“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठतेस ना." सुश्रुतेने गोड प्रेमळ वाणीने विचारले.
“मला निजू दे, आजी. निजूनच राहू दे. मला काही नको. मला स्नान नको, मला ज्ञान नको, मी जागीच आहे. ज्ञानाचा विचार करते आहे. ज्ञान म्हणजे शून्य. ते परब्रह्म म्हणे सतही नाही, असत्ही नाही. दोहोंच्या पलीकडे आहे. ते दुष्टत्वाच्या पलीकडे आहे. सुष्टत्वाच्या पलीकडे आहे. असे जर आहे तर नीतीला अर्थ काय? आपण चांगलेच वागावे व वाईट वागू नये असे का ? चांगले वा वाईट अंतिम तत्त्वाच्या दृष्टीने ही मायाच आहे. वाटेल तसे मनुष्य वागला म्हणून काय झाले? तो पहाटे स्नान करो वा पासल्या प्रहरी करो; तो दिवसा निजो वा रात्री जागो; तो आग लावो वा आग विझवो; कशालाही अर्थ नाही. आजी, ब्रह्मचिंतन करता करता सारे व्यर्थ आहे एवढे मला समजले. मी पडूनच राहते. नको उठवू मला.” वत्सला म्हणाली.
“नीज तर मग. आणखी पांघरूण घालते. त्रास नको करून घेऊ. विचार
नको करू, थोडा कमी कर विचार, नाहीतरी वेडी होशील.” सुश्रुता म्हणाली. सुश्रुता स्नानाला गेली. वत्सला निजून राहिली. थोड्या वेळाने कार्तिक आला. एकदम वत्सलेजवळ आला.
“ऊठ ना गं, वत्सला, तू पोहायला ना येणार होतीस? मी नदीवर वाट पाहत होतो. सुश्रुताआजींना विचारले तर त्या म्हणाल्या, 'ती निजलेलीच आहे.' आज नदीवर किती गर्दी आहे. कितीतरी मुली शिकत आहेत पोहायला. तूही शीक. चल." कार्तिक म्हणाला.
“मी नाही येत. तू जा.” ती पांघरुणातूनच म्हणाली. “तू कधीही माझ्या इच्छेप्रमाणे नाहीच करणार?” कार्तिक म्हणाला.
“मी का दासी आहे कोणाची?” एकदम वत्सला म्हणाली.
“तू दासी नाहीस, परंतु मी तुझा दास आहे.” कार्तिक म्हणाला.
“दासाने अंगणात राहावे, असे घरात येऊन अधिकाराने बोलू नये. कार्तिक तू मूर्ख आहेस. स्त्रियांना दासी होणे आवडते. परंतु कोणाचे? त्यांचे दास होणाऱ्यांच्या त्या कधीही दासी होत नाहीत. जे मिळत नाही त्याच्या पाठीमागे लागावे, जे मिळेल ते झिडकारावे. सहजासहजी मिळणाऱ्या वस्तूला किंमत नसते. तू मला विनामूल्य मिळणार? परंतु ज्याच्यासाठी माझे जीवनहीं मी फेकून देण्याला तयार होईन तो माझा ठेवा. तू आपली एवढी किंमत कोठे ठेविली आहेस? तू स्वतःला भाजीचा पाला केले आहेस, पै किंमतीचे केले आहेस. स्वस्त वस्तू वत्सलेला नकोत. जा तू.” वत्सला म्हणाली.
"मलाही स्वस्त वस्तू नको आहेत. तू महाग आहेस म्हणूनच तुझ्या पाठीमागे मी लागलो आहे. त्या जन्मी नाही तर पुढील जन्मी मिळशील! मी आशावान आहे.” कार्तिक म्हणाला.
“पुढील जन्म? कोणी पाहिला आहे पुढील जन्म? कोणीही मेलेला परत आला नाही, त्याने येऊन सांगितले नाही. " वत्सला म्हणाली.
“दूर बागेत फुले फुलली आहेत की नाहीत हे न पाहता वास आला म्हणजे आपण म्हणतो की फुले फुलली आहेत. त्याप्रमाणे काही गोष्टींचा जीवनात वास सुटतो, त्यावरून फुले फुलली होती असे कळते. नाहीतर जीवनात हा सुगंध का भरावा? वत्सले, या जन्मात एखाद्याला आपण एकदम पाहतो व त्याच्याबद्दल आपणास एकदम निराळे वाटते. असे का वाटावे? यात काहीच अर्थ नाही का? वत्सले, या जन्मात एखाद्याला आपण एकदम पाहतो व त्याच्याबद्दल आपणास एकदम निराळे वाटते. असे का वाटावे? यात काहीच अर्थ नाही का? तो सुगंध आपण घेऊ देत असतो. त्या स्मृती आपण घेऊन येत असतो. त्या त्या व्यक्ती भेटताच ते ते जीवनातील सुगंधकोश फुटतात व जीवन दरवळून जाते.” कार्तिक म्हणाला.
“तुम्हाला पाहून माझे जीवन दरवळत नाही. माझे जीवनवन दरवळून टाकणारा वसंत अद्याप यायचा आहे. माझ्या जीवनात अद्याप शिशिरच आहे. सारे उजाड आहे. ना फुले ना फळे ना कमळे ना भृंग ना मंजिरी ना पिक. काही नाही. कार्तिक, तू जा. मला सतावू नकोस.” वत्सला म्हणाली.
“माझ्यामुळे तुला त्रास तरी होतो. माझ्या अस्तित्वाचा अगदीच परिणाम होत नाही असे नाही. आज त्रास होतो, उद्या वास येईल. मला आशा आहे. जातो मी.” असे म्हणून कार्तिक गेला.
वत्सला पुन्हा अंथरुणावर पडली. पुन्हा उठून बसली. आळेपिळे तिने दिले. ती आज आळसावली होती, सुस्त झाली होती. कोठे गेले तिचे चापल्य, कोठे गेला अल्लडपणा? कसला झाला आहे तिला भार? कशाच्या ओझ्याखाली दडपली गेली स्फूतीं? हसली, मंदमधुर अशी ती हसली. पुन्हा तिने डोळे मिटले. ती गंभीर झाली.
थोड्या वेळाने ती नदीवर गेली. तेथे कितीतरी गर्दी होती. सुश्रुता एका बाजूला धूत होती. वत्सला जाऊन उभी राहिली.
" आलीस वाटतं. बरं नसेल वाटत तर नको करू स्नान. " आजी म्हणाली. “नदी म्हणजे माता, या मातेचे सहस्र तरंग अंगाला लागून उदासीनपणा जाईल. ही माता हजारो हातांनी मला न्हाऊ-माखू घालील. माझं मालिन्य दवडील. टाकू मी उडी ?” तिने विचारले.
“उडी नको मारू. तुला नीट तरंगायला येत नाही. येथे पाण्यात उभी राहा व अंग धू. फार वेळ गार पाण्यात राहू नको.” सुश्रुता म्हणाली.
“नदी का बुडवील? मातेच्या प्रेमसागरात बुडून का कोणी मरतो ? अमृताच्या सिंधूत बुडी मारण्याची का भीती वाटावी? नाही, ही लोकमाता मला बुडवणार नाही. मारते मी उडी. " वत्सला हसून म्हणाली.
“वत्सले, म्हाताऱ्या आजीचा अंत पाहू नकोस. तुझ्यासाठी मी जगत आहे.” सुश्रुता सद्गदित होऊन म्हणाली. “बरे, रडू नको तू. मी तेथे थोड्याशा खळखळ पाण्यात जाऊन अंग धुते." ती म्हणाली. वत्सला बरीच होता. पुढ गेली. पाणी फार नव्हते तेथे. परंतु पाण्याला जोर
“आजी, नदी मला ओढीत आहे. चल म्हणत आहे. जोर करीत आहे.”
थट्टामस्करी करीत वत्सला म्हणाली.
“तू इकडे ये. पाण्याला येथे ओढ आहे. एकदा घसरलीस तर सावरता येणार नाही. पुढे डोह आहे. ये इकडे पोरी." आजी म्हणाली.
इतक्यात धों धों आवाज येऊ लागला. जणू समुद्राचा आवाज ! नदी पुढे समुद्राकडे जात होती. तो लबाड समुद्रच तिला पकडण्यासाठी पाठीमागून धो धो करीत येत होता की काय? का नदीचा पिता पर्वत रागावून तिला परत नेण्यासाठी येत होता? धों धों आवाज कसला बरे आवाज?
“आजी, हा बघ धों धों आवाज. माझ्या हृदयांतील धो धो आवाज होत आहे. तेथे जणू तुफान सागर उचंबळत आहे! हा जीवनातीलच आवाज का बाहेरही ऐकू येत आहे? धो धो आवाज, गोड परंतु भेसूर ! अंगावर रोमांच उभे करणारा आवाज, जीवनाच्या तारा न तारा कंपायमान करणारा आवाज ! धो घो!... आजी, हा आवाज थरकवतो! परंतु उन्मादवितो. विलक्षण आवाज! "
“ पळा पळा सारी, प्रचंड लोंढा वरून येत आहे. पळा, निघा सारी पाण्यातून. या लौकर बाहेर. मुलांनो निघा बाहेर, बायांनो, निघा बाहेर! हा पाहारा कचरा आला वाहत... येणार, प्रचंड लोंढा येणार! पाणी चढू लागले! आले रे आले! धो धो करीत पाणी आले, पळा पळा..."
एकच हाक झाली. कोणाचे कलश तेथेच राहिले. कोणाची भांडी तेथेच राहिली, कोणाची वस्त्रे राहिली, कोणाची आसने राहिली. धावपळ झाली. पाण्यातून भराभर पळता येईना. कोणी ठेंचाळले, पडले. पुन्हा घाबरून सावरले. तीरावर येऊन एकदाचे उभे राहिले.
परंतु वत्सला कोठे आहे? ती पाण्यात नाचत आहे. तिला भय ना भीती!
कसा येत आहे धो धो आवाज, आंतबाहेर एक आवाज ! अंतर्बाह्य एकच
आवाज ! हीच का समाधी ? हाच का अनाहत ध्वनी? हा कोणता ध्वनी? विलक्षण ध्वनी! धो! धो!" असे म्हणत ती तेथे नाचत होती. “वत्सले, अगं ये लौकर, पोरी, पाणी आले वरून, ये. अशी नाचतेस काय? मला येववतही नाही तुला ओढायला. मी येईल तो पाणी येईल. ये,
ये, वत्सले, ये.” सुश्रुता आजी ओरडत होती, हाका मारीत होती.
तेथे कार्तिक आला, तो कावराबावरा दिसत होता. “ कार्तिक, आण पोरीला ओढून जा, बघतोस काय, ते बघ पाणी आले! धाव." सुश्रुता म्हणाली.
“ये कार्तिक ये, माझ्याने येववत नाही. येथे जोराची धार आहे. माझे पाय पांगुळले आहेत, ये घर माझे हात. ये." वत्सलेने हाक मारली. "कार्तिक, नको जाऊ आले बघ पाणी, फिर मागे... तूही मरशील, तूही बुडशील. कोणीतरी म्हणाले.
“ये, कार्तिक ये. हातात हात घालू. नदी उचंबळून येत आहे. तूही
उचंबळून ये. माझ्या हृदयात धो धो होत आहे. तुझ्या नाही का होत ?” वत्सला म्हणत होती.
आले पाणी! अपार लाल लाल पाणी! कार्तिक मागे आला पटकन, आणि वत्सला ? कोठे आहे वत्सला?
“अरे वत्सला माझी, अरे वाचवा कोणी वेड्या पोरीला, अरे टाका रे कोणी उडी, नाही का कोणी येथे ? कार्तिक, का नाही गेलास जरा पुढे ? तू आणतोस तिला ओढून? ती तुला बोलावीत होती. तू बळकट हाताने आणतोस तिला धरून? बोलव कोणाला, कर पुकारा, मार हाक, ती बघ, ती बघ, ती चालली! अरेरे, एकुलती माझी नात, वाचवा रे! हाय रे, देवा! अरे नाही का रे कोणी? सारे का भ्याड ? सारे का कापुरुष झाले? नाही का कोणी तरुण? अरेरे, ती बघा, तो पाहा तिचा हात, घरा कोणी जाऊन. तो तिचा पदर, ओढा रे तो धरून. ते पाहा तिचे केस येतील ते धरता. जा रे कोणी, मारा उडी, अरेरे, चालली, वत्सला चालली.” असा सुश्रुतेचा विलाप चालला होता.
“नागालाच वरीन' म्हणणारी मरू दे. असेल कोणी नाग तर काढील तिला. आम्ही आर्यकुमारांनी कशाला घ्यावा उड्या ? हिचा बाप नागांना वाचवायला गेला तर स्वतः मेला. 'मी नागालाच वरीन' असे हीही म्हणत होती. तर हीही चालली वाहत. आर्यांनी नागांपासून दूर राहावे हा सृष्टीचा संदेश आहे. " तेथे एक नागद्वेषी बोलला.
'अरे, ही का भांडणे उकरावयाची वेळ? माझी चालली रे, गुणांची पोर ! आहे का रे कोणी नाग येथे ? आहे का कोणी माणुसकी असलेला आर्य ? उदारचरित आर्य ? नाही, कोणी नाही? ती पाहा, तिचेच ते केस ! टाका कोणी उडी!” सुश्रुता विलपत होती.
तो पाहा कोणी तरी धावत आला ! घेतली त्याने उडी ! उसळणाऱ्या प्रक्षुब्ध पाण्यात घेतली उडी. पाण्याच्या लोंढ्यात त्याने आपल्या देहाचा ओंडका फेकला. वत्सलेला आधार म्हणून फेकला. नदीने फेंसाची माळ त्याच्या गळ्यात घातली! झपझप हात मारीत जात आहे. परंतु हे काय? तोही दिसेनासा झाला! तोही बुडाला की काय? आला वर, चालला पुढे! नदीजवळून आणणार का लूट हिसकवून? ती नदी रत्नाकराला ते निर्मळ जीवनरत्न नेऊन देणार होती. प्रियकराच्या चरणी ती भेट देणार होती. परंतु हा तरुण विफल करणार का तिचे हेतू ?
तीरावरून लोक पाहत होते. तीराच्या बाजूने धावत जात होते. लहान मुले तर “ आहे, तो दिसत आहे." असे म्हणत पुढे पुढे पळत होती. तो पाण्याचा लोंढा, हा मानवी लोंढा.
तो तरुण त्या नदीबरोबर झगडत होता. आपले लक्ष्य गाठण्यासाठी धडपडत होता. ती पाहा त्याने एकदम मोठी झेप घातली. परंतु काय? ते केस नव्हते, ती वेल होती. फसला. पुन्हा मारलीन झेप. काय सापडले ? त्याला पदर वाटला. परंतु ती शेवाळ होती. त्याचे रत्न नाही का त्याला मिळणार? सापडले, सापडले! काहीतरी सापडले! तो पाहा पकडीत आहे! होय. वत्सलाच ती. तिचे डोके वर धरून तो आणीत आहे. एका हाताने लाटांशी झगडत आहे. त्याचा एक हात व खवळलेल्या सरितेचे सहस्र हात! परंतु तो एक हात भारी आहे. निःस्वार्थी सेवा त्या हातात भरलेली आहे. थोर अहेतुक प्रेम त्या हातात भरलेले आहे. जगासाठी हलाहल पिणाऱ्या देवा शंकराच्या जटेतील एक केस कुबेराच्या सर्व संपत्तीहून अधिक मोलाचा व वजनाचा भरतो! रुक्मिणीचे एक तुळशीपत्र सत्यभामेच्या संपत्तीतून अधिक भरते ! वजन वस्तूचे नसून तिच्यातील भावाचे आहे. तो त्या तरुणाचा हात ! तो काळासावळा, लहानसा हात ! नदीच्या सामर्थ्यापुढे तो तुच्छ होता. परंतु तो हात त्या वेळेस मंतरलेला होता. अनंत सामर्थ्य त्यात संचारलेले होते. त्या लहान हातातील महान त्यागासमोर नदी नमली, शरमली, तिने वेग कमी केला. तो पाहा तरुण तीराकडे येऊ लागला. झपाट्याने येत आहे. सारी शक्ती एकवटून तो येत आहे. आला, आला! अचेतन वत्सलेला घेऊन आला! त्याचे आता जमिनीला पाय लागले. त्याने तिला पाठंगुळीस घेतले, तिची चेतनाहीन मान, डोळे मिटलेली मान, त्याच्या खांद्यावर पडली होती.
तीरावर एकच जयघोष झाला. 'शाबास, शाबास!' असे आवाज शेकडो कंठांतून निघाले. तो नागद्वेषी मनात जळफळत होता. कार्तिक पुढे
झाला. तो त्या श्रांत तरुणाला साहाय्य करायला धावला. “थांबा, मी नेतो तिला. तुम्ही दमला असाल. " कार्तिक म्हणाला.
“घ्या, माझ्यात शक्ती नाही. " तो तरुण म्हणाला. कार्तिकाने वत्सलेला
खांद्यावर घेतले, तो आला झपाट्याने.
“ आहे का रे धुगधुगी, कार्तिक!” सुश्रुतेने विचारले.
“तिला कुंभाराच्या चाकावर घालू, चला.” तो म्हणाला.
कार्तिक वत्सलेला घेऊन कुंभाराकडे गेला. बरोबर सुश्रुता होती. इतर मंडळी होती. स्त्रीपुरुषांची गर्दी होती. कुंभाराचे चाक गरगर फिरले. पोटातून भडभड पाणी बाहेर पडले. वत्सलेच्या जिवात धुगधुगी आली. छाती खालीवर होऊ लागली. तिने डोळे उघडले. श्रान्त निस्तेज डोळे!
वत्सलेला घरी नेण्यात आले. तिला ऊबदार वस्त्रात पांघरवून ठेवण्यात आले. कढत पाणी तिला देण्यात आले. सुश्रुता तिच्याजवळ बसली होती. परंतु तो प्राणदाता तरुण कोठे आहे? तो काळासावळा त्यागी तरुण कोठे आहे? त्याला का सारे विसरले? गरज सरो, वैद्य मरो, हीच का जगाची रीत? कामापुरतेच का सारे मामा ?
"कार्तिक, तो तरुण कोठे आहे? कोण तो, कोठला आहे तो ? त्याला जा आण. त्याने उडी घेतली. आपले प्राण त्याने संकटात घातले. जा, कार्तिक जा." सुश्रुता म्हणाली.
कार्तिक गेला. नदीवर गेला. नदीवर आता कोणी नव्हते. फक्त ती नदीच भरून वाहत होती. इतक्यात त्याला दूर कोणीतरी दिसले. कोण होते ते? नदीतीरावरील दरडीवर तो तरुण उभा होता. नदीच्या लाल पाण्याकडे बघत होता. ज्या नदीजवळ तो झगडून आला. तिच्याकडे तो बघत होता. कार्तिक तेथे धावतच गेला.
“काय करता येथे ? तुम्ही दमले आहात. ", तो म्हणाला.
“होय, दमलो आहे. मला विश्रांती पाहिजे आहे. विश्रांती घेण्यासाठी जाऊ म्हणतो." तो तरुण म्हणाला.
“चला विश्रांती घ्यायला. सुश्रुता आजीने बोलावले आहे. ज्या मुलीला वाचवलेत तिच्या आजीने. ती मुलगी वाचली. ती आता लौकरच नीट बरी होईल. अंथरुणात गुरगुटवून ठेवले आहे तिला. चला, तेथे विसावा घ्या.” कार्तिक म्हणाला.
“तो क्षणभर विसावा. तो कितीसा पुरणार? मला कायमचा विसावा पाहिजे आहे. ही नदी देईल मला विसावा. तिची एक वस्तू मी हिरावून आणली. तिला दुसरी वस्तू बदली देतो. मौल्यवान वस्तू आणली, क्षुद्र वस्तू देतो." तरुण म्हणाला.
“तुमचे जीवन क्षुद्र ?” कार्तिकाने विचारले.
“ज्या जीवनाची जगात कोणाला आवश्यकता नाही ते क्षुद्र जीवन. माझ्या जीवनाची कोणाला आहे जरुरी? मला आई ना बाप, भाऊ ना बहीण, सखा ना मित्र. मी कशासाठी जगू?” त्या तरुणाने विचारले.
“बुडणारे काढण्यासाठी, मरणारे वाचविण्यासाठी.” कार्तिक म्हणाला.
तो तरुण काही बोलला नाही. कार्तिकाने त्याचा हात धरला. अद्याप तो ओलाचिंब होता. त्याचे कपडे गळत होते. त्याचे केस ओले होते. हृदयातील करुणा का ती बाहेर वाहत होती?
“ त्याने हो वाचविले, त्याने उडी घेतली. कसा दिसतो आहे? कसे आहे सरळ सुंदर नाक! कसे पाणीदार डोळे ! श्रीकृष्ण परमात्मा का असाच दिसत असेल!” स्त्रिया दारातून, वातायनांतून पाहत बोलत होत्या. इतक्यात काही मुलींनी वरून फुले फेकली. त्या तरुणाने वर पाहिले.
“मी नाग आहे, आर्य नाही. का फुकट दवडता फुले!” तो म्हणाला.
“आम्ही आर्यकन्या हा भेद ओळखीत नाही. आम्ही उदारपणा ओळखतो, त्याग ओळखतो. आज तरी तुम्ही सिद्ध केलेत की, या गावातील सर्व आर्यांपेक्षा तुम्ही थोर आहात. करू दे तुमची पूजा, ही घ्या फुले..." असे म्हणून एका मुलीने आणखी फुले अर्पिली. कोणीतरी धैर्य दाखविण्याची जरुरी होती. रस्त्यात मग गल्लीगल्लीतील मुलांमुलींनी त्या तरुणाच्या गळ्यात हार घातले. त्याच्यावर फुले उधळिली. नागद्वेषी मनात चरफडत होते. परंतु तो प्रसंगच असा अपूर्व होता की, द्वेषाला बाहेर पडायला लाज वाटत होती. पावसाळ्यात शेतांना उपळी फुटतात, परंतु दगडही जरा मऊ दिसतात, आर्द्रसे दिसतात.
वत्सला पडलेली होती. कार्तिक त्या प्राणदात्याला घेऊन आला. सुश्रुतेने दारात स्वागत केले. तिचे डोळे पाण्याने भरून आले.
“तुम्ही वाचविले हिला. माझी सारी मेली. एवढी वाचली. आज तीही जाणार होती. परंतु तुम्ही मृत्युंजय भेटलात. तुम्ही अमृत दिलेत. या, बसा. तुमचे कसे उपकार फेडू, कशी उतराई होऊ ? बसा. दमलेत तुम्ही. हिला शुद्धीवर आणण्याचा भरात तुम्हाला मी विसरल्ये. पण कार्तिकाला म्हटलं, “जा रे, त्यांना आण.” आलेत. बसा. तुमचेच हे घर. विश्रांती घ्या, अंथरूण देऊ का घालून? कढत दूध घ्या आधी. मी तापवून ठेवले आहे. आधी कोरडे नेसा, थांबा, देते हो वस्त्र." असे म्हणून सुश्रुतेने एक स्वच्छ वस्त्र त्याला दिले. तो तरुण ते नेसला. अंगावर पांघरूण घेऊन तेथे एका व्याघ्राजिनावर तो बसला. कढत- कढत दूध तो प्याला. नंतर त्याने आहार घेतला. शेवटी तो झोपी गेला.
* आजी, अद्याप कसे होत नाहीत हे जागे? काही अपाय तर नसेल ना?
अति श्रमाने का ग्लानी आली आहे! ही स्वस्थ झोप आहे, का दुसरे काही आहे?" वत्सलेने विचारले.
“होतील जागे, आता सायंकाळचा गार वारा वाहू लागला की होतील जागे. केवढे त्यांचे उपकार !” सुश्रुता म्हणाली. भाग्याचे
“आजी, त्यांच्या भिवया बघ कशा आहेत त्या! अशा भिवया लक्षण मानतात ना?" वत्सलेने विचारले.
"जो आपले प्राण दुसऱ्यांसाठी संकटात घालतो, त्याच्याहून कोण 'अधिक भाग्यवान ? खरोखर महात्माच तो." आजी म्हणाली. "यांच्या खांद्यावर कसला गं आहे हा डाग? भाजलेले असावे का? का दुसरा काही लागले असेल कधी? हा बघ चट्टा, खरा ना?" वत्सला हळूच पाहत व दाखवीत म्हणाली. “तुला त्यानी पाण्यातून वाचविले, आणखी कोणाला आगीतून
वाचविले असेल. वीरांची भूषणे, विराची पदके. सुश्रुता म्हणाली.
"तो तरुण जागा झाला. इकदम तो उठून बसला.
“बरे वाटते ना?” सुश्रुतेने विचारले.
“हो.” तो म्हणाला. * तुम्ही अकस्मात कोठून आलात? जणू देवाने पाठविले! कोणता तुमचा गाव, काय आपले नाव?" सुश्रुतेने विचारले.
* मला गाव असा नाही. जेथे जाईन तेथे माझा गाव. मी एकटा आहे. जगात कोठे ओलावा आहे का, हे पाहत फिरत असतो. सर्वत्र द्वेष व मत्सर भरून राहिला आहे. आर्य आणि नाग यांच्यात प्रचंड कलहाग्नी पेटणार ! ठायी ठायी मी वास घेत आहे. मला द्वेषाची हवा मानवत नाही. मी गुदमरतो. जेथे जाईन तेथे द्वेष नाकात शिरतो. ह्या गावाकडे वळली पावले. नदीवर मी उभा होतो. धो धो आवाज येत होता. जणू मला देवाचे बोलावणे येत होते. अनंत जीवन हाक मारीत होते. इतक्यात हाकाहाक ऐकली. फेकली उडी, वाचलो तर दोघे वाचू. नाहीतरी मीही जाण्याला उत्सुकच होतो. घो आवाज मला हाक मारीतच होता." तो तरुण म्हणाला.
“आस्तिक ऋषींच्या आश्रमात तुम्ही कधी गेला होतात का? ते नवसंस्कृती निर्मित आहेत. नाग व आर्य यांच्यात ऐक्य व्हावे म्हणून तो महात्मा पराकाष्ठा करीत आहे. त्यांना आपण साहाय्य करू या. जेथे जेथे द्वेष फैलावला जात असेल तेथे तेथे आपण स्नेह नेऊ या. कधी कधी मला वाटते की, प्रेमाची पताका खांद्यावर घ्यावी व नारदाप्रमाणे ब्रह्मवीणा हाती घेऊन ऐक्याची गीते गात निर्मळ वाऱ्याप्रमाणे विचरावे. स्नेहाचा ओलावा देत निर्मळ स्वच्छ झऱ्याप्रमाणे सर्वत्र धावावे, नाचावे परंतु माझे विचार मनात राहतात. कोणी समानधर्मा भेटलाच तर हे विचार प्रत्यक्ष मूर्ती रूप धारण करतील. आश्रमातील सदसतांच्या पलीकडच्या ब्रह्माचा मला वीट आला. कंटाळले मी ब्रह्मज्ञानाला. प्रत्यक्ष अनुभूती घ्यावयास मी उत्सुक आहे, जशी अनुभूती आज तुम्हाला मिळाली! दुसऱ्याच्या जीवनात मिळून जाण्याची अनुभूती!” वत्सला बोलून थांबली.
“ मी आता जातो. मला निरोप घेऊ दे." तो तरुण म्हणाला.
“आता कोठे जाणार? या गावात तुमची ओळख नाही. रात्रीचे कोठे जाणार? रात्री का प्रवास करणार? येथेच राहा रात्रभर जेबा व सकाळी जायचेच असेल तर जा. नाही म्हणू नका.” सुश्रुता म्हणाली.
*मी रात्रीही हिंडतो. मला भय ना भीती. नागाला भय वाटत नाही. घोर रानातही मी एखाद्या दगडावर खुशाल रात्री झोपतो. मला घर आवडतच नाही. घर संकुचित करते. घराचा कोंडवाडा मनाचा कोंडमारा करतो. आपण घरेदारे करू लागलो की, द्वेषमत्सर वाढू लागतात, आसक्ती वाढू लागते. आर्य घरेदारे करू लागले व नागांना हाकलून देऊ लागले. साऱ्या चांगल्या जमिनी आपल्याला पाहिजेत, असा त्यांचा हट्ट. आज नागांजवळ भांडतील, उद्या आपसात भांडतील. कुरुक्षेत्रावर भांडलेच ना! भांडवले व मेले. एकदा भांडणाची सवय लागली म्हणजे कोणीतरी भांडायला पाहिजेच असतो. एक दिवस मानवाला कळून येईल की, सर्वांनी मिळते घेऊन राहिले पाहिजे. स्वतः जगावे, दुसऱ्यास जगू द्यावे. सहकार्य करावे. परंतु केव्हा येईल तो दिवस ?” तो डोळे कोठेतरी भविष्यात नेऊन म्हणाला.
* मोठ मोठे वृक्ष क्षणात उगवत नाहीत. क्षणात उगवणारी झाडे क्षणात मरतात. भराभरा जन्मणारे जीवजंतू मरतातही भराभरा मोठी ध्येय, मोठे विचार वाढीस लागायला वेळच लागणार. सृष्टीचा हा नियमच आहे. तो लक्षात ठेवून धीराने वागले पाहिजे.” सुश्रुता म्हणाली.
“आजी, बाहेर बघ कसा सुंदर प्रकाश पडला आहे. पिवळा पिवळा प्रकाश! असा नव्हता कधी पाहिला. साऱ्या आकाशाला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे. बाहेर अंगणात या. बघा भव्य देखावा. इवलाही ढग कोठे दिसत नाही. झाडे बघ कशी दिसत आहेत! जणू सुवर्णाची वृष्टी होत आहे. कधी नव्हता असा देखावा मी पाहिला. " वत्सला नाचत व टाळ्या पिटीत म्हणाली.
“मी हिमालयात असा देखावा एकदा पाहिला होता. खाली स्वच्छ व शुभ्र बर्फ व वर पिवळे अनंत अंबर खाली चांदीरुप्याची शिखरे, वर सोन्याची छत्री!" तो तरुण म्हणाला.
"आपण नदीवर जाऊ. तेथे तर फारच सुंदर देखावा दिसेल. नदीमध्ये सुंदर प्रतिबिंब पडले असेल. नदी सोन्याची झाली असेल, झगमगीत दिसत असेल. येता तुम्ही? येतेस आजी?” वत्सलेने उत्कंठेने विचारले. “ तुम्ही जा. मी स्वयंपाक करते. काळोख पडण्यापूर्वी या.” सुश्रुता म्हणाली.
“यांना तर काळोखाचीही सवय आहे. अंधारातूनही ते प्रवास करतात. काळोखातही हे प्रकाश देतील. पडू लागले तर आधार देतील. धराल ना हो हात जर काळोख पडला तर?” वत्सलेने हसून विचारले.
“पाण्यात बुडून असताना पकडला; अंधारात पडत असताही पकडीन. चला पाहू लौकर. नाहीतरी मजा जाईल, असे सोने फार वेळ टिकत नाही. दैवी क्षण पटकन जातात. क्षणभर विश्वेश्वर महान वैभव दाखवतो. आपल्या वैभवाची मानवाला कल्पना देतो. मानवाला आपल्या सोन्याचंदीचा थोडा कमी गर्व वाटावा म्हणून ही सृष्टीची भव्य दर्शने असतात. आकाशातील साऱ्या ढगांचे जणू सोने झाले. एका महान सुवर्णरंगात सारी अभ्रखंडे रंगली. महान वस्तूसमोर विरोध मावळतात. आपणासही तीत विरून जावे असे वाटते. नाहीतरी आपण हास्यास्पद होतो. या सोन्यासारख्या आकाशात एखादा काळतोंडा मेघ जर अलग राहता तर आपणास तो आवडला नसता!!” तो तरुण म्हणाला.
“परंतु स्वतःचे अस्तित्व त्याला नसेल गमवायचे तर ! असेल तुमचे सोने, परंतु माझ्या जीवनाची मातीच मला मोल्यवान आहे असे कोणाला वाटण्याचा संभव आहे आणि शेवटी सोने म्हणजे तरी काय? मातीचाच परम विकास म्हणजे सोने! शेवटी सारे एकच आहे. एकरंगी दिसो वा नानारंगी दिसो. ह्या सर्व रंगांच्या पाठीमागे एकच शक्ती आहे. आकाशातील हे रंग बदलतील, परंतु पाठीमागचा अभंग निळा रंग कायमच आहे! नाही का? ती पाहा आली नदी. आपल्या पाठीमागून मुलेही येत आहेत." वत्सला म्हणाली.
नदीतीरावर वत्सला व तो तरुण उभयता उभी होती. वाचा कुंठित झाली होती. लहान मुले-मुली नाचत होती. त्यांची काव्यशक्ती जागृत झाली होती. मुलांची प्रतिभा अप्रतिहत असते. त्यांची कल्पना पटकन उडू लागते, बागडू लागते, आकाशातील देवदूतांची चित्रे लहान मुलांची काढतात, परंतु त्यांना पंख असतात. सपंख लहान मुले म्हणजे देवाचे दूत. मुले जन्मतात, तेव्हा त्यांना हे पंख असतात. परंतु हे पंख हळूहळू छाटले जातात. मुलांचा उड्डाण करणारा आत्मा खालीच डांबला जातो. वत्सला व तरुण ती दोघे मुकी होती. मुकेपणाने उचंबळत होती, स्थिरपणाने नाचत होती, न बोलता बोलत होती. चित्राप्रमाणे ती दोघे होती. चित्रात भावाचे मूक दर्शन असते. हृदयातील भावांचे मूक दर्शन वत्सला व तो तरुण ह्यांच्या मुद्रेवर उमटले होते. परंतु ती मुले? त्यांचा आनंद नाचण्यात व गाण्यात ओसंडू लागला. मुलांना मनात राखता येत नाही. ते देत असतात, प्रकट करीत असतात. ऐका त्या मुलांचे गाणे, पाहा त्यांचा नाच!
आभाळ झाले सोन्याचे सोन्याचे आभाळ आहे कोणाचे कोणाचे आभाळ झाले सोन्याचे सोन्याचे आभाळ देवबाप्पाचे बाप्पाचे सोन्याचा पडतो पाऊस पाऊस रुसून नको तू जाऊस जाऊस सोन्याचा पडतो पाऊस पाऊस नको भिकारी राहूस राहूस एका गाण्याने दुसऱ्या गाण्यास जन्म दिला. दिवा दिव्याला पेटवतो. एकदा एक दिवा लागला की लाखो लागतात. एक तारा दिसू लागताच मग लाखो दिसतात, एक फूल फुलले की मागून पखरण पडू लागते. सारा एकाचा पसारा. हे दुसरे गाणे मुली म्हणत आहेत, फेर धरून नाचत आहेत, गोड गोड
गाणे:
आले सोन्याचे गं पीक
आले सोन्याचे गं पीक
पोरी वेचायाला शीक
पोरी टिपायाला शीक
भरला सोन्याचा हा रंग झाले पितळे अपुले अंग
भरला सोन्याचा हा रंग
पोरी नाचामध्ये दंग
भरला सोन्याचा हा रंग
पोरी खेळामध्ये दंग
तुझा आटप बाई खेळ
घरी जाया होईल वेळ
आई मारित असेल हाक
पोटी वाटे मला धाक
येथे सोन्याचा हा पूर
घर राहिले माझे दूर
राही दूर अपुले घर
लुटू सोने पोटभर
पोरी पुरेल जन्मभर
गेले आकाशातले सोने थांबले आमचे बघा गाणे आकाशातील ती सुदामपुरी क्षणात अदृश्य झाली. सोने दिसेनासे झाले. मुलीचे गाणे संपले. जोवर सोने तोवर गाणे. मुलामुलींचे गाणे संपले. परंतु तो तरुण एकदम नाचू लागला व गाऊ लागला. तो त्या मुलांचे काही चरण म्हणत नाचू लागला.
सोन्याचा पडतो पाऊस पाऊस रुसून नको तू जाऊस जाऊस सोन्याचा पडतो पाऊस पाऊस नको भिकारी राहूस राहूस हे चरण तो म्हणत होता व नाचत होता.
“ आपण सारी नाचू या. या रे मुलांनो, उठा," वत्सला म्हणाली. “तुम्ही दोघे मध्ये उभी राहा. तुमच्याभोवती आम्ही फिरतो. तुम्ही जणू झाडे. आंब्यांची मोहरलेली झाडे. आम्ही जणू गुं गुं करणाऱ्या मधमाशा. तुम्ही जणू कमळे, आम्ही जणू भुंगे.” मुले म्हणाली. “आम्ही मध्ये उभी राहतो. तुम्ही नाचा व गाणे म्हणा." वत्सला म्हणाली.
मुलांना अपार उत्साह आला. तो तरुण व वत्सला मध्ये उभी होती. मुलांच्या तालात त्यांच्याही टाळ्या वाजत होत्या. त्या तरुणाने वत्सलेचा हात धरला. ती दोघे नाचू लागली. मुलांमध्ये नाचू लागली. नदीचे पाणी नाचत होते. आकाशात चांदण्या नाचू लागल्या. दूर दिवे नाचू लागले. मुले दमली. थांबला खेळ. थांबला का सुरू झाला ? नाच थांबला. थांबला का कायमचा सुरु झाला? वत्सला व तो तरुण याचे हात सुटले. सुटले की एकत्र चिकटले?
“कशी मजा आली. गंमत. तो कसा छान नाचत होता. जणू गोकुळातील कृष्ण! असाच नाचत असेल तो कृष्ण ” असे म्हणत मुलेमुली गावात चालली. परंतु तो कोण होता दूर उभा ? हा महान नाच चालू असताना तो नव्हता का नाचत? त्याला नाही का स्फूर्ती आली?
“कोण कार्तिक? असा रे का उभा? आज सोन्याचा पाऊस पडला.
वेचीना तो भिकारी. तू का नाही आलास नाचायला?” तिने विचारले. “नागाप्रमाणे आर्य नाचरे नाहीत. " तो म्हणाला.
“नागांना नाच प्रिय आहे. नागांचा देव गानप्रिय आहे, नृत्यप्रिय आहे. नाग देवांच्या यात्रांतून आम्ही नागमूर्तीसमोर गातो व नाचतो. खरोखरचे नागही येऊन तेथे डोलू लागतात.” तो तरुण म्हणाला.
" आणि आर्य अर्जुन तर उर्वशीजवळ नृत्य शिकला. श्रीकृष्ण भगवान तर नटराज होते. कार्तिक, नाचणे का वाईट? सारी सृष्टी नाचत आहे. वाऱ्याची लहर येताच पाने नाचू लागतात, लतावेली डोलू लागतात, पाणी उचंबळू लागते. ही आपली पृथ्वीसुद्धा म्हणे सूर्याभोवती नाचत आहे. आणि चंद्र पृथ्वीभोवती नाचत आहे. त्यांचा शिवाशिवीचा खेळ चालला आहे, असे आश्रमात आचार्य एके दिवशी सांगत होते. लपंडावाचा खेळ. पृथ्वीला सूर्य सापडत नाही, चंद्राला पृथ्वी मिळत नाही. चालत्या आहेत प्रदक्षिणा.” वत्सला म्हणाली.
“प्रदक्षिणा फुकट नाही जात. पृथ्वीला प्रकाश मिळतो, चंद्रालाही शोभा मिळते. प्रेमाची प्रदक्षिणा जीवनात प्रकाशच आणील.” तो तरुण
म्हणाला. " प्रकाश आला की अंधार आलाच बरोबर मला प्रकाशही नको व
अंधारही नको." कार्तिक म्हणाला. " जेथे प्रकाशही नाही व अंधारही नाही असे काय?" वत्सलेने विचारले.
“परब्रह्म. सर्व द्वंद्वांच्या ते अतीत आहे." तो म्हणाला.
“निर्द्वद्व! मला वीट आला त्याचा. ह्या नाचण्यातील ब्रह्मात आनंद आहे.
कधी चाखला आहेस का आनंद तू, कार्तिक!" तिने विचारले.
“ विष प्रत्येकाने चाखण्याची जरूर नाही." तो म्हणाला.
“परंतु एखादे वेळेस माहीत नसल्यामुळे गोड फळालाही कवंडळ समजून कोणी फेकून द्यायचा. एखादा विद्वान त्या फळाला मुकेल व एखादा रानटी ते चाखील." वत्सला म्हणाली.
“तू नाचतेस का माझ्याबरोबर? आता मुली नाहीत पाहायला. मुलांमुलींदेखत नाचायला मला लाज वाटत होती, ये, घर माझा हात. आपण नाचू.” कार्तिक पुढे होऊन म्हणाला.
“आता नको, आजीने लौकर यायला सांगितले होते. काळोख पडू लागला. चला जाऊ." वत्सला म्हणाली.
"तुझा मी हात धरतो. नाहीतर पडशील.” तो म्हणाला.
“ नाचणाऱ्याची पावले फारशी चुकत नाहीत. त्याला नीट पावले टाकायची सवय असते. परंतु धरायचाच असेल तर त्यांचा घर. ते या प्रदेशात नवीन आहेत. आपल्या गावात कधी आलेले नाहीत. घर त्यांचा हात.” वत्सला म्हणाली.
“मी या गावाला परका नाही. सर्व जगात या गावाइतका परिचित मला दुसरा गाव नाही. या नदीइतकी परिचित दुसरी नदी नाही. या टेकडीइतकी परिचित दुसरी टेकडी नाही." तो तरुण म्हणाला.
“या मुलीइतकी दुसरी परिचित मुलगी नाही.” कार्तिक हसून म्हणाला.
“हो. खरे आहे ते. माझी कोठे ओळखच नाही. मी एके ठिकाणी घटकाभरही राहत नाही. या गावातच आज दिवसभर राहिलो. माझ्या जीवनात अमर होणारे गाव." तो तरुण म्हणाला.
“तुमचे नाव काय? तुमचा गाव कोठेही नसला तरी तुमचे नाव तरी असेलच. सांगा तुमचे नाव. ते नाव अमर होऊ दे माझ्या जीवनात. " वत्सला म्हणाली.
“माझे नाव नागानंद." तो तरुण म्हणाला.
“नागानंद वत्सलानंदही आहे. नागानंद! सुंदर नाव! सारी काव्ये ह्या नावात आहेत. सारे संगीत ह्या नावात आहे. कार्तिक, गोड आहे नाही नाव?" तिने विचारले.
“जे आपल्याला आवडते ते गोड लागते. जो आपल्याला आवडतों
त्याचे सारे गोड लागते." तो म्हणाला.
“ कार्तिकही सुंदर नाव आहे. कृत्तिका नक्षत्रांचा पुंजका कार्तिक महिन्यात किती सुरेख दिसतो! जणू मोत्यांचा पुंजका, जणू हिरेमाणकांचा घड! कृत्तिकांच्या नक्षत्राकडे मी फार बघत असे. आश्रमात असताना मी सर्वांचे आधी स्नानाला जात असे. स्नान करीत असताना त्या कृतिकांकडे बघत असे! जणू पुण्यवान आत्म्यांची सभाच भरली आहे. मला नाव नव्हते प्रथम माहीत. परंतु आचार्यांनी सांगितले.” नागानंद म्हणाला.
“ तुम्ही का आश्रमात होतात? नागांना आश्रमात राहणे आवडते ?” कार्तिकाने विचारले.
“जे जे सुगंधी आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे ते नागाला आवडते. नाग
सौंदर्यपूजक आहे, संगीतपूजक आहे, सत्यपूजक आहे." नागानंद म्हणाला “किती दिवस होतात आश्रमात ?” वत्सलेने विचारले.
“होतो काही दिवस. नंतर सोडून दिला. " तो म्हणाला.
“ का सोडलात?" कार्तिकाने विचारले. “सर्व ज्ञानाची किल्ली सापडली म्हणून." तो म्हणाला.
"कोणती किल्ली?” वत्सलेने विचारले.
“प्रेममय सेवा.” त्याने उत्तर दिले.
“म्हणजे काय?” वत्सलेने विचारले.
“पृथ्वीचे ज्ञान हवे असेल तर तिच्या हृदयात शिरा. तिला खणा. वृक्षाचे ज्ञान हवे असेल तर त्याला पाणी घाला. त्याच्या जीवनातील सौंदर्य कळून येईल. ताऱ्यांचे ज्ञान हवे असेल तर प्रेमाने रात्रंदिवस त्यांच्याकडे बघा. माणसाचे अंतरंग समजून घ्यावयाचे असेल तर प्रेमाने त्यांच्या उपयोगी पडा. नागात म्हण आहे ‘जमीन पाहावी कसून व माणूस पाहावा बसून.' जमीन चांगली की वाईट ते तिची मशागत केल्याने कळते. माणूस चांगला की वाईट ते त्याच्या सान्निध्यात राहिल्याने कळते. नुसते सान्निध्य नको, स्नेहमय सान्निध्य हे. तरच अंतरंग प्रतीत होते." नागानंद म्हणाला.
“तुम्हाला काय काय येते?" कार्तिकाने विचारले.
“ मला महापुरात पोहता येते, मला तीर मारता येतो, भाला फेकता येतो, मला शेती करता येते, बासरी वाजविता येते, फुले फुलविता येतात. वेलीच्या व गवताच्या सुंदर टोपल्या करता येतात. आश्रमात असताना मी तेथील गुरुदेवांना एक सुंदर गवताची परडी विणून दिली होती. किती सुकुमार व मजेदार होते ते गवत!” नागानंद म्हणाला.
“कोणी शिकवले टोपल्या करायला?" कार्तिकाने विचारले.
“माझ्या आईने.” तो म्हणाला.
“तुमच्या आईने आणखी काय शिकविले तुम्हाला?” कार्तिकाने प्रश्न केला.
“दुसऱ्यासाठी मरायला. दुसऱ्यासाठी श्रमायला." तो म्हणाला. "कोठे आहे तुमची आई ?” वत्सलेने विचारले.
“नागलोकी गेली. देवाघरी गेली.” तो म्हणाला.
“कशाने मेली ती ?" तिने कनवाळूपणाने विचारले.
“ अंगावर वीज पडून. एकदा भर पावसाळा होता. आमच्या गावी एक बाई आजारी होती. ताप होता तिच्या अंगात. फार ताप. आम्ही शीतळादेवीची गाणी म्हटली. परंतु ताप हटेना. तिला वाटले की, आपण मरणार. नागदेवाकडे जाणार. तिचा मुलगा दुसऱ्या गावी होता. मुलाला भेटायची तिची इच्छा होती. परंतु कोण जाणार निरोप घेऊन? माझ्या आईजवळ ती म्हणाली, “तुम्ही माता आहात. मातृहृदय तुम्ही जाणता. तुम्ही जा व माझ्या मुलाला घेऊन या." माझी आई निघाली. मी घरी निजलेला होतो. मी एकटाच होतो. आईने मला उठवले नाही. ती मध्यरात्री निघाली. मुसळधार पाऊस पडत होता. आकाश धरणीमातेला भेटण्यासाठी वाकत होते. संपूर्णपणे भेटण्यासाठी टाहो फोडीत होते, रडत होते. मुलांसाठी माता रडत होती. त्या मातेसाठी माझी आई जात होती. अंधाराला वाट विचारीत जात होती. झगझग करणाऱ्या विजेला वाट विचारीत होती. सकाळी मी उठलो, तो आई जवळ नाही. मी त्या तापाने फणफणणाऱ्या आईकडे गेलो. तिने सांगितले सारे, बराच वेळ झाला तरी आई येईना. मला धीर निघेना. इतक्यात त्या मातेचा मुलगा गावाहून आला. धावतच आला. त्याची आई उठली व तिने त्याला जवळ घेतले. परंतु माझी आई कोठे होती? मला जवळ घेणारी आई कोठे होती? त्या मुलाने सांगितले की, ती दोघे बरोबर येत होती. परंतु अंधारात पावसातून येता येता रस्ता चुकला. त्याने एका ठिकाणी थांबून हाका मारल्या. परंतु उत्तर मिळाले नाही. येईल मागून असे समजून तो आला निघून. परंतु आई आली नाही. मी कावराबावरा झालो. त्या बाईचा मुलगा व मी पाहावयास निघालो. पाऊस थांबला होता. वाटोवाट झाडे पडली होती, माझी आई एके ठिकाणी पडलेली दिसली ! परंतु तिच्यात प्राण नव्हता. मी तिला मिठी मारली. परंतु ती हसेना, उठेना. तो म्हणाला, 'वीज पडली अंगावर' माझी आई गेली. दुसऱ्या एका मातेच्या जीवनात आनंद ओतण्यासाठी ती मरण पावली. त्या प्रळयकाळच्या रात्री ती भ्याली नाही. हृदयात अपार सेवा भरलेली असली की, सर्वत्र मित्रच दिसतात. अंधार मित्र वाटतो, काटे फुलांप्रमाणे वाटतात, संकट सखा वाटते, माझी आई ! माझी आई! कधी भेटेल पुन्हा माझी आई !” नागानंदाने करुण असा प्रश्न केला.
क्षणभर सारी गंभीर होऊन उभी राहिली. “शीतळादेवीची गाणी म्हणता म्हणजे काय करता?" वत्सलेने विचारले.
“आम्ही झाडांचे पल्लव तोडून आणतो. पानांचे द्रोण करून त्यात पाणी भरतो. नंतर गाणी म्हणत आजाऱ्याभोवती फिरतो. पल्लवांनी द्रोणांतील पाणी शिंपडतो.” नागानंदाने सांगितले.
“त्यातील एखादे गाणे म्हणा ना." ती आग्रहपूर्वक म्हणाली.
नागानंद गाणे म्हणू लागला. वत्सला व कार्तिक ऐकत होती. शांत
वाहणारी शीतल नदी ऐकत होती. त्या टेकडीवरील निःस्तब्ध शांतताही ऐकत
होती.
(चाल - आरती मंगळागौरी)
ये गं शीतलाई
प्राणी मारतो तापे कर तू घाई । । ये ।।
हिमालयामधले सोडून येई घर
सोडून येई सागर नद्या नि निर्झर
वृक्षवेलीलतांमधून ये भरभर । । ये. ।।
तुषारांतून येई लाटांमधून येई
पानांमधून येई पाण्यांमधून येई
चंदनांतून येई जंगलातून येई । । ये. ।।
राईतून येई दरीतून येई
आरसपानी पाषाणांतून तू येई
दवांतून येई दह्यांतून येई । । ये. ।।
तळमळे रोगी थांबव त्याची आग
जे जे पाहिजे असेल ते ते आई माग
तुझे आई भक्त आम्ही सारे नाग । । ये ।।
आली आली आई घाला रे वारा
आली आली आई उडवा जलधारा
ताप पळून जाईल क्षणात हा सारा । । ये. ।।
“साऱ्या शीतल पदार्थांतून शीतलाईला आवाहन केले आहे. वेदांतसुद्धा अशा प्रकारचे मंत्र आहेत. " कार्तिक म्हणाला.
“साऱ्या शीतल पदार्थांतून शीतलाईला आवाहन केले आहे. वेदांतसुद्धा अशा प्रकारचे मंत्र आहेत. " कार्तिक म्हणाला.
“मानवी मन सर्वत्र एकच आहे. वरची कातडी गोरी असो की काळी असो. आतील भुका त्याच असतात. आतील आशा-आकांक्षाचे, नाना कल्पनांचे, वासनाविकारांचे प्रकार समानच असतात." नागानंद म्हणाला. “आपण येथेच उभे राहिलो! घरी जाऊ म्हटले नि बोलत उभेच राहिलो.
आई वाट पाहत असेल. " वत्सला म्हणाली. “ का गेली चोराबरोबर पळून अशी शंका येईल तिला.” कार्तिक म्हणाला.
"मी जातोच येथून पळून." नागानंद म्हणाला.
“माझ्या आईची शपथ, माझ्या प्राणाची शपथ, जाऊ नका." वत्सला म्हणाली.
" तिघे परतली.
“थांबा, तुमचा मी हात धरते. पडाल हो." वत्सला म्हणाली.
तिने एका हाताने नागानंदाचा हात धरला व दुसऱ्या हाताने कार्तिकचा घरला.
“तुम्ही दोघे दोहो बाजूस मला नका ओढू. मी तुम्हाला ओढून नेते. तुम्ही मुकाट्याने या. तुम्ही माझ्या ताब्यात. जणू चोर पकडले दोघे !” ती हसून म्हणाली.
“चोर पळू बघतो. मुकाट्याने येत नाही.” नागानंद म्हणाला.
“सैल सोडले तर पळू बघतो. घट्ट बांधून नेले तर मग गडबड करीत नाही. कार्तिक पुरा कैदी झाला आहे. त्याला धरले नाही तरी नीट पाठोपाठ येईल, बरोबर येईल. तुम्हालाच घट्ट धरून नेते. तुमचे दोन्ही हात पकडून धरून नेते." ती म्हणाली.
“ स्त्रियांच्या एका हातात पुरुषांचे दोन हात पकडण्याची का शक्ती असते?” हसून नागानंदाने विचारले.
“असे एखादे सुकुमार फूल महान नागाला गुंगवून टाकते. त्या लहानशा फुलाला सुगंधात सापाची महान फणा खाली वाकविण्याची शक्ती असते. तुम्ही तर पाहिला असेल हा प्रकार." तिने हात आवळून म्हटले.
“पाहिला आहे. आता अनुभवतही आहे." तो म्हणाला. “ कार्तिक, कोठे आहे कार्तिक ? गेला वाटते? तो वडिलांना फार भितो.
मला नाही भित्री माणसे आवडत. मला आगीशी खेळणारी माणसे आवडतात. आज नदीला पाणी चढत होते. मी कार्तिकला हाक मारीत होते. मरणाशी खेळलो असतो. नदीच्या जबड्यात शिरलो असतो व बाहेर आलो असतो. परंतु कार्तिक कचरला. तुम्ही कशी घेतली उडी, फेकलेत जीवन ! जीवन
कुरवाळणारा मला नाही आवडत." ती म्हणाली. " परंतु माझा हात तर कुरवाळीत आहेस." तो म्हणाला.
“बोलण्यात विसरले. आता पकडते घट्ट. नाग असे घट्ट विळखे घालतो
की मग तोडून काढावा लागतो. तशी माझी ही पकड कोण सोडवतो बघू. वत्सलेची वज्राची पकड असते." ती म्हणाली.
दोघे घरी आली. सुश्रुता अंगणात बसली होती.
“आलो, आजी. अंधारात झाली फजिती. हे भलतीकडेच गेले. मग आणले मी यांना शोधून. तू वाट पाहत होतीस ना !” वत्सलेने आजीजवळ जाऊन विचारले.
“सोने लुटायला गेली होतीस. म्हटलं जड झाले बहुधा तुम्हाला ! थोडे आणावे म्हणजे जड होत नाही. देवाने दिले म्हणून अधाशाप्रमाणे फार नये घेऊ. नाहतरी फाटायची झोळी व सारेच धुळीत जायचे. फार नाही ना लुटलेत सोने?" आजीने हसून विचारले.
“आजी, सोने दिसते व नाहीसे होते.” नागानंद म्हणाला.
“परंतु स्मृती अमर राहते.” आजी म्हणाली.
“आता, आजी, भूक लागली आहे. फार भूक. जन्मात नव्हती लागली एवढी भूक. माझ्या अंगाला जणू भूक लागली आहे. डोळ्यात भरावा घास, कानात भरावा घास, नाकात भरावा घास, तोंडात भरावा घास ! वणवा पेटला आहे, आजी, भुकेचा. येईपर्यंत कळलेही नाही. वाढ, लवकर वाढ. नाहीतरी खाईन तुला, खाईन यांना.” वत्सला वेड्याप्रमाणे बोलू लागली.
“वेडे वेडे नको बोलू. चल घरात. चला हो तुम्हीही. ही अशीच आहे फटकळ. कधी मुकी बसते तर कधी तोंडात सारी पुराणे येऊन बसतात. वेडी आहे वत्सला. आश्रमात राहूनही वेडी.” सुश्रुता म्हणाली.
“ आश्रमात राहून वेडीच बनतात. जगाच्या आश्रमात राहून शहाणपण येते.” नागानंद म्हणाला.
“शहाणपणा देणारा एकच आश्रम आहे.” सुश्रुता म्हणाली.
“कोठे आहे तो?” वत्सलेने विचारले.
“काय त्याचे नाव ?” नागानंदाने विचारले. “गृहस्थाश्रम." सुश्रुता गंभीरपणे म्हणाली.