shabd-logo

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023

3 पाहिले 3
आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे करुन सुखाने दिवस काढीत होते. त्या नगरात सर्वत्र बाईचीच सत्ता होती. तिचे भाग्य मोठे थोर म्हणून तिला ‘भाग्यबाई' म्हणत. तिची मुलेही मोठी उद्योगी : कोणी उत्कृष्ट कारागीर, कोणी उत्कृष्ट संगीतज्ञ, कोणी शास्त्रज्ञ, कोणी तत्त्वज्ञ, कोणी चांगले विणकर, कोणी चांगले योद्धे; कोणी मुत्सद्दी, कोणी तपस्वी असे होते. सर्व त्या त्या कामात मोठे वाकबगार, मोठे दर्दी! परस्परांचा हेवादावा त्यांना माहीत नाही. सर्वंच धंदे चांगले, ज्याला आवडेल तो त्याने करावा, असे होते. मुलांच्या या प्रेमळपणामुळे, या ऐक्यामुळे भाग्यबाई मोठी सुखी होती. तिचे मुख नेहमी प्रसन्न दिसे.

भाग्यबाई इतकी श्रीमंत व वैभववती होती, तरी तिला इक्लादेखील गर्व नव्हता हो. कोणी आला गेला, आतिथ्यअभ्यागत, सर्वांचे ती स्वागत करी. तिला सर्वच चांगले दिसत. जो कोणी भुकेला, तान्हेला येई त्याला तिने जवळ घ्यावे, त्याला कुरवाळावे, त्याला खायला द्यावे, कोणास तिने शेतीभाती द्यावी, वतनवाडी द्यावी असे चाले. परदेशातून किती तरी नवीन नवीन बुभुक्षित लोक तिची कीर्ती ऐकून येत. तिची कीर्ती दिगंतात गेली होती. कोणी तिच्या नगराला 'सोन्याची नगरी' म्हणत, कोणी तेथील जमिनीला ‘सुवर्णभूमी' म्हणत. कर्णोपकर्णी तिची कीर्ती सर्व त्रिभुवनात पसरली. कोणी संपत्तीसाठी, कोणी ज्ञानासाठी भाग्यबाईच्या नगरात येऊ लागले. कोणी कायमची वस्ती केली तरी भाग्यबाई 'ना' म्हणत नसे. “माझी बाळे, तसेच तुम्ही. या. गुणगोविंदाने राहा. भांडू नका, तंडू नका. मिळून मिसळून राहा. माझ्या मुलांच्या मनोभावना दुखवू नका, ते पण तुमच्या दुखावणार नाहीत,” असे ती आपली म्हणायची.

एखादे वेळेस मुले जरी भांडली, तरी ती त्यांना जवळ घेई व त्यांची भांडणे मिटवी. असे आपले चालले होते.

होता होता काय झाले, दूर देशचा एक व्यापारी आला. पांढऱ्या तोंडाचा व पांढऱ्या पायांचा तो होता. बोलायला मोठा. मिठ्ठास ! वाणी अमृताची, करणी कसाबाची, असा तो होता. त्याच्या जिभेवर ऊस लावलेले होते, परंतु पोटात विषाचे गरळ होते. भाग्यबाई भोळी, सर्वांवर तिचा विश्वास. तिने या पांढऱ्या व्यापाऱ्याला दुकान घालण्याची परवानगी दिली.

व्यापाऱ्याने वखार थाटली. व्यापार चांगला चालू लागला. त्याने एका वखारीच्या दोन केल्या, दोहीच्या चार झाल्या. चारांच्या दहा झाल्या. त्याचा पसारा वाढत चालला. व्यापारासारखे वैभव व वैभवासारखा हावभाव असतो. व्यापार वाढला तर वैभव वाढते. व्यापारी मोठा कुशल होता. नाना तप्हेचा माल मांडी. दिसायला सुबक किंमतीला स्वस्त. भाग्यबाईच्या नगरातील लोक हा माल घेऊ लागले. व्यापाऱ्याला बरकत चढली. भाग्यबाईंची सर्व मुले तो माल पाहून लोभावली. गोऱ्याचा माल घेऊ लागली. कोणी उधार घेई. कोणी रोख घेई. उधारवाल्याकडे बाकी थकली की, गोरा व्यापारी त्याची शेतीवाडी, बागबगीचा, घरदार जप्त करी व आपण मालक बने.

हळूहळू भाग्यबाईच्या नगरातील लोकांनी आपले धंदे सोडले, गोरा व्यापारी स्वस्त व भरपूर माल आणी व विकी. गोऱ्याची सत्ताही पैशाबरोबर वाढू लागली. वखारीच्या रखवालदारीसाठी तो प्रथम शिपाई - यादे ठेवू लागला. हेच शिपाई तो दुसऱ्यांना पण मदतीसाठी कधी कधी देई. गोरा मोठा हुषार, शिपाई चांगले शिकवी. त्यांना कवायती सांगे, चांगली शस्त्रास्त्रे देई. भाग्यबाईच्या नगरात कोणाला शिपाई लागले तर गोऱ्या व्यापाऱ्याजवळ मागत. गोऱ्याचे सैन्य वाढू लागले. आपले शिपाई नाहीसे होऊ लागले. असा गोऱ्याचा व्याप वाढत होता. हळूहळू एकेक वेढा भाग्यबाईच्या नगराला देत होता.

भाग्यबाई भोळी व तिची मुले पण भोळी. हळूहळू ती परावलंबी होऊ लागली. त्यात या गोऱ्याने त्यांना दारू व विडीची व्यसने लावली. चहा विड्यांची चटक लावली. त्यांना शुद्ध राहात नाहीशी झाली. गोऱ्याने एकेक घर, एकेक शेत सर्व बळकावले.

आता तो तोऱ्याने राहू लागला. लोकांच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला. अरे, आपण मायेला भुललो, परावलंबी झालो, त्यांचे शिपाई ठेवू लागलो, त्यांचा माल घेऊ लागलो, आपण होऊन त्यांच्या हातात आपली शेंडी दिली. अरेरे! आता काय करावे ? चला, पुन्हा आपले उद्योगधंदे सुरू करू चला, म्हणा हरहर महादेव-घ्या देवाजीचे नाव, घ्या अल्लाचे नाव.

परंतु गोरा व्यापारी कसला वस्ताद, तो व्यापाऱ्यांचा आता राजा झाला. फौजफाटा ठेवू लागला; तागडी जाऊन तरवार दिसू लागली. गोऱ्यांचे जातभाई टोळांसारखे सर्वत्र हिंडू-फिरू लागले. त्यांच्या हातात व्यापार गेला; त्यांनी सर्व धंदे घेतले. जेव्हा भाग्यबाईच्या मुलांचा निश्चय या गोऱ्यांच्या जातभाईस कळला, तेव्हा गोरे गुरगुरू लागले. आम्हांला धंदे करू देईनात. आमच्या मालावर जकाती बसविल्या, शेकडो नियंत्रणे घातली. मलमल विणणाऱ्यांनी मलमल विणू नये, गलबते बांधणारांनी गलबते बांधू नयेत. सर्वत्र मज्जाव ! विणकऱ्यांनी संतापाने आपआपले आंगठे तोडले. ज्या बोटांनी आम्हाला मलमल विणू देत नाही ती बोटे काय शोभेला ठेवायची ? त्यांना संताप आवरेना, क्षोभ आवरेना. टाकली स्वतःचीच बोटे तोडून, चावले स्वतःचेच दातओठ—परंतु गोऱ्याला त्याचे काय होय! तो आपला फिदीफिदी हसे व दुःखावर डागण्या देई. त्यांचे एका गोष्टीकडे लक्ष असे. ते म्हणजे पैसा. पैसा हा त्यांचा देव. तो पैशाशी बसे, पैशाशी उठे. असे त्याचे चालल.

भाग्यबाईची बाळे दीन दिसू लागली. तिला स्वतःची चूक समजली. अरेरे, उगीच मी गोऱ्या पायांना येथे येऊ दिले. दाढीवाले, टोपवाले आले तरी तेही पत्करले. त्यांनी मला तितके छळले नाही, जितके हा छळतो. आता काय करावे ? आता रडावे. केली चूक नि जन्माचे दुःख ! भाग्यबाई म्लान झाली. तिची मान खाली झाली. तिच्या तोंडावरचे ते दैवी प्रसन्न तेज लोपले. तिच्या लावण्याला अवकळा आली. ती दुःखीकष्टी - दीनवाणी झाली. आपल्या मुलाबाळांचे हाल पाहून तिला वाटे 'मरून जावे आता. कोठे माझ्या मुलांची विद्या, कोठे त्यांचे ज्ञान, कोठे त्यांचे शील, कोठे त्यांची संपत्ती ? सर्व- सर्व या चोरांनी नाहीसे केले. आत, बाहेर, जनात व मनात नागविले. अरेरे! कोठे त्या दुधातुपाच्या नद्या, कोठे ते खंडोगणती धान्य ! कोठे त्या कला, कोठे ते सुखभोग-‘अरेरे! नंदनवनाला यांनी स्मशान केले; भरल्या गोकुळाचा मसणवटा केला. बाळांनो, सोनुकल्यांनो, नाही रे मला तुमचे हाल पाहवत !' असे ती म्हणे व आपल्या डोळ्यांतून टिपे काढी. खरोखर वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये.

दुःखाने दुःख वाढू लागते. दारिद्र्य आले म्हणजे सर्व दुर्गुण पण येतात. भाग्यबाईची मुले भाकरीसाठी भांडू लागली. गोरा धनी भाकरीचा तुकडा चौघांना दाखवी व लठ्ठालठ्ठी लावून देई. कधी पैसे देऊन स्वतः- च्या बांधबांची तो हत्या करण्यास लावी. त्याचे नुकसान करण्यास लावी, गोरा धनी आपली स्तुतिस्तोत्रे कोणास गावयास लावी. आपली भाषा बोलण्यास लावी. गोऱ्या धन्याने जाहीर केले, 'माझी भाषा शिका, माझा पोशाख करा. माझी संस्कृती उचला. जो असे करील त्यास मी मान देईन. पैंसा देईन.' बुभुक्षित भाग्यदेवतेची बाळे - भराभरा तसे करू लागली. येस, नो, येसफेस करू लागली, विजार - बूट पेहरू लागली. जो असे न करील त्या स्वतःच्याच बांधवास तुच्छ लेखू लागली ! होता होता इतकी स्थिती झाली की, भाग्यबाईची ही विधुळी पोरे जर कधी कधी आईची आठवण होऊन घरी आली तर आईच्या भाषेत त्यांना बोलताही येत नसे. आईची भाषा विसरून गेले. आईला नमस्कार करण्याऐवजी म्हणत, 'गुड मर्निंग – बुट मारिंग' म्हणत. भाग्यबाई म्हणे, ‘कोणाला बूट मारतोस, मला का ?' असे तिने म्हणताच ते रागावत व म्हणत 'Old hag म्हातारडी कोठली.' अरेरे! स्वतःच्याच मातेची अशी विटंबना त्यांनी आरंभावी ना ?

परंतु एक दिवस असा येतो की, ज्या वेळेस चुकलेल्यास चूक समजून येते, तसे भाग्यबाईच्या मुलांचे पण झाले; त्यांना आपल्या चुका कळल्या, किती झाले तरी हा धनी परका, त्याला का खरा कळवळा येणार आहे ? प्रसंग आला की गोरा गोऱ्याला मिळे व भाग्यबाईच्या मुलांचे वाभाडे निघत. गोऱ्याची लावालावी, त्याची लफंगेगिरी, त्याचे डावपेच भाग्यबाईच्या

वाळांना समजून येऊ लागले; गोरा जास्त जास्त पिळू लागला. दडपू लागला - तसतसा भाग्यबाईच्या मुलांचा स्वाभिमान जागृत होऊ लागला. तिची काही मुले मोठी गुणी निघाली. त्यांनी हा गोऱ्यांचा दंगा उघड केला. गोऱ्यांची सत्ता व्यापाऱ्यावर आहे, त्यांचा व्यापार आपण बंद करू या; असे म्हणू लागली. परंतु सर्वांस पटेना. गोऱ्याकडे दरवर्षी जाऊन आपली गाम्हाणी सांगू व 'आमची सत्ता आम्हांला द्या' असे म्हणत जाऊ, असे त्यांनी ठरविले.

दरवर्षी मार्गशीर्षाच्या महिन्यात भाग्यबाईची मुले एकत्र जमत व यंदा कशा तऱ्हेने भीक मागण्यासाठी जावयाचे हे ठरवीत. परंतु भीक मागायला आले म्हणजे गोऱ्या बाईचे उत्तर ठरलेले, “वा रे वा, चावट कोठले ! तुम्हाला रे काय देऊ ? माझ्याच मुलांबाळांस पोटभर पुरत नाही. दासी - बटकींना उरत नाही. माझ्याच मुलांत अजून बेकारी आहे, दारिद्रय आहे. चला चालते व्हा इथून. "

असे आपले दरवर्षी व्हावयाचे. गोऱ्या मुलांची आई भाग्यबाईच्या मुलांस पाण्यात पाही. तिला भाग्यबाईंचा पाणउतारा करावा असे पदोपदी वाटे. हा पाणउतारा करण्यास कोणी ग्रंथकार, कोणी ग्रंथकर्त्री तिला आपली मिळायची. म्हणतात ना, 'मोठे कुले तिकडे जग भुले.'

भाग्यबाईचे रडून रडून डोळे सुजले, लाल झाले. एक दिवस ती वैतागली व म्हणाली, “जीव देते जाऊन. मला मुलांचे हाल पाहवत नाहीत. सतरा साथी, अठरा दुष्काळ, सर्व आपत्तींनी मुले खंगून गेली. डोळे खोल गेले, गाल बसले; मला नाही रे देवा हे पाहवत.' असे म्हणून ती उठली व फाटक्या वस्त्रानिशी रानात निघाली. जिने भरजरी शालू नेसावे, जिने अलंकार घालावे, जी शिबिकेमध्ये नेहमी बसायची, भालदार-चोपदार जिच्यापुढे ललकारायचे –तीं भाग्यबाई अनवाणी, निरलंकार, फाटक्या वस्त्रानिशी रडत चालली होती. सूर्याला ते पाहवले नाही. त्याने ढगाचे दाट वस्त्र आपल्या तोंडावर घेतले.

भाग्यबाई इकडे तिकडे पाहात नव्हती. पायांना दगड खुपत होते, काटे बोचत होते, रक्त भळभळा येत होते; परंतु दुःखसंतापाने ती वेडी झाली होती. अत्यंत सुखाचे वेळी किंवा अत्यंत दुःखाचे वेळी स्वतःला स्वतःचीच शुद्ध नसते.

रानात पुढे पुढे चालली. आता रान मोठे सुंदर लागले. दाट जंगल लागले. मोठ मोठे वृक्ष तेथे होते. त्यांनी आकाशाला उचलून धरले होते, गर्द छाया होती; नाना रंगांचे पक्षी उडत होते. नाना स्वरांचे पक्ष्यांचे आलाप ऐकू येत होते. मधुर सुंदर फुलांचा वास भरून राहिलेला वाऱ्याबरोबर येई.

होता होता एक अत्यंत सुंदर स्थळ आले. फारच रमणीय वनस्थली ती होती. तेथे प्रशांत सरोवर पसरले होते. लावण्यदेवतेचा जणू तो आरसाच होता. पाणी स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते. मधून मधून निरनिराळी कमळे फुलली होती. हंस तेथे पोहत होते. तेथील त्या प्रशांत सौंदर्याचे कोण वर्णन करील ?

भाग्यबाईलाही थोडा दुःखाचा विसर पडला. परंतु इतक्यात आपण कशाला आलो याची तिला आठवण झाली. या प्रचंड जलाशयात आपला अभागी देह सोडून द्यावा असे तिने ठरविले. शेवटचा निश्चय तिच्या डोळ्यांत दिसू लागला. तिने आपले केस बांधले, पदर बांधला. मुलांची आठवण होऊन पुन्हा ते चार अश्रू पाहा गालांवर घळघळले. माया मोठी कठीण, मोठी कठीण हो.

इतक्यात या पाहा स्त्रिया तिकडून धावतच येत आहेत. कोण या स्त्रिया - आणि त्या का बरे धावत येत आहेत ! ती पाहा, एकजण भाग्यबाईच्या जवळ जाऊन तिला सावरून धरते आहे, तिची विचारपूस करते आहे. चला, आपण त्यांचे बोलणे ऐकू. त्या स्त्रियांतील मुख्य जी होती. तिचे नाव अकलंका होते. अकलंका भाग्यबाईस म्हणाली, “बाई अशा जिवावर उदार का होता ? जीव कधी देऊ नये. आत्महत्या हे घोर पातक आहे.

भाग्यबाई म्हणाली, “हो ते मला माहीत आहे. परंतु आजपर्यंत सर्व सहन केले हो. माझ्याइतकी सहनशीलता कोणीच दाखविली नसेल ! परंतु सर्वच गोष्टींना मर्यादा आहे-नाही का ? कोठवर तरी बाई सहन करावयाचे ? नाही हो बाळांचे हाल पाहवत, बोंडलेभर दूध नाही, चिमूटभर पीठ नाही. पूर्वीचे माझे भाग्य केवढे - तुम्हीसुद्धा माझे नाव ऐकले असेल - भाग्यबाई-ती हो मी - पण मी आज अभागी !”

अकलंका म्हणाली, “काय तुम्हीच का भाग्यबाई! हो, तुमचे नाव आम्ही ऐकले आहे. तुमचे मुलगे मागे एकदा आमच्या मदतीसाठी आले होते. दिलीप, दशरथ हे आले होते. तुम्हाला आज अशी दशा कशाने आली ? या, अशा नीट बसा. तुम्ही थोर आहात."

भाग्यदेवता म्हणाली, “मी फसले व स्वातंत्र्य गमावून बसले, मुलगे मोहाला बळी पडले. आता गोरा चोर सर्व घेऊन बसला आहे. माझी मुले गोऱ्या बाईकडे जातात व भीक मागतात द्या हो एक तरी तुकडा' तर गोरीबाई उलट काही न देता फटकारे मारून हाकलून देते. मला मुलांची अन्नान्नदशा पाहवत नाही. जेथे फुले टिपली तेथे शेण्या वेचायची पाळी आली. केले सहन-परंतु आता नाही हो करवत.”

अकलंकेचे डोळे भरून आले; इतर स्त्रियांनी सुद्धा डोळ्यांस पदर लावले. थोरामोठ्यांवरची विपत्ती सर्वांच्या हृदयाचे पाणी करते. अकलंका डोळे पुसून म्हणाली, “भाग्यबाई तुम्ही सर्व उपाय केलेच आहेत. परंतु मी उपाय सांगते तो करून पाहा. मी एक तुम्हाला व्रत सांगेन. या व्रताप्रमाणे तुम्ही व तुमची मुले वागतील तर गेलेले वैभव परत येईल. स्वतंत्रता हसत येईल. "

भाग्यबाई म्हणाली, “सांगा ते व्रत. मी मर्त्य लोकांची असल्ये तरी उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. घेतलेले व्रत सोडणार नाही. पूजासाहित्य सर्व जमवीन. सांगा मला वसा. "

अकलंका देवी म्हणाली, “आम्हाला हे व्रत पूर्वी नारदाने सांगितले होते, ते तुम्हांला सांगते. त्याचा वसा कसा घ्यावा, काय पुजावे, कसे पुजावे, काय करावे सर्व सांगते. हे हातात तांदूळ घ्या. हं, ऐका आता. हा वसा केव्हा घ्यावा. केव्हाही घ्या. ज्या दिवशी मनी पवित्र विचार असतील त्या दिवशी उठावे, दिवस वार ठरवू नये, चांगले विचार येतील तीच वेळ धरावी. त्या दिवशी स्वतंत्रतादेवीची मूर्ती करावी. तिला खादीचे शुभ्र वस्त्र नेसवावे, स्वतःही खादीचे वस्त्र परिधान करावे. स्वतंत्रतादेवीला फुलांच्या माळा घालाव्या-फुले कोठली घालायची ? एकेक सद्गुणाचे फूल आणून ऐक्याचे दोऱ्यात ते ओवावे. अशी गुंफलेली माळच तिला आवडते. तिला नैवेद्य लागतो. नैवेद्य कस करावयाचा तो ऐका. व्रतात चूक होता कामा नये. कर्म यथासांग झाले पाहिजे म्हणून नीट ऐका. स्वावलंबनाची डाळ आणावी, ती दुहीच्या जाळावर कळकळीच्या तुपावर भाजावी; ती डाळ मग चांगली दळावी. दळून झाल्यावर तिच्यात प्रयत्नांची शर्करा घालावी व तिला प्रेमाचा कढ आणावा. देशभक्तीचे व धर्मशक्तीचे लवंगा-वेलदोडे आणावे व देव- भक्तीचे केशर आणावे - ते त्यात सर्व नीट प्रमाणात घालावे. मग हे लाडू नीट वळावे. स्वतंत्रदेवीला नैवेद्य दाखवावा. नंतर स्वतंत्रतादेवीची मगंल आरती करावी. पूजा संपल्यावर सर्वांनी हा प्रसाद भक्षण करावा. दरवर्षी असे करीत जा. असे झाले तर स्वतंत्रादेवी प्रसन्न होईल. ती तुमच्याकडे नांदावयास थेईल. चोराचिलाटांना दूर करील अशी नारदांनी सांगितलेली पूजा तुम्हाला सांगितली. तुम्ही करा. आता आम्ही जातो, फार उशीर झाला. स्वर्गात आमची वाट पाहात असतील. "

भाग्यबाईने त्यांना नमस्कार केला. देवता निघून गेल्या. भाग्यबाईच्या मनात श्रद्धा होती. भक्ती होती. तिच्या हृदयात आशा उत्पन्न झाली. तिने तेथे स्नान केले व पुन्हा माघारी घरी आली. तिने सर्व मुलांना एकत्र बोलाविले. सर्व मुले मातेच्या भोवती जमा झाली. भाग्यबाईने मुलांना ते व्रत सांगितले. त्यांनी ते व्रत करण्याचे ठरविले.

दरवर्षी मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात, पवित्र विचार मनात आणून भाग्यबाईची बाळे स्वतंत्रतेची सुंदर मूर्ती करीत. तिला सद्गुणांची माळ घालीत. स्वावलंबनाचे लाडू सांगितल्याप्रमाणे करीत. अशा रीतीने पहिले वर्ष त्यांनी केले—तो गोरीबाई भिऊ लागली. ती म्हणू लागली, 'या रे भाग्यबाईच्या पोरांनो, हे घ्या तुकडे -' परंतु व्रताचा ताबडतोब परिणाम लक्षात येताच त्या तुकड्यांकडे भाग्यबाईच्या मुलांनी पाहिले नाही. त्यांनी पुन्हा व्रत केले. गोरीबाई फारच भिऊ लागली. गोरोबाई जसजशी भिऊ लागली, तसतशी भाग्यबाईच्या बाळांची श्रद्धा बळावत चालली. ते उत्साहाने व्रत करू लागले. शेवटी एक दिवस गोरीबाई म्हणाली, “मी माझ्या दुप्पट देशात आल्ये तशी जाते. ही या तुमची सत्ता. ही घ्या तुमची मत्ता. मला काही नको. भाग्यबाई, मी तुला छळले, पण मनात ठेवू नको. मी चुकल्ये, मी पापे केली. मी तुला नाडले, पाडले, छळले, मारले, पोळले- क्षमा कर. तू थोर आहेस, तू खरी आमची अन्नदात्री तू विद्यादात्री. त्या तुलाच कृतघ्नपणे आम्ही हीनदीन केले. मनात नको हो ठेवू हे. उदार मनाने आम्हांला क्षमा कर. माझी मुले-बाळे आली सवरली तर त्यांना हाकलून देऊ नको. ती आता सौजन्याने राहतील. करशील ना ही कृपा ?"

भाग्यबाई म्हणाली, “खुशाल येथे राहातना ! पण नीट राहू देत, मला आई मानून येथे राहू देत. मला त्यांनी परकी समजू नये म्हणजे मी त्यांना समजणार नाही. क्षमा हा माझा धर्म आहे. माझी सर्व मुले - हा मोठा मुलगा वसिष्ट, हा लहानसा मोहनदास - पाहा किती क्षमावान आहेत. येऊ देत हो तुझी पण मुले. अग, त्यात काय जाते ? येतील, एके ठिकाणी खेळतील. खातील, शिकतील, सवरतील. मोठी होतील. एकमेकांना साहाय्य करून जगात आनंदाने सर्वांनी राहावे, उन्मत्त होऊ नये, फसबू नये असे आपले मला वाटते. "

गोरीबाई मनाने चांगली होऊन निघून गेली. भाग्यबाई पुन्हा भाग्यवती झाली. जगाची मार्गदर्शक - तारक झाली; सुखी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ या. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !

22
Articles
अमोल गोष्टी
0.0
संस्कारक्षम अश्या लहान वयातच मुलांना नैतिक शिकवण देणाऱ्या थोरामोठ्यांच्या गोष्टी सांगितल्या तर मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास त्या नक्कीच मदत करतात. साने गुरुजींनी लिहिलेले अमोल गोष्टी हे पुस्तक असंच असून साध्या सोप्या भाषेमुळे व त्यातील नितीगुणांमुळे त्या गोष्टी मुलांनी जरूर वाचाव्यात. हा अमोल खजिना खरोखर मूल्यशिक्षण घडविणाराच आहे.
1

गुणांचा गौरव

8 June 2023
2
0
0

ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की, काही लोकांस ईश्वरानेच गुलाम म्हणून जन्मास घातलेले असते. आपल्याकडेसुद्धा शूद्र वगैरे ईश्वरानेच

2

राजा शुद्धमती

8 June 2023
1
0
0

आपण सर्व जगाकडे दृष्टी फेकली तर आपणांस असे दिसून येईल की, सर्व माणसांच्या वाट्यास दुःख आले आहे. जरी काही लोक सुखात व वैभवात दिसले तरी त्यांस दुःखाने सोडले आहे असे नाही. शारीरिक रोग कोणास सुटले आहेत ?

3

मातेची आशा

8 June 2023
0
0
0

त्या गावाचे नाव होते मगरूळ. एके काळी ते गाव संपन्न होते. तेथे जणू सर्व संगले होती. परंतु आज काय आहे ? तेथील उद्योगधंदे मेले आहेत. लोक कसेतरी जगत आहेत. सारा गाव कर्जबाजारी झाला आहे. जिकडे तिकडे पडकीमोड

4

किसन

8 June 2023
0
0
0

एका समुद्रकाठी एक लहान नाही, मोठे नाही असे गाव होते. समुद्रकिनारा फारच सुंदर होता. समुद्रकिनाऱ्यावर शिंपा- कवड्याची संपत्ती किती तरी विखुरलेली असे. किनाऱ्यालगतच एक लहानशी टेकडी होती. या टेकडीवर नाना प

5

स्वतंत्रतादेवीची कहाणी

8 June 2023
0
0
0

आपले एक आटपाट नगर होते. तेथे एक भाग्याची बाई राहात असे. लेकी-सुनांनी घर भरलेले, गुराढोरांनी गोठा भरलेला, खायलाऱ्यायला काही कमी नव्हते. पाटीभर दागिने एकेकीच्या अंगाखांद्यावर होते. लोक आपापले उद्योगधंदे

6

अब्बूखाँकी बकरी

8 June 2023
0
0
0

हिमालयाचे नाव कोणी ऐकले नाही? हजारो मैल लांब तो पसरला आहे. त्याची शिखरे इतकी उंच आहेत, की कोणी त्यावर अद्याप पोचला नाही. हिमालय पर्वतात मधून मधून वस्ती आहे. अशा वस्तीच्या जागांपैकी आल्मोडा ही एक आहे.आ

7

आई, मी तुला आवडेन का ?

8 June 2023
0
0
0

“माझी सोन्यासारखी पोर अंथरुणास खिळली आहे आणि या कारट्यास जरा त्या मुलीला घे सांगितले तर नुसता एरंडासारखा फुगला आहे! आवदसा आठवली आहे मेल्याला! पुण्यास दिवे लावून आले पळपुटेराव, आता येथे आईशीला गांजावया

8

राम-रहीम

10 June 2023
0
0
0

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बर

9

समाजाचे प्राण

10 June 2023
0
0
0

ती मोटार लांबची होती. वाटेत ती बिघडली. दुरुस्त होईना. बाहेर अंधार पडू लागला. आकाशातील तारे लुकलुकू लागले. लहान मुले कंटाळून रडू लागली. मोटारीत कुटुंबवत्सल माणसे होती. रात्री कोठे जाणार ? गार वारा वाहत

10

तरी आईच !

10 June 2023
0
0
0

एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागू

11

खरा सुगंध

10 June 2023
0
0
0

गोविंदाचा एक मित्र फार दूरच्या देशात- फिझी बेटात गेला होता. फिझी बेटात आपल्या देशातील मजूर पुष्कळ आहेत. त्यांना शिक्षण देणे, आपल्या धर्माची ओळख करून देणे, या पवित्र कार्यासाठी गोविंदाचा मित्र गेला होत

12

सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

10 June 2023
0
0
0

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आतां आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या ड

13

वृद्ध आणि बेटा

10 June 2023
0
0
0

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुद्ध त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.एकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होत

14

‘मुलांनो, सावध !’

10 June 2023
0
0
0

ग्रीस देशातील इसापप्रमाणे पुष्किन् म्हणून एक रशियन ग्रंथकार शे-दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. त्याच्या गोष्टांपैकी एक गोष्ट पुढे देतो.एक लहानसा ओढा होता. उन्हाळ्यात पाण्याचा एक थेंब त्यात आढळेल तर शपथ.

15

पहिले पुस्तक

10 June 2023
0
0
0

एक अत्यंत गरीब मुलगा होता. तो गरीब होता तरी त्याला शिकण्याची फार इच्छा होती. एक दिवस तो एका शेजारच्या मुलाजवळ खेळत होता. त्या मुलास तो म्हणाला, “मला जर तू अक्षरे वाचावयास शिकवशील तर सहा अक्षरांस एक बै

16

योग्य इलाज

10 June 2023
0
0
0

गोल्डस्मिथ हा इंग्रजी भाषेतील नामांकित कवी अठराव्या शतकात झाला. 'विकार ऑफ वेकफील्ड' ही त्याची कादंबरी व 'ट्रॅव्हलर अॅण्ड डेझर्टेड् व्हिलेज' या त्याच्या कविता जगप्रसिद्ध आहेत. गोल्डस्मिथ हा कवी होता. त

17

चित्रकार टॅव्हर्निअर

10 June 2023
0
0
0

ज्यूलस ट्रॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापाऱ्याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टँव्हर्निअ

18

मरीआईची कहाणी

10 June 2023
0
0
0

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. पाच सुना दोन्ही लेकी सासरी सुखाने नांदल्या सवरल्या. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही. रोग नाही, राई नाही. कशा

19

कृतज्ञता

10 June 2023
0
0
0

गंगा नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती. त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटांत एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्ष

20

श्रेष्ठ बळ

10 June 2023
0
0
0

कुराणात पुढे दिलेला संवाद देवदूत व देव ह्यांच्यामध्ये झाल्याचे लिहिले आहे.देवदूत: प्रभो, या जगात दगडापेक्षा बलवान अशी कोणती वस्तू आहे का? सर्व वस्तू दगडावर पडून फुटतात, पण दगड मात्र अभंग राहतो. द

21

समाधीटपणा

10 June 2023
0
0
0

फ्रान्स देशातला फोंतेन म्हणून एक गोष्टीलेखक होऊन गेळा. न्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यांपैकी एक देतो.पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करीत होता. तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या

22

चतुर राजा

10 June 2023
0
0
0

सालोमन म्हणून एक प्राचीन काळी पश्चिमेकडे राजा होऊन गेला. तो शहाणपणाविषयी फार प्रसिद्ध होता. त्याच्या चातुर्याची कीर्ती दुखर पोचली होती. कीर्तीही पंखाशिवाय उडत जात असते. एक दिवस सालोमन आपल्या दरबारात ब

---

एक पुस्तक वाचा