shabd-logo

पाच

12 June 2023

0 पाहिले 0
महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते. ते कार्तिक-मार्गशीर्ष महिन्याचे दिवस होते. वटवृक्षाच्या पानांपानांमधून लाललाल फळे शोभत होती. जणू लाल रुद्राक्षच त्या वटवृक्षाने सर्वांगी धारण केले होते. सूर्य उगवला होता. आश्रमातील कुमारांनी झाडलोट करण्याचे आधीच सूर्याने आपली सोन्याची हिरांची केरसुणी घेऊन सारा अंधार झाडून टाकला होता. दऱ्याखोऱ्यांतून वृक्षराईतून सर्वत्र त्याने तो सुवर्ण झाडू फिरविला. औषधालाही अंधाराचा केरकचरा ठेवला नाही. सूर्याने अंधाराचा कचरा दूर केला. वाऱ्याने पुष्कळसा पानपातेरा पहाटे उठून दूर केला. दव पडून सडा घातला गेला होता. फुलांचे सुगंध पसरून पावित्र्य व प्रसन्नता निर्मिली होती. पक्ष्यांनी गोड किलबिल सुरु केली होती. आश्रमातील साऱ्या बटूंनी सृष्टीच्या झाडलोटीत भाग घेतला. सर्वं आरशासारखे स्वच्छ केले. स्नाने करून अंगाला ऊब यावी म्हणून भस्म फासून ते मृगाजिनांवर येऊन बसले. समोर भगवान आस्तिक होते.

“ ॐ असतो मा सद्गमय

ॐ तमसो मा ज्योतिर्गमय

ॐ मृत्यो मा अमृतं गमय." ही उपनिषदांतील प्रार्थना, लहानशी परंतु बहु अर्थमयी, त्यांनी डोळे मिटून म्हटली. नंतर आस्तिक बोलू लागले.

“मी थोडेसे सांगणार आहे आज. मग तुम्ही आपापली निरनिराळी कामे करायला जा. मी जे सांगत असतो ते जीवनाला उद्देशून सांगत असतो. प्रत्येकाच्या जीवनाला उपयुक्त असे सांगत असतो. तुम्ही सारेच धनुर्वेत्ते नाही होणार. सारे संगीतवेत्ते नाही होणार. सारे राजनीतिज्ञ नाही होणार. परंतु मी जे सकाळी प्रार्थनेच्या वेळेस सांगत असतो ते, तुम्ही पुढे काहीही करा की कोठेही जा, तुम्हाला उपयोगी पडेल.

“बाळ अजित, एक उंबराचे फळ आण बघू.' "

अजित पटकन उठला व एकदोन उंबराची फळे घेऊन आला.

"फोन, तूच फोड एक." आस्तिकांनी सांगितले.

“फोडले. " अजित म्हणाला.

“काय दिसते तुला आत ?” त्यांनी प्रश्न केला.

“आत शेकडो बिया लवलव करीत आहेत. मोठी मौज दिसते आणि ही बी बघा, भुरटी बघा आत." अजित म्हणाला.

"या एका फळांत शेकडो बिया आनंदाने राहत आहेत. सहकार्याने नांदत

आहेत. या भूमीमध्येही तुम्ही सारे असेच आनंदाने राहा. नाग व आर्य भांडू नका. परस्पर सहकायांने राहा. समजले ना?” आस्तिक म्हणाले.

“माझ्या तंत्रीचे असेच आहे.” सुहास म्हणाला. “काय आहे तुझ्या तंत्रीत. " आस्तिकांनी प्रश्न केला.

“अनेक तारा, परंतु सर्वांच्या सहकायांने, संयमी वर्तनाने मधुर संगीत

निर्माण होते." तो म्हणाला.

“असे तर सर्वत्रच आहे. या आश्रमात अनेक वृक्ष आहेत, परंतु सर्व आनंदाने राहत आहेत. अनेक फुलझाडे आहेत, परंतु भांडत नाहीत. उलट नाना प्रकारची फुले आपण लावतो व त्यामुळे अधिकच आनंद होतो. आपल्या नदीमध्ये अनेक लाटा एकमेकीत गमतीने गुदगुल्या करीत असतात. एकमेकींच्या अंगावर नाचतात, कुदतात, मौज आहे.” हृषीकेश म्हणाला.

“वामन, तू एक लहानसे रोपटे हळूच उपटून आण बघू.” गुरुदेवांनी

सांगितले.

वामन गेला व बरीचशी रोपटी उपटून घेऊन आला.

“ अरे एक सांगितले ना? बरे राहू दे. त्यातील एक हातात घे. त्याला मुळे आहेत का?" त्यांनी प्रश्न केला.

“हो, मुळांशिवाय कसे असेल ते?" वामन हसून म्हणाला.

“किती आहेत मुळे?”

“ अनेक. "

“कोणत्या दिशेला गेलेली आहेत ती?"

“सर्व दिशांना....'

“यातील अर्थ समजला का कोणाला ? का सांगितले हे रोपटे उपटून आणायला? येते कोणाच्या ध्यानात?” गुरुदेवांनी विचारले.

“ मी सांगतो. " शुद्धमती म्हणाला. “सांग बरे." गुरुदेव प्रसन्न होऊन म्हणाले. “ज्याप्रमाणे झाड आपली मुळे सर्व दिशांत पसरून ओलावा मिळविते

व स्वतःची वाढ करून घेते, त्याप्रमाणे मानवानेही जेथे जेथे प्रकाश मिळेल, चांगुलपणा मिळेल, तेथून तेथून घेऊन स्वतःचा विकास करावा. जे झाड आपली मुळे दूरवर पसरते ते सुदृढपणे उभे राहते, असाच ना तुमचा आशय ?”

"होय बाळ. आर्यांनी नागांजवळचे चांगले असेल ते घ्यावे व नागांनी आर्याजवळचे घ्यावे. कोणाजवळ काहीच चांगुलपणा नाही अशी भिकारी वस्तू वा व्यक्ती ईश्वराच्या विश्वात नाही. विषांतही अमृतत्व असते. काही विषे अप्रतिम औषधे होतात. उपयोग करून घेणाऱ्यावर सारे आहे. आपण सर्व वस्तूंचा उपयोग करून घेतो. परंतु मानवाचा सदुपयोग आपणास करून घेता येऊ नये, हे आश्चर्य नाही का? या आश्रमातून तरी जे तरुण बाहेर पडतील ते मानव्याची उपासना करणारे होवोत. आजकाल आर्य व नाग यांच्यात द्वेष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रकट रीतीने होत आहे, अप्रकट रीतीने होत आहेत. द्वेषसंवर्धनाचे आश्रम व शाळा सुरू होत आहेत. अशा या जगात तुम्ही शांतीचे उदककुंभ भरून न्या.” आस्तिक गंभीरपणे म्हणाले.

“परंतु काही लोक वाईटच असतात. 'दुर्जनाः परिहर्तव्यः । " बोधायन म्हणाला.

“वाईटपणा हा एक वरचा पापुद्रा असतो. एखादा कंद जरा वर वाईट दिसला तर आपण एकदम फेकीत नाही. तो आत बघत जातो. चांगला भाग दिसेल तो घेतो. आपण एक गमतीचा प्रयोग करू या. तुमच्यात सर्वात झोपाळून कोण आहे?” गुरुदेवांनी हसून विचारले.

" नागेश. " आर्यव्रत म्हणाला.

“कधी रे पाहिलेस ? आर्यव्रतच आहे आळशी.” नागेश रागाने म्हणाला.

“आळशी म्हणजे झोपाळू नव्हे. मी पडलेला असतो तरी जागा असतो.”

आर्यव्रताने उत्तर दिले.

“ते तर फारच वाईट. मला झोप लागलेली असते. मी उगीच लोळत नसतो." नागेश म्हणाला.

"म्हणजे झोप तुला फार येते हे तूच कबूल केलेस.” आस्तिक म्हणाले. सर्व मुले हसू लागली.

“झोपाळू म्हणजे का वाईट?" नागेशने विचारले.

“मुळीच नाही. तो विपुल अन्नाला आपल्या पोटात ठाव देतो. अन्नब्रह्माचा तो थोर एकनिष्ठ उपासक असतो.” प्रद्युम्न म्हणाला. “खूप जेवणारा का वाईट असतो?" नागेशने विचारले.

“मुळीच नाही. तो मारामारीत पहिला असतो. सर्वांना रडवतो.” हलधर

बोलला.

“येऊ का रडवायला, अशी देईन एक! " नागेश म्हणाला.

“परंतु नागेश उत्कृष्ट सेवकही आहे. त्या दिवशी त्या वाटसरूंची होडी उलटली. हाकाहाक झाली. नागेशने किती जणांस त्या दिवशी वाचविले! शक्ती ही वाईट वस्तू नाही. शक्तीच्या पाठीमागे शिव हवा, एवढेच. बरे, नागेश, एकदा हस बघू. राग गेला? आता एक प्रयोग करू हा येथे तू नीज. तुझ्या अंगावर बरीच पांघरुणे घालतो. झोपलास तरी चालेल. झोपच लागली पाहिजे असेही नाही आणि तू, आर्यव्रत तूही ये. तुझ्या अंगावरही तितकीच कांबळी घालतो. निजा दोघे हसता काय? निजा." आस्तिक म्हणाले.

ते दोघे कुमार झोपले.

“मी माझा पावा वाजवतो म्हणजे यांना झोप लागेल.” मुरलीधर

म्हणाला.

“मी गातो. सामवेदातील मंत्र म्हणतो.” जानश्रुती म्हणाला.

तेथे एक महान प्रयोग सुरू झाला. सारे शांत होत होते. संगीत सुरू होते. पावा वाजत होता. वेदगान चालले होते. नागेशचे डोळे, ते पाहा मिटत चालले, उघडले जरा, मिटले, मिटले आणि आर्यव्रत, तोही चालला निद्रेकडे. चालला, मिटले डोळे, झोपला.

“दोघे झोपले ना रे !” आस्तिकांनी विचारले.

" नागेश तर कधीच झोपला. झोप म्हटले की तो झोपतो.” हृषीकेश म्हणाला.

“परंतु ऊठ म्हटले की उठत नाही. तो अर्धा अर्जुन झाला आहे. अर्जुनाला गुडाकेश म्हणत. निद्रा त्याच्या स्वाधीन होती. इच्छा असताच जागा होई, इच्छा असताच निजे. एक प्रकारचे इच्छामरण व इच्छाजीवनच ते. आता आपण एक गम्मत करू या. तुम्ही पाहा हो.” आस्तिक म्हणाले.

आस्तिक आर्यव्रताजवळ गेले. त्याच्या अंगावरची पांघरुणे ते काढू लागले. दोन पांघरुणे काढताच त्या हालचालीने तो जागा झाला. नंतर आस्तिक नागेशकडे वळले. त्याच्या अंगावरची सारी पांघरुणे त्यांनी काढली, तरी त्याला जाग आली नाही. “नागेश, नागेश" हळू हाका मारण्यात आल्या. तरी काही नाही. शेवटी "नागेश, नागेश" असे मोठ्याने म्हणून त्याला हलवल्यावर त्याने डोळे किलकिले केले. मग गदगदा हलवल्यावर तो उठला.

“आर्यव्रताला लवकर जाग आली व नागेशला मागून आली, परंतु जाग येतेच. कोणाला आधी, कोणाला मागून. जसे हे शारीरिक जागृतीचे तसेच मानसिक व बौद्धिक जागृतीचे. काहींचे मन काही गोष्टींत लवकर जागे होते, काहींची बुद्धी काही गोष्टीत लवकर रंगते, परंतु इतर गोष्टींत त्यांची मने, त्यांच्या बुद्धी काही कधीही रमणार नाहीत असे नव्हे. मनाची व बुद्धीची अनंत शक्ती आहे. ज्या संबंधात मन वा बुद्धी जागृत व्हावयास पाहिजे असेल त्या संबंधीची मनोबुद्धीवरची आवरणे दूर केली पाहिजेत. त्या त्या वेळेस मनोबुद्धीस गदगदा हलविले पाहिजे. ते ते वातावरण सर्वत्र संतत उभे केले पाहिजे. दुसऱ्याने जसे व्हावे असे तुम्हास वाटते ते वातावरण सर्वत्र पसरा. रोग्याच्या शेजारी दुसरे रोग का उभे करायचे? रोग्याजवळ फुले, सुगंध आपण ठेवतो. प्रकाश, आनंद, स्वच्छता ठेवतो. त्याप्रमाणे ज्यांची जीवने, ज्यांची मने तुम्हाला रोगट वाटत असतील, त्यांच्या समीप तुमची जीवने सुगंधी, स्वच्छ, प्रकाशमय, आनंदमय, सेवामय अशी घेऊन जा. गाणाऱ्या गंधर्वाची कुत्रीही गाऊ लागतात! हे सारे आपल्यावर आहे. आर्यांनी नागासमोर सेवामय, सहकार्यमय, प्रेममय जीवन उभे करावे. त्या दोन प्रेमळ लाटा एकमेकींत मिसळून जातील. एक नवीन महान लाट उत्पन्न होईल. ती आणखी दुसरीत मिसळेल. अशा रीतीने ह्या भारतात मानवतेचा गोड सिंधू उचंबळवू या. समजलेत ना? सर्वांवरची आवरणे दूर होतील, पापुद्रे पडतील, कवचे गळतील. आतील सौंदर्य सर्वांचे सर्वांस दिसेल, ही दृष्टी घेऊन येथून जा व द्वेषमय दृष्टीने पाहणारी आसमंतातली मानवसृष्टी प्रेममय करा. जा आता. आपापले आवडीचे विषय शिकायला जा. शांतपणे जा. नागेशला चिडवू नका, नाहीतर तो मारील हो...." हसून आस्तिक म्हणाले.

सारे छात्र गेले. आनंदाची, मोकळेपणाची किलबिल सुरू होती. पाखरे पांगली. निरनिराळ्या ठिकाणी गेली. भगवान आस्तिक कोठे चालले? जेथे जेथे छात्र गेले तेथे तेथे जाऊन प्रेमवृष्टी करायला स्मितमय आशीर्वाद द्यायला!

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा