shabd-logo

7 June 2023

7 पाहिले 7
मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.'

'ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-पोलके तिला छान दिसत होते. तिने नानांचा हात धरला.

'हात नको धरायला. मी पडणार नाही.

'पण धरू दे ना हात!'

तिने घरलाच त्यांचा हात. ते मंदिरात आले. ते दोघेही आत गेले. नाना बसले जाऊन. तेथे कुंचले होते. रंग होते. ते लागले काम करायला.

'मी जाऊ, नाना?'

'जा. घरीच जा.'

मिरी निघाली. परंतु तिने आधी सारे मंदिर पाहिले. तो एका ठिकाणी तिला कोण दिसले? ती थबकून उभी राहिली. कोण होते तेथे? डोळे मिटून कोणी तरी तेथे बसले होते. मिरी जवळ गेली.

'कोण आहे?' त्या व्यक्तीने विचारले. 'मी मिरी. तुम्ही अशा का बसल्यात?'

'येथे मंदिरात एक गवई येणार होते. म्हणून मला बाबांनी येथे आणून बसविले. बाबा कोठे तरी गेले. तो गवईही नाही आला. म्हणून येथे बसले

आहे.'

'तुम्हाला दिसत नाही?’

'बाहेरचे नाही दिसत.'

'मग कोठले दिसते?' 'मनातले सारे दिसते.'

'मनात काय असणार? बाहेर खरी मजा. तुम्हाला काही नाही दिसत? झाडे, फुले, पाखरे, दिवे, आकाशातील तारे, काही दिसत नाही? माझे तोंड,

माझे डोळे नाही दिसत?'

'नाही. काही नाही दिसत.' 'माझे डोळे नाही पाहिलेत ते बरेच झाले.'

'का बाळ असे बोलतेस ? मला पाहता येत नाही ते का बरे? दुसऱ्याला

'डोळे नसणे ते का बरे?"

'तसे नाही, परंतु माझे डोळे चांगले नाहीत. आत्याबाई नेहमी नावे ठेवायची. '

'कोण आत्याबाई?'

‘ती मला मारणारी; माझे मांजरीचे पिलू उकळत्या पाण्यात टाकणारी;

मला घरातून घालवून देणारी.'

'तू का ती मिरी? कृपारामांनी आणलेली ती का तू?'

'हो. तुमच्या ओळखीचे आहेत कृपाकाका?"

'हो. तू बरी आहेस आता ?'

'आता बरी आहे मी. घरात काम करते.

'तू शाळेत जातेस का? आता शाळा उघडतील. मी कृपाकाकांना सांगितले आहे. शीक. वाचायला शिकलीस की माझ्याकडे येत जा. छानछांन पुस्तके देईन. ती मला वाचून दाखव. शहाणी हो.'

'तुमचे घर कोठे आहे?' 'कृपाकाका दाखवतील.'

'तुमचे डोळे नाहीत. किती वाईट गोष्ट. डोळे हवेत. '

'परंतु नाहीत त्याला काय करायचे ? परंतु देवाने मला आत डोळे दिले आहेत. तेथे सारे चांगलेच दिसते. तुझी आत्याबाईसुध्दा तेथे मला चांगली

दिसते.'

'ती दृष्ट आत्याबाई. मी परवा मुरारीबरोबर जात होते. तो सायंकाळ झाली नि आत्याबाईचे घर आले. मुरारी पुढे गेला. मी एक दगड घेऊन आत्याबाईच्या खिडकीवर मारला; नि पळून आले.'

'मी ऐकले होते.'

'कोणी सांगितले तुम्हाला? कृपाकाकांनी?'

'हो, असे नको पुन्हा करूस. तुला आई-बाप नाहीत. आत्याबाईंनी बरे- वाईट का होईना, तुला इतके दिवस सांभाळले खरे ना? आणि ते पिलू त्यांनी रागाने फेकले. ते चुकून त्या पाण्यात पडले. मुद्दाम फेकले असेल का?'

‘मुद्दाम नसेल फेकले; परंतु फेकले काय म्हणून?'

'ती पडली नि तू तिला हसलीस म्हणून तिला राग आला. आणि आत्याबाई, समजा, दुष्ट असली म्हणून आपणही दुष्ट व्हायचे का? आपण का दगड मारायचा? ती एक दुष्ट आणि तूही दुष्ट होणार का? मग दोन दुष्ट माणसे झाली. जगात चांगली आधिक होऊ देत. दुष्ट कशाला? खरे ना बाळ? तुला मुरारी धडे देतो ना?'

'हो. मुरारी मला आवडतो. चित्रे काढतो, गोड बोलतो. परंतु मी दगड फेकल्याचे सांगितले तेव्हा त्याने मला थप्पडही मारली. मी रागावले. मागाहून म्हणाला, रागावू नकोस, मिरे. '

'मुरारी चांगला मुलगा आहे. आईवर त्याचे फार प्रेम आहे. आईचीही सारी भिस्त त्याच्यावर आहे."

'मुरारी आता शिकणे सोडणार नि नोकरी करणार !'

'इतक्यात नोकरी?'

'आईला मी आता मदत केली पाहिजे असे तो म्हणतो. आईने किती कष्ट काढावे, खस्ता खाव्या, असे त्याला वाटते. आईला श्रमवून शिकत बसणे म्हणजे चैन आहे असे तो कृपाकाकांजवळ म्हणाला. '

'खरे आहे त्याचे म्हणणे.'

इतक्यात कोणी तरी तेथे आले. मिरी चपापली.

'सुमित्रा, तुला बोलायला भेटली वाटते मिरी ?"

'हो. किती छान बोलते !'

'माझे नाव तुम्हाला काय माहीत?'

'तू आजारी होतीस तेव्हा आलो होतो मी पहायला. डॉक्टर घेऊन आलो होतो. या सुमित्राचे सारखे सांगणे की डॉक्टर घेऊन जा. तिला गरम बंडीसाठी कापड द्या. '

'त्या गरम बंडीचे कापड तुम्ही दिलेत ?'

'हो.'

'अय्या ! मला माहीतच नाही. तुम्ही कशाला दिलेत ?'

'कृपाकाका एका अनाथ मुलीचे मायबाप बनतात. आम्ही इतकेही करू नये का? गरिबांची हृदये सोन्यासारखी असावीत आणि श्रीमंतांची का दगडाची असावीत? तुला घरी आणल्याचे कृपाकाकांनी जेव्हा मला सांगितले, तेव्हा माझे हृदय भरून आले होते. मी त्यांना म्हटले, मिरीला वाढवा. काळजी करू नका. आम्हीही मदत करू. मिरे, आम्हीही तुझेच आहोत. हे माझे बाबा, बरे का! येत जा आमच्याकडे.'

'घर बघून ठेवीन.'

'आताच चल आमच्याबरोबर.

ती तिघे निघाली. एका बंगल्यात शिरली. लहानसा टुमदार तो बंगला होता. सभोवती बाग होती. कृष्णचंद्रांनी सुमित्राला तिच्चा खोलीत नेले. खोली स्वच्छ होती.

'मिरे, बस, ये माझ्याजवळ.' सुमित्रा म्हणाली. कृष्णचंद्रांनी मिरीला खाऊ आणून दिला. ती तेथे सारे बघत होती.

'ही किती पुस्तके! ही कोण वाचते?"

'मी वाचीत असे पूर्वी, जेव्हा डोळे होते तेव्हा. आता बाबा वाचून दाखवतात. नवीन चांगले पुस्तक दिसले की ते घेऊन येतात. तू शिक वाचायला लवकर. मग तू ही पुस्तके वाचशील.'

'मला येतील का वाचता?'

'माणसाच्या मनात असले म्हणजे त्याला सारे येते." ‘मी शिकेन. खूप शिकेन. मुरारी म्हणतो की खूप शिक.'

'जा आता घरी वाट पाहतील.' ‘मी फुले नेऊ? कृपाकाकांना देईन. ध्रुव नारायणांच्या चित्राला घालीन माळ करून. '

‘आणि तुझ्या केसात नको का लबाडे? मी घालीत असे माझ्या केसात!' 'तुमच्या केसात घालू का मी?'

'आता नको. मी का लहान आहे? तू घाल हो तुझ्या केसात ने तोडून.

कशात नेशील? बाबा तिला रूमाल द्या एखादा ' मिरी एका सुंदर रूमालात फुले घेऊन घरी गेली. तिने यशोदाआईंना ती फुले दाखविली.

'सुमित्राताई फार मायाळू आहेत.' त्या म्हणाल्या. 'त्याच्या घरी कोण करते काम?'

'त्यांच्या घरी एक आजीबाई आहे. ती सारे करते. ती जणू त्यांच्या घरातलीच झाली आहे. कृष्णचंद्रांचे मुरलीवर फार प्रेम. बिचारी आंधळी आहे; परंतु आमच्यापेक्षा तीच डोळस आहे. तिला सर्वत्र देवाचे राज्य दिसते.'

'देवाचे राज्य?'

'आपण मनात सर्वांचे भले चिंतणे म्हणजेच देवाचे राज्य. आपण सारी देवाची लेकरे. देवाचे सर्वांवर प्रेम आहे. म्हणूनच आपणही सर्वांवर प्रेम करावे. '

'त्या दुष्ट आत्याबाईवरसुद्धा?'

'हो, तिच्यावरसुद्धा.'

'तुम्ही कराल का, यशोदाआई?'

'मिरे, हे कठीण आहे. पण प्रयत्न करावा. आधिक चांगले होण्याचा आपण प्रयत्न करीत राहिले पाहिजे. जा, आता कृपाकाका येतील. शेगडी पेटव. आज भाजी कसली करशील?'

'मुळ्याची करीन. मला येईल करायला.'

मिरी खोलीत गेली. तिने पुन्हा एकदा खोलीचा केर काढला. तिने भाजी चिरली. चूल पेटवून तिने तीवर भाजी शिजत ठेवून दिली आणि नळावर गेली. कपडे धुऊन, अंग धुऊन आली. केस नीट विंचरून तिने केसात फुले घातली. मग ध्रुव नारायणांच्या तसबिरीला तिने हार घातला आणि हात जोडून ती म्हणाली, 'देवा, तू कुठे रे असतोस ? असशील तेथे मिरीचा नमस्कार घे.'

ती पाटी घेऊन लिहीत बसली. सुमित्रानी तिच्यासाठी सचित्र पुस्तक पाठविले होते. पुस्तकही ती वाचत बसली पुन्हा लिही. कृपाराम, मुरारी असे शब्द लिहिले. तिने स्वतःचे नाव लिहिले मिरी. नंतर पुन्हा तिने सारे पुसून टाकले. ती निराळे लिहू लागली.

'कृपाकाका मला फार आवडतात मुरारी मला आवडतो. माझे मोठे डोळे मुरारीला आवडतात. यशोदाआईंना मी आवडते. माझ्या केसात फुले घातली आहेत. एक फूल मुरारीला देईन. एक कृपाकाकांना. कृपाकाका मग माझा मुका घेतील नि हसतील. मी पण हसेन. मुरारी हसेल. सारी हसू, सारी नाचू, सारी खेळू.'

ती उठली. भाजी झाली होती. तिने भाकरी केली आणि कृपाकाका आत आले.

'आज फुले कोठली, मिरे?'

'सुमित्राताईकडची. त्यांनीच माझ्या पेटीसाठी कापड पाठविले; होय ना बाबा?'

'तुझी त्यांची ओळख झाली वाटते.' ‘हो; त्यांच्या घरीसुद्धा गेले होते. खाऊ खाल्ला. फुले तोडून आणली. ही बघा केसात.

'छान दिसतात तुला.'

'आणि हे तुम्हाला फूल.

'हे दुसरे कोणाला?'

'मुरारीला. तुम्ही आता आंघोळ करा. आपण लवकर जेवू. मग मी लिहीत- वाचीत बसेन. हे बघा पाटीवर लिहिले आहे. ' 'बघू!'

कृपाकाकांनी ते वाचले. त्यांनी तिला शाबासकी दिली. इतक्यात मुरारीही आला.

'आज मिरीची ऐट आहे अगदी. केसांत फुले आणि कानांत नकोत का ?'

'आणि नाकात नकोत का? तू थट्टाच करतोस !'

‘आणि हे पाटीवर काय? तुझे डोळे मला आवडतात म्हणून कुणी सांगितले? आणि आईंला का तू आवडतेस ? पाटीवर काही तरी लिहावे वाटते ?'

'मिरी कुणाला आवडत नाही, असे उद्या लिहीन. तू जा. तूला फूल ठेवले आहे ते देतच नाही. जा तू.'
'तुझ्या केसातील"काढ तर खरे. मी मारीन काढून 'पळवीन.'

'मी तुला मारीन. फिटंफाट होईल.'

'तू जा मुरारी.’

‘अग मिरे, असे काय करतेस? बसू दे त्याला. मुरारी चांगला आहे. तुला तो शिकवतो. चित्रे देतो. '

'आणि माझ्याशी भांडतो. रडवतो मला.'

'आणि हसवीत नाही वाटते? सारे सांगा की. ' कृपाकाका नि मिरी जेवायला बसली.

'मुरारी, भाजी खातोस?'

‘मी भांडतो ना? मग कशाला विचारतेस? नको मला भाजी, नको फूल. 'मी यशोदाबाईंना नेऊन देते. त्या तुला वाढतील. झक्कत खाशील.'

तुझे काही नको.'

'मी जातोच घरी.'

'मुरारी, मुरारी हे फूल ने.'

'कुठे आहे? दे लवकर.'

'नाही देत जा. एवढा ऐटीने निघाला होतास तर परत कशाला आलास? माझे फूल मागायला आला भिकारी.'

मुरारी गेला. रागावून गेला. दोन दिवसांत मग तो मिरीकडे पुन्हा आला नाहीं. मिरी रडकुंडीस आली. कृपाकाका कंदील लावायला गेले. मिरी खिडकीत बसली होती. इतक्यात हळूच येऊन कोणी तरी तिचे डोळे धरले.

'मुरारी आहे.'

'तू पाहिले होतेस मला येताना.'

'नाही काही. परंतु अशा खोडया तुझ्याशिवाय कोण दुसरे करणार? माझे मोठे डोळे तुला कुस्करून टाकायचे असतील!'

'फुले कोणी कुस्करते का? का त्यांना कुरवाळतात?'

“एवढ्या जोराने डोळे धरणे हे तुझे कुरवाळणे वाटते? आणि तू आलास का? दोन दिवसांत एकदा तरी आलास का? मिरी तुझ्यासाठी रडत होती.'

‘मला जा म्हणतोस आणि आलो नाही तर पुन्हा रडतेस? विचित्रच आहेस

'असू दे जा. मी वाईटच आहे. तू कशाला आलास?'

तू.'

'मिरे, उद्यापासून मी एका ठिकाणी नोकरी धरली आहे. आता फक्त शनिवारी रात्री येईन, रविवारचा दिवस राहीन. पुन्हा सोमवारी उजाडत जाईन. दर आठवड्यात असेच. आता वरच्यावर मी भेटणार नाही. दररोज भांडायला नाही. म्हणून आज आलो. चल, आपण फिरायला जाऊ.'

'चल, बाजारपेठेतून जाऊ.' दोघे फिरायला गेली. मुरारी मिरीला सारे दाखवीत होता. बाजारपेठेत

मोठमोठी दुकाने होती. मोठमोठे बंगले होते. तो पहा एक बंगला. तो सुंदर दिवाणखाना. आत हंडया आहेत. झुंबरे आहेत. सुंदर दिवे आहेत. आणि त्या पाहा दोनतीन मुली. त्यांची जरीची पातळे. अंगावर दागिने ! मिरी बघतच सीहली.

‘काय बघतेस, मिरे? ते घर तुला का आवडले?'

'केवढे घर! हंड्या-झुंबरे. त्या मुली बघ. जरीची पातळे!' 'तुला हवे का जरीचे पातळ!'

'कोण देईल मला ! कृपाकाका गरीब आहेत आणि सगळ्यांनाच मिळतील जरीची पातळे?" 'मी देईन तुला पातळ, जरीचे पातळ. मी मोठा होईन.'

'मोठा होऊन काय करशील?" 'आईला विश्रांती देईन. तिला चांगली लुगडी घेईन. आजोबा मग घरीच बसतील. त्यांना म्हातारपणी मग श्रम नकोत आणि तुला पाहिजे असेल ते देईन.'

'आणखी काय करशील?'

'मी मोठा होईन आणि जवळ असेल ते सर्वांना देईन. गरिबांचा मित्र

होईन. कृपाकाकांचा कित्ता गिरवीन.' 'कधी होशील तू मोठा? तुला त्या ठिकाणी किती मिळणार पगार?'

'जेवून खाऊन पंधरा रुपये.

'फक्त पंधराच? आणि दिवसभर तेथे राबायचे!'

'आरंभी असेच असते. मला अनुभव मिळेल. नदी उगमाशी किती लहान असते.

तीच पुढे केवढी होते!'

‘मुरारी, तू मोठा झाल्यावर मला विसरशील.'

'असे तुला वाटते का?'

‘काय सांगू? एखादे वेळेस वाटते की, मिरीला कोणी राहणार नाही. कृपाकाकांनाही अलिकडे बरे नसते. त्यांचे सांधे दुखतात. तरी त्यांना काम करावे लागते. ते परवा यशोदाआईजवळ काय म्हणाले माहीत आहे का?"

'काय म्हणाले?"

'मी फार दिवस वाचणार नाही. या मिरीचे कसे होईल? असे ते म्हणाले. माझ्या कानी पडले. '

'कृपाकाका एवढ्यात नाही जाणार सोडून.' 'तुझ्या देवाला माहीत. '

'माझा देव तुझाही आहे, सर्वांचा आहे.'

'माझे कोणी नाही.'

'मिरे, असे का म्हणतेस? तुला आत्याने घराबाहेर घालवले. तुला

कृपाकाका मिळाले. मी आहे. आई आहे. सुमित्राताई आहेत. कृष्णचंद्र आहेत. जमनी आहे. किती मित्र!'

'परंतु देवाने दिले, तोच पुन्हा नेईल!'

'तो एक नेईल तर दुसरे दहा देईल. त्याची दया अनंत आहे. चल, आपण भराभर जाऊ. 'मुरारी, ते बघ कृपाकाका जात आहेत. आपण त्यांचे ओझे घेऊ.' दोघे

धावत गेली.

'काय ग मिरे?'

'तुमची शिडी मी घेते. आणा.'

'उचलेल का तरी ? वेडी आहेस तू. नाहीतर मलाच घे कडेवर घेतेस

'इश्श्य! हे काय कृपाकाका?' 'मग ही शिडी कशी घेशील?'

'मी म्हणजे मुरारी घेईल.'

'अस्से! आपले नाव आणि मुरारीला काम ?'

'मी कंदील घेते. आणा.'

मुरारीने खरेच शिडी घेतली. मिरीने कंदील घेतला. तिघे हसत-खेळत घरी आली.

आणि दुसऱ्या दिवशी मुरारी त्या नोकरीवर गेला. मिरीही आता शाळेत जाऊ लागली. तिला समजूत आली होती ती वर्गात पहिली असे. श्रीमंतांच्या मुली तिला हसत. एकदा तर काही मुली तिच्या पाठीस लागल्या. 'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणाऱ्याची मुलगी' असे म्हणून तिला हिणवीत होत्या.

'दिवे लावणारा वाईट वाटते?' तिने विचारले.

'आता तूही उद्या दिवे लाव.' मुली मोठ्याने हसून म्हणाल्या.

मिरी रडत घरी निघून गेली. ती शाळेत जाईनाशी झाली. कृपाकाकांनी खूप समजूत घालण्याची खटपट केली. परंतु मिरी ऐकेना. शेवटी सुमित्राबाईनी मिरीला घरी बोलावले. त्यांनी तिची समजूत घातली. त्या म्हणाल्या, 'मी तुमच्या वर्गावरच्या बाईंना तसेच मुख्य बाईंना कळवले आहे. त्या मला ओळखतात. माझ्याकडून पुस्तके नेतात. तुला चिडवणाऱ्या मुलींना त्या रागे भरल्याही. आता तू जा शाळेत. असे हट्टास पेटू नये.'

मिरी पुन्हा शाळेत जाऊ लागली. ती शरीराने वाढत होती. मनाने, बुध्दीने वाढत होती. कृपाकाकांना परमआनंद होत होता.

परंतु ते आजारी पडले. त्यांना संधिवाताचा फार मोठा झटका आला. मुरारीही चार दिवस रजा घेऊन सेवाशुश्रुषा करण्यासाठी आला. कृष्णचंद्र सुमित्राला घेऊन आले होते. सुमित्रा कृपाकाकांजवळ बसली होती. ती त्यांना म्हणाली 'तुम्ही मिरीची काळजी करू नका. मिरीला मी माझ्याकडे नेईन. तुम्ही निश्चिंत राहा. माझ्याकडून होईल तेवढे तुमचे मी करीन.'

'आता मी सुखाने मरेन. मिरी मोठी गोड मुलगी आहे. किती झपाट्याने ती सुधारत आहे! किती चांगली होत आहे. तिला किती समजते ! माझ्या जीवनात तिने किती आनंद ओतला!'

'तुम्ही अनेकांच्या जीवनात आनंद ओतला आहे. कृपाराम, तुम्ही

आमच्याकडे काम करायला होतेत. तुम्हांला दुकानात काम करावे लागे.

आणि ती पेटी तुमच्या अंगावर पडली किती दिवस तुम्ही आजारी होतेत!' ‘परंतु तुम्ही माझी काळजी घ्यायला लागतात आणि इतर काम मला होत नसे म्हणून वडीलांकडून ही म्युनिसिपालिटीची नोकरी मला देववलीत. तुमचे उपकार.

‘उपकार कसले, कृपाराम ? तुम्ही आमचे काम करताना मरणार होतेत. गोरगरिबांचे प्राण असे किती जात असतील. कारखान्यातून अपघात होतात आणि मग थोडी नुकसानभरपाई देतात. परंतु गेलेले प्राण, त्यांची का किंमत होईल? ज्यांचा मनुष्य मरतो, त्यांना काय वाटत असेल? कृपाराम, तुमची प्रकृती त्या वेळेपासून नाजुक झाली होती. तुम्ही लग्रही केले नाही. कारण, केव्हा झटका येईल याचा नेम नव्हता. तुम्ही सर्वांजवळ गोड बोलायचे, गोड हासायचे, सर्वांना मदत करायचे. खरोखरच तुम्ही प्रकाश देणारे होतात. तुम्ही नुसते म्युनिसिपालिटीचे दिवेच लावीत नव्हता, तर अनेकांच्या हदयांतही तुम्ही प्रेमस्नेहाचे, माणुसकीचे, उदारतेचे नंदादीप लावले आहेत. मंडईत जावे, सारे तुमची आठवण काढतात. काल मिरी गेली होती मंडईत, तर एकाने तुम्हाला आवडणारी भाजी दिली; दुसऱ्याने फळे दिली, तुमची आस्थेने चौकशी करीत. मिरी मला सारे सांगत होती. धन्य तुमचे जीवन !'

'सुमित्राबाई, तुम्हांला सारे चांगले दिसते. तुम्ही निराळे डोळे मिळविले आहेत. तुम्ही तर देवाच्या राज्यात वावरता. कुशाल वाईट कधी तुम्ही म्हटले आहे का? तुमच्या जीवनात इतकी शांती, इतके समाधान, इतके निरपेक्ष प्रेम; हे सारे कोठून आले? दुसरे कोणी आंधळे झाले असते तर आदळआपट केली असती. जगाला शिव्या देत तो राहिला असता. तुमची गोष्ट निराळी. आणि प्रकाशबाबू! कोठे असतील ते! तुम्ही एका शब्दांनेही त्यांना नाव ठेवले नाही.' 'कृपाराम, नको त्यासंबंधी बोलणे, माझा प्रकाश माझ्याजवळ आहे.

आंधळी असूनही मी इतकी आनंदी, शांत, प्रसन्न राहते ती का उगीच ? बाबांनी

प्रकाशला घालवले. प्रकाशचे शरीर त्यांनी घालवले. प्रकाशाचा तेजस्वी,

मंगल आत्मा माझ्या हृदयामंदिरात आहे. त्याची प्रभाच माझ्या जीवनाला

व्यापून आहे. बाबांना आता वाईट वाटते प्रकाशवर त्यांनी केलेले आरोप खरे

नव्हते, हे त्यांना मागून कळले. परंतु आता काय ? प्रकाश पृथ्वीवर असला तर

सुखी असो. देवाघरी असला तर सुखी असेलच. प्रकाशशिवाय कोणाचीही

मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर कधी दिसू नये म्हणून का प्रभूराजाने माझे बाह्य डोळे

नेले?'

'सुमित्राताई, तुम्ही सर्व गोष्टींत चांगलेच पाहता. माझ्या मिरीला तुमची थोर संगती मिळेल. मिरी म्हणजे एक रत्न आहे. तुमच्या संगतीत या हिप्याला नीट पैलू पडतील. तिचे तेज अधिकच फाकेल. मिरीला तुमच्या पदरात मी घातले आहे. मी तुम्हाला बोलावणारच होतो. तुम्हीच आलात. जणु माझ्या मनाची वेदना तुम्हांला कळली. '

सुमित्राताई नि कृष्णचंद्र गेले. मिरी कृपाकाकांचे हात-पाय शेकवी.

प्रेमाने जवळ बसे. त्यांच्याकडे प्रेमाने बघे. मुरारीही मधूनमधून जवळ बसे.

'मिरे, बाळ, तू मनाने तयार आहेस ना? आज-उद्या मला देवाचे बोलवणे येईल. खालचे दिवे लावणारा वर देवाच्या घरी देवाच्या राज्यात दिवे लावायला जाईल. तू शोक करू नकोस. सुमित्राताई आता तुला नेणार आहोत. त्या आता तुझ्या. मुरारी आहे. चांगली हो. तू आहेसच चांगली. मी वरून तुला आशीर्वाद पाठवीत जाईन.'

'कृपाकाका, पुन्हा मी एकटी होईन.'

'नाही, बाळ. सुमित्राताई आहेत. कितीतरी इतर प्रेमळ मंडळी आहेत. मुरारी तुला आंतर देणार नाही.'

'तुमचे प्रेम ते तुमचे. '

'प्रभूचे प्रेम सर्वांच्या हदयात आहे. त्याचा सुगंध सर्वांच्या जीवनात आहे. जरा प्रकार निराळे. त्यातच मौज. सुखी हो. सद्गुणी हो. देवाला आठव. सर्वांची आवडती हो. अधिक काय सांगू बाळ?"

कृपाकाका शांत होते. यशोदाआई आल्या. मुरारी आला. नानाही बाजूस येऊन बसले. जमनीही आली आणि सर्वांच्या प्रेमळ सान्निध्यात त्या देवमाणसाने राम म्हटला.

'कृपाकाका, कृपाकाका' मिरीने हंबरडा फोडला.

'नको रडूस मिरे, कृपाकाकांच्या आत्म्याला क्लेश होतील. नको रडूस; आम्ही आहोत तुला. पूस डोळे. आपण शांत राहू.' मुरारी स्फुंदत म्हणाला. 'तुला सुद्धा रडू येत आहे. मग मला रे किती येईल?' मिरी त्याच्या खांद्यावर मान ठेवून हुंदके देत म्हणाली.

कृष्णचंद्र आले. इतर मंडळी आली. मंडईतील मित्र आले. त्या एकाकी माणसाचे शेकडो मित्र होते. आणि सर्व जातीजमातींतील.

हुसेनभाई, रामा महार, गोविंदा गवळी- ते बघा सारे आले आहेत आणि ते गोटीराम बघा! त्याच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. भजन करीत, फुले उधळीत कृपाकाकांचा देह नेण्यात आला. मुरारी आज मिरीजवळ बसून होता. तो सद्गदित होऊन म्हणाला.

‘मिरे, उद्या मला कामाला जायला हवे. मी रविवारी येईन. तू रडू नकोस. काही दिवस आमच्याकडे राहा. पुढे सुमित्राताईकडे जायचे झाले तर पाहू. दहा दिवस होऊ देत. हो मिरे ! हा कृपाकाकांचा कंदील! याला जप. ही त्यांची काठी. त्यांच्या वस्तू आपण जपून ठेवू. त्यांनी आपल्या सर्वांच्या हदयात तर अभंग कंदील लावलेच आहेत, खरे ना? मिरे, तू माझी आहेस. मी तुझा होईन. मी तुला अंतर देणार नाही. मी मोठा होईन. आपण सुखी होऊ. सर्वांना सुखी करू हो मिरे!”

11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा