shabd-logo

अकरा

13 June 2023

4 पाहिले 4
राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणसांची स्थिती मोठी चमत्कारिक असते. जेथे जातील तेथे त्या त्या बुद्धिमान माणसांचे ते कबूल करतात. पुन्हा मागून पस्तावतात, “मी कसे असे केले?" असे त्यांचे त्यांनाच मग आश्चर्य वाटते.

एके दिवशी परीक्षिती, जगात काहीच शेवटी खरे नाही अशा विचारात होता. जगात सारा सावळा गोंधळ आहे. असे त्या दिवशी त्याच्या मनात येत होते. अशा मनस्थितीत तो शिकारीला निघाला. आज निःशंकपणे तो बाण मारीत होता. हरण असो, हरणी असो वा हरणपाडस असो त्याचा बाण आकर्ण धनुष्य ओढून सोडला जाई. आज सर्वांची तो हत्या करीत होता. पक्ष्यांवरही आज दया नव्हती. त्यांनाही बाण मारून खाली पाडीत होता. आज स्वतःलाही बाण त्याने मारला असता! जीवन म्हणजे निरर्थक वस्तू, असेच आज त्याच्या मनात होते.

एका झाडावर एक सर्प विळखा मारून बसला होता. परीक्षिताचे लक्ष गेले. त्याने मारला बाण. साप त्या झाडात खिळून बसला. आणखी एक बाण व तो साप मेला ! प्रचंड होता साप. तो मेलेला साप त्याने बरोबर घेतला.

“तेथे झाडाखाली कोण आहे तो बसलेला ?” परीक्षितीने विचारले. “तो एक ऋषी आहे. नागजातीचा ऋषी आहे. तो या झाडाखाली तपश्चर्या करीत असतो." सेवकाने सांगितले.

“त्यांना नागपूजा प्रिय आहे ना! हा मृत नाग घाला त्याच्या गळ्यात!

जिवंत दैवत नाही जवळ घेता येत, निदान मृत तरी असू दे जवळ, यांच्या देवाच्या गळ्यात साप असतात. नागोबांच्या दगडाच्या मूर्ती आणि पशुपतीच्या दगडी मूर्तीच्या गळ्यात साप, अंगावर साप ! त्याला ते महादेव म्हणतात! यांचा सारा गोंधळ आहे. नाना दैवते, विचित्र दैवते! कशी आम्ही ही दैवते एकत्र आणावयाची, कसा समन्वय करायाचा? आस्तिक करू जाणत. आपण करावी गंमत. आणा तो मृत सर्प. बरा आहे लांबलचक. या ऋषीला महादेव बनवू. साप गळ्यात घालणारा महादेव. भुतांत नाचणारा महादेव. आण." परीक्षिती सेवकाला म्हणाला.

तो मृत सर्प काढण्यात आला. राजाने तो ऋषींच्या अंगावर चढविला. जणू ऋषीला त्याने अलंकार लेवविले. बरोबर सेवक हसले. कोणी गंभीर झाले, ‘राजाचा होईल खेळ, परंतु कठीण येईल वेळ' असे काहींच्या मनात आले. परंतु स्पष्ट कोणी बोलेना.

राजा रथात बसला. सेवक घोड्यावर बसले. वायुवेगाने ते निघून गेले. नागतरुणांना त्या ऋषीबद्दल अत्यंत आदर होता. विशेषतः तक्षक कुळातील नागतरुणांची तर त्यांच्या ठिकाणी फार भक्ती. एक तरुण प्रत्यही सायंकाळी तेथे येई. ऋषीच्या मुखात दूध घाली. तेथे घटका दोन घटका बसे. प्रणाम करून जाई. त्या दिवशी सायंकाळी तो तरुण तेथे आला. तो तो बीभत्स प्रकार त्याला दिसला. नागांच्या दैवाची ती विटंबना होती. नागजातीचे लोक सापाला मारीतच नसत असे नाही. परंतु सर्पाला मारल्यावर त्याची विटंबना करीत नसत. त्याला अग्नी देत. साप फार असत त्या काळी त्या प्रदेशात. ईश्वराची त्या स्वरूपातच नाग मग पूजा करीत. “हे नागस्वरूपी देवा, हे सर्पस्वरूपी देवा, आम्हाला या सर्पापासून, नागांपासून वाचव.” अशी ते प्रथना करीत.

त्या तरुणाला सर्पाची ती विटंबना व त्या तपोधन ऋषीची विटंबना सहन झाली नाही. त्याने तो मृत सर्प हळूच काढला. तेथे कशाने अग्नी देणार? त्याने त्याला पुरले. त्याच्यावर फुले वाहिली, नंतर ऋषीच्या अंगावर सर्पाचे रक्त सांडले होते, ते त्याने हलक्या हाताने पुसून काढले. ऋषीचे अंग स्वच्छ केले. मग ऋषीच्या मुखात त्याने दूध घातले. त्यांच्याजवळ मग मन शांत करून बसला. प्रणाम करून निघून गेला.

परंतु त्याच्या मनात तो अपमान सलत होता. कोणी केली ती विटंबना ? याचा त्याने शोध चालविला. 'राजा परीक्षितीनेच ही गोष्ट स्वतःच्या हाताने केली' असे एका राजसेवकाकडून त्याला कळले. प्रजेमध्ये ही गोष्ट प्रसृत झाली. वक्रतुंडाने तिचा फायदा घेतला. 'राजाला नागपूजा मान्य नाही, नागजातीची संस्कृती मान्य नाही.' असा प्रकार त्याने व त्याच्या हस्तकांनी सुरू केला. ठिकठिकाणी मारलेले सर्प नागांच्या पाषाणमयी मूर्तीवर फेकण्यात येऊ लागले. यासाठीच साप हुडकून मारायचे की नागजातीला चिडवता यावे. साप मारावा व नागांच्या अंगावर टाकावा. साप मारावा, त्यांच्या दारात आणून टाकावा, असे प्रकार सुरू झाले. राजाचा आपणास पाठिंबा आहे असे कळताच दबलेला द्वेष बाहेर पडू लागला.

नागजातीच्या तरुणांतही प्रचंड हालचाली सुरू झाल्या. आर्यांच्या गाई

चोरणे, आर्यांवर हल्ले करणे या गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. जीवन सुरक्षित राहिले नाही.

एके दिवशी काही तक्षकवंशीय नागतरुणांची जंगलात परिषद भरली होती. आर्यांवर कसा सूड घ्यायचा याची चर्चा होत होती. “राजा परीक्षितीचाच वध करावा" असे काही म्हणू लागले. “या राजाचाच हा चावटपणा आहे, या राजालाच ही भांडणे पाहिजे आहेत." असे एकाने बोलून दाखविले. चर्चा जोरजोराने होऊ लागली.

“आर्यांच्याविरुद्ध सर्व नागांची संघटना केली पाहिजे. मणिपूर वगैरे जी

निर्भेळ नागराज्ये आहेत, तेथे जास्तच जोर केला पाहिजे.” मणिनाग म्हणाला. “इंद्र वगैरे आर्य राजे आपणास अनुकूल आहेत. त्यांच्याशी अधिक स्नेहबंध जोडले पाहिजेत. इंद्राच्या राज्यांत आर्य व नाग असले भेद नाहीत. तेथे नागजातीचे लोकही मोठमोठ्या अधिकारांवर कामे करीत आहेत. " तेजस्वी वासुकी म्हणाला.

“दोन नाग प्रधान आहेत तेथे. इंद्र त्यांना फार मान देतो.” अनंताने सांगितले.

“ आपले जे महोत्सव असतात. आपल्या ज्या यात्रा असतात त्यातून

प्रचार केला पाहिजे. " तक्षक त्वेषाने म्हणाला.

“ परंतु प्रचार कोणाला करावयचा? कारण नागांच्या महोत्सवास आर्यही पुष्कळ येतात. कडेवर मुले घेऊन आर्यस्त्रियाही येतात. आर्यांच्या महोत्सवांसही नाग जातात. अडचण अशी आहे की, बहुजनसमाज एकमेकांशी चांगला वागत आहे. संबंध प्रेमाचे जडत आहेत. जडलेले दृढ़ होत आहेत. जपून प्रचार केला पाहिजे. नागांनी संघटित व्हावे. परंतु मुद्दाम आर्यांचा त्यांनी द्वेष करू नये. आर्य बाहेरून आले म्हणून त्यांना हाकलून द्यावे, असे म्हणू नये. जर आर्य नागांवर अतिक्रमण करतील, नागांच्या धर्मभावना दुखवतील, तर प्रतिकार करावा. दोन्ही समाजांनी समाधानाने नांदावे अशी आमची इच्छा आहे असे सांगावे. द्वेषासाठी द्वेष नको. जे चांगले आर्य आहेत, त्यांचे कौतुक आपण केले पाहिजे. सर्व आर्यच वाईट असे नाही म्हणता कामा. आपल्यामध्ये 'नागांसाठीच हा देश' अशीही काही चळवळ काहींनी सुरू केली आहे. तिकडे वक्रतुंड वगैरे काही आर्यही 'हा आर्यावर्त आहे, तेथील मागासलेल्या नागांना व इतरांना आम्ही समुद्राच्या पार हाकून देऊ' असे म्हणत आहेत. आपण हे दोन्ही आत्यंतिक मार्ग टाळावे, असे मला वाटते. या एका निळ्या आकाशाखाली आपणास का नांदता येऊ नये?" गंभीर नीलांग म्हणाला.

“परीक्षितीला मरून टाकण्याची मी प्रतिज्ञा केली आहे." एक नवयुवक म्हणाला.

" एकाला मारून काय होणार? एकदा मारामारीच सुरू झाली म्हणजे मग कठीण. शक्य तो मारामारी टाळावी आणि हे वैयक्तिक वध टाळावे. समोरासमोर युद्धच जुंपले तर मग उपाय नाही.” असे अनंताने सुचविले.

“या आर्यांचा पूर्वीपासूनच हा सर्व देश बळकावयाचा बेत आहे. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्' असे ह्यांचे मंत्र. सर्व जग आर्यांचे करावयाचे, अशी ह्यांची महत्वाकांक्षा. आपणास आस्ते अस्ते ते दूर तरी करतील किंवा आपले नागांचे वैशिष्ट्य मारून टाकतील. त्यांच्यातील सर्वांचेच हे मत आहे असे नाही. काही थोर असेही म्हणणारे आहेत की, “आपण सर्व एकाच देवाची लेकरे. एकमेकांचे चांगले घेऊ व आनंदाने नांदू.” नीलांगाने सांगितले.

“ कोणत्या देवाला आम्ही भजावे? पाऊस पाडणाऱ्या देवाला, का वणवे लावणाऱ्या देवाला? पर्वत उभे करणाऱ्या देवाला, का आकाशाचा चांदवा पसरणाऱ्या देवाला? वारे वाहवणाऱ्या देवाला का समुद्र उचंबळवणाऱ्या देवाला ? असे प्रश्न या आर्यातीलच कित्येकांनी केले आहेत. शेवटी त्यांच्या एका महान ऋषीने सांगितले, “एकाच या सत्त्वाला निरनिराळ्या नावांनी आपण हाक मारतो.” नागदेव म्हणून म्हणा, इंद्रदेव म्हणून म्हणा. एकाच अनंत शक्तिमान प्रभूला ती नावे पोहोचतात. आर्यांपैकी अनेकांचे हेच मत आहे. परंतु काही महत्त्वाकांक्षी, संकुचित व स्वार्थी वृत्तीचे आर्य आज निराळेच धोरण आखीत आहेत. आपण आपली चळवळ अशी ठेवू या की, ज्यामुळे खरे उदरचरित आर्यही आपल्या बाजूस येतील. तेही आपल्या बाजूने मग बोलतील. या संयुक्त आर्य व नागप्रचाराने वक्रतुंडाचे तोंड जरा सरळ होईल.” वासुकी म्हणाला.

नागांची संघटना करायची, परंतु आर्यांच्या सहकाराची अपेक्षा ठेवून करायची, असे ठरवून परिषद संपली. सारे गेले. परंतु परीक्षितीला मारण्याची प्रतिज्ञा करणारा नो नवयुवक तेथेच राहिला. तो मनात विचार करीत होता. शेवटी त्याने काहीतरी मनात निश्चित केले. त्याने टाळी वाजवली; शीळ घातली. त्याला आनंद झाला.

त्या तरुणाने परीक्षितीच्या हस्तिनापूर राजधानीत प्रवेश केला. तो दिसे सुंदर. बोले गोड. मोठा लाघवी होता तो. त्याने परीक्षितीकडे बल्लवाची सेवा स्वीकारली. उत्कृष्ट पक्वान्ने करी. त्याच्या हातात जणू अमृतच होते. परीक्षितीची त्याच्यावर मर्जी बसली. राजपत्न्या त्याच्यावर प्रसन्न झाल्या.

काही दिवस गेले. परीक्षिती त्या चित्रशाळेत चित्रे पाहात होता. उत्तरा सती जाऊ बघत आहे, असे ते चित्र तो बघत होता. पुन्हा खिन्नतेचे विचार त्याच्या मनात आले. आपण काय केले आयुष्यात असे त्याच्या मनात आले. तो फारच उद्विग्न झाला. सेवकांनी त्याला उपवनात नेले. तेथील सुंदर फुले पाहून त्याला आनंद झाला नाही. एका सेवकाने अत्यंत सुगंधी अशी नागचाफ्याची फुले त्याला आणून दिली.

“याला नागचाफा म्हणतात. नागलोक ही फुले नागदेवाला वाहतात. हे

फूल जणू नागाच्या फणेसारखे दिसत अआहे नाही? घ्या, महाराज, ही फुले.”

एक सेवक म्हणाला.

“कशाला देता ही फुले ? ही फुले तोडलीत तरीही ती वास देतात. तोडणाऱ्याला प्रसन्न करतात. मला तुम्ही मारायला धावलात तरी मी तुमचे कल्याण चिंतीन का? ह्या लहानशा फुलात जी महनीयता आहे ती आम्हा मानवात आहे का? ह्या लहानलहान फुलात परिपूर्ण जीवन भरलेले आहे. आपण आपले जीवन किती परिपूर्णतेस नेले? छे, व्यर्थ मी जगतो- ” परीक्षिती तेथील एका आसनावर बसला.

एके दिवशी परीक्षितीने आपल्या प्रधानास विचारले, “माझ्या त्रस्त मनाला कोण देईल विसावा? माझ्या अशांत हृदयाला कोण देईल शांती? माझ्या शुष्क जीवनाला पल्लव फुटावेत म्हणून कोण येईल वसंतऋतू घेऊन, कोण येईल भरलेला मेघ घेऊन? असा कोण आहे महात्मा, कोण आहे पुण्यात्मा ? ज्याच्या जीवनात अनुपम शांती भरून राहिली आहे असा कोण आहे?”

“महाराज, शुकदेवात ही शक्ती आहे. बाळब्रह्मचारी ते. केवढा संयम, केवढी विरक्ती! त्यांना बोलवावे. ते येतील. परोपकारार्थ त्यांचे जीवन. ते नाही म्हणणार नाहीत.” मुख्य प्रधान म्हणाले.

“बोलवा, शुकाचार्यांना बोलावा. त्यांना आणण्यासाठी पाठवा रथ. त्यांच्या स्वागताची सिद्धता करा. त्यांना आणायला आपण सारे सामोरे जाऊ. सारे नगर शृंगारा, चंदनाचे, केशरकस्तुरीचे सडे घाला. दीपमाळा लावा. उंच गगनचुंबी ध्वज उभारा. मार्गात ठायी ठायी नानाप्रकारच्या कमानी उभारा. सहस्र वाद्यांचे ध्वनी त्यावेळेस होऊ देत. नागांची मंजुळ वाद्ये, नागाला डोलावणाऱ्या या त्यांच्या पुंग्या, तशीच ती भिल्लांची वाद्ये येऊ देत सारी. अपार सोहळा करा. शुकाचार्य ! ज्ञानसूर्यच ते. ज्ञानाची महान पूजाअर्चा होऊ दे. येऊ देत. शुकाचार्य हरू देत अंधार.” परीक्षिती म्हणाला.

एक प्रमुख मंत्री रथ घेऊन शुकाचार्यास आणावयास गेला. शुकाचार्य येणार, ही वार्ता वाऱ्यावर सर्वत्र गेली. स्त्री-पुरुषांत हीच एक चर्चेची गोष्ट झाली. शुकाचार्यांच्या ज्ञानवैराग्याच्या कथा सर्वांच्या ओठावर होत्या. परंतु डोळ्यांना त्यांचे दर्शन घडलेले नव्हते. कथांनी कान कृतार्थ झाले होते. आता दर्शनाने डोळे पावन होणार होते. खेडोपाडी वार्ता गेली. स्त्री-पुरुष मुलांबाळासह हस्तिनापुरात जमू लागले. सारे शहर गजबजले. घरोघर गुढ्या उभारण्यात आल्या. लतापल्लवांच्या, केळीकर्दळीच्या कमानी उभारण्यात आल्या. माणिक-मोत्यांच्या व्यापाऱ्यांनी रत्नांच्या, मोत्यांच्या कमानी उभारल्या. पाचू, इंद्रनील, लाल वगैरे शेकडो प्रकारची, शेकडो रंगाची रत्ने, रत्नांची प्रभा तर फारच खुले, मोर, शुष्क, हंस वगैरेंच्या आकृती रत्नांनी तयार केलेल्या तोरणांतून दाखविल्या होत्या. वस्त्रगारांच्या समोर महार्ह वस्त्रांच्या कमानी होत्या. चांदीसोन्यांच्या भांडेवाल्यांनी त्यांच्या कमानी उभारल्या. अपार उत्साह, अपूर्व शोभा !

आज प्रभातसमयी रथ येणार होता. उदयाचलावर सूर्य वर येत होता व तिकडून शुकाचार्यांचा रथ धडधडत येत होता. रथ दुरून दिसताच एकच जयघोष झाला. आकाश खाली पडते की काय असे वाटले. नगराच्या महाद्वाराला फारच शोभविले होते. वर गच्चीत फुले घेऊन भृत्य उभे होते. द्वारात येताच पुषवृष्टी होणार होती. वाद्ये वाजू लागली. त्यांचा संमिश्र आवाज फारच आनंद देत होता. परीक्षिती सामोरा गेला. शुकाचार्य बाहेर पडले. परीक्षितीने लोटांगण घातले. शुकाचार्यांनी त्याला हृदयाशी धरले.

एका शुंगारलेल्या मोकळ्या रथात शुकाचार्य बसले. वर सुवर्ण- छत्री होती. रथ चालू लागला. वाद्ये झडू लागली. पुष्पवृष्टी होऊ लागली. कोणी सोन्याचांदीची फुले उधळली. कोणी हिरेमोती उधळले. गरीब पौरजनांनी लाह्या उधळल्या. ज्याच्याजवळ जे होते ते त्याने आनंदाने उधळले. हजारोंचे हात जोडले जात होते. डोळ्यांत भक्तिप्रेमाचे अश्रू येत होते. शुकाचार्य शांत होते. सन्मानाचे मंद स्मित त्यांच्या मुद्रेवर झळकत होते. त्यांचे डोळे, किती शांत, पवित्र व गंभीर दिसत होते! जणू आकाशातले दोन तारेच. कोमल दिसत होते. त्यांचे कपाळ रुंद होते. ज्ञानाची प्रभा तेथे फाकली होती. किती कोमल दिसत होते ते मुगमंडळ! त्यांची गौर अंगकांती होती. चंद्र व सूर्य यांची संमिश्र प्रभा त्यांच्या अंगावर होती. सूर्याचे तेज व चंद्राची रमणीयता ! किती पाहिले तरी तृप्ती होत नव्हती डोळ्यांची.

राजप्रासादात शुकाचार्य आले. जनसंमर्द दूर गेला. तिसरे प्रहरी राजा परीक्षिती शुकाचार्यांजवळ गेला व प्रणाम करून पायाशी बसला.

“राजा, कशाला बोलावलेस? काय काम? दूर राहूनही मी चराचराचे मंगलच चिंतीत असतो. मी सर्वांजवळ आहे. जवळ आणि दूर हे शब्दच मजजवळ नाहीत." शुकाचार्यांनी आरंभ केला.

“भगवान, अत्यंत असमाधान मला वाटत आहे. जीवन विफल वाटत आहे. मला शांती द्या. तुमच्या अपार शांतीतील एक बिंदू मला मिळाला तरी पुरे. अमृताचा सागर मिळाला आहे आणायला. एक थेंब मला द्या." परीक्षिती अत्यंत नम्रतेने म्हणाला.

"राजा, मी होता होईतो फार बोलत नाही. परंतु एकदा गंभीर गोष्टीवर मी बोलू लागलो की मी मला आवरू शकत नाही. मग खाणेपिणे, झोपणे- कशाचीही मला आठवण राहात नाही. राग पुरा केल्याविना गवई थांबत नाही, तसे माझे ब्रह्मज्ञान सुरू झाले, माझा ब्रह्मवीणा सुरू झाला, की मनातील सर्व ओतल्याशिवाय मला थांबता नाही येत. तुझी आहे सिद्धता बसण्याची, श्रवण करण्याची?” शुकाचार्यांनी विचारले.

“भगवान, आपण ज्यात रंगाल त्यात मीही रंगूनच जाईन. आपण सांगाल ते असेच असेल की मला पामरालाही इतर गोष्टींचाही ते विसर पाडील. केव्हापासून आपण बसावयाचे? मीच एकटा आपणाजवळ बसेन. म्हणजे अपार शांती राहिली. व्यत्यय येणार नाही. ते पहा समोर शांतीमंदिर! कमलाकृती असे ते निर्मिले आहे. पुष्करिणीतील कमलांचा गंध व शीतल चारा तेथे येतो. सभोवती प्रसन्न वातावरण आहे- " परीक्षिती म्हणाला.

“बरे तर. उद्या सूर्योदयापासून आपण बसू.” शुकदेव म्हणाले. लोक लांबून दर्शन घेत. राजपुरुष ठिकठिकाणी उभे होते. 'अशांती निर्मू नका. कलकलाट करू नका.' असे सांगत होते. तेथे महान यात्राच सुरू झाली जणू! हजारो नरनारी येत व जात. परंतु शुकाचार्यांचे अन्यत्र लक्ष नसे. राजाला सांगण्यात ते रंगलेले असत. राजा सर्वेद्रियांचे कान करून ऐकत होता. तहानलेला पाण्यासाठी, भुकेलेली अन्नासाठी, तसा परीक्षिती शुकाचार्यांच्या शब्दांसाठी उत्सुक असे.

दोघांची तहानभूक हरपली होती. ज्ञानामृताचे भोजन चालले होते. ना विश्रांती, ना निद्रा. शुकाचार्यांच्या डोळ्यांतून मधूनमधून आनंदाश्रू घळघळत! कोणत्या दिव्य गोष्टी ते सांगत होते? ते पाहा एक पाखरु शुकाचार्याच्या मांडीवर बसून त्यांच्या डोळ्यांतून गळणारे अश्रू पीत आहे. मोती गिळीत आहे. धन्य ते पाखरू !

असे सात दिवस झाले. सातवा दिवस संपायला थोडासा अवधी राहिला होता. पहाटेचा प्रसन्न वारा वाहत होता. आकाश अधिक गंभीर दिसत होते. पाखरांचा मुंजूळ आवाज थोडा थोडा ऐकू येऊ लागला होता. शुकाचार्य समारोप करीत होते.

“राजा, सांगायचे ते सांगून झाले. माझे हृदय तुला दिले. माझी बुद्धी तुला दिली. माझे अनुभव तुला दिले. आता अंधारातून उषा येईल. तुझ्या जीवनात ज्ञानप्रभा फाको मालिन्य निरस्त होवो. तुझे कल्याण होवो. आज सात दिवस झाले. संगीतात सात सूर असतात. इंद्रधनुष्यात सात रंग असतात. तुला सारे सूर सांगितले; सारे रंग दाखविले. आता जीवनात संगीत निर्माण कर. सौंदर्य निर्माण कर. संगीत कसे जुळवावयाचे, सौंदर्य कसे निर्मावयाचे, नाना रंगांची प्रमाणबद्ध सजावट कशी करावयाची, ते सारे तुला सांगितले.

नाना कथांनी उदाहरणांनी, दृष्टांतांनी सोपे करून दिले आहे. तूही अनन्य भक्तीने सारे ऐकलेस. असा श्रोता मला मिळाला नाही. तू मला धन्य केलेस.

आता पारणे कर. विश्रांती घे." शुकाचार्य म्हणाले. “भगवान, शब्दातीत माझी स्थिती आहे. जीवन उचंबळून आले आहे.

काय मी बोलू?” असे म्हणून त्याने शुकाचार्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. अश्रूंनी ते चरण धुतले गेले. दोघे शांतिमंदिरातून खाली आले. मंगल वाद्ये वाजली. शुकाचार्यांच्या पाया पडण्यासाठी लाखोंची गर्दी झाली. राजपुरुष व्यवस्था ठेवता ठेवता

दमले. पुढे दोघांची स्नाने झाली. दोघेही साध्या आसनांवर बसले.

"आपणही पारणे करणार ना?” परीक्षितीने विचारले.

“मला थोडे पाणी दे म्हणजे पुरे.” शुकाचार्य म्हणाले.

“एखादे फळ नको?” त्याने प्रमाने विचारले.

“राजा, तू घे फळ. गंगाजळ व जगाचे कल्याणचिंतन हाच माझा मुख्य आहार असतो. मला थोडे पाणी दे म्हणजे पुरे." शुकाचार्य म्हणाले. एका स्वच्छ झारीतून पाणी आणण्यात आले. त्या नागयुवकाने ते आणले. परीक्षितीसाठी चांदीच्या ताटात द्राक्षफळे त्याने आणिली होती.

निर्मळ रसाळ द्राक्षफळे.

“राजा, मी पाणी पितो. तू घे ती गोड द्राक्षे.” शुकाचार्य म्हणाले.

त्यांनी पाणी घेतले. राजाने द्राक्षे तोंडात टाकली. परंतु त्याला एकट्याला संकोच होत होता.

“राजा, संकोच नको करू. घे ती द्राक्षे. खा. त्यांनी अपाय नाही होणार." शुकाचार्य प्रसन्नपणे म्हणाले.

“महाराज, मी ती मुद्दाम निवडून आणली आहेत. आज सात दिवसांत आपण काही खाल्ले नाही. चार द्राक्षे अधिक नाही होणार.” तो सुंदर नागतरुण गोड शब्दांनी बोलला.

“किती रे गोड बोलतोस तू!” परीक्षिती म्हणाला.

शुकाचार्य आता जाणार होते. राजघराण्यांतील सर्व मंडळी पाया पडण्यासाठी आली. जनमेजय आला. सर्वांनी वंदन करून आशीर्वाद घेतले. परंतु परीक्षिती असा का? त्याची मुद्रा अशी का? त्याला फार वाईट वाटत आहे? “राजा, कष्टी नको होऊ.” शुकाचार्य म्हणाले. एकदम परीक्षिती खाली बसला.

“काय झाले, राजा?" शुकाचार्यांनी विचारले.

“आग, सर्वांगाची एकाएकी आग होत आहे. आग, महाराज, आग! हृदयाची आग तुम्ही थांबविलीत. परंतु ही देहाची आग कोण थांबविणार?

काय झाले एकाएकी ? छे: जळलो मी, भाजलो मी. अपार वेदना होत आहेत.” त्याच्याने बोलवेना.

धावाधाव झाली. शुकाचार्य शांत होते. राजवैद्य आले. त्यांनी ती द्राक्षे पाहिली. नीट न्याहाळून पाहिली. ते गंभीर झाले.

“राजा, हा विषप्रयोग आहे. या द्राक्षांना विष चोपडलेले आहे. प्रखर विष काही तरी कपट आहे. कोणी आणली ही द्राक्षे! त्याला आणा पुढे. " राजवैद्य म्हणाला.

राजपुरुषांनी त्या सुंदर बल्लव तरुणाला ओढून आणले. तो तेथेच मागे उभा होता.

“कोठून आणलीस ही द्राक्षे?” जनमेजयाने विचारले.

“थांबा, मी सारे सांगतो. नागतरुण निर्भय असतो.” तो म्हणाला.

“तू का नाग आहेस? दिसतोस गोरा." वैद्य म्हणाले.

“काही नाग गोरेही असतात. गोऱ्या नागांना तुम्ही आर्यांनी आत्मसात केले तरीही माझ्यासारखे स्वतंत्र असे काही आहेत. या तुमच्या राजाने नागांचा अपमान केला आहे. ज्या एका महर्षीविषयी आम्ही सर्व नागांना अपार आदर व भक्ती वाटे त्यांचा अपमान या पापी परीक्षितीने केलेला आहे. त्या ऋषींच्या तोंडात सायंकाळी मी दूध नेऊन घालीत असे. ते ऋषी तपश्चर्येने रंगून गेले होते. एके दिवशी या राजाने एक साप मारून त्या ऋषींच्या गळ्यात अडकवून ठेवला. आम्ही नागजातीचे लोक सापांना मारले तरी त्यांची विटंबना करीत नाही. चंदनकाष्ठांनी त्यांना जाळतो. परीक्षितीने आमच्या भावना दुखविण्यासाठी हे केले. ऋषींचा अपमान व आमच्या भावना दुखविण्यासाठी हे केले. ऋषींचा अपमान व आमच्या दैवतांचा अपमान. राजानेच असे केल्यामुळे इतर लोकही असे करू लागले आहेत. नि:शंकपणे साप मारतात. मुद्दाम रानात जाऊन मारतात आणि ते मृत सर्प आमच्या घरात फेकतात, आमच्या नागमूर्तीवर फेकतात. मला हे सहन नाही झाले. ह्या राजाचे प्राण घेण्याची मी प्रतिज्ञा आज पुरी होत आहे. तो पाहा पापात्मा तडफडत आहे, मरत आहे. आता माझे काहीही होवो. माझ्या शरीराचे राईएवढे तुकडे करा किंवा आगीत जिवंत जाळा. माझे ध्येय मला मिळाले. हा मी निर्भयपणे येथे उभा आहे. नाग पळत नसतो.” तो तरुण म्हणाला.

राजपुरुषांनी त्या तरुणाला घेरले. त्यात त्याचे हात जखडून बांधण्यात आले. तलवारी सरसावल्या गेल्या. जनमेजय रागाने लाल झाला होता. राजपत्न्यांनी आकांत मांडला होता. परीक्षिती शेवटच्या वेदनांत होता. शुकाचार्य शांत होते.

“राजा तू आता काही क्षणांचा सोबती आहेस. मरण समोर उभे आहे. मरणकाळी शत्रुमित्र समान मानण्याची सुवर्णसंधी देवाने तुला दिली आहे. मरणातून द्वेषमत्सर काढून टाक. तुला सात दिवस भगवंतांचा महिमा ऐकविला. ज्ञानप्रेमाची मुरली ऐकविली. ऐकलेस त्याची परीक्षा आहे. उत्तीर्ण हो. शत्रूलाही प्रेम देता देता देहाचा पडदा फाडून चैतन्यात मिळून जा. निर्मल, निर्मत्सर हो, याला क्षमा कर. म्हण की 'हे तरुणा, जा तू मला विष दिलेस. मी तुला प्रेमाचे अमृत देतो.' म्हण.” शुकाचार्य परीक्षितीजवळ बसून राहिले.

परीक्षितीने त्या तरुणाकडे पाहिले. राजांच्या डोळ्यात प्रेमाचे अमृत भरले होते. शक्ती एकवटून राजा म्हणाला, “तरुणा, जा. मी तुला प्रेम दिले आहे. मरणारा परीक्षिती मारणाऱ्याला प्रेम देऊन जात आहे. सर्वांना प्रेम देऊन जात आहे. अद्याप मी राजा आहे. अद्याप माझे शासन आहे. मी माझ्या अपराधास क्षमा करतो. जनमेजया, त्याला जाऊ दे. सोडा त्याला. सोडा. मरनोन्मुख राजाची आज्ञा माना. सारे जीवन मला निस्सार वाटत होते. परंतु आज कृतार्थ झाले जीवन. जन्मभर जीवाचा घडा रित होता. परंतु मरणकाळी आज एकदम प्रेमाने भरून आला. शेवटचा क्षण गोड झाला. मला वाटे माझे जीवितकार्य काय? ते आज मरताना सापडले. 'विष देणाऱ्यालाही प्रेम द्या.' हे सांगण्यासाठी, स्वतःच्या कृत्याने जगाला सांगण्यासाठी, माझा जन्म होता. कृतार्थ झालो मी, सापडले नि त्याच क्षणी पूर्णही झाले. भगवान तुमच्या पायांवर डोके ठेवूनच हे प्राणहंस उडून जावेत."

त्या तरुणाला सर्वांनी मोकळे केले. त्या तरुणाने शुकाचार्यास व राजास वंदन केले. तो म्हणाला, “राजा, मी जातो. आर्यांचा द्वेष आम्हा नागांतही पसरत चालला आहे. तुझे हे दिव्य मरण त्यांना सांगून द्वेषापासून त्यांना मी परावृत्त करतो. तू पेरलेस ते फुकट नाही जाणार. मला क्षमा कर. "

“क्षमा." परीक्षिती म्हणाला. तो तरुण गेला. परीक्षिती शुकाचार्यांच्या चरणी मरून पडला. गंभीर प्रसंग. ते मरण होते की जीवन होते? “ जनमेजया, मी जातो. शोक करू नका. ज्या मरणाने प्रेमाचा पाऊस पडला ते मरण अपूर्व आहे, ते मरण अमर आहे-" असे म्हणून शुकाचार्य गेले.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा