shabd-logo

गुणांचा गौरव

8 June 2023

31 पाहिले 31
ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच निर्माण केले म्हणून ते तसेच गुलाम राहणे युक्त असे समजण्यात येई. इतिहासात त्याच त्याच गोष्टी आपणांस सर्वत्र दिसून येतात.

या गुलाम समजले जाणाऱ्या ग्रीक लोकांस काही काही बाबतींत मुळीच अधिकार नसत. आपल्याकडे शूद्रांस वेदाध्ययन किंवा दुसरे चांगले धंदे करण्याची परवानगी नसे. तसेच ग्रीस देशात होते. एकदा तर एक असा कायदा करण्यात आला की, शिल्पशास्त्राचा अभ्यास फक्त स्वतंत्र लोकांनीच करावा. निरनिराळ्या मूर्ती, पुतळे वगैरे गुलामांनी करता कामा नये. जर त्यांनी शिल्पकलेचे नमुने केले तर त्यास भयंकर शिक्षा कायद्याने ठरविण्यात आली होती.

या ग्रीक लोकांत क्रेऑन म्हणून एक गुलाम होता. तो स्वतंत्र ग्रीक लोकांचा जसा गुलाम व एकनिष्ठ सेवक होता, त्याप्रमाणेच सौंर्दयदेवतेचा कलादेवतेचापण एकनिष्ट भक्त होता. सौंदर्य ही त्याची देवता होती. ज्याची त्याची देवता त्याच्या वृत्तीप्रमाणे असते. हे दास म्हणत, 'स्वदेश हा माझा देव आहे व स्वजनसेवा ही माझी देवपूजा आहे.' प्रत्येकाचे विशिष्ट ध्येय म्हणजे त्याचा देव असतो.

या क्रेऑनची देवता शिल्पकला होती. तो स्वतः उत्कृष्ट शिल्पकार होता व एक उत्कृष्ट मूर्तिसंघ तो तयार करीत होता. तत्कालीन दुसरा प्रसिद्ध शिल्पी फिडियस याची त्याला वाहवा मिळवावयाची होती. त्याप्रमाणे अथेन्सचा त्या वेळचा सूत्रधार व महान् मुत्सद्दी पेरिक्लीस हाही आपण केलेल्या मूर्ती पाहून प्रसन्न होईल असे त्याला वाटत होते.

त्या मूर्ती तयार करण्यात त्याने सर्व कौशल्य ओतले होते. स्वतःचे हृदय, मेंदू-सर्व जीवनच त्यासाठी त्याने अर्पण केले होते. आपण करतो हा पुतळा अपूर्व होईल असे त्याला वाटत होते. आपणास सर्वजण धन्यवाद देत आहेत हेच त्यास स्वप्नातही दिसे. ग्रीक लोकांची सर्वश्रेष्ठ देवता जी अपोलो, तिची, क्रेऑन रोज नवीन नवीन स्फूर्ती देण्यास मनापासून प्रार्थना करी. आपल्या हातन ज्या मूर्ती घडत आहेत त्या अपोलोच्या स्फूर्तीमुळेच घडत आहेत आणि म्हणूनच त्या उत्कृष्ट होणारच असे क्रेऑनला खरोखर वाटे. 'श्रद्धाबलं बहुबल' - श्रद्वेसारखे बल नाही. आपल्या समोरचा मूर्तिसंघ जणू हाडामासाचा आहे, जिवंत आहे, असे क्रेऑन यास वाटे.

पुतळा, तो मूर्तिसंघ, अद्याप पुरा झाला नव्हता; तोच वर सांगितलेला कायदा जाहीर करण्यात आला. क्रेऑन-गुणी व कलाभक्त क्रेऑन-गुलाम होता. पुतळ्याचे काम तसेच अपूर्ण सोडण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हते. ज्या देवतेची तो पूजा करीत होता, त्या देवतेस त्याला सोडून जाणे प्राप्त झाले. फिडियस, पेरिक्लीस वगैरेकडून शाबास म्हणवून घेऊ वगैरे ती सुखस्वप्ने संपली, मावळली. 'उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः' हेच एकंदरीत कटू सत्य त्याच्या अनुभवास आले.

परंतु भगवंत खऱ्या भावनेला, उत्कृष्ट निश्रव्याला साहाय्य करतोच करतो. क्रेऑन याची एक बहीण होती. तिचे नाव,क्लिऑन. भावाच्या मनास वसलेल्या जबर धक्क्यामुळे क्लिऑन खचली. खिन्न झाली. ती परमेश्वरास म्हणाली, 'देवा, तू अमर, अनंत आहेसं; तू सर्व सत्ताधीश आहेस; तू माझा आधार आहेस; तू माझी आशा आहेस. रोज तुझ्या चरणकमलांवर मी भक्तिभावाने फुले वाहिली आहेत. तू आमचा साहाय्यकर्ता हो. माझ्या भावाचा संकटकाळचा सखा हो. "

परमेश्वराची करुणा भाकून क्लिऑन क्रेऑनला म्हणाली, “भाऊ, कष्टी होऊ नकोस, चिंता करू नकोस; आपल्या घराला तळघर आहे ना ? गुप्तपणे आपले काम कर. तेथे काळोख आहे, पण मी दिवाबत्तीची व्यवस्था करते. तुला तेथे अन्नपाणी मी आणून देत जाईन. तुझे काम सुरू ठेव; परमेश्वर तुझा सहाय्यकारी झाल्याशिवाय राहणार नाही. "

बहिणीच्या त्या उत्साहप्रद व प्रेमळ सांगण्यावरून क्रेऑन तळघरात जाऊन काम करू लागला; त्याची वहीण त्याचे सर्वदा संरक्षण करीत होती. रात्रंदिवस पहारा करून त्या गोष्टीची तिने कोणास दाद लागू दिली नाही. धोक्याचे काम होते; उघडकीस येते तर उभयतांचे मरण होते. क्रेऑन आपल्या मूर्ती घडविण्यात पुन्हा सर्व संकटे विसरून तल्लीन होऊन गेला.

थोड्याच दिवसांनी अथेन्स येथे कलाविषयक वस्तूंचे जंगी प्रदर्शन भरावयाचे होते. पेरिक्लीस हा चतुराग्रणी या समारंभाचा अध्यक्ष व्हावयाचा होता. तो ठरलेला दिवस उजाडला. पेरिक्लीस मुख्य स्थानावर अविष्ठित झाला. त्याच्या शेजारी त्याची गुणी पत्नी ॲस्पेशिया ही बसली होती. सर्वांत नामांकित कुशल शिल्पी फिडियस तोही तेथे बसला होता. मोठा तत्वज्ञ सॉक्रेटिस तो पेरिक्लीसजवळ शोभत होता. प्रसिद्ध नाटककार सफोक्लीस हाही हजर होता. अशा प्रकारे मोठमोठे गुणी व विद्वान लोक, कवी, चित्रकार, शिल्पज्ञ व मुत्सद्दी तेथे हजर होते. ग्रीस देशातील हजारो लोक तो समारंभ पाहण्यास आले होते.

प्रदर्शन उघडण्यात आले. तेथे नाना प्रकारची सुंदर कामे होती. तेथे मनोहर पुतळे होते; नक्षीकामे होती. मोठमोठ्या कलाविदांनी तयार केलेले उत्कृष्ट नमुने तेथे हारीने मांडलेले होते. परंतु त्या सर्व वस्तूंत एक मूर्तिसंघ अलौकिक ठरला; सर्वोत्कृष्ट ठरला. प्रत्यक्ष अपोलो देवतेनेच तो घडवला असे सर्वांस वाटू लागले. त्या मूर्ती जिवंत होत्या; त्यांचे ओठ बोलत आहेत, मानेच्या शिरा उडत आहेत असे वाटत होते. त्या मूर्तिसंघाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिल्पज्ञांचा राजा जो फिडियस याने मोकळ्या व असूयारहित वृत्तीने सांगितले, “हे काम दैवी आहे, मनुष्याच्या हातून काम होणे कठीण."

त्या पुतळ्यास, त्या मूर्तिसंघास बक्षीस देण्याचे ठरले. परंतु कोणा अभिनव शिल्पकाराची ही उत्कृष्ट कृती ? कोणाच्या हातांनी ही दैवी स्वर्गीय सौंदर्याची कृती घडली गेली? भालदार चोपदारांनी पुन्हा पुन्हा पुकारा केला, परंतु शिल्पकार पुढे येईना व कोणास माहिती दिसेना, सर्व लोक अधीर झाले. " हे काम एखाद्या गुलामाचे तर नसेल ?” असा पेरिक्लीसने प्रश्न केला.

इतक्यात एका सुंदर मुलीला लोक ओढीत आणीत होते. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तिचे केस विस्कळीत झाले होते; परंतु लोकांचे लक्ष तिच्या करुण स्थितीकडे नव्हते. त्या मुलीस अध्यक्षांसमोरं आणून उभे करण्यात आले. सर्वांचे डोळे तिच्याकडे लागले. ती काय बोलते, काय प्रकरण आहे याबद्दल उत्कंठा वाढत होती. सर्व प्रेक्षकसागर हेलावत होता, गर्दीमुळे पुढेमागे होत होता. सरकारी अधिकारी ओरडून म्हणाला, "या मुलीस त्या शिल्पकाराचे नाव माहीत आहे; परंतु ही हट्टी, उर्मट पोर ते सांगत नाही. "

पेरिक्लीसने परोपरीने त्या मुलीस प्रेमळपणाने, धमकीने विचारले. परंतु ती मुलगी स्तब्ध राहिली. ती शिल्पकाराचे नाव सांगेना. तिच्या डोळयांत अढळ व अभंग निश्चय होता. मरणाची बेपर्वाई तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती पण एका पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभी आहे हे पाहून पेरिक्लीस संतापला व म्हणाला. “कायदा कठोर आहे. कायद्याप्रमाणे मला वागले पाहिजे. या मुलीला कारागृहात घेऊन जा. तिला हातकड्या अडकवा.”

पेरिक्लीसचा हुकूम. अधिकारी क्लिऑनला तुरुंगात घालण्यासाठी ओढीत नेणारा तोच, तो पाहा एक तरुण गर्दीतुन पुढे आला. त्याचा देह कृश झाला होता; परंतु त्याचे ते डोळे पाहा -त्या डोळ्यांत सर्व सौंदर्यदेवताच अवतरल्या आहेत असे वाटत होते ! किती तेजस्वी, सुंदर ते दोन डोळे ! तो तरुण पुढे आला व म्हणाला, “महाराज, या निरपराधी मुलीस क्षमा करा; तिचा अपराध नाही, ती माझी प्रेमळ बहीण आहे; खरा अपराधी मी आहे; या मूर्ती ज्या हातांनी घडविल्या, ते हे माझे हात - हे गुलामाचे हात आहेत!”

क्षुब्ध झालेला, अविचारी, भावनावश जनसमाज ओरडला, "दोघांना खेचा, दोघांस तुरुंगात टाका. फाशी द्या गुलामांना !” जनसमाजाने अशा प्रकारचा निकाल दिला व एकच कोल्हेकुई, हुल्लड सुरू केली. अध्यक्ष पेरिक्लीस उभा राहिला. पेरिक्लीसची चर्या पाहुन पुन्हा सर्वत्र शांत झाले. एवढा जनसमाज होता, पण एक सुई पडली असती तर ऐकू आली असती, अशी शांतता उत्पन्न झाली. पेरिक्लीसच्या डोळ्यांत अश्रुबिंदू आले होते. परंतु ते दाबून तो गद्गद वाणीने म्हणाला, “नाही, जोपर्यंत पेरिक्लीस जिवंत आहे, तोपर्यंत मी यांना मरू देणार नाही. तो पुतळा पाहा; पाहा तरी त्या सुंदर मूर्ती – प्रत्यक्ष देवाच्या हातच्या त्या मूर्ती वाटत आहेत. मला माझ्या हृदयातून परमेश्वर सांगत आहे, अन्यायी कायद्यापेक्षा या जगात काहीतरी श्रेष्ठ आहे हे जगास कळू दे. कायद्याचे ध्येय काय ? जे जे सत् आहे, शिव आहे, संदर आहे, सत्य आहे त्या सर्वांचे संरक्षण करावयाचे. 'The highest purpose of law should be the development of the beautiful.' अथेन्स जर जगाला ललामभूत व्हायचे असेल, अथेन्सची कीर्ती यावच्चंद्रदिवाकरौ राहो असे जर कोणास वाटत असेल, तर त्याने 'सत्यं शिवं सुंदरं' यांची सतत पूजा केली पाहिजे. कलांची किती भक्तिभावाने अथेन्स पूजा करते हे जगाला कळू दे. कलांची अधिष्ठात्री, कलांची पूजा करणारी अशी ही अथेन्स नगरी विश्वात शोभत राहो. आणा, त्या कृश तरुणास - त्या दैवी देण्याच्या तरुणास - माझ्याजवळ आणा. तुरुंग त्याच्यासाठी नाही.”

सर्व समाज चित्राप्रमाणे तटस्थ राहिला. पेरिक्कीसने मोठया प्रेमाने क्रेऑनला स्वतःजवळ बसविले. पेरिक्लीसच्या पत्नीने विजयचिन्हदर्शक माला क्रेऑनच्या गळ्यात घातली; तिने क्रेऑनच्या बहिणीस आलिंगन देऊन पोटाशी धरले.

पेरिक्लीस, फिडियम, सॉक्रेटिस - सर्वांच्या तोंडचे धन्यवाद ऐकून क्रेऑनचे हृदय ब्रह्मानंदाने भरून गेले.

कलांची पूजा, गुणांचा गौरव कसा करावा हे ग्रीस देशाला, अथेन्स शहराला माहीत होते. क्रेऑन गुलाम होता, तरी त्याच्या गुणांची पूजा करण्यात आली. ‘इसापनीती' म्हणून ज्या गोष्टी आपण वाचतो, त्या सुंदर व बोधप्रद गोष्टी लिहिणारा इसाप हाही एक गुलामच होता. अथेन्सने त्याचाही गौरव करून त्याचा पुतळा उभारला. ज्या राष्ट्रातील जनतेला व सरकारला गुणांबद्दल आदर आहे, त्या राष्ट्राचा उत्कर्ष का होणार नाही ? परंतु जेथे गुणांची बूज नाही, जातिभिन्नत्वामुळे जनतेस खन्या गुणाला मोल नाही, अधिकारमदामुळे सरकारलाही ते सहन होत नाहीत, त्या राष्ट्राचा उत्कर्ष केव्हा कसा होईल हे भगवंतासच माहीत !

22
Articles
अमोल गोष्टी
0.0
संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांमुळे त्या गोष्टी मुलांनी जरूर वाचाव्यात. हा अमोल खजिना खरोखर मूल्यशिक्षण घडविणाराच आहे.
1

गुणांचा गौरव

8 June 2023
2
0
0

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच

2

राजा शुद्धमती

8 June 2023
1
0
0

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ?

3

मातेची आशा

8 June 2023
0
0
0

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोड

4

किसन

8 June 2023
0
0
0

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिनाऱ्यावर शिंपा- कवड्याची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प

5

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023
0
0
0

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे

6

अब्बूखाँकी बकरी

8 June 2023
0
0
0

हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आ

7

आई, मी तुला आवडेन का ?

8 June 2023
0
0
0

“माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावया

8

राम-रहीम

10 June 2023
0
0
0

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बर

9

समाजाचे प्राण

10 June 2023
0
0
0

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत

10

तरी आईच !

10 June 2023
0
0
0

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागू

11

खरा सुगंध

10 June 2023
0
0
0

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात- फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होत

12

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

10 June 2023
0
0
0

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आतां आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या ड

13

वृद्ध आणि बेटा

10 June 2023
0
0
0

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुद्ध त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होत

14

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023
0
0
0

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ.

15

पहिले पुस्तक

10 June 2023
0
0
0

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, “मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बै

16

योग्य इलाज

10 June 2023
0
0
0

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेकफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर अॅण्ड डेझर्टेड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिद्ध आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त

17

चित्रकार टॅव्हर्निअर

10 June 2023
0
0
0

ज्यूलस ट्रॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापाऱ्याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टँव्हर्निअ

18

मरीआईची कहाणी

10 June 2023
0
0
0

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशा

19

कृतज्ञता

10 June 2023
0
0
0

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्ष

20

श्रेष्ठ बळ

10 June 2023
0
0
0

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. द

21

समाधीटपणा

10 June 2023
0
0
0

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेळा. न्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या

22

चतुर राजा

10 June 2023
0
0
0

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात ब

---

एक पुस्तक वाचा