ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत होता. जवळच्या शेतातून कोल्हे ओरडत होते. मुले मातांना घट्ट विलगत होती. लहानगा धीट रमेश मात्र ड्रायव्हरला म्हणाला, “पों पों वाजव म्हणजे कोल्हे भिऊन पळून जातील.”
तिकडून एक वृद्ध मुसलमान आला. तो उंच होता. त्याच्या हातात काठी होती. जवळच्या खेड्यातील तो होता. लहान होते ते खेडे. वीस-पंचवीस घरांची वस्ती होती. तो मुसलमान तेथील पुढारी होता. पूर्वीचे खानदानी घराणे; परंतु आता त्याला गरिबी आली होती. तो मोटार- जवळ आला व म्हणाला, “ गावात चला. येथे वाऱ्यात का राहता ? बालबच्चे बरोबर आहेत. डाळ-रोटी खा. सामान देतो. गावात रात्रीचे निजा. सकाळी मोटार दुरुस्त झाली की जा. "
प्रवासी मंडळी बोलेनात. धीट रमेश म्हणाला, “चला जाऊ गावात; परंतु आम्हांला दूध द्याल का हो दाढीवाले ?” दाढीवाला म्हणाला, “हां बेटा, गायीचे दूध देईन. चला सारे." तो वृद्ध मुसलमान आग्रह करू लागला. शेवटी भाऊ म्हणाले, “चला जाऊ. येथे रानावनात मुलाबाळांस घेऊन कसे राहावयाचे ?"
ती मंडळी गावात आली. त्यांना रसोईचे सामान देण्यात आले. मुलांना दूध मिळाले, सर्वांची जेवणे झाली. दाढीवाल्याने विचारले, “आत निजता की बाहेर ? आतील ओटी मोकळी करून देतो. बाहेर गार वारा आहे. मुलाबाळांस बाघेल.” मंडळी म्हणाली, "येथे बाहेरच बरे. ” त्यांना झोरे देण्यात आले. घरातील होते नव्हते ते पांघरावयास देण्यात आले.
काहींना झोप लागली, काही जागे होते. एक जण म्हणाला, “ मुसलमानाच्या घरी येण्यापेक्षा रानात पडलो असतो तरी बरं. वाघाचा विश्वास धरवेल एक वेळ, परंतु यांचा नाही धरता येणार. भाऊ, हा तुमचा वेडेपणा. येथे बरे-वाईट झाले तर ? विश्वास दाखवून गळे कापले गेले तर ?”
भाऊ बोलले नाहीत. पलीकडे गाय झोपली होती. तिचे वासरू विश्वासाने झोपले होते. बुद्धिमान माणसाला कोठला विश्वास ? परंतु हळूहळू सारे झोपले. पहाटेचा कोंबडा आरवला. वृद्ध मुसलमान नमाज पढण्यासाठी उठला. रमेशच्या अंगावर पांघरूण नव्हते. वृद्धाने अंगावरची चादर त्याच्या अंगावर घातली.
सगळी मंडळी उठली. शौच- मुखमार्जने झाली. त्यांना चहापाणी करण्यात आले. "रमेश, तुला दूध पाहिजे ना?" वृद्धाने विचारले. रमेश हसला. तो म्हणाला, “तुम्ही घातलेत वाटते मला पांघरूण ? कशी ऊब आली होती!” रमेश गायीचे दूध प्याला. मंडळी जायला निघाली. वृद्ध मुसलमान जरा घरात गेला. मंडळीत कोणी म्हणाला, “सुटलो एकदाचे.” ते शब्द त्या मुसलमानाच्या कानी पडले. तो चमकला. त्याच्या हृदयाची कालवाकालव झाली. तो कापच्या आवाजाने म्हणाला, “असे का म्हटलेत ?” उत्तर मिळाले, “तुमची भीती वाटत होती. मुसलमानांवर विश्वास कसा राखावा ?"
दाढीवाला काही बोलला नाही. त्याला बोलवेच ना. मोटारीपर्यंत तो पोचवायला गेला. मोटार दुरुस्त झाली होती. मंडळी आत बसली. दाढीवाला बाहेर उभा होता. त्याच्या डोळयांतून अश्रु आले. पिकलेल्या दाढीवरून ते खाली आले. किती पवित्र होते ते दृश्य! तो शेवटी म्हणाला, “सारे मुसलमान वाईट नका समजू. असे समजणे देवाचा अपमान आहे. माझ्या अश्रूंनी माझ्या बंधूंचे पाप कमी होवो !”
सारे स्तब्ध होते. बाळ रमेश दाढीवाल्याकडे बघत होता, या वृद्धाने एकदम पुढे होऊन रमेशच्या तोंडावरून हात फिरवले व त्याचे चिमुकले हात हातात घेतले. रमेश म्हणाला, “तुम्ही छान आहात. तुमच्या गायीचे दूध छान आहे.” दाढीवाला अश्रूंतून हसला. मोटार सुरू झाली. भाऊंनी कृतज्ञ व साश्रु नयनांनी वृद्धाकडे पाहून प्रणाम केला. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले.
गेली मोटार. वृद्ध तेथे उभा होता. मोटारीत भाऊ म्हणाले, “प्रत्येक समाजात हृदये जोडणारे असे देवाचे लोक आहेत, म्हणून जग चालले आहे. असे लोक समाजाचे प्राण. त्यांच्याकडे आपण बघावे व जीवन उदार, प्रेमळ व सुंदर करण्यास आशेने झटावे. "