shabd-logo

रात्र एकोणतिसावी

30 May 2023

6 पाहिले 6
मोठा होण्यासाठी चोरी

आपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, 'श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी?' त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे; परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे.' अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती ' असे मग ते हसून म्हणावयाचे.

मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला. परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचीत असे; परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झालेला आहे. यांतील तेजस्वी, सोज्ज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते. परंतु त्या वेळेस मला हे भाग मिळाले नाही. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातांतून तो घेतला व म्हणाले, 'तुला रे काय समजणार त्यात?' मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या-पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रध्दामय व भावमय झालेले होते. मला वाटले, 'आपण भाग विकत घ्यावे.' परंतु पैसे कोठून आणावयाचे ! वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो; परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणांस पाहिजेतच, असे मला वाटले.

आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या, त्यातील एक लांबवावी, असे मी ठरविले. दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते; परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे, असे मला वाटले! माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवीत होतो.

"आस ही तुझी फार लागली दे दयानिधे बुध्दि चांगली'

बुध्दी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवीत होतो; परंतु चोरी करून बसलो होतो! माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक पाच रूपयांची नोट कमी!

'भाऊराव! पाच रूपये कमी भरतात. एक नोट नाही.' ते पाहुणे म्हणाले.

'नीट पाहिल्यात का साया खिशांतून? कोणाला दिली तर नाहीत?"

माझे श्लोक शिकवणे सारं थांबले, चोराला कोठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो.

"आई? तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही, वाटते?' मी विचारले. 'बाळा, इच्छा कोठे आहे? दोन घास कसेतरी बळेच पोटात दवडायाचे. दोन धंदे झाले पाहिजेत ना? पाणीउदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे.' आई म्हणाली.

'आई! मी खरेच मोठा होईन. पुष्कळ शिकेन. खूप वाचीन!' मी म्हटले.

'शीक, पण चांगला. हो. शिकलेले लोक बिघडतात, म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील; परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते.' आई म्हणाली. ती प्रेमळ, थोर माता किती गोड सांगत होती! माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत, याचे मला आश्चर्य वाटे. महंमदाला लोक म्हणत, 'तू देवाचा पैगंबर असशील, तर चमत्कार करून दाखव.' तेव्हा महंमद म्हणाला, 'सान्या सृष्टीत चमत्कार आहेत. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महंमद म्हणाला, 'माझ्यासारख्या अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का?' मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्वार. आईसुध्दा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदयगाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती.

'मोठा नाही झालास, तरी गुणी हो.' थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू

डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो! इंग्लंडला ट्यूडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडेतिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की, 'त्या वेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते.' कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यातसुध्दा विंचू आहेत. ते तुम्हांस झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात, तरी ते गुप्त दूत आहेतच. सद्सद्विवेकबुध्दीची टोचणी ती सदैव आहेच आहे.

'घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावयाचा!' वडील म्हणाले.

'श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा यांशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम ! अरे श्याम!' बळवंतरावांनी हाक मारली.

मी गेलो. 'काय ? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, 'श्याम! तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोट नाहीशी झाली आहे.'

मी म्हटले, 'नाही, बोवा. मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते.'

वडील म्हणाले, 'श्याम! तू तर नाही घेतलीस? घेतली असलीस तर सांग.'

'छे, हो! तो कसा घेईल ?' बळवंतराव म्हणाले.

आई हात धुऊन आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचाराले. 'श्याम अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील ? कंपासपोटीसाठी पैसे मागत होतास.'

आई म्हणाली, 'श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रूसला, तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले, तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होतीन त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, 'मी घेतली हो, आई.' श्याम घेणार नाही व घेईल, तर कबूल करील. 'श्याम! तू नाही ना बाळ हात लावलास?'

आईचा माझ्यावर केवढा विश्वास! 'आधी घेणार नाही. घेईल, तर कबूल करील.' तिची माझ्यावर haढी श्रध्दा! आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे :

'विश्वासाची धन्य जाती'

ज्याच्यावर विश्वास टाकता येतो, त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझ्या असत्याचा

किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रध्दामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला.

माझ्या डोळयांतून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. 'श्याम, रडू नकोस.

तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीस घ्यायचास. मला माहीतच आहे. उगी!' असे आई म्हणाली.

आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाणे रडत आईला म्हटले, 'आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई!'

माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. 'माझा मुलगा घेणार नाही!" केवढा तिचा विश्वास! स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला; परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही; परंतु घेईल तर कबूल करील.' तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही; परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला.

'श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस, चांगले झाले. उगी!' आईने माझी समजूत घातली.

बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला एक रूपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला.

'श्याम! तू का रे घेतले होतेस ते पैसे?' आईने विचारले.

'आई ! मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी !' मी म्हटले.

'अरे, पण पहिलीच्या पुस्तकात 'चोरी कधी करू नये', असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस? मग आणखी दुसरी पुस्तके कशाला?' माझी आई बोलली; परंतु ते बोलणे फार खोल होते.

गड्यांनो! पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे, की 'एकः शब्दः सम्यक् ज्ञातः स्वर्गेलोके कामधुग्भवति । ' एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल, तर मनुष्याला मोक्ष मिळतो. 'सम्यक् ज्ञातः' नीट समजलेला; वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले, ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, 'लाव, लाव हात!' ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॅक्रिटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो, तेच ज्ञान.

'चोरी करू नये' हे वाक्य मी पढलो होतो; परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम अहिंसा, ब्रह्मचर्य-लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो; परंतु त्यांची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत!

इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

43
Articles
श्यामची आई
0.0
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आधारित 'श्यामची आई' नावाचा चित्रपटही पडद्यावर आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते. आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडल्या आहेत. ही कथा साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात ९ फेब्रुवारी, इ.स. 1933 ला लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी, इ.स. 1933 च्या पहाटे त्यांनी ते संपवले.
1

प्रारंभ

25 May 2023
6
0
0

श्यामची आईपुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच

2

रात्र पहिली

25 May 2023
4
1
0

सावित्री व्रतआश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवि

3

रात्र दुसरी

26 May 2023
2
0
0

अक्काचे लग्नआश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महा

4

रात्र तिसरी

26 May 2023
3
1
0

मुकी फुले"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात ?' शिवाने विचारले.'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. ' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घ

5

रात्र चवथी

26 May 2023
3
1
0

पुण्यात्मा यशवंत"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली."जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. ' शिवा म्हणाला."तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्या

6

रात्र पाचवी

26 May 2023
3
1
0

मथुरीश्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तूपडून रहा.'"अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्

7

रात्र सहावी

26 May 2023
3
1
0

थोर अश्रूलहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे ना

8

रात्र सातवी

27 May 2023
2
0
0

पत्रावळ"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी, माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासु

9

रात्र आठवी

27 May 2023
2
0
0

क्षमेविषयी प्रार्थनाबाहेर पिठुर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प

10

रात्र नववी

27 May 2023
2
0
0

मोरी गाय"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला."तो बाहेर बसला आहे ऐकत, आत

11

रात्र दहावी

27 May 2023
1
0
0

पर्णकुटी"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस आई सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.'ने रे तिलासुध्दा, ती

12

रात्र अकरावी

27 May 2023
1
0
0

भूतदया"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श

13

रात्र बारावी

27 May 2023
1
0
0

श्यामचे पोहणेकोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच

14

रात्र तेरावी

27 May 2023
1
0
0

स्वाभिमान रक्षण"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्याव

15

रात्र चौदावी

27 May 2023
1
0
0

श्रीखंडाच्या वडयाआमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आ

16

रात्र पंधरावी

27 May 2023
1
0
0

रघुपती राघव राजारामलहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधु

17

रात्र सोळावी

29 May 2023
0
0
0

तीर्थयात्रार्थ पलायनसिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला स

18

रात्र सतरावी

29 May 2023
0
0
0

स्वावलंबनाची शिकवण"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं... अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्

19

रात्र अठरावी

29 May 2023
0
0
0

अळणी भाजीराजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्

20

रात्र एकोणिसावी

29 May 2023
0
0
0

पुनर्जन्म"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी

21

रात्र विसावी

29 May 2023
0
0
0

सात्त्विक प्रेमाची भूक"काय, सुरूवात करू ना रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबाअजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला."इतक

22

रात्र एकविसावी

29 May 2023
0
0
0

दूर्वांची आजी"आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्

23

रात्र बाविसावी

29 May 2023
0
0
0

आनंदाची दिवाळी"दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्य

24

रात्र तेविसावी

29 May 2023
0
0
0

अर्धनारी नटेश्वर"मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला, की ती पुन्हा

25

रात्र चोवीसावी

29 May 2023
1
0
0

सोमवती अवसज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या

26

रात्र पंचविसावी

29 May 2023
1
0
0

देवाला सारी प्रियसंध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का

27

रात्र सव्विसावी

30 May 2023
0
0
0

बंधुप्रेमाची शिकवणमे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला

28

रात्र सत्ताविसावी

30 May 2023
0
0
0

उदार पितृहृदयआमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी ख

29

रात्र अठ्ठावीसवी

30 May 2023
0
0
0

सांब सदाशिव पाऊस देत्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू

30

रात्र एकोणतिसावी

30 May 2023
0
0
0

मोठा होण्यासाठी चोरीआपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त

31

रात्र तिसावी

30 May 2023
0
0
0

तू वयाने मोठा नाहीस.... मनाने...मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास स

32

रात्र एकतिसावी

30 May 2023
0
0
0

लाडघरचे तामस्तीर्थराजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टा

33

रात्र बत्तिसावी

30 May 2023
0
0
0

कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरकत्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक ह

34

रात्र तेहतिसावी

30 May 2023
0
0
0

गरिबांचे मनोरथश्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी वकष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस

35

रात्र चौतिसावी

30 May 2023
0
0
0

वित्तहीनाची हेटाळणीश्यामने सुरूवात केली.'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर

36

रात्र पस्तिसावी

30 May 2023
0
0
0

आईचे चिंतामय जीवन"मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात.

37

रात्र छत्तिसावी

30 May 2023
0
0
0

तेल आहे, तर मीठ नाही!"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस ?' भिकाने विचारले.'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. ' गोविंदा म्हणाला.

38

रात्र सदतिसावी

30 May 2023
1
0
0

अब्रूचे धिंडवडेश्यामने आरंभ केला.शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे

39

रात्र अडतिसावी

30 May 2023
1
0
0

आईचा शेवटचा आजारश्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता."श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या म

40

रात्र एकोणचाळीसावी

30 May 2023
1
0
0

सारी प्रेमाने नांदाश्यामच्या गोष्टीस सुरूवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. 'सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कश

41

रात्र चाळिसावी

30 May 2023
1
0
0

शेवटची निरवानिरव"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल.' आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक

42

रात्र एकेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

भस्ममय मूर्तीआईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, 'का, रे, नाही भेटायला

43

रात्र बेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

आईचे स्मृतिश्राध्द'गडयांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दा

---

एक पुस्तक वाचा