shabd-logo

एकोणीस

20 June 2023

1 पाहिले 1
आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा तेथे जमला होता. आस्तिक म्हणाले, “उद्या सूर्य उगवला की निघावयाचे. अंधारात प्रकाश आणण्यासाठी निघावयाचे. जनमेजयाच्या क्रोधाग्नीला शांत करावयासाठी निघावयाचे. समाजातील द्वेषमय जीवन आपण आपल्या प्रेममय जीवनाने शुद्ध करण्यासाठी निघू या. आपण मोठमोठी ब्रह्मवाक्ये उच्चारतो. ती महावाक्ये जीवनात आणू या. तुम्ही आईबापांची अनुज्ञा घेऊन आला आहात. आपण अमर असा होम पेटवू की या देशाला त्यामुळे सदैव स्फूर्ती मिळेल. ज्या ज्या वेळेस या देशांतील भावी पिढ्यांना संकुचितता, स्वार्थ, द्वेष घेरील, त्या त्या वेळेस आपले हे होणारे बलिदान त्यांना नवजीवन देईल. तुमच्यातील ज्यांचे ज्यांचे हृदय ध्येयाला भेटण्यासाठी उचंबळत आहे त्यांनी त्यांनी मजबरोबर निघावे. माझ्याही शरीरात नागरक्त आहे. जनमेजय मला का बद्ध करून नेत नाही? मलाच आपण होऊन जाऊ दे. त्या त्याच्या होमकुंडात हा देह अर्पू दे. मजबरोबर हे अनेक थोर ऋषिमुनिही येत आहेत. त्यात काही आर्य आहेत, काही नाग आहेत. काही संमिश्र आहेत. सर्वांनी निघावयाचे निश्चित केले आहे. आपला आश्रम कृतार्थ झाला. पवित्र झाला. अतः पर या देशातील प्रत्येकाच्या हृदयात आश्रम निर्माण होईल. हा आपला आश्रम जाईल. स्थूलरूपाने जाईल. परंतु तो सर्वांच्या हृदयात चिरंजीव होईल.”

“आम्ही सारे तुमच्याबरोबर येणार!” तरुण म्हणाले.

“शशांक व मी हातात हात घेऊन उडी टाकू. कायम टिकणारे आर्य व नाग यांचे ऐक्य निर्मू." नागेश म्हणाला. “रत्नकांत व मी अशीच एकदम उडी घेतो." बोधायन म्हणाला.

“अग्ने नम सुपथा रामे अस्मान." असा मंत्र म्हणत मी उडी घेईन." असे पद्मनाभ म्हणाला. “ अमर्त्य मर्त्यो जोहवीमि । जातवेदो यशो अस्मासु घेहि' असे मी म्हणेन व फेकीन स्वतःला. " जातवेद म्हणाला.

रात्री सर्व शांतपणे झोपी गेले. मोठ्या पहाटे आस्तिक उठले. सर्व ऋषिमुनी उठले. छात्र उठले. गंगेवरून सर्वजण स्नाने करून आले. सूर्य आता वर येणार होता. भारताचे भाग्य वर येत होते. अपूर्व तेज जन्मत होते. भगवान आस्तिकांनी “आनंद ब्रह्मणो विद्वान् व बिभेति कदाचन" या विषयावर शेवटचे दोन शब्द सांगितले.

ते म्हणाले, “आपण आश्रमात 'असत्याकडून आम्हास सत्याकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने.' अशी प्रार्थना करीत असू. त्या प्रार्थनेचे फळ आज मिळत आहे. आज आपण देहावर स्वार होत आहोत. हा देह ध्येयाचे साधन आहे हे ज्याला कळले त्याने अमृतत्व मिळविले. लाकूड ज्याप्रमाणे चुलीत घालावयाचे असते, त्याप्रमाणे हा देह ध्येयासाठी आगीत घालावयाचा असतो. आज आपण ते करीत आहोत. असे केल्यानेच अंधारातून प्रकाश येतो. प्रकाश म्हणजेच ज्ञान, सत्यता. देहाची आसक्ती सोडणे म्हणजेच असत्यातून सत्याकडे जाणे. या तिन्ही वचनांचा एकच अर्थ आहे. या तिन्ही वाक्यांचा आज साक्षात्कार करून घ्यावयाचा आहे. या साक्षात्काराचा आनंद ज्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला, त्याला ना भीती ना चिंता. तो ध्येयप्राप्तीच्या आनंदात मस्त असतो.

जनमेजयाविषयी आपल्या मनात द्वेष मत्सर नको. तो निमित्त म्हणून आपल्या ज्ञानाची परीक्षा घ्यावयास उभा राहिला आहे. पूर्वी विश्वामित्रांनी वसिष्ठांची अशीच परीक्षा घेतली होती. त्यांचे सारे मुलगे विश्वामित्राने मारले, तरी वसिष्ठ शांत राहिले. ज्या वेळेस माता अरुंधती म्हणाली, 'चांदणे कसे शुभ्र पडले आहे!' त्या वेळेस महात्मा वसिष्ठ म्हणाले, ‘विश्वामित्राच्या तपासारखे हे चांदणे आहे.' स्वतःचे शंभर मुलगे ज्याने मारले, त्याच्याविषयीही वसिष्ठांचे कसे हे कौतुकाचे उद्गार ! ती परंपरा आपण पुढे चालवू.

परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करून त्याने मानवाजवळ यज्ञ हे साधन दिले. 'या यज्ञाने सर्व मिळवून घ्या.' असे त्याने सांगितले. हे यज्ञसाधन मानवाजवळ आहे की नाही याची तो मधूनमधून परीक्षा घेत असतो. मानवाची नाडी घड आहे की नाही हे तो पाहत असतो. आज अंधकार दिसत आहे. द्वेष भरपूर वाढला आहे. उपाय काय? बलिदान, स्वेच्छेचे बलिदान. आपण आज परमेश्वाराला दाखवू या की आज्ञसाधन जिवंत आहे. त्याची उपासना आमच्यात अद्याप आहे. परमेश्वर पाहील व प्रसन्न होईल. जनमेजयाचे हृदय पुन्हा द्रवेल, नवीन उज्ज्वल भविष्य सुरू होईल. चला, आपण यात्रेकरू आहोत. सत्यदेवाचे यात्रेकरू. मानवजातीची ही महान यात्रा कधीच सुरू झाली आहे. कधी संपेल ते मी काय सांगू? परंतु 'आपण या सत्यदेवाचे यात्रेत सामील झालो होतो.', एवढे प्रत्येकाला जर म्हणता येईल तर किती सुंदर होईल!

सारे सिद्ध व्हा. नम्रपणे, निहंकारपणे, प्रेमळपण, भक्तिभावाने, ध्येयानंदाच्या कल्पनेने नटून, हृदय उचंबळून अनासक्तपणे, निर्भयपणे प्रयाणार्थ सिद्ध व्हा. ॐ शांतिः शांतिः शांतिः।”

आश्रमात वृद्ध नकुल राहणार होता. आश्रमातील हरणांची, गाईंची, मोरांची तो काळजी घेणार होता. फुलझाडे, फळझाडे यांची निगा राखणार होता.

“नकुल, माझ्या हरणाला मारू नको हं. ते मला इकडेतिकडे शोधील.

निघून जायचे हो एखादे व वाघ खायचा त्याला. त्याला माझा विसर पाड. ते हिरवे गवत खाणार नाही. त्याला म्हण, 'शशांकाने खा खांगितले आहे.' म्हणजे खाईल. आणि मी लावलेल्या त्या पुन्नागाला पाणी घाल. लहानसे आहे झाड, परंतु लवकरच त्याला फुले येतील. पुन्नागाची फुले कशी छान दिसतात! मला आवडतात. " शशांक सांगत होता.

“ आणि माझ्या मोराला जप रे. नागेशाचे नाव घे म्हणजे तो नाचेल, पिसारा पसरील. त्याची पिसे नको कोणाला उपटू देऊस. त्याच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. त्यालासुद्धा समजते. जप हो त्याला.” नागेशाने सांगितले. “त्या रत्नीच्या वासराला पोटभर दूध पिऊ देत जा.” रत्नकांताने सांगितले.

अशी चालली होती निरवानिरव. झाडावरून टपटप पाणी पडत होते. ते दवबिंदू होते, की प्रेमबिंदू होते? असा सुगंध आला वाऱ्याबरोबर की कधी असा आला नव्हता. आश्रमातील फुले का आपली सारी सुगंधसंपत्ति देऊन टाकीत होती? आपले सुगंधी प्राण का ती सोडीत होती? मोर केकारव करीत होता. गाई हम्मारव करीत होत्या. मांजर आस्तिकांच्या पायांशी पायांशी करीत होते. चपळ व अल्लड हरणे दीनवाणी उभी होती. पाखरे फांद्यांवर निस्तब्ध बसली होती. 'आता कोण घालणार नीवारदाणे' असे का त्यांना वाटत होते? आस्तिकांचा तो प्रेमळ हात, त्या हातून पुन्हा मिळतील का दाणे ? असे का त्यांच्या मनात येत होते? तेथील सारी सृष्टी भरून आली होती. आश्रमातील पशुपक्ष्यांच्या वृक्षवनस्पतींच्या रोमरोमात एक प्रकारची तीव्र संवेदना भरून राहिली होती.

आस्तिक आश्रमातील वृक्षांना, फुलांना, उद्देशून म्हणाले, “जातो आम्ही. तुम्ही आमचे सद्गुरु. प्रेमळ वृक्षांनो, आम्हाला आशीर्वाद द्या. तुम्ही आपले सारे जगाला देता, फुले-फळे-छाया सर्व देता. तोडणाऱ्यावरही छाया करिता. दुष्ट असो, सृष्ट असतो, जवळ घेता. दगड मारणाऱ्यास गोड फळे देता. तुमची मुळे रात्रंदिवस भूमीच्या पोटात धडपडत असतात. परंतु या धडपडीने मिळणारे सारे भाग्य तुम्ही जगाला देता. तुम्ही आमच्यासाठी थंडीवाऱ्यात- पावसात-उन्हात अहोरात्र उभे. आमच्यासाठी तुम्ही जळता. तुमचे सारे आमच्यासाठी, तुमच्याप्रमाणे आगीत जाण्याचे आम्हाला धैर्य येवो. स्वतःचे सर्वस्व नम्रपणे व मुकाट्याने जगताला देण्याची इच्छा होवो.

आश्रमातील फुलांनो, तुमच्याप्रमाणे आमचे जीवन निर्मळ, सुंदर व सुगंधी होवो. तुमचे लहानसे जीवन. परंतु किती परिपूर्ण, किती कृतकृत्य ! सृष्टीचे तुम्ही अंतरंग आहात; सृष्टीचे मुके संगीत आहात. जातो आम्ही. काट्यावरही तुम्ही उभी राहता व सुगंध देता. आम्हासही आगीत शिरताना हसू दे. जगाला सुगंध देऊ दे.

आश्रमातील पशुपक्ष्यांनो, किती तुम्ही प्रेमळ ! आम्ही तुम्हाला मूठभर धान्य फेकावे, परंतु तुम्ही दिवसभर आम्हास संगीत ऐकवता. आमच्या खांद्यावर येऊन बसता. हातातून दाणे घेता. तुम्हाला प्रेम समजते. मानवाला का समजू नये? आमची रत्नी आवाज ओळखते. प्रेमळ हात तिच्या कासेला लागला तर अधिक दूध देते. ही हरणे किती प्रेमाने जवळ येतात! मोर प्रेमळ माणूस पाहून पिसारा उभारतो. कशी तुम्हा पशुपक्ष्यांची मने ! आणि ही मांजरी. सारखी कालपासून म्याव म्याव करीत आहे. 'मी येऊ' 'मी येऊ' असे का विचारीत आहे?

प्रेमळ मानवेतर पशुपक्ष्यांची ही सृष्टी! मानवालाही कृतज्ञतेचे, प्रेमस्नेहाचे धडे देणारी ही सृष्टी! हिला प्रणाम असो. आम्हाला ही सृष्टी आशीर्वाद देवो.”

आस्तिकांनी क्षणभर डोळे मिटले. पुन्हा तो स्थिर-गंभीर झाले, निघाले. पाठोपाठ ऋषिमुनी निघाले. त्यांच्या पाठोपाठ सर्व तरुण निघाले. महान मूर्त त्याग वाट चालू लागला. भगवान आस्तिक निघणार आहेत हे गोष्ट सर्वत्र गेलीच होती. हारीत, यज्ञमूर्ती, दधीची यांनी प्रचार केला होता. ते वाटेत मिळाले. त्यांच्याबरोबर आणखी प्राणयज्ञ करणारे आले होते. ती पाहा कार्तिकाची सेना आली. शांतिसेना. कार्तिकाने आस्तिकांना साष्टांग प्रणाम केला. त्यांनी त्याला हृदयाशी धरीले.

“तुझ्याच पत्नीने ना हातात निखारे घेतले? धन्य आहेस तू. धन्य तुमचा जोडा.” आस्तिक त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाले.

संतांचा हात पाठीवरून फिरणे, किती समाधान असते ते! जणू तो परमेश्वराचा मंगल स्पर्श असतो. त्या स्पर्शाने शरीरातील अणुरेणू पवित्र होतो, पुलकित होतो.

पुढे स्त्रियांची शांतिसेना मिळाली. शांतीचे ध्वज हाती घेऊन जाणाऱ्या स्त्रिया. कडेवर मुले घेऊन जाणाऱ्या माता ! प्रेमधर्म जगाला मातांनी नाही शिकवावयाचा तर कोणी? त्या स्त्रिया एकीमागून एक आस्तिकांच्या पाया पडल्या. आस्तिकांच्या डोळ्यांतून पावित्र्य व मांगल्य स्रवत होते. त्यांना तो अपूर्व देखावा पाहून उचंबळून येत होते. “ ही कार्तिकाची माता, ही कार्तिकाची पत्नी.” एकाने ओळख करून दिली.

“अजून हातावरचे फोड बरे नाही वाटले झाले? फुलाप्रमाणे कोमल अशा हातात केवढी ही शक्ती!" आस्तिक म्हणाले.

त्रिवेणी संगम पुढे जाऊ लागला. हजारो लाखों स्त्रीपुरुष गावागावांहून ही अमर यात्र पाहावयास निघाले. सारा देश हादरला. सारे भरतखंड गहिवरले. हिमालय वितळून वाहू लागला. समुद्र उचंबळून नाचू लागला. नद्या अधिकच द्रवल्या. त्यांचे पाणी पाणी झाले. अपूर्व असा तो क्षण होता!

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा