प्रश्नकर्ता: पुष्कळ वेळा असे होते की, आपण अशुभ कर्म बांधत असतो आणि त्यावेळी बाहेरील उदय शुभ कर्माचा असतो ?
दादाश्री हो, असे होत असते. आता तुमचा शुभ कर्माचा उदय असेल पण आत तुम्ही अशुभ कर्म बांधत असाल.
तुम्ही बाहेर गावाहून इथे शहरात आले असाल आणि रात्री उशीर झाला असेल तर आत विचार येतो की आता आपण कुठे झोपणार? मग तुम्ही म्हणता की इथे माझा एक मित्र राहतो, तेथे आपण जाऊया. म्हणजे ते चार जण व पाचवे तुम्ही, साडे अकरा वाजता त्या मित्राच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावता. तो विचारतो, कोण आहे? तेव्हा तुम्ही सांगता 'मी आहे. ' तेव्हा तो म्हणतो, 'उघडतो. ' दरवाजा उघडल्यावर तो तुम्हाला काय म्हणतो? पाच जणांना बघतो, तुम्हाला एकट्याला बघत नाही, तर सोबत चार-पाच जणांना बघतो, त्यावर तुम्हाला काय म्हणेल? 'परत जा' असे म्हणेल का?
'या या तुमचे स्वागत आहे!' आपल्याकडे तर सर्व खानदानी माणसं, 'या या स्वागत आहे' असे बोलून घरात घेतात.
प्रश्नकर्ता: तो असे सुद्धा म्हणेल की, 'केव्हा आलात आणि केव्हा परत जाणार आहे?'
दादाश्री : नाही, खानदानी माणसं असे बोलत नसतात. ते तर 'या या स्वागत आहे तुमचे' असे बोलून बसवून घेतात, पण त्यांच्या मनात काय चाललेले असते? की आता कुठून आले मेले हे बांधले कर्म. तसे करण्याची गरज नाही. ते आले आहेत, त्यांचा हिशोब असेपर्यंत राहणार. नंतर निघून जाणार त्याने हा जो शहाणपणा केला की, 'आता कुठून आले मेले' ते बांधले कर्म. आता जेव्हा हे कर्म बांधले तेव्हा मला विचारून घ्यायचे की, 'माझ्याकडून असे घडत असते, त्यावर मी काय करु?' तेव्हा मी सांगेल की, त्यावेळी कृष्ण भगवंताला मानत असाल, किंवा ज्यांना मानत असाल, त्यांचे नांव मनात स्मरुन, हे भगवंता! माझी चुक झाली, अशी चुक पुन्हा करणार नाही', अशा प्रकारे माफी मागाल तर सर्व पुसले जाईल. बांधलेले कर्म लगेचच पुसले जाईल. जो पर्यंत पत्र पोस्टात टाकले जात नाही, तो पर्यंत ते (पत्रातील मजकूर) बदलू शकतो. पोस्टात टाकले अर्थात हा देह सुटला, मग कर्म बांधले गेले. म्हणून हा देह सुटण्यापूर्वी तुम्ही ते सर्व पुसून टाकले तर ते पुसले जाईल. आता त्याने एक कर्म तर बांधले ना?
आणि पुन्हा तो तुम्हाला काय विचारतो? अरे मित्रा, जरा थोडीशी, थोडीशी...? काय विचारतो 'जरा थोडीशी? म्हणजे चहा किंवा कॉफी असे काहीच स्पष्ट बोलत नाही, पण तुम्ही समजून जाता की, चहासाठी सांगत आहे. पण तो म्हणतो 'जरा थोडी थोडी...' तेव्हा तुम्ही सांगता, आता राहू द्या ना चहा-पाणी खिचडी-कढी असेल तर चालेल!' तेव्हा आत स्वयंपाकघरात तुमची बायको चिडते. त्यामुळेच सर्व कर्म बांधली जातात. आता त्यावेळी निसर्गाचा नियम आहे की तो पाहुणा हिशोबानुसार आला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी भाव बिघडवू नका. अशा प्रकारे जर नियमात राहिलात आणि भले जे काही तुमच्याकडे असेल, खिचडी-कढी जे काही असेल ते वाढा. पाहुणे असे म्हणत नाहीत की आम्हाला तुम्ही बासुंदी खायला द्या. खिचडी-कढी, भाजी जे काही असेल ते वाढा. पण मग हा तर स्वत:ची इज्जत जावू नये म्हणून, खिचडी-कढी वाढत नाही, तर शिरा वगैरे वाढतो. पण आत मनात मात्र शिव्या देतो. आता कुठून आले मेले ! त्याचे नाव कर्म. अर्थात असे व्हायला नको.