shabd-logo

वीस

20 June 2023

1 पाहिले 1
“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होती. एकेक कुटुंब बलिदानार्थ रांगेने उभे करण्यात आले. होमकुंडे पेटली. तुपाच्या धारा ओतून काष्ठे शिलगावण्यात आली. त्या ज्वाळा खाऊ की चावू करीत होत्या? जनमेजयाच्या द्वेषाला खाऊ पाहात होत्या.

“कोठे आहे ती वत्सला?" जनमेजय हा राजाच नव्हे. जो प्रजेचे ऐकत नाही तो का राजा? तो लुटारू, चोर.' असे असे हिने म्हटले नाही का? आणा तिला पुढे. तिच्या नवऱ्यालाही ओढा. " जनमेजय गर्जला.

दोघांना दोरखंडांनी बांधून उभे करण्यात आले.

“काय, वत्सले, विचार केलास की नाही? या पतीला सोड, माझी क्षमा माग. प्राण नको असतील तर तयार हो. प्राण हवे असतील तर माझी आज्ञा ऐक. " तो म्हणाला.

“जा रे, पाप्या! तुझें तोंडही पाहावयाची मला इच्छा नाही. तुझे अपवित्र शब्द ऐकण्याची इच्छा नाही. तुझ्यासारखे पापात्मे ज्या भूमीवर नांदतात ती भूमी सोडून जाण्यासाठी मी उत्सुक आहे. जाऊ दे देवलोकी, दुसऱ्या लोकी. पतीला सोडून पत्नी राहू शकत नाही. हे तुला किती सांगायचे? प्रभा प्रभाकरला सोडत नाही, जोत्स्ना चंद्राला सोडीत नाही. हे अविनाभाव संबंध असतात! नाग पवित्र आहेत. तू मात्र धर्मभ्रष्ट चांडाळ आहेस. सहस्रावधी लोकांचे, स्त्रीपुरुषांचे, मुलाबाळांचे हवन करू पाहाणारा, तु का मनुष्य? तू वृकव्याघ्र आहेस. वृकव्याघ्रही बरे. ते रक्ताला इतके तहानलेले नसतात. तू कोण आहेस? तुझ्या पशुत्वाला, दुष्टत्वाला तुलना नाही. मला धर्म शिकवतो आहे! हा तुझा रक्तलांच्छित धर्म, हा का धर्म ? निरपराधी जीवांचे रक्त सांडणे हा का धर्म? हा धर्म नाही. ही तुझी जहरी लहर आहे. द्वेषाची लहर म्हणजे विषारी वणवा, विषारी लाट ! तुझ्या राज्यात एक क्षणभरही जगण्याची मला इच्छा नाही. जेथे सर्वांच्या विकासाला अवसर नाही ते राज्य केवळ पापरूप आहे. तुमचे कायदे, तुमच्या संस्था सर्वांच्या विकासाला कितपत साहाय्य करतात यावर तुमच्या राज्याची वा धर्माची प्रतिष्ठा. नको तुझे राज्य, नको तुझा हा धर्म. मला लवकर जाऊ दे. कुठल्या होमकुंडात उडी घेऊ बोल. आम्ही दोघे हातात हात घेऊन उडी घेतो. त्या पाहा ज्वाला आम्हास भेटण्यासाठी नाचत आहेत. कोठे फेकू उडी बोल. आमची शरीरे जळताना पाहून तुझे डोळे कृतार्थ होऊ देत. तुझा आर्यधर्मं सुफल होऊ दे. आमचे मांस चुरचुर जळताना पाहून तुझ्या अंगावर मूठभर मांस चढो. आम्हा हजारोंच्या आगीत जळण्यानं तुझ्या एकट्याचा राग शांत झाला. तरीही पुष्कळ झाले. सूर्याला जन्म देताना सर्व प्राची दिशा लाल लाल होते. ती रक्तबंबाळ होऊन पडते व बालसूर्य वर येतो. तुझ्या जीवनात ज्ञानरवी यावा म्हणून आम्ही हजारो लहानमोठी माणसे आमचे रक्त सांडायला उभी आहोत. बोल, राजा.....

वत्सला बोलत होती तो तिकडून प्रचंड जयनाद आले. शांतिगर्जना आल्या. आस्तिक भगवानांचा जयजयकार कानी आला. 'ऐक्याचा विजय असो' असे ध्वनी कानावर आले. 'ससैन्य इंद्र का आला? आस्तिकांचा का जयजयकार ? का खरोखरच आस्तिक आले? मला ही वार्ता कशी कळली नाही? वक्रतुंडाने का सांगितले नाही? जनमेजय अशा विचारात पडला. होमकुंडे धडधडत होती. राजाने उभे राहून दूर पाहिले. जणू राज्यातील सारी प्रजा येत आहे असे त्याला वाटले. लाखो स्त्रीपुरुषांचा सागर येत होता. पिवळ्या शांतिध्वजा दुरून दिसत होत्या. बाळ शशांकाचा हात धरून आस्तिक सर्वांच्या पुढे होते. पाठीमागून सर्व जनसागर होता. जनमेजय उभा राहिला. भगवान आस्तिक हातात शांतिध्वज घेतलेले असे समोर येऊन उभे राहिले. बाळ शशांकाने समोर आई पाहिली, वडील पाहिले. तो एकदम धावत जाऊन आईला बिलगला. सैनिक त्याला दूर ओढू लागले.

“थांबा, ओढू नका. ही माझी आई आहे. तिच्याबरोबरच उडी टाकीन. आई, माझा एक हात तू घर व एक बाबा धरतील. आपण उडी घेऊ. कोणत्या होमकुंडात? ह्या?” तो बोलत होता. ते तेजस्वी शब्द ऐकून काय वाटले असेल बरे तेथील लोकांना? जनमेजयाला काय वाटले? हजारो बद्ध स्त्रीपुरुषांना काय वाटले? ते शब्द ऐकून जनमेजयाची मान खाली झाली. इतर सहस्रांची मान वर झाली.

“राजा, सप्रेम प्रणाम." भगवान आस्तिक म्हणाले.

“भगवान, मला लाजवू नका. आपल्या चरणांची धूळ आम्ही मस्तकी धरावी." असे म्हणून राजा जनमेजय दंडवत घालून त्यांच्या पायावर पडला. आस्तिकांनी त्याला उठवून क्षेमालिंगन दिले.

“आपण कोणीकडून आलात? काय हेतू धरून आलात? आपल्यासारख्या पुण्यमूर्ती महर्षीचे दर्शन अत्यंत दुर्लभ. का केलात दर्शन देण्याचा अनुग्रह ? आज शतजन्माची पुण्ये फळली म्हणून आपले दर्शन घडले. " जनमेजय बद्धांजली म्हणाला.

"राजा, शब्दावडंबर करण्याची वेळ नाही. औपचारिक बोलण्याची ही वेळ नाही. मी माझे बलिदान करण्यासाठी आलो आहे. मी व माझ्या आश्रमातील अंतेवासी, त्याप्रमाणेच इतर महान ऋषिमुनी आम्ही सर्व तुझ्या होमकुंडात शिरण्यासाठी आलो आहोत. शेकडो लोक वाटोवाट मिळाले तेही आले आहेत. तू जो हा नरमेध सुरु केला आहेस, हे सर्पसत्र सुरु केले आहेस, त्यात आमचीही आहुती पडून तुझा नागद्वेष शांत होवो. हा शशांक, हा नागेश, हा रत्नकांत, तो बोधायन, तो पद्मनाभ दे सर्वांच्या आहुती. निर्मळ कुमारांच्या आहुती, वत्सला, कृष्णी, अशा थोर सतीच्या दे आहुती. त्या वृद्ध सुश्रुता आहे. सर्वांत वृद्ध अशा त्या आहेत. त्याही तुझ्या द्वेषाला शांत करण्यासाठी आल्या आहेत. राजा, माझ्या देहातही तुझ्या दृष्टीने अपवित्र असणारे नागरक्त आहे. हा अपवित्र देह अग्नीत फेक व धर्माला उजाळा दें, पृथ्वीला पावनता दे." आस्तिक म्हणाले.

“महाराज, तुमच्या अस्तित्वाने पावित्र्य होईल, धर्म सनाथ होईल. तुम्ही असे का बोलता? मी आपला कधीतरी अपमान केला का? आपल्या आश्रमावर पाठवले का सैनिक? आपणाविषयी मला अत्यंत पूज्य बुद्धी आहे.” जनमेजय म्हणाला.

“राजा, माझ्याहून थोर अशा व्यक्ती तू आगीत फेकण्यासाठी उभ्या केल्या आहेस. या सहस्रावधी माता यांच्यात का दिव्यता नाही? हे सहस्राबंधी पुरुष तू उभे केलेस. त्यांच्यात का पुण्यता नाही? ही शेकडो मुले तू बांधून उभी केली आहेस. त्या मुलांहून कोण रे निर्मळ? या पृथ्वीला जी काही थोडी पवित्रता मधुरता आहे, या पृथ्वीला जी काही थोडी शांती व गोड आनंद मिळतो तो ह्या निष्कपट मुलांमुळे. मुले म्हणजे संसारवृक्षाची फुले. ह्या सर्वांचे तू हवन करणार व मला वाचवणार? ती वत्सला, ते थोर नागानंद, एकेक पृथ्वीमोलाची माणसे तू जाळण्यासाठी उभी केलीस ! हा भयंकर आसुरी संहार आरंभलास! आम्हाला कसे जगवेल ? राजा, आम्हालाही जाळ, कोठल्या होमकुंडात शिरू ? शिष्यांना गुरूने मार्ग दर्शविला पाहिजे. मला शिरू दे. माझ्या पाठोपाठ हे कुमार येतील.” आस्तिक शांतपणे बोलत होते.

“भगवान, नागजातीचा मला का राग येऊ नये? माझ्या पित्याचा दुष्टपणे यांच्यातीलच एकाने प्राण घेतला. हे लोक दुष्ट नाहीत? जनमेजयाने विचारले.

“राजा, अर्जुनाने तुझ्या पणजोबाने - तक्षकांच्या सर्व वसाहती जाळून टाकिल्या. हजारो नाग त्या वेळेस त्या आगीत भाजून गेले. त्या आगीत भस्म झाले. त्या आगीतून पळून जाणारेही आगीत फेकले गेले. तक्षकवंशांतील एक तरुण फक्त वाचला. तुझ्या पित्याने नागांच्या ऋषींची विटंबना केली. ऋषींच्या गळ्यातून मारलेले साप अडकवले. तुम्ही आर्यांनी नागांना भरडून काढले आहे. तुम्ही नागांवर इतके अत्याचार केले आहेत, की, तुम्हाला शासनच करावयाचे झाले तर तुम्हा सर्व आर्यांचे राईराईएवढे तुकडे करावे लागतील. तरीही ती शिक्षा कमीच होईल. आर्यांनी नागांना छळले, जाळले, पोळले. तुम्ही त्यांच्या सुपीक वसाहती बळकावल्यात. त्यांना दूर हाकललेत. त्यांना केवळ दास केलेत. त्यांच्या स्त्रियांना केवळ करमणूक म्हणून क्षणभर जवळ घेतलेत व मग दूर फेकलेत. तरीही ते नाग शांत होते. आता त्यांची दैवतेही तुम्ही अपमानू लागलात. त्यांचा सुंदर पाषाणी नागमूर्ती फेकू लागलात. ते शांत राहणारे, तुमचे सहस्रावधी अपराध पोटात घालणारे नाग ते आत उठले. ते का क्रूर? ते क्रूर का तुम्ही क्रूर? जेत्यांना स्वतःचा क्रूरपणा दिसत नाही. जितांची कत्तल करण्यातही आपण त्यांना करुणाच दाखवीत आहोत, त्यांना लुटण्यात आपण त्यांचेवर उपकारच करीत आहोत, त्यांना गुलाम करण्यात आपण त्यांना संस्कृतीच देत आहोत, असे त्यांना वाटते. खड्ग म्हणजे संस्कृती नव्हे. मनुष्याचा वध करणे म्हणजे संस्कृती नव्हे. दुसऱ्यांच्या झोपड्या जळून आपले प्रासाद उठवणे म्हणजे सुधारणा नव्हे. माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा. मला तर सारा क्षुद्रपणा दिसत आहे. केवळ हीनवृत्ती दिसत आहे. केवळ द्वेष दिसत आहे. नाग म्हणजे क्रूर. नाग म्हणजे वाईट, कारे, बाबा ? ईश्वराने का एखाद्या विशिष्ट मानववंशाला केवळ क्रूर असेच निर्मिले ? भलेबुरे सर्वांत आहेत. आर्यात अत्यंत दुष्ट असतील, तर नागात महात्मे मिळतील. कोणी कोणास हसू नये. प्रकाश व अंधार सर्वत्र आहे. फुले व काटे सर्वत्र आहेत. अशी कोणती जात आहे की ती केवळ पवित्र आहे, निःस्वार्थ आहे, निष्कलंक आहे? सर्वसुंदर एक परमेश्वर आहे. आपणास एकमेकांचे गुण घेत व स्वतःचे दोष दूर करीत पुढे जावयाचे आहे. दुसऱ्याची हत्या करून परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करता येणार नाही.

नागजातीवर तू उगीच तुटून पडत आहेस. गावोगाव भले संबंध उत्पन्न होत होते. परंतु तू पुन्हा खो घातलास. आता काही नाग इंद्राकडे गेले. तू का त्याच्याजवळ लढाई करणार? पुन्हा काही या बाजूस, काही त्या बाजूस उभे राहून का सारे मरणार? पुन्हा सत्पुत्राच्या रक्ताचा सडा भारतमातेच्या अंगावर सांडणार? राजा, गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, तापी, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा, कावेरी वगैरे मंगल नद्यांनी सुपीक व सुंदर झालेल्या या भारतमातेची तुम्ही सारी मुले. जिच्या पायाशी सागर खेळत आहे व जिच्या डोक्याशी हिमालय नम्रपणे उभा आहे अशी ही भव्य भूमी. तिची तुम्ही लेकरे ! आपल्याच मुलांच्या आपसातील मारामारीने आपल्या अंगावर त्यांचे रक्त सांडावे असे कोणत्या मातेस पाहवेल, सहन करवेल? ही माता पाताळात गडप होऊ पाहील. येथील हवापाणी, अन्न तुम्हाला तेवढे पवित्र करते व नागांना नेमके अपवित्र करते का? हा अहंकार आहे.

राजा, द्वेषाने द्वेष शमत नाही. मत्सराने मत्सर मरत नाही. तुमच्या आर्यात जशा काही सुंदर चालीरीती आहेत, तशा नागातही आहेत. तुम्ही दोघे एक व्हा. धर्म आणखी वैभवशाली होईल. हिमालयाला शेकडो शिखरे आहेत, त्या सर्वांमुळे तो शोभतो. भारतीय धर्माला शेकडो सुंदर सुंदर विचाराआचारांची शिखरे शोभोत. विविधता हे वैभव आहे, परंतु त्या विविधतेच्या पाठीमागे एकता मात्र हवी. एका वृक्षाच्या फांद्या, एका नदीचे प्रवाह, एका सागरातील लाटा, एका अंबरातील तारे, एका सतारीतील बोल!

राजा, आर्यांचा विष्णू व नागांचा सहस्र फणांचा नागदेव, येऊ देत दोन्ही दैवते एकत्र. देव एकत्र आले की भक्तही एकत्र येतील. शेषशायी भगवान आपण निर्माण करू. देवाचे वैभव वाढवू. शेषाच्या आधारावर असणारा विष्णू. नागांच्या आधाराने जगणारे आर्य. नाग हे येथील. ते पाया आहेत. त्यांची मदत घ्या; सहकार्य घ्या. दोघे गोडीने जगा. आर्यसंस्कृती व नागसंस्कृती एकत्र येवोत. दोहोंची एक नवीनच संमित्र अशी संस्कृती होवो. शुभ्र गंगेत काळी यमुना मिळून जाऊ दे. प्रवाह अधिक विशाल व गंभीर होऊ दे. पुढील पिढ्यांना आदर्श घालून ठेवा.

राजा, या पवित्र व सुंदर, समृद्ध व सस्यश्यामल भूमीत अनेक जातिजमाती येतील. तुम्ही आर्य आलात, दुसरेही येतील. या भूमीच्या प्रेमाने नाना धर्म येतील. उपाशी अन्नान्न राष्ट्रे या भारतमातेजवळ येतील. ती त्यांनाही जवळ घेईल व पोशील. परंतु तुम्ही दूर दूर राहाल तर भांडाल व मातेला कष्टवाल. पुढील काळात येणाऱ्या नाना लोकांनी कसे वागावे त्यासाठी आज तुम्ही उदाहरण घालून ठेवा.

एकमेकांना उच्चनीच समजू नका. उगीच कुरापती काढू नका, कलागती वाढवू नका. मांगल्य निर्मिण्यासाठी जगेल-मरेल तो खरा माणूस. जातिजातींत सलोखा व स्नेह निर्माण करण्यासाठी जगेल मरेल तो खरा मानव मानव्याची महती स्वतः जीवनात प्रकट करून ती दुसऱ्यासही पटवील तो खरा मनुष्य. या भारतात नाना संस्कृतीचे लोक येणार. महान वटवृक्षावर शेकडो रंगांची व नाना आवाजाची पाखरे येऊन बसणार. तो महान आहे म्हणूनच येणार. त्याचप्रमाणे हा देश महान आहे. म्हणूनच येणार भिन्न भिन्न लोक. हे सारे भिन्न भिन्न लोक एकत्र येतील व शेवटी विश्वसंग्राहक परममंगल संस्कृती निर्मितील. भरतभूमी मानव्याचे तीर्थक्षेत्र होईल. नाना संस्कृतीचे संमिश्र असे सहस्र पाकळ्यांचे कमलपुष्प फुलवतील.

राजा, अहंकाराने विकास थांबतो, वाढ खुंटते. संकुचितपणाने शेवटी मराल, गुदमराल. सहानुभूतीशिवाय व सहकार्याशिवाय हे जीवन म्हणजे रखरखीत वाळवंट आहे. आपल्या थोर पूर्वजांनी 'शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्राः' अशी सर्वांना हाक मारिली. 'अमृतस्य पुत्रा नतु केवलं आर्याणां नमु नागानाम् !' ज्या विश्वशक्तीने आर्य निर्मिले त्याच विश्वशक्तीने नागही निर्मिले. जे तत्त्व आर्यात आहे, तेच नागातही आहे. आर्यांना भुकेसाठी अन्न लागते तसेच नागासही लागते, हे जो पाहील तो खरा मनुष्य. तो डोळस. बाकीचे आंधळे, डोळे असून आंधळे!

राजा, विवेकाने बघ. निर्मळ प्रेमळ निरहंकारी दृष्टीने बघ. शांतपणे हृदयात डोकावून बघ. माझे म्हणणे तुला पटेल. परंतु तुला तू वाचवावे म्हणून हे मी बोलत नाही. या नागांचा व त्यांना सहानुभूती दाखविणाऱ्या सर्वांचा संहार करणार असशील तर माझीही आहुती पडू दे. नागजातीचा समूळ संहार चालला असताना कोणाला जपतप करीत बसवेल, आश्रमात राहवेल? देवांच्या सहस्रावधी लेकरांचा अमानुष छळ होत असताना कोण स्वस्थ बसेल? इंद्रासारखे तुझ्याशी शस्त्रास्त्रांनी लढतील. तलवर हाती घेऊन लढणे हे माझे काम नाही. माझ्यासारखा तपोधन तलवारीसमोर शांतपणे उभा राहील. अन्यायाला जीवनार्पणाने विरोध करील. पशुत्वाविरुद्ध मानुष्यत्व उभे करून विरोध करील. राजा, या थोर माता तू गाईप्रमाणे उभ्या केल्या आहेस, राजा, तुझ्या आयाबहिणींना, तुझ्या कुटुंबातील सर्वांना जर कोणी असे दोऱ्या बांधून उभे केले असते तर? प्रत्येक गोष्ट स्वतःवरून पाहा.

अरे, या तुझ्याच मायबहिणी आहेत. अर्जुनाने नागकन्यांजवळ नव्हते का विवाह केले? आणि ती सती द्रौपदी ती तरी कोण होती? मला तर वाटते ती नागकन्याच असावी. कारण ऋषी अग्नीने ती द्रुपद राजाला दिली. द्रुपदाला मूलबाळ नव्हते. ऋषी अग्नी हा आर्यांच्या वसाहती वाढवणारा. त्याने नागांना छळले. परंतु सुंदर नागबाला पाहून त्याचेही हृदय द्रवले. ती लहान मुलगी त्याने द्रुपदाला नेऊन दिली. ती काळीसावळी होती म्हणून कृष्णा असेही म्हणत. द्रुपदाने प्रेमाने तिला वाढवले व ती द्रौपदी म्हणून ओळखली जाऊ लागली. माझे मत सर्वांना नाही पटणार. केवळ कृष्णवर्ण म्हणून आर्य नव्हता असा सिद्धांत कसा मांडावा? आम्हा नागतही काही श्वेत नाग आहेत. तुमच्या आर्यातही काही कृष्णवर्ण आर्य असतील. परंतु खांडववन जाळवणाऱ्या अग्नीने द्रुपदाला ही मुलगी नेऊन दिली, ही गोष्ट निर्विवाद. ते काही असो. मला सांगायचे एवढेच की, या नागमाता एक प्रकारे तुझ्या माताच आहेत. त्यांचे बलिदान करायचे असेल तर कर. त्या मातांबरोबर माझेही भस्म होवो, माझ्या मातीचेही सोने होवो.

राजा, या पृथ्वीवर शांतीचे राज्य असावे, अशी त्या पूर्वीच्या महर्षीची तळमळ. प्रत्येक वेदमंत्राच्या शेवटी 'ओम शांतिः शांतिः' अशी त्रिवार उत्कट ध्येयघोषणा त्यांनी केली आहे. पूंजांची थोर ध्येये उत्तरोत्तर अधिकाधिक मूर्त करावयाची हे पुढील पिढ्यांचे काम असते. परंतु तू तर त्या ध्येयांना मातीत मिळवू पाहत आहेस. तू ह्या नागांना नाही जाळायला उभे केलेस, तर थोर पूर्वजांची महान ध्येये, त्यांची थोर स्वप्ने, त्यांच्या आशा-आकांक्षा ह्या सर्वांची तू होळी करणार आहेस. राजा, मनुष्यत्व कशात आहे ते लक्षात घे. पशुतेचा त्याग करीत दिव्यत्वाकडे जाणे हे मनुष्याचे काम. तू कोठे रे खाली खाली चाललास? अहंकाराच्या भरीस पडून कोठे चाललास वाहवत ? राजाची मती भ्रष्ट झाली तर साऱ्या राष्ट्राचा नाश होतो. भगवान शुकचार्यांच्या सांगण्यावरून तुझ्या पित्यानेच विष चारणाऱ्या त्या तरुण नागाला क्षमा नाही का केली, प्रेम नाही का दिले? आज परीक्षिती काय म्हणत असतील? मरताना त्यांनी जे दिव्यत्व दाखविले ते का तू धुळीत मिळविणार?

राजा, पुन्हा विचार कर. विवेकाला स्थान दे. आर्य व नाग यांचे ऐक्य करणारा म्हणून इतिहासात विख्यात हो, तू नागांचे हवन आरंभणारा म्हणून इतिहासात राहशीलच. परंतु ते हवन थांबवून दोन्ही जातीचे मीलन करणाराही तूच होतास, असेही इतिहास सद्गदित होऊन सांगेल. आर्य व नाग यांची हृदये जोड, या थोर सती, या थोर मायबहिणी, यांना आदराने वस्त्रालंकार दे. सर्वांचा सत्कार कर. हे नागबंधू, यांनाही भेटी दे. सर्वांना जवळ घे. प्रेम दे. शल्ये बुजव. इंद्र वगैरे इतर सर्व राजांनाही बोलाव. सर्व भरतखंडांतील राजे येऊ देत. सर्व भरतखंडभर आर्य व नाग यांच्या ऐक्याचा संदेश जाऊ दे. आता आर्यांनी नागांच्या वाटेस जाऊ नये, नागांनी आर्यांच्या जाऊ नये, एवढेच नाही, दोन्ही समाज, दोन्ही वंश एकमेकांत मिळून जाऊ देत, एकरूप होऊ देत. भारताचे तोंड नवतेजाने फुलू दे. भावी पिढ्यास उत्तरोत्तर वाढत जाण्याचे, भेदात अभेद पाहण्याचे ध्येय मिळू दे. आज आर्य व नाग एक होत आहात, उद्या तुमच्यात आणखी प्रवाह येऊन मिळतील. या भरतभूमीत तो विश्वचालक मानवजातीचे सारे नमुने आणील व एक मनोज्ञ असे दृश्य दाखवील. ही त्याची इच्छा ओळखून वागू या. ईश्वरी इच्छेच्या विरुद्ध जाण्याने आपण मरू. दुसऱ्यास मारू. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यात अर्थ नाही. या भारतखंडाच्या इतिहासाची गती मानवैक्याकडे आहे. तिकडे हा प्रवाह चालला आहे. हा प्रवाह पुढे धीर-गंभीर होऊन, अति विशाल होऊन, सच्छांतीच्या सागराला मिळेल!

“राजा, हा आस्तिक तुझ्याजवळ ही प्रेमभिक्षा मागत आहे. राजाने नाही म्हणू नये. घाल ही ऐक्याची भिक्षा. भारताच्या इतिहासातील दिव्य आरंभाची भिक्षा. राजा, तू कठोर नाहीस. हाडाचा कठोर कोणीच नसतो. शेवटी कठोरातील कठोरही विरघळतो. कठोरता आत्मचंद्राला कायमची चिकटू शकत नाही. ती शेवटी गळते. ती पहा कठोरता पाझरली. राजा, तुझ्या डोळ्यांतून पाणी आले!”

“भगवन, मला क्षमा करा. मलाच ह्या पाप्याला होळीत फेका. माझेच दहन करा. मी अपराधी आहे. या सहस्रावधी मातांच्या शापांनी मी आधीच जळून गेलो असेन.” जनमेजय आस्तिकांच्या पायांवर पडून म्हणाला.

“ऊठ, राजा, ऊठ. आलेले वादळ गेले. द्वेषपटल गेले. तुझ्या हृदयातील खरा धर्मसूर्य जागा झाला. आता कशाला मरू इच्छितोस ? या हजारो माता तुला आशीर्वाद देत आहेत. पहा त्यांची मुखे फुलली. त्यांचे डोळे भरून आले. ते अश्रू तुझे जीवन फुलवतील. ते आशीर्वादाचे अश्रू आहेत. आता मरण्याची इच्छा नको करू. आता तर तुझा सर्वांना खरा आधार. आता चिरंजीव हो. हे ऐक्य वाढव. या ऐक्याला सर्वत्र हिंडून फिरून पाणी दे. पूर्वीच्या जीवनावर पडदा पडू दे. झाले गेले सर्वजण विसरून जाऊ. अंधारातील प्रकाश जीवनात भरू." आस्तिक म्हणाले.

सर्व नागबंदींना मुक्त करण्यात आले. मुले आईबापांस बिलगली. सखे सख्यांना भेटले. पत्नींनी पतीकडे अश्रूपूर्ण दृष्टीने प्रेमाने पाहिले. तेथे प्रेमाचा सागर उचंबळला. आनंदाचा सागर उचंबळला. जयजयकार गगनात गेले. 'महाराजाधिराज जनमेजयांचा विजय असो.', 'भगवान आस्तिकांचा विजय असो.', 'शांतिधर्माचा, ऐक्यधर्माचा, संग्राहक प्रेमधर्माचा विजय असो.' असे नाना जयजयकार! मुले नाचू लागली. शांतिध्वजा फडकवू लागली. कृष्णी कार्तिकाला भेटली. वत्सला नागानंदाजवळ भावनांनी ओथंबून उभी होती. नागानंद बासरी वाजवू लागले. प्रेमाची बासरी. लक्षावधी प्रजा प्रेमसंगीतात डुंबत राहिली. मुले नाचू लागली.

जनमेजयाने बृहत् भारतीय परिषद बोलावली. राजेमहाराजे आले. ऋषिमूनी आले. इंद्र आला. नागनायक आले, नागराजे आले. भव्य दिव्य सभा. लाखो आर्य व नाग जनता जमली होती. जे पूर्वी बंदी होते ते सर्व वस्त्रालंकारांनी अलंकृत असे तेथे शोभत होते. वृद्ध सुश्रुता आसनावर होती. मुख्य आसनावर भगवान आस्तिक होते. त्यांच्या एका पायाशी जनमेजय होता. दुसऱ्या पायाशी इंद्र होता. अपूर्व सभा.

आरंभी नागानंदाने बासरी वाजविली. सर्व सभा एका भावनासिंधूत डुंबू लागली. सर्वांचा एका वृत्ती लय झाला. नंतर ऋषींनी शांतीमंत्र म्हटले. मग श्री आस्तिक बोलावयास उभे राहिले.

“आजचा परम मंगल दिवस. उपनिषदे आज कृतार्थ झाली. परमेश्वराने फार मोठी कृपा करून हा दिवस दाखविला. या भारताच्या इतिहासाचे विधिलिखित आज आपण लिहून ठेवीत आहोत, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवीत आहोत. निरनिराळ्या जातींनी सूडबुद्धीने एकमेकांशी सदैव लढत राहण्याऐवजी, ‘आपलीच संस्कृती श्रेष्ठ, आपणच काय ते देवाचे लाडके, सर्व 'सद्गुण केवळ आपणातच आहेत, बाकीचे मानववंश म्हणजे नुसते शुंभ, हीन, असंस्कृत पशू' असे मानण्याऐवजी, दुसऱ्या मानववंशास गुलाम करून त्यांचा उच्छेद करण्याऐवजी, सर्वं मानववंशात दिव्यता आहे, त्या त्या भिन्न मानवी समाजातही एक प्रकारची चारित्र्याची प्रभा असते, त्यांच्या त्यांच्या संस्कृतीतही विशिष्ट असे महत्त्वाचे गुण असतात हे ध्यानात घेऊन एकमेकांनी एकमेकांच्या जवळ येणे, मनाने व बुद्धीने अधिक श्रीमंत होणे, अधिक विशाल होणे हे सर्व मानवाचे कर्तव्य आहे, ही गोष्ट या भारतात आज प्रामुख्याने ओळखिली जात आहे. अतः पर झाले गेले विसरून गेले पाहिजे. खंडभर मातीतून जो एक सोन्याचा कण मिळतो तो आपण जवळ घेतो. त्याप्रमाणे मानवी इतिहासाच्या अनंत घडामोडींतून शेवटी जो सत्कण मिळतो, तो घेऊन पुढे गेले पाहिजे. ती आपली पुढची शिदोरी. भावी पिढीच्या हातात द्वेषाची जुनी मशाल आपण देणार नही. प्रेमाचा हा दीप त्यांच्या हाती देऊ. 'हा नंदादीप वाढवीत न्या.' असे त्यांना सांगू. जो सोन्याचा कण आपणास मिळाला तो त्यांना देऊ.

जुनी मढी उकरीत बसण्यात अर्थ नाही. जुन्या इतिहासातील भांडणे उगाळीत बसण्यात अर्थ नाही. जुन्या इतिहासातील मंगल घेऊन पुढे गेले पाहिजे. एका म्हाताऱ्याची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. त्याला दोन मुलगे होते. दोघांतील शहाणा कोण, ते त्याला पाहावयाचे होते. त्याने त्यांना दोन खोल्या बांधून दिल्या. किंचित द्रव्य दिले. 'एवढ्याशा द्रव्यात जो आपली खोली भरून दाखवील त्याला मी माझी सर्व संपत्ती देईन' असे त्याने सांगितले. एका मुलाला गावातीलच कचराच अगदी अल्प किंमतीत मिळाला. त्याने गाड्या भरून ती घाण आणली व खोली भरून टाकली. परंतु तो दुसरा मुलगा. त्याने मातीच्या दहा पणत्या विकत घेतल्या. त्यात तेल घातले, वाती घातल्या. ते लहानसे मंगल दीप त्याने खोलीत लावून ठेवले. बाप परीक्षा घ्यावयास आला. एक खोली त्याने घाणीने भरलेली पाहिली. एका खोलीत मधुर मंगल असा शांत प्रकाश भरलेला पाहिला. आपणही जुन्या इतिहासातील घाण नेहमी बरोबर बाळगू नये. त्यातील प्रकाश घ्यावा. आता उखाळ्यापाखाळ्या नका काढू. सर्व राजे-महाराजे, सर्व ऋषिमुनी, सर्व आश्रम, सर्व प्रज्ञा सर्वांनी आता हे ऐक्याचे बाळ वाढवावे.

ये, तक्षकवंशातील नायका ये. तुझा व जनमेजयाचा हात मी एकमेकांच्या हातात देतो. या. आता हे हात एकमेकांस तारोत, सांभाळोत. हे हात प्रेमसेवा देवोत. हे हात विषे चारणार नाहीत. होळीत लोटणार नाहीत. भेटा, परस्परांत क्षेमालिंगन द्या. इंद्रा, तूही ये. जनमेजयास भेट. मणिपूरचा राजा, ये तूही जनमेजयास हृदयाशी धर. भरतखंडात आता शांती नांदो, आनंद नांदो, विवेक नांदो, ज्ञान नांदो, स्नेह नांदो, सहकार्य नांदो. आज मला धन्य धन्य वाटत आहे. तपोधनाला शांतिप्रसादापेक्षा दुसऱ्या कशात आनंद आहे? खरा धर्मशील मनुष्य उगीचच्या उगीच केवळ स्वार्थासाठी जगाला युद्धाच्या खाईत लोटणार नाही. खरा धर्मशील मनुष्य हे वणवे विझवण्याचा कसून प्रयत्न करील, स्वतःचे प्राण अर्पण प्रयत्न करील. आज तुम्ही सारे खरे धर्मपूजक शोभता. आज धर्माला आनंद झाला असेल, परमेश्वराला प्रेमाचे भरते आले असेल!”

आस्तिक भावनाभराने वाकून खाली बसले. जनमेजय उभा राहिला. त्याला प्रथम बोलवेना. मोठ्या कष्टाने तो बोलूलागला. “मला सर्वांनी क्षमा करावी. नागांनी क्षमा करावी. ज्यांना ज्यांना मी शारीरिक व मानसिक वेदना दिल्या त्यांचेजवळ मी क्षमा मागतो. भगवान आस्तिकांनी सत्पथ दाखविला. या मार्गाने आपण सारे जाऊ या. आजच्या प्रसंगाचे चिरस्मरण राहण्यासाठी आपण वर्षातील एक दिवस निश्चित करू या. आषाढ-श्रावणात पाऊस फार पडतो रानावनात दूर राहणारे सर्प, नाग पाण्याने बिळे भरली म्हणजे आपल्या आश्रयास येतात. नागबंधू सर्वांची पूजा करतात. आपण पावसाळ्यातील एखादा दिवस नागपूजेसाठी म्हणून राखू या. श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस ठरवू या. कारण या दिवशीच मोठी नागयात्रा भरत असते. तोच दिवस हिंदुस्थानभर ठरवू. त्या दिवशी आर्य व नाग, सर्वांनीच नागांची पूजा करावी. त्या दिवशी संपूर्ण अहिंसा पाळू. क्रीडामुंगीला दुखवणार नाही, पानफूल तोडणार नाही. एक दिवस तरी प्रेमाचे महान दर्शन. त्या दिवशी हसू, खेळू, नाचू, झोक्यावर झोके घेऊ. कथागोष्टी सांगू. तुम्हा सर्वांस आहे का ही सूचना मान्य?"

सर्व राजांनी संमती दिली. ऋषमुनींनी संमती दिली. नागजातीतील तो तक्षकवंशीय तरुण म्हणाला, “आम्ही सारे विसरून जाऊ. आपण सारे भाऊ भाऊ होऊ." वत्सला तेथे येऊन म्हणाली, “मी महाराज जनमेजयास फार कठोर बोलल्ये, त्यांनी क्षमा करावी." परंतु जनमेजयच उठून म्हणाला, “तुम्ही थोर पतिव्रता आहात. राजाच्या आज्ञेपेक्षा सदसद्विवेकबुद्धीची आज्ञा अधिक थोर असते, हे तुम्ही निर्भयपणे जगाला दाखविलेत. राजाची आज्ञा अयोग्य असेल तर ती पायाखाली तुडवणे हेच प्रजेचे कर्तव्य. अशानेच राजा ताळ्यावर येईल. राजा शुद्धीवर येईल. राजाच्या 'होस हो' म्हणणे हे प्रजेचे काम नाही. वत्सलाताई, तुम्हीच सद्धर्म दाखविलात. त्या सैनिकांसही माघारे दवडून नवपंथ दाखविलात. या मंदाधाला क्षमा करा. मी महान अपराध केला. मला तुमच्या चरणांवर पडू दे व रडू दे."

खरोखरच राजा जनमेजय वत्सलेच्या पाया पडला. “शाबात, शाबास” सारे म्हणाले. वृद्ध सुश्रुता आजी म्हणाली, “जनमेजय व वत्सला यांचा एका दिवशीचा जन्म आहे. दोघे एका ध्येयाची झाली!” सोहळा संपला. सर्व भरतखंड भेटले. एकरूप झाले. आनंदीआनंद झाला.


21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा