shabd-logo

चौदा

15 June 2023

4 पाहिले 4
जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला होता. पित्याच्या त्या भयंकर मरणाने तो पराकोटीस गेला होता. 'ही भूमी मी निर्नाग करीन' अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. त्या प्रतिज्ञापूर्तीच्या कामाला तो लागला. त्याने या बाबतीत इतर कोणाचे ऐकावयाचे नाही असे ठरविले. 'माझ्या पित्याचा प्राण घेणारी जात दुष्टच असली पाहिजे. नागाची पूजा करणारे नागासारखेच दुष्ट असावयाचे. सर्पाप्रमाणे ते वक्रगती व विष वमणारे असावयाचे. अशी दुष्ट जात जगातून दूर केलीच पाहिजे.' असे तो म्हणे. सर्व सत्ता हाती येईपर्यंत तो वाट पाहत होता. परंतु आता कोण करणार विरोध ? कोण येणार आडवा ?

“साम्राज्यात कोणीही नागपूजा करता कामा नये.” असे त्याने आज्ञापिले. नागांचे उत्सव, यात्रा यावर त्याने बंधन घातले. कोणत्याही अधिकारावर नागांना नेमावयाचे नाही, असे ठरविण्यात आले. नागांशी आर्यांचे विवाह होता कामा नयेत, असे त्याने उद्घोषिले. इतर मांडलिक राजास त्याने पत्रे लिहिली. 'आपापल्या राज्यांत नागपूजा बंद करा, कोणी नागपूजा करील तर त्याचे शासन करा, नागांना कोठेही कसलेही अधिकार देऊ नका.' असे त्याने कळविले.

सर्वत्र छळ होऊ लागला. वक्रतुंड व त्याचे हस्तक प्रचार करू लागले. राजाच्या आज्ञेप्रमाणे अधिकारी वागत आहेत की नाहीत, सामंत राजे वागत आहेत की नाहीत, हे ते पाहत व जनमेजयाला कळवीत. पाषाणमयी सुंदर अशा नागमूर्तीचा संहार होऊ लागला. त्या गावाबाहेर फेकण्यात येऊ लागल्या. सर्वत्र असंतोष माजला.

आर्यांच्या पुष्कळ स्त्रिया नागपूजक झाल्या होत्या. त्या फुले व दूध घेऊन गावाबाहेर जात, कोठे एखादे वारूळ पाहून तेथे फुले वाहून येत, दूध अर्पून येत. परंतु त्यांना बंदी होऊ लागली. आर्यस्त्रिया घरातच भिंतीवर, पाटावर नागाचे चंदनी गंधाने चित्र काढीत व पूजा करीत. परंतु राजपुरुषांना कळले तर दंड होई. गुप्त हेरांचा सुळसुळाट झाला. भिंतीला कान फुटले, उशीखाली विंचू आले. सुरक्षितता कोठे दिसेना.

जनमेजयाच्या साम्राज्यात नागांचे एक मोठे गाव होते, त्यांनी तेथे आज्ञाभंग करण्याचे ठरविले. फारच प्रचंड अशी पाच फणांची अतिशय मनोहर पाषाणमयी नागमूर्ती त्या गावी होती. ज्या वेळेस त्या मूर्तीचा उत्सव होई, त्या वेळेस त्या पाच फणा हिरेमाणकांनी सजवीत. “उत्सव कायमचा बंद करा. राजाधिराज जनमेजयमहाराजांचे अनुशासन पाळा. नाहीतर समूळ उच्छेद केला जाईल.” असे धमकीचे पत्र तेथील नागनायकास आले. गावातील नाग-स्त्रीपुरुषांची प्रचंड सभा भरली. त्या सभेत ते जनमेजयाचे अनुशासन प्रकट रीतीने जाळण्यात आले. संतापजनक भाषणे तेथे झाली. नागांचा निश्चय झाला उत्सव करण्याचे सर्वांनी ठरविले. जनमेजयाचे सेन्य आले तर त्याचा समाचार घेण्यासाठी नागतरुण सिद्ध झाले. सोळा वर्षांवरील प्रत्येक नागतरुण सन्नद्ध झाला. गदा, तलवार, पट्टा, बाण वगैरे शस्त्रास्त्रांची जमवाजमवय करण्यात आली, महाद्वारावर हजारो दगड गोळा करून ठेवण्यात आले.

उत्सवाचा दिवस आला. गावात संमिश्र आनंद होता. गगनभेदी भेरी वाजत होत्या. शंकर त्राहाटिले गेले. शिंगे फुंकली गेली. सारा गाव श्रृंगारण्यात आला. आज नागेश्वराची महान पूजा. ती पूजा साध्या पुष्पांनी होणार की शिरकमलांनी होणार? आज तेथे रक्त सांडले जाणार का?

“जनमेजयाचे सैन्य चालून येत आहे.” अशी वार्ता पसरली. दूर आकाशात धूळ उडताना दिसत होती. नागसेना सामना देण्यासाठी सिद्ध झाली. ‘मारू किंवा मरू' अशा त्यांनी आणा घेतल्या. चतुर नागनायकाने नागांची एक तुकडी जनमेजयाच्या सैन्यावर पाठीमागून हल्ला करण्यासाठी पाठविली. बाणांच्या गाड्या घेऊन ती तुकडी गुपचूप गेली. बाकीचे नाग बाहेर पडले. शत्रूकडून बाण येऊ लागले. नागांनी उत्तर दिले. हजारो गोफणीतून दगड फेकले जाऊ लागले. डोकी फुटू लागली. इतक्यात जनमेजयाच्या सेनेवर पाठीमागूनबाण येऊ लागले. कचाट्यात सापडले ते सैन्य. ते घाबरले व सैरावैरा पळत सुटले. नागांनी पाठलाग केला. फारच थोडे शत्रुसैन्य जिवंत जाऊ शकले. बहुतेक प्राणांस मुकले.

नागांचा विजय झाला खरा, परंतु हा तात्पुरता विजय होता. पराजयाने जनमेजय संतापेल, तो सहस्रावधी सैन्य घेऊन येईल, हे नागांना पक्के माहीत होते. त्यांनी तो गाव सोडण्याचे ठरविले, ज्या गावात त्यांचे वाडवडील नांदत आले, त्या गावात ते सुखाने नांदत होते. ते गाव सोडणे त्यांच्या जिवावर आले. तेथील घरे, तेथील क्रीडाभूमी, तेथील तडागवापी, तेथील नागमूर्ती सारे सोडून जावयाचे होते. तेथील शेतेभाते, झाडेमाडे, सारे सोडायचे होते. ज्या झाडांवरून ते झोके घेत, जी झाडे त्यांनी स्वतः लाविली, त्या सर्वांना निरोप द्यावयाचा होता. कितीतरी तेथील आठवणी, कितीतरी स्मृतीचिन्हे ! परंतु जाण्याशिवाय उपाय नव्हता.

हिमालयाच्या उतरणीवरील राजा इंद्राच्या आश्रयास जाण्याचे त्यांनी ठरविले. एकजात सर्व मंडळी निघाली. म्हाताऱ्याकोताऱ्यांना व लहान मुलांना रथांतून, गाड्यांतून बसविण्यात आले. कोणी घोड्यांवर बसले. बहुतेक पायी निघाले. जितके आवश्यक तितके सामान त्यांनी बरोबर घेतले. कुत्री, मांजरे, तीही त्यांनी बरोबर घेतली. महान यात्रा सुरू झाली. स्त्रिया दमून गेल्या. पायांना फोड आले. त्यांनी पायांना पल्लवर लपेटले. चालतच होत्या. वाटेत वेळ दवडणे धोक्याचे होते.

निघताना ती भव्य नागमूर्ती त्यांनी मोठा खड्डा खणून त्यात पुरून टाकली. जणू आपले प्राणच पुरीत आहोत, असे त्यांना वाटले. अश्रूंनी व पुष्पांनी शेवटची पूजा त्या मूर्तीची त्यांनी केली व मग वर माती लोटली.

राजा इंद्र याचे घराणे फार प्रसिद्ध होते. आर्य व नाग या दोघांशी या घराण्याचे संबंध स्नेहाचे होते. इंद्र आश्रय देईल, अशी नागांना श्रद्धा होती. अतिशय हाल व अपेष्टा सोशीत हे स्वातंत्र्याचे यात्रेकरू इंद्राच्या राजधानीस पोचले. इंद्राने त्याचे स्वागत केले. त्यांना अभय दिले.

जनमेजयाच्या कानावर या सर्व गोष्टी गेल्या. वक्रतुंड व जनमेजय बोलत

असतानाच, वार्ताहराने जनमेजयाचे पत्र जाळून टाकल्याची वार्ता दिली. “राजा, किती दिवस सौम्यपणा दाखविणार?” वक्रतुंड म्हणाला. “सौम्यपणा आता संपला. माझे पत्र जाळणाऱ्यास मी जाळीन. पत्राचा सत्र सुरू करून सूड घेतो. सर्पसत्र सुरू करतो. नागांना जाळण्याचे सत्र !”

जनमेजय म्हणाला.

“महाराज, नागांनी आपले सैन्य ठार केले आणि आता सारे नाग

इंद्राच्या आश्नयार्थ गेले." वार्ताहराने वार्ता आणली. “काय, इंद्राने आमच्या शत्रूस आश्रय दिला?” जनमेजय क्रोधाने म्हणाला.

“राजा, तू आता उग्र रूप धारण कर. इंद्राला खरमरीत पत्र लिही. इतरही सामंतांना नागांच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारण्याविषयी लिही. त्यांचे गुळमुळीत धोरण असते असे कळते.” वक्रतुंड म्हणाला.

“सर्व नागांना पकडून येथेच पाठविण्याविषयी लिहितो. येथे करू त्यांची होळी. त्या बावळटांना नागांना शिक्षा करण्याचे धैर्य होणार नाही. येथेच उभारू सहस्रावधी तुरुंग प्रत्यही काढू बळी घेऊ पुरा सूड. असेच करतो. " जनमेजय म्हणाला.

“फारच चांगले. साऱ्या नागांच्या मुसक्या बांधून येथे आणू. गावोगाव

तुझे राजपुरुष जाऊ देत, सैनिक जाऊ देत.” वक्रतुंड म्हणाला. “इंद्राशी युद्धच करावे लागेल.” जनमेजय म्हणाला.

“ करू युद्ध. सारे सामंत आपापली सैन्ये घेऊन तुझ्या बाजूने उभे राहतील. त्यांना ससैन्य सिद्ध राहण्याविषयीही लिही.” वक्रतुंड म्हणाला. विचार करून जनमेजयाने इंद्राला पत्र लिहिले. ते पत्र घमेंडीचे होते. सत्तेच्या उन्मादाचे होते.

“महाराज इंद्र यास....

नागजातीचे लोक माझ्या राज्यातून आपल्या आश्रयास गेले आहेत, असे कळते, वास्तविक आमचे व नागांचे वैर आहे हे जाणून आपण त्यांना आश्रय दिला न पाहिजे होता. नागांची दुष्ट जात क्षमाई नसून हननार्ह आहे. त्यांनी माझे शासन मोडले, इवढेच नाही, तर मी पाठविलेले पत्र सभा भरवून तुच्छतेने जाळले. माझे पत्र जाळणाऱ्या जातीची मीही होळी करण्याचे ठरविले आहे. नागांचा निःपात करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. तुमच्या घराण्याचे व आमचे पूर्वापार फार स्नेहाचे संबंध आहेत. आपला घरोबा फार व ऋणानुबंधही तसाच आहे. माझे पणजोबा आपल्या राजधानीत गाहून नृत्यादी कला शिकते झाले, नाना शस्त्रास्त्रे संपादिते झाले. नरवीर पार्थाचा महिमा सर्वांस ज्ञात आहे आणि त्यांची माता कुंती, त्यांच्या व्रतसमाप्तीप्रीत्यर्थ तुमच्या घराण्याकडूनच श्वेतवर्ण ऐरावत पाठवण्यात आला होता. असे आपले संबंध, त्या संबंधात वितुष्ट येऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. आपण नागांना आश्रय द्याल तर फसाल. ते तुमच्यावरच उलटतील. माझ्या पूज्य पित्याचा त्यांनी कसा विश्वासघाताने वध केला ती हकिकत तुम्हाला ज्ञातच आहे. असो. तरी नागास पत्रदेखत निष्कासित करावे. कळावे, महाराजाधिराज जनमेजय.

जनमेजयाच्या पत्राने इंद्र घाबरला नाही. त्याने प्रमुख नागांना बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय केला. एकजात सारे नाग इंद्राच्या पाठीशी उभे राहायला तयार होते. 'मणिपूर वगैरे नागराज्येही इंद्राच्याच बाजूने उभी राहतील.' असे नागनायकांनी सांगितले. शेवटी युद्धाचीच पाळी आली तर नाग सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीने उठतील, अशी त्यांनी ग्वाही दिली. इंद्राने जनमेजयास उत्तर दिले.

"राजाधिराज जनमेजय यांस,

निराधारास आधार देणे, आश्रयार्थ आलेल्यास आश्रय देणे, हे आमचे कुलव्रत आहे. इतके दिवस झाले. नाग व आर्य यांचे संबंध इतक्या विकोपास कधीही गेले नव्हते. उलट दोन्ही समाज जवळ येत होते. सरमिसळ होत होती. दोघांची एक संमिश्र अशी सुंदर संस्कृती बनत चालली होती. तुम्ही काळाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊ पाहात आहात. असे कराल तर फसाल. फुकट श्रम होतील. आपण जे धोरण स्वीकारले आहे ते आर्यास शोभले नाही. 'एक सत् विप्रा बहुधा वदन्ति' असे म्हणाऱ्या आर्यांना आपले प्रस्तुतचे धोरण पाहून दुःख होईल. संग्राहक वसहानुभूतीचे धोरण स्वीकाराल व सर्वत्र शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कराल, अशी मला आशा आहे. आर्य व नाग यांच्यात स्नेहसंबंध निर्मिण्याचे काम जर आपण अंगावर घ्याल तर मी त्यात सर्वस्वी साहाय्य देईन.

आपला
इंद्र 


जनमेजयाला ते पत्र मिळाले. ते पत्र त्याने पायाखाली चुरडले. “इंद्रासह नागांची होळी करतो.' अशी त्याने गर्जना केली. 'इंद्राच्या मुसक्या बांधून आणून ह्या होळीत फेकतो.' असे तो म्हणाला. त्याने इंद्राशी युद्ध करण्याचे ठरविले. सर्व अंकित राजांना सैन्य घेऊन येण्याविषयी पत्रे लिहिली गेली. तिकडे इंद्रही स्वस्थ बसला नाही. त्यानेही सिद्धता केली होती. ठिकठिकाणचे नाग इंद्राच्या राजधानीत येत होते. मणिपूरचा राजा इंद्राच्या साहाय्यार्थ सिद्ध झाला. नागांना इंद्राविषयी कृतज्ञता वाटली. इंद्राचे चतुरंग दल सिद्ध झाले. पुन्हा महाभारत होणार का? पुन्हा कुरुक्षेत्र होणार का? पुन्हा लक्षावधी लोक एखाद्या व्यक्तीच्या हट्टासाठी रणकुंडात पडणार का? पुन्हा लक्षावधी स्त्रिया पतिहीन होणार का? मुले पितृहीन होणार का? पुन्हा शोकसागर घरोघर उसळणार का? काय होणार? जनमेजयाच्या आसुरी अहंकारास कोण घालणार आळा ? हा महान संहार कोण थांबवणार? कोणात आहे शक्ती ? स्वतःच्या साम्राज्यातून व सामंतांच्या राज्यांतून सारे नाग भराभर इंद्राकडे जात आहेत, हे कळताच जनमेजय दातओठ खाऊ लागला. त्याने पुन्हा कडक आज्ञापत्रे लिहिली. गावोगावचे नाग बद्ध करून राजधानीस पाठविण्याविषयी अधिकाऱ्यांस कळविण्यात आले. नागांना घरे सोडण्याची सर्वत्र बंदी झाली. नागांचे जथे राजधानीस येऊ लागले. कारागृहे भरून जाऊ लागली.
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा