांचा प्रमोद मात्र तितकासा चांगला वाटत नाही. त्याला पाहून भीती वाटते. प्रसन्नता वाटत नाही. प्रमोद तर म्हणतो लावीन तर मायेशीच लग्न लावीन ! वसंतकुमारास काय सांगावे? मायेची फसवणूक करू की महानपणाच्या मित्राच्या मुलाची निराशा करू? माझेही पितृहृदय, त्याचेही पितृहृदय, काय करावे? आनंदमोह्न विचार करीत होते. तोच कोमिल्ला शहरातील वकील वसंतराव तेथे आले. “या वसंतबाबू” आनंदमोहन म्हणाले उष्मा फार होऊ लागला नाही? हल्ली कोर्टकचेरी बंद आहे म्हणून तरी बरे. बाकी कामात असले म्हणजे उकाडा फार भासतही नाही म्हणा. हल्ली रिकामा आहे तो फारच भासतो” वसंतबाबू म्हणाले. “तुम्ही आश्रमात या. चोवीस घंटे देतो काम, मग उकाडा नाही, काही नाका." हसत आनंदमोहन म्हणाले. “मुलाबाळांची नीट व्यवस्था लावून मग वानप्रस्थ व्हावे. एकदा प्रमोदचे लग्र करून दिले म्हणजे एक मोठेच काम झाले? मग तुम्ही मायेला विचारले का? ती प्रमोदला ओळखते. दोघे एका हायस्कूलमध्ये होती.” वसंतकुमार म्हणाले.

“परंतु मायेने लवकरच सोडले हायस्कूल. पाचसहांतून सोडले. झाली त्याला चारपाच वर्षे.” आनंदमोहन म्हणाले.

“प्रमोदने तिला पाहिली आहे पुष्कळ तो हट्टच घेऊन बसला आहे.” वसंतकुमारा म्हणाले.

“मी मायेला विचारतो, पण मी सांगू का? वसंतबाबू मायेचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तिने जर कोणाशी विवाह करावयाचे ठरवले असेल तर? किंवा विवाह करणारच नसली तर?" आनंदमोहन म्हणाले. “जर तिने मनाने कोणी वर नियुक्त केला असेल तर मी काय सांगणार? तिच्या जीवनाचे मातेरे करू मी इच्छित नाही. प्रमोदला व मायेला उभयतांना तो विवाह जाचक होईल. मारून मुटकून काय द्यावे. प्रेम थोडेच निर्माण होणार? परंतु तसे ठरवले नसेल तिने तर प्रमोद ओह.

विवाह करणार नाही वगैरे यात अर्थ नाही. ही मुले प्रथम अशीच म्हणतात. परंतु सारी मग लग्न करतात, नाहीतर पतित होतात. लग्न करायला तिला तुम्ही लावाल, प्रमोदशीच असे नाही म्हणत, कोणीही अनुरूप तरुणाशी. विवाह म्हणजे सांभाळ आहे, ते कवच तारून नेणारी तरी आहे. संसार सागरातून तरून जाण्यास विवाहाची सांगड फार उपयोगी पडते ती इकडे तिकडे जाऊ देत नाही. वासना व विकार यांना आळा घालते. संयम, सहनशीलता, कष्ट सेवा यांचे धडे मिळतात. विवाह करून राहणे म्हणजे आश्रमच तो. तोही गृहस्थाश्रम होय. सारे हे आश्रम - आश्रम याचा अर्थच मुळी त्या आश्रमात राहिल्याने मोक्ष मिळेल - त्या त्या आश्रमाच्या नियमाप्रमाणे वागा म्हणजे झाले. चारी आश्रमच - नाही?” वसंतबाबू बोलत होते. दोघे मित्र जरा मग आश्रमाच्या भवनात फिरावयास गेले. तेथून वसंतकुमार घरी गेले. माया आनंदमोहनांचे अंथरूण घालून देत होती. आनंदमोहन म्हणाले, “माया, तुला मी काही विचारणार आहे, बाळ ! विचारू?"

“बाबा, विचार ना. " माया लडिवाळपणे म्हणाली.

“माये, तुला लग्न करावेसे वाटतेकी नाही? तू पूर्वी म्हणत असे, मी आश्रम जीवनास वाहून घेणार आहे?" दवाखान्यात सेवा करीन. सेवा एकट्याने करणार की दोन जीवांनी करणार?” आनंदमोहन म्हणाले.

“बाबा, विवाहाची मला कधीकधी भीती वाटते. कधीकधी सुंदर स्वर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, कधी भिववितो, कधी रमवतो डोलवतो. बाबा, मी काय करु तुम्हीच सांगा." माया म्हणाली.

“बाळ, विवाह वाईट नाही काय ! खऱ्या सेवावृत्तीच्या आड विवाह येत नाही हे भारतवर्षातील सर्व ऋषींनी, राजर्षीनी, संतांनी दाखवले आहे. तू विवाह कर. माझीही मोठी काळजी दूर होईल. तुला खंबीर प्रेमाचा आधार मिळाला म्हणजे मला बरे वाटेल. याचा अर्थ मी तुला असहाय अबला समजतो असा नाही. स्त्रीयांना नेहमी आधारच पाहिजे असा नाही. “विनाश्रय न शोभते पंडिता वनिता लता" हे वाक्य खोटे आहे. उलट राजांच्या दरबारात पंडिताशिवाय शोभा नाही, परस्परांमुळे परस्परांस शोभा आहे. पुरुषालाही स्त्रीशिवाय शक्ती नाही. स्त्री पुरुषाची शक्ती आहे. वाफेला मर्यादित केल्याशिवाय तिच्यातून शक्ती प्रकट होत नाही. पुरुषाच्या सर्वत्र पसरलेल्या व धावणा-या चंचल मनाला स्त्री मर्यादित करते एकत्र आणते म्हणजेच त्याच्या ठिकाणी शक्ती निर्माण करते. त्याला कर्मप्रवण स्थिरध्येयेप्रवण- करते. पुरुषाची खरी योग्यता त्याच्या भाग्याचे खरे माप स्त्री त्याला दाखवते. माये, मी स्त्रीजीवनाचा अपमान नाही करीत. तुला आधार घे असे संगतो. परंतु पतिपत्नी या नात्याने एकत्र आल्याने पुरुषांना या स्त्रीयांना स्थिरता व सुरक्षितता असते हे खरे." आनंदमोहन म्हणाले.

“बाबा, मलाही वाटते की लग्न करावे. परंतु मग तुम्ही एकटे राहाल. तुम्हाला कोण बाबा." माया म्हणाली.

“तर मी येथे आधीच आश्रमात येऊन बसतो आहे. येथे कितीतरी मित्र आहेत. तू पतिगृही वाढावेस यातच आमचा आनंद.” आनंदमोहन म्हणाले. “बाबा” मायेला काहीतरी बोलायचे होते.

“काय बेटा? तू आपली निवड केली आहेस एखादी ?” आनंदमोहनांनी तू

विचारले. “बाबा, मी काय सांगू?” माया बापाच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाली.

त्या मस्तकावर प्रेममलंग हात ठेऊन आनंदमोहन म्हणाले.

माया, त्या फोटोतील तो दिलदार तरुण होय ना? म्हणूनच तो फोटो पाहात होतीस? त्या व्यक्तीचे वर्णन त्या दिवशी करीत होतीस?" आनंदमोहन म्हणाले. “बाबा, ते तर दूर महाराष्ट्रात मी येथे काय करू?" माया म्हणाली. “मी त्यांना पत्र लिहितो. त्यांचा पत्ता मजजवळ आहे. बहुधा त्यांचे प्रेम तुझ्यावर आहे. एकदिवस ते विवाहासंबंधी वादविवाद करीत होते, म्हणलो बंगाल व महाराष्ट्रयातील तरुण- तरुणींचे विवाह का न व्हावे मी म्हटले मुलामुलींना जावयास यावयास अडचण" आनंदमोहन थांबले.

“ खरेच बाबा, मग मी तुम्हाला वरचेवर भेटू शकणार नाही" माया म्हणाली. “वेडी रडू नको. आता आगगाडी आहे, तार आहे. दोन दिवसात येता येईल. जा तू महाराष्ट्रात जा. बंगालची भागीरथी तू महाराष्ट्रात जा. महाराष्ट्राला भावना दे त्याग दे. प्रेमासाठी घरेदारे सोडण्यास शिकव, ध्येयासाठी आईबापही सोडण्यास शिकव. जा. बेटा. मी त्यांना पत्र लिहितो ते येतील. याच आश्रमात विवाह लावू” आनंदमोहन म्हणाले.

“बाबा, मी आता झोपते" माया म्हणाली. “जा बेटा" आनंदमोहन म्हणाले.

आनंदमोहनांनी सर्व हकिकतीचे पत्र लिहिले. बाबू आपली आई व काही

मित्र बरोबर घेऊन कोमिल्यास गेला. आश्रमात एकदिवस बाबू व माया यांचा विवाह लागला. विवाहास अनेक सद्गृहस्थ आले होते. वसंतरावही आले होते. त्यांनी वधूवरास आशीर्वाद दिले. मंगल दिले. स्वतःच्या मुलीचा भेसूर निराशा त्यांच्या हृदयास दुःखी करीत होती, तरी आपल्या मित्राच्या मुलीच्या आनंदात ते भागीदार झाले. त्यांनी खादीचे एक सुंदर तलम वस्त्र मायेस दिले.

बाबू आता मायेस घेऊन परत जाणार होता. मायेला वाईट वाटत होते. बंगाल सोडून जाणार होती. आपली वंगभूमी सोडून ती जाणार होती. वृद्ध पित्याला सोडून ती जाणार होती. “बाबा, तुम्ही सांभाळा हां. मी पूजा दिवसात येईन हां. कधी बरे नसेल तर मला कळवा हां. मी उडत येईन हां. आता तुमचे अंथरुण कोण घालील ? रोज मला आठवण येईल.” माया रडत रडत बोलत होती.

“असे रडू नये. आपण सारी एकमेकांस सोडून एकदिवस जाणार. त्याचा हा पहिला धडा आहे. उगी. प्रकृतीला सांभाळ. नवीन देश नवीन हवा, नवीन अन्न, जपत जा.” आनंदमोहन सांगत होते. आनंदमोहनांनी बाबुलाही पुष्कळ सांगितले. “दोघे एका विचाराने राहा. परस्परांस दुखवू नका. परस्परांस सुखवा, हसवा. संशय मनात ठेवू नका. एकमेकांची हृदये खुली ठेवीत जा. एकच हृदय होऊ दे. कुडी दोन परंतु मन बुद्धी एकच करा. मी काय सांगू?”

सर्वांचा निरोप घेऊन बाबू निघून गेला. माया वडिलांची माया हृदयात ठेऊन पतिदेवाबरोबर निघाली. दोघांच्या हृदयात काय विचार खेळत होते कोण सांगू शकेल?

माया व बाबू यांची जीवित यात्रा सुरू झाली. महाराष्ट्रातील भाषा माया शिकू लागली. बंगाली वाचून दाखवू लागली. बंगाली मासिके वृत्तपत्रे ती मागवी व आपल्या भूमीची हकिकत वाची. वांङ्मयद्वारी हृदय व बुद्धी मातृभक्तीने भरून घेई. परंतु आता महाराष्ट्रही तिचा होता. मराठीही ती वाची, बाबू सांगे, समजावी. महाराष्ट्रातील परिस्थिती बाबू वर्णन करी.

एक दिवस कोमिल्लाहून अकस्मात तार आली. आनंदमोहन एकाएकी छातीत कळ येऊन मरण पावले. जणू मायेला खंबीर आधार देण्यासाठीच देवाने त्यांना ठेवले होते. मायेला मोठा धक्काच बसला. आपल्या वियोगाने तर बाबा झुरून नाही ना मेले? मी माझ्या प्रेमसुखात दंग झाले, परंतु बाबांची मनःस्थिती मी पाहिलीच नाही. प्रेम हे स्वार्थी आहे, त्याला विशाल दृष्टी नसते का? बाबूने तिची खूप समजूत घातली तरी माया म्हणे, “पित्याचे बलिदान करून मी तुम्हाला वरले. आपणा दोघांस एकत्र करण्यासाठी बाबांनी स्वतः चे बलिदान दिले. थोर प्रेमळ बाबा. "

हळूहळू शोक कमी झाला. माया कामात रंगू लागली. तेथील दवाखान्यात ती काम करी. प्रसूतिसदनाची ती आता व्यवस्था पाही. तिने आता एक नर्सिंग वर्गच उघडला व काही बायका त्या वर्गाला येत. अशा रीतीने वेळ जाऊ लागला. अश्विन महिन्यात पूजादिवस आले तेव्हा तिला वडिलांची फार आठवण झाली. आश्रमातील काही मंडळीस तिने देणग्यापाठवल्या. वसंतरावांसच पित्यासम मानून त्यांना तिने भेट पाठवली व पत्रही पाठवले.

बाबूने आता खादीच्या कामात लक्ष घातले. तो गोविंदाबरोबर खेड्यापाड्यांतून हिंडे व उत्तेजन देई, उन्हातान्हातूनही हिंडे. गाडीघोड्यातून हिंडण्याचा त्याला कंटाळा असे. तो पायांनीच हिंडे. कधीकधी पायातही घालीत नसे. त्याला त्रिंबकरावांची आठवण येई. ते पायात घालत नसत.

बाबू आज सोनखेडीहून चालत आला होता. वाटेत खूप ऊन लागले. घरी आला तेंव्हा चेहरा नुसता लाल गेला होता. गालाची रातोत्पले झाली होती. आज बाबूच्या पायाची सारखी आग होत होती. त्रिंबकरावांसारखा आजारी तर नाही ना पडणार?

“माझ्या पायाला थोडे गायीचे दूध चोळ" बाबू म्हणाला. मायेने दूध आणले व पायांना चोळीत बसली.

"किती पटापट जिरते आहे दूध? पायात नव्हते का घालते? तुम्हाला कितीदा सांगितले की, उन्हातान्हातून येत जाऊ नका, निदान पायात घाला.

तुम्ही हट्टी आहात अगदी." माया म्हणाली.

"मला मार" बाबू हसत म्हणाला.

“तुम्ही लहान असतेत तर मारले असते" माया म्हणाली.

"मग लहान येऊ? आणखी चारपाच महिन्यांनी होईन” बाबू म्हणाला. " *म्हणजे? माया म्हणाली.

"घाबरू नकोस. मी मोठा राहूनही लहान होईन. तुझ्या हात खेळेन, पायांवर खेळे.. तू मला न्हाऊ माखू घालशील. ज्या वेळेस या मोठ्या बाबूवर तू रागावलेली असशील त्यावेळेस मग लहान्या बाबूचे गाल लाल होतील.

त्याला मार बसेल. खरे ना?" बाबू हसत म्हणाला. "काहीतरी बोलता" माया लाजून म्हणाली.

“काहीतरी नाही. खरे आहे. पती पत्नीवर रागावला असला, तर त्याला तिच्यावर तर राग काढता येत नाही. मग तोही मुलाला देतो, दोन तडाखे व पत्नीही पतीवर रागावली असली तर मुलाला देते हातखाऊ. दोघांचा राग शांत करावयास बाळ आपले बलिदान देतो आपल्या शरीराची ढाल पुढे करतो." बाबू म्हणाला.

"मी माझ्या बाळाला कधी बोट लावणार नाही व लावू देणार नाही."

माया म्हणाली.

"माझा हक्क का घेतेस? म्हणजे तुझ्यावर रागवायचाही हक्क काढून घेतलास?" बाबू म्हणाला.

* आपण कधी एकमेकांवर रागावायचेच नाही मुळी." माया म्हणाली. "मग आता का रागावली होतीस?" बाबू म्हणाला.

"रागावले असते तर पायांना दूध चोळले असते का? माझे हात

रागावलेल्या माणसाच्या हातासारखे लागतात का? सांगा " माया म्हणाली. “इकडे ये, हळूच सांगतो.” बाबू म्हणाला. “मी नाही येत हे दूध चोळायचे आहे अजून" माया म्हणाली.

“पाहा, मी सांगतो आहे तर तूच येत नाहीस. तू रागातच आहेस, मी बोलतंच नाही." बाबू म्हणाला.

"हा सांगा कसे आहेत हात" माया तोंडाजवळ कान नेऊन विचारू लागली,

बाबूने पटकन तोंड आपल्या तोंडाजवळ धरले. "काय सांगितले" बाबूने विचरले. "गोड आहेत हात असे सांगितले. लबाड व धूर्त आहात तुम्ही महाराष्ट्रीय भोळ्या माणसास फसवता." माया म्हणाली.

"परंतु फसवून मारले नाही ना?" बाबू म्हणाला. 

“गुदमरवले आणखी मारायचे काय राहिले?" माया म्हणाली. “पण हे मर हे गुदमरवणे म्हणजे अमृत नाही का? असे गुदमरवणे तुला

आवडले की नाही? हे फसवणे तुला नको?” बाबूने विचारले. “आणखी चोळू का दूध?” मायेने विचारले.

“तुझे हात दुःखू लागले होय ना?" बाबूने विचारले.

“तुमच्या पायांची सेवा करून हात उलट बलवान होतात. जे पाय गरिबांसाठी वणवण करून कधी थकत नाहीत, त्या पायांची सेवा करून हात कसे थकतील? मी जन्मोजन्मी हे पाय चुरीत बसेन,” त्यांना तेल दुध बसेन, माया म्हणाली. चोळत

"पुरे आता कोण हाक मारते आहे बाहरे" बाबू उठला.

बाबू बाहेर आला तो तेथे फौजदार व आणखी दोन शिपाई होते. “आपणास पकडण्यासाठी मी आलो. हे पाहा वारंट" फौजदार म्हणाले. “परंतु माझा गुन्हा काय ? बाबूने विचारले. गुप्त कटात सामील असल्याचा गुन्हा" अत्याचारात सामील असल्याचा गुन्हा" फौजदार म्हणाला.

माया बाहेर आली. तो यमदूत उभे. त्या वरच्या यमाने तिचे वडील नेले, आता है यमदूत तिचा पतिदेव नेण्यासाठी आले होते.” का त्यांना नेता? ते नाही हो कशात ! खादी त्यांना एक माहीत. माझ्यामुळे त्यांच्यावर आरोप घेता की काय? मी वंगीय मुलगी या शंकेमुळे का त्यांना पकडता? मलाच पकड़ा हो. बंगालमध्ये संशयावरून वाटेल त्याला पकडतात, तसे येथेही आहे तर? मीच दुर्दैवी आहे.” माया बालू लागली. “माया रडू नकोस, शांत राहा, कोणत्याही गोष्टीस आपण तयार असले पाहिजे. गरिबांची सेवा करताना थोडी सत्वपरीक्षाही होऊन जाऊ दे. देव सारे चांगले करील. नीट जपून राहा. जी हां.” बाबूने समजूत घातली.

पोलीस बाबूस घेऊन गेले. माया सारखी रडत बसली. तिला कोण धीर देणार? आपण दुर्दैवी असे तिला वाटू लागले. आपल्या पोटी बाळ येत आहे. तो दुर्दैवी असे तिला वाटू लागले. कशाला रेपोटी आलास, बाळ, पोटात आला नाहीस तो, तुझ्या जन्मदात्याला कारागृहात पाठवलेस? दुष्ट आहे माझा गर्भ. मीच दुष्ट मीचसाऱ्यांना भक्षण करणारी ओह. मी दुर्दैवी आहे. याचाही नाश करावयास आले, देवा, तुरुंगात का रे घालणार? आणि संशयावरून अनियमित मुदतीपर्यंत का ठेवणार? दहा दहा वर्षे बंगाली बंधू तुरुंगात खितपत पडले आहेत, तसे तर नाही होणार?" माया विलाप करू लागली.

मायेला आता अलीकडे काही सुचेना. विलासपूरातील लोकांनी सभा भरवून सरकारचा निषेध केला. गोविंदा व त्यांचे मित्र यांनीही खेड्यापाड्यातील लोकांची सभा भरवून बाबू हा केवळ खादीला वाहून घेतलेला जीव त्याचा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींशी संबंध नव्हता. सरकारने त्यांना सोडून द्यावे असा ठराव पास केला. खेड्यापाड्यातील लोकांस फार वाईट वाटले.कसे घरोघर जावयाचे, चौकशी करावयाचे साहाय्य करावयाचे, दीनबंधूंबाबू - देवा आमचा दीनबंधू परत दे, परत दे, लोक देवाला आळवू लागले.

मायेने वसंतकुमारांना एक पत्र लिहिले व तुम्हीच माझ्या वडिलांप्रमाणे, तुम्ही मला मदत करा, पतीच्या सुटकेची काही व्यवस्था करा असे कळविले. वसंतुकुमारांनी वर्तमानपत्रातून ही हकिकत वाचली व ते चकित झाले. आपल्या मित्राच्या कन्येवर असा विनाकारण गहजब उडावा, आपला पती हयात असता विधवा राहण्याचा प्रसंग सरकारने आणावा याचे वाईट वाटले. त्यांचे मन कळवळले, परंतु ते काय करणार?

एक उपाय त्यांना सुचला. त्यांचा एक वर्गबंधू सी. आय. डी. खात्यात होता. त्यांच्याकडे जावे कलकत्त्याला असे त्यांनी ठरवले. वृद्ध वसंतकुमार अक्षयबाबूंच्या भेटीस जाण्यास निघाले.

अक्षयकुमार, वसंतकुमार, आनंदमोहन एका वर्गातले. परंतु तिघे तीन दिशांना गेले. एकाने देशाला जीवन दान दिले., एक वकील झाला, एकाने देशाची सेवा करणाऱ्यांस हुडकून मरणाचा दरवाजा दाखवण्याचे काम अंगावर घेतले.

अक्षयकुमार आज घरी सापडले पण, प्रथम वसंतकुमारांना त्याने ओळखले नाही. वसंतकुमार काळजीने व चिंतेने खंगले होते. प्रमोदच्या लहरी व वेड्यासारख्या स्थितीमुळे त्यांचे पितृहृदय दुखे. प्रमोद तासच्या तास आपल्या खोलीत बसून राही. जणू तो भ्रमिष्ट झाला होता.

“आता ओळखले मी. आपण होतो एका वर्गात एक दिवस वादविवादोत्तेजक सभेत माझा व आनंदबाबूचा खूप झगडा उडाला होता. आठवले आता. तुमच्यात किती फरक. " अक्षयकुमारा म्हणाले. “काळाने शरीरात आदल बदल होतो, परंतु हृदयात होत नाही, आत्म्यात होत नाही. तुमचे हृदय अजून पूर्वीचे आहे का? माझे दुःख दूर करण्यात मदत करा. आनंदमोहनच्या मुलीवर बिकट प्रसंग आला आहे.” वसंतबाबू म्हणाले. त्यांनी सारी हकीकत अक्षयबाबूंस सांगितली.

“पण त्यांच्याजवळ पत्रे सापडली आहेत" अक्षयबाबू म्हणाले. “त्यांच्या जवळ?” वसंतकुमार म्हणाले आश्यचर्याने विचारते झाले.

“त्यांच्या घरी नाही. त्यांच्या पत्रावर सी. आय. डी. चा डोळा होता व काही पत्रे त्यांच्या नावे आलेली सी.आय.डी.ने पकडली व त्यात अत्याचाराशी त्यांचा संबंध असावा याबद्दल बळकट पुरावा आहे." अक्षयबाबू म्हणाले.

" तुमच्याजवळ पत्रे आहेत" वसंतकुमार म्हणाले.

“हो मजजवळ आहेत” अक्षयकुमार म्हणाले. अक्षयकुमारांनी आपल्या बॅगेतून काही पत्रे काढली. ही पाहा हा मजकूर. बंगालीत लिहिलेली आहेत. आता आणखी काय पुरावा पाहिजे? हा लिहिणारा कोण याचा आता तपास काढला पाहिजे. ही पत्रे कालच माझ्याकडे आली. छान या पत्रावर एकदम कलकत्याचा आहे.” अक्षयकुमार म्हणाले.

पत्रे पाहून वसंतकमार स्तंभित झाला. ते जणू विचारमग्र झाले. “का, विचार कसचा करता?” अक्षयबाबूंनी विचारले. “अक्षयबाबू यात काही लपंडाव आहे. मी सांगू? माझ्या मुलाचे हे हस्ताक्षर आहे. प्रमोदचेच हे हस्ताक्षर. त्याचे मायेवर प्रेम होतें. त्याने सूड घेतला असे वाटते अक्षयबाबू.” वसंतकुमार रडू लागले. अक्षयबाबूंनी धीर धरा सांगितले. “माझ्या मुलाला शिक्षा होईल मित्राच्या मुलीला वाचावयास गेला तर स्वतःचा मुलगातुरुंगात पडलेला मी पाहणार दुर्दैवी आहे झाले.” वसंतकुमार म्हणाले. वसंतकुमार म्हणाले “तुम्ही स्वस्थ राहा. यात फार भिण्यासारखे दिसत नाही.” अक्षयकुमार बोलले.

वसंतकुमार खिन्न होऊन घरी आले. ते घरी येतात तो प्रमोद घरी नव्हता. प्रमोद घरातून निघून गेला. कोठे गेला? प्रमोद कोठे गेला? मायेचा सर्वनाश करून तो स्वत: ही गुप्त नाही ना झाला? त्याने एखाद्या नदीमध्ये स्वतःचे जीवन अर्पण तर केले नसेल ना? कोठे गेला? वसंतकुमारांनी अक्षयकुमारस तार केली की प्रमोद नाहीसा झाला आहे. अक्षयकुमारांच्या मनात असा विचार आला की, प्रमोद हा विलासपूरला तर गेला नसेल? त्यांनी प्रमोदचा फोटो त्याच्या वडिलांकडून मागवून घेतला. ते विलासपूरला जाण्यास निघाले.

अक्षयबाबूने आपला वेष बदलला होता. ते जणू, महाराष्ट्रीय दिसत होते, कोणाला ओळखही आले नसते, की ते बंगाली आहेत म्हणून गुप्त पोलिसास ही बहुरूप्याची विद्या अवश्य येत असते, त्याच्या जीवनाचे सारे कौशल्य त्या बहुरूपीपणातच असते. अक्षयकुमार विलासपूरला आले. तेथील फौजदार पोलीस अधिकारी यांस भेटले. ते टेहळणी करू लागले. सोनखेडी वगैरे गावे हिंडले, त्यांना प्रमोद अजून कोठे दिसला नाही. -

एक दिवस अक्षय बाबू रात्री आठची वेळ असेल नदीतीरावर बसले होते, नदीवर अनेक लोक फिरावयास येत होते, शांत, रम्य व निर्मल नदीप्रवाह वाहन होता. नदी म्हणजे परमेश्वराची करुणा आहे. परमेश्वराचे कारुण्य नदीच्या रूपाने सतत वाहत असते. जगालाओलावा देत असते. कधीकधी हा प्रवाह वरून आटला तरी जरा हातभर वाळू खणली की खाली हा गुप्त कारुण्य - निर्झर थंडगार स्वच्छ वाहतच असतो. परमेश्वराची तप्त मनाला व शरीराला रिझवते-सुखवते. परमेश्वराच्या करुणेला खरा राग कधी माहीतच नाही. कधी कधी रागाचा अविर्भाव आणतो- वादळे उत्पात, साथी भूकंप, दुष्काळ, ज्वालामुखी - दाखवतो परंतु ही बरीच तापलेली वाळू जरा दूर करून खाली पाहिले तर तेथे झुळूझुळू वाहणारी करुणा, प्रेमगंगा दिसून येते. परमेश्वर ज्या दिवशी या दुनियेवर घुस्सा करील त्या दिवशी या दुनियेचे भस्म होईल, तिची राख होईल, मग नवीन तृणांकुर येणार नाहीत, नवीन जलधारा मिळणार नाहीत, पाखरे गात गात चिवचिव करीत वनराजीतून हिंडणार नाहीत, आपल्या अंगात विश्वाची गाणी गात येणार नाहीत.

परमेश्वर, तो कधीही रागवत नाही, तो आचारशांतीचा सागर आहे, प्रेम- समुद्र आहे, धैर्याचा मेरू आहे, आशेची अनंत मूर्ती आहे. परमेश्वर, तो का रागवेल? तुम्ही आम्ही रागावलो तर एकवेळ चालेल. परमेश्वर रागावून कसे चालेल? रागाने कार्य नीट होणार नाही. ज्याला या विश्वाचा कारभार हाकायचा आहे, तो रागीट कसा असून चालेल? तो अत्यंत धिमा असला पाहिजे. आपण जरा रागावलो तर काम बिघडते. परमेश्वराचे विशाल काम- रेखीव आखीव काम तेथे राग असेल तर सारा गोंधळ माजेल, बिघडेल परमेश्वर, तो रागवत नाही. आईच्या पोटात असलेल्या बच्च्याला तेथे जीवन देतो, वठलेल्या तरूला उन्हाळ्यात पाणी न घालता तो पालवी फोडतों व मनुष्य पाणी घालतो. त्या झाडांपेक्षा ही संत्रीची झाडे नव्या नव्या पोषाखाने नटवतो, सजवतो न मागता तो देतो.

मोराला पिसारा देतो, शुक्राला सुंदर हिरवाहिरवा रंग देतो, आठ महिने ती कोकीळा मुकी असते परंतु आम्रमंजरीपाहून नवपल्लवीततरुराजी पाहून कोकिळेचे हृदय भरून येते. तिला आपल्या भावना प्रकट कराव्याशा वाटतात व प्रभू तिची इच्छा पुरवतो व ती म्हणू लागते “कूक कूक" कोठून या उन्हाळ्यात ही संपत्ती आली? पाण्याचा ठण ठण पाळ व्हावयाची वेळ आली, परंतु या झाडांच्या नसानसांतून कोणी जीवनरस भरला, कुऊ कोणी, कुऊ कोणी परमेश्वर तो दयाळू आहे, त्याची दया, त्याचे, प्रेम, त्याची करुणा, . त्याचे या विश्वासाठी वितळणारे, पाझरणारे अगाध हृदय म्हणजेच या शतसरिता, त्या सरितटावर कोणीही या, दुष्ट या सुष्ट या, व्याघ्र या. वृक या, हरीण या, गायी या, सर्वांचे स्वागत ती सरिता करीत आहे. सर्वाशी सूखसंवाद करिते, सर्वांना शांतविते, सर्वांच्या पायांना धुते, परमेश्वर आपल्या मुलांचे पाय धुतो, त्यांना अंतर्बाह्य शांत करतो. "

तो पाहा प्रमोद तेथे बसला आहे. त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही. आता अंधार पडू लागला आहे, प्रमोद तेथे एक बंगाली गीत काही पुटपुटला वाटते ! ते पाहा अक्षयकुमार त्याच्याजवळ गेले व बंगालीत बोलू लागले. “तुम्हाला बंगाली येते, तुम्ही तर महाराष्ट्रीय दिसता,” अक्षयकुमारास प्रमोदने बंगालीत विचारले. "मी बंगालमध्ये राहिलो हातो त्यामुळे येते आहे. आता पेंशन घेतले आहे व इकडे आलो आहे, तुम्ही इकडे कोठे?" अक्षयकुमारांनी विचारले, “मी एक मुशाफर आहे. माझा एक मित्र उगीच तुरुंगात सरकारने डांबला आहे. तुम्हाला माहीतच असेल तो महाराष्ट्रीय तरूण आहे. त्याची पत्नी बंगीय कन्या आहे. तिच्यासाठी, तिने सांत्वन करण्यासाठी आलो.” प्रमोद म्हणाला.

“माझ्याकडे येत जा मला आनंद होईल,” अक्षयकुमार म्हणाले.

“येईन, परंतु सध्या वेळ होणार नाही. येथे सायंकाळी जरा फिरावयास आलो, तेथे तुमची आमची भेट होत जाईल, मी बाहेर कोठे कसा जाऊ? एक तर ओळख नाही, शिवाय आपल्या मित्राची पत्नी दुःखात असता आपणांस तरी कसे सुखाने हिंडवेल, फिरवेल? प्रमोद म्हणाला.

“खरे आहे. तुमच्या मित्राच्या सुटकेबद्दल काही खटपट तुम्ही नाही का केली?” अक्षयकुमारांनी विचरले.

"नाही एकतर मी गरीब आहे, शिवाय आपणांस वाचावावयास जाऊ तर एखादे वेळेस आपण अडकायचे. माझा मित्र अशा फंदात सापडेल असे वाटले नव्हते. आमच्या बंगालमध्ये हे फार बाँबचे बंड. परंतु महाराष्ट्रीयालाही त्यांनी ओढले, फसला व त्याची पत्नी फसली. बिचारी. बरे आता मी जातो असे म्हणून प्रमोद निघून गेला.

त्याच्या पाठोपाठ त्याला दाद न लागूदेता अक्षयकुमारही गेले. प्रमोद मायेच्या घरात शिरताना त्यांनी पाहिला. अक्षयकुमारांनी अंगणाच्या जवळ घराशेजारी पोलीस उभे ठेवले. शिट्टी वाजवली म्हणजे पोलिसांनी यावयाचे असे ठरले होते. ते पाहा अक्षयकुमार हलकेच घरात शिरले.

माया खिडकीतून वरती आकाशात दिसणा-या शततारकांकडे पाहात होती. तो पाहा प्रमोद एकदम तिच्या पाठीमागून जाऊन तिचे डोळे घरीत आहे. घरले डोळे, घाबरली माया धांदरली. “आलेत तुम्ही, असे म्हणत ती चमकून 'उठते तो कोण? कोण तुम्ही, कोण तुम्ही पापी. परांगनेला स्पर्श करायला तुमचे हात धजतात कसे? पापी, जा काळे करा, जा.” माया रागाने थरथरत होती. “परांगना नाहीस. तू माझी आहेस. लहानपणापासून मी तुला वरले आहे. पाषाणी, माझी तू निराशा केलीस, ओळख मला, कोण मी, मी प्रमोद. ओळख तुझ्या दृष्टीने मी जाणार नाही. सारा बंगाल का ओस पडला होता? एका महाराष्ट्रीय मुलाला तू वरलेस ? या दगडधोंड्यांच्या देशातल्या भिकाऱ्याला वरलेस? तुला वंगभूमीत कोणीच लायक तरुण दिसला नाही का? तू बंगालचा अपमान केला आहेस? मातृभूमीचा अपमान केला आहेस. आम्हा तरुणांचा अपमान केला आहेस. तरुणकुमारिकांना तूमान खाली घालावयास लाविले आहेस. तू शेवटी या माकडास पसंत केलेस? माकडाशी माझी वंग भगिनी विलासचेष्टा करीत आहे हे माझ्याने कसे सहन होईल? हा पाहा प्रमोद, हा वीर मुका आहे. मरणावर उदार होणाऱ्या बंगाली तरुणांतील एक तरुण आहे. काय आहे महाराष्ट्रात? काही भावना आहे, काही तेज आहे, मरणाची बेपर्वाई आहे? काय आहे? तू बंगाल सोडून आलीस, त्याने महाराष्ट्र सोडून का न यावे ? तुझा बाप झुरून मेला. पाषाणी, म्हणून तुझा मी सूड घेतला. मी खोटी पत्रे लिहिली, मी तुला माकडाजवळ चेष्टा करून देणार नाही. आता पडला तो तुरुंगात सोडून दे त्याचा मोह. पाप केलेस, स्वजनद्रोहाचे पाप केलेस तेवढेपुरे.चल बंगभूमीत परत चल. त्या भगीरथीच्या शिखरांनी शीतल होणाऱ्या वाऱ्याने वहावली जाणारी वंगभूमी, तिची सेवा करायला चल, हिमालयातील गगनचुंबी वृक्षांना वारा कसा वंगभूमी सुखवीत आहे, तिच्या कडे चल. शूरांची भूमी, काविवरांची भूमी, शास्त्राज्ञांची भूमी, धर्ममूर्तीची भूमी, चल. आपल्या भूमीस परत चल. मला शांत कर आपण आनंदाने राहू, सेवा करावयास शिकव." प्रमोद भावनावेशाने बोलत होता. माया रागाने पाहत होती, जणू त्याला जाळीत होती. पार्वतीला व्रतच्युत करावयास आलेला, शंकराची निंदा करणारा तो बटू त्याला पाहून पार्वती जी कोपायमान झाली तशी माया कोपायमान झाली.

“माकडा, तू माकड. ते का माकड आहेत? काय एकाच भूमीला गुणांचा मक्ता मिळाला आहे? तुमच्या बंगालमध्ये येऊन ते कला शिकते झाले, तुमचे आश्रम पाहाते झाले, तुमचे गुण शिकते झाले, स्वयंसेवक होऊन सेवा करते झाले ! पूजादिवसांत सारे स्वयंसेवक गेले परंतु ते काम करीत राहिले. ही दगडधोंड्यांची भूमी ही त्यागभूमी आहे. या भूमीतील अणुरेणू त्यागाने तपस्येने भरलेला आहे. अनेक संतांचे पाय या भूमीला लागलेले आहेत. आज या पतित काळीही महान विभूती येथे नाही का झाल्या? कोणी कोणाला हिणवू नये. महाराष्ट्रीय लोक गुणज्ञ आहेत. ते तुमच्याकडे आले. तुमचे वाङ्मय, तुमचे जीवन अभ्यासिते झाले. महाराष्ट्राचा अभ्यास करावा, महाराष्ट्राची परंपरा पाहावी, महाराष्ट्रीय हृदय तपासावे, महाराष्ट्रातले स्वयंसेवक कसे साधनहीन, आश्रयहीन परंतु जिवाचे रान करून रक्ताचे पाणी करून उपाशी राहून उघडे राहून सेवा करीत आहेत ती पाहावी, महाराष्ट्रीय वाड्मय पाहावे, महाराष्ट्राचे उज्ज्वल वाड्मय प्राचीन वाड्मय अभ्यासावे, काय तुम्ही करत आहात? बंगाली भाषेतील उत्कृष्ट कादंब-या मराठी उतरल्या परंतु मराठीतील विंध्याचल, रागिणी, मराठीतील उषःकाल, पण लक्षात कोण घेतो, अजिंक्यतारा या बंगाली भाषेत गेल्या का? रवींद्रनाथ, द्विजेंद्रलाल राय मराठीत आहेत, परंतु मराठीतील खाडीलकर, कोल्हटकर, केळकर, गडकरी, बंगालीत आले का? ज्ञानेश्वर, तुकाराम उतरले का? मराठ्यांचा उज्वल इतिहास बंगाली भाषेत लिहिलात का? ते जदुनाथ इंग्रजीत औरंगजेबाचा रद्दी इतिहास लिहीत आहेत, म्हणावे बंगाली भाषेत लिही ना? त्यांना त्रिखंड कीर्ती मिळवावयाची आहे, उदोउदो करावयाचा आहे. मराठीतील ते राजवाडे पाहा. त्यांच्या नखाची सर जदुनाथ सरकारना नाही. लिहीन तर मराठीत लिहीन, हा त्यांचा बाणा. जगास ज्ञानाची खरी तहान असेल, तर हा माझा मराठी बोल, जग शिकेल, मोत्याला पारखीत हंस येतील, असे तो तेजाळ गाढा पंडित म्हणावयाचा. तो मराठीतील अपूर्व ज्योतिषशास्त्राचा इतिहास लिहिणारे शंकर दीक्षित, तो बंगालीत उतरला का? मराठीत केवढा सुंदर ज्ञानकोश झाला ! त्याचे प्रस्तावना खंड वाचा, हिंदुस्थान खंड वाचा, उतरा बंगालीत! तुम्ही आपल्याच गुंगीत व घमेंडीत आहात. रवींद्र, जगदीशचंद्र आहेत, एवढ्याने साऱ्या जगास हिणवू नका. परमेश्वर साया झाडांना पोषित आहे. प्रत्येक तरूवेलीला सुंदर पोषाख, सुंदर भिन्न भिन्न फुले, फळे देत आहेत. मी वंगभूमीला फसवत नाही, तर महाराष्ट्राचे हृद्य मी बंगालला देईन, बंगाली भाषेत मराठीतील सुंदर स्त्रीगीते, सुंदर ओव्या, सुंदर कथा उतरीन. महाराष्ट्री भगिनीची वंगीय भगिनीस ओळख करून देईन. मी वंगभूमीची सेवाच करावयास आले आहे. व्यापक सेवा करावयास आले आहे. मी भारतमातेची सेवा करावयास आले आहे. माझ्या वंगमातेची ही सनातन माता- भारत माता - तिची सेवा मी करीत आहे. हे सारे प्रांत ही तिची बाळे. त्यांनी परस्परांपासून अहंकारे दूर राहावे हे तिला कसे आवडेल. भारतमायीचा प्रेमळ हात माझ्या शिरावर आहे. माझे मंगलच ती करील. जा, वंगभूमीची खरी सेवा करावयाची असेल तर हृदय निर्मळ करून जा.

एका वंगभूमीच्या कन्येला व्रतच्युत करून, पातिव्रत्यच्युत करून तू वंगभूमीची सेवा करणार का? तू मात्र आपल्या वंगीय कुमार- कुमारीस, युवयुवती समान खाली घालवयास लावशील. बंगाली तरुणं तुझे तुकडे करतील. त्यांना हा अपमान सहन होणार नाही. जा, तू माझा भाऊ आहेस. बंधो, जा नीट राहा. मला विसरून जा. मला माझे मला भगिनीचे प्रेम दे. मला भाऊ नाही, प्रमोद मला भाऊ नाही. मला भाऊबीजेच्या दिवशी पुढच्या वर्षी ओवाळावयास तू ये. महाराष्ट्रात भाऊबीज केवढा आनंद असतो. हो माझा भाऊ हो. वंगदेशाला भूषण हो. महाराष्ट्राचा मित्र हो. भारतमातेच्या लेकरांतील प्रेम वाढव, भेदभाव, अहंकार, मत्सर, अभिमान कमी कर. प्रमोद, माझी दया नाही येत? त्यांना तुरुंगात तू घातलेस तेही मी विसरेन, माझा भाऊ होऊन ते पाप धुऊन टाक. मी अश्रुने, धैर्याने दिवस काढीन. त्यांचे मित्र आहेत, येथे दवाखाना आहे त्यात मी सेविका होईन व त्यांच्या येण्याची वाट पाहीन.

प्रमोद, ते पाहा तुझे डोळे, ते विरघळल, शुद्ध होऊ लागले. वंगीभूमीतील पवित्र भागीरथी आली, तुझी दृष्टी धुवायला आली, गळू दे. पुसू नको, ते अश्रु गळू दे. माझ्या भावाच्या डोळ्यांतील हे अश्रु किती पवित्र व सुंदर आहेत. प्रमोद रड रडून तुझा पुनर्जन्म होऊ दे. पूर्वीचा प्रमोद मरू दे, नवीन प्रमोद जन्मास येऊ दे. हे अश्रु दुःखाचे व आनंदाचे होवोत. मरणाचे व जीवनाचे होवोत "

“मी जातो, मला तुझ्या पाया पडू दे. मी माझे शरीर गंगेत अर्पण करतो, मला क्षमा कर.” प्रमोद अश्रुरुद्ध कंठाने म्हणाला.

“प्रमोद असे नको करू. पश्चात्तापाने पुनर्जन्मच झाला. शरीरच दुसरे घेऊन यावयास पाहिजे असे नाही. मन निराळे झाले. हृदय निराळे झाले की शरीरही निराळे होते. आतील प्रकाश बाहेर पडतो. प्रमोद वसंतकुमार आहेत. ते माझे वडील आहेत. त्यांना दुःख देऊ नका. त्यांचे तुझ्यावर किती प्रेम. जाऊन त्यांच्या पाया पड. मी त्यांना पत्र लिहीन. त्यांना किती आनंद होईल, भाई प्रमोद जा, घरी जा." माया म्हणाली.

"मला बाबांना हे तोंड दाखवण्यास लाज वाटते, माया.” प्रमोद म्हणाला. “मी तुझ्याबरोबर आले असते, परंतु यांच्या खटल्याचे काय होते इकडे माझे लक्ष आहे. प्रमोदभाई जसे दिवसही भरत आले आहेत. प्रमोद तू जा.” माया म्हणाली.

“मी तुझ्या पतीला सोडवीन तेव्हाच घरी परत जाईन, हीच माझी प्रतिज्ञा” म्हणाला.

“मग आपण सारीजणे घरी तुझ्या घरी जाऊ. माझ्या बाबांना नाही परंतु आपल्या बाबांना तुझ्या माझ्या बाबांना वसतकुमारांना भेटावयास जाऊ." माया म्हणाली.

“मी जातो." प्रमोद म्हणाला.

“कोठे? तू जेवला का?” मायेने विचारले. 

“मी माझ्या खोलीत जातो, तेथे राहणे बरे नाही.” असे म्हणून प्रमोद दाराकडे वळला.

प्रमोद दारातून बाहेर जाते न जातो तो शिटी झाली. पोलिसांनी प्रमोदला पकडले. शिटी ऐकून माया बाहेर आली. “माया, माझे मला कर्म फळले. परंतु घाबरू नकोस. सर्व मंगल होईल. तुझा पती मुक्त करून फारतर मी तुरुंगात राहीन" प्रमोद शांतपणे म्हणाला.

नैले. पोलिसांनी सां प्रमोदला खोलीत नेले. कोणत्या खोलीत जावयाचे प्रमोदला चिंता होती, ती परमात्म्याने नाहीशी केली माया खोलीत येऊन प्रभूचे आभार मानती झाली. माझा बाळ, त्याने मला वाचकले माझे पातिव्रत्य संभाळले, माझे शील राखले, बाळ, तुला नावे ठेवली होती रे, रागवू नको हो राजा. आता त्यांनाही आण. तू बाहेर ये व तेही बाहेर येऊ दे. असे म्हणून आपल्या पोटातील बाळाला आपल्या गुडघ्यात घेऊन कुरवाळले, त्याच्यवर अश्रूचे न्हाण घातले.

बाबू, दीनबंधूं बाबू तुरुंगात होता. प्रमोदही तुरुंगात होता. मायेने सर्व हकिकतीचे पत्र वसंतकुमारास लिहिले. वसंतकुमारांना खरी हकिकत समजली. ते शांतपणे वाट पाहात राहिले.

गोविंदा परमेश्वराची प्रार्थना करीत असे. गोविंदा बाबूस भेटावयास येत होता. तो मायेचेही समाधान करण्यास येत असे. बाबू केव्हा सुटेल, त्याचे काय होईल याची त्याला सारखी चिंता होती. तो रात्रभर कधीकधी प्रार्थना करीत असे. त्याला आशा वाटे, उत्साह येई, दिवसभर आशेने काम करी.

आज बाबूचा खटला सुरू व्हावयाचा होता. तारीख जाहीर झाली होती. बाबूला भेटावयास, त्याचा खटला ऐकावयास गोविंदा गेला नव्हता. आज आश्रमातच सारेजण उपासना व उपवास करणार होते व दिवसभर चरखा चालवणार होते. पहाटेची प्रार्थना झाली, स्नाने झाली व सर्व आश्रमवासी चरख्यावर सूत काढीत असले. गोविंदा रामराम म्हणत होता. त्याच्या निर्मळ डोळ्यांतून अश्रू येत होते. गावातील काही मुलेही आज व्रतस्थ राहिली होती व चरखा चालवीत होती. माया घरात समोर गोपालकृष्णाची मूर्ती घेऊन जप करीत बसली. कुमार आपल्या आरामखुर्चीत बसून अश्रु ढाळत होते. मधूनमधून हात जोडीत होते.

पोलिसांनी बाबू व प्रमोद यांना उभे केले. प्रमोदला पाहून बाबूला आश्चर्य वाटले. सरकारतर्फे बाबूवरचे आरोप सांगण्यात आले. ती पत्रे तेथ समक्ष दाखवण्यात आले. बाबूने ईश्वराला स्मरून सांगितले. मला यातील काही माहित नाही. माझा कोणत्याही प्रकारचा संबंध या अत्याचाराशी नाही. माझ्या गुरूने मला खेड्यातील जनतेची सत्याच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने सेवा करायला शिकवले आहे. वंगीय तरुणीबरोबर मी विवाह केला याहून दुसरा कोणताही अपराध, गुन्हा मी केलेला नाही. ज्या बंगालमध्ये क्रांतिकारक जास्त जन्मतात, त्या बंगालमधील लोकांशी संबंध ठेवणे सरकारला या संबंधापासून फार भयंकर क्रांतिकारक पुढे निर्माण होतील अशी भीती वाटते का? मी कोणता गुन्हा केला? आज इतके दिवस मला उगीच का कोंडून ठेवले आहे हे मला समजत नाही."

परंतु कोर्टाचे काम आज तेवढचे राहिले. प्रमोदचे वडील व माया यांना साक्षीस बोलवण्याचे ठरले. प्रमोदच्या वडिलांस येण्यासाठी दोनतीन दिवस लागतील. तारीख आठ दिवसांवर ढकलण्यात आली.

परंतु मायेने आपली कैफियत लिहून ठेवली. तिचे पोटदुखत होते. ती प्रसूतिसदनात राहावयास गेली. डॉ. करुणाकर तिची काळजी घेत होते.

मायेची सासू यात्रेला गेली हाती, ती आता घरी परत आली होती. ही सारी हकिकत ऐकून ती रडू लागली. ती आळवा." माया म्हणाली. बाबूची माता घरी जाऊन परमेश्वराचे स्तवन करू लागली.

वसंतकुमारास आणण्यासाठी मायेने स्टेशनवर माणसे गाडी घेऊन पाठवली होती. वसंतकुमार आले. ते मायेला भेटले. माया खाटेवर पडली होती. “सारे मंगल होईल, रडू नका.” मायेने त्या वृद्धास धीर दिला. उद्याची तारीख होती. अक्षयकुमार रात्री वसंतकुमारास भेटावयास आले

होते. वसंतकुमारास काय करावे ते समजेना. “तुम्ही सांगा की मुलाला जणू वेड लागले होते, तो तासच्या तास बसे व हे वेड्यासारखे वर्तन त्याने केले. त्याला पश्चाताप झाला आहे. त्याला क्षमा करावी.” असे अक्षयकुमारांनी सांगितले. वसंतकुमारास ते पटले.

मायेने आपली कैफियत सुंदर लिहिली होती. ती कोर्टात हजर करण्यात

येणार होती.

तारीख आज होती. सकाळपासून मायेचे पोटजरा जास्त दुखत होते. सकाळपासून गोविंदा व त्याचे मित्र चरखा चालवीत होते व हृदयात परमेश्वराला आळवीत होते.

कोर्ट भरले. खूप प्रेक्षक आले होते. आज प्रमोदची जबानी होती. प्रमोदने आपला सारा अपराध कबूल केला. “माझे मायेवर लहानपणापासून प्रेम होते, तिच्याबरोबर विवाह करावा ही माझी हृदयातील रात्रंदिवस खेळवलेली इच्छा होती. परंतु एक दिवस हा महाराष्ट्रीयन तरुण आला व त्याने माझे जीवन हरण केले. मला तो बंगालचाही अपमान वाटला, बंगाली तरुणांचा अपमान वाटला. बंगालमध्ये लायक वर उरलाच नव्हता का हा विचार माझ्या मनात आला. मायेची तिच्या महाराष्ट्रीय पतीपासून वियुक्तता करावयासाठी मी ही असली पत्रे लिहिण्याचा उपाय रात्रंदिवस बसून नक्की केला. मी प्रथम पोलिसांस कळवले की, पत्रे येतील. मी मुद्दाम अक्षर दोन्ही पत्रांतील जरा बदलून लिहिले. सारा अपराध माझा आहे. मी मायेकडे एके दिवशी रात्री गेलो तिला रागाने बोललो मला वर असे सांगितले. परंतु त्या थोर भगिनीने माझे डोळे उघडले. मी तिचा भाऊ झालो. माझ्या डोळ्यातून अथू आले व त्या अश्रुंनी मी निराळा झालो आहे, मला पश्चाताप होत आहे, वाईट वाटत आहे. परंतु मी क्षमा मागत नाही. मला शिक्षा करा या लहरी व विकारी मुलाला शिक्षा करा.” या नंतर बाबूच्या वडिलांची साक्ष झाली. वसंतकुमार म्हणाले “हा माझा मुलगा प्रमोद. याचे प्रेम माझ्या मित्राच्या मुलीवर मायेवर होते, परंतु तिचे प्रेम बंगालमध्ये सेवा करावयास आलेल्या व आश्रमात शिक्षण घेण्यास आलेल्या या महाराष्ट्रीय तरुणावर होते. या दोघांचे लग्न लागल्यापासून माझा मुलगा दुःखी झाला. तो तासच्या तास खोलीत बसे. खाईना, पिईना. आम्हा मायबापांच्या हृदयाची कल्पना कोर्टाने करावी, मुलाने सारा अपराध केला खरा, परंतु तो शुद्ध झाला आहे. वेडेपणाच्या भरात काहीतरी त्याने केले. कोर्टाने आम्हा म्हाता-या आईबापांकडे पाहून या मुलाला क्षमा करावी, वृद्ध मायबापांचा दुवा घ्यावा.” यानंतर मायेची कैफियत वाचण्यात आली.

“प्रमोद व मी एका शाळेत शिकवावयास होतो. मी वादविवादोत्तेजक सभेत भाग घेई. प्रमोद माझी बाजू घेत असे. परंतु मी सहावी इयत्तेतून शाळा सोडली. प्रमोदचे मजवर प्रेम होते. मला तो पत्रे पाठवीत असे. त्या वेळेस मी अविवाहित राहावयाचे ठरवीत होते. पुढे हा महाराष्ट्रीय तरुण आला व त्याने माझ्या जीवनात क्रांती केली. तो मला महाराष्ट्रात घेऊन आला माझ्या पित्याने त्यांच्या पदरात मला घातले.

प्रमोद मजकडे आला होता. मला वरण्यासाठी, माझ्या प्रेमास पुन्हा बदलवण्यासाठी आला होता. परंतु शेवटी तो विरघळला. तो माझा भाऊ झाला. माझ्या पाया पडला. पाय धुतले त्याने. ईश्वराच्या न्यायसनासमोर तो निर्दोष झाला आहे. भूतलावरच्या न्यायसनासमोरही तो निर्दोष ठरो. माझा भाऊ निर्दोष सुटो, माझा पतीही निर्दोष सुटो मुलीची कोर्टाला करुणा येवो.”

अक्षयकुमारनीही साक्ष देऊन प्रमोदचे परिवर्तन गमक्ष पाहिल्याचे सांगितले. सर्व खटला चालला. न्यायाधीश काय निकाल देणार याच्याकडे लक्ष लागून राहिले होते. न्याधीशांनी पुढील निकाल जाहीर केला. “बाबू पूर्णपणे निर्दोष आहे. प्रमोदचा गुन्हा आहे. परंतु एकंदर परिस्थिती लक्षात घेता, त्याचे परिवर्तन लक्षात घेता त्यालाही मी सोडून देतो. मानसिक शिक्षा त्याने भोगली तेवढी पुरे आहे. बाबू, माया, वसंतकुमार यांनीही प्रमोदसाठी शिक्षा भोगली आहे. तो प्रमोदलाच जणू होत होती. मायेचे कौतुक करतो व वसंतकुमारांनी आपण होऊन हे अक्षर माझ्या मुलाचे सांगितले. त्यांचा हा सरळ प्रेमळ स्वभाव त्यांचे मी कौतुक करतो, गौरव करतो. हा आनंदपर्यवसायी खटला मी कधी विसरणार नाही. "

कोर्टात टाळ्यांचा गजर झाला. बाबूची मिरवणूक निघाली. मध्ये वृद्ध वसंतकुमार बसले होते, दोन बाजूस हे दोन तरुण बसले होते, एक मुलगा व एक मानलेला जामात ! एकच जयजयकार झाला, मायेला वार्ता कळली. आनंदाने पोट जास्तच दुखू लागले व बाळबाहेर आला. सूर्य अस्तास जाऊन चंद्र वर येत होता. शोक अस्ताला जाऊन शोकताप दूर होऊन हा बाळचंद्र उदयास येत होता. मायेच्या सासूने मिरवणुकीत साखर वाटवली. गावात आनंदी आनंद होता.

मायेजवळ बाळ होता, मुलगा झाला होता: मायेचे हृदय आनंदाने थयथय नाचत होते. या बाळाला नावे ठेवली मी वेडी, कठोर मी. माझा बाळ देव आहे. आनंद आहे बाळाला तिने दुध पाजले. दवाखान्यात बाळबाळंनतीन होती. बाबू, प्रमोद, वसंतकुमार यांना पुत्रजन्माची वार्ता सांगण्यात आली. मायेजवळ त्यावेळेस बोलता येण्यासारखे नव्हते. ती दमली होती.

आज बाबूच्या घरी केवढा आनंद. गोविंदाकडे केव्हाच दूध पाठविण्यात आले होते. अक्षयकुमारही तेथेच आले. महाराष्ट्रीय घरी आज वंगीय बंधूस मेजवानी होती. प्रमोद वडिलांच्या पाया पडला त्यांनी त्याला जवळ घेतले. “ज्याचा शेवट चांगला ते सारे चांगले.” अक्षयकुमार इंग्रजीत म्हणाले.

प्रार्थना करण्यात आली. बाबूने सुंदर प्राथना म्हटली, प्रार्थने नंतर भोजने झाली. शिरापुरी करण्यात आली होती. महाराष्ट्रीय भाज्या मंडळीस आवडल्या. वृद्ध अक्षयकुमार परंतु तरुणास लाजवते झाले. वसंतकुमारांचे आनंदाने पोट भरून आले होते.

सारी मंडळी झोपली होती फक्त बाबूला झोप येईना. अनेक विचार त्याच्या हृदयात येत होते. मायेबद्दल प्रेम व आदर त्याच्या हृदयात शतपट वाढला. बाळाला केव्हा पाहू असे त्याला झाले. तो परमेश्वराचे मधूनच आभार मानीत होता. महाराष्ट्र व बंगालचे लग्न दिव्यातून पार पडले. देवाला आवडले असे मनात येऊन तो आनंदला, गहिवरला. इतक्यात खालून कोणीतरी हाक मारली. “गोविंदा, गोविंदा आला” बाबू धावतच गच्चीवरून खाली गेला. बाबूला गोविंदाने मिठी मारली. रामभरतांची ती भेट होती. दोन महिने बाबू तुरुंगात त्या लॉकअपमध्ये होता. दोन महिने चौदा वर्षाप्रमाणेच गोविंदास वाटले, त्याचा वनवासी राम त्याला परत मिळाला. दोघे मित्र गच्चीवर गेले. बाबूने त्याला तेथे पाणी आणून दिले. गोविंदाने हात पाय धुतले, तोंड धुतले, घरात शिरापुरी उरलेली होती. बाबूने गच्चीवर चांदण्यात गोविंदाला जेवावयास वाढले. गोविंदा जेवत होता. दोघांच्या आनंदवार्ता चालल्या होत्या.

“बाबू, गेले दोन महिने जेवण गोड गेले नाही. रडू यावयाचे. गुरुजींची आठवण येई, तुझी आठवण येई, कधी प्रार्थना करीत मी रात्रभर बसे व जणू आशा हृदयात संचरे, हृदयदेव बोले, “सारे मंगल होईल” गावातील मुलेसुद्धा व्रतवासी राहून, उपवासी राहून दिवसभर सूत कातीत होती, आज व मागच्या तारखेस आम्ही गावात गूळ वाटला व येथे मी धावत आलो, माझ्या दीनबंधूस भेटावयास आलो.

“गोविंदा, एकटे रात्री येण्यास तुला भीती वाटली नाही,” बाबूने विचारले. “बाबू, प्रमाला भीती नसते, तुळसीदासांना साप दोरी वाटला. प्रेमदीप हृद्यात असला म्हणजे मग कशाची अडचण नसते, कसला विरोध नसतो. मग सारे सुंदरच आहे. कुरूप मुले, शेंबडी त्यांची मी मुखे धुतो, त्यांचे दात घासतो. बाबू-" गोविंदा प्रेमाने बोलत होता.

“जेव आधी, तुझे जेवण थांबते, गोविंद एक दुसरी आनंदाची गोष्ट सांगू, सांगू? तू ओळख. " बाबू म्हणाला.

" काय बरे ! ही ताई बाळंत झाल्या का?" गोविंद म्हणाला.

“हो बाळ आनंदाची वार्ता घेऊन आला, मंगल घेऊन आला. महाराष्ट्राचे व बंगालचे साऱ्या भारताचे नवमंगल घेऊन बाळ आला. त्याचे नाव आपण आनंद ठेवू हा” बाबू आनंदाने, प्रेमाने बोलत होता. “पुरे आता” गोविंदा उठू लागला. “हे रे काय? तेवढा जास्त का झाला?” बाबू म्हणाला. “अरे आनंदाच्या वार्तांनी पोट भरले. लोक म्हणतात. पिपासुभिः काव्यरसो न पीयते परंतु काव्यानेही पोट भरते, आनंद वार्तेने पोट भरते यात शंका नाही. बाबू संयमी माणसाला जास्त खाऊन कसे चालेल? जिभेसाठी थोडेच खावयाचे आहे? महात्माजींचा व्रतविचार ते वाचला नाही का?" असे म्हणत गोविंदा उठला.

दोघे मित्र आकाशाच्या खाली पडले. अनंत तारा चमचम करीत होत्या. " तो श्रावण, ही कावड घेऊन चालला आहे, आईबाप घेऊन चालला आहे. तारेसुद्धा पाहताच प्राचीन संस्कृती त्यात कळावी अशी योजना पूर्वजांनी करून ठेवली आहे. ते मृग व तो व्याघ केवढी त्या हरणांची सत्यनिष्ठा ! मृगांनी माणसास मुक्त केले. मृगांच्या सत्यनिष्ठेने व्याघही 'ज्याप्रमाणे मायेच्या पावित्र्याने प्रमोद पवित्र झाला" गोविद म्हणाला.

“ज्याप्रमाणे मायेच्या पावित्र्याने प्रमोद पवित्र झाला" बाबू म्हणाला. “हो आपण पवित्र झालो म्हणजे सभोवतालची सृष्टीही पवित्र होते. चंदनाच्या सुगंधाने लिंबही सुगंधी होता व त्यांचे खोड उगाळले जाते व तो लेप देवाच्या भाळी शोभतो, पवित्र होणे हा जगातील पहिला कायदा आहे नाही बाबू!” गोविंदा त्याचा हात हातात घेऊन म्हणला.

“आकाशातही भारताची संस्कृती आपण भरली आहे, तेथे वसिष्ठादी ऋषी, अरूंधती, ध्रुव, श्रपवण, मृग, ययाती यांना आपण नेऊन बसवले आहे. पाताळात बळी, वामन यांना ठेवले आहे. आकाशात, पाताळात, पृथ्वीवर भारतीय संस्कृती भरून ठेवली आहे. थोर संस्कृती” बाबू बोलू लागला. जणू कवी झाला होता.

बोलता बोलता ते दोघे पुनर्वसुचे तारे झोपी गेले. आकाशातील चंद्र व नक्षत्र मंडळी प्रेमळपणे त्यांच्याकडे पाहात होती. माया शांत झोपली होती, तिच्या कुशीत तिचा बालराज निजला होता.

बाबूने प्रमोद व वसंतकुमार यांना बारसे होईपर्यंत ठेवून घेतले. त्यांना सोनखेडीचा आश्रम दाखवला. उत्कृष्ठ खादी पाहून ते प्रसन्न झाले. सोनखेडी गावातील स्वच्छता, तेथील सुंदरता पाहून प्रमोद प्रसन्न झाला. आजूबाजूच्या खेड्यातूनही प्रमोद हिंडला. महाराष्ट्र गाजावाजा न करता सेवा करीत आहे. यथाशक्ती सेवा करीत आहे हे त्याने पाहिले व मायेचे शब्द त्याला खरे वाटले.

दहा दिवस होऊन माया आज घरी आली होती. दोन दिवसांनी बाळास पाळण्यात घालावयाचे होते. सोनखेडीच्या एका सुताराने सुंदर पाळणा केला होता. खादीच्या चिमण्या करून पाळण्याला लावल्या होत्या. मोठा रमणीय पाळणा. त्यात छोटी गादी आश्रमातून केलेली पाठवण्यात आली होती. तो पाळणा आला. तो टांगण्यात आला.

आज बाबूकडे मोठा समारंभ होता. गोविंदा व इतर आश्रममित्र आले होते. जीव आला होता. मंगल वाद्ये वाजत होती. सुवासिनी आल्या होत्या. बाळ पाळण्यात घालण्यात आला. तो गोविंदाने तयार केला होता. मुलाचे नाव आनंद ठेवण्यात आले. मायेचे सौम्य तोंड किती सुंदर दिसत होते. ती आता माता झाली होती. नव अनुभव मिळाला. एकदम पवित्र, पोक्त ती दिसू लागली.

प्रमोद व वसंतकुमार आज जाणार होते. माया वसंतकुमारांच्या पाया पडली. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. मुलाला त्यांच्या पायावर तिने घातले. बाबूनेही पाय धरले. त्या वृद्ध पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले. “भाई प्रमोद, आता कधी भेटशील? पुढील वर्षी दिपवाळीत ये. भाऊबीजेस ये. पाठवा हा, तात" माया म्हणाली. प्रमोदने आनंदला जवळ घेतले. “मामा जातो हा बाळ, म्हणावे लवकर ये" माया प्रेमाने बोलत होती.

“बाबू, मनात किंतु नको हां" प्रमोद म्हणाला.

“हे काय बरे असे ? आपण आता निराळ्या जगात आहोत. आनंदाने आनंदलोकात, निर्मत्सर जगात आपणास आणले आहे. प्रमोदभाई, पत्र पाठवीत जा." बाबूने पाठीवर भावाप्रमाणे हात ठेवला.

गेली. वंगमंडळी गेली. मायेचे जीवन सुरु झाले. आनंद वाढू लागला. एक दिवस वसंतकुमारकडून आनंदाला बोलवणे आले. मायेला गहिवरून आले. डांची जागा कसे पण भरून काढीत आहेत.

एकदिवस आनंदला जरा ताप आला होता. खोकलाही झाला होता. मायाळू माया घाबरली. डॉ. करुणाकरही गावाला मुंबईला गेले होते. सायंकाळची वेळ होत आली होती. बाबू आनंदजवळ बसला होता, माया बसली होती.

इतक्यात सोनखेडीचा एक मनुष्य घाब-या घाब-या आला होता. सोनखेडीला एक भगिनी प्रसूत होती. तिला अत्यंत वेदना होत होत्या. डॉ. करुणाकर तर नाहीत. मायेला तुम्ही चला असे तो मनुष्य विनवीत होता.

मायेचे लेकरू आजारी पडलेले. “जा तू बाळाला दूध पाजून जा. घोड्याच्या गाडीतून जा. दरिद्रनारायणाची सेवा करून ये. त्यानेच बाळाला आराम वाटेल. परमेश्वर परीक्षा पाहात आहे. जा मी येथे सारखा ज्ञानाचा पाळणा करून बसेन. जा” बाबू गंभीरपणे म्हणाला.

मायेने बाळाला घेतले, त्याला प्रेमाने हृदयाशी धरले, प्रेमपूर्ण दृष्टीने पाहिले. देवाच्या पाया पडून ती निघाली. दवाखान्यात शस्त्रे घेऊन ती गेली. घोड्यांच्या गाडीत आज किती दिवसांनी ती बसली होती. देवा, आनंदाला सांभाळ हो, माझ्या हाताला यश दे, माझ्या भगिनीलाही सांभाळ माया ईश्वरात रममाण होऊन जात होती.

सोनखेडी आली. ती भगिनी अत्यवस्थ होती. परमवेदना होत होत्या. मायाळू माया तिच्याजवळ गेली. मायेचा हात हलका व त्या हातात अपरंपार प्रेम व कर्मकुशलता होती. अर्ध्या तासात मायेने भगिनीची मुक्तता केली. बाळ जिवंत होते. मुलगी होती. घरातील म्हातरी म्हणाली. दीनबंधूचेच कुटुंब त्यांच्या हाताला यश का येणार नाही, लोक म्हणाले. आनंद झाला.

मायेने स्नान केले. पहाटेची वेळ झाली होती. गोविंदाच्या आश्रमात माया गेली. तेथे प्रार्थना झाली. माया मन:पूर्वक प्रार्थना करीत होती. तिने थोडे दूध घेतले. त्या स्त्रीच्या पतीने आणून दिले होते. कृतज्ञतापूर्वक आणून दिले होते. ते मधुरतर दूध माया प्यायली. तिच्या स्तनांना पान्हा फुटत होता. बाळाला दूध पाजण्यासाठी ते तडतडत होते. सर्वांचा निरोप घेऊन, कुंकू लावून ती गाडीत बसली व विलासपूरला येऊ लागली. सूर्यं वर येत होता. सृष्टी दिसत होती. वसंत जवळ येत होता. पालवी फुटत होती. आम्रवृक्षांना मोहर आला होता. कुऊ कुऊसुरू झाले होते. माया प्रसन्न व सौम्य मुद्रेने जात होती. आनंद बरा असेल ना? हो - हो वारा आनंदवार्ताच सांगत आहे. नाहीतर हा झोंबला असता, मला टोचता, ही सृष्टी मंगल दिसती, हा सूर्य पवित्र सतेजन दिसता, हे नवफळासाठी फुललेले तरू असे मनोरम न दिसते." माया मनात म्हणत होती.

माया गेली. मायेची सासू बाबूबरोबर बसली होती. “आई तू आता झोप मी आहे " बाबू म्हणाला. ती वृद्धा झोपली. बाबू एकटा तेथे त्या बाळराजाची सेवा करीत होता. त्याला दोन वेळा चांगले शौचास झाले. हलक्या हाताने बाबूने पुसले त्यला. दुसऱ्या कपड्यात ठेवले. शौचावाटेकफ पडला. बाळाला बरे वाटत होते. त्याला पाळण्यात पहाटे घातले. पहाटे ती शेतकऱ्याच्या झोपडीत कन्या बाहेर येत होती व पहाटे आनंदाला झोप लागत होती. ती माता मुक्त होत होती. बाळही व्याधिमुक्त होत होता. बाळाला झोप लागली, बाबू आई बनून सांभाळीत होता. दोरा धरून हालवीत होता, झोपा देत होता. पहाटेची सुंदर प्रार्थना गांत होता. “रचा प्रभू तूने यह ब्रह्मांड सारा" हे गीत तो म्हणत होता. बाबूचेही डोळे लागले. पाळण्यात बाळ स्वस्थ झोपले होते.

त्याची कोमल छाती खालीवर होत होती. मत लवकर उठून घरात कामधाम करीत होती.

टांगा भरधाव येत होता. मायेच्या खाटेवरच बाबू शांत झोपी गेला होता. सर्व रात्रीचे त्याला जागरण होते. आठ वाजायला माया परत आली. ती धावतच बाळ पाहायला गेली. घरात सामसूम दिसले. ती घाबरली. तिच्या स्तनधारा भूमीला स्नान घालू लागल्या. गायीचा पान्हा दाटला होता, ती खोलीत गेली तो रम्य सुंदर दृश्य. बाबू शांत झोपला होता. पाळण्यात बाळ झोपले होते. त्याची छाती खाली वर होत होती. उठवू का बाळाला? त्याला भूक लागली असेल? पण निजला आहे राजा. निजू दे. यांनाही झोप लागली आहे, झोप मोडेल बाळ उठवला व तोरडला तर. आपोआप त्यांना उठू दे. मायेचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. देवाच्या पाया ती पडली. बाळाची हगोली घेऊन बाहेर धुवावयासाठी मोलकरणीजवळ दिली.

पाळणा हळू लागला. माया वाटच पाहात होती. मायेने बाळाला घेतले. बाळ पिऊ लागला. “मी कोठे गेले होते बाळाला टाकून. दुसऱ्या बाळाला सोडवायला, खरे ना, रडलास नाही ना?” माया बोलत होती. बाबू निजला आहे ती विसरली. बाबू एकदम जागा झाला. त्याने डोळे उघडले. तो बाळाला माया पाजीत आहे. त्याच्या जवळ बोलत आहे असे तिने पाहिले. बाबू हळूच उठला व त्याने मायेचे डोळे धरले. “ते तुमचेचे हात सोडा." माया म्हणाली. “चांगली घेतलीत काळजी, झोपून गेले माझ्या खाटेवर, पुरुषांवर विसंबून राहण्यात अर्थ नाही. होय ना रे राजा” माया विनोदाने प्रेमाने म्हणत होती. " त्या राजाला माहीत आहे मी केव्हा निजलो तो.” बाबू म्हणाला.

“रांगावलेत वाटते. तुम्ही डोळे माझे धरलेत ना, मागे असेच त्या रात्री येऊन प्रमोदने माझे डोळे धरले होते, मला वाटले तुम्ही सुटून आलात, तर तो वेडा पागल प्रमोद तो हल्ली आश्रमात आहे.” माया बोलत होती. “परंतु गेलीस तेथील काय?” बाबूने विचारले.

“माझ्या तोंडावरून समजत नाही ना, तुम्ही वेडे आहात अगदी.” माया म्हणाली.

“ आणि मी केवळ झोपलो यावरून ती काळजी घेतली नाही असे म्हणणारी तू वेडी नाहीस वाटते? अगं मी इतका वेळ कधी झोपतो का? ज्या अर्थी इतका गाढ झोपलो, त्या अर्थी उजाडत उजाडत झोपलो, रात्रभर जागलो हे तुला समजले नाही, तू वेडी की मी वेडा ? ” बाबूने विचारले.

“बाळ म्हणतो दोघेजण वेडी” त्याला आजारी सोडून मी गेले व तुम्ही पाठवलेत, जग आपणा दोघास वेडी म्हणतील," माया म्हणाली. “अशीच आपण वेडी होऊ, पागल होऊ. तुला सोनखेडीचे लोक वेडी म्हणाले न?” बाबूने विचारले.

“ते म्हणाले दीनबंधूंच्या पत्नीच्या हातात अमृतच असावयाचे हा सारा तुमच्या पुण्याच्या प्रेमाचा, दयेचा परिणाम. देव प्रसन्न झाला. भगिनी मुक्त झाली, आनंदली, कन्या झाली, माझा बाळही बरा झाला. देवाने खरोखर सत्वपरीक्षा पाहिली. तुमच्या साहाय्याने, प्रेरणेने मी पण उत्तीर्ण झाले. मला वेडीला क्षमा करा हां." माया म्हणाली.

सेवेमध्ये दोघेजण वेडी होऊ लागली. मायाळू माया अशी ख्याती झाली. दीनबंधू बाबू व ममताळू माया अलौकिक जोडा होता तो.

कधीकधी माया व दीनबंधू सोनखेडीस जाऊन राहात. तेथे त्यांनी एक सुंदर झोपडी बांधली होती. विलासपूरचा विलासी वाडा त्यांना आवडत नसो. या झोपडीभोवती फुलझाडे होती. गायी होत्या दोन. विलासपूरला मंडळी गेली तर गायींची व्यवस्था आश्रम पाही, फुलझाडांस आश्रमवासी पाणी घालत.

बायांमध्ये माया जावयाची. सुताचे धागे तुटत असत विणकामात, त्यांना तयार करावयास तिने शिकवले. लहान मनी बॅग्जस् सुंदर रंगारंगाच्या जाळीदार गाठी दिलेल्या पिशव्या माया विणून देऊ लागली. मुली हे काम शिकल्या. या पिशव्या विलासपूरमध्ये फार खपू लागल्या. मुलेसुद्धा आपली पेन्सिल ठेवावयास, रबर ठेवावयास घेत |

माया त्यांच्या जीवनात रंगून जाई. कधी बायका रात्री जमत, चांदण्यात खेळ करीत माया गाणी गाई. कधी सारा गाव रात्री चांदण्यात जमे व बाबू सुंदर सतार वाजवी. गोविंदा गाणे गाई. "हृदय जणू तुम्हा ते नसे" हे गाणे गोविंदा म्हणे व बाबू तेच बोल सतारीतून काढी. लोक तल्लीन होत." या गाण्याने माझ्यात क्रांती केली. या गाण्याने दीनबंधू मला केले नाहीतर मी दीनसूदन होतो. " बाबू मायेला त्या गाण्याचा इतिहास सांगे.

अश्विन महिना आला होता. पिके तयार झाली होती. सृष्टीने भरभरून धनधान्य आपल्या मुलांना आणले होते. ज्वारीच्या उंच ताटावरून वारा सळसळ वाहात होता. किती सुंदर आवाज. मायेला तो आवाज फार आवडे. छोट्या आनंदला कडेवर घेऊन ती त्या ज्वारीच्या जंगलातून जावयाची. आनंदाला खेळवण्यासाठी सृष्टी जणू शत खुळखुळेच वाजवीत होती.

ते पूजा दिवस होते. मायेने प्रमोद व वसंतकुमार यांना देणग्या पाठवल्या. चंदनाची एक मुरलीधराची मूर्ती तिने वसंतकुमारास पाठवली. विलासपूरच्या स्वदेशी स्टोअरमध्ये ती मिळाली होती. वसंतकुमारास ती रम्य मूर्ती फार आवडली. त्यांनीही मायेस, बाबूस आनंदास देणग्या पाठवल्या. मायेने भाऊबीजेस भावास प्रेमाचे आमंत्रण पाठवले.

महाराष्ट्रातील दिवाळीच्या ओव्या माया शिकू लागली –

" दसऱ्यापासून | दिवाळी वीसां दिशी
मज माहेरी कधी नेशी | बंधू राया
माझ्या दारावरून | रंगीत गाड्या गेल्या 
भावानी बहिणी नेल्या | दिवाळीला. 
भाऊबीजेच्या रे दिवशी | कारे भाई रुसलासी 
तुझा शेला माझ्या पाशी | प्रेमखूण 
मायबाप गेल्यावरी | मग कोठले माहेर 
काय खरे हे होणार | शब्द दादा 
मुले मज पुसताती | केव्हा मामा गं येईल 
दिवाळीला तो नेईल | आपणाला 
कोणत्या कामामध्ये | भाईराया गुंतलासी 
तुझी बहीण कासावीसी | होत आहे. 
डोळा माझा फडफडे | घांस पडे तोंडातूनी 
 काय येतसे धावुनी | बंधूराया 
कां ग उचकी लागली | सखि सकाळपासूनी
काय येतसे धावूनी | बंधूराया
पूर ओसरले | नदीनाले शांत झाले 
अजुन कां न भाई आले कां रे सकाळीच | 
कावळ्या काका करिशी | बहिणीकडे 
काय नेण्या येतो मशी | बंधूराया 
पहा माझ्याच गावीची | चिंगी माहेरा चालली 
काय माझी भूल पडली | बंधूराया 
काय वयनीने | भूल फार रे पाडिली 
म्हणून नाही झाली | आठवण 
लागेल घालावया | फार मोठी ओवाळणी 
चिंता काय तुझ्या मनी | आली दांदा 
पान, फूल मज पुरे नको शेला जरतारी | 
 पुरे अक्षता, सुपारी | नको दादा
नको धन नको मुद्रा | नको मौक्तिकांचे हार 
देई प्रेमाश्रुंची धार | बंधूराया 
माझ्या राजस बाळाचे | घेई दोनचार मुके 
त्यांना नाचव कौतुके | इतुके देई 
दादा रे लहानपणी | तुला चावा मी घेतला 
त्याचा काय राग आला | आज तूज 
दाणे भातुकलीचे खाशी | सारे म्हणून कसले 
तेच काय मनी धरले | आज भाई 
चूकभूल जी जी होई ॥ खरे प्रेम विसरत 
 येई दादा तू धावत | मला घ्याया 
 ये रे ये रे मामा | बाळे बोलती खेळात 
 माझे प्रेमे भरे चित्त | कोणा सांगू 
मागे त्यांनी तुला | रागे कागद लिहीला 
 त्याचा काय राग आला | तुला सांग 
 आला होतास न्यावया | नाही पाठवली त्यांनी 
 नि तोचि का धरूनी | बैसलासी 
 दादा आपलेच ओठ | आणि आपलेच दात 
 थोर सारे विसरत | मागील रे 
 नको मनी काही ठेवू | भाऊ येई लगबग 
 मायबापांची ती बघ | आण तुला शेवटचे शब्द | आई तुला 
 जे बोलली काय तुला भूल पडली | त्याची दादा 
 ताईला प्रेम देई | इंदूला तूंच आता 
 मे बोले मरत मरता दादा तुला 
 नको इंदूला विसरू | बाबा बोलले आठव 
 नको विलंब लाव | धाव घेई 
आई आई आली | मामाची गाडी आली 
मुलांची हाक आली | अंगणात तुला आळवित | बैसले देख काय एकलीस हांक | सांग सारे बहिणभावंडांचे प्रेम | निर्मळ अनुपम अमृताहून उत्तम | संसारात.

मायेला या गोड मराठी ओव्या, त्यातील सहृदयपणा, त्यातील ते रम्य स्मृतिचित्र तिला अपार आनंद होई. आपले आईबाप नाही म्हणजे आपले - माहेर संपलेच असे तिच्या मनात येई. आपणाला भाऊही नाही, परंतु देवाने दिला माझ्या वडिलांच्या पुण्याईने प्रेमाने मला भाऊ दिला, येईल, प्रमोददादा येईल. माया वाट पाहात होती.

या वेळेस माया, बाबू आनंद दिपवाळीस सोनखेडीसच आली होती. सर्व गाव स्वच्छ झाला होता. मायेच्या झोपडीभोवती झेंडू फुलले होते. झेंडूची तोरणे झोपडीस लावली होती. लोकांनी आपली घरे स्वच्छ करून अलंकृत केली होती. पल्लव फुले त्यांची तोरणे लावली होती. गावातील पावसाळ्यातील घाण तो नरकासूर सर्वांनी मिळून नाहीसा केला होता. आनंद होता.

एक दिवस मंडळी अंगणात बसली होती. रात्र झाली होती. तेथे “दिनबंधू कोठे राहतात” असे विचारत एक व्यक्ती गाडीतून उतरली. “प्रमोद आला - • भाई आला. " माया एकदम आनंदाने उठून म्हणाली. बाबू समोरा गेला प्रमोदची ट्रंक त्याने उचलून आणली. प्रमोदने भाडे दिले, गाडी गेली.

“ आलास. मी म्हटले भाई विसरला. " माया म्हणाली.

“तू मला पुण्यापवित्र जीवन देणारी तुला मी कसा विसरेन ? तू कोळशाचा हिरा केलास नाही माया ?” प्रमोद म्हणाला. "जाऊ दे रे, बाबा कसे आहेत, मी कशी आहे?" मायेने विचारले.

“आनंदात आहेत. आमी सारीच आता आश्रमात राहतो. आई, बाबा आश्रमातच आली आहेत." प्रमोद म्हणाला.

“माझ्या बाबांजवळ वसंतबाबू म्हणायचे प्रमोद एकदा स्थिर झाला

म्हणजे आश्रमात येऊ." माया म्हणाली. “तू प्रमोदला स्थिर करून माझ्या आईबापास सुखी केलेस. हे सारे श्रेय तुझ्या पुण्याईने." प्रमोद बोलला. “ही देवाची कृपा, ही दीनबंधूंच्या सेवेची पुण्याई." माया म्हणाली.

आनंदाला सुंदर स्वदेशी खेळणी प्रमोद घेऊन आला होता. त्याने बंगाली

पक्कान्ने आणली होती. रसगुला घेऊन आला होता. तो सर्व आश्रमवासी व

इतर बंधू यांनी वाटून खाल्ला.

आज भाऊबीज होती. मंदिरात भाऊबीज व्हावयाची होती. आश्रमातील बंधू मायाच ओवाळणार होती. मायेने साधाच स्वयंपाक केला होता. बाबू म्हणाला, “केळ्याचे शिकरण कर झाले. सोपेसाधे पकात्र." गोवारीची व बटाट्याची भाजी केली होती. नारळाची चटणी होती. बाबूने सुंदर रांगोळी घेतली. गावातून केळीच्या आगोतल्या सुंदर आणल्या होत्या.

पहाटे मायेने प्रमोदच्या अंगाला तेल चोळले. भावाच्या अंगाला चोळीत होती. “तोंडाला लावू दे. तोंडावरून तेलाचा हात नाही फिरवला तर अशुभ इकडे मानतात हो.” असे म्हणून प्रमोदच्या मुखावरून तेलाचा स्नेहमय हात मायेने फिरवला.

प्रमोदला कढत पाणी भरपूर दिले. त्याच्या पाठीस साबण लावून चोळला. आश्रमातील स्वच्छ खादीचा रुमाल अंग पुसावयास दिला. गोविंदा व इतर बंधू यांच्याही अंगाला मायेने तेल लावले. गोविंदाची शेंडी विंचरली. गोविंदाच्या शेंडीला बाबू सदैव नावे ठेवायचा व तिला ओढावयाचा. परंतु गोविंदाचे शेंडीवर फार प्रेम. एक दिवस बाबू मायेस म्हणाला. “तुझी कातर दे - याची शेंडी कातरूं" "मी मग कधी बोलणार नाही" गोविंदा म्हणाला. “शेंडीचा कसला अभिमान" माया म्हणाली. “त्यात मराठ्यांचा इतिहास आहे. म्हणून " गोविंदा म्हणाला. असा हा गोविंदा. सर्वांची स्नाने झाली. मंगल दिवस. मंडळी चरखे चालवीत काही वेळ बसली.

दुपारी सारी मंडळी जेवावयास बसली. अपूर्व प्रेम व आनंद तेथे होता. समया दोन लावल्या होत्या. त्या पवित्र जळत होत्या, उदबत्यांचा घमघमाट सुटला होता. हातात तबक घेऊन ती पहा माया आली. तिने आधी देवांना ओवाळले. आली. प्रमोदजवळ आली. प्रमोदला कुंकू लावले, अक्षता लावल्या. एकही दाणा खाली नाही पडला. ओवाळले, बहिणीने भावास ओवाळले, एक स्वतःच्या हाताच्या सुताने कातून तयार केलेली सुंदर बारीक तलम साडी प्रमोदने ओवाळणी घातली व त्या साडीवर एक पुस्तक होते “पुनर्जन्म " म्हणून. प्रमोदने एक नवीन सुंदर नाटक लिहिले होते. ते या दिवशी बंगालमध्ये प्रसिद्ध होणार होते. मायेचे फार उदात्त व उज्वल चित्र त्यात त्याने रेखाटले होते. ते अश्रुंचे पुस्तक ते आपले हृदय त्याने मायेला दिले. कायमचा बहिणभावांचा अमर संबंध वाङ्मयाद्वारा त्याने जोडला. गोविंदा व इतर बंधू यांनी सुंदर लड्या ओवाळणी घातली व त्याबरोबर एक फूल व सुपारी व स्वच्छ अक्षता. अपूर्णाला अक्षता पूर्ण करतात, निर्मळ करतात.

मंडळी जेवायला बसली. तो पाहा आनंद खेळाशीच दंग आहे. परंतु त्याचे लक्ष त्या मंडळीकडे गेले. तो पाहा हसत खिदळत रांगत येत आहे. मध्येच थांबतो, हसतो, पुन्हा धाव घेतो, समयी धरणार का उदबत्तीचे घर पकडणार, “आला आला मायाताई” गोविंदाने हाक मारली. “लबाड, तिकडे होतास तो आलास होय." माया म्हणाली. "मी मांडीवर घेतो दे आज त्याचे उष्टावण करतो.” प्रमोद म्हणाला. “उष्टावण मग करू एक दिवस. उटावणाला खीर हवी हो. तो मांडीवर सुद्धा बसायचा नाही, आण त्याला दूर ठेवते येऊ दे पुन्हा गुलामाला" असे म्हणून आनंदला मायेने दूर ठेवले, ती खेळणी त्याच्या पुढे टाकली. गमतीने जेवणे झाली. मायेची भाऊबीज झाली.

रात्री बाबूने सतार वाजवली व प्रमोदने बंगाली गीत म्हटले.

एक दिवस आनंदाचे उष्टावण झाले. मामा आहे ती करून घ्यावे नाही तर आनंद अजून लहानच होता. खीर गवल्यांची केली होती. मामाने अंगठीने आनंदाच्या तोंडात खीर घातली. आनंद चाटू लागला, हसू लागला, एकदम खिरीच्या वाटीवर हात मारला व वाटी पानात सांडली. “सारी वाटी हवी होय तुला?" मामाने विचारले.

"त्याला खीर नको आहे. तो म्हणतो चटणी भाकर द्या" बाबू म्हणाला. असे आनंदाने दिवस गेले. एक दिवस प्रमोद निघून गेला. मायेच्या हृदयात तो कायमचा आहे. त्या पुस्तकात तिच्याजवळ तो बोलतो. त्या पुस्तकात तीसाऱ्यांना पाहाते. वसंतरावांना पाहते. आंनदमोहनांना पाहते, त्यात महाराष्ट्र पाहते, वंगभूमी पाहते, पुस्तक हाती धरून कधी अश्रूही ढाळते. आनंद पुस्तक ओढू पाहतो, “अरे फाडू नको, तुझ्या मामाचे ते हृदय आहे हो, चुंबायला का हवे, गोड लागते होय? पुस्तक वेडा” असे माया म्हणायची.

दीनबंधू बाबू ममताळू स्नेहाळु माया खेड्यापाड्यांतून प्रिय व पूज्य झाली आहेत. गोविंदासारखा सखा त्यांना मिळाला आहे. प्रमोदसारखा भाऊ मिळाला आहे. मायेने वंग "महाराष्ट्राची थोरवी” म्हणून एक पुस्तक प्रसिध्द केले आहे. त्यांत सुंदर चित्र आहेत. बाबूने मराठीत “बंगालचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास" म्हणून फार बोधप्रद, स्फूर्तिप्रद पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे व ते त्रिंबकरावांच्या पूज्य स्मृतीस अर्पण केले आहे. परस्पर प्रांतांची हृदये जवळ येऊ लागली. भारतात ऐक्य वाढू लागले, प्रेम वाढू लागले. गंगा - गोदा आनंदाने ओसंडू लागल्या. वारे आनंदाने भारतात प्रदक्षिणा घालू लागले झाडे मोडणी नटली. फळभाराने लवली, आकाश निर्मल तर झाले. तारे सतेज दिसू लागले. फुले अधिक मधुर व मोहक फुलू लागली. पाखरांना गोड कंठ फुटले. भारतात रमणीय मुले निर्माण होऊ लागली. भारत सजू लागला स्त्रियांकडे जाऊ लागला. दीनबंधू बाबू ध्येयजपूजक वाढवू लागला, सात्विकेने नटू लागला.

7
Articles
दीनबंधू
0.0
दीनबंधू हे साने गुरुजींनी लिहिलेले मराठी साहित्यिक आहे.
1

प्रकरण १

22 June 2023
3
0
0

विलासपूर शहरात रतनशेट म्हणून एक धनाढ्य व्यापारी होते. ते कपाशीचा व्यापार करीत. त्यांचे कापडाच्या मिलमध्ये अनेक भाग होते.हजारो रुपयांची उलाढाल रोज त्यांच्याकडे चालावयाची. रतनशेटना मूलबाळ नव्हते. त्यांन

2

प्रकरण २

22 June 2023
1
0
0

बाबू इंग्रजी शाळेत जात होता. त्या शाळेत एक त्रिंबकराव म्हणून शिक्षक होते. त्यांचे हृदय फार थोर होते. मुलांच्या मनावर उत्कृष्ट संस्कार घडवणे म्हणजे शिक्षण असे त्यांना वाटे. ते इतिहास व भाषाविषय शिकवीत,

3

प्रकरण ३

22 June 2023
1
0
0

वर्गात कधी स्वदेशावर बोलणे निघे. तुम्ही साधी खादी वापरत नाही - तुम्ही पुढे काय ध्वजा लावणार? देशभक्ती म्हणजे शब्द नव्हे. देशभक्ती म्हणजे देशातील दीन लोकांचे दुःख दूर करणे. ते दूर करण्यासाठी स्वतः त्या

4

प्रकरण ४

22 June 2023
2
0
0

दिवाळीची सुट्टी पडून मुले घरोघर गेली होती. त्रिंबकराव मात्र घरी गेले नाहीत. त्यांना घरच नव्हते. त्यांना कोणी नव्हते. त्यांचा एक भाऊ आफ्रिकेत होता - एक डॉक्टर होता परंतु त्यांचा स्वभाव असा विचित्र असल्

5

प्रकरण ५

22 June 2023
0
0
0

दिवाळीच्या यंदाच्या सुट्टीत त्रिंबकराव तेथेच आले होते. त्यांना विणता येत होते. मागे उन्हाळ्याच्य सुट्टीत ते शिकले होते. ते आता माग चालवीत तेही मुलांबरोबर सारखे विणीत. परंतु आश्रमात खाडी तर भरपूर साठली

6

प्रकरण ६

22 June 2023
0
0
0

“बाबा, दिवाळीला अजून चार दिवस आहेत. मी मुंबईला जाऊ? मी चांगले चांगले कपडे घेईन, दारू आणीन. जाऊ का मुंबईल ? मी लगेच परत येईन. दिवाळीला, लक्ष्मीपूजनाला मी परत येईन.” बाबू वडिलांना म्हणाला. “पण तू एकट कस

7

प्रकरण ७

22 June 2023
0
0
0

गोविंदाच्या खेड्यातील आनंदी आनंदात दिवाळी गेली. चार दिवस गोरगरिबांनी आनंदात दवडले. हिंदुस्थानातील लोक किती अल्पसंतोषी असतात. थोडक्यातही ते किती राजी असातात, मजा करतात. कोंड्याचा मांडा करावा नवा संसार

---

एक पुस्तक वाचा