shabd-logo

पंधरा

15 June 2023

4 पाहिले 4
कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको युद्ध, नको संहार, वत्सला व नागानंद यांच्या प्रचाराला यश दे. आस्तिकांसारख्या महर्षीचे हेतू पूर्ण करा.” त्याच्या डोळ्यासमोर वत्सला येई. ‘ध्येयवादी वत्सला! सुखाचा संसार सोडून संकटास मिठी मारणारी वत्सला ! वत्सलेला निर्भय नागानंदच योग्य ! मी नाही योग्य.' असे त्याच्या मनात येई.

त्या गावात एक नागकन्या होती. तिचे नाव कृष्णी. कृष्णी काळीसावळी होती. मोठी खेळकर होती. परंतु तिची आई तिला बाहेर जाऊ देत नसे. तरीही कृष्णी चोरून जाई. कार्तिकाला पाहावयास कृष्णी जाई. दूर झाडीत उभी राही व त्याला पाही. एखादे वेळेस ती मोठ्याने टाळी वाजवी, मोठ्याने हसे. कार्तिक इकडे तिकडे बघे, परंतु त्याला कोणी दिसत नसे.

कृष्णी आता धीट झाली. रात्री आई निजली की उठे. ती त्या शेतावर येई. प्रेमाचा दिवा हातात घेऊन येई. काटे बोचत नसत. भीती वाटत नसे. ती कार्तिकाच्या झोपडीच्या प्रदक्षिणा घालीत राही. पहाटेची वेळ होत आली, कोंबडा आरवला, की ती जायला निघे. परंतु जाण्याचे आधी दोनचार फुले झोपडीचे आत टाकी, प्रणाम करी व जाई.

कार्तिकाने एके दिवशी ती फुले पाहिली. त्याच्या शय्येवर होती. कोठून आली फुले, कोणी टाकली का, की वरून पडली, का वाऱ्याने आली? त्याला कळेना. ती फुले हातात घेऊन तो बसला. या कार्तिकाला कोणी दिली फुले ? कोणाचा आहे मी देव, कोणाचा आहे मी मित्र?

एके दिवशी कृष्णीने सुंदर फुलांच्या माळा घरी तयार केल्या. किती तरी हार, किती तरी माळा!

“कृष्णे, कशाला माळा, कशाला हे हार?" आईने विचारले.

“माझ्या देवाला." ती म्हणाली. "कोठे आहे देव?" तिने प्रश्न केला.

“नागांचा देव रानात राहतो." ती म्हणाली.

“केव्हा जाणार पूजेला? राजपुरुष येतील व पकडतील. नागपूजा बंद झाली आहे. उगीच संकट आणू नको. पुढे काय काय होणार आहे देवाला माहीत. " आई म्हणाली.

“देवाची पूजा करताना मरण आले तर काय वाईट? ती खरी पूजा होईल. पण मी रात्री जात जाईन पूजेला, म्हणजे कोणी बघणार नाही. जाऊ ना आई ? रोज जात जाईन." ती म्हणाली.

“एकटी का जाणार?" आईने विचारले. “देवाचे नाव व मी. ह्या माळाही आहेत ना बरोबर? एकटी कशी? भक्त

कधी एकटा नसतो." ती म्हणाली.

“कृष्णे, आपणा सर्वांना लवकरच येथून जावे लागेल. नको ते आर्यांचे

राज्य; प्राणांवर पाळी यायची. आपले लोक म्हणत होते.” आई म्हणाली.

“तुम्ही जा सारी. मी येथेच राहीन. येथल्या रानात राहीन. रानात राहून देवाची भक्ती करीन, त्याला फुले वाहीन, त्याला प्रदक्षिणा घालीन. तुम्ही जा. तुमचा सांभाळ व्हावा म्हणून मी देवाची प्रार्थना करीन." कृष्णा म्हणाली.

त्या दिवशी रात्री कृष्णी त्या पुष्पमाला घेऊन शेतावर आली. तिने झोपडीच्या दारावर त्या माळा बांधल्या. जणू देवाचे मंदिर तिने श्रृंगारले. प्रदक्षिणा घातल्या. पहाटेची वेळ झाली. एक सुंदर माळ तिने हळूच आत टाकली. ती निघून गेली.

सकाळी कार्तिक उठला. आज फुलांच्याऐवजी हार! अंथरुणात एक हार! दारावर हारांची तोरणे. काय आहे हा प्रकार? त्याला भीती वाटली. ते हार घेऊन तो सुश्रुतेकडे गेला.

"आजी, आजी काहीतरी चमत्कार आहे." तो म्हणाला.

" काय रे आहे? वत्सला व नागानंद चमत्कार करीत आहेत. प्रेमळ बाळे, त्या दिवशी यात्रेत गर्दीत घुसली म्हणतात. वत्सला प्रेमाचे गाणे म्हणत होती. नागानंद बासरी वाजवीत होते. मारामारी म्हणे थांबली. सर्वत्र हिंडत आहेत दोघे. आणखी का काही चमत्कार कळला?" तिने विचारले.

“तसला नाही चमत्कार; परंतु शेतावर चमत्कार. काही दिवसांपूर्वी माझ्या अंथरुणावर सकाळी उठले तो फुलें पडलेली असत. मी म्हणे 'येतात कशी?' परंतु फुलांऐवजी आता हार येऊ लागले. काल रात्री झोपडीच्या दारावर तोरणे होती. फुलांच्या माळांची सुंदर तोरणे आणि अंथरुणावर एक पुष्पमाला ! मला भीती वाटते. काय आहे हे?" तो म्हणाला.

“कधी कधी गंधर्व असे करतात म्हणून ऐकले होते. त्यातला तर नसेल प्रकार?” सुश्रुता म्हणाली. इतक्यात कृष्णीची आई सुश्रुतेकडे आली. ती बाहेर उभी राहिली. ती काही बोलेना.

" काय हवे?" कार्तिकाने विचारले.

“आज कृष्णीला पुरेशी फुले मिळाली नाहीत, म्हणून रडत बसली आहे. ती रोज रानातील देवाला हार नेऊन वाहते. आम्हा नागांवर संकट येऊ नये म्हणून रोज रात्री जाते, पूजा करते, प्रदक्षिणा घालते व येते. आज माळा नीट होणार नाहीत. मला म्हणाली, 'वत्सलेच्या आजीकडे जा. त्यांच्याकडे

मिळतील फुले' आहेत का फुले ?" ती म्हणाली.. “शेतावर कितीतरी फुले! कार्तिक यांना दे रे टोपलीभर आणून. वत्सलेला फुलांचे वेड असे. तुमच्या मुलीलाही आहे वाटते?" सुश्रुतेने विचारले.

“गावातील मुलीबरोबर पोहायला शिकत असे तीच ना तुमची मुलगी?" कार्तिकाने विचारले.

“हो.” ती म्हणाली.

“बरेच वर्षांत ती दिसली नाही येथे. " तो म्हणाला.

“ती होती आजोळी. परंतु येऊन झाले काही महिने. देवूजेचा अलीकडे लागला आहे तिला नाद. " ती म्हणाली.

“मोठी झाली असेल आता?" कार्तिकाने विचारले.

“हो. उंच झाली आहे चांगली. राजाची राणी शोभेल." ती म्हणाली. “मी देतो फुले आणून.” असे म्हणून कार्तिक गेला.

कृष्णीची आई निघून गेली. “कुठे आहेत फुले ? हात हालवीतच आलीस?” कृष्णी म्हणाली.

“ते कार्तिक आणून देत आहेत शेतावरून. तुझी त्यांना आठवण आहे तुम्हाला पोहायला शिकवीत वाटते?” आईने विचारले.

“हो. ते मला नाही म्हणत नसत. आर्यकन्यांबरोबर मलाही शिकवीत. परंतु कितीतरी वर्षे झाली त्याला. तेव्हा मी होते लहान. तेही फार मोठे नव्हते. मग ते आश्रमात गेले. मी आजोळी गेले. ते आता मोठे झाले असतील. त्यांचे वडील नागांचा द्वेष करीत. परंतु मला त्यांनी एकदा गोड फळे दिली होती. त्यांना आठवणसुद्धा नसेल.” कृष्णी म्हणाली.

“ते आता घर सोडून वत्सलेच्या शेतावर राहतात. त्यांना वत्सलेशी लग्न करायचे होते. ते निराश झाले. फार हसत नाहीत, बोलत नाहीत. 'पुढील जन्मी मिळेल वत्सला' असे म्हणतात. मला त्यांची दया येते.” कृष्णीची आई म्हणाली.

कार्तिकाने सुंदर सुंदर फुले तोडून परडी भरली. वत्सलेची परडी, नागानंदाने विणलेली परडी. ती परडी भरून तो कृष्णीच्या घरी गेला.

“कोण आहे घरात?” त्याने विचारले.

कृष्णी बाहेर आली. कार्तिकाकडे पाहत राहिली.

“आई कोठे आहे?” त्याने विचारले.

" गेली पाण्याला." ती म्हणाली.

“तुला ना हवी होती फुले ? ही घे.” तो म्हणाला.

“तुम्हाला त्रास झाला." ती म्हणाली. “देवाला पूजेला फुले आणून देण्यात त्रास नसतो.” तो म्हणाला.

“परंतु हा नागांचा देव !” ती म्हणाली.

“ मला नाग नीच नाही वाटत, नागांची मने थोर असतात. हृदये प्रेमळ

असतात. " तो म्हणाला.

“तुम्हाला केव्हा आला अनुभव?" तिने विचारले. “नागानंद कितीतरी गोष्टी सांगत. " तो म्हणाला.

“कोठे आहेत ते नागानंद ?" तिने विचारले.

“ वत्सला व ते प्रेमधर्माचा प्रचार करण्यासाठी गेले आहेत." तो म्हणाला.

“तुम्ही का नाही जात?” तिने प्रश्न गेला. “माझ्यामध्ये स्फूर्ती नाही." तो म्हणाला.

“कोठे गेली स्फूर्ती?” तिने विचारले.

“मला नाही माहीत. घे ही फुले ओतून." तो म्हणाला. "राहू दे ना परडी. छान आहे परडी. मला देता ही ?" तिने विचारले.

“तुला कशाला?” त्याने विचारले.

“ मला आवडली आहे म्हणून. तुमची आहे म्हणून." ती म्हणाली. “माझी आहे म्हणून?” त्याने प्रश्न केला.

“हो! तुम्ही किती चांगले आहात. मला पोहायला शिकवीत असा. मी लहान होते. तुम्ही लहान होता. मला एकदा दोन फळे दिली होतीत, आठवते का? तुम्हाला नसेल आठवत, परंतु मला आठवते. मी आजोळी होते. तेथे किती गोड बोरी ! मला तुमची आठवण येई. मी तेथल्या विहिरीत उंचावरून उडी टाकीत असे. लोक माझे कौतुक करीत. मी त्यांना सांगे, कार्तिकाने शिकविले मला. त्यांना आश्चर्य वाटे की, आर्याने कसे शिकविले? ठेवू मी परडी ? का हवी तुम्हाला ?” कृष्णाने प्रेमाने विचारले.

“ ही परडी माझी नाही." तो म्हणाला.

“मग कोणाची?" तिने विचारले.

“वत्सलेची आहे ही. नागानंदाने तिला करून दिली होती. तिची आवडती परडी." तो म्हणाला.

“ वत्सलेची व नागानंदाची परडी ! कार्तिकांची व कृष्णीची का न व्हावी? काय आहे अडचण?" ती हसून म्हणाली.

इतक्यात कृष्णीची आई घडा घेऊन आली. घडा ठेवून ती तेथे आली.

"इतकी कशाला फुले ?" ती म्हणाली. “मला वाटले एवढी पुरतील की नाही? रोज देऊ का आणून ?” त्याने विचारले.

“ रोज कशाला त्रास?" आई म्हणाली.

“त्रास कसला? वत्सलेच्या आजीकडे सकाळी येतो. इकडेही येईन. लहानपणची मैत्रीण, तिच्यासाठी नको यायला?" तो म्हणाला.

“परंतु त्यात धोका आहे ! राजपुरुषांची दवंडी ऐकलीत ना? आता आलात तेवढे पुरे. पुन्हा नका येऊ." आई म्हणाली.

“राजपुरुषांची आज्ञा मोडली पाहिजे. पापाला का साथ द्यावी?

कार्तिक, या हो तुम्ही.” कृष्णी म्हणाली. “लवकरच आम्ही येथून जाणार. हे गाव सोडून जावे लागणार. कृष्णी

म्हणते येथेच राहीन रानात." आई म्हणाली.

“रानात राहीन व माझ्या देवाची पूजा करीन." ती म्हणाली. “कोठेसा आहे हा देव? मला दाखवशील?" कार्तिकाने विचारले.

“तुम्हाला भीती वाटेल. दाट जंगलात आहे. तेथे सूर्याचा किरण जाऊ

शकत नाही. किर्र झाडी. खरेच. " ती म्हणाली.

“मी भित्रा म्हणून वत्सलेला आवडत नसे. मी भित्रा असे तुलाही वाटते. माझी भीती गेली पाहिजे. " कार्तिक म्हणाला.

“मी दवडीन भीती. याल माझ्या बरोबर? आज तिसरे प्रहरी जाऊ.” कृष्णा म्हणाली.

“बरे, ठरले. तू ये शेतावर. मी वाट बघेन." कार्तिक म्हणाला.

तिसरा प्रहर झाला. परडीत फुलांच्या सुंदर माळा घेऊन कृष्णी निघाली. कार्तिक वाट पाहत होता. तो झोपडीत होता. कृष्णी आत आली. "तुम्ही येथेच स्वयंपाक करता वाटते?" तिने विचारले.

“हो. हाताने दळतो, हाताने भाकरी भाजतो. आज हात भाजला भाकरी करताना. " तो म्हणाला.

“पाहू.” ती म्हणाली. त्याचा हात तिने हातात घेतला. तिने त्याचे भाजलेले बोट आपल्या तोंडात घातले.

“हे काय, कृष्णे ?" तो म्हणाला.

“आग होत असेल म्हणून तोंडात घातले. तुम्हाला मी रोज भाकरी भाजून आणीन. मी तुमचे रोज दळीन.” ती म्हणाली.

“चल. उशीर होईल. देवाचे दर्शन घेऊन येऊ. रानातील देव. किर्र झाडांतील नागांचा देव." तो म्हणाला.

दोघे निघाली. गावाबाहेर दाट जंगल होते तिकडे निघाली. कितीतरीपक्षी किलबिल करीत होते. किती गोड आवाज ! एका पक्षाचा आवाज फारच मधुर होता.

“तो नर आहे. तो मादीला हाक मारीत आहे. या नराची मादी जवळच

असते. परंतु छपून राहते. ओरडून ओरडून तो दमला म्हणजे ती हळूच येते व त्याला प्रेमाने चोंच मारते. ” कृष्णी म्हणाली. “किती लांब आहे देव? शेतावर परतायला उशीर होईल. तुला घरी

जायला रात्र होईल." तो म्हणाला.

“रात्र तर माझी मैत्रीण. दिवसच माझा शत्रू." ती म्हणाली.

“साप रात्री बाहेर पडतात. सर्पपूजक का तसेच आहेत?” तो हसून म्हणाला.

"माझा देव म्हटले तर लांब आहे, म्हटले तर जवळ आहे." ती म्हणाली.

" म्हणजे काय?" तो म्हणाला.

“थांबा, तो पाहा साप. जाऊ दे त्याला. देवाच्या जवळ आलो आपण.” ती म्हणाली.

त्याने भिऊन तिचा हात धरला.

“कृष्णे, परत जाऊ.” तो म्हणाला. “भिऊ नका. मी आहे बरोबर. देवाल भेटल्याशिवाय जाऊ नये.” ती म्हणाली.

एका प्रचंड वृक्षाखाली ती दोघे थांबली.

“ आला का तुझा देव ?” त्याने विचारले. "माझा देव, तुमचा नाही का?" तिने विचारले.

“आटोप लवकर पूजा." तो म्हणाला.

तिने परडीतील माळा मोकळ्या केल्या.

“ तुम्ही या झाडाखाली मुळाशी बसा. या झाडाला मी प्रदक्षिणा घालते." ती म्हणाली.

तो झाडाच्या मुळांना टेकून बसला. हातात माळ घेऊन ती प्रदक्षिणा घालीत होती. दमलेला कार्तिक झाडाला टेकून डोळे मिटून बसला. त्याला का झोप लागली होती?

कृष्णी समोर उभी राहिली. हातात माळ घेऊन उभी राहिली. कार्तिककडे ती पाहत होती.

“संपली का पूजा?” त्याने डोळे उघडून विचारले.

तिने हातातील माळ त्याच्या गळ्यात घातली. त्याच्या पायावर तिने डोके ठेवले.

“हे काय?" तो बावरून म्हणाला.

" ही माझी देवपूजा." ती म्हणाली.

“रानातील देव कोठे आहे?” त्याने विचारले.

"या जगाच्या रानातील तुम्ही माझे देव. माझे जीवन मी तुम्हाला दिले आहे. मी तुमच्या झोपडीत राहीन. तुमच्यासाठी दळीन, तुमच्यासाठी भाकर भाजीन. तुमचे सारे मी करीन. माझ्या पंचप्राणांनी तुमची पूजा करीन. भक्ताला दूर लोटू नका. चरणांशी ठेवा." ती म्हणाली.

तो काही बोलला नाही. स्तब्ध बसला होता.

“बोलत का नाही?" तिने विचारले.

“तुझी देवपूजा झाली, परंतु माझी राहिली. चल, शेतावर लवकर जाऊ. माझ्या देवाची पूजा अंतरेल. सायंपूजा." तो म्हणाला.

दोघे शेतावर आली.

“कृष्णे, तुला दूध काढता येते का?" त्याने विचारले.

“हो. मी काढू?" तिने विचारले.

" काढ. माझ्या देवपूजेची मी तयारी करतो." तो म्हणाला. कृष्णी दूध काढीत होती. चरवी भरली तरी कास रिती होईना. कृष्णीची बोटे दुखू लागली.

“दुसरे भांडे द्या. हे भरले. ” कृष्णीने सांगितले.

कार्तिक आला. भांडे भरलेले पाहून तो चकित झाला.

“इतके कसे दूध ?” त्याने विचारले. “अजून कास भरलेली आहे." ती म्हणाली.

“आश्चर्य! तुझ्या हातात का जादू आहे?" त्याने विचारले.

“माझ्या हातात प्रेम भरलेले आहे. आज माझ्या शरीराचे अणुरेणू अनंत प्रेमाने भरलेले आहेत." ती म्हणाली.

“ पुरे कर दूध." तो म्हणाला.

दोघे झोपडीत आली.

“झाली का तुमची देवपूजा?" तिने विचारले.

“तू त्या शिलाखंडावर जाऊन बस. मी येतो." तो म्हणाला

ती त्या शिलाखंडावर जाऊन बसली. तिकडे सूर्य अस्तास जात होता.

लाल-लाल रंग पसरला होता. वारा गोड सुटला होता. सुगंधी, शीतल असा वारा. कृष्णीचे हृदय फुलून आले होते. तोंडावर प्रेम व प्रसन्नता फुलली होती. डोळे चमकत होते. कार्तिक तिकडून आला. त्याने कृष्णीच्या गळ्यात फुलांची सुंदर माळ घातली. कृष्णी एकदम चमकून उठली. त्याने तिला हृदयाशी घरले.

“कृष्णे, तू माझी देवता." तो म्हणाला.

"तुम्ही माझे देव." ती म्हणाली.

दोघे त्या शिलाखंडावर बसली होती. वाऱ्यावर कृष्णीचे केस उडत होते. तिचे हृदय प्रेमसिंधूत डुंबत होते.

“आपण दोघे घरी जाऊ व आईचा आशीर्वाद घेऊ. सुश्रुता आजींचाही घेऊ." ती म्हणाली. "तूच येथे येत असस. फुले झोपडीत टाकीत असस. दारावर तोरणे बांधीत असस. सुश्रुता आजी म्हणाल्या, 'गंधर्व असे करतात.' तो गंधर्व

सापडला. ती अप्सरा सापडली. कृष्णे, तुला भीती कशी वाटत नसे?” त्याने तिला विचारले.

“प्रेम जीवनात भरले म्हणजे भीती जाते. कोणतीही भावना पराकोटीला गेली की दुसऱ्या भावना नष्ट होतात." ती म्हणाली. दोघे गेली. हातात हात घालून गेली. सुश्रुता आजी मृगाजिनावर बसली होती. जपतप करीत होती. तो ही वधुवरे आली. तिच्या पाया पडली. "आजी, ही कृष्णी माझी झोपडली सजवी. माझ्या झोपडीत फुले ठेवी. माझ्या निद्रेत ही माझी प्रेमपूजा करून जाई. मला प्रदक्षिणा घालून जाई. या कार्तिकाला तिने देवत्व दिले आहे. या मातीच्या ढिपळाला तिने आपल्या प्रेमाच्या शक्तीने मोल्यवान मोती बनविले आहे. खापरीला परिस बनविले आहे. आजी, आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही सायंकाळी आकाशात पेटलेल्या देवाच्या घरच्या अग्नीसमक्ष एकमेकांस वरिले. " तो म्हणाला.

वृद्धेने कृष्णीला जवळ घेतले. तिच्या तोंडावरून हात फिरविला. त्यांना तिने आशीर्वाद दिला. तिने त्यांना केळी खावयाला दिली. गोड गोड केळी.

नंतर कृष्णीच्या घरी उभयता आली. आई वाट पाहत होती. “आलात एकदाची ?" तिने विचारले.

“आई आले; परंतु कायमची जावयाला आले. मी कार्तिकांची आज प्रेमपूजा केली. प्रेमाचा वसा एकदा घेतला की सोडता येत नाही. आई, आशीर्वाद दे.” कृष्णी म्हणाली.

“कृष्णे, माझा आशीर्वाद आहे. परंतु तुम्ही विचार केला नाही. घाईने सारे केलेत.” तीम्हणाली.

“आई, प्रेम सदैव पूर्णच असते. ते नेहमी बरोबर असते. ते चुकत नाही. ते कधी घाई करीत नाही, कधी उशीर करीत नाही. वेळ आली की कळी फुलते. प्रेमाला ना विचार ना मनन. तेथे एक सर्वस्वाचे अर्पण असते. प्रेम पुढे बघत नाही, मागे बघत नाही. प्रेमाला सर्वत्र प्रकाशच दिसतो. गोड प्रकाश. " कृष्णी म्हणाली..

“ कार्तिक, जनमेजयाचे अनुशासन तुम्ही मोडले आहे. नागगन्येशी तुम्ही विवाह करीत आहात. दोघे तुम्ही अपराधी आहात. संकट येणार. कृष्णे, येथून सारी नागमंडळी उद्या जाणार असे ठरत आहे आणि आज तू काय हे केलेस? तुम्ही दोघे आमच्याबरोबर येणार का?" तिने विचारले.

‘मी कसा येणार? सुश्रुता आजींना कोण? नागानंद व वत्सला यांनी माझ्यावर ती जबाबदारी टाकली आहे. " कार्तिक म्हणाला. “टाकलेला विश्वास मोडता कामा नये. विश्वासघातासारखे पाप नाही.

तुम्ही येथून नाही जाता कामा आणि मीही तुमच्याबरोबर राहीन. तुमचे माझे आता लग्न लागले. मंगल विवाह. आता जीवन काय, मरण काय सारे मंगलच आहे. आई, आम्ही येथेच राहू. काय होणार आहे? हजारोंचे होईल ते आमचे होईल.” कृष्णी म्हणाली.

“हजारोंचे काय होणार आहे? ते हजारों तर जनमेजयाचे राज्य सोडून जात आहेत. मुद्दाम संकटात का राहावे ? सुश्रुता आजीसही घेऊन जाऊ.” कृष्णीची आई म्हणाली.

" त्या कशा येतील? नागानंद व वत्सला येथे आली तर? आम्ही येथेच राहू. कृष्णी मला धैर्य देईल. मला आगीत जाण्याचे, पुरात उडी टाकण्याचे धैर्य देईल.” कार्तिक म्हणाला.

“आई, आम्ही जातो. " कृष्णी म्हणाली.

“सुखी असा.” ती म्हणाली.

कृष्णी व कार्तिक शेतावर निघाली.

“ तुम्ही या शेतावर का राहिलात? घरातून तुमच्या वडिलांनी का तुम्हाला घालविले? तुमच्या आईला वाईट नाही वाटत तुम्ही एकटे दूर राहता म्हणून?” कृष्णीने वाटेत प्रश्न केला.

“आईला वाईट वाटते. परंतु ती काय करणार? बाबांना मी नागाविषयी सहानुभूती दाखवितो हे आवडत नाही. घरात कटकटी सदैव असण्यापेक्षा निघून जाणे बरे असे मी ठरविले. शिवाय तुला सांगू एक गोष्ट? वत्सलेविषयी मला खूप वाटे. माझे तिच्यावर फार प्रेम आहे. असे मला वाटे. तिने आश्रम सोडला हे ऐकून मीही आश्रम सोडून घरी आलो. मी तिच्याकडे बघे, तिच्याकडे जाई. परंतु तो नागानंद आला. त्याने तिच्यासाठी पुरात उडी टाकली. त्याने वाघाला मारले. वत्सला त्याच्यासाठी वेडी झाली. मला वाईट वाटे. मला वत्सलेचे सारे आवडे. तिची सेवा करावी असे वाटे. या जन्मी नाही तर पुढील जन्मी ती मिळेल असे मी मनात म्हणे. तिच्या शेतावर खपावे, तिला फुले नेऊन द्यावी, तिला दुरून का होईना पण जीवनात साठवावे असे वाटे. मी वत्सलेसाठी वेडा झालो होतो. परंतु ती माझी कीव करी. मी तिला माझ्या हातच्या सुताची वस्त्रे दिली. तिने ती नाकारली नाहीत. ती माझ्याविषयी सहानुभूती दाखवी. माझा तिटकारा करीत नसे. परंतु प्रेम म्हणून काही निराळे असते. पुढे वत्सला व नागानंद गेली. तिची फुलांची परडीच मी हातात प्रेमाने घेत असे आणि आता तू आलीस नवी जादूगारीण! जीवनातील एक अंक संपला. दुसरा सुरू झाला. इतक्या वर्षांत तुझी आठवण झाली नाही. परंतु तू जीवनात कोठेतरी होतीस. इतके दिवस गुप्त रूपाने मागे राहणारी तू एकदम पुढे येताच तू माझीच असे वाटले. तू माझ्या न कळत माझ्या जीवनात हळूहळू वाढत होतीस. तू येथे फुले ठेवीस. मला वाटे, माझ्यासाठी कोण ठेवतो फुले ? मी एकदा वत्सलेला म्हटले, 'मी तुझ्यासाठी रडतो. परंतु माझ्यासाठी कोण रडत असेल ? ' तू तिकडे रडत होतीस. माझी आठवण काढीत होतीस. वत्सलेसाठी मी तपश्चर्या करीत होतो. तू माझ्यासाठी करीत होतीस. माझी तपश्चर्या फळली. जीवनाला परिपूर्ण करणारे कोणीतरी मिळाले. कृष्णे, पुष्कळ वेळा आपले आपले म्हणून जे 'मनुष्य आपणास वाटते ते आपले नसते. आपले मनुष्य दूर असते. त्याचाच वास जणू आपण या जवळच्या माणसांत घेऊ पाहतो आणि आपण फसतो. परंतु ते आपले खरे माणूस दृष्टीस पडताच मग आपली फजिती आपणास कळते. वत्सलेत जणू मी तुलाच बघत होतो. परंतु ते मला कळले नाही. वत्सलेने हाक मारली, परंतु मी पुरात जाऊ शकलो नाही. परंतु तुझ्याबरोबर मी वाटेल तेथे येईन. कारण तू मला संपूर्णपणे माझी वाटत आहेस. तुझ्याबरोबर मी न येईन तर मरून पडेन. तुझ्याबरोबर रानात आलो. तुझ्याबरोबर कोठे येणार नाही? हे बोट भाजते म्हणून मी कुरकुर करीत होतो. पण तुझ्याबरोबर मी आगीत शिरेन. थंड वाटेल ती आग. खरेच, तू दिसलीस व एकदम काही नवीन वाटले. मरगळलेल्या माझ्या मनात अपार स्फूर्ती आली. मरू म्हणणाऱ्या मला जगावे असे वाटू लागले. जीवनाला नवीन अर्थ, नवीन रंग, नवीन सौंदर्य, नवीन गोडी प्राप्त झाली. वत्सलेला पाहून मला बरे वाटे. वत्सलेच्या दर्शनाने मला आनंद होई. परंतु तो आनंद क्षणिक असे. तुला पाहून जो आनंद झाला, त्या आनंदाशी वत्सलेला पाहून होणारा आनंद तुलिता येणार नाही. कृष्णे, इतके दिवस मला जिवंत असून मेल्याप्रमाणे का ठेवलेस? लवकर का नाही आलीस? सांग, का नाही आलीस?" कार्तिक तिला दोन्ही हातांनी धरून म्हणाला.

"हे काय हे? मारता का मला?" ती म्हणाली.

“हो. तू का मला रडत ठेवलेस? बोल.” तो म्हणाला.

“माझी खरी भूक लागावी म्हणून. मी पूर्वी आले असते तर तुम्हीच मला हाकलून दिले असते. मला ओळखलेही नसतेत. मी अगदी वेळेवर आले. तुमचे जीवन रिकामे असताना आले. स्वतःला पूर येतो तेव्हाच आपण दुसऱ्यास देतो. माझ्या जीवनातील प्रेमपूर जेव्हा दुथडी भरून वाहू लागला तेव्हा मी आले. तुमच्या जीवनात तो पसरेल, तुमचे जीवन हिरवे हिरवे होईल, असे वाटले तेव्हा आले." ती म्हणाली.
दोनचार दिवस झाले. कृष्णी व कार्तिक बाहेर बसली होती. इतक्यात कृष्णीची आई तेथे आली. रात्रीच्या वेळेस ती माता का बरे आली? घाबरली होती ती. कावरीबावरी झाली होती.

“कृष्णे, नीघ बाई आमच्याबरोबर. तुम्हीही चला हो. जनमेजयाचे हेर आले आहेत. उद्या राजपुरुष येणार असे कळते. सारे नाग आज येथून जाणार. येथे राहणे धोक्याचे. बद्ध करून नेतील, आगीत फेकतील. चला, उठा, विचार करण्याची वेळ नाही. ऊठ, पोरी, उठा हो तुम्ही.” ती म्हणाली.

“आई मी कशी येऊ ? हे तरी कसे येणार? वत्सला व नागानंद यांचा विश्वासघात कसा करावयाचा? तू जा. जे व्हावयाचे असेल ते होईल.” कृष्णी म्हणाली.

“मी सुश्रुता आजीची अनुज्ञा आणते.” ती म्हणाली.

“त्या जा म्हणतील. तो त्यांचा मोठेपणा. परंतु आपण कसे विचारावयाचे?” कृष्णी म्हणाली.

“पोरी, हट्ट नको धरू, चल. वेळ नाही.” आई तिचा हात धरून म्हणाली. "नको आई, माझा जीवनप्रवाह आता अलग नाही. मी एकटी नाही.” कृष्णा म्हणाली.

“उद्या राजाचे अधिकारी आले व त्यांनी दरडावून विचारले तर कार्तिक तुला 'जा' म्हणतील. तुला खुशाल त्यांच्या स्वाधीन हे करतील. यमदूतांच्या हातात तू पडशील. हे आर्य म्हणून वाचतील. यांचा पिता खटपट करील आणि तुला कोण? तुला का प्राण नकोसे झाले आहेत. आईचे ऐक. नीघ.” माता आग्रह करीत होती.

“आई, तू यांचा अपमान नको करू, मला राजाधिकाऱ्यांच्या स्वाधीन तू करण्याइतके का हे भीरू आहेत. इतके का हे पुरुषार्थहीन आहेत? तू निश्चिंत अस. आम्ही तर दोघे मरू, जगू तर दोघे जगू. आई, तू जा." कृष्णी म्हणाली. “आई, तुम्ही काळजी नका करू. हा पूर्वीचा मेषपात्र कार्तिक आता राहिला नाही. कार्तिक आता सिंह बनला आहे. मी माझे नाव उज्ज्वल करीन.

जिचा हात मी घेतला तो सोडणार नाही मी.” कार्तिक म्हणाला.

“जाऊ मी?" आईने विचारले.

“जा.” दोघे म्हणाली.

माता निघून गेली. गावातील नागमंडळी सारी रात्री पसार झाली. गावात रात्रभर कोणाला झोप आली नाही. कार्तिकाच्या घरी त्याचे आईबाप अस्वस्थ होते. उद्या काय होणार याची सर्वांना चिंता वाटत होती.

दुसरा दिवस उजाडला. गावात राजपुरुष आले. त्यांच्याबरोबर सैनिक होते. गावातील सर्व स्त्रीपुरुषांस सभेला बोलावण्यात आले. “कोणीही घरी राहता कामा नये. राहील तर त्याच शिरच्छेद होईल." अशी दवंडी देण्यात आली. राजपुरुष उच्चासनावर बसले. गावातील सर्व स्त्रीपुरुष जमा झाले.

मुलेबाळे आली.. मुख्य राजपुरुष बोलू लागला, “तुमच्या गावातील सर्व नागलोकास बद्ध करण्यासाठी मी आलो आहे. सशस्त्र सैनिकांसह आलो आहे. महाराजाधिराज जनमेजय महाराज यांचे आज्ञापत्र तुम्हाला माहीतच आहे. कालच तुमच्या गावातून नागमंडळी निघून गेली. त्यांना विरोध करणे येथील आर्यांचे काम होते. एकही नाग बाहेर जाऊ देता कामा नये अशी राजाज्ञा आहे. वास्तविक हा सर्व गाव अपराधी आहे. येथील सर्वांनाच राजबंदी करून नेले पाहिजे. परंतु मी गोष्टी इतक्या थराला नेऊ इच्छित नाही. कोणी नाग येथे उरला असेल तर त्याने निमूटपणे स्वाधीन व्हावे. नाग कोठे आहे हे कोणाला माहीत असेल तर त्याने ते सांगावे. वेळ नाही. काम झटपट उरकावयाचे आहे.”

सभा स्तब्ध होती. कोणी उठेना. बोलेना.

यराजपुरुष संतापला. “काय? येथे कोणीच नाग नाही? निर्नाग आहे हे गाव?"

पुन्हा सारे शांत.

राजपुरुषाचा क्रोध अनावर झाला. तो म्हणाला, "या सर्व गावाला आग लावून टाकतो. आणा रे ते जळजळीत कोलित. हे पाहा जळजळीत पेटते कोलित. ही निशाणी, ही खूण. नागांना आधार देणारी गावे आम्ही भस्म करू. तुमचा गाव सुरक्षित राहावयास पाहिजे असेल तर नाग आमच्या स्वाधीन करा. त्यांची जनमेजयमहाराज तिकडे करतील होळी. त्यांनी सर्पपूजकांचे हवन आरंभिले आहे. तुमच्या गावाच हवन व्हावयास नको असेल तर त्या हवनास बळी द्या, आहुती द्या."

तेजस्वी कृष्णी राजपुरुषाकडे जाऊ लागली. सर्वांचे डोळे तिच्याकडे वळले. तिच्या डोळ्यात निर्भयता होती. ती तेथे उभी राहिली. क्षणभर तिने सर्वांकडे पाहिले. ती बोलू लागली.

“राजाच्या क्रोधाला शांत करण्यासाठी बळी पाहिजेच असेल तर मी माझा देते. मी नागकन्या आहे. परंतु मी आर्याला वरिले आहे. पत्नी पतीत मिळून जाते. मला आता वास्तविक स्वतंत्र अस्तित्व नाही. मी आता नाग की आर्य? राजपुरुषांना सांगता येईल का? पती पत्नीचा होतो व पत्नी पतीची होते. या देशात आता कोण खरे आर्य व कोण खरे नाग? शेकडो नागकन्यांनी आर्यांना वरीले आहे व शेकडो आर्यकन्यांनी नागांना वरीले आहे. या गावातील आर्यकन्या वत्सला हिने नागाला माळ घातली. मी नागकन्या आहे. मी आर्याला जीवन वाहिले. नाग आणि आर्य काय आहे त्यांच्यात भेद? आर्यमाता मुलांना वाढवते व नागमाता का फेकून देते? आर्य थोर आहेत व नाग का नीच आहेत? आर्य व नाग हे शेवटी मानव आहेत.

या सर्व गावाची राख होण्यापेक्षा माझी एकटीची होऊ दे. पेटू दे जनमेजयाचे ते होमकुंड. ते होमकुंड एक दिवस सर्व आर्यांचे भस्म करील. ह्या होमकुंडाला आर्यांनी विझवले पाहिजे. नागांची होळी पाहाल तर पुढे तुमची होळी होईल हे ध्यानात धरा. पेराल ते मिळेल. नाग निर्भय असतो. नागकन्या निर्भय असतात. आम्हाला मरणाची भीती नाही. कुठे आहे तुझे ते कोलित ? आण ते इकडे. (ती हिसकून घेते) माझ्या या हातावर हे बघ मी ठेवते कोलित. बघ बघ. फुलाप्रमाणे असणारा हात अग्नीला धरू शकतो, निखाऱ्यांना फुले मानतो. कोणाला भीती घालता, माकडांनो? तुम्हाला ना माणुसकी ना विवेक. या येथे शेकडो आयाबहिणी बसल्या आहेत. यांचे शाप तुम्हाला भस्म करतील. तुम्ही नागांना नाही जाळीत. तुमचे भावी कल्याण तुम्ही जाळीत आहात. पकडा मला, करा बद्ध. खाली नका माना घालू. त्या होळीत नेऊन फेका."

सभेत फार प्रक्षुब्धता उत्पन्न झाली. सुश्रुता आजी तेथे गेली. ती वृद्ध सती उभी राहिली ती म्हणाली, "मलाही न्या. माझ्या मुलाने कित्येक वर्षांपूर्वी नागांच्या वसाहतीला आर्यांनी आग लाविली असता आगीत शिरून नागांना वाचविले. त्या मुलाची मी माता. मलाही आज आगीत शिरू दे. नाग आगीत जात असतील तर आर्य कसे दूर राहतील? नागमाता जाळल्या जात असता आर्यमाता का दूर राहतील? नागपत्न्या पतीपासून ओढल्या जात असता आर्यपत्न्या पतीजवळ कशा राहतील? स्त्रियांनी स्त्रीदर्म ओळखावा. मातेने मातृधर्म ओळखावा. ही कृष्णी निघाली. परवा तिने लग्न लावले. प्रियकराचा हात जन्माचा हाती घेतला. कोवळी पोर. फुलाची कळी. ती आगीत शिरावयाला जाते. हातावर हसत निखारे ठेवते. कोणाला हे पाहवेल? येथे कोणाला हे पाहवते का? चला आपण साऱ्याजणी जाऊ. जनमेजयासमोर उभ्या राहू. जाळ म्हणावे आम्हाला कर तुझ्या क्रोधाची शांती. या सर्व मायबहिणी! उठा. या इकडे. शाबास राजपुरुषांनो, पकडा आम्हाला. न्या. माझ्या देहाची हाडे आधी फेका यज्ञात. "

कार्तिक एकदम तेथे धावून गेला. तो म्हणाला, “ गावातील स्त्रिया निघतात नि पुरुष का मागे राहणार? चला, आपण सारे जाऊ. होळीचा समारंभ पार पाडू. स्त्रियांच्या पुढे पुरुष होऊ देत. स्त्रियांनी आजपर्यंत कधी अग्नीची भीती बाळगली नाही. त्या हसत सती जातात. आता पुरुषांनी दाखवावे ते तेज. चला, सारा गाव निघू दे."

सारी सभा उठली. राजपुरुष घाबरले. त्यांच्या भोवती सर्व स्त्रीपुरुषांचा गराडा पडला. इतक्यात मंजुळ आवाज कानावर आला. बासरीचा आवाज. नागानंद व वत्सला आली. प्रेमाचा धर्म घेऊन आली. जिवंत असणाऱ्यांना अधिक यथार्थपणे जिवंत करण्यासाठी आली. सार सभा तटस्थ झाली.

वत्सला गाणे म्हणत होती. नागानंद बासरी वाजवीत होता. अपूर्व गाणे, अपूर्व वाजविणे.

“आकाशातून जीवन देणारा पाऊस पडतो, समृद्धी देणारा प्रकाश मिळतो. मानवा, तुझ्या हृदयाकाशातून तू का जीवनाचा संहार करणारा द्वेष देणार? जीवनाला जाळून टाकणारा क्रोध देणार?

अरे, आपण सडक्या नासक्या वस्तूही शेतात टाकून त्यांच्यापासून भरपूर धान्य मिळवतो. मनुष्य का त्यापेक्षा वाईट? विषांतून अमृत मिळवणारा, मातीचे सोने करणारा, शेणखतातून धान्य निर्मिणारा असा हा मानव. त्याला मानवात मंगलता का दिसू नये?

ऊठ, बंधो! उठ, ऊठ, गाते! ऊठ, सर्वत्र मांगल्याचा अनुभव घे. सारे सुंदर आहे, शिव आहे. सूर्य आपले किरण सर्वत्र फेकतो व सारे प्रकाश मान करतो. आपणही प्रेमाचे किरण सर्वत्र फेकू या व सारे सुंदर करू या.

आग पेटली आहे. चला विझवावयाला. आपली जीवने घेऊन चला. जो मानव असेल तो उठेल. जो पशू असे तो पळेल. कोण येता, बोला. मांगल्य बोलावीत आहे. मानव्य हाक मारीत आहे. नवधर्म बोलावीत आहे. कोण येता, बोला.

द्वेषाची लाट आली आहे; प्रेमाचा सिंधू घेऊन चेला, संकुचितपणा येत आहे; विशालता घेऊन चला. क्षुद्रता घेरू पाहत आहे; उदारता घेऊन चला. अंधार येत आहे; प्रकाशाचे झोत आणा. घाण येत आहे; सुगंध पसरा. मरणाचा सुकाळ होत आहे; जीवनाची वृष्टी करा. बंधने वेष्टू पाहात आहेत; तोडा ती बंधने. मुक्त करा म्हणजे मुक्त व्हाल. बद्ध कराल तर बद्ध व्हाल. आहे का कोणी मोक्षार्थी, कोणी मुमुक्षू? उठू द्या जे असतील ते.

मोक्षाची नवप्रभात येत आहे, जीवनाचा दीप पाजळून स्वागतार्थ जाऊ या. सत्त्वपरीक्षा आहे. चला, परीक्षा देऊ. सोने आगीतून परीक्षिले पाहिजे. आपले जीवन सोन्याचे आहे. चला, ते सिद्ध करू. चला सारे मानव, चला सर्व मायबाप, चला पतिपत्नी, चला बहीणभाऊ, चला लहानथोर येथे ना आर्य कोणी, ना नाग कोणी. ही मानव्याची परीक्षा आहे.”

वत्सला गाणे गात होती, नागानंदाची बासरी चालली होती. कृष्णी नाचू लागली. कार्तिकही आला. सारे आले. लहानथोर आले. सारे येऊन नाचू लागले. सारे गाणे म्हणू लागले आणि ते राजपुरुष कोठे आहेत? ते सैनिक कोठे आहेत? ते कोलित कोठे आहे? आग विझली. प्रेमाचा मळा तेथे पिकला.

गाणे थांबले. वाजवणे थांबले.

वत्सला बोलू लागली, “हे माझे गाव. माझ्या गावाला मी आले आहे. आस्तिकांचा संदेश घेऊन आले आहे. भगवान आस्तिकांनी स्त्रियांना महान कर्म सांगितले आहे. स्त्रियाच नवीन बाळे जगाला देतात. त्याच, या कंटाळवाण्या संसारात त्या नवीन, हसरी सृष्टी आणतात. भगवान आस्तिक आपणापासून नवीन दिव्यता अपेक्षित आहेत. ठिकठिकाणचे राजे सैन्य घेऊन जगमेजयाकडे निघाले आहेत. आपण साऱ्या भगिनी त्या सैन्यांसमोर जाऊ या. त्यांना परावृत्त करू या. युद्धामुळे सर्वांत अधिक दुःख कोणाला सोसावे लागत असेल तर ते आपणाला. आपले पती जातात, आपले मुलगे जातात, आपले भाऊ जातात. रडणे आपल्या नशिबी. आपण उगीचच्या उगीच हा संहार का होऊ द्यावा ? ना या लोकांसमोर ध्येय, ना धर्म, हा सारा क्षुद्र द्वेषाचा पसारा आहे. पुरुष बावचळला तर स्त्रीने सत्पथ दाखविला पाहिजे. आपणही कठोर होऊ, शुष्क होऊ तर संपलीच सारी आशा. आपले स्त्रीत्व घेऊन आपण निघू या. आपली प्रेमळ हृदये घेऊन द्वेष जिंकावयाला आपण निघू या. येता माझ्याबरोबर! वाटोवाट आपणास असंख्य स्त्रिया भेटतील. स्त्रीराज्यांतून शेकडों स्त्रिया शांतिपथके घेऊन येत आहेत. सारे प्रवाह वाटेत मिळतील. स्त्रियांची शांतिगंगा द्वेषाचे वणवे विझवावयाला निघेल. भगीरथाने गंगा मानवाला उद्धरावाला आणली. परंतु मानवाचा खरोखर उद्धार कोणत्या गंगेने होणार? स्त्रियांच्या हृदयातील गंगा बाहेर प्रकट झाली पाहिजे. ती संघटित होऊन धों धों करीत निघाली पाहिजे. त्या वेळेसच खरा उद्धार होईल. "

कार्तिकाची आई म्हणाली, " वत्सले, मी येते तुझ्याबरोबर.” “कृष्ण म्हणाली, “मी येते. "

सुश्रुता म्हणाली, “मी म्हातारी आहे. तरीही मी येते. मला संभाळून न्या.” अनेक स्त्रिया निघाल्या. अनेक कन्या निघाल्या. स्त्रियांचे शांतिपथक सिद्ध झाले.

नागानंद म्हणाला, “आपण पुरुष येथे राहून काय करणार? आपणही प्रेमधर्माची गाणी गात जाऊ. आर्य व नाग यांच्या सहकार्यांची गाणीत गात जाऊ. भारताच्या भवितव्याची गाणी गात जाऊ." कार्तिक म्हणाला, “मी सिद्ध आहे. अपूर्व दिवस. अपूर्व प्रयोग. अपूर्व संधी. निघू या सारे.'

मुख्य राजपुरुष म्हणाला, “आम्हीही तुमच्याबरोबर आलो असतो, परंतु नको. आम्ही येथून दुसऱ्या राज्यात निघून जातो. सारे शांत होईल तेव्हा येऊ परत. तुमच्या गावाने आम्हाला नवजीवन दिले. धन्य हा गाव! भगवान आस्तिकांची आशा सफळ होईल. आस्तिकांच्या आश्रमातून जे जे तरुण बाहेर पडले आहेत ते स्वस्थ नाहीत. सर्वत्र त्यांनी नवधर्म वाढविण्याचे काम सुरू केले आहे. या सर्व वेदनांतून मंगलच बाहेर पडेल. "

राजपुरुष निघून गेले. सैनिक गेले. सुश्रुता आजी, वत्सला व नागानंदासह घरी आली. कार्तिक व कृष्णीही आली..

कार्तिक - वत्सले, ही हो माझी कृष्णी.

वत्सला - केवढी झाली कृष्णी ? कृष्णे, तू इतकी वर्षे कोठे लपली होतीस?

कृष्णी - वेळेवर येण्यासाठी.

सुश्रुता - कृष्णे, बघू तुझा हात? केवढा आला आहे फोड ! खरी हो शूर तू.

नागानंद कसला फोड?

कार्तिक- राजपुरुषांनी जळते लाकूड 'तुमची होळी करू' असे दाखविण्यासाठी आणले होते. कृष्णीने ते ओढून घेतले व स्वःच्या हातावर ठेवून ती म्हणाली, “कोणाला घालता भीती! सती जाणाऱ्या स्त्रिया आगीला भीत नाहीत. निखाऱ्यांना फुले समजून त्या ओंजळीत घेतात."

वत्सला - (कृष्णीला हृदयाशी धरून) खरी नागकन्या. नागपूजेने असे धैर्य येत असेल तर ती कोण त्याज्य म्हणेल?

कार्तिक - आज सारे गोड झाले. आपल्या गावातील भेद मिटले. कृष्णीने स्वतःच्या हातावर निखारे ठेवले व गावातील द्वेषावर निखारा ठेवला गेला. माझी आईही तुमच्याबरोबर येण्यास तयार झाली आणि बाबा आमच्याबरोबर येणार.

कृष्णी - आपण आता आपल्या घरी जाऊ. वडिलांचे आशीर्वाद घेऊ.

सुश्रुता - हे काही परक्याचे घर नाही. कृष्णी - तसे नाही मी म्हटले. आजी, मी तुमचीच आहे. आम्ही तुमचीच आहोत.

कार्तिक व कृष्णी कार्तिकाच्या घरी गेली. कार्तिक आईला म्हणाला, “आई, ही तुझी सून. तुला आवडते की नाही सांग." आईने तिला पोटाशी धरले. “धन्य आहेस तू.” ती म्हणाली. नंतर दोघे पित्याच्या पाया पडली. कार्तिक वडिलांस म्हणाला, “बाबा, मुलांवर राग नका करू." वडिल म्हणाले, “तुम्ही मुलेच बरोबर असता. तुम्हाला दूरचे दिसते. आम्हाला जवळचेही दिसेनासे होते. खरोखर आम्ही आंधळे होतो. आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही मरायला निघता आणि आम्ही मरतुकड्यांनी का घरी राहावे? वास्तविक आम्ही सर्व वृद्धांनी ती जनमेजयाची होमकुंडे भरून टाकली पाहिजेत. तुम्ही सुखाचे संसार क्षणात फेकून आगीला कवटाळायला निघालात. धन्य तुम्ही मुले! तुमच्याजवळच खरा धर्म आहे; खरा देव आहे. आम्ही वृद्धांनी उगीच काथ्याकूट करावा. आशीर्वाद, तुम्हाला शत आशीर्वाद. या पोरीने हातावर कोलीत ठेवले. माझ्या हृदयावर निखारे पडल्यासारखे झाले, अशी रत्ने - त्यांना आम्ही 'नाग' 'नाग' म्हणून नीच मानतो. आम्हीच खरोखरच नीच. कृष्णे, मुली, धन्य तुझी मायबापे! धन्य माझा कार्तिक त्याला तुझी जोड मिळाली!” कार्तिक आईला म्हणाला, “आम्ही जरा जाऊन येतो.” आई, “जा. लवकर या. शेवटचे घरी जेवू व बाहेर पडू. ' ?,”

कार्तिक व कृष्णी बाहेर पडली. ती शेतावर निघाली. कार्तिकाने कृष्णीचा भाजलेला हात आपल्या हृदयावर ठेवला होता. कोणी बोलत नव्हते. दोघे शिलाखंडावर बसली.

“मी ' काढतो हा!" कार्तिक म्हणाला. दूध “ काढा. मी खोलीत जरा पडते." ती म्हणाले.

कार्तिक दूध काढायला गेला. कृष्णी कार्तिकाच्या पलंगडीवर पडली होती. ती रडत होती. तिला हुंदके आवरतना. कार्तिक आला. त्याला हुंदके ऐकू आले. तो तिच्याजवळ बसला. तिचे डोके मांडीवर घेऊन बसला. तिचे अश्रू त्याने पुसले. छे:! ते कसे पुसले जाणार? सागराला कोण बांध घालणार?

“कृष्णे, काय झाले?” त्याने विचारले.

“काय सांगू! दोन दिवसही आपणास एकत्र येऊन झाले नाहीत, आणि आता आपण जाणार? कोठे आपण पुन्हा भेटू? आगीत तरी एकदम लोटतील का आपणाला? आपणास बद्ध करतील, नेतील, छळतील, मारतील, जाळतील. तुमच्या मांडीवर एकदासुद्धा डोके नाही ठेवले. तुम्हाला काय दिले मी? मरण-मरण, कार्तिक, मी अकस्मात आले व तुम्हला आगीत लोटले. काय करू मी? का नाही आपण गेलो पळून, का नाही गेलो निघून? राहिलो असतो जंगलात. खाल्ली असती पाने. ऐकली असती पाखरांनी ज्ञाने. पल्लवांची केली असती मऊमऊ शय्या. रानफुले पसरली असती तीवर. मी तुम्हाला वनमाळांनी नटविले असते. तुमच्याबरोबर नाचले असते. आपण झाडाच्या एका फांदीवर पाखराप्रमाणे बसलो असतो. झोके घेतले असते. प्रेमाचा झोला! प्रेमाचे जीवन! परंतु आता काय? तुम्ही जाणार प्रचाराला, आम्हीही जाणार. जिवंतपणी उभयतांचे हाती सतीचे वाण. नाही तुम्हाला दिले सुख, नाही पोटभर पाहिले मुख. काय करू मी?” ती रडू लागली. रडे थांबेना.

“कृष्णे, तू मला सारे दिलेस. जीवनाची कृतार्थता दिलीस. जीवनाची अनंतता दाखविलीस. मरणाला मित्र मानायला शिकवलेस. रडू नको. दोनच दिवस. परंतु किती सुगंध ओतलास माझ्या जीवनात ! तो मला पुरेल. जन्मोजन्मी पुरेल. रडू नको. हस. तू आता एकटी नाहीस, मी एकटा नाही. आपली कोण ताटातूट करील? तुझ्याबरोबर मी आहे. माझ्याबरोबर तू आहेस. चल. आपण जाऊ. आपल्या क्षुद्र सुखाचा विचार का आता करायचा? नवधर्म आपण आणीत आहो. तिकडे कोठेसे सांगतात की, बी पेरण्याआधी जमीन जाळावी लागते. त्याप्रमाणे नवधर्माचे बी पेरण्यापूर्वी बलिदाने अर्पावी लागतील. मग सुंदर अंकुर फुटेल. आपली जीवने धन्य होतील आणि ही धन्यता मला तू देत आहेस. मी का पुरुष होतो. भ्याड होतो. तू मला वीर केलेस. तू गावातील सर्व स्त्रीपुरुषांत नवस्फूर्ती ओतलीस. सर्वांना नवजीवन दिलेस. सर्वांच्या जीवनात राम आणलास. रडू नको. आपला संसार कृतार्थ झाला. नवीन ध्येयाचे बाळ तू सर्वांना वाढवायला दिलेस. खरे ना?” तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला.

ती शांत पडून होती.

“ हाताची आग होते का?" त्याने विचारले.

"तुम्ही आपल्या हृदयावर तो धरून ठेवला होतात. मग आग थांबणार नाही का? तुमचे हृदय प्रेमसिंधू आहे." तीम्हणाली.

“तू त्या दिवशी माझे भाजलेले बोट एकदम तोंडत धरून ठेवलेस. किती गं तुम्हा बायकांचे प्रेम! आमचे कमी हो प्रेम. पुरुषी प्रेम शेवटी उथळच.” तो म्हणाला. 

“ असे नका म्हणू. तुम्ही पुरुष संयम राखता. तुमच्याजवळ प्रेम कमी असते असे नाही. " ती म्हणाली.

"चला, आपण जाऊ." तो म्हणाला. "चला, आपली वाट पाहत असतील." ती म्हणाली.
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा