shabd-logo

१०

8 June 2023

7 पाहिले 7
निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. सुमित्राताईंना हात धरून उतरवण्यात आले. थोडयाशा पाण्यातून मंडळी तीरावर आली. ती खाडी होती. दोन्ही तीरांवर दाट झाडी होतीय नारळाची बने होती. जवळच शिवालय होते. आपले यात्रेकरू तेथे जाणार होते. तीरावरल्या एका धर्मशाळेत त्यांनी आपले समान ठेवले. तेथल्या खानावळवाल्यास जेवणाचे सांगून डोंगर चढायला मंडळी लागली. तो अपरिचित मनुष्य झपाझप चढत पुढे गेला. मिरीही वेगाने पुढे जात होती. डॉक्टर नि सुमित्राताई हळूहळू येत होती. मिरी मध्येच उभी राही नि सभोवतालचे सृष्टिसौंदर्य बघे. किती तरी गलबते दूर दिसत होती. त्यांची पांढरी शिडे फडफडत होती. जणू हंसपक्षीच क्रीडा करीत होते. दूरच्या खडकांवर लाटा आपटताना दिसत. कोटयावधी तुषार उडत. त्या खडकांच्या ठिकप्या उडविण्यासाठी संतापून संतापून जणू त्या लाटा येत. आपल्या गतीला विरोध करणाप्या त्या खडकांचा चक्काचूर करावा असे त्यांना वाटे. परंतु त्यांचा चुरा होई. आणि दुरून हिरवी निळी दिसणारी ती झाडे. पलीकडची काही डोंगरशिखरे, आकाशाला भिडायला गेलेली. मिरी बघत राही. परंतु पुन्हा भानावर येई नि पळे. त्या पाहुण्याला आपण गाठू असे तिला वाटे. परंतु तो पाहुणा कधीच वर निघून गेला होता. मिरीला भिती वाटू लागली. आता फिर्र झाडीतून रसता होता. तिला शिळा ऐकू आली. ती घाबरली. कोणाची ती शीळ ? ती पाखरांची होती. समुद्रकाठचे मत्स्याहारी पक्षी. किती गोड त्यांची ती शीळ असते. त्यांची शीळ ऐकून म्हणे मासे भुलतात व पाण्यात जरा वर येतात, की हे पक्षी त्यांना पटकन् मटकावतात.

मिरी एकदाची चढण चढून वर आली. आता वर सपाटी होती. तिने आजूबाजूला बघितले. ते शिवालय आता जवळ होते. इतक्यात एक दगड उशाला घेऊन झोपी गेलेला तो पाहुणा तिला दिसला. ती त्वरेने तेथे आली. त्या पाहुण्याच्या तोंडाकडे ती पाहात होती. निद्रेतही त्याचे तोंड चिंतातूर दिसत होते.

‘नाही. मी नाही. मी असे करीन? माझ्या हृदयात तू आहेस. दुदैव!' असे काही तरी झोपेत तो बडबडला. तो कुशीवर वळला. मिरीला त्याची करुणा वाटली. हा का दुःखीकष्टी जीव आहे? त्याच्या जीवनात का निराशा आहे? अंधार आहे? त्याच्याविषयी तिला सहानुभूती वाटू लागली. तो पाहा एक लहान हिरवा किडा. गवतातला किडा. त्या पाहुण्याच्या कपाळावर तो चढला. किडयातून उत्क्रांत झालेल्या मानवाच्या कपाळावर तो प्रेमाने सहल करीत होता. मिरी खाली वाकली. तिने हलकेच त्या किडयाला उचलून दूर फेकले.

'हे माझे जीवन नको. मला कशाला कोण जवळ करील? माझी असून माझी नाहीत. अरेरे!'

तो पुन्हा बडबडला. तोपहा आणखी एक किडा आणि तो एक मुंगळा! मिरी पुन्हा खाली वाकली. तिने त्या जिवांना हाकलले. परंतु तिच्या डोळ्यांतील दोन अश्रू त्याच्या मुखावर पडले. तो एकदम जागा झाला. त्याने आपले डोळे उघडले. मिरीच्या मोठ्या डोळ्यांकडे तो पहात राहिला. त्याने

तिचा हात पकडला. मुंगळ्याला दूर करणार हात. 'बाळ, तू का रडतेस? तुझ्या डोळ्यांत हे पाणी का? तू का माझ्यासाठी

रडत होतीस? माझी तुला माहिती आहे? असे एखाद्या परक्यासाठी रडू नये.

का बरे रडलीस ?' ' तुमची सचिंत मुद्रा बघून, तुमचे अस्फुट शब्द ऐकून. तुम्ही दुःखी आहांत. '

'तुला काही स्वतःची दु:खे नसती तर मी दुसप्यासाठी रडले नसते. मी स्वतःसाठी रडले आहे. म्हणून तर दुसप्यासाठई अश्रू येतात. जो स्वतः दुःखातून गेला नाही, त्याला दुसप्याच्या दुःखाची कल्पना कशी येणार?"

'तू सुखी आहेस का?' 'होय.'

'तू का आपली दुःखे विसरलीस? भूतकाळातील दुःखांची तुला आता आठवण नाही का?'

'मी माझा भूतकाळ विसरले नाही. तो विसरू शकणारही नाही.' 'तरी तू सुखी आहेस?'

'होय. '

'मग ती तुझी दुःखे पोरकट असतील. लहानपणाच्या लूटूपुटूच्या खेळांप्रमाणे, भातुकलीच्या खेळातील सुखदुःखाप्रमाणे तू अद्याप मूल आहेस लहान आहेस.'

'मी लहान कधीच नव्हते. दुःखामुळे लहान मुले अकाली प्रौढ होतात. ' 'बाळ, तू चमत्कारीक बोलतेस. बोल बोल. सांग मला सारे. मी आता वयातीत माणूस आहे. माझ्याजवळ सांगायला काही हरकत नाही. मी निरूपद्रवी आहे. '

'तुम्ही का कधीच सुखी नव्हता.'

'सुखाचा एखादा क्षण अनुभवला असेल. परंतु दुःखच सदैव नशिबी

आहे.'

'परंतु सुख येईल.'

“कधी येईल? आता आशा नाही. हे जग वाईट आहे. दुःखाने भरलेले आहे. येथे संशय फार. गैरसमज फार. किती तरी वर्षात सुखाचा वारा मला शिवला नाही.' असे म्हणून त्याने पुढील चरण म्हटले.

“जगाच्या बंदिशाळेला सुखाचा कोठला वारा”

'अशा दुःखी जीवांची मी कीव करीन. त्यांना सुख साहाय्य देईन. त्यांच्यासाठी प्रार्थना करीन.' 'मी आशेच्या पलीकडे गेलेला आहे. मिळावे म्हणून मी 'परंतु प्रार्थनेच्या पलीकडे नाही ना गेलात? प्रार्थनेच्या पलीकडे कोण जाणार ? निराशाही प्रार्थनेसमोर थबकते नि तिचे सुंदर आशेत परिवर्तन होते. '

'मुली, ते बघ दाट ढग येत आहेत. वादळ का येणार? दाट काळेकुट्ट ढग. ढग ज्याप्रमाणे प्रकाशाला येऊ देत नाहीत, त्याप्रमाणे निराशा सुखाला येऊ देत नाही. आशेच्या किरणांना येऊ देत नाही.'

'परंतु ढग कितीही वेळ राहिले तरी चिरंजीव नाहीत. सात सात दिवस मुसळधार पाऊस पडतो. सूर्यदर्शन होत नाही. परंतु आठव्या दिवशी पुन्हा सूर्यनारायण दिसतो. प्रकाश सर्वत्र पसरतो. निराशा, दुःखे, क्लेश, विफलता यांच्या पलीकडे सुखाचा प्रकाश शेवटी आहे. तो पहायला शिका.

'परंतु ज्यांना हा दूरचा प्रकाश दिसत नाही. त्यांनी काय करावे?'

'श्रद्धेचे डोळे घ्यावे. श्रद्धा बरोबर घेऊन जीवनातून धडपडत जावे.'

'बाळ, श्रद्धा टिकत नाही. कोणा महात्माची श्रद्धा अनंत असेल. सामान्य माणसांची श्रद्धा पुन्हापुन्हा खंडित होते. श्रद्धेचा धागा तुटतो.' 'तो धागा पुन्हा जोडावा नि धडपडत पुढे जावे. तो बघा प्रकाश आला.

ढग गेले. उठा, बघा तो प्रकाश.'

तिने त्याला उठवले. प्रकाश दाखविला. 'मुली बोल. मला शिकव.'

'तुम्ही या जगाचा तिटकारा करता. होय ना?' 'हो. तू नाही का करीत?'

'नाही.'

'तू या जगावर कधी संतापली नाहीस? जगावर कधी दातओठ खाल्ले नाहीस ? या जगाचा तुला कधी वीट नाही आला? हे जग दुष्ट आहे, असे तुला कधी नाही वाटले?'

‘मीही पूर्वी असे कधीकधी करीत असे. हे जग वाईट आहे, दुष्ट आहे, असे म्हणत असे.

'पुन्हाही असे म्हणशील का ? जगाचा तिरस्कार करशील का?'

'अशक्य, अगदी अशक्य, आता जगाला मी नेहमी प्रेम देईन. कारण, या जगानेच मला आधार दिला, या जगाने मला प्रेम दिले. भरपूर प्रेम. 'जगाने तुला प्रेम दिले?'

'हो कृपाकाकांनी दिले मुरारीने दिले सुमित्राताईंनी दिले. कृपाकाका एकटे होते. वृद्ध होते, तरी त्यांनी या अनाथ मुलीला जवळ केले. आईना बाप, बहीण ना भाऊ, अशी मी होते, परंतु त्या कृपाकाकांनी मला प्रेम दिले आणि मुरारी, त्याची आई यशोदा, यांनी मला प्रेम दिले आणि या आंधळ्या सुमित्राताई ! कृपाकाका मेल्यावर सुमित्राताईंनी मला वाढविले. त्या स्वतः आंधळ्या आहेत. परंतु त्यांनीच मला कधी न जाणारा प्रकाश दिला. अमर श्रद्धा त्यांनी मला दिली. जगावर प्रेम करायला त्यांनीच मला शिकविले. मी पूर्वी किती दुःखी होते ! रोज मारहाण व्हायची, नीट खायला मिळायचे नाही. सारी ददात. मला त्या आठवणी येतात. परंतु त्यामुळेच हे मिळालेले प्रेम अधिक मौल्यवान वाटते.

'जगाने तुला प्रेम दिले? त्या आंधळीने तुला श्रद्धा दिली?'

'हो. जगात ज्याप्रमाणे आपले आईबाप असतात, त्याचप्रमाणे या सर्व विश्वाचा कोणी तरी मायबाप आहे असे मला वाटते. ज्या क्षणापासून या श्रद्धेचा माझ्या जीवनात उदय झाला, त्या क्षणापासून मी निश्चित झाले, सुखी झाले. '

'तुला अलिकडे कधी दुःखकारक प्रसंगांना तोंड द्यावे लागले नाही? तू का केवळ सुखी आहेस?' 'तसे नाही. पुष्कळ कसोटीच्या प्रसंगातून मीही जात आहे. मुरारीची आई गेली, मुरारीचेही बप्याच दिवसांत पत्र नाही. कधीकधी मी एकटी रडतही

बसते. कधीकधी अगदी सुनेसुने वाटते.*

'तरी तू अशी आनंदी कशी? पाखरासारखी सुखी, उल्हासमूर्ती कशी? 'समोर मला गिळायला दुःखनिराशेची दरी आ वासून भेसूरपणे उभी राहिली, तरीही आशेच्या त्या अनंत आधारावर, अनादिकाळापासून सज्जनांची ज्याचा आधार घेतला, त्या दयामय प्रभूच्या आधारावर मी उभी असते. त्या अनंत दयेवरची माझी श्रद्धा अभंगच असते. आणि त्या भयाण दरीतही मी हसतमुखाने उतरते.'

'तुला त्या मुरारीचे पत्र नाही?'

'नाही.'

'तो एखाद्या वेळेस तुला फसवील.'

'नाही. तो फसवणार नाही.'

त्या दोघांचे असे बोलणे चालले होते तो डॉक्टर नि सुमित्राताई आली. 'देवाचे दर्शन घेतलेस का !' डॉक्टरांनी विचारले.

'तुमच्याशिवाय कसे घेऊ तुमच्याशिवाय देव कोण दाखविणार?' मिरी म्हणाली.

‘कोठे आहे देव?' पाहुण्यानी विचारले.

'तो वर तेथे.' डॉक्टर म्हणाले.

'देव अंतर्बाह्य सर्वत्रच आहे.' सुमित्रा म्हणाली.

तो पाहुणा आता मुका नव्हता. त्याला आता कंठ फुटला होता. तो एखाद्या मुलासारखा बोलू लागला. जणू त्याला नव्यानेच वाचा सापडली होती.

'डॉक्टर, तुमचे पाहुणे बोलू लागले.' सुमित्रा म्हणाली. 'डोंगरावरची, देवाजवळची प्रेमळ प्रसन्न हवा त्याला लागली आणि त्याची हृदयवीणा बोलू लागली. खरे ना मिरे?' डॉक्टर म्हणाले. 'डॉक्टर, तुम्ही कवीही आहात वाटते?' पाहुण्याने प्रश्न केला.

'धंदा कोणताही असो मनुष्य जर कवी नसेल तर त्याचा धंदा यशस्वी होणार नाही. कवी म्हणजे दुसप्याविषयी सहानुभूती असणे. दुसप्यांच्या भावना ओळखणे सुखदुःखे, गरजा ओळखणे. क्रांतिकारक हे सर्वांत मोठे कवी असतात. कारण, कोट्यावधी दीनदारिद्री जनतेच्या हृदयाशी ते एकरूप झालेले असतात.' डॉक्टरांनी प्रवचन दिले.

'परमेश्वराला म्हणूनच 'कवींना कविः' असे म्हटले आहे. कारण, तो चराचराचे हृद्गत जाणतो. तृणपर्णासाठीही दवबिंदू ढाळतो.' सुमित्राताई म्हणाल्या.

'तुम्ही सर्वच काव्य बोलत आहात मीच एक तुमच्यात अरसिक आहे.'

'तुमच्यामुळे तर या सर्वांच्या वाणीला पल्लव फुटले आहेत. आमच्या

काव्यांना स्फूर्ती देणारे तुम्ही आहात.' मिरी म्हणाली.

'डॉक्टर, तुम्ही काही म्हणा, या जगात माझी कशावरच श्रद्धा नाही. या जगात कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर श्रद्धा ठेवावी? सारा असार पसारा आहे.'

'जे शुद्ध आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी.'

'या शुद्धांना कोठे धुंडाळायचे? सर्व बजबजपुरी नि घाण. मोठमोठ्या मंदिरातून जावे तो तेथे गेल्यावर किळस येते. यात्रांची ठिकाणे म्हणजे व्यसनांचे व्यभिचारांचे नरक वाटतात. कोठे ठेवायचा विश्वास? तुम्ही या मंदिरात जाऊन देव पाहणार? सर्वत्र दंभ आहे. देवदेव म्हणणाप्यांजवळ नेमका देव नसतो. टिळे, माळा, जपज्याप्य, सारी सोंगे. डॉक्टर, देवाला न मानणारा एक गृहस्थ एकदा मी पाहिला होता. परंतु लाखो सनातनींना कुरवाळूनही असे निर्मळ जीवन हाती आले नसते. देवधर्म न मानणाप्यांजवळच थोडाफार देवधर्म असण्याचा संभव आहे. बाकी सारा रूढींचा पसारा. वरपांगी देखावे. देवाला मानणारे मानवांना तुडवायला निघतात. देव, कोठे आहे देव?'

'जेथे सुजनता दिसेल, चांगुलपणा दिसेल, तेथे देव पाहा तेथे विश्वास ठेवा. तेथे श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवण्यासारख्या काही तरी व्यक्ती आपणास भेटतातच. या जगात सारे वाईटच असते तर हे जग चालले असते का? शरीर सारेच सडलेले असेल तर तेथे प्राण राहू शकेल का ? हे जग चालले आहे यावरून जगात साधुता आहे. या जगात केवळ खाटीकखाने नाहीत. अशी शिवालयेही आहेत. '

बोलत बोलत मंडळी शिवालयाजवळ आली. थंडगार वारा येत होता.

मिरी घामाघूम झाली होती.

'मिरे, घाम पूस. दमलीस ना?' डॉक्टरांनी विचारले. 'मिरी, किती छान नाव! हा घे रुमाल. पूस घाम.' तो पाहुणा म्हणाला. 'माझ्याजवळ आहे.' मिरी म्हणाली.

पाहुण्याने आपला रुमाल खिशात ठेवला. सुमित्रा शांतपणे बसली होती. डॉक्टरांनी खिशातून लिंबे काढून चुंफायला दिली. पाहुण्याच्या खिशात लिमलेटच्या गोळ्या होत्या. थोडा वेळ बसून मंडळी निघाली. खाली उतरताना त्रास होत नव्हता.

भोजन करून मंडळी धर्मशाळेत पडून राहिली. सुमित्रा, मिरी, डॉक्टर सर्वामनाच गाढ झोप लागली. परंतु तो पाहुणा कुठे आहे? मिरी जागी झाली तो तिला पाहुणा दिसेना. तिने सर्वत्र पाहिले. ती बंदरावर गेली. तिने चौकशी केली.

'ते पाहुणे गेले. ' कोणी तरी सांगितले.

'कसे गेले?'

' एक होडी जात होती पलीकडे. ते गेले."

'आम्ही उद्या तिकडे जाणार होतो. ते एकटेच कसे गेले?'

मिरी धर्मशाळेत परत आली. सर्व मंडळी उठली. पाहुण्यांचे अकस्मात जाणे पाहून, सर्वामिना आश्चर्य वाटले. सायंकाळी तीरावर तिघेजण हिंडली. नारळाचे पाणी प्यायली कोवळे खोबरे मिरीने खाल्ले. इतक्यात मिरीला रंगाच्या पेटीची आठवण झाली. तिने ती आणली. एका खडकावर जाऊन ती बसली. समोरचे निसर्गदृश्य ती चितारीत बसली. परंतु आकाशात इतके रमणीय रंग पसरले की कुंचले तिच्या हातातच राहिले. ती बघतच राहिली. समुद्राच्या पाण्यावर त्या रंगाचे प्रतिबिंब पडले होते. सौंदर्यदेवता जणू लाटांवर नाचत होती. आकाशात विहरत होती. रात्री खलाशांची सागरगीते ऐकण्यात मंडळी रंगली. डॉक्टरांनी

खलाशांना बक्षिसी दिली व ते म्हणाले, 'ताडी मात्र नका पिऊ' 'ताडी प्यायल्याने तर गाण्यांना रंग चढतो.' एक म्हणाला.

'ताडीशिवाय गाण्यांना चव नाही.' दुसरा म्हणाला.

'तुम्ही ताडी पीत नाही. म्हगून असे हवा खायला तुम्हांला यावे लागते.'

तिसरा म्हणाला.

ते खलाशी गेले आणि प्रवासी मंडळी झोपली.

सकाळी एका नावेत बसून ती पलीकडे गेली. तेथून त्यांना चार कोसांवर जायचे होते. बैलगाडी करून ती गेली.

'मिरे, आपण जात आहोत. परंतु तेथे जागा मिळेल की नाही? बंगले

भरलेले असतात.'

'बंगला न मिळाला तर हिरव्या बंगल्यात राहू.' मिरी म्हणाली.

'हिरवा बंगला कोठला ? डॉक्टरांनी विचारले. '

'हिरवी हिरवी झाडे. '

‘झाडाखाली पडावे, दगड उशाला घ्यावा.' गाडीवान म्हणाला.

गाडी हळहळे जात होती. सुंदर पाखरे दिसत होती. रस्त्याने दाट छाया होती. या बाजूची झाडे त्या बाजूच्या झाडांना मिठ्या मारीत होती.

शेवटी एकदाची गाडी गावात आली. लहानसा गाव. परंतु तेथे बंगले बरेच होते. सुखी लोक मधून मधून हवेसाठी तेथे येऊन राहात. डॉक्टर बंगल्याची चौकशी करू लागले. इतक्यात एक भय्या धावत आला. 'मिराबेन कौन है? आपका नाम है क्या?" है

'हां भय्या. क्यों?"

'आपके लिए तो बंगला रख्खा है। एक भला आदमी कल यहाँ आया

था। उन्होंने लेकर रख्खा है। किराया भी उन्होंने दिया हैं ।' त्या पाहुण्याने केलेली ही सोय पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

'वो आदमी कहा है भय्या?"

'वो चला गया । आप लोगोंको यहाँसे जहाँ जाना है वहाँ वो गया है। वहाँ भी सुविधा कर रखेगा वो भला आदमी!'

त्या गावात ही मंडळी जवळजवळ आठवडाभर राहिली. आसपास हिंडली. तेथील हवा फारच आरोग्यदायी होती. एक प्रकारचा उत्साह तेथे वाटे. सुमित्राची प्रकृती सुधारली. तोंडावर थोडा तजेला आला.

'आपण आता परत जाऊ.' सुमित्रा म्हणाली.

'एक सुंदर जागा अद्याप बघायची राहिली आहे. तेथे जाऊन मग परत फिरू.' डॉक्टर म्हणाले.

'तेथून बोटही मिळेल.' मिरी म्हणाली.

'हो. ते मोठे गाव आहे. सुंदर वने-उपवने तेथे आहेत. रेल्वेचाही रस्ता तेथे

मिळाला आहे. मोटारींची सारखी ये- जा तेथे चालू असते.'

'गर्दी असेल तर कशाला तेथे जायचे?' सुमित्राने विचारले.

'आपण गर्दी पासून दूर राहू.' मिरी म्हणाली.

आणि त्या पृथ्वीवरच्या नंदनवनात ती तिघे आली. एका शांत अशा ठिकाणी ती उतरली. समोरच समुद्र होता. गंभीर समुद्र. सुमित्रा शांत पडून होती. डॉक्टर बाहेर गेले होते. सायंकाळी मिरी एकटीच बाहेर पडली. ती हिंडत हिंत रेल्वेच्या बाजूला गेली. रेल्वेचे फाटक ओलांडून ती पलीकडे गेली. तो ती एकाएकी थबकली. जणू विजेचा धक्काच बसला असे तिला झाले! ती तेथे खिळल्यासारखी झाली. ती एका दिशेकडे सारखी पाहत होती. कोणी तरी दोन माणसे एका झाडाखाली उभी होती. एक तरुण होता नि एक तरूणी. मिरीकड त्या दोघांचे लक्ष नव्हते. परंतु मिरी सारखी तिकडे बघत होती. तिचे सारे भान गेले. जणू शुद्ध गेली. ती पाहा तिकडून एक मोटर येत आहे. मिरीला भान नाही. तो तिला एकदम कोणी तरी बाजूला ओढले.

'मिरे !'

'कोणी ओढले मला?"

'मी'

'तुम्हीं इतके दिवस कोठे होतात? आम्हांला सोडून एकदम गेलात!'

'पुढच्या मुक्कामावर तुमची व्यवस्था करण्यासाठी. मिरे, तू काय बघत

होतीस?'

'काही नाही. '

'तू त्या दोन माणसांकडे पाहात होतीस, खरे ना? माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. कोण होती ती दोघे? तुझ्या ओळखीची होती? गाडीत बसून ती दोघे गेली.

'जाऊ देत. '

'माझा हात धर. तू थरथरत आहेस. मिरे काय झाले? तुझी श्रद्धा कोठे गेली ? धीर धर. चल.' 'मी एकटी घरी जाईन.'

'तुला पोहोचवून मग मी जाईन. माझ्याविषयी तुला सहानुभूती वाटते ना? येऊ दे तुझ्याबरोबरय तुला दुःखाचा, निराशेचा वारा न लागो. चल बाळ.'

त्या पाहुण्याने मिरीला पोहोचविले नि तो गेला. त्या रात्री मिरीला झोप आली नाही. अंथरूणात ती रडली. ती मध्येच उठून बाहेर येऊन बसली. वारा वाहत होता. समुद्राला भरती येत होती आणि मिरी दुःखगंभीर होऊन तेथे निराधारप्रमाणे बसली होती.

दुसरा दिवस उजाडला. मिरी उजाडताच तेथील सुंदर उपवनाकडे फिरत गेली. ती एका शीतल वृक्षाखाली बसली. समोर सर्वत्र हिरवळ होती. मधून फुलांचे मनोहर ताटवे होते. कोठे कारंजी उडत होती, सूर्यकिरण त्यांच्यावर पडून नाना रंग दिसत होते. परंतु इतक्यात मिरीच्या जवळच एका झाडाखाली ती दोन माणसे येऊन बसली. मिरी हळूच उठली. झाडाआड उभी राहिली. परंतु असे चोरून ऐकणे बरे नाही असे तिला वाटले.

'लवकर ये उशीर नको. एकेक क्षण तुझ्याशिवाय कंठणे...' तो तरूण बोलत होता. मिरीला पुढचे ऐकवेना. ती गोरीमोरी झाली. इतक्यात तो पाहुणा तेथे हजर.

'मिरे चल. घर माझा हात. 'तुम्ही नेमके येथे कसे?'

'तू दुःखी आहेस. तुला सुखी करीन तेव्हाच मी सुखी होईन. तुझी श्रद्धा अभंग ठेव, चल बाळ, माझे ऐक. '

त्याने तिला घरी पोहोचविले नि निघून गेला.

दिवस कसातरी गेला. मिरी आज हसली नाही. गाणे गुणगुणली नाही. दोन घास खाऊनच ती अंथरुणावर जाऊन पडली. रोडच्या प्रमाणे ती सुमित्राताईंजवळ येऊन बसली नाहीं. त्यांना तिने काही वाचून दाखविले नाही. सुमित्राताईंनाही झोप येईना. मिरीला बरेबिरे नाही काय, असे त्यांच्या मनात आले. तिला कृपाकाका, यशोदाआई, मुरारी यांच्या आठवणी तर नाही ना आल्या? आपण सुखाने हवापालट करीत फिरत आहोत. परंतु यशोदाआईंना कधी कुठे जाता आले नाही. कृपाकाका मरेपर्यंत शिडी घेऊन जातच होते. मिरी त्यामुळे का दुःखी आहे? सुमित्राताई तर्क करीत होत्या.

तिकडे मिरी अंथरुणात रडत होती. ती आता बसून राहिली. तिला मोठाच हुंदका आला.

'मिरे,' सुमित्राताईंनी जवळ येऊन विचारले.

'सर्वनाश झाला तुमच्या मिरीचा' त्यांच्या गळ्यात मिठी मारून मिरी रडत म्हणाली. तिचे अश्रू आवरताना जणू बंधारा फुटला. काही वेळ सुमित्राताई बोलल्या नाहीत. नंतर प्रेमाने, वात्सल्याने म्हणाल्या, 'उगी बेटा. रडू नको, पूस डोळे. काय झाले सांग. मुरारी खुशाल आहे ना? त्याचे काही बरेवाईट कळले? त्याचे का पत्र आले, निरोप आला? कोणी व्यापारी का तिकडचा भेटला ? की काही कुणकुण ऐकलीस? सांग.' 'मुरारीला मी इथे पाहिले. '

'इथे ?'

'हो येथत्या नंदनवनात पाहिले. आज पाहिले. काल पाहिले. त्या सुंदर तरूणीबरोबर तो प्रेमाने बोलत होता. तुझ्याशिवाय क्षणही करमणार नाही असे म्हणत होता. पुढे मी चोरून ऐकत उभी राहिले नाही. मी निघून आले. सारे शून्य वाटले. त्या व्यापाप्याने मुरारीला पाठवले होते, त्याचीच ती मुलगी. ज्या मोठ्या बंगल्यात राहणारी. जरीची पातळे नेसणारी. मी तिला पूर्वी पाहिले होते. मुरारीचे अलिकडे कितीतरी दिवसांत म्हणूनच पत्र नाही. या दरिद्री मिरीला काय म्हणून त्याने पत्र पाठवावे? तो कशाला माझ्याशी लग्र करील ? मी अनाथ आहे. माझे जगात कोण आहे? बेवारशी मी मुलगी. आईबापांचा पत्ता नाही. बहीण ना भाऊ. पोरकी अनाथ अशी मी पोर. सुमित्राताई, तुमची मिरी दुदैवी आहे. कपाळकरंटी आहे. या समोरच्या अथांग सागरात मला उडी घेऊ दे. संपवू दे हा जीवन. ज्याच्या आशेवर कित्येक दिवस राहिले, त्यानेही दूर लोटले. गेली पाच-सहा वर्षे त्याचे मी नित्य स्मरण करीत असे. त्याच्यासाठी मी प्रार्थना करीत असते. त्याच्या नावाने पाण्याचा घोट पिते. घास घेते. अरेरे! असे कसे हे जग ! सुमित्राताई, आता कशी जगू? कशासाठी 'जगू?'

मिरी रडू लागली. थोड्या वेळाने सुमित्राताई म्हणाल्या.

'मिरे, जशी मी जगत आले तशी तूही जग.'

'तुम्हांला या वेदना नाहीत म्हणून तुम्ही जगत आहात. या असह्य वेदना असतात. हृदय जाळणाप्या वेदना! पाच वर्षे त्याची मनात मी प्रेमपूजा करीत होते. त्याच्या आधीही त्याच्याविषयीचे प्रेम मनात वाढत होते. जणू त्यांची होऊनच मी राहिले होते. त्याची होऊनच त्याच्या आजोबांची, त्याच्या आईची सेवा केली. सुमित्राताई, जीवनाचे मूळच तुटले असे वाटते तुम्हांला माझ्या दुःखाची तीव्रता कशी कळणार!"

'मिरे, मागे एकदा मी तुला म्हटले होते की, प्रेमाच्या दिव्यातून मीही गेले आहे. आठवतात ते माझे शब्द? आज ऐक. या आंधळीची करूण कहाणी ऐक. पाच वर्षेच काय, आज पंचवीस वर्षे या हृदयात त्या प्रेमाग्रीच्या वेदना मी अनुभवीत आहे. अश्रूंनी माझ्या प्रेमदेवता मी आज दोन तपांहून अधिक काळ एकांतात हृदयात पूजा करीत आहे. आतल्या डोळ्यांनी त्याला मी बघते. अंतरंगात त्याला मी ओवाळते आणि त्याची माझी भेट नाही, इतक्या वर्षात भेट नाही, चिठीचपाटी नाही. निरोप नाही. काही नाही. मी तुम्हांला शांत समाधानी दिसते. माझ्या तोंडावर मंद हास्य खेळत असते. परंतु आनंद, समाधान, हास्य यांची माझ्या तोंडावर फुलणारी फुले हृदयातील अनंत अश्रूंतूनच उगवत असतात. मिरे, स्वतःचे व्यक्तीगत दुःख मी स्वतःजवळच आत ठेवते आणि देवाच्या या दुनियेतसाठी आनंदी, समाधानी राहते. मी माझ्यातच गुरफटून गेले नाही. केवळ आत्मलक्षी, स्वतःपुरते पाहणारी मी झाले नाही. परंतु म्हणून का मला दुःख नाही, वेदना नाहीत? सारे आहे. सारे ताजे आहे. मिरे, माझ्या जीवनाची कथाही अत्यंत करूण आहे. माझी आई एक गरीब विधवा होती. तिने बाबांबरोबर जेव्हा लग्र लावले, तेव्हा तिला पहिल्या लग्राचा एक लहान मुलगा होता. त्याचे नाव शांताराम ! आमच्या घरात तो वाढत होता. तो चारपाच वर्षाचा असेल, तेव्हा माझा जन्म झाला. आम्ही दूधभाऊ होतो. दोघांचे बाप निराळे, परंतु आई एक होती आणि मी वाढू लागले. शांताराम नि मी खेळत असू. तो माझा खेळ मांडी. मला पतंग करून देई. माझी बाहुली नीट करून देई. तो मला सुमद्रावर नेई. माझ्यासाठी तो शिंपल्या, कवड्या, गोळा करी. समुद्रच्या लाडांत मला नेई. मी घाबरले तर मला उचलून घेई. अशी आम्ही वाढत होतो.'

शांताराम शाळेत जाई. मोठी झाल्यावर मीही जाऊ लागले. तो इंग्रजी शाळेत जाई. मी मराठी. तो मला पोहोचवून मग आपल्या शाळेत जाई, आम्ही एकमेकांस कधी विसंबत नसू. भांडलो, रूसलो, रागावलो तरी पुन्हा एक होत असू. असे दिवस जात होते.

त्याचे आडनाव निराळे, माझे निराळे. आई एक परंतु घराणी निराळी. माझे बाबा शांतारामावर प्रेम करीत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी त्याला घरात ठेवले होते. आपल्या पत्नीच्या पूर्वसंसाराची ती स्मृती त्यांना डोळ्यांसमोर नको. असे. कोणी जर विचारले की हा कोण ? तर सांगत की, आहे असाच एक अनाथ मुलगा. त्याने फार शिकावे असे त्यांना वाटत नसे. परंतु माझ्या आईच्या आग्रहामुळे त्याला ते शिकवीत होते. शांतारामला कधीकधी ते मारीत. मग मी रडत असे. माझ्या आईला म्हणजेच शांतारामच्याही - यामुळे वाईट वाटे.

'पुढे आमची आई आजारी पडली. ती देवाघरी जाणार असे दिसू लागले. एके दिवशी तिने शांतारामला व मला जवळ बोलावले. पूर्वीच्या पतीची अंगठी तिच्या बोटात होती. तिने ती शांतारामच्या बोटात घातली.

“तुझा पिता थोर होता. त्याच्या स्मृतीस काळिमा लावू नकोस. नीट वाग. कोणाच्या वसूला हात लावू नकोस. स्वाभिमान सोडू नकोस. सत्याची सेवा कर. सुमित्रा, तू नि शांताराम एकमेकांस अंतर देऊ नका, तुझ्या वडिलांचे शांतारामवर प्रेम नाही. परंतु तू त्याला प्रेम देत जा." असे ती माऊली म्हणाली. आमच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ती माऊली देवाघरी गेली. माझी आईं गेली. मी झाले तेव्हापासून ती आजारी होती. तरी बरीच वर्षे वाचली. शांताराम पोरका झाला. मी मातृहीन झाले. घरात एक स्वयंपाकीण बाई ठेवण्यात आली.

‘माझ्या बाबांचे औषधांचे, रासायनिक वस्तूंचे दुकान होते. कृपाराम आमच्या दुकानात कामाला होते. एकदा एक पेटी त्यांच्या अंगावर पडली. मरायचेच, परंतु वाचले. त्यांना शारीरिक शक्तीचे काम पुढे करता येत नसे. बाबांनी त्यांना म्युनिसिपालिटीचे दिवे लावण्याचे काम दिले. कृपारामांवर शांतारामाचे नि माझे होते. ते आम्हांला गोष्टी सांगत.

'शांतारामचे शिक्षण बंद करण्यात आले, बाबांच्या दुकानातच तो काम करू लागला. जणू एखाद्या नोकराप्रमाणे बाबा त्याला वागवू लागले. त्याला वाईट वाटे. तो बुद्धीमान होता. खूप शिकावे असे त्याला वाटे परंतु काय करणार? मिरे, शांतारामवर मी प्रेम करीतच होते. तोही माझ्यावर करी. परंतु बाबांना ते आवडत नसे. आम्ही एकमेकांशी बोललेलेही त्यांना खपत नसे. ते संतापत, चिडत. आम्ही एकत्र बसणे, एकत्र फिरायला जाणे, काहीही त्यांना नको असे. त्यांनी मला तंबी दिली, धमकी दिली. परंतु आम्ही एकमेकांजवळ बोलत्याशिवाय राहात नसू.

'आमचे प्रेम वाढले. बाबांना ते दिसून आले. ते चडफडत. आम्ही दाद देत नसू.' 'सुमित्रा, तू येशील माझ्याबरोबर? आपण येथून दूर जाऊ. आपण अकमेकांची होऊ, सुखाचा संसार करू.'

'शांताराम, पण बाबांना कोण? तेही एकटे आहेत. आपण त्यांची मनधरणी करू. तेच आपले हात एकमेकांच्या हातात देतील. ते तुझे जन्मदाते नसले, तरी माझे आहेत. मुलीचे मनोरथ ते धुळीस मिळवणार नाहीत. 'मला ते अशक्य दिसते.'

'असे आमचे एके दिवशी बोलणे चालले होते. तो बाबा आले.

हातातील काठी त्यांनी उगारली. आम्ही एका टेबलाजवळ बसलेलो होतो. 'हरामखोर, कसल्या गोष्टी करतो आहेस? शंभरदा सांगितले की, तू तिच्याजवळ बोलत जाऊ नकोस म्हणून, तरी लाज नाही तुला? आणि येथे प्रेमचेष्टा करतोस आणि दुकानातले तिकडे पैसे खातोस? पैशाची अफरातफर केलीस का नाही? आज माझ्या दृष्टीत्पत्तीस सारे आले. हे पैसे घेऊन नि माझी मुलगी पळवून जाणार होतास, होय ना? नीघ येथून.'

'मी पैसे खाल्ले? काय म्हणता?'

'होय, तू.'

'शांतारामला राग असह्य झाला. त्याने त्या टेबलावरची एक बाटली बाबांना मारण्यासाठी फेकली: परंतु ती बाबांच्या शेजारी असलेल्या मला लागली नि मी एकदम ओरडले. त्या बाटलीत अॅसिड होते. माझ्या डोळ्यांत ते उडाले. आगडोंब झाला. शांताराम दारातून निघून गेला होता आणि मी आंधळी झाले. बाबांनी पुष्कळ उपचार केले. परंतु डोळे जळून गेले. दृष्टी पुन्हा आली नाही.

'त्या दिवसापासून शांताराम माझ्या दृष्टीस पडला नाही. तो पुन्हा आला नाही. माझे डोळे गेले ते त्याला कळले असेल. आपण काय केले असे मनात येऊन तो परत आला नसेल. जे माझे सुंदर डोळे त्याला आवडायचे, जे माझे डोळे तो लहानपणी झाकायचा, तेच त्याच्या हातून न कळत नाहीसे केले गेले. परंतु त्याचा हेतू थोडाच तसा होता? तो संतापला होता. जवळ होते ते बाबांकडे त्याने भिरकावले. ती बाटली मी आडवायला गेले. तो माझ्या डोळ्यांतच ती उपडी झाली. दोन्ही डोळे गेले. जणू शांताराम पुन्हा दिसायचा नव्हता म्हणून आधीच डोळे निघून गेले.

'काही वर्षे गेली. शांतारामविषयी मला किती प्रेम वाटे हे बाबांना कळून आले. आपल्या त्राग्यामुळे आपल्या मुलीचे असे जन्माचे मातेरे झाले असे मनात येऊन ते रडत. ते माझ्यावर अपार माया-ममता करीत. ते स्वतः मला वाचून दाखवीत. मला आनंद देण्यासाठी धडपडत. त्यांच्यासाठी मी समाधानी दिसू लागले. मी शांत शिकले. मिरे, परंतु आत वेदना आहे. कोठे आहे शांताराम ? अनाथ शांताराम तो मला भेटला नाही. मी त्याच्यावर रागावेन, तिटकारा करेन त्याचा, असे समजून का तो मला सोडून गेला? माझे प्रेम का इतके क्षुद्र होते? हातून नकळत झालेल्या अपघातामुळे मी का त्याला जबाबदार धरले असते? परंतु तो पुन्हा आला नाही. त्याची मूर्ती माझ्यासमोर आहे. मरताना आई जे म्हणाली होती ते आठवते. शांतारामला अंतर देऊ नकोस. परंतु कुठे आहे तो? माझ्या हृदयात आहे परंतु तेवढ्याने का समाधान असते? शांताराम . मी तुझ्यावर नाही रे रागावले, असे त्याला मी कधी म्हणेन ? आज वीस-पंचवीस वर्षे मी त्याचे स्मरण करीत जगत आहे. कदाचित तो मला भेटेल या आशेवर मी जगत आहे. बाबांचे मन माझे कष्ट पाहून कष्टी होऊ नये म्हणून मी शांति-समाधानाने जगत आहे. सर्वांना प्रेम देत आहे. देवाचे राज्य अनुभवीत आहे. मिरे, तुझा मुरारीही कदाचित पुन्हा तुझ्याकडे येईल . काही गैरसमज असतील. या जगात बरेचसे दुःख गैरसमजामुळे निर्माण होते. वाट पहा नि समज असेच झाले की, मुरारी दुसप्या कोणाचा झाला तरीही शांतीने रहा. मुरारीची मानसपुजा करून शांती मिळव आणि आयुष्य जगाची सेवा करण्यात दवड. मी काय सांगू? बाळ, अनुभवाच्या जोरावरच तुला मी हे सांगत आहे. वेदनांतून जाऊनच मी शांत झाले आहे. कुणाला न सांगितलेले हे दुःख आज तुला मी सांगत आहे.'

बोलता बोलता, समित्रेचा आवाज सद्गदित झाला. तिच्या डोळ्यातून अक्षु आले. ती शांतपणे, स्तब्धपणे बसली. मिरीच्या डोक्यावरून हात फिरवीत बसली.

'तुम्ही थोर आहात, सुमित्राताई. शापभ्रष्ट देवता आहात. तुमची शांती मी

कोठून आणू?' 'प्रयत्नाने आणि विवेकाने आण. या विश्वात अनेक दुःखे आहेत. आपले दुःख त्यातीलच एक समज. ते आपले दुःखच उगाळीत बसू नकोस. स्वतःच्या दुःखाला विश्वाएवढे विराट करीत बसण्याचा अहंकार करू नये समजलीस?'

'मी प्रयत्न करीत आहे. तुम्ही आता जाऊन पडा. उद्या येथून निघायचे

आहे. विश्रांती घ्या.'

'तूही चल.'

'मी थोड्या वेळाने जाऊन पडेन. कबूल करते."

सुमित्रा उठून गेली. मिरी तिथेच काही वेळ बसून राहिली. शेवची ती अंथरुणावर जाऊन पडली. रडून रडून तिचे डोळे भरून येतच होते. केंव्हा उजाडले ते मिरीला कळलेच नाही ! डॉक्टरांनी तिला उठविले. ती उठली. आज त्यांना जायचे होते. सारी तयारी झाली. डॉक्टर सुमित्राताई,

मिरी बंदरावर आली तो तेथे पुन्हा ते हृदय विद्ध करणारे दृश्य मिरीच्या दृष्टीस

पडले.

'मिरी, चल, काय बघतेस?' डॉक्टर म्हणाले.

मिरीचा पाय निघेना. मुरारी होता तिथे. त्या तरुणीशी तो बोलत होता.

'मी लवकरच येईन.'

'भेट होईल ना?'

'प्राण घुटमळत आहेत. किती सांगू? लवकर का आला नाहीत? पत्र नाही मिळाले?'

“मिळाले. परंतु तितके गंभीर वाटले नाही. तुम्ही या हां. मी एकटी.' ती तरुणी बोटीत येऊन बसली. मिरी दुःखाने आधीच जाऊन बसली

होती. बोट सुटली. मुरारीने रुमाल फडफडवला.

'मिरे, दुःख कमी झाले का?' सुमित्राने विचारले.

'दुःख वाढतच आहे. हृदय फुटतही नाही. तुम्हांला दुःख होईल म्हणून हे प्राण धरले आहेत.'

‘प्राण फेकू नये. तशी आलीच वेळ तर त्यांची आसक्तीही धरू नये. तू धीर धर. मी काय सांगू?'

'मी अभागीच आहे.

'श्रद्धा ठेव.'

बोटीत तो अपरिचित परंतु थोडा परिचित झालेला पाहुणाही मिरीला दिसला. काय असेल ते असो, त्याला पाहून तिला धीर आला. जणू या कसोटीतून पलीकडे नेण्यासाठी देवाने त्याला पाठविले होते. तो मिरीकडे आला. तेथे बसला.

'मिरे, तुझी मुद्रा आज प्रसन्न नाही.' तो म्हणाला.

'सूर्यचंद्रांवर कधीकधी ढग येतात.' ती म्हणाली.

'ते जातात. तसेच हे ही जावोत, तु मला श्रद्धा शिकवलीस. तू माझे हृदय

हलके केलेस तुझी ती श्रद्धा गमावू नकोस.'

त्याने आपल्या पिशवीतून फळे काढली.

'मिरे ही घे द्राक्षे, ही सुमित्राताईंना दे. डॉक्टर कोठे आहेत? बोटीतही ते रोगी तपाशीत असतील. कमाल आहे त्यांची!' असे ते म्हणत आहेत तोच डॉक्टर आले.

'या डॉक्टर. फलाहार करा.'

'वाः ! त्या मिरीला द्या. काल नीट जेवलीही नाही. खूप खावे, प्यावे

हसावे आनंदाने रहावे.'

'डॉक्टर तुम्ही किती खाता ?' मिरीने विचारले.

'शरीर बघ. पोटभर खाल्याशिवाय असा आहे का धष्टपुष्ट ? हं, खा ती द्राक्षे. सफरचंद फोड !"

फलाहार झाला. तो पाहुणा गेला बोटीत हिंडायला. सुमित्रा जरा पडली.

मिरी समुद्राच्या लाटांकडे बघत होती. दिवस मावळला. आता हळूहळू अंधार पडू लागला. बोटीतले दिवे

लागले. वारा जरा जोरात सुटला होता. बोट हलत होती. 'मिरे, जरा पड़ तुही.' डॉक्टर म्हणाले.

सारी मंडळी झोपली. परंतु एकदोन तासांनी एकाएकी सारी मंडळी जागी झाली. बोटीत हलकल्लोळ माजला. बोटीला आग लागली होती. कप्तानही घाबरला. त्याने किनाप्याकडे बोट वळवली. परंतु शेवटी आग फारच भडकली! आता काय करायचे?

तो अपरिचित मनुष्य मिरीकडे आला. डॉक्टर तेथे संचितपणे उभे होते. 'मिरे, मी तुला घेऊन जातो. मी समुद्रात उतरतो, तू या दोरीला धरून खाली ये. मी तुला धरून तीराला पोहत जाईन.' तो म्हणाला.

'आधी सुमित्राताईंना न्या. मग मी चर्चा नको, त्यांनाच आधी न्या.'

'बरे तर, सुमित्राताईंना घेऊन जातो.' त्याने तयारी केली. 'मिरे, तू तेथेच उभी राहा हं! ही खूण. मी परत येईन. हाका मारीन. तू

निमुटपणे खाली ये. खाली ये. चला सुमित्राताई.' त्याने पाण्यात उडी घेतली. सुमित्राताईंना पाण्यात सोडण्यात आले. त्यांना पकडले. लाटांशी झुंझत आपला अमूल्य ठेवा घेऊन तो जात होता. इतक्यात मिरीजवळ ती तरुणी आक्रोश करीत आली.

'काय करायचे हो? ते वाट बघतीस, अरेरे!' असे ती म्हणत होती. रडत होती. मिरीने क्षणभर तिच्याकडे मत्सराने पाहिले. परंतु क्षणभरच. तिने मनात विचार केला. तिच्यासमोर मुरारी उभा राहिला. 'मुरारीची मर्जी. त्याचे' सुख.' असे ती म्हणाली.

‘ओरडू नका. येथे उभ्या रहा. या ज्वाला लागतील. तोंडावर हा पातळ बुरखा घ्या. आता एक गृहस्थ खाली येतील. ते हाका मारतील. तुम्ही निमूटपणे उतरायचे. समजले ना?"

डॉक्टर पलीकडे उभे होते. 'डॉक्टर काय करणार?"

'तू काय करणार?"

'ते कदाचित आम्हाला वाचवतील.'

'तिसरी खेप अशक्य दिसते. बोट लवकरच कोलमडणार असे दिसते आहे.'

'तुम्ही उडी घ्या. इथे रहाणे धोक्याचे.'

'तू म्हणतेस तसेच करतो. जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. मिरे, प्रभूची इच्छा!' असे म्हणून ते डॉक्टर गेले.

मिरी नि तरूणी दोघी तेथे उभ्या होत्या. तो पहा, तो अपरिचित पाहुणा येत आहे. अंतर कापीत झपाट्याने येत आहे.

'खाली ये लवकर, लवकर.' तो ओरडला.

'उतरा, या दोरीवरून. तोंडावर बुरखा असू दे.' मिरी त्या तरुणीला म्हणाली.

ती तरुणी उतरली. मिरी बघत होती. इतक्यात ती बोट कलंडली. एकच आकांत झाला. थोडया बेळाने सारे शांत झाले, मिरीचे काय झाले? शेवटी ती का देवाघरी गेली? प्रभूला माहीत.

11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा