shabd-logo

रात्र विसावी

29 May 2023

6 पाहिले 6
सात्त्विक प्रेमाची भूक

"काय, सुरूवात करू ना रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा

अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला.

"इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले.' श्याम

म्हणाला.

"तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?' भिकाने विचारले.

"शिवाय लोकांची श्रध्दा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. 'गोविंदा म्हणाला.

"हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा.' राम म्हणाला. "इकडेच बरे आहे. असा येथे बसतो.' ते म्हातारबाबा म्हणाले.

"श्याम, कर सुरूवात आता.' राजा म्हणाला.

सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली.

मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे. तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. एक-दोन यत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते. 

दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठीमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती; म्हणून दापोलीस कँप दापोली असेही म्हणतात. या कंपनंतर 'काप' असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असे म्हणतात. तसे पाहिले, तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आग्रयांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्रयांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजीमहाराजांनी मोठया प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरूषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे 'केसरी' संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुध्द बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.

दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत: उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंडयाझुंबरासारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्यांची माहेरघरे आहेत..

दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.

दापोलीहून माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की, मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाला व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा.

एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते, की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात? हा विचार मनात घेऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू! कोणा झाडाचे पान! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार! असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूतीं व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनांचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास, देऊ शकत नाही.

त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत, 'मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुध्द व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!' माझीही जणू तशीच स्थिती होती. दर आठ दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की, प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, वाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.

मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळयांतून अश्रू येत होते, या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल. अशा मोठमोठया पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच ! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.

शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!

मी अंगणात दिसताच 'अण्णा आला, अण्णा आला' असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो.

आई म्हणाली, 'उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली.'

मी म्हणालो, 'माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते.'

'मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रातीस यावयाचे.' आई म्हणाली.

'आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन.' असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले.

"हे कढत पाणी घे व पाय धू, थांब, थोडे तेल लावत्ये. मग वर कढत पाणी घे.' असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्या वेळेस किती आनंद होत होता! त्या वेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती. पवित्र होती.

मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. 'अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव.' असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले. 

'का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्या वेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. 'नाही केली, करतो.' मी म्हटले.

'तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची. ते रागाने आई म्हणाली, 'आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बोलले.

बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर.'

मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळयांतील पाण्याची देवाला शतअर्थ्ये सुटत होती.

वडील पुन्हा म्हणाले, 'तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवडे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा झाला आहे! मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले, की डोके करून घे, म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लख्या न्हाव्याला, बोलावून आण व डोके तासटून घे. नाही तर येथे राहू नकोस. निघून जा.'

मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. 'झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी. वडील म्हणाले.

'पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील' आई अमृतमय वाणीने बोलते होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.

आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता; त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.

आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली; परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत

होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती.

कृष्ण यशोदेचा बाळ। सुकुमार लडिवाळ

कृष्ण यशोदेचा तान्हा । त्यास पाजी प्रेमपान्हा कृष्ण बाळ मेघश्याम। यशोदेचे प्राशी प्रेम

मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजीत होती, मला प्रेमपान्हा पाजीत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. 'आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट, राहू दे पोतेरे.' मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.

पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे

परी बाळा झोपी जावे। लहान तू || अंगाई ॥

पहाटेची वेळ वाजू लागती रहाट

बाळा तू रे पाळण्यात झोप घेई || अंगाई || पहाटेची वेळ का का करितो कावळा झोपे परि माझ्या बाळा । उठू नको || अंगाई ॥ बाळा, तू झोप घेई । आई म्हणे || अंगाई ||

पहाटेची वेळ । कामाची आहे घाई

मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, 'आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे.'

आई म्हणाली, 'असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्यात मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वतः फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात, तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का ? आईबापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून इतकेही तू करू नयेस का?' आई मला समजावीत होती.

'केसात कसला आहे, ग, धर्म?' मी म्हटले.

आई म्हणाली, 'धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे, यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहचतो. मोह सोडणे म्हणजे धर्म.'

मित्रांनो! माझ्या आईला त्या वेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल; परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, ही गोष्ट आपणां आश्रमवासीयांस सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे लेणे, सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जिवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो, ते मी सुंदर दिसावे, म्हणून ! खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे..

त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो; परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम दई. परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते.

आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळी दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पध्दत आता खेडयातूनही नाहीशी होत चालली आहे.

गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. 'काय, श्याम ! लईशी डोई वाडविलीस?' असे त्याने विचारले.

मी त्याला म्हटले, 'गोविंदा! तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात.' माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंबसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने

टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती

टिकणार नाहीत, अशी समजूत असते.

वडील आईला म्हणाले, 'हे तंबसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुध्दा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोडया घाल. मी पण अंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो.'

वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो! मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो, असे आल्यावर त्यांनी पाहिले असते, तर त्यांची केवढी निराशा झाली असती! त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते! हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत! दोन शब्दांनीच ती मरून जावीत, असे त्यांना वाटले असते.

मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे, म्हणून वाळलेला पातेरा वगैरे. घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती, त्यांतील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दूर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेविली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली.

वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीची पाने पुसले. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदुळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.

वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाडया वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा ? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुध्दि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खाववयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता.

'श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ.' वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत वेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.

आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला 'आई जाऊ?'

'कुठे रे बाबुल्या?' मी म्हटले.

'आईला आहे माहीत. जाऊ का?' त्याने विचारले.

आई म्हणाली, 'जा. पण तेथे लोकबीक म्हणत नको बसू.' हसत सदानंद निघून गेला. धाकटया भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू.

मी विचारले, 'आई ! करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला?'

आई म्हणाली, 'नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे टाकुलीवर बसून मोठयाने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!' मला हसू आले.

बोलता बोलता आई म्हणाली, 'श्याम ! तू आज गेला असतास, तर त्यांना किती वाईट वाटले असते! त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, 'कोणी आठवण काढली? गजूने की श्यामने ? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे- तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख!' असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, 'श्याम ! ते नेहमी म्हणतात, की 'असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ.' तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या.'

आईचे जेवण झाले. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते, म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली, आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. तीत त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुऊन तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाणाखाली विस्तव हवा का, तिने पाहिले. याप्रमाणे आईची निरवानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फन्यमऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला.

आईने माझे धोतर फाटले होते. ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यालो.

पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात, म्हणून शेजारच्या जानकीवयनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. 'आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो.' असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. 'श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर.' ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकट्या भावांस कुरवाळून निघालो. महारवाडयापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळयापर्यंत आले. आमची गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.

आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू ! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, 'का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?

मी त्याला म्हटले, 'माझे आईबाप आहेत.'

"ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?'

'नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे!' विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलदीने चालू लागलो.



इतर चरित्रात्मक आठवणी पुस्तके

43
Articles
श्यामची आई
0.0
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले मराठी आत्मचरित्र आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाच्या 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. 1953 मध्ये या पुस्तकावर आधारित 'श्यामची आई' नावाचा चित्रपटही पडद्यावर आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे यांनी केले होते. आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता या अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात मांडल्या आहेत. ही कथा साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात ९ फेब्रुवारी, इ.स. 1933 ला लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी, इ.स. 1933 च्या पहाटे त्यांनी ते संपवले.
1

प्रारंभ

25 May 2023
6
0
0

श्यामची आईपुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच

2

रात्र पहिली

25 May 2023
4
1
0

सावित्री व्रतआश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवि

3

रात्र दुसरी

26 May 2023
2
0
0

अक्काचे लग्नआश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महा

4

रात्र तिसरी

26 May 2023
3
1
0

मुकी फुले"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात ?' शिवाने विचारले.'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट. ' बारकू आपल्या आईला घाई करू लागला.'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घ

5

रात्र चवथी

26 May 2023
3
1
0

पुण्यात्मा यशवंत"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली."जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. ' शिवा म्हणाला."तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्या

6

रात्र पाचवी

26 May 2023
3
1
0

मथुरीश्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तूपडून रहा.'"अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्

7

रात्र सहावी

26 May 2023
3
1
0

थोर अश्रूलहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे ना

8

रात्र सातवी

27 May 2023
2
0
0

पत्रावळ"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी, माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासु

9

रात्र आठवी

27 May 2023
2
0
0

क्षमेविषयी प्रार्थनाबाहेर पिठुर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प

10

रात्र नववी

27 May 2023
2
0
0

मोरी गाय"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला."तो बाहेर बसला आहे ऐकत, आत

11

रात्र दहावी

27 May 2023
1
0
0

पर्णकुटी"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस आई सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.'ने रे तिलासुध्दा, ती

12

रात्र अकरावी

27 May 2023
1
0
0

भूतदया"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला.आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श

13

रात्र बारावी

27 May 2023
1
0
0

श्यामचे पोहणेकोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच

14

रात्र तेरावी

27 May 2023
1
0
0

स्वाभिमान रक्षण"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्याव

15

रात्र चौदावी

27 May 2023
1
0
0

श्रीखंडाच्या वडयाआमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वडया खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आ

16

रात्र पंधरावी

27 May 2023
1
0
0

रघुपती राघव राजारामलहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधु

17

रात्र सोळावी

29 May 2023
0
0
0

तीर्थयात्रार्थ पलायनसिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला स

18

रात्र सतरावी

29 May 2023
0
0
0

स्वावलंबनाची शिकवण"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं... अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार लहान लहान स्

19

रात्र अठरावी

29 May 2023
0
0
0

अळणी भाजीराजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, 'राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्

20

रात्र एकोणिसावी

29 May 2023
0
0
0

पुनर्जन्म"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी

21

रात्र विसावी

29 May 2023
0
0
0

सात्त्विक प्रेमाची भूक"काय, सुरूवात करू ना रे, गोविंदा?' श्यामने विचारले. 'थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबाअजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते.' गोविंदा म्हणाला."इतक

22

रात्र एकविसावी

29 May 2023
0
0
0

दूर्वांची आजी"आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्

23

रात्र बाविसावी

29 May 2023
0
0
0

आनंदाची दिवाळी"दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्य

24

रात्र तेविसावी

29 May 2023
0
0
0

अर्धनारी नटेश्वर"मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला, की ती पुन्हा

25

रात्र चोवीसावी

29 May 2023
1
0
0

सोमवती अवसज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या

26

रात्र पंचविसावी

29 May 2023
1
0
0

देवाला सारी प्रियसंध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का

27

रात्र सव्विसावी

30 May 2023
0
0
0

बंधुप्रेमाची शिकवणमे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला

28

रात्र सत्ताविसावी

30 May 2023
0
0
0

उदार पितृहृदयआमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईचे दुधाच्या खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी ख

29

रात्र अठ्ठावीसवी

30 May 2023
0
0
0

सांब सदाशिव पाऊस देत्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू

30

रात्र एकोणतिसावी

30 May 2023
0
0
0

मोठा होण्यासाठी चोरीआपल्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिध्द सरदार त्यांच्यांतील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त

31

रात्र तिसावी

30 May 2023
0
0
0

तू वयाने मोठा नाहीस.... मनाने...मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास स

32

रात्र एकतिसावी

30 May 2023
0
0
0

लाडघरचे तामस्तीर्थराजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टा

33

रात्र बत्तिसावी

30 May 2023
0
0
0

कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरकत्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक ह

34

रात्र तेहतिसावी

30 May 2023
0
0
0

गरिबांचे मनोरथश्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी वकष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला!"श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस

35

रात्र चौतिसावी

30 May 2023
0
0
0

वित्तहीनाची हेटाळणीश्यामने सुरूवात केली.'आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एक दोन मोठी शेते विकली असती, तर

36

रात्र पस्तिसावी

30 May 2023
0
0
0

आईचे चिंतामय जीवन"मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात.

37

रात्र छत्तिसावी

30 May 2023
0
0
0

तेल आहे, तर मीठ नाही!"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस ?' भिकाने विचारले.'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले. ' गोविंदा म्हणाला.

38

रात्र सदतिसावी

30 May 2023
1
0
0

अब्रूचे धिंडवडेश्यामने आरंभ केला.शेवटी आमच्यावर मारवाडयाने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे

39

रात्र अडतिसावी

30 May 2023
1
0
0

आईचा शेवटचा आजारश्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता."श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या म

40

रात्र एकोणचाळीसावी

30 May 2023
1
0
0

सारी प्रेमाने नांदाश्यामच्या गोष्टीस सुरूवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. 'सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कश

41

रात्र चाळिसावी

30 May 2023
1
0
0

शेवटची निरवानिरव"त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल.' आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक

42

रात्र एकेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

भस्ममय मूर्तीआईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, 'का, रे, नाही भेटायला

43

रात्र बेचाळिसावी

30 May 2023
1
0
0

आईचे स्मृतिश्राध्द'गडयांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राध्द आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दा

---

एक पुस्तक वाचा