shabd-logo

8 June 2023

7 पाहिले 7
मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा, कधी होणार तू बरी'

'बाबा, तुम्ही एकटेच युरोपच्या यात्रेला जा. एवढा दूरचा प्रवास माझ्याच्याने झेपणार नाही. आणि खरेच, मी बरी तरी केव्हा होणार? किती तरी दिवसांपासून तुम्हांला कोठे तरी दूरच्या प्रवासाला जाण्याची इच्छा आहे. मागे लंकेकडे जाणार होतो. तेही जमले नाही आता युरोपात जायचे आपण ठरवीत आहोत. परंतु अजून मला नीट शक्ती येत नाही. तुम्ही या ना जाऊन. मला बरे वाटल्यावर इकडेच कुठे तरी जवळपास जाऊन येऊ. घारापुरीची

लेणी पाहू; जुहूला जाऊ. परंतु तुम्ही या युरोपाला जाऊन.' 'मिरे, खरेच जाऊ का? तू सुमित्राचे सारे नीट करशील? सुमित्रा म्हणजे माझा प्राण आहे.'

एके दिवशी कृष्णचंद्र युरोपच्या प्रवासाला निघाले. प्रथम ते कोलंबोस जाऊन लंकेतील निसर्गसौंदर्य पाहून मग तेथून युरोपची बोट घेणार होते. गडीमाणसांना कामे वगैरे सांगून ते गेले. घरात आता सुमित्रा, मिरी नि आजीबाई. सुखासमाधानात वेळ जात होता. मिरी मुरारीच्या पत्राची वाट पहात होती. आजोबा, आई यांच्या शोककारक निधनाचे पत्र तिने पाठविले होते. परंतु मुरारीचे उत्तर येईना. तो रागावला असेल का, निराश होईल का? अनेक विचार मिरीच्या मनात येत. मायेचे आता इकडे कोणी उरलेले नाही म्हणून तो येणारही नाही कदाचित, अशी शंका क्षणभर तिच्या मनात डोकावे. परंतु मी नाही का मायेची, असे मनात येऊन ती स्वतःला धीर देई. वाट पाहता पाहता एके दिवशी मुरारीचे पत्र आले. फार सुंदर होते ते पत्र.

'प्रियतम मिरा,

हृदय विदीर्ण करणारे तुझे पत्र मिळाले. ज्या गोष्टीला मी भीत होतो ती गोष्ट शेवटी झाली. मी आईला सुखी करीन ही माझी लहानपणापासूनची इच्छा धुळीस मिळाली. आजोबा मुरारी, मुरारी हाक मारीत समुद्रावर बसत. आजोबांचे इतके प्रेम माझ्यावर असेल असे मला वाटत नव्हते. त्यांचे अप्रकट प्रेम त्यांना आतून पोखरी; विद्ध करी, तुला ते पूर्वी नावे ठेवीत. परंतु शेवटी तुझेच फक्त ते ऐकत. माझ्या नावाचा त्यांना तू घास देत होतीस. मिरे, शेवटी त्या दोघांची सेवा तुझ्या हातून व्हावयाची होती. तुझ्या हातांना ते पुण्य लाभावयाचे होते. कृपाकाकांनी तुला आणले ते का आम्हा सर्वांना तुझा आधार मिळावा म्हणून? त्या काळी तू निराधार म्हणून आलीस. आज तू आधारदेवता झाली आहेस. आजोबा गेले आणि लगेच आई गेली. प्रेममूर्ती आई, माझ्यासाठी सदैव राबली आणि शेवटी झिजून झिजून निघून गेली.

मिरे, मी त्यांच्याजवळ नव्हतो; परंतु तू होतीस. तू त्यांना कमी पडू दिले नाहीस. माझ्या हातूनही अशी सेवा घडली नसती. सेवा स्त्रियांनीच करावी. तुझ्या स्वाधीन त्या दोघांना करून मी इकडे निघून आलो. तू कर्तव्य पार पाडलेस. कृष्णचंद्रांचे शिव्याशाप सहन करूनही तू निघून आलीस. नोकरी घरलीस. शाब्बास तुझी.

मिरे, पूर्वीपासून मी तुझ्यावर प्रेम करीत आहे. परंतु या पृथ्वीवरील भौतिक बंधनांपेक्षाही, मर्त्य बंधनापेक्षाही स्वर्गीय अशा अमर बंधनांनी आपण आज एकत्र आलो आहोत. अतः पर माझ्या आशा, माझे उद्योग, माझे मनोरथ, माझ्या प्रार्थना, सारे तुझ्यासाठी असेल. डॉक्टरांनी आईची शेवटची इच्छा लिहून पाठवली. तुझ्या पत्राला ती जोडलेली होती. आईन आजोबांनी, परमेश्वराने तुला नि मला एकत्र जोडले आहे. ही बंधने स्वर्गीय प्रेमाची बंधने आता कोण तोडील? जन्मोजन्मी आपण एकमेकांचे राहू.

आपण लवकर भेटू. दीड वर्ष झपाट्याने जाईल. पिंजन्यातला राजा आहे ना? माझी आठवण येईल तेव्हा त्याच्याजवळ जात जा. मिरे, तू कृतार्थं आहेस. सर्वांची सेवा करून पवित्र पावन झालेले तुझे हात मी माझ्या हातात केव्हा बरे घेईन? लवकरच. खरे ना?

सुमित्राताईना सप्रेम भक्तिमय प्रणाम. प्रिय डॉक्टरांचे उपकार कसे फेडायचे ? त्यांना सादर प्रणाम.

तुझाच
मुरारी


अशा अर्थाचे ते पत्र होते. सुमित्राताईंना सद्गदित कंठाने मिरीने ते वाचून दाखविले.

'गोड पत्र. '

'परंतु अधिक लांब का नाही लिहिले?"

‘मिरे, पुरूषांना पाल्हाळ येत नाही आणि मुरारी जरा संयमीच आहे. थोडी

तो गोडी. एका रामनामात जी गोडी आहे, ती संबंध रामायणातही नसेल. '

मिरी दिवस मोजीत होती. परंतु सुमित्राताईंच्चा घरात अकस्मात मोठा बदल झाला.

कृष्णचंद्रांनी मद्रासला एका श्रीमंत विधवेशी पुवर्विवाह केल्याची बातमी आली. प्रथम त्या बातमीवर सुमित्राताईंचा विश्वासच बसेना. परंतु एके दिवशी पित्याचेच पत्र आले.

'प्रिय सुमित्रास आशीर्वाद.

युरोपची यात्रा रद्द करून पुन्हा नवी संसारयात्रा मी आरंभिली आहे. तुझ्या पित्याने पुनर्विवाह केला आहे. तुमच्या या नवीन आईला बरोबर घेऊन मी लवकरच घरी येईन. तू आश्चर्य मानू नकोस. म्हातारपणी मी पुन्हा विवाह केला म्हणून नावे ठेवू नकोस. माझा दुबळेपणा मानून माझी कवि कर. मिरीस आशीर्वाद. आजीबाईस नमस्कार.

तुझे
बाबा

कृष्णचंद्रांचे वय जवळजवळ साठ वर्षांचे होत आले होते. सुमित्राची आई वारल्यापासून ते आज इतकी वर्षे अविवाहित राहिले. सुमित्राचेच वय आता जवळजवळ पस्तीस-छत्तीस वर्षांचे होते. इतकी वर्षे अविवाहित राहून, विधुरावस्थेत राहून आता उतार वयात त्यांनी एकाएकी का बरे हा पुनर्विवाह केला? का त्यांची ही एक लहर होती? का त्या विधवा स्त्रीला नि यांना दोघांनाही उतार वयात कोणाचा आधार हवा होता? सुमित्रा आजारी असे, ती गेली तर आपणांस कोणीच नाही. असे का त्या वृद्धाच्या मनात आले? काही असो. तर्क करण्यात अर्थ नाहीं. कृष्णचंद्रांचा हा पुनर्विवाह म्हणजे सर्वांना एक आश्चर्याचा विषय झाला होता.

गडीमाणसे शहरातील घराची झाडलोट करीत होती. सुमित्राताई, मिरी, आजीबाई सारी खेड्यातून आपल्या घरी राहायला येणार होती. तयारी झाली. एके दिवशी सारी मंडळी पुन्हा शहरात आली. घराची, बागेची साफसफाई झाली. घराला नवीन रंग देण्यात आला. आपल्या यजमानांची नि नव्या यजमानिणीची ते सुसज्ज घर वाट बघत होते.

एके दिवशी कृष्णचंद्र आले. त्यांची नवपत्नीही आली. मिरी सामोरी गेली. गडीमाणसे धावली. किती तरी सामान होते. ट्रंका, चामड्याच्या पेट्या, गाद्या, . करंड्या! किती सामान!

‘ही मिरी बरे का ?' कृष्णचंद्रंना मिरीची ओळख करून दिली. परंतु नवपत्नीने तिरस्कारसूचक हास्य केले. ती एक शब्दही बोलली नाही. ती इकडेतिकडे बघत घरात शिरली. तिथल्या एका आरामखुर्चीत ती बसली.

'चहा सांगा आधी.' ती म्हणाली.

'मिरे चहा कर जा. आजीबाईंना चांगला नाहीं करता येणार तू कर जा.'

मिरी गोली, तिने चहाचे आधण ठेवल्. कृष्णचंद्रांनी सुमित्राला हात

धरून खाली आणले.

'ही माझी आंधळी सुमित्रा माझा प्राण.' ते म्हणाले. सुमित्राने हात

जोडून जरा. वाकून प्रणाम केला. 'मुळीच नाही दिसत वाटते?' नवीन आईने विचारले.

'मुळीच नाही.' पिता म्हणाला.

'परावलंबी जिणे सारे दुसप्याला करायला हवे. आज फारच उकडते आहे. नाही ? अद्याप तुमच्या शहरात वीज नाही वाटते? मागासलेलेच दिसते गाव. पंखा तरी द्या एखादा. हुश्श्य! नकोसा जीव होत आहे.'

'मिरे, अग मिरे!'

'काय बाबा ?"

'पंखा दे बरे बेटा आणून.'

मिरीने पंखा आणुन दिला. कृष्णचंद्र नव्या राणीला वारा घालू लागले. 'जरा जोराने तरी घाला. मी काही नाजूक राणी नाही: उडून नाही जाणार.

द्या इकडे पंखा. तुम्हांला वारासुध्दा घालता येत नाही.'

'शिकवायला कोणी नव्हते गेली वीस वर्षे, तुम्ही आता शिकवा. ' मिरीने चहा आणला नि दोघांपुढे ठेवला.

"यांना दे की.

'मी चहा घेत नाही.' सुमित्रा म्हणली.

'व्रत आहे वाटते?'

'तिचे सारे जीवनच व्रतमय आहे. ' वडील म्हणाले.

'चहा झक्क झाला आहे. तूच करीत जा. त्या म्हारबाईला असा करता नाही येणार. समजले ना? माझे काम करीत जा. का या सुमित्राताईंचे फक्त करणार?' 'ती सर्वांचेच करते.'
'मिरे, मला वर पोचव' सुमित्रा म्हणाली.

मिरीने हात धरून तिला खोलीत नेले. नवीन आईचे बोलणे ऐकून सुमित्रा असमाधानी दिसली, दुःखीकष्टी दिसली. आजपर्यंतचे तिचे शांतपणे जाणारे जीवन अशांत होणार की काय?

घरात नवीन कारभार सुरू झाला. नव्या राणीसरकरांची नवी राजवट सुरू

झाली आजीबाईंना आजपर्यंत कोणी बोलले नव्हते. परंतु नवी राणी येता- जाता त्या आजीबाईचा अपमान करी. 'एक भाजी नीट करता येईल तर शप्पथ. इतकी वर्षे चुलीजवळ काढली तरी कशी? आणि यांनी खाले तरी काय? ही चटणी आहे का भरडा ? जरा

अधिक नको का वाटायला?'

'सुमित्राच्या वडिलांना जरा जाडजाडच आवडते.' आजीबाई म्हणाली.

'त्यांना जसे वाढता तसे ते खातात. त्यांना तशी जाडी चटणी आवडत असली तरी मला नाही आवडत. समजले ना? नीट मनापासून करीत जा स्वयंपाक. येथे लाड नाही आता चालायचे. नाही तर दुसरी ठेवू बाई. बायांना काय तोटा ! तुम्हांला नवीन नवीन पदार्थ माहीत तरी आहेत का? मी इकडची असले तरी मद्रासकडे गेला माझा जन्म. इडली वगैरे काही येते का ? पाकशास्त्राच्या पुस्तकात वाचा.'

'आता आधी वाचायला शिकवा.'

‘मी शिकवू वाचायला? नाचायलाही शिकवू का?'

‘फाजिलपणे बोलू नकोस. नवी राणी आसलीस तरी या घरात वीस वर्षे मी काढली आहेत. खबरदार वेडेवाकडे बोलशील तर !' ती नवी राणी गारच झाली. आजीबाई संतप्त होऊन निघून गेली.

घरात आता रोज उठून कटकटी असत. मिरी सर्वांना शांत करी, परंतु तिलाही शिव्याशाप मिळत. कृष्णचंद्र महिन्यातच कंटाळले. ते कामानिमित्त कोठे बाहेरगावी निघून गेले. मग तर काय, नव्या राणीसाहेबांनी रान मोकळे सापडले!

एके दिवशी राणीसाहेबांनी मिरीला हाक मारली.

'काय नव्या आई?'

'तुझी खोली उद्या रिकामी कर.'

'कोठे नेऊ माझे सामान ?'

'चुलीत ने. म्हणे कोठे नेऊ सामान ! स्वतंत्र खोली करायची काय ग

तुला ? सुमित्राबाईंच्या खोलीत राहायला जा. तेथे ने सामानं. माझ्या दोन मामेबहीणी नि एक चुलतबहीण अशा तिघी यायच्या आहेत. समजलीस?'

'जसा हूकूम . '

असे म्हणून मिरी गेली तिने सुमित्राबाईंच्चा कानांवर सारी वार्ता घातली. 'तुमच्या खोलीत अडचण होईल.' ती म्हणाली.

'मिरे, अग, गरीब माणसे एका झोपडीत राहतात. एका खोलीत दहा दहा राहतात. अडचण नाही होत. तुझी मला कधी अडचण का होईल ? सारे सामानही आण. कृपाकाकांची आरामखुर्ची, त्यांचा तो कंदील, आजोबांची काठी, सारे आण. संकोच नको करूस. प्रेमळ वसतिंचा संग्रह माझ्या खेलीत होऊन ही खोली कृतार्थ होईल, पावन होईल. जा, घेऊन ये सामान. तुझी खाट आण. मोलकरीण मदतीस घे. सुंदरला हाक मार.'

मिरीने सुंदरला हाक मारली.

'कशाला हवी सुंदरा ? ते सामान का तुला नेववत नाही?'

'खाट नको का घरायला ?'

"बर बाई, सुंदरा जा, आधी तिचे सामान लाव.' सुंदराने मिरीचे सामान सुमित्राताईंच्या खोलीत नेले. दोघींनी ते नीट

लावले. सुंदरा निघून गेली.

आणि राणीसाहेबांच्या त्या लांबच्या जवळच्या बहिणी आल्या. एकीच नाव प्रेमा, एकीचे मडी, एकीचे लडी. मडी नि लडी या सख्ख्या बहिणी. राणीसरकारच्या त्या मामेबहिणी प्रमा दूरची चुलत बहीण. राणीसरकारच्या राज्यातील सुख चाखायला त्या आल्या होत्या तिघा अविवाहीत होत्या, उपवर होत्या. त्या शिकत होत्या. त्यांना आता सुट्टी होती. श्रीमंत राणीसाहेबांचे आमंत्रण गेले. त्या आल्या. प्रमा जरा निराळ्या वळणाची होता. ती फसवणारा आहे असे तिला कधी वाटले नसावे. सर्वांवर विश्वास टाकणारे तिचे डोळे होते. तिचे सारे जीवन जणू त्या डोळ्यांत होते. ती मंद हसे. खो खो हसणे तिला माहित नव्हते. तिचा पोशाखही भडक नव्हता. परंतु मडी नि लडी यांचा निराळाच अवतार होता. त्यांची किती पातळे, किती पोलकी! दिवसातून चारदा पातळे बदलीत. केशभूषा करण्यात तासन्तास दवडीत. मडी गोरी होती. लहानपणी तिचे आईबाप तिला प्रेमाने मडुम म्हणत. ह्या मडुम शब्दाचा अपभ्रंश होऊन शेवटी मडी हेच तिचे नाव रूढ झाले आणि तिची बहीण लडी लाडावलेली म्हणून ती लडी या नावाने विख्यात झाली.

या तीन बहिणी त्या बंगल्यात आल्या. त्याचप्रमाणे एक नवीन तरुण मनुष्यही ओळख काढून त्या बंगल्यात वरच्यावर येऊ लागला. त्या तरूणाचे नाव रमाकांत.

एके दिवशी दिवाणखान्यात मडी, लडी, प्रेमा, राणीसरकार सारी बसली होती. मिरी सुमित्राताईंना काही तरी वाचून दाखवीत होती. इतक्यात ते रमाकांत शीळ घालीत आले. डोक्यास साहेबी टोपी होती. एक लांडा सदरा निलांडी तुमान घालून ते आले होते. हातात रिस्टवॉच होते. बोटात अंगठी होती. तोंडात सुंदर सिगरेट होती. नाकाजवळ थोडी मिशी होती. असे रमाकांत आले.

'या रमाकांत, तुमची आम्ही वाटच पहात होतो. माझ्या वडीलांच्या

फर्ममध्ये तुम्ही बंगलोरला होतात. जवळचेच नाते. किती दिवस राहणार इकडे?' 'माझी लहर आहे. हा सुंदर मुलुख पाहायला आलो. कोणी ओलखीचे

नाही. परंतु आमची ओळख निघाली. कुणकूण कळल्यावर आलो

तुमच्याकडे. करमेनासे झाले की तुमच्याकडे येतो.' 'आपण खेळू या.' लडी म्हणाली.

'पाच जणेच?' मडी म्हणाली.

'तुमची चौथी बहीण कुठे आहे?' रमाकांत म्हणाले.

'ती मिरी ? ती का आमची बहीण? ती एक निराधार मुलगी आहे.

सुमित्राताईंची जणू मोलकरीण.' मडी म्हणाली. 'तिला बोलवा ना?' रमाकांतांनी सांगितले.

'मी बोलावते.' प्रेमा म्हणाली.

प्रेमाने शेवटी मिरीला आणले.

'बसा मिराबेन.' रमाकांत म्हणाला.

'कोण कोण भिडू ? मिरी आमच्याकडे नको.' लडी म्हणाली.

‘मिरी माझ्याकडे.' तो रमाकांत एकदम बोलला. आपण एकदम मिराला एकेरी नावाने संबोधले म्हणून तो जरा चपापला. शरमला.

'माफ करा हां मिराबेन.' तो लज्जारक्त होऊन म्हणाला. शेवटी प्रेमा, मिरी नि रमाकांत एका बाजूला झाली आणि राणीसरकार नि त्या छबेल्या एका बाजूला. खेळ रंगला. मडी, लडी यांच्यावरच सारखी पिसणी राहत

होती.

'मिरीचे नशीब चांगले आहे.' रमाकांत म्हणाला.

'तिचा प्रियकर यायचा आहे. लवकर लग्न व्हायचे आहे.' मडी म्हणाली.

‘आणि प्रेमाचे नशीब ?' लडी म्हणाली.

'तिलाही कोणी तरी मिळेल.' राणीसरकार म्हणास्या.

' पुरे आता खेळ.' मिरी म्हणाली.

'आपण फिरायला जाऊ.' प्रेमा म्हणाली.

'चला' लडी म्हणाली.

‘परंतु बरोबर कोणीतरी हवे. मिरे येतेस?' मडीने विचारले.

'जा गा मिरे त्यांच्याबरोबर. त्या डोंगरावरून सुंदर देखावा दिसतो. जा तिकडे यांना घेऊन.' राणीसरकार म्हणाल्या.

'परंतु वाटेत जरा दलदल आहे. जपून जायला हवे.' मिरी म्हणाली.

'आम्ही जपून जाऊ.' लडी मडी म्हणाल्या. 'मीही तुमच्याबरोबर येतो. चिखलात गाई रूतल्या तर काढायला

गोपाळ हवाच. '

'वा रमाकांत ! कवी दिसता!' लडी म्हणाली. 'म्हणजे वेडे ना?' मडी म्हणाली.

'जगात सारे वेडेच आहेत. प्रत्येकाला कशाचे तरी वेड असते.' रमाकांत म्हणाला.

'आता कवीचा तत्त्वज्ञानी झाला बरे!' प्रेमा म्हणाली.

'परंतु मिराबेन काही बोलत नाहीत!' तो म्हणाला. 'त्या धीरगंभीर असतात.' राणीसरकार तिरस्काराने बोलल्या.

'अकाली धीरगंभीररत्व शोभत नाही. ते हास्यास्पद होते. खरे की नाही मंडळी?'

'एकदम खरे.' मडी, लडी उद्गारल्या. सारी फिरायला गेली. प्रेमा व मिरी दोघींची जोडी झाली. लडी नि मडी दोघींची जोडी जोराने आघाडीला चालली. रमाकांताला कोणाबरोबर जावे समजेना. तो मध्येच लोंबकळत होता. क्षणभर या जोडीबरोबर चाले, क्षणभर भराभरा जाऊन पुढील जोडीशी बोलू लागे. परंतु त्याचे डोळे मिरीकडे असत. मिरी त्याची दृष्टी चुकवीत असे.

आता ती दलदल जवळ आली.

'थांबा, मी येते.' मिरीने ओरडून सांगितले.

'चला, आपण जाऊ. आपल्याला का डोळे नाहीत?' लडी म्हणाली.

आणि लडी, मडी, रमाकांत चालली पुढे. तो रमाकांत एकदम चिखलात फसला. लडी नि मडी थोडक्यात वाचल्या. परंतु त्यांच्या अंगावर चिखल

उडालाच आता रमाकांताला बाहेर कसे काढायचे?

'मला ओढून घ्या.' तो काकुळतीस येऊन म्हणाला. 'गायींचा उद्धार करणारे तुम्ही गोपाळ ना?' लडी म्हणाली.

परंतु मिरीने युक्ती केली. पलीकडे एक झाड होते. त्या झाडाचा एक फोक तिने प्रेमाच्या सहाय्याने ओढून आणला. तिने त्याचे एक टोक रमाकांताकडे फेकले. दुसरे टोक चौघींनी ओढून धरले, नि रमाकांत धीरेधीरे

खेचला गेला.

'अंधार पडल्यावर आता घरी जाऊ.' रमाकांत म्हणाला.

'तुम्ही या मागून. आम्ही जातो घरी. सृष्टीसौंदर्य पाहिले तेवढे पुरे.' असे

लडी निमडी म्हणाल्या. 'प्रेमा तू येतेस डोंगरावर ?' मिरीने विचारले.

'चल, एवढी आल्यासरशी जाऊन येऊ.' ती म्हणाली

मडी निलडी घरी गेल्या. रमाकांत तेथेच झाडाखाली बसला. मिरी नि प्रेमा डोंगरावर गेल्या. समोर अनंत समुद्र दिसत होता. फारच रमणीय देखावा.

दोघीजणी पहात होत्या तेथे आणखी कोणी नव्हते.

'चल मिरा परत फिरू.' प्रेमा म्हणाली.

'चल जाऊ.' ती म्हणाली

दोघी निघास्या. वाटेत रमाकांत भेटला.

'तुम्ही अद्याप येथेच ?' प्रेमाने विचारले.

'तुमची मी वाट पहात होतो. मी का कृतघ्न आहे? या मिराबेनने तारले.

या उपकाराची फेड कशी करू?'

'नीट वागून, नीट बोलून. 'मिरी म्हणाली.

'तुम्ही शिकवा. '

'तुमचा विवेक तुम्हांला शिकवील.'

'तुम्ही चारी जणींत ही प्रेमाच प्रेमळ आहे.'

'प्रेमा भोळी आहे.'

'भोळी माणसे चांगली. '

'कारण ती जाळ्यात अडकतात; होय ना?'

मिरी व रमाकांतचे बोलणे प्रेमा ऐकत होती. ती काहीच बोलत नव्हती. बंगला आला. रमाकांत निघून गेला.

'मिरे, यांना शेवटी चिखलात पाडलेस ना? रस्ता दाखवायला गेलीस नि स्वतः मागे राहिलीस.' राणीसरकार रागाने ओरडल्या.

'मी त्यांना थांबा थांबा म्हणून सांगत होते.' मिरी म्हणाली.

'परंतु त्यांच्याबरोबर जायला पाय मोडले वाटते? तुला त्यांची फजिती करावयाची होती. तुला त्यांचा हेवा वाटतो. त्या शिकलेल्या, सुंदर म्हणून त्यांचा मत्सर करतेस. होय ना? सुमित्राताईजवळ हेच शिकलीस वाटते? त्या आंधळीला तरी आमचे सुख कोठे बघवते ? जगात जिकडेतिकडे द्वेष नि मत्सर वरून सारी गोंडस सोंगेढोंगे. मने काळीकुट्ट मेल्यांची.'

मिरी निमूटपणे निघून गेली आणि सुमित्राताईजवळ बसली. 'सुमित्राताई, तुमच्या कानावर आले का ते शब्द ?'

'आले नि गेले. जे शब्द हृदयात साठवून ठेवण्याच्या योग्यतेचे असतात त्यांनाच मी आतपर्यंत येऊ देते. बाकीच्यांना बाहेरच्या बाहेर रजा देते. तूही असेच कर. नवीन शाळा देवाने आपल्यासाठी आपल्या या घरी उघडली आहे. भरपूर शिकून घे बेटा.'

दुसप्या दिवशी रमाकांत आला तो एकदम वरती आला. मिरी गॅलरीत

उभी होती. 'मिराबेन, आजचे माझे कपडे बघा तरी किती स्वच्छ नि सुंदर आहेत!' तो म्हणाला.

'या कपड्यांप्रमाणेच तुम्हीही स्वच्छ, निर्मळ, निरपराधी असतेत तर ? मला भाऊ नाही. एक भाऊ मिळाला. असे वाटले असते.' ती म्हणाली.

'मी तुम्हाला फूल आणले आहे. कालच्या उपकाराची फेड. हे ध्या.' 'मला नको. त्या फुलापाठीमागे अमंगल वृत्ती आहे.'

'कोणावर प्रेम करणे का अमंगल ?'

'तुम्ही माझ्या वाटेस जात जाऊ नका. लाळगोटेपणा करीत जाऊ नका तुम्ही खाली जा. तेथे खेळा, हसा, विनोद करा.'

'ठीक. तुम्हाला प्रेमाची किंमत नाही असे दिसते. प्रेमाच प्रेमार्ह आहे. तिलाच मी हे देईन. मी तिच्यासाठी आणले होते, परंतु तुमची गंमत केली. तुमच्यावर प्रेम करण्याइतका मी पागल नाही, मूख नाही. रसिकालाच रसाची 'चव' असे म्हणून तो खाली गेला.

'अय्या, रमाकांत ? आज लौकरसे!' लडीने विचारले.

'प्रेमा कोठे आहे? तिला हे फूल आणले आहे. प्रेमळ आहे ती मुलगी. मला ओढून घेण्यासाठी तिने सारी शक्ती लावली. तिचे हात रक्तबंबाळ झाले.'

'मग तेथे आयोडिन लावायला आणायचे तर हे फूल कशाला?' मडीने म्हटले.

'अग, त्या फुलात सारी रसायने आहेत.' लडी म्हणाली.

'प्रेमा तिकडे परीक्षेत नापास झाली. परंतु तुमच्या परीक्षेत पास झालेली दिसते.' लडी म्हणाली.

'मला काम आहे. हे फूल प्रेमासाठी ठेवून मी जातो.'

'उद्या येऊ नका रमाकांत. आम्ही एके ठिकाणी वसंतोत्सवास जाणार

आहोत.' मडी म्हणाली.

'मलाही तेथे आमंत्रण आहे.' रमाकांतने सांगितले. 'मग तेथे भेटूच. तुमची प्रेमळ प्रेमाही तेथे भेटेल. उद्या तिला गुच्छ आणा,

नाही तर माळच घेऊन या.' लडी हासून बोलली. ‘इतक्यात माळ नको. काही दिवस फुलाफुलीच बरी, मग फुलांची माळ

होईल. एका फुलाची का माळ होते? बरीच फुले जमली म्हणजे माळ. खरे की नाही रमाकांत ?' मडी म्हणाली.

'मी जातो. '

रमाकांत गेला. प्रेमा वाचनालयात गेली होती. ती परत आल्यावर लडी

नि मडी दोघींनी तिला भंडावून सोडले. तिच्या केसात ते फूल त्यांनी घातले. प्रेमा एकटीच वरती जाऊन बसली. तिने ते फूल हातात घेतले. हुंगले, हृदयाशी धरले. 'खरेच का रमाकांतचे आपल्यावर प्रेम आहे?' असा विचार तिच्या मनात आला. तिला रमाकांत आवडला. इतक्यात मिरी तेथे आली.

प्रेमा प्रेमस्वप्नात दंग होती.

'प्रेमा, एकटीच बसलीस ?

'हातात हे फूल आहे. त्याच्याशी बोलत आहे.'

'तुला का रमाकांतविषयी प्रेम वाटते?'

'होय मिरी. '

'त्याचेही तुझ्यावर प्रेम आहे असे दिसते. तो तसे म्हणाला. अधीर होऊ

नकोस. तो मनुष्य विश्वासार्ह नसावा असें मनांत येते. माझा अंदाज चुकीचा

ठरो, अशी प्रार्थना आहे.'

सायंकाळी रमाकांत परत आला.

'कोणी येते का फिरायला?' त्याने विचारले. 'मला बरे नाही.' मडी म्हणाली.

'माझे कपाळ दुखते.' लडी म्हणाली.

'मिरी कामात आहे. कपडे धूत आहे.' प्रेमा म्हणाली. 'ती स्वतः कपडे धुते ? मोलकरणी नाहीत वाटते?'

'सुमित्राताईंचे कपडे. तीच आपल्या हातांनी धुते. त्यांना इस्त्री करते. '

'मागील जन्मी मोलकरीण होती वाटते?' लडी म्हणाली.

'या जन्मी तरी ते काम तिला आवडते खरे.' मड़ी म्हणाली.

‘आणि तुमचे कपडे?' रमाकांतने विचारले. 'आक्का धोब्याकडे देते.' लडी म्हणाली.

‘प्रेमा, तू येतेस फिरायला? का तुझे पाय दुखताहेत?'

'चला मी येते. '

आणि ती फिरायला गेली.

कपडे वाळत घालून मिरी सुमित्राताईंकडे आली.

'बागेत येता फिरायला? हात धरून नेते.' ती म्हणाली.

‘तू दमली असशील. मिरे, नव्या आईमुळे तुला त्रास. माझे कपडे ती धोब्याकडे देत नाही. तुला धुवावे लागतात. तू इस्त्री करतेस. किती तुला कष्ट ?"

'सुमित्राताई, कामाची सवय का वाईट? या कामाचा अभ्यास होईल. धोबीकामात तरबेज होईन. मिळालेले ज्ञान काही फुकट नाही जात आणि तुमचे काम करण्यात मला आनंद असतो. चला फिरायला.' मिरीने हात धरून सुमित्राला नेले. बागेत दोघी फिरत होत्या. दोघींचा उदार संवाद चालला होता.

रस्त्यावर म्युनिसिपालिटीचे दिवे लागले. एकदम मिरीचे लक्ष गेले. 'सुमित्राताई रस्त्यांतले दिवे लागत आहेत. कृपाकाका रोज दिवे लावीत जावयाचे, खांद्यावर शिडी, हातात कंदील! मी लहानपणापासून त्यांना बघत असे. सुंदर काम. नाही का?"

'प्रकाश देणे, सर्वत्र प्रकाश पसरविणे याहून अधिक पवित्र, अधिक

चांगले असे दुसरे काय आहे?"

'आपल्या गावात आता वीज येणार आहे म्हणतात. मग सर्वत्र विजेचे दिवे होतील. नको शिडी घेऊन जायला. बटन दाबले की सर्वत्र प्रकाश. गंमत होईल, नाही? कृपाकाका परत आले तर चकित होतील, म्हणतील सारी नवीन दुनिया. आपल्या शहरात किती बदल होत आहेत! बंदर मोठे झाले. कारखाने वाढत आहेत. कॉलेज होणार म्हणे. जग झपाट्याने बदलत आहे.'

'क्षणाक्षणाला वस्तुमात्रात बदल होत असतो. आपणही सारखे बदलत आहोत. तुझ्यात किती बदल झाले, माझ्यात किती झाला, खरे ना ?'

'सृष्टीचा कायदाच आहे की बदला नाही तर मरा. होय ना?' झाडांची जुनी पाने गळतात, नवीन येतात. नदीचे जुने पाणी जाते, नवीन येते आपण थंडी आली तर गरम कपडे घालतों. उन्हाळा आला तर पातळ वापरतो. थंडीत गरम पेय पितो. उन्हाळ्यात थंड सरबत घेतो. काळआप्रमाणे बदल करावा लागतो.

'परंतु कधीकधी माणसे काळाप्रमाणे बदलायला तयार होत नाहीत. मग समाजात उत्पात होतात. क्रांत्या होतात. मनुष्य ऋतुमानाप्रमाणे खाण्यापिण्यात कपड्यालत्यांत बदल करतो. परंतु आपल्या विचारांत आचारांत कल्पनांत बदल करायला नवीन दृष्टी घ्यायला तो तयार नसतो, सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे विचारात बदल होणे. जीवनाची नवनवीन दृष्टी येणे. आपण विश्ववंद्य विभूतींना युगपुरुष म्हणत असतो. श्रीकृष्ण युगपुरुष होते. भगवान बुद्ध युगपुरुष होते. याचा अर्थ हाच की त्या त्या युगाला अनुरूप धर्मअनुरूप आचार-विचार, अनुरूप नवदृष्टी त्यांनी दिली. नेहमी जुने तुणतुणे वाजविणे वेडेपणा आहे. '

'चला आता आत जाऊ. गार वाटते जरा, नाही?'

'चला जाऊ ?'

वरती गॅलरीत जाऊन दोघीजणी बसल्या. तो तिकडून प्रेमा नि रमाकांत

रस्त्यातून येताना दिसली. दोघे अंगणातील फाटकाशी उभी होती. शेवटी रमाकांत गेला. प्रेमा आत आली. ती एकटीच वर गचीत जाऊन बसली.

मिरीने खाली जाऊन जेवणाची तयारी केली. आजीबाईंना तीच मदत

करी सारी जेवायला बसली. सुमित्राताई अलीकडे सायंकाळी जेवत नसत. थोडे दूध घेत. जेवताना विनोद चालला होता; थट्टा चालली होती.

'प्रेमाचे आज पोट भरले असेल' लडी म्हणाली.

'कोठे फराळाला गेली होती? काय ग प्रेमा? आम्हांला नाही बोलवलेस ते? एकटीएकटी गोलीस ना ?' मडी बोलली.

'तुम्हांला आमंत्रण मिळाले होते. तुमची कपाळे दुखत होती. अजीर्ण

झाले असेल किंवा जिभेला रूची नसेल. मी भुकेली होते. तोंडाला चव होती.

मी गेले. '

'पोटभर फराळ केलेस ना?'

'मी नेहमी प्रमाणात खाते, प्रमाणात वागते.'

'प्रमाणातच सौंदर्य असते. '

'बाकी रमाकांत रसिक आहेत. खेळाडू वृत्तीचे आहेत आणि हसतात

केवढ्याने. '

‘प्रेमा, त्यांच्या हसण्याने घाबरत नाहीस ना?'

'मोकळ्या वृत्तीचे ते हास्य असते.' 'मला तर वाटते ते खोटे असते.'

'जेवा ग पोरींनो. बोलाल किती!' राणीसरकार म्हणाल्या.

'आक्का, जेवल्यावर फोनो लावू का?' मडीने विचारले. 'लाव.'

'परंतु प्रेमाला आवडेल तेच गाणे लावायचे.'

' आज तिच्या हृदयात फोनो सुरू आहे. गाण्यावर गाणी तेथे चालली असतील. गोड गोड गाणी, मधुर भावगीते.'

प्रेमा पटकन उठून गेली.

'मिरी, तुझेही पोट भरले आहे की काय?'

'भरत आले आहे.' ती म्हणाली.

जेवणे झाली. मिरीने सुमित्राताईंस दूध नेऊन दिले. खाली थोडे काम करून ती वरती खोलीत आली. सुमित्राताईंस एक सुंदरसे पुस्तक वाचून दाखवायला ती बसली. तिकडे दिवाणखान्यात फोनो लागला होता. हसणे- खिदळणे चालले होते. अनेक गाणी लागली. शेवटी...

“अब तेरे सिवा कौन मुझे कृष्ण- - कन्हैय्या

भगवान किनारे लगा दे मोरी नैय्या. "

हे मिराबाईचे सुंदर गाणे लागले. मिरीला ते गाणे फार आवडत असे. पुस्तक मिटून ती ते गाणे डोळे मिटून ऐकत होती. सुमित्राताईंनी ते ओळखले. त्याही भक्तिभावाने ऐकत होत्या. प्रेमाही आपल्या अंथरूणात पडून ऐकत होती.

'मिरे, मी आता झोपते.' सुमित्राताई म्हणाल्या. 'पडा तुम्ही.' मिरी म्हणाली.

मिरी वर गेली. आकाशातील तारे पहात होती. मुरारी नि ती लहानपणी तारे बघत असत आणि ती खिडकीतून एका तेजस्वी ताच्याकडे लहानपणी बघत असे. कृपाकाकांचा तारा का तेथे असेल ? कोठे जातात हे आत्मे? या आत्मज्योती का कायमच्या मावळल्या जातात? तिच्या मनात अनेक कल्पना येत होत्या; तिला अनेक स्मृती आल्या आणि मुरारी आठवला. मुरारीला आई ना बाप, बहीण ना भाऊ; मीही तशीच. दोघे आम्ही पोरकी. मुरारी लांब आहे. किती दूर. शेकडो, हजारो मैल दूर! तिने खाली जाऊन राजाचा पिंजरा आणला. हळूच आणला. राजा झोपला होता. तिने तो पिंजरा हळूच खाली ठेवला. त्याची झोपमोड तिने केली नाही. जणू त्याची झोपमोड म्हणजे तिकडे मुरारीची झोपमोड असे तिला वाटले.

'नीज राजा, नीज. प्रेमाच्या पिंजप्यात नीज. गोड गोड स्वप्नांत रंगून जा हो राजा!' असे ती म्हणत होती. तो कोणाची तरी पावले वाजली. कोण येत

होते? मिरीने वर पाहिले तो प्रेमा तेथे येऊन उभी.

'ये प्रेमा, बैस. '

'काय करतेस, मिरे?'

'या राजाला झोपवत होते.'

'छान आहे पक्षी. बोलतो किती गोड !"

'प्रेमा, झोप नाही का येत?' 'मिरे, रमाकांताना मी माझे हृदय देत आहे. देऊ?'

'मी काय सांगू?'

‘ते किती प्रेम दाखवतात! आमचे दोघांचे जीवन सुखाचे होईल असे वाटते.'

'मिरा, वसंताची झुळूक लागताच वृक्षवेलींना पालवी फुटते. तेथे लवकर - उशिरा प्रश्र का असतो?'

'तेथेही पालवी हळूहळू फुटते. किती दिवस एकेक पान येत असतें. एकेक कळी किती दिवस फुलत असते. निसर्गात सारे धीमेधीमे होत असते. म्हणूनच लहानशी कळी फुलल्यावर सारा सौंदर्यसिंधू तिथे उचंबळत असतो.' 'मिरे, वादळे का हळूहळू येतात? भरती का हळूहळू येते? भूकंप का

हळूहळू होतात?' ‘प्रेमा, तू हे उत्पात सांगत आहेस. आणि तेथेही पाहू तर किती दिवसांपासून त्या गोष्टींचीही तयारी होत असलेली दिसेल. एक दिवस उजाडत फूल फुललेले दिसते. महिनाभर ती कळी होती. म्हणून का एकदम फुलले असे तू म्हणशील ? किडीची फुलपाखरे होतात. सुरवंट कोशात बसतात. त्यांतून फुलपाखरे बाहेर येतात. ती का एकदम आली? अंड्यातून पिलू बाहेर येते. ते का एका क्षणात पिलू झाले? नवीन प्रकार, नवीन गुणधर्म दिसले तरी त्यांचीही वाढ हळूहळूच होत होती असे दिसून येईल. तुझ्या प्रेमाची वेल हळूहळूच वाढो. घाई नको.'

'मिरे, मी तर स्वप्नसृष्टीत जणू आहे. रमाकांताचे बोलणे, हसणे सारे सारखे मनासमोर असते. त्यांनी आज एक पत्र दिले. किती भावनामय आहे ते.'

‘जर खरोखरच त्यांचे तुझ्यावर प्रेम असेल, तर मला आनंदच आहे. तू भोळी आहेस. तुझे डोळे जगावर विश्वास टाकणारे आहेत. तुझा विश्वास धन्य ठरो, कृतार्थ ठरो.

'मिरे, जगात माझ्यावर फारसे प्रेम कोणी केले नाही. आईबाप लहानपणीच गेले. मी चुलत्यांजवळ आहे. आपण निराधार असे मला वाटत असते. रमाकांतांचा आधार मिळेल असे वाटते.'

'प्रेमा तू पोरकी आहेस तुझ्याविषयी किती सहानुभूती मला वाटते. म्हणूनच सांगते की जरा जपून जा. तुझी निराशा न होवो. संपूर्णपणे पाऊल टाकल्यावर मग निराशा पदरी येणे फार वाईट. हृदयाला जरा खेचून घर. ' 'बघू काय होते ते. लवकरच कृष्णचंद्रही आता येतील. होय ना?'

'असे पत्र आले आहे खरे. '

'मिरे, मी आता पडते जाऊन.'

'मीही जाते.'

दुसप्या दिवशी वसंतोत्सवास जायला सगळ्याजणी तयार होऊ लागल्या. मिरी जाणार नव्हतीच. लडी, मडी जणू राजकन्ये प्रमाणे सजल्या. प्रेमाजवळ नटायला फारसे नव्हते. ती जरा दुःखी होती. इतक्यात मिरी तिच्याजवळ येऊन म्हणाली, ‘प्रेमा, दुःखी का?'

'मिरे, मला कोणते पातळ शोभेल सांगा.' 'प्रेमा, माझ्याजवळ एक सुंदर पातळ आहे. ते तू नेस. तुला ते खूलून

दिसेल. कानांत कर्णभूषणे घाल आणि तुझ्या केसांत मी सुंदर फुले गुंफते. तू जणू वनराणी शोभशील. काळीसावळी सुंदर हिंदकन्या !'

मिरीने प्रेमाला सजवले. प्रेमा आज खरेच सुंदर दिसत होती. ती त्या वेषात खाली गेली. लडी नि मडी चकित झाल्या.

'मिरी कलावान आहे.' मडी म्हणाली.

'परंतु स्वत: नटत नाही.' लडी म्हणाली.

'आफ्रिका परत येईल तेव्हा ती नटेल.' राणीसरकार म्हणाल्या.

राणीसरकार नि त्या तिघीजणी वसंतोत्सवात गेल्या. मिरी वाचत बसली होती. नंतर बागेत जाऊन ती झाडांना पाणी घालू लागली. सायंकाळ होत आली. तिच्या जिवाला आज कसली तरी रुखरुख लागली होती. ती खोलीत येऊन बसली. पुन्हा उठली नि वरती गचीत गेली. तेथे ती आरामखुर्चीत पडून राहिली.

तो एकाएकी कुणीतरी आले. ती चमकली. कोण आले होते? ते रमाकांत होते.

'मिरा!' त्याने प्रेमविव्हळ हाक मारली.

'तुम्ही वसंतोत्सवास जाणार होतेत ना? प्रेमा आज किती सुंदर दिसत होती. तिचे पातळ, ती कुर्णभूषणे सारे तिच्चा सावळ्या अंग कांतीला खुलून दिसत होते. '

'मी तिकडे जाऊन आलो. ' 'प्रेमा अद्याप परत आली नाही. तुम्ही आलेत ?'

'तेथे मिरी नव्हती म्हणून.'

'मिरीला तेथे येण्यात आनंद वाटत नव्हता.

'मिरी!" 'काय?'

'तू माझा तिरस्कार का करतेस?'

'मी कोणाचा तिरस्कार करीत नाही.'

'तू माझे हृदय ओळखतेस?'

'तुमचे प्रेमावर प्रेम आहे.'

'खोटे, साफ खोटे, '

'तुम्हीं तिला फुले देता, तिच्चा बरोबर फिरायला जाता, तिला प्रेमपत्रे लिहिता ते सारे का खोटे. ?'

'खोटे, साफ खोटे, माझे तुझ्यावर प्रेम आहे.'

'हेही खोटे कशावरून नाही? तुमच्यावर विश्वास कोणी काय म्हणून ठेवावा? प्रेमावर प्रेम दाखवता हे जर नाटक असेल, तर माझ्यावर प्रेम आहे असे म्हणता, हेही नाटक कशावरून नाही?"

'तुझ्या हृदयातील ईर्षा जागृत व्हावी म्हणून मी प्रेमाकडे अधिक लक्ष देऊ लागलो. मी प्रेमाकडे अधिक वळत आहे असे पाहून स्त्री-स्वभावानुसार तू माझ्याकडे अधिक लक्ष देशील असे मला वाटले. मिरी, माझ्या हृदयात प्रेमाला स्थान नाही. तेथे मिरी आहे. मिरीने माझे जीवन व्यापले आहे. तू माझा तिटकारा करू नकोस माझा स्वीकार कर.'

' रमाकांत, या क्षणापर्यंत मी तुमचा तिरस्कार करीत नव्हते. परंतु आता मात्र तुमची किंमत मला कळली. एका भोळ्या मुलीला फसवून माझ्यापासून तुम्ही आदराची, प्रेमाची अपेक्षा करता तरी कशी? प्रेमाने आपले हृदय दिले. तुमच्यावर तिने विश्वास ठेवला. किती आनंदाने नटून ती वसंतोत्सवास गेली ! मी तिला सजविले. तुम्ही तेथे येणार म्हणून ती उत्सुकतेने गेली आणि तुम्ही इकडे निघून आलात! रमाकांत ! मानवी हृदयाची, स्त्रीच्या पहिल्या पवित्र प्रेमाची अशी वंचना करणे फार भयंकर आहे. थोर भावनांची, कोमल, अमोल, पहिल्या प्रेमाच्या मोहोराची अशी टिंगल करणे पाप आहे. तुम्ही का प्रेमाचा खेळ मांडला आहे? तुम्ही अत्यंत नीच वर्तन केले आहे.'

‘मिरी, तुझ्या प्रेमासाठी हे सारे नाटक मला करावे लागले. कठोर नको होऊस. क्षमा कर !'

'कसली क्षमा नि काय? प्रेमा एक पोरकी मुलगी आहे. लहानपणापासून तिला सहानुभूतीचे प्रेम मिळाले नाही. मीही पोरकी असल्यामुळे तिचे मन मी समजू शकते. किती आशेने ती तुमच्याकडे पाहू लागली होती! अरेरे ! त्या प्रेमळ हृदयाचा तुम्ही घात केलात. ते भोळे प्रेमळ डोळे, काळेभोर डोळे, त्यांच्यासमोर निराशेची अंधेरी येईल. ज्याने दुसप्या एका प्रेमळ जीवाचा असा विश्वासघात केला तो का माझे हृदय जिंकू शकेल? मला का तुम्ही इतकी क्षुद्र लेखता? प्रेमाच्या हृदयाची होळी करणाप्याने माझ्या प्रेमाची अपेक्षा करावी हा माझा अपमान आहे. स्त्रीजात इतकी तुच्छ लेखू नका. दुसप्या भगिनीच्या कोमल भावनांच्चा राखेवर माझे प्रेममंदिर उभारण्याइतकी मी नीच नाही. जी स्त्रीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा, अब्रू यांना कमी लेखते, ती स्त्रीच नाही. स्त्रीजातीला ती कलंक आहे, असे मी म्हणेन. आणि त्या मुलीचीही घोर निराशा होणार तीही माझ्यामुळे. अरेरे! एकंदरीत मी दुर्दैवीच आहे. रमाकांत, जा तुम्ही! पुन्हा कोणा स्त्रीची अशी वंचना करू नका. स्त्रियांच्या कोमल भावनांचा कचरा समजून वागत जाऊ नका.'

'मिरा, तू जरा विचार करून बघ. तुझ्यावरील उत्कट प्रेमामुळेच मी हे केलेना? माझ्या भावनांना तूही लाथाडू नकोस. मी जातो. जगांत प्रेमाच्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. तू मला झिडकारलेस, तरी तुझ्यावर केलेल्या प्रेमाचा सुगंध माझ्या जीवनात राहील. जातो मी. या पागलाला क्षमा कर.'

रमाकांत निघून गेला आणि एकदम प्रेमा पुढे येऊन स्कुंदतस्कुंदत मिरीच्चा गळ्यात पडली. तिला भावना आवरत नव्हत्या, दुःख, निराशा, अगतिकता किती तरी कल्लोळ तिच्या हृदयात उसळले होते. तिची छाती समुद्राप्रमाणे खालीवर होत होती. मिरीच्या डोळ्यात पाणी आले. परंतु संयमाने तिने स्वतःला आवरले.

‘प्रेमा, रडू नकोस. तू का पलीकडे होतीस? सारे बोलणे का तू ऐकलेस?' ‘होय मिरा, मीही वसंतोत्सवातून लवकरच आले. रमाकांत निघून आले. मग माझेही लक्ष तेथे लागेना. त्यांच्यासाठी तर मी सजून गेले. तू मला सजवून पाठवलेस. मी तिथे कोणासाठी राहू? आले निघून त्यांच्या पाठोपाठ. तो तुमचे दोघांचे बोलणे कानांवर आले. मिरा, ते निखारे माझ्या जीवनाची होळी करीत होते. रमाकांतांना मी माझे हृदय देऊ केले होते. दिलेच होते आणि त्यांनी का असे फसवावे? अशी कशी ही दुनिया ? मला फुले देत, प्रेमपत्रे लिहीत. माझ्याकडे गोड डोळ्यांनी बघत, प्रेमाने माझा हात हातात घेत. सारे का ते सोंग होते? केवळ नाटक होते? त्या दिवशी मला रमाकांत म्हणाले,' तू माझी जीवनदेवता आहेस.' असे कसे हे पुरुष ! मिरा, कशाला मी जगू, कशाला राहू ? मिरा, तुझ्या स्वभावाची थोरवी आज अधिकच मला कळली. तू सामान्य स्त्री नाहीस. तू उदात्त, आदर्श आहेस. निराळ्याच देवाने तुला घडवले आहे. तुझी मूर्ती बनविताना देवाने सारे मांगल्य, सारी विशुद्धता, सारे सत्य जणू एकत्र ओतले. तूच मला मार्ग दाखव.

'प्रेमा, ज्याला तू हृदय देऊ केलेस, तो जर असा वंचक निघाला, तर काय करणार? रमाकांतला विसरून जा. कदाचित तुला त्याच्याविषयी वाटणारे प्रेम हेही वरवरचे असेल. क्षणभर तू दिपून गेली असशील. परंतु काही काळ गेल्यावरही तुला रमाकांताची मूर्ती हृदयमंदिरात उभी आहे असे वाटले, तर तू त्या मनोमय रमाकांताची प्रेमपूजा करीत व्रती जीवन जग. प्रेमस्वर्गातील, आशाधामातील आदर्श रमाकांतची पूजा कर. तुझा रमाकांत तुझ्या स्वप्नात राहो. प्रेमकुंजात राहो. परंतु काही काळानंतर रमाकांताची मूर्ती जर तुझ्या जीवनातून निघून गेली, तर तुझे प्रेम दुसप्या अनुकुल व्यक्तीला शोधत राहील. रडू नकोस. सारे चांगले होईल. तू पुढे सुखी होशील. हे एक क्षणिक मृगजल होते असे समज. '

'मिरा काही दिवस तरी चैन पडणार नाही. क्षणात मी सारे कसे विसरू?

मी काही नाटक नव्हते करीत तू माझा स्वभाव जाणतेस.'

‘हो प्रेमा. तुझा भोळा, प्रेमळ स्वभाव मी ओळखते. म्हणूनच तू जे प्रेम करीत होतीस, त्याची खोली, गंभीरता, तीव्रता तू अनुभव पुढेही राहिला तर मी

सांगितले त्याप्रमाणे कर.

'कठीण आहे हे सारे. केवळ मनोमय रमाकांताची पूजा करून मला का संपूर्ण आनंद मिळेल?' 'प्रेमा, हे मी सांगते आहे खरे. परंतु मलाही असे जीवन जगणे अशक्य होईल. आपण उच्च ध्येयासाठी धडपडायचे. सुमित्राताई हाच आदर्श पूजीत

आहेत. '

'काय? त्यांचीही अशीच कोणी निराशा केली होती?"

‘तो सारा इतिहास मला माहीत नाही. परंतु एकदा त्या सूचक बोलल्या होत्या.' मी प्रेमाच्चा वेदनांतून गेले आहे. 'असे काही तरी म्हणाल्या होत्या.' 'मिरा, मी येथे आता राहू इच्छित नाही.'

'तुला येथे राहणे आवडणार नाही हे मी समजू शकते. त्या दुसप्या दोघी तुझी थट्टाही करतील. परंतु सुमित्राताईंचे वडील येईपर्यंत राहा. चल आपण जरा फिरायला जाऊ.'

'नको, मी माझ्या खोलीत एकटीच पडून रहाते.'

'बरे तर, मी जाते. '

प्रेमा आपल्या खोलीत रडत बसली, तिने ती प्रेमपत्रे वाचली. फाडून टाकावी असे तिच्या मनात येई. परंतु तिला फाडवेत ना. पुनःपुन्हा ती पत्रे ती हृदयाशी धरीत होती. परंतु एकदम तिने डोळे पुसले. तिची मुद्रा गंभीर झाली. तिने पत्रे फाडली. काड्याची पेटी आणून त्या तुकड्यांना तिने अग्रिसंस्कार दिला. त्या होळीकडे ती बघत होती. नंतर ती उठली. शून्य मनाने खिडकीशी ती उभी होती. बागेत मिरी नि सुमित्राताई फिरत होत्या.

'प्रणाम, तुम्हा दोघींना प्रणाम.' ती मनात म्हणाली.

रमाकांत आता मुळीच येईनासा झाला. तो परगावी गेला असेही कळले. मडी नि लडी नाना प्रकारची कुजबूज करीत.

'प्रेमाचे त्याच्यावर प्रेम होते, तो अकस्मात का गेला?' लडी म्हणाली. 'त्या मिरीचे कारस्थान. तिने यांच्या प्रेमात माती कालवली. मत्सरी आहे ही मिरी.' मडी म्हणाली.

'दुसप्याच्या सुखात माती कालवणे फार वाईट.' राणीसाहेब म्हणाल्या. मिरीच्या कानांवर ती दुष्ट कुजबूज येई. परंतु ती परम शांती धारण करी. थोड्या दिवसांनी कृष्णचंद्र आले. मिरीवरचा त्यांचा राग अद्याप गेला नव्हता. दोनचार दिवस झाले. घरातील बदल त्यांच्या ध्यानात आला. मिरी नि सुमित्रा एका खोलीत राहात होती. सुमित्राचे कपडे मिरीच धुवी. त्या लडी नि मडीचा त्यांना तिटकारा वाटू लागला. त्यांची फुलपाखरी वृत्ती त्यांना आवडेना. त्या दोघी उशीरा उठत. काडीचे काम करतील तर शपथ. फुले तोडीत नि केसात घालीत. परंतु कधी बादलीभर पाणी घालणार नाहीत. पाट घेणार नाहीत. ताटे ठेवणार नाहीत. सारे मिरी करी. चहाचे काम तर मिरीवरच नव्या राणीसाहेबांनी सोपविले होते.

'आज ही लडी करील चहा.' कृष्णचंद्र म्हणाले.

'मिरीच चांगला करते.' राणीसाहेब बोलल्या.

यांना अधिक चांगला येईल, शिकलेल्या, मोठ्या शहरात राहणाप्या, बड्या घराण्यातल्या या आहेत. लडे, तू करतेस की मडी करणार?"

'आम्ही कोणीच करीत नाही. आमच्या घरी भरपूर नोकर आहेत. आम्ही कधी केला नाहीं.' मडी म्हणाली. 'आज तुम्हीच दोघींनी केला पाहिजे. तुम्ही केलात तरच मी पिईन.'

कृष्णचंद्र म्हणाले.

'जा बाई दोघी. आणा करून.'

'मिरे, तू चल मदतीला दुरून दाखव.' मडी म्हणाली. ‘ती नको ती मला वानून दाखवील.'

'आम्ही वाचून दाखवितो. मिरीच चहाला जाऊ दे.' लडी म्हणाली.

'नको. चहा तुम्हीच करा. वाचून दाखवायचे असेल तर मागून वाचूनही दाखवा. मिरी गप्पा मारीत बसेल.' शेवटी त्या दोघी गेल्या.

कृष्णचंद्र बोलत बसले.

'मिरे, प्रेमा कुठे आहे?' त्यांनी विचारले.

'मी तिला बोलावते. ती सुमित्राताईजवळ आहे.'

'दोघींना घेऊन ये. सुमित्राची प्रकृती बरी नाही.' 'त्या जेवतच नाहीत नीट' राणीसरकार म्हणाल्या.

'तू तिच्यावर माया करतेस ना?'

'परंतु त्या मुळी बोलतच नाहीत.'

'तिच्या खोलीत तू मिरीला दवडलेस. तिचे कपडेही धोब्याकडे तू देत नाहीस. आंघोळीला गरम पाणी म्हणे बादलीभरच घेत जा, असे तू फर्माविलेस, खरे ना! हीच का तुझी माया ? तुझ्या या दूरच्या बहिणी आल्या. त्यांना स्वतंत्र खोल्या नि माझ्या सुमित्राच्या खोलीत मिरीचे बिप्हाड! '

'तुमच्या घरात मिरीची सत्ता की माझी ??

'हा सत्तेचा प्रश्न नाही. साध्या माणुसकीचा आहे.'

'त्या मिरीजवळ का माणुसकी आहे? प्रेमाच्या प्रियकराला हिने दवडले. बिचारी प्रेमा रडत असते.'

'मिरीने असे दुष्ट कृत्य केले असते तर प्रेमा तिच्याजवळ बोलली नसती. परंतु प्रेमा तर तिच्चाबरोबर अधिक असते. सारी सत्यकथा माझ्या कानावर आली आहे. प्रेमावर प्रेम करण्याचे नाटक करून तो मिरीवर प्रेम करीत होता. ह्या दोघांचे प्रेम जमावे म्हणून मिरी उलट खटपट करीत होती. प्रेमाला तिनेच वसंतोत्सवात सजवून पाठवले. प्रेमाचा खोटा कैवार घेऊन मिरीला नावे नका ठेवू. ती थोर मनाची मुलगी आहे.'

इतक्यात सुमित्राताई, प्रेमा तेथे आल्या.

'सुमित्रा, तू बरी नाहीस?' कृष्णचंद्र म्हणाले.

'बरी आहे बाबा. मनात शांती आहे.'

'तू जातेस का कोठे हवापालट करायला? मिरीला बरोबर घेऊन जा.'

'बघू, काय घाई आहे?"

'इतक्यात अकस्मात डॉक्टर आले. सारी मंडळी उभी राहिली.' 'या डॉक्टर. ' कृष्णचंद्र म्हणाले.

'बसा सारी. सुमित्राताई, तुम्ही नका उठू. बसा.' 'आज अवेळी कोठून आलात? कामाशिवाय तुम्ही कधी यायचे नाहीत.'

कृष्णचंद्र म्हणाले.

'कामासाठीच आलो आहे. '

'मिरी, आणखी एक कप चहा करायला सांग जा.'

'मीच जाते.' राणीसरकार म्हणाल्या.

'सुमित्राताई, तुमची प्रकृती तितकीशी चांगली नाही.' डॉक्टर म्हणाले. 'मी तिला कोठे तरी हवापालट करायला जा, असे सांगतो आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.

‘मी त्याच बाबतीत बोलायला आलो आहे. मीही कोठे तरी जाण्याचा विचार करीत आहे. सुंदर स्थाने पाहून येऊ. कोठे आवडले तर चार दिवस मुक्काम करू. दुसरेही एक गृहस्थ माझ्याबरोबर येणार आहेत.'

'कोण आहेत ते?' मिरीने विचारले.

'त्यांची मलाही नीट माहिती नाही. तत्त्वज्ञानी दिसतो आहे. या गावाचा नाही. जगाचा तो यात्रेकरू आहे. बुध्दिमान आहे. साप्या विषयांची त्याला माहिती आहे. चेहरा गंभीर परंतु जरा उदास दिसतो. त्यांची माझी सहज गाठ पडली. ते म्हणाले, ‘मीही येतो तुमच्याबरोबर.' मी त्यांना 'या' म्हटले. मग जायचे का? मिरे, तू हवीसच बरोबर.'

‘जाऊ' सुमित्राताई म्हणाल्या.

लडी, मडी, राणीसाहेब चहा घेऊन आल्या.

“मिरे, काही खायला आण. डॉक्टर आले आहेत.' कृष्णचंद्र म्हणाले.

मिरी त्वरीत गेली. चिवडा, शंकरपाळे मोठ्या कागदात घेऊन आली. टेबलावर तिने तो कागद ठेवला. सारी मंडळी फराळ करू लागली. मिरी

पटकन् उठली. तिने कपातून चहा ओतला. चहा जरा लालसर दिसत होता. 'पूड बरीच घातलेली दिसते. कडक चहा आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.

'मला तर सौम्य आवडतो.' डॉक्टर म्हणाले.

'तुम्हा लोकांना चहाबाज कोण म्हणेल? खरी लज्जतच तुम्हांला नाही. कमीत कमी दूध नि जास्तीत जास्त पूड आणि साखर नावाला, तो खरा चहा.'

लडी म्हणाली.

'चहा सुंदर झाला आहे.' मडी म्हणाली. 'चहा सुंदर झाला आहे.' राणी सरकार म्हणाल्या.

‘अगदी रद्यी झाला. आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.

'माझ्या उलट बोलायची तुम्हांला सवयच आहे.'

'पतीपत्नीचा तो तर विनोद. विशेषतः अशा उतार वयातील पतीपत्नींचा.' डॉक्टर हसून म्हणाले.

'मी का म्हातारा दिसतो?' कृष्णचंद्रांनी विचारले.

'आणि माझा एक तरी केस पांढरा झाला आहे का? मला तर मी अगदी

तरुण आहे असे वाटते.' राणीसरकार म्हणाल्या.

'कृष्णचंद्र मी जातो. मग काय ठरले? येणार का मिरी आणि

सुमित्राताई?' डॉक्टरांनी विचारले.

'सुमित्रा, तुझे काय म्हणणे?'

'जाइन डॉक्टरांबरोबर. येईन चार दिवस हिंडून.'

'ठीक तर, तयारी करा. कधी निघायचे डॉक्टर ?'

‘निघू दोनचार दिवसांत.' असे म्हणून डॉक्टर निघून गेले. कृष्णचंद्र दरवाजापर्यंत पोचवायला गेले नी परत आले. ते खुर्चीवर बसले.

'मडी, वाचून दाखवतेस ना?' त्यांनी विचारले.

'मी वाचू की लडी वाचणार?' तिने विचारले.

‘कोणीही वाचा. ती मराठी इंग्रजी वर्तमानपत्रे तेथे पडली आहेत उचला.' मडी वाचू लागली. ती शंभरदा अडे अं-अं करी मध्येच डोळे चोळी. चारचारदा केसांच्या बटा मागे सारी.

'रेमीडोकीच दिसतेस. वाच की जरा घडाघडा. स्वतःला वाचलेले समजते आहे अशा आवाजात वाच. मिरी सुंदर वाचते. तिचे वाचणे म्हणजे जणू संगीत लडी, तुझा प्रयोग होऊ दे.'

लडीने एक मासिक वाचायला घेतले. इंग्रजी होते ते.

‘कोणता लेख वाचू' तिने विचारले.

'तुला आवडेल तो.' कृष्णचंद्र म्हणाले. लडी त्यातील एक कविता वाचू लागली.

'अगं, ती कविता आहे. गद्यासारखे काय वाचतेस? अरसिकच आहेस. तुमचे सारे काव्य कपड्यालत्यांत. त्या कवीची भावना काही समजते का? पुरे, ठेवा खाली. जा पत्ते कुटीत बसा. मिरे तू दाखव ग त्यांना कौशल्य.' 'कौशल्य कसचे?' मिरी म्हणाली.

'हं, वाच विनय पुरे.' ते म्हणाले.

मिरीने ती कविता किती सुंदर रीतीने वाचून दाखविली. आवाज मृदू होई. गंभीर होई. कवीच्या भावनांशी ती एकरूप होई. सारी मंडळी स्तब्ध होती. 'सुंदर' कृष्णचंद्र म्हणाले.

हळूहळू त्या घरात लडी, मडी यांचा तोरा कमी होऊ लागला. त्या लवकरच आपल्या घरी जायची तयारी करू लागल्या. सुमित्रा, मिरी हवापालट करायला जाण्यापूर्वीच त्या जाऊ म्हणू लागल्या. प्रेमा राहणार होती. एके दिवशी लडी नि मडी निघून गेल्या. जाताना मिरीशी बोलल्याही नाहीत. मिरीने त्यांना दोन फुले नेऊन दिली. त्यांनी हातात घेऊन ती कोपप्यात फेकली. प्रेमाने ती उचलून स्वत:च्चा केसात घातली.

'प्रेमा' तुझ्या डोक्यात ही फुले कोठून आली?' मिरीने विचारले. 'मडी नि लडीला तू दिलीस ना, तीच ही. त्यांनी ती फेकून दिली. मी ती उचलून घेतली. प्रेमाने दिलेल्या वस्तूचा असा अव्हेर होऊ नये.'

'मी तरी प्रेमाने दिली होती का? प्रेमा, केवळ शिष्टाचार म्हणूनच मी ती दिली. शेवटचा निरोप घ्यायच्या वेळी तरी झाले गेले विसरून जावे, नाही? त्यांनी ती फेकून दिली. त्यांना माझी फुले औपचारिक वाटली असतील. वरपांगी वाटली असतील. त्यांचा तरी काय दोष? प्रेमा आम्ही परत येईपर्यंत तू येथे राहा. माझ्या पक्ष्याची तू काळजी घे. त्याला वेळच्या वेळेस दाणापाणी देत जा. गोड फळ मिळाले, देत जा. त्याच्याजवळ बोलत बसू.' मिरी सांगत होती.

'मिरे, तुझा मुरारी कधी येईल?'

'देव आणील तेव्हा. '

'आणि माझे कसे होईल?"

तुलाही प्रेमळ सहकारी मिळेल. जीवनाचा सोबती मिळेल. काळजी नकी करूस.

सुमित्राताईची मिरीने सारी तयारी केली. तिने काही सुंदर पुस्तके बरोबर घेतली. रंगाची पेटी, कुंचले हे सामानही तिने घेतले. तिलाही चित्रकलेचा नाद होता. कधी लहर लागली तर ती रंगात रंगून जात असे.



समुद्रात एक छोटीशी लाँच तयार होती. दुसरेही कोणी उतारू तीत होते. तेपहा आनंदमूर्ती, धिप्पाड डॉक्टर तेथे उभे आहेत.

'मिरे तुझी वाट पहात होतो. बायकांना नेहमी उशीर.' ते हसून म्हणाले.

'आम्ही वेळेवर आलो.' मिरी म्हणाली. सारी मंडळी लाँचमध्ये बसली. लाँच निघाली. बाणाप्रमाणे पाणी कापीत निघाली. मिरी सागरलीला बघत होती आणि तिच्या तोंडाकडे डॉक्टरांचा तो अपरिचीत पाहुणा बघत होता. एकाएकी मिरीच्या लक्षात ती गोष्ट आली आणि त्या गंभीर प्रवाशाने आपले डोळे दुसरीकडे वळविले कोण होता. तो ? हरी जाणे.

11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा