shabd-logo

सात

12 June 2023

7 पाहिले 7
आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घातला होता. मोठे प्रसन्न व सुंदर होते वातावरण.

राजा परीक्षिती आज येणार होता. त्याच्याबरोबर इतरही काही ऋषिमंडळी येणार होती. त्याच्या स्वागताची सिद्धता होत होती. आज आश्रमाला सुट्टी होती. छात्रगण निरनिराळ्या कामांत मग्न होता. काही छात्र पुढे गेले होते. येणारी मंडळी दिसताच ते शिंग वाजवणार होते. अतिथी शाळेत सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

ते पहा शिंग वाजले. भगवान आस्तिक पुष्पहार घेऊन सामोरे निघाले. बरोबर छात्रमंडळी होती. राजा परीक्षितीचा रथ दुरून ओळखू येत होता. बरोबर काही घोडेस्वार होते. दुसऱ्या काही रथांतून ऋषिमंडळी होती. भगवान आस्तिक दिसताच राजा रथातून उतरला. तो एकदम पुढे आला व त्याने प्रणाम केला. इतर ऋषिमंडळींनीही आस्तिकास अभिवादन केले, आस्तिकांनी परीक्षितच्या गळ्यात सुगंधी फुलांचा हार घातला. इतर ऋषींनाही त्यांनी पुष्पहार अर्पण केले. छात्रांनी झाडावरून पुष्पवृष्टी केली.

सारे आश्रमात आले. रथ एका बाजूला सोडण्यात आले. पाहुण्यांनी हस्तपादप्रक्षालन केले. कुशल प्रश्न आले. आस्तिक स्वतः सर्वांची चौकशी करीत होते. गोड फळांचा उपहार देण्यात आला.

“भगवान किती मधुर आहेत ही फळे, अशी मी कधी चाखली नव्हती. राजाच्या उपवनांतूनही अशी रसाळ फळे मिळणार नाहीत. तुम्ही कोणती करता जादू?" परीक्षितीने विचारले.

“राजा, या आश्रमात जादुटोणा काही नाही. या आश्रमात काही विशेष असेल तर एकच आहे की, येथे प्रेम पिकवले जाते. जीवनाच्या वृक्षाला मधुर फळे कशी लागतील ती कला येथे शिकविली जाते." आस्तिक म्हणाले.

"जो जीवन रसाळ करायला शिकला त्याला झाडावर का रसाळ फळे निर्मिता येणार नाहीत? जीवनाची शेती ही सर्वांत कठीण अशी शेती." एक ऋषी म्हणाले.

“शेकडो कोस पसरलेली शेती करणे सोपे आहे, परंतु हे साडेतीन हातांचे शेत पिकविणे कठीण आहे. परंतु एकदा हे पिकू लागले की अमोल संपत्ती हाती येते. कधीही मग ते पीक तुटत नाही, बुडत नाही.” दुसरे ऋषी म्हणाले..

“ मधूनमधून जपावे लागतेच. उंदीर, घुशी जीवनाचा मळा विफळ करण्यासाठी टपलेल्या असतात. हा मळा फस्त करण्यासाठी नाना वासनाविकारांचे पशू हपापलेले असतात. कठीण आहे ही शेती, परंतु ही शेती केली नाही तर सारे फुकट आहे. हृदयातील शेती नसेल तर बाहेर कितीही तुम्ही पिकविले तरी उपासमार नष्ट होणार नाही, भांडणे दूर होणार नाहीत, राजा, ही शेती येथे पिकविली जाते. बाहेरच्या शेतीबरोबरच ह्या शेतीकडेही लक्ष दिले जाते. आम्ही शेतात जातो. तण उपटून टाकतो. तण उपटताना मुलांना सांगतो, 'हे तण उपटल्याशिवाय धान्य नाही. त्याप्रमाणे जीवनातील द्वेषद्रोह वगैरे विषारी तण उपटल्याशिवाय जीवन समृद्ध होणार नाही.' राजा, प्रत्येक बाह्य कर्मांबरोबर यात मानसिक कर्म होईल अशी दक्षता मी येथे घेतो. सकाळी मुले आश्रम स्वच्छ करतात, पाण्याचा सडा घालतात. मी त्यांना सांगतो, ‘हृदयातीलही घाण काढा. धूळ उडू नये म्हणून बाहेर पाणी शिंपलेत, परंतु जीवनात दुष्ट स्पर्धेची, कामक्रोधाची, द्वेषाची, स्वार्थाची धूळ उडून मार्ग दिसेनासा होतो. तेथे नको का सडे घालायला? तेथे प्रेमाच्या पवित्र पाण्याचे, सहानुभूतीच्या सुगंधी पाण्याचे सडे घालीत जा. प्रातःकाळच्या पवित्र वेळी तरी घालीत जा.' सकाळी भगवान सूर्यनारायण सर्वत्र सोने वाटीत येतो. अशा मंगल प्रहरी आपणही जीवनाचे सोने होईल अशी खटपट केली पाहिजे. प्रभातकाळचे संस्कार दिवसभर उपयोगी पडतात. प्रभाती जे पेरू ते सायंकाळी कापू. राजा, असा हा आश्रम आहे. दुसरी जादू येथे नाही. जे काही करावयाचे ते मनापासून. जे काही करायचे ते हृदय ओतून. ज्या झाडांना अंतःकरणपूर्वक पाणी घालण्यात येईल त्यांना रसाळ फळे का लागणार नाहीत? मुले झाडांना नुसते खत, नुसते पाणी नाही देत. त्यांत हृदये मिळतात. वृक्ष ही गोष्ट ओळखतात व रसाळ फळे अर्पण करतात. मानवापेक्षाही ही मानवेतर सृष्टी कधीकधी अधिक कृतज्ञ वाटते. पृथ्वीची जरा जोपासना करा. पोटेरीसारखे कणीस ती देते. मी नेहमी याचा विचार करीत असतो.” आस्तिकांची वाणी गंगेप्रमाणे वाहत होती.

“स्नाने येथे करणार का नदीवर?” एका छात्राने येऊन प्रणामपूर्वक विचारले.

“नदीवरच जाऊ. बरेच दिवसांत पोहलो नाही. आज पोहू.” परीक्षिती म्हणाला.

“मग आता निघावेच.” बरोबरचे एक ऋषी म्हणाले.

नदीवर सर्व स्नानार्थ गेले. सारथी घोड्यांना पाणी पाजून आणीत होते. परीक्षितीने वाटेत घोड्यांना थोपटले.

“तुम्हाला घोड्यांबद्दल प्रेम वाटते एकूण?” आस्तिकांनी प्रश्न केला.

“भगवान श्रीकृष्णाचे घोड्यांवर किती प्रेम? ते आपल्या पितांबरातून घोड्यांना चंदी देत, घोड्यांचा स्वतः खरारा करीत, त्यांच्या अंगातील शल्ये काढीत? ते सारे ऐकूनच माझे मन उचंबळते.” परीक्षिती म्हणाला. “श्रीकृष्णाचे जीवन म्हणजे अगाध सिंधू! त्यात माराव्या बुड्या तितक्या थोड्याच !” आस्तिक म्हणाले.

“तुमच्या आश्रमातील मुले नाहीत का येत? त्यांनाही येऊ दे आमच्या बरोबर पोहायला. आज मी राजेपणा विसरून आलो आहे. आज सामान्य मनुष्य या नात्याने मी आलो आहे. आज मुलांत हसू दे; खेळू दे; नाचू दे; कुडू दे; मला लहान होऊ दे." परीक्षिती म्हणाला.

“मी बोलावू का सर्वांना?” एका मुलाने विचारले.

“भोजनाची व्यवस्था ठेवणारे वगळून बाकीच्यांना बोलव. "

आस्तिकांनी सांगितले.

उड्या मारीत मुले आली. लंगोट नेसून ती तयार झाली. त्यांनी दंड थोपटले. त्यांचे शत प्रतिध्वनी उमटले. एकाने शिंग वाजवले. गंमत वाटली. नदीत भरपूर पाणी होते. नागांची काळी मुले व आर्यांची गोरी मुले श्वेत व नील कमळेच फुलली आहेत की काय, असे वाटत होते.

“धरा रे मला कोणी" राजा म्हणाला. “मी पकडतो, मी." एकजण म्हणाला.

राजाने बुडी मारली, त्यानेही मारली. मध्येच वर येत. पुन्हा गुप्त होत.

राजा सापडेना.

“हरलास ना !” राजाने हसून विचारले.

“मी लहान आहे.” तो मुलगा म्हणाला. “लहानांनी तर म्हाताऱ्यांच्या पुढे गेले पाहिजे.” परीक्षिती म्हणाला.

“पुरे आता, अति तेथे माती!” राजा म्हणाला.

“राजा आजारी पडला तर प्रजेचे कसे होणार? राजाने फारच जपून वागले पाहिजे." एक मुलगा म्हणाला. "राजाचे कोण ऐकतो? प्रजेच्या स्वाधीन राजा." परीक्षिती हसून म्हणाला.

“नाही काही. जनमेजय युवराजांनी नागांना आश्रमात येऊ नका असे सांगताच पुष्कळ आश्रमांतून त्यांना बंदी झाली. काही आचार्यांनी असे पाप करण्यापेक्षा आश्रमच बंद केले. आमच्या येथे असे काही आचार्य आले होते. त्यांना फार वाईट वाटत होते." एक नागकुमार म्हणाला.

“परंतु येथील आश्रमात तर उभय जातीचे छात्र आहेत. या आश्रमात आल्याने राजालाही धन्यता वाटते.” परीक्षिती वस्त्रे परिधान करता करता बोलला.

सर्वांची स्नाने झाली. भोजने झाली. भोजनोत्तर सर्वांनी विश्रांती घेतली. छात्र मात्र कामे करीत होते. आश्रमाच्या पटांगणात त्यांनी आसने मांडिली होती. तिसरे प्रहरी काही विचारविनिमय होता. झाडांच्या फांद्या वर पसरलेल्या होत्या. छाया होती. मधूनमधून फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या.

परीक्षिती उठला. इतर ऋषीही उठले. आस्तिकांनी सर्वांना प्रेमळपणे विचारले. सर्वांनी नेत्रांना जलस्पर्श केला; चूळ भरली. सर्व मंडळी वृक्षमंडपात आली. छात्र सारे उभे होते. राजा परीक्षितीला आस्तिकांनी उच्चासनावर बसविले. परीक्षितीने त्यांनाही जवळच दुसऱ्या उच्चासनावर बसविले. इतर ऋषीही बसले. आश्रमात येऊन राहिलेलेही काही ऋषी येथे आले. मोठी प्रसन्न दिसत होती सभा.

भगवान आस्तिक बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले:

"आज भाग्याचा दिवस आहे. आज थोर मंडळी आश्रमाला भेट देण्यासाठी आली आहेत. आश्रमाचे कौतुक करण्यासाठी आली आहेत. परीक्षितिमहाराज आले आहेत. इतर ज्ञानधन व तपोधन महर्षीही त्यांच्यासमवेत आले आहेत. आपण त्यांना काय देणार? आपण त्यांना आदर व प्रेम देतो. आपल्याजवळ दुसरे काय आहे? आश्रमात राजा येणे म्हणजे सर्व प्रजा येणे. राजा म्हणजे प्रजा. राजा म्हणजे सर्व प्रजेचे कल्याण, सर्व प्रजेचे संरक्षण. राजा म्हणजे भेदातीत न्याय, राजा म्हणजे एक प्रकारे महान संन्यासी. तो वैभवात असून अकिंचन असतो. त्याला स्वतःचे असे काही नाही. वृक्षाची फुले-फळे दुसऱ्यांसाठी, वृक्षाचा विस्तार दुसऱ्यांसाठी, तसे राजाचे आहे. म्हणून राजा हा विष्णूचा अंश आपण मानतो. विष्णू म्हणजे सर्वत्र प्रवेश करणारा. विष्णू म्हणजे सूर्याचे रूप. सूर्याचे किरण अंधार दूर करीत, ऊब देत, जीवन वाढवीत, सर्वत्र हळूच प्रेमाने शिरतात. त्याप्रमाणे राजाने प्रजेचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्वत्र जावयाचे; सर्वांच्या जीवनात शिरावयाचे; सर्वांच्या सुखदुःखाची चौकशी करावयाची, सर्वांना ऊब द्यावयाची, आधार द्यावयाचा, द्वेष, स्पर्धा, मत्सर, वैर, संकुचितपणा यांचा नाश करीत जीवनाची वाढ सर्वत्र नीट होईल याची काळजी राजाने घ्यावयाची. परीक्षितिमहाराज याप्रमाणे वागत आहेत हे त्याच्या या परिभ्रमणावरून दिसत आहे. राजाने असेच समता, न्याय व सहानुभूती यांचा दीप हाती घेऊन सर्वत्र हिंडले पाहिजे. म्हणजे असत्य व अन्याय यांची फारशी वाढ होणारच नाही. असो. मी सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो.

प्रजेच्या कल्याणासाठी त्यांना उदंड आयुष्य मिळो, असे मनःपूर्वक इच्छितो. हा फुलांचा हार त्यांना अर्पण करतो. इतर महर्षीसही मी हार घालतो.”

सर्वांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आले. आस्तिक आसनावर बसले. परीक्षिती म्हणाला, “भगवान आस्तिकांनी आमचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. कितीतरी दिवस आश्रमात येईन येईन असे मी म्हणत होतो, मी पुष्कळ आश्रम पाहिले. परंतु हा आश्रम काही निराळा आहे. या आश्रमात आल्याने सर्व श्रमांचा परिहार होतो. ज्या आश्रमात क्षणभर आल्याने सर्व सांसारिकांना स्फूर्ती मिळेल, उदात्त ध्येये मिळतील, नवजीवन लाभेल, दृष्टी मोठी हेईल, जरा वर गेल्यासारखे वाटेल तोच आश्रम खरा आश्रम. अशा आश्रमात अत्यंत आदरपूर्वक व चिकित्सापूर्वक जीवनाचा सर्वांगीण विचार होत असतो. आश्रम म्हणजे विचारनिर्मितीची खाण. येथे सर्व प्रकारच्या चर्चा होऊन जीवनाचा मार्ग दाखविला गेला पाहिजे. शिक्षण कसे असावे, कलांचे ध्येय काय, राजनीती कशी असावी, विवाहनीती कशी असावी, आश्रमधर्म काय, वर्णधर्म काय, निरनिराळ्या मानववंशांचे परस्परांशी संबंध असे असोत, धर्माचे स्वरूप काय, संस्कृतिसंवर्धन कसे व्हावे एक का दोन शेकडो प्रश्नांचा ऊहापोह येथे झाला पाहिजे. आश्रमातून विचारांची धारा बाहेरच्या जगाला मिळाली पाहिजे. येथून प्रकाश मिळावा; येथून जीवन मिळावे, येथून स्फूर्ती मिळावी, दृष्टी मिळावी असे आश्रम सर्वत्र नसतात. असा आश्रम एखादाच असावयाचा. जेथे महान विभूती असेल तेथे असा आश्रम उभा राहतो. मागे एकदा या आश्रमात मी आलो होतो त्या वेळेस जो सुगंध मी घेऊन गेलो तो अद्याप मला पुरत आहे. भगवान आस्तिकांचे स्मरण होताच मला पावन झाल्यासारखे वाटते. का असे वाटते? त्यांच्याकडे मी पूज्यभावाने का पाहतो? तुम्ही सारे का पाहता ? थोरांच्या चरणांशी भक्तिभावाने बसावे असे आपणास का वाटते? ते चरण सोडू नयेत असे का वाटते? सांगू ! आपल्या जीवनाची पूर्णता आपणाला स्वतःच्या जीवनात अनुभवता येत नाही. आपल्या जीवनाचा संपूर्ण विकास आपल्या कृतीतून प्रकट झालेला नसतो. आपणास यामुळे असमाधान असते. आपले संपूर्ण सुंदर स्वरूप पाहण्याची आपणास इच्छा असते. थोर विभूतीच्या ठिकाणी तो विकास आपणास दिसतो. ते आपले उदात्त स्वरूप, ते आपले दैवी स्वरूप, त्यांच्या ठिकाणी आपण बघतो. 'असे मला व्हावयाचे आहे, हा खरा मी, ही माझी परिपूर्णता.' असे आपणास वाटते. त्यांना आपण देव मानतो. माझा देव म्हणजे सर्वांगीण विकास झालेला मीच. देवाचे चिंतन करणे म्हणजे माझ्या परिपूर्णतेचे चिंतन करणे. ती परिपूर्णता माझ्यात आज अप्रकट आहे. ती ज्याच्या ठिकाणी अधिकाधिक प्रकट झालेली मला दिसते, तेथे मी नमतो, रमतो. भगवान आस्तिकांच्या ठायी मानवी परिपूर्णत प्रकट झालेली दिसते.

परिपूर्णता अनेक प्रकारची आहे. परिपूर्णता म्हणजे सर्वांगीण सौंदर्य, शरीराची सर्वांगीण प्रमाणबद्ध अशी वाढ झाली की शारीरिक सौंदर्य उत्पन्न होते. मनाची व बुद्धी ची परिपूर्ण वाढ झाली की, ज्ञान जन्मते, आणि मानव्याची परिपूर्ण वाढ झाली की दिव्यता जन्माला येते. ही सौंदर्ये एकापेक्षा एक अधिक उच्चतर आहेत. किंवा शारीरिक सौंदर्य म्हणजे घराची बाहेरची शोभा, बौद्धिक सौंदर्य म्हणजे माजघरातील शोभा आणि मानव्याच्या परिपूर्णतेचे सौंदर्य म्हणजे गाभाऱ्यातील शोभा. दिव्याचे आत ज्योत नसेल तर बाहेरचा दिवा काय कामाचा? तो कितीही स्वच्छ ठेवला तरी काय उपयोग? म्हणून शेवटी गाभाऱ्यातील मानव्याच्या परिपूर्णतेची सुंदर ज्योत ज्याच्या जीवनात पेटली तोच खरा.

भगवान आस्तिकांच्या ठिकाणी मानव्य परिपूर्णतेस गेलेले मला दिसते. म्हणून त्यांचे सारे जीवन प्रकाशमान दिसते. त्यांचे जीवन म्हणजे एक मंगल ज्योत आहे. म्हणून मी त्यांचेकडे येतो. जेव्हा जेव्हा अंधार मला घेरू पाहत आहे असे मला वाटते, तेव्हा तेव्हा मला येथे यावेसे वाटते. आजही माझ्या मनात अंधार शिरला आहे. मला कर्माकर्म समजेनासे झाले आहे. मी किंकर्तव्यमूढ झालो आहे. भगवान आस्तिकांनी प्रकाश दाखवावा. "

आस्तिक म्हणाले, “राजा, तुझ्या मनातील सर्व सांग. मला त्यावर जे काही सांगता येईल ते मी सांगेन. आपण एकमेकांस हात देऊन पुढे जावयाचे. "

परीक्षिती म्हणाला, “भगवान, आज दोन संस्कृतीचा संघर्ष उत्पन्न झाला आहे. आपण आर्य या प्रदेशात आलो व या प्रदेशाला आर्यावर्त म्हणू लागले. परंतु येथे नानाप्रकारचे मूळचे लोक होतेच. त्यांच्या आपल्या लढाया झाल्या. ते पांगले. परंतु आपण वसाहती वाढवीत चाललो. आपले त्यांचे संबंध येऊ लागले. त्यांच्याशी आपल्या लढायाही होत होत्या व त्यांच्याशी सोयरिकीही होत होत्या. पुष्कळ नागकन्यांशी आपण लग्ने लाविली. त्या नागकन्यांनी आपल्या माहेरची दैवते आपणांबरोबर आणिली. इतरही आर्येतर स्त्रियांनी आपापली दैवते आर्यांच्या घरी आणिली. सारी खिचडी होत आहे. निरनिराळ्या चालीरीती घुसत आहेत. नवीन पद्धती पडत आहेत, अशा वेळेस काय करावे? वेळीच जपले पाहिजे. संस्कृती स्त्रियांच्या हाती असते. आर्य संस्कृती निर्मळ राहायला हवी असे, तर नागांपासून दूर राहावयास नको का? हे विवाह निषिद्ध मानायला नकोत का? आर्य व आर्येत्तर यांचे विवाह होऊ नयेत असे निर्बंध नकोत का घालायला? लोकांना मोह होतो. नागकन्याही अधिक सुंदर व गोड असतात. आर्यकुमार मोहात पडतात. तेव्हा नागांना येथून जा म्हणून सांगणे हेच नाही का योग्य? आता तर आर्यकन्या नागतरुणांजवळ विवाह करू लागल्या आहेत. श्रेष्ठ आर्यांनी नीच नागांजवळ लावावीत का लग्ने? हा अधःपात नाही का? आपल्याच मुलाबाळांचा अधःपात आपण पाहावा का? नीच जातीपासून दूर राहणे बरे. असे अनेक प्रश्न मनाला त्रास देत आहेत. प्रजेमध्ये ह्या विचारांच्या चर्चा होत आहेत. राजाचे कर्तव्य काय? माझे कर्तव्य काय? मला सांगा. मला मार्ग दाखवा. "

सारी सभा तटस्थ होती. राजाने महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला होता. उत्तर ऐकावयास झाडावर पक्षीही शांतपणे बसून राहिले. आश्रमातील हरणेही आस्तिकांची वाणी ऐकावयास कान टवकारून उभी राहिली. घोडा दूर खिंकाळला व 'मीही सावधान आहे' असे त्याने कळविले.

झाडांवरून आस्तिकांच्या मस्तकावर फुले पडली. वृक्षांनी गुरुदेवांची पूजा केली. आस्तिक क्षणभर गंभीर राहिले व म्हणाले, “राजा, श्रेष्ठ कोण व नीच कोण? आपण या नाग वगैरे लोकांच्या प्रदेशात आलो. त्यांच्यापेक्षा आपली संस्कृती श्रेष्ठ असे म्हणू लागलो. ज्यांची संस्कृती श्रेष्ठ त्यांना आधी जगण्याचा अधिकार असे म्हणू लागलो. परंतु जी संस्कृती श्रेष्ठ असेल ती दुसऱ्याच्या संस्कृतीस भीत नाही. त्या दुसऱ्या संस्कृतीसही जवळ घेऊन तिला ती पावित्र्य देते. गंगा मोठी का? कारण इतर प्रवाह आत्मसात करूनही ती पवित्र राहते म्हणून इतर प्रवाहांना ती तुच्छ मानीत नाही. सर्वांमध्ये काही खळमळ असतो, तो शेवटी खाली बसतो व एक महान गंभीर प्रवाह होऊन पुढे जातो. आपण आर्य श्रेष्ठ आहोत ना? श्रेष्ठाने सर्वांना जवळ घ्यावे. मानवप्राणी इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ का? कारण तो फक्त मानवांपुरतेच पाहणार नाही तर विश्वाचा विचार करील. नर हा शेवटी विश्वानर, वैश्वानर आहे. मनुष्य हा विश्वाचे बाळ आहे. तो ताऱ्यांचा विचार करील, वाऱ्यांचा विचार करील. तो पशुपक्ष्यांना उगीच दुखवणार नाही. झाडांना उगीच तोडणार नाही. तो सर्वांना काही मर्यादा सांभाळून संरक्षील. अरे, मानवाने जर विश्वामित्र व्हावयाचे, वैश्वानर व्हावयाचे, तर त्याने का नागांना जवळ घ्यावयाचे नाही, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवावयाची नाही? आपण अग्नीला वैश्वानर म्हणतो. त्याला महान दैवत मानतो. जो अग्नीचा उपासक असेल, महान वैश्वानराचा पूजक असेल, त्याने कसे वागले पाहिजे? अग्नी बरोबर पेटतो, प्रकाश देतो, ऊब देतो, अन्न सिद्ध करून देतो. ज्याने या उपकारक तेजाचा शोध लावला तो मानवजातीचा मोठा सेवक होय. या अग्नीची उपासना करून आपणही सर्वत्र ज्ञान नेऊ या, ऊब नेऊ या, प्रकाश नेऊ या. निरनिराळे विचार निरनिराळ्या ठिकाणी वाढतात त्यांची नीट जुळणी करू या.

नागांना दूर करून ते कसे सुधारणार? इतरही ज्या जातिजमाती असतील त्यांना तुच्छ मानून त्या कशा सुधारणार? तसेच त्यांची दैवते, त्यांच्या चाली यांना शास्त्राने नष्ट करूनही ते काम होणार नाही. नागलोक सापाची उपासना करतात. आपणाला हसू येते. यात हसण्यासारखे काय आहे? मानवाला जे जे भव्य वाटते. दिव्य वाटते, भीतिदायक वाटते, आश्चर्यमय वाटते, त्याला त्याला तो भजू लागतो. अरे, आपल्या सर्व दंतकथा आकाशातील अनंत ताऱ्यांपासून आपण निर्मिल्या आहेत. त्या ताऱ्यांकडे पाहत असत पूर्वज निर्मिली त्यांनी काव्ये, हा ध्रुव तारा, एका बाजूला स्थिर असा का दिसतो? असेल त्याचा बाप. त्याने मारली असेल लाथ. त्या राजाला नाव दिले उत्तानपाद! लांब पाय करून लाथ मारणारा राजा. ध्रुव वनात गेला. त्याने तपश्चर्या केली. तो अढळपदी बसला. त्या ध्रुवाच्या ताऱ्याभोवती आपण अद्भुत अशी सुंदर व गोड कथा उभी केली. ते दुसरे सात तारे एकत्र दिसले, त्यांना दिली सप्तर्षीची नावे. मृगसारखे जे आणखी काही तारे दिसतात.... तो मध्ये बाण दिसतो, तो पलीकडे तेजस्वी तारा दिसतो. त्या ताऱ्याला व्याध म्हटले. हा व्याध व हरणे आकाशात कशी आली? रचिली दंतकथा. अशा रीतीने आकाशाला पाहून जणू आपली पुराणे, आपल्या आख्यायिका, कथा जन्मल्या. अरे, सर्वत्रच अशा जन्मतात. त्या कथांतून आपण आपल्या जीवनाचे अनुभव ओततो, आपली ध्येये ओततो. म्हणून त्या कथा गोड वाटतात. आपल्या जीवनाच्या आशा-आकांक्षा त्यात कवी ओततात, म्हणून ती ती काव्ये हृदय हेलावतात.

उषादेवीची किती सुंदर स्तोत्रे आहेत ! जेथे रम्या उषा दिसत असेल तेथील ऋषींनी तिची स्तोत्रे गायिली. आपण सूर्य, अग्नी, वारे, पर्जन्य, इंद्र, उषा यांना मानतो की नाही देव? पाण्याचीही उपासना करतो की नाही? मग कोणी विशाल वृक्षाची उपासना केली तर का हसावे? नागाची केली तर का हसावे? मी एक विचार सांगतो तो ऐक. त्या त्या कल्पनांना आपण आपल्या श्रेष्ठ कल्पनेचा उजाळा द्यावा. येथील काही जातीत शिश्नदेवही आहेत. ते जननेंद्रियांच्या प्रतिमा करून पूजा करतात. आपण त्यांना हसू नये. मानवाला हा सर्वांत मोठा चमत्कार वाटला असेल. ज्या इंद्रियांच्या द्वारा ही सृष्टी निर्माण होते, त्या इंद्रियांची तो पूजा करू लागला. सृष्टीचे आदितत्त्व ते हे, असे त्याला वाटले. आपण त्यांच्या या लिंगपूजेत अधिक अर्थ ओतू या. ती पूजा प्रतिष्ठित करू या. लिंगपूजा म्हणजे काय ? जननेंद्रियांची पूजा म्हणजे काय? त्यांना स्वच्छ ठेवणे, निर्मळ ठेवणे, त्यांचा दुरुपयोग न करणे, त्यांच्याबद्दल पावित्र्य वाटणे. सृजनकर्म म्हणजे महान जबाबदारी. मी माझ्या इंद्रियांवर संयम ठेवीन. त्यांची शक्ती कमी होईल, असे वर्तन ठेवणार नाही. शिश्नदेव शेवटी शिश्नसंयमी होतील. लिंगपूजा म्हणजे शेवटी शक्तीची पूजा. ज्या शक्तीतून विश्व निर्माण होते त्या शक्तीची पूजा. त्या शक्तीपासून नीट काम करून घ्यायचे असेल तर ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. ह्या शक्तीला क्षोभवाल तर प्रलय होईल. त्या शक्तीला शमवाल तर कल्याण होईल. म्हणून शक्ती व शिव ही दोन दैवते आपण निर्मिली. या शिवाने आपल्या ज्ञानचक्षूने कामाचे भस्म केले, अशी अथा निर्मिली. 

शिश्नदेव असतील येथील जाती, परंतु आपल्या प्रतिभावान पूर्वजांनी त्यांच्या कल्पना, त्यांची दैवते घेऊन त्यात अधिक अर्थ ओतला. मनात वाईट येईल त्याला वाईट. नवीन दृष्टी द्या. जनतेला तसे पाहण्याची मग सवय होईल. मग जननेंद्रियांची ती मंदिरे गंभीर वाटतील, वैराग्याची वाटतील. तेथे कामाचे दहन करणारा शंकर आठवेल. संसार सुंदर करावयाचा असेल तर संयम राख. हे शरीर म्हणजेच ईश्वराचे मंदिर. ते पवित्र राख. तेथील इंद्रिये शुद्ध राख. अशा भावना, त्या मंदिरात गेल्यावर उत्पन्न होतील. ही दृष्टी घेऊन आपण येथील सर्व जातिजमातीत शिरू या. वरवर पाहून कोणाला तुच्छ नका मानू.

राजा, प्रत्येक मनुष्यप्राणी हा काही बाबतीत अधिक विकसित असतो, काही बाबतीत कमी विकसित असतो. म्हणून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असे कसे म्हणावे? आर्यात काही गुण असतील तर येथील आर्येतरात दुसरे असतील. त्यांच्यापासून आपण काही शिकू. आपल्यापासून ते शिकतील. आर्य व नाग यांचे विवाह झाले म्हणून काय बिघडले? या एका देशात आपण राहतो. एकाच प्रकारचे अन्न खातो. एकाच प्रकारची हवा, एकाच प्रकारचे पाणी, आपण आता सारे येथले. काय आहे असे विवाह करण्यास हरकत? अर्जुनाने नागकन्यांजवळ विवाह केले. तो चित्रांगदेचा पुत्र बभ्रुवाहन का कमी पराक्रमी निघाला? काकणभर सरसच होता. अनेक महान ऋषीही अशाच संबंधांपासून नाही का जन्मले? कोणत्या विवाहापासून सुख मिळेल? दोन गोष्टींची जरूर असते. काही समानधर्म लागत असतो. धर्म म्हणजे गुणधर्म. समान आवडी, समान ध्येय असले तर बरे असते. परंतु केवळ साधर्म्यच पुरेसे नाही. आपण जेव्हा कोणाकडे आकर्षिले जातो तेव्हा दोन गोष्टींचा खेळ चाललेला असतो, काही समान गुणधर्मामुळे आपण आकर्षिले जातो तर काही दुसऱ्याच गोष्टींमुळे ओढले जातो. आपण जे आहे ते त्या दुसऱ्या व्यक्तीत आहे. शिवाय जे माझ्यात नाही, परंतु मला ज्याची जरुरी आहे, असेही काहीतरी त्या दुसऱ्या व्यक्तीत आहे. आपणास तहान लागते त्या वेळेस पाण्याकडे आपण ओढले जातो. आपणास भूक लागली म्हणजे अन्नाकडे आपण ओढले जातो. थंडी लागते तेव्हा अग्नीजवळ बसतो. म्हणजे जे जे आपणास हवे असे वाटत होते, परंतु आपणाजवळ नव्हते, त्या त्या वस्तूंकडे आपण धावतो. त्या वस्तू न मिळतील तर मरू; मिळतील तर जगू. लग्न म्हणजे एक प्रकारची पूर्णता. ज्या एकमेकांत उणिवा असतात त्या एकमेक भरून काढून जो उभयतांत समानधर्म असतो त्याची वाढ होते. एकाच ध्येयाची स्त्री-पुरुषे असूनही प्रखर वृत्तीच्या स्त्रीला त्या ध्येयाचा परंतु सौम्यवृत्ती पती आवडेल, तर प्रखर वृत्तीच्या पुरुषाला त्याच ध्येयाची परंतु सौम्यवृत्ती पत्नी आवडेल. अशीही परिपूर्णता होत असते. म्हणून ज्यात खरोखर एकमेकांविषयी ओढ वाटते, आकर्षण वाटते, त्याची पूर्णतः त्यांच्या एकत्र येण्यानेच होत असते. त्याचं विकास त्यामुळे होईल. सौम्य माणसाला प्रखरतेची जोड मिळते. प्रखरतेला सौम्य वृत्तीची जोड मिळून मर्यादा व संयम येतात.

नाग काय किंवा इतर कोणत्याही जातिजमाती काय ! येऊ देत साऱ्या एकत्र. जो तो शक्य तो आपणास योग्य त्याचीच निवड करील. आणि शेवटी मानवी जीवन हे अपूर्णच आहे, त्यामुळे आपण दृष्टी अधिक उदार ठेवली पाहिजे. असो. स्वतःच्या विकासास जे हवे ते स्त्री-पुरुष एकमेकांत बघतील. एका दृष्टिक्षेपाने बघतील. एका कटाक्षात सारी जीवने उघडी होतात. त्यातील साधर्म्य व वैधर्म्य निघते. आपण जवळ येऊ तर आपली जीवने सफल होतील, असे ते दोन जीव एकदम मुकेपणाने बोलतात. एका हस्तस्पर्शाने सांगतात. तुमची सारी शास्त्रे या जीवनशास्त्रासमोर फिकी आहेत. या महान जीवनशास्त्राचा धर्म बनवाल तरच संस्कृती वाढेल. सजीवता नेहमी राहील. चैतन्य व स्फूर्ती खेळत राहील. समाजाचा संकोच होणार नाही. व्यवहार मोकळा राहील. सर्वत्र प्रकाश नांदेल. सागर कधी अटत नाही. तो सर्वांना जवळ घेतो. तो सदैव उचंबळतो. आर्यांनी सागराप्रमाणे व्हावे. हजारो जातिजमातींच्या लाटा येथील मानवसागरात उसळोत, उचंबळोत. हिमालयाची सहस्र शिखरे, सागरावर अनंत लाटा ! सारा हिमालय शुभ्र व स्वच्छ आहे; शेकडो जीवनदायी नद्यांना जन्म देत आहे, सर्व प्रकारच्या वृक्षवनस्पती फुलवीत आहे. तसा होऊ दे भारतीय समाज. नाना विचारधारांना प्रसवणारा, शेकडो कल्पना देणारा, शेकडो प्रकारच्या चालीरीतींची मनोहर फुले फुलवणारा, शेकडो प्रयोग करणारा, सहकार्य व सहानुभूती यांनी पुढे जाणारा, वर उंच जाणारा असा होऊ दे हा समाज.

राजा, मला सर्वत्र मांगल्यच दिसते. एके दिवशी झाडाची फांदी मी रात्री तोडीत होतो. एक वृद्ध नागमाता म्हणाली, 'नको रे बाबा! रात्री पाने झोपतात, झाडे झोपतात.' मी तिला हसलो नाही. तिचे पाय धरले. तिची ती खोटीही कल्पना असेल. परंतु सर्वत्र ती चैतन्य पाहते आहे. वृक्षालाही सुखदुःख असेल याचा क्षणभर विचार करते आहे. मी मलाच क्षुद्र व हीन मानले व त्या मातेला थोर मानले. राजा, सर्वांच्या विकासाची वेळ येते. ती ती झाडे त्यांची त्यांची वेळ येताच नवीन पल्लवांनी नटतात, नवीन फुलाफळांनी बहरतात. कोणाला कधी बहर, कोणाला कधी, कोणाला आज, कोणाला उद्या, परंतु वर्षाचा विकास घ्यावयाचा आहे. वांझ कोणी नाही. ही दृष्टी ठेवून आपण वागू या. त्यांच्या त्यांच्या विकासाला साहाय्य करू या. आपणास स्वतःचा विकास करून घ्यावयाचा असेल तर दुसऱ्याविषयी आदरभाव दाखविल्याशिवाय तो होणार नाही. मी काय सांगू? या तरुणांना मी हेच शिकवीत असतो. या माझ्यासमोर काळ्यागोऱ्या मूर्ती बसल्या आहेत. परंतु मला त्यांच्यात एकच दिव्यता दिसत आहे. सारी सुगंधी फुले. त्यांच्या जीवनातील अप्रकट वास प्रकट करणे एवढेच माझे काम. गुरू नवीन काही देत नाही. जे असेल तेच प्रकट होण्यास मदत करतो. कोंडलेल्या सुगंधाला बाहेर आणतो. जे बद्ध आहे ते मुक्त करणे एवढेच गुरूचे काम ! घर्षणाने ज्याप्रमाणे काष्ठांतील अग्नी प्रकट होतो, त्याप्रमाणे संस्कारांच्या घर्षणाने मानवी मनांतील दिव्यता प्रकट होते. सुगंध अनेक प्रकारचा असतो. गोडी अनेक प्रकारची असते. ह्या छात्रांतील दिव्यताही अनेक प्रकारची आहे. ह्याची दिव्यता त्याला दाखवतो, त्याची ह्याला दाखवतो. जे ह्या आश्रमात चालले आहे ते समाजात सर्वत्र चालावे, ते वाढीस लागावे, असे मला वाटते. परंतु अनेकांची अनेक मते. शेवटी ज्याने त्याने नम्रतापूर्वक परंतु निश्चयी वृत्तीने स्वतःच्या हृदयातील सत्याशी एकरूप राहिले पाहिजे. स्वतःच्या सत्यावर शेवटी श्रद्धा. स्वतःच्या प्रयोगावर श्रद्धा. जेथे श्रद्धा नाही तेथे विकास नाही. श्रद्धा हे स्वयंप्रकाशी तत्त्व आहे. श्रद्धेला श्रद्धेचाच पुरावा. तिला तिचे स्वतःचेच प्रमाण. श्रद्धेला तुच्छ नको मानू. ती एक स्वतंत्र अशी निर्मात्री शक्ती आहे. श्रद्धेचा नाश म्हणजे स्फूर्तीचा नाश. म्हणून माझी श्रद्धा घेऊन मी जात आहे. माझा दिवा माझ्या हातात. त्याने दुसऱ्यास 'दिसेल की नाही मला माहीत नाही, परंतु मला दिसत आहे ही गोष्ट खरी. "

आस्तिक थांबले. एक हरीण आले व त्यांचे अंग चाटू लागले. शिंगांनी अस्तिकांना कांडुळू लागले. प्राणिमात्रावर प्रेम करणाऱ्या त्या महर्षीबद्दलची कृतज्ञता का ते हरिण प्रकट करीत होते?

सायंकाळ होत आली. सायंप्रार्थना व सायंसंध्येचा समय झाला. सभा समाप्त झाली. सारे मुके होते, गंभीर होते. रात्री फलाहार झाला. सर्वांनी

विश्रांती घेतली. सकाळी राजा परीक्षिती ऋषीसह निघून गेला. “राजा, परिस्थिती कठीण आहे. तू दक्ष राहा. मोठी दृष्टी घे. मी तुला काय सांगू? तू समयज्ञ आहेस." आस्तिक निरोप देताना म्हणाले.

“भगवान, तुमचा आशीर्वाद हीच माझी शक्ती. अलीकडे माझी संकल्पशक्ती नष्ट होत चालली आहे. काय होईल ते खरे. माझ्या हातून पाप होण्यापूर्वीच माझे डोळे मिटोत. माझ्या राज्यात प्रक्षोभ होण्यापूर्वीच माझे प्राण जावोत." परीक्षिती म्हणाला.

“चिरंजीव हो तू. तू गेलास तर पुढे फारच कठीण काळ येईल असे वाटते. तू आहेस तोच हे प्रश्न मिटले तर मिटतील.” आस्तिक चिंतेने म्हणाले. “सत्य स्वतःची काळजी घेईल." परीक्षिती म्हणाला.

इतक्यात नागेशने रसाळ फळांची एक करंडी भरून आणली. त्याने ती आस्तिकांजवळ दिली.

"राजा, ही रसाळ फळे ने; आश्रमाची भेट, ह्या करंडीतून आश्रमाचे ध्येय तुझ्याबरोबर आम्ही देत आहोत. हा नागेश नागजातीचा तरुण आहे. परंतु त्याला हे सूचले. काल तू फळांविषयी म्हणाला होतास. परंतु ह्याच्या लक्षात राहिले. गोड आहे हा मुलगा. त्याचे शरीर मोठे आहे, तसेच मनही मोठे आहे. मोठा कलावान आहे तो. सुंदर फुलांच्या माळा करील, पल्लवांची तोरणे

करील, बांबूंचे विंझणे करील, बासऱ्या करील....” आस्तिक सांगत होते. “त्याला पाहून मलाही आनंद झाला होता. कोणाचेही लक्ष त्याच्याकडे जाईल असाच तो आहे.” परीक्षिती म्हणाला.

“परंतु त्याला झोप पुष्कळ येते.” हसून आस्तिक म्हणाले. “निर्मळ मन आहे म्हणून ...." परीक्षिती म्हणाला.

सर्व पाहुणे गेले. सर्व छात्र आपापल्या कामाला लागले. भगवान आस्तिक एकटेच विचार करीत फिरत होते. काय चालले होते त्यांच्या मनात?

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा