आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना शेजारच्या जमनीला विचारून ती गेली. नाना घरी नव्हतेच. जाताना तिचे डोळे भरून आले. कृपाकाकांची प्रेमळ खोली! त्या लहानशा खोलीने तिच्या जीवनात केवढी मोलाची भर घातली होती! या खोलीला प्रणाम करून ती गेली.
सुमित्राताईंच्या बंगल्यातील एक खोली तिला देण्यात आली. त्या स्मरणीय वस्तु तिने नीट ठेवल्या. तिने आपली खोली नीट लावली. ती सुमित्राताईकडे गेली त्यांच्याजवळ बसली. राहून राहून तिला वाईट वाटत होते.
'मिरे, रडू नकोस.'
‘सुमित्राताई, वेलीला सारखे येथून उपटून तेथे लावायचे, असे केले तर ती नीट वाढेल का? माझे देव तसेच करीत आहे, नाही का?'
‘तू येथे परकेपणा नको मानूस' दिवस जाऊ लागले. स्वयंपाक करणाऱ्या आजीबाई जरा मत्सरी होत्या. सुमित्राचे मिरीवरचे प्रेम पाहून त्या चरफडत. परंतु मिरी सारे मनांत गिळी. त्या आजीबाईंसही भाजी वगैरे चिरायला ती मदत करी. बगीच्यातून फुले आणून कृष्णचंद्राच्या खोलीत फुलदाणी सजवून ठेवील. सुमित्राताईस वाचून दाखवी. वाचता वाचता सुमित्राताई तिला मध्येच समजावून देत. अनेक प्रकारची माहिती देत. ऐतिहासिक गोष्टी सांगत. मिरी आनंदू लागली. कधीकधी कृष्णचंद्रही तिलाच वर्तमानपत्रे वाचायला सांगायचे. मिरी फार सुंदर वाची. तिच्या वाचनातही जणू संगीत असे.
रविवारी मुरारी घरी येत असे. त्याला भेटायला मिरी जात असे. तो तिची. त्या दिवशी वाटच पाहात असे. दोघे हसतखेळत फिरायला जात. पुढेच बेत रचीत. एका रविवारी मुरारी असाच घरी आला होता. त्याचे आजोबा त्या दिवशी घरातच होते. ते कामावर नव्हते गेले. मुरारी मिरी केव्हा येईल अशी वाट पाहात होता.
'मुरारी, त्या मिरीचा नाद तू सोड. कुठली पोर तो कृपाराम घेऊन आला! काय आहे त्या पोरीत? पुढे निराश व्हावे लागेल. ती त्या बड्या बंगल्यात गेली राहायला. येथे राहिली असती तर? कृपाराम किती वर्षे त्या खोलीत राहात होता. त्याच्या वास्तव्याने पवित्र झालेली ती खोली. ती सोडून का मिरीने जावे? परंतु श्रीमंतांकडे राहायला मिळेल. बंगल्यात मजा करायला सापडेल. गेली. तू आहेस गरीब. समजलास?'
'नाना, असे का म्हणता तुम्ही? मिरीला तिळभर तरी गर्व आहे का? कृपाकाकांनीच,' सुमित्राताईंकडे जा म्हणून मरताना तिला सांगितले होते. तिचे शिक्षण तेथे होईल. सुमित्राताईंनाही तिचा आधार होईल. नाही तर त्याही एकट्या बसून असतात. त्या जणू तपस्विनीच आहेत. त्या मिराला अधिकच चांगले शिकवतील. त्यांच्या संगतीत ती अधिकच उदार नि प्रेमळ होईल.
'उगीच गोडचे गाऊ नकोस. मागून पस्तावशील.' असे म्हणून नाना- ते आजोबा बाहेर निघून गेले. मिरीविषयी कोणी वाईट म्हटले की मुरारीला खपत नसे. त्याला राग येई त्या माणसाचा. आजोबांचा त्याला राग आला. यशोदाआई जेव्हा बाहेरून आल्या, तेव्हा तो त्यांना म्हणाला,
'आई, नाना असे गं काय वागतात? त्यांना जगात कोणी चांगले दिसतच नाही! मी इतके दिवस ऐकून घेत असे. परंतु आज मिरीविषयीच वाटेल ते बोलले. मला राग आला. मिरी का त्या बंगल्यात राहून बिघडेल? तिला का बंगल्यात राहायची हौस होती? ती खोली सोडून जाताना ती रडली नाही का? म्हणाले; मिरी कोणाची मुलगी! असू दे कोणाची. सारी माणसेच आहेत. कोण आहे श्रेष्ठ, कोण आहे कनिष्ठ? सारे मातीतून आले नि मातीतच जाणार! जो कृपाकाकांसारखा वागेल तो खरा श्रेष्ठ, तो खरा देवमाणूस.'
'मुरारी नाना असे बोलतात म्हणून रागावू नकोस. त्यांच्या मनात वाईट नसते. परंचु त्यांच्या जीवनात निराशा फार असल्यामुळे ते असे बोलतात. अरे, मी त्यांची सर्वात मोठी मुलगी. तू झालास नि तुझे वडील वारले. आपली मुलगी विधवा झालेली पाहून कोणा बापाला वाईट नाही वाटणार? माझ्या पाठची माझी बहीण होती. कर्ज काढून चांगल्या स्थळी त्यांनी तिला दिली. परंतु नवरा पुढे दारूडया झाला. तो बायकोचे हाल करी. शेवटी तिने जीव दिला. नानांनी एका मित्राला अडचणीत पैसे दिले. त्या मित्राने फसविले.
नानांचे घरदार गेले. जे जे चांगले म्हणून ते करायला गेले, त्यातून त्यांना वाईटच अनुभव आले. म्हणून ते निराश झालेले आहेत. त्यांना कोणाचा विश्वास नाही वाटत. कशाचा भरवसा नाही वाटत. तुझ्यावर त्यांचे किती प्रेम आहे! तुझी कोणी स्तुती केली की, त्यांना किती आनंद होतो! परंतु पुन्हा तेच म्हणतील, ‘काय होणार आहे त्याच्या हातून ? चैनी होईल, नाहीतर शेणातल्या किड्यांप्रमाणे बसेल कोपऱ्यात. पराक्रम नाही व्हायचा त्याच्या हातून.' मुरारी, पाठीमागचे त्यांचे सारे आयुष्य कसे गेले ते लक्षात आणून त्यांच्या बोलण्या- चालण्याकडे आपण पाहिले पाहिजे. त्यांच्यावर न रागावता त्यांची कोव करायला हवी, आपण अधिकच चांगले होऊन त्यांची श्रद्धा पुन्हा जिवंत होईल आणि मागल्यावरचा त्यांचा विश्वास पुन्हा येईल असे केले पाहिजे. समजलास ना? मुरारी, वरवर पाहून जगात चालत नाही बाळ.'
इतक्यात गाणे गुणगुणत मिरी आली.
'किती उशीर मिरे !' मुरारी म्हणाला.
'आज मायलेकांना पोटभर बोलू दे म्हटले.'
'चल चावट आहेस! आई, आम्ही फिरायला जाऊ का?' 'जा. परंतु फार नका उशीर करू परत यायला. आज मिरी येथेच जेवून जाईल.'
'वा छान !"
'जेवल्याशिवाय नाही हो जायचे आज.'
ती दोघे फिरत फिरत गेली.
'मुरारी, आज समुद्रावर जाऊ. बंदरावर. '
'तिकड़े घाण असते, नि गड़बड़ असते.'
'मग कोठे जायचे? टेकडी तर लांब आहे. ' 'टेकडीवरच जाऊ. आज मला पुष्कळ बोलायचे आहे तुझ्याजवळ. 'काय रे बोलयचे आहे? मी का एवढी मोठी आहे माझ्याजवळ पुष्कळ बोलायला?'
'मोठ्यांच्या संगतीत तर राहतेस ना? मिरे, माझी नोकरी सुटणार आहे. पुढे काय करायचे? पुन्हा का आईवर ओझे घालू ? मला वाटते कोठे दूर जावे. आपले दैव उदयास येते का पाहावे. काम करीन, कष्ट करीन, परंतु कोणाचा तरी आधार हवा. आज मी खूप निराश आहे मनात. गरीबाला कोठे आधार नसतो. मिरे, मी का हुशार नाही? परंतु पुढे यायला थोडा वाव लागतो. कोणीतरी हाताशी धरावे लागते. जाऊ निघून दूर ?'
'तुझी आई तुला जाऊ देणार नाही.'
'आईला न सांगताच जावे असे वाटते.'
'असे नको करूस मुरारी, आईसाठी तर सारे करायचे आणि तिला का दुःखात ठेवून जायचे ? तुझी आठवण काढून ती माऊली रडत बसेल. नोकरी सुटली तर दुसरी मिळेल.' 'अग पंचवीस एके पंचवीस. आपणास पुढे यायला हे लोक वाव देत
नाहीत. दिवसभर नुसती हमाली करायची. नवीन ज्ञान घेऊ देत नाहीत, सारे
अप्पलपोटे.
'नवीन चांगली नोकरी मिळेपर्यंत तू शीक, अभ्यास कर. मागे म्हणत असायचास की उर्दूचा अभ्यास करीन. फ्रेंच शिकेन. शीक शिकता येईल तेवढे.
'मॅट्रिक तर नाही होता आले.'
'घरी शीक. सुमित्राबाईचे वडील पुस्तके देतील. असा निराश नको होऊस मुरारी, कोठे जाऊ नकोस.'
ती दोघे बोलत जात होती. इतक्यात एक लठ्ठ बाई रस्त्यात पाय घसरून पडली. तिच्या हातातले सामान पडले. लोक हसत होते. फिरायला जाणाऱ्या ऐटबाज पोशाखी मुली त्या लठ्ठ बाईची फजिती पाहून हसत होत्या. परंतु मुरारी तिथे धावून गेला. त्याने त्या बाईला आधार दिला. त्याने तिचे सामान गोळा करून दिले.
'लागले की काय?' त्याने विचारले.
'होय, बाळ, माझा हात धरून नेशील का माझ्या घरी? पलीकडच्या रस्त्याला माझा बंगला आहे.
'मिरे, मी यांना पोहोचवायला जातो. तू घरी जा. मी त्यांना पोचवून येतो."
मिरी गेली. त्या लठ्ठ बाईंचा हात धरून मुरारी जात होता. येणारे-जाणारे कौतुकाने, विस्मयाने पाहात होते. तरुण-तरुणी मिस्किलपणे हसत होती.
मुरारी ऊंच होता. तेजस्वी नि सुंदर दिसत होता. परंतु मुरारीला त्याची लाज वाटत नव्हती. तो शांतपणे जात होता. एका सुंदर तरुणाची आपल्याला मदत मिळाली म्हणून त्या बाईला जणू अभिमान वाटत होता.
तो बंगला आला.
'मी जाईन आता, बाळ तुझे नाव काय?'
'माझे नाव मुरारी.'
'तुझा पता एका कागदावर लिहून दे नि जा.'
त्याने पत्ता लिहून दिला. नमस्कार करून तो गेला. तो घरी आला. मिरी
हसत होती. त्या बाईची हकीगत सांगत होती.
'या प्रियकर!' ती थट्टेने म्हणाली.
'कोणाचा प्रियकर?'
'जिचा हात हातात घेतला तिचा. केवढी अगडबंब बाई! मलासुध्दा हसू येणार होते. मुरारी, तुला मी भ्याले. '
'मी वाघ आहे वाटते?'
'तू माणूस आहेस म्हणूनच भ्याले. वाघ असंतास तर इतकी नसते भ्याले. ' 'आई, मिरीला जेवून जायचे आहे ना? वाढ तर पाने. तिला उशीर
होईल.
'माझी ब्याद लवकर घालवायची आहे वाटते?'
'सुमित्राताई, वाट बघत असतील, म्हणून हो मिरे. मी घालवू पाहीन ढीग;
परंतु तू का जाणार आहेस? सा-या मुलुखाची तू लोचट. खरे ना ?' यशोदाआईंना दोघांची पाने वाढली. मिरीचे जेवण लवकर संपले.
'मी जाते रे मुरारी.'
'एकटी जाशील?'
'जाईन हो. मी भित्री नाही म्हटले. '
मिरी गेली. सुमित्राताई गॅलरीत बसल्या होत्या. मंद शीतल वारा येत होता. फुलांचा सुगंध येत होता. हळूच येऊन मिरी सुमित्राताईजवळ बसली. वातावरण शांत होते. मिरीही डोळे मिटून तेथे बसली.
'अजून या पोरीचा पत्ता नाही. शेफारून ठेवली आहे.' आजीबाई खालून
ओरडत आल्या.
'येईल हो. मुरारी घरी आला असेल.'
‘ही बघा. आली आहे तर खरी, तुमच्याजवळ बसली आहे.'
'केव्हा आलीस मिरे ?'
'थोड्या वेळापूर्वी. तुमच्याजवळ डोळे मिटून बसावे असे वाटले. '
'जा बाळ, जेवून घे. मला भूकच नाही. '
'मलासुद्धा नाही.'
'मग जाताना सांगून का नाही गेलीस? उद्या शिळे खाल्ले पाहिजे.' 'खाईन. मला तर शिळे आवडते.'
'मिरे, दोन घास खा, हवे तर. "
करू?'
'नको मुरारीकडे थोडे जेवले. यशोदाआई एरवी येऊ देत ना. मग काय
'आजीबाई तुम्ही घ्या जेवून. बाबा आज जाणार आहेत कोठे तरी फराळाला.
आजीबाई गेल्या. मिरी तेथे बसली होती. सुमित्राने तिला जवळ ओढून घेतले. 'तू येथे सुखी आहेस ना?'
'सुखी आहे. मला काही सांगा.'
'काय सांगू? चांगली हो; आणखी काय सांगायचे?'
'चांगली होऊ म्हणजे काय करू?'
‘ज्याची मागून लाज वाटेल असे काही करीत जाऊ नकोस.' मिरीने त्या लठ्ठ बाईची गोष्ट सांगितली. मुरारीने हात धरून तिला नेले, तेही सांगितले. 'त्याची निराशा सुटणार आहे. तो निराश झाला आहे. कोठे जावे निघून, म्हणतो.'
'त्याची निराशा टिकणार नाही. प्रेमळ व पवित्र माणसाची निराशा फार वेळ टिकत नाही. जरा कोठे दुसऱ्याचे दुःख किंवा अडचण दिसताच अशी माणसे धावून जातात. पुन्हा आशावंत होऊन काम करू लागतात. दुष्ट माणसांची निराशा भयंकर असते. परंतु सज्जनांची निराशा पुन्हा आशेलाच जन्म देत असते, सेवेलाच जन्म देत असते.'
निशिगंधाच्या फुलांचा वास येत होता आणि पारिजातकाच्या कळ्या फुलल्या होत्या. गोड वास. वर अष्टमीचा चंद्र होता. सारी सृष्टी प्रसन्न होती. दूर कोठे तरी भजन चालले होते. एकतारीवरचे भजन.
'आज एकादशी आहे. भजन चालले आहे.'
'सुमित्राबाई, तुम्ही एकादशी नाही का करीत? उपवास नाही का करीत?'
‘मला उपवास सहन होत नाही. लगेच पित्त होते. बेताचे खाणे एवढेच माझे व्रत कसे सुंदर भजन चालले आहे ! मिरे, तू काहीतरी वाजवायला शीक.
‘शिकू तरी केव्हा? चित्रकला शिकायची इच्छा होती. परंतु तीही राहिली. '
'तू जात जा चित्रकलेच्या वर्गाला.'
'एखाद्या वेळेस वाटते, कशाला हे सारे सोस? मुरारी चित्रे सुंदर काढतो. परंतु त्याची कला कारकुनीत मरुन जाणार.'
‘बाबा आले वाटते, मिरे? तू आता जाऊन झोप. नाही तर बस लिहीत- वाचीत. मी येथेच बसते. बाबा येतील. त्यांच्याशी थोडा वेळ बोलेन. मग मी जाऊन पडेन. तू जा बाळ.'
मिरी आपल्या खोलीत गेली. ती अंथरूण घानून पडली. मुरारी कोठे जाईल की काय हा विचार तिच्या मनात राहून राहून येत होता. तिला वाईट वाटत होते. केव्हा झोप लागली ते तिला कळलेसुध्दा नाही. स्वप्नात तिला कृपाकाका दिसले. हातात कंदील नि खांद्यावर शिडी असलेले कृपाकाका!