shabd-logo

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023

18 पाहिले 18
 चिमुकली इसापनीती

प्रस्तावना

मुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात येऊन मूळच्या विचाराला प्रस्तुत पुस्तकात दिसणारे स्वरूप आले. बाराखड्या येऊ लागल्यापासून जोडाक्षरे येऊ लागेपर्यंत मुलांचा बराच काळ जातो व साध्या अक्षरांची ओळख चांगली घटविण्यासाठी असा काळ जावा है इष्टही आहे. पण ही साधी अक्षर ओळख घटविण्यासाठी मुलाला काही काळ तरी कुशा, काशी, गाय, पाटी यांसारख्या चार खंडातल्या चार असंबध्द सवंगडयांशी बागडावे लागते किंवा वारा आला पाऊस गेला यासारख्या सृष्टचमत्कारातल्या नीरस कार्यकारण संबंधावर करमणूक करून घ्यावी लागते. एकंदरीनेच आमच्या हल्लीच्या शिक्षणक्रमात चटकदारपणा कमी पण ही अडचण सर्वांशी दूर करणे हे जितके इष्ट आहे तितकेच किंबहुना अधिक- दुष्कर आहे. त्यातल्या त्यात विद्यामृताच्या अगदी पहिल्याच घुटक्यास हा नीरसतेचा मक्षिकापात चुकविता आल्यास पाहावा म्हणून सदर प्रयत्न केला आहे. साधी अक्षर ओळख घटविण्यासाठी वर सांगितलेल्या असबध्द शब्दसंघापेक्षा व बोजड सिध्दांतापेक्षा या पुस्तकाच्या वाचनाचा जास्त उपयोग होईल असे वाटते. मुलांना मनोरंजन पाहिजे. सुरुवातीलाच विद्यावनातले अवघडपणाचे कंटक रूप लागले तर ती अगतिक होतील- निदान त्यांना विद्याप्राप्ती त्रासदायक तरी वाटेल हे लक्षात घेऊन सदर पुस्तकात लहान लहान पण चटकदार गोष्टी अगदी साध्या भाषेत, सोप्या शब्दांनी व एकही जोडाक्षर न येऊ देता सांगितल्या आहेत. कोणाच्याही मदतीवाचून मुलास हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठ्या टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल. बालशिक्षणात मनोरंजनाची भर टाकण्याची जंगी कामगिरी या चिमुकल्या व एकाकी पुस्तकाने पार पडेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे पण त्याचा उद्देश मात्र तसा आहे. खास जोडाक्षरे मुळीच येऊ द्यावयाची नाहीत असा त्रिविध संकल्प असल्यामुळे भाषा क्वचित वडील झाली आहे हे माझे मलाच दिसते आहे. पण त्याला उपाय नाही. केवळ दोषैकदृष्ट्या या भाषादूषणाबद्दल मजवर आक्षेप घेणारांना आधीच उत्तर देऊन ठेवितो की स्वतः लिहून पाहा.



✳️कथा पहिली उदीर व बेडूक

एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. है वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. 
यासाठी संगत फार विचाराने करावी


✳️ कथा दुसरी दोघे सोबती

रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, "रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन" असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारे हर्शावारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, "काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?" रामा बोलला, "हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे." हे ऐकून हरी फारच खजील झाला.


✳️ कथा तिसरी लबाड गाढव

एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले.
 मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते


✳️ कथा चौथी देव आणि उंट

एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, "देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस, मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे "देवाने सांगितले की, "बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?" देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना.. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बारीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.


✳️ कथा पाचवी कासव आणि ससा

एक कासव हळू हळू घरी चालले होते कासवाला लौकर चालता येत नाही; यामुळे थोडेसे चालावयासही फार वेळ लागे. हे एका सशाने पाहिले. ससा फारच जलद धावतो. तो हसून कासवाला बोलला, "काय रे, तू किती सावकाश चालतोस? अशा रीतीने तू घरी कधी पोहोचणार?" कासव शहाणे होते. ते बोलले, "बाबा रे, तू एवढी ऐट मारू नकोस! मी सावकाश चालतो आणि तू जलद पळणारा आहेस. बरे. तर आपण एक पैज मारुती समोर टेकडी दिसते ना? तेथे आधी कोण पोहोचते ते पाहू बरे" हे ऐकून सशाने हसत हसत कासवाला सागितले, "चल, मला ही पैज कबूल आहे." नंतर दोघेही वाट चालू लागले. सशाने एक धाव मारून कासवाला मागे टाकले. कासव सावकाश चाललेच होते. सशाने मागे वळून पाहिले तो कासव फारच दूरा हे पाहून सशाने विचार केला की, "हे कासव तर फारच मागे आहे; मग इतकी घाई कशाला हवी? आता या गार झुडपात थोडीशी झोप काढावी. कासव जरा जवळ आले की, एक उडी मारुन टेकडी गाठावी." असा विचार करून ससा एका झुडपाखाली पडला व लौकरच गाढ झोपी गेला. इकडे बिचारे कासव हळू हळू चालत होते, पण ते वाटेत कोठेही थांबले नाही; सारखे चालतच होते. अशा रीतीने लौकरच ते टेकडीवर जाऊन पोहोचले. काही वेळाने ससा जागा झाला आणि पाहतो तो कासव टेकडीवर बसलेले! बिचारा ससा हे पाहून फारच वरमला. नंतर कासव बोलले, "बाबा रे, कधीही ऐट मारू नये आणि आपले काम नेहमी वेळेवर करावे. तू जलद चालणारा ससा, पण आळसाने फसलास!"


✳️ कथा सहावी मुलगा आणि वाघ

एक मुलगा एका कुरणात मेढरे चारीत असे. जवळ शेतात शेतकरी आपले काम करीत असत. या कामकरी लोकांना फसवावयासाठी तो लबाड मुलगा दररोज उगीच ओरडत असे की, "वाघ आला रे वाघ!" मुलाची अशी आरोळी ऐकून बिचारे शेतकरी धावून येत व वाघबीच काही नाही, असे पाहून परत जात शेतकरी असे फसले की, तो मुलगा हसत सुटे दोन चार वेळा शेतकरी असे फसले; पण पुढे मुलाची आरोळी ऐकून ते येईनातसे झाले. अखेर एकदा खरोखरीच वाघ आला. वाघाला पाहून तो मुलगा फारच घाबरला व ओरडू लागला की, "वाघ आला रे वाघ!" पण लोकाना वाटले की, तो लबाड मुलगा नेहमीसारखाच फसवीत असेल. अशा समजुतीने कोणीही मदतीसाठी धावून आले नाही व इकडे वाघाने मुलाची सारी मेंढरे मारून टाकली. पहा, एक वेळ खोटे बोलले की, पुढे लोक आपणावर भरवसा ठेवीत नाहीत.


✳️ कथा सातवी सिंह आणि उंदीर

एक सिंह दररोज एका झाडाखाली निजत असे जवळच एक उंदीर राहात होता. सिहाला झोप लागली की, उदीर बिळातून बाहेर येई व सिंहाची आयाळ कुरतडीत असे. तो जागा झाला की उदीर पळून जाई. एकदा सिंह जागा होता तोच उंदीर बाहेर आला. सिंहाला झोप लागली आहे असे उदराला वाटले आणि तो जरासा जवळ आला पण सिंहाने लागलीच उंदराची शेपटी घरली. उदराने पाहिले की, आता सिंह आपणाला मारणार. मग तो रडू लागला व हात जोडून सिंहाची विनवणी करू लागला की, "महाराज, मला क्षमा करा. माझा जीव घेऊ नका. आपण मला मारले नाही तर मी कधी तरी आपले उपयोगी पडेन" हे ऐकून सिंहाला हसू आले व तो बोलला की, "जा, वेडा कुठला मी सिंह जनावरांचा राजा आहे आणि तू एवढासा उदीर तू माझे काय काम करणार? पण मला तुझी दया येते. तू आता जा; फिरून असे करू नकोस." सिहाने सोडून देताच उदीर घरात पळून गेला. पुढे काही दिवसांनी एक पारधी तेथे आला व झाडाखाली आपले जाळे पसरून निघून गेला.. काही वेळाने सिंह निजावयाला आला सिंहाने जाळे पाहिले नाही आणि तसाच निजू लागला, तोच जाळे अंगावर पडून सिंह खाली सापडला. हे पाहून बिचारा सिंह ओरडू लागला. ओरडणे ऐकून उंदीर बाहेर धावून आला व सिंहाला बोलला, "महाराज, घाबरू नका मी आपला चाकर हजर आहे. आता जाळे तोडून टाकतो." असे बोलून तो दातांनी ते जाळे कुरतडू लागला. नंतर एका घटकेत उंदराने सारे जाळे तोडले आणि सिंहाला मोकळे केले. 
पाहा, उंदीर एवढासा जीव! पण सिंहाला कसा उपयोगी पडला कोण कधी उपयोगी पडेल याचा नेम नाही.


✳️ कथा आठवी वेडे सांबर

एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, "अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बरीक फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!" साबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताने ते बोलले, "अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बरीक माझा जीव घेतला!
" मुलांनो, जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!


✳️ कथा नववी मांजर व बगळी


एका मांजरीची एका बगळीशी फार ओळख होती बगळी फार चांगली होती; पण मांजर मोठी लबाड होती. तिने एकदा बगळीला आपल्या घरी जेवावयास बोलावले बिचारी बगळी भोळी होती! तिला मांजरीची लबाडी काय ठाऊक? ती तशीच आनंदात माजरीकडे गेली माजरीने एका ताटात खीर आणली आणि बगळीला बोलली, "ताई, आपण दोघी बहिणी बहिणी आहो, यासाठी आज एका ताटातच जेवू" असे बोलून, मांजरी जिभेने चटचट खीर चाटू लागली पण बगळीची चोच लांब होती! तिला ताटातून खीर मुळीच खाता येईना! लबाड मांजर खीर खातच होती. आणि मधून मधून बगळीला विचारत होती की, "ताई, सावकाश होऊ दे खीर बरी झाली आहे ना?" बगळीला राग आला पण ती मुळीच बोलली नाही. उलट काही झाले नाही असे तिने दाखविले आणि हसत हसत घरी निघून गेली. पुढे मांजरीची एकदा खोड मोडावी असा बगळीने विचार केला. काही दिवसांनी तिने मांजरीला आपले घरी जेवावयास बोलावले! मांजरी आशेने बगळीकडे गेली. पण बगळीकडे बारीक तोंडाची एक बरणी होती आणि त्यात आंबरस घातला नंतर तिने मांजरीला खावयास सांगितले व आपणही रस खाऊ लागली. बगळीची मान लाव आणि बारीक होती; यामुळे तिला सहज रस खाता येत होता. पण मांजरीचे डोके पडले मोठे! ते काही बरणीत शिरेना! माजरीने बरीच धडपड केली पण तिचे मुळीच फावले नाही. अखेर बगळीने विचारले, "बाई, आजचा बेत बरा आहे ना? तू रस का खात नाहीस? खिरीसारखा चांगला रस आहे" हे ऐकून मांजरी ओशाळून घरी निघून गेली. 
याचे नाव जशास तसे.


✳️ कथा दहावी चिमणी आणि मुंगी

एक लहानशी मुंगी नदीवर पाणी पीत होती. पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. जवळच एका झाडावर एक चिमणी बसली होती. ती फार दयाळू होती. मुंगी सारखी वाहून चालली होती. हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत टाकले. पानावर बसून तरंगत मुगी जमिनीवर आली. नंतर काही वेळाने एक मुलगा तेथे आला, तो हातातील गोफणीने पाखरे मारीत असे. चिमणीला पाहताच मुलाने एक दगड उचलला आणि गोफणीचा नेम धरला. हे पाहून मुंगीने विचार केला की, चिमणीने मला मघाशी मदत केली आणि मला वाचवले आता ती मरत आहे, तर मी तिला मदत केली पाहिजे. मग मुंगी हळूच जाऊन मुलाला कडकडून चावली मुंगी चावताच मुलाचा नेम चुकला आणि गोफणीतून दगड खाली पडला. दगडाचा आवाज ऐकून चिमणी भूर्रकन उडून गेली
 पहा मुलांनो, आपण लोकाना उपयोगी पडलो तर लोक आपणाला उपयोगी पडतात.

     

            समाप्त

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
3
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा