shabd-logo

तीन

12 June 2023

2 पाहिले 2
राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये समोरासमोर उभी आहेत. अर्जुनाने 'रथ हाकल' म्हणून श्रीकृष्णास सांगितले, रथ हाकलल्यावर अर्जुन रथात उभा राहून सर्वत्र जो पाहू लागला तो त्याला महान कुलक्षय दिसू लागला, 'युद्ध नको' तो म्हणू लागला. हातातील गांडीव गळून पडले. अशा प्रसंगाचे एक सुंदर चित्र तेथे होते. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांस तहान लागते, तेव्हा अर्जुन बाण मारून पाताळातील गंगा वर आणतो व तिची धार त्यांच्या मुखात सोडतो, तो प्रसंग तेथे चितारलेला होता. श्रीकृष्ण भगवान गोकुळात गाई चारीत असल्याचा मनोहर प्रसंग तेथे होता. शिष्टाई करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा आले होते त्या वेळेचेही एक चित्र होते. उर्वशी अर्जुनाला स्वर्गात मोह पाडते त्या प्रसंगाचे एक चित्र होते, विराटाच्या दरबारात धर्मराजाचा राजा विराट फासा मारतो व धर्मराज ते रक्त खाली पडू न देता अंजलीत धरतो तो प्रसंग तेथे होता. वीर अभिमन्यू एकटा कर्ण-द्रोणांजवळ लढत आहे असे एक सुंदर चित्र तिथे होते. अर्जुनाने खांडववन जाळून अग्नी नावाच्या ऋषीला अर्पण केले व तो ऋषी अर्जुनास 'विजयरथ' प्रसन्न होऊन देत आहे, तो प्रसंग फारच अप्रतिम रंगविला होता. ती चित्रशाळा म्हणजे चित्रमय इतिहास होता. त्या चित्रांच्या दर्शनाने नाना भावना मनात उत्पन्न होत. कधी करुण भावना उचंबळून डोळे ओले होत, तर कधी अंगावर काटा उभा राही. कधी वीररस मनात संचरे, तर कधी गंभीर भाव हृदयात भरे. त्या महान विभूती डोळ्यांसमोर उभ्या राहत, सत्त्वशील धर्मराजा, पराक्रमी असूनही कृष्ण शिष्टाईस निघतो तेव्हा त्याला 'देवा, शक्य तो युद्ध टाळ' असे सांगणारा दिलदार भीम, वीरशिरोमणी सुभद्रापती अर्जुन, ते प्रेमळ व अत्यंत सुंदर नकुल-सहदेव, ती कारुण्यमूर्ती परंतु तेजस्विनी द्रौपदी, तो अमर अभिमन्यू, ती पतिव्रता गांधारी- जिने पती अंध म्हणून स्वतःच्याही दृष्टिसुखाचा त्याग केला, तो स्वाभिमानी दुर्योधन, भीमाच्या गदेने मांडी मोडून पडला असताही “माझे काय वाईट झाले? क्षत्रियाला मरण आहेच. मी साम्राज्य भोगले. भीमासारख्यांच्या हाती पोळपाट दिला, अर्जुनाला बृहन्नडा बनविले. आणखी काय मला पाहिजे?” असे त्याचे उद्गार ! तो धीरवीर कर्ण, उदारांचा राणा! ते धृतव्रत इच्छामरणी महान भीष्म ! ते कृतान्ताप्रमाणे लढणारे परंतु पुत्र मेला असे कळताच मरणाला मिठी मारणारे प्रेमळ द्रोण ! नकुलसहदेवांचे सख्खे मामा असूनही आधी दुर्योधन आला म्हणून त्याच्या मदतीस जाणारे शल्य, आणि ते कर्मयोगी भगवान श्रीकृष्ण, त्यांचा तो सखा विदुर व पांडव वनात असता विदुराकडे दारिद्रयात राहणारी ती स्वाभिमानी कुंती! प्रणाम! त्या महान स्त्रीपुरुषांना प्रणाम ! केवढी वैभवशाली पिढी ! परंतु ती सारी कुरुक्षेत्रावर कापली गेली. कारण काय तर भाऊबंदकी! भारतवर्षातील लाखो क्षत्रिय तेथे या ना त्या बाजूस लढून धारातीर्थी पडले. लाखो स्त्रिया पतिहीन झाल्या. लाखो अर्भके पितृहीन झाली!

परीक्षितीने ते महाभारत तेथे रंगात उतरवून घेतले होते. अश्रूंचे व रक्ताचे महाभारत तेथे नाना रंगांत लिहिलेले होते. मुके रंग, मुक्या आकृती, मुके प्रसंग! परंतु त्या मुकेपणात सहस्र जिव्हा होत्या. परीक्षितीस कंटाळा आला, कधी विमनस्कता वाटली म्हणजे तो चित्रशाळेत येई. तेथे तो रमे. क्षणभर वर्तमानकाळ विसरून भूतकाळात बुडून जाई.

एका चित्राजवळ तो उभा होता. सजल नयनांनी ते तो पाहत होता. माता उत्तरा सती जाऊ म्हणत होती. धर्म, भीम, अर्जुन, सुभद्रा सारी शोकात होती. अशावेळी कृष्णासखा उत्तरेला समजावीत आहे, परावृत्त करीत आहे, असा तो प्रसंग होता. परीक्षितीला तो प्रसंग पुनःपुन्हा पाहावासा वाटे.

हलक्या पावलांनी कोण आले ते आत? प्रसन्न नाही त्याची मुद्रा. मुखावर माणुसकी नाही दिसत. क्रूर दिसतो आहे हा माणूस. कपटी दिसतो आहे हा माणूस. कोण आहे हा?

“काय पाहता एवढे, महाराज, त्या चित्रात?" त्याने विचारले. “कोण वक्रतुंड, तुम्ही केव्हा आलात?" परीक्षिती वळून म्हणाला.

“बराच वेळ झाला. मी आपली राजनीतिगृहात वाट पाहत होतो. शेवटी भृत्यांना विचारिले. येथे आहात असे कळले. आपल्या कृपेने मला कोठेच प्रतिबंध होत नाही. आलो येथेच. परंतु आपणाला बरे नाही का वाटत आज? असे डोळे का भरून आले?” वक्रतुंड गोड बोलत होता.

“वक्रतुंड, हे चित्र मी अनेकदा पाहतो. आई जर सती गेली असती तर माझा जन्मही झाला नसता. मी जन्मलो खरा, परंतु आईचे हास्य मी कधीही पाहिले नाही. जिवंत असून ती मृताप्रमाणे राही. तिचे मन तिच्या शरीरात नव्हते. तिचे विचार, तिच्या भावना, तिचा आत्मा हे जणू केव्हाच निघून गेले होते. आई रोज क्षणाक्षणाला सती जात होती. हरघडी भाजून निघत होती. माझ्यासाठी ती राहिली. अभागी मी. मी आईच्या गर्भात आलो आणि प्रतापी माझे वडील मी मारले. मी अपशकुनी आहे, अभद्र आहे, जन्मताही पुन्हा मेल्यासारखा जन्मलो. परंतु कृष्णदेवाने सजीव केले. हे चित्र म्हणजे माझी जन्मकथा, हे चित्र म्हणजे मी जन्माला येणे. परंतु जन्मून तरी काय केले ?” परीक्षिती थांबला.

“काही केले नसशील तर कर. काहीतरी अपूर्व करावे. नवीन तेजस्वी असे करावे. राजा, कितीतरी दिवसांत माझ्या मनात विचार खेळत आहेत. परंतु ते अद्याप कोणाला पटत नाहीत. मी सर्वत्र प्रचार करून राहिलो आहे. परंतु राजसत्तेची जोड मिळाल्याशिवाय सारे व्यर्थ असते. 'यथा राजा तथा प्रजा.', 'राजा कालस्य कारणम्' ही वचने खरी आहेत. राजा म्हणजे प्रजेचे दैवत. ‘प्रजेतील सारे मांगल्य, सारे पुण्य राजाच्या ठायी असते.' असे म्हणतात. एका दृष्टीने ते खरेही आहे. कारण पूर्वी प्रजाच राजाला नेमी ! म्हणजे प्रजेचीच पूंजीभूत मूर्ती म्हणजे राजा. राजा म्हणजे आपलाच आवाज, आपलेच ध्येय, आपल्याच आशा-आकांक्षा असे प्रजा पुढे मानू लागली. समाजात राजशासनाचा सर्वात अधिक परिणाम होत असतो. राजाचे जे विचार असतात त्यांना राजपुरुष प्रमाण मानतात. राजाचे प्रधान, सेनापती, सर्व क्षेत्रांतील सारे सेवक राजाला जे आवडते ते करतात. प्रजेचा संबंध ह्या सर्व कर्मचाऱ्यांशी प्रत्यही येतो. ह्या कर्मचाऱ्यांची कृपा असावी असे प्रजा इच्छित असते. म्हणून प्रजाही आपले विचार त्या कर्मचाऱ्यांच्या विचारांप्रमाणे ठेवते. जर कोणी त्या विचारांविरुद्ध वागणारा, बोलणारा निघाला तर कर्मचारी त्याचे शासन करतात. त्याला देशत्याग करायला लावतात, त्याला देहदंड देतात. म्हणून शेवटी 'जसा राजा तशी प्रजा' हे म्हणणे खरे होते. माझ्या विचारांचा तू का होत नाहीस? मी तुझ्याजवळ पूर्वी बोललो होतो. ह्या नागजातीचे उच्चाटनच केले पाहिजे. तू सर्व आर्यात ह्या कल्पनेचा प्रसार कर. जे जे राजे तुझे मांडलिक असतील त्यांनाही ह्या विचाराची दीक्षा दे. जे इतर राजे तुला भीत असतील, तुला मानीत असतील, त्यांनाही ह्या नवसंघटनेत घे. राजा, आर्यरक्त शुद्ध राहिले पाहिजे. कितीतरी आर्य- तरुण नागतरुणींशी निशंकपणे विवाह लावीत आहेत. परंतु हेही एक वेळ राहू दे, अरे, आता आर्यकन्या नागतरुणांशी विवाहबद्ध होत आहेत. मला असे वाटू लागले आहे की, मुलांची लग्ने आईबापांनी लहानपणीच करावी, म्हणजे हे अतिरेक बंद होतील. परंतु माझे हे म्हणणे ऐकून लोक हसतात. अनेक आश्रमांतून मी तेथील कुलपतींजवळ चर्चा केल्या, परंतु बालविवाह त्यांना पटत नाहीत. 'लग्न म्हणजे गंमत नव्हे' असे ते म्हणतात. परंतु आजच माझ्या मते लग्नाची गंमत झाली आहे. वाटेल त्याने उठावे व वाटेल त्याच्याशी लग्न लावावे. हा का गंभीरपणा ? राजा, तू एक आज्ञापत्र काढ की, आर्यकन्यांनी नागांशी विवाह करू नये. नागतरुणांनीही आर्यकुमारीकांजवळ लग्न लावण्याचे धाष्टर्य करू नये. मला हा संकर बघवत नाही. आर्यांची संस्कृती उच्च, नागांशी मिश्रणे होत असल्यामुळे आर्यसंस्कृतीचाही अधःपात होत आहे. आर्यांच्या संस्कृतीचा प्रसार झाला पाहिजे. ठायीं ठायीं आमच्या आर्यांच्या वसाहती झाल्या पाहिजेत, आमच्या संस्कृतिप्रसाराचे आश्रम निघाले पाहिजेत. पूर्वी ही कामे करणारे ध्येयवादी पुरुष कितीतरी असत. परंतु आज सारा गोंधळ होत आहे. उदारपणाच्या नावाखाली भ्रष्टाकार होत आहे. ह्या नागांचे भस्म करावे असे वाटते, परंतु माझ्या एकट्याच्या मनात येऊन काय होणार?” वक्रतुंड थांबला.

“वक्रतुंड, तुम्ही बरेच दिवसांपासून हे मला सांगत आहात. परंतु अजूनही तुमचे विचार सर्वस्वी मला पटत नाहीत. माझ्याच आजोबांनी नागकन्यांजवळ नव्हते का विवाह लाविले? उलूपी व चित्रांगी ह्या नागकन्याच होत्या. त्यांना जर हे संबंध निषिद्ध वाटते तर त्यांनी असे केले नसते.” परीक्षिती म्हणाला.

“राजा, अर्जुनाने त्या नागकन्यांशी विवाह लाविला खरा, परंतु त्यांना इंद्रप्रस्थास त्याने कधी आणले नाही. सुभद्रेचा, द्रौपदीचा मान त्यांना कधी दिला नाही. अशा संबंधांना ते प्राचीन आर्य श्रेष्ठ मानीत नसत. वीरांची ती करमणूक होती. ज्या वेळेस बभ्रुवाहन अश्वमेधाच्या त्या प्रसंगी अर्जुनास सामोरा आला त्यावेळी अर्जुन काय म्हणाला ? 'तो अभिमन्यू, तो खरा माझा पुत्र. माझा पुत्र म्हणून तू मिरवत जाऊ नकोस! कोल्ह्याने सिंहाचा छावा होण्याची व्यर्थ आकांक्षा धरू नये.' ते उद्गार ऐकून बभ्रुवाहन संतापला. त्याला आईचा अपमान वाटला. मग तुंबळ रणकंदन झाले. तुझे आजोबा नागकन्यांजवळचे ते संबंध कोणत्या रीतीने मानीत, त्यांना कितपत महत्त्व देत ते ह्यावरून कळून येईल. हेच त्या भिंतीवरचे चित्र पाहा. तुझे आजोबा खांडववन जाळीत आहेत. नर्मदेच्या तीरावर तक्षककुळातील नागांची केवढी वसाहत होती! परंतु त्या महान अग्नीला तेथे आश्रम स्थापावयाचा होता. नद्या म्हणजे वसाहतीच्या जागा. सर्व नद्यांच्या तीरावर आर्यांचे आश्रम झाले पाहिजेत, असे महर्षी अग्नीला वाटे. आश्रमापाठोपाठ वस्ती होते. सुपीक प्रदेश आपले होतात. ते तक्षककुळातील नाग जात ना. तेव्हा तुझ्या प्रतापी आजोबांनी ती सारी वसाहत भस्म केली, महषीं अग्निंची इच्छा त्यांनी पूर्ण केली. आणि त्या मानधन ऋषीने हा 'विजयरथ' अर्जुनाला दिला. ह्या विजयरथाचा असा हा इतिहास आहे. नागजातीवर मिळविलेला विजय, तेच पूर्वजांचे काम तू पुढे चालव. अरे, श्रीकृष्णानेसुद्धा मथुरावृंदावनातून, त्या सुपीक गंगा-यमुनांच्या प्रदेशातून नागांना दूर जाण्यास सांगितले. तो कालिया जात नव्हता. मोठा बलाढ्य होता. यमुनेच्या मध्यभागी विलासमंदिर बांधून राहत होता. वृंदावनातील जनतेस सतावी. शेवटी श्रीकृष्णाने त्याचा गर्व जिरविला. त्याच्या छातीवर श्रीकृष्ण बसले. शेवटी त्याने जीवदान मागितले. त्यांच्या बायका पदर पसरू लागल्या. कृष्णा म्हणाला, येथून जा. लांब समुद्रकाठी जा. हा प्रदेश सोड.' तिकडे समुद्रतीरी राहणाऱ्यांना प्रतापी आर्यवीर गरुड सळो का पळो करीत होता. कालिया म्हणाला, 'समुद्रतीरी गरुड आहे. तो मारील!' कृष्णाने आश्वासन दिले की, 'मी गरुडाला 'त्रास देऊ नको' असे सांगेन, परंतु येथून जा.' परीक्षिती, असा हा पूर्वजांचा इतिहास आहे. नागांना हाकलून देण्याचा इतिहास आहे. तुझ्या आजोबांनी जे केले, आजोबांच्या प्रिय मित्राने कृष्णाने जे केले, तेच तू कर. तुझे ते जीवितकार्य. त्यासाठी तू जन्मलास. जन्मतःच मरत असताना वाचलास. नागसंहारक हो. तू तू एकदा हे काम हाती घेतलस म्हणजे बघ कसा परिणाम होतो तो! त्या अस्तिकाचे हातपाय मग गारठतील. तो समन्वयवादी आहे. संग्राहक मताचे तो समर्थन करतो. संग्राहक मत! पोटात का कोणी वाटेल ते कोंबील? पोटात पुष्टी देणारे अन्नच दडवले पाहिजे. तेथे काटे कोंबू तर मरू. जे स्वतःला पोषक आहे त्याचाच संग्रह केला पाहिजे. स्वतःच्या संस्कृतीस मारक आहे त्याचा त्यागच केला पाहिजे.” वक्रतुंड त्वेषाने बोलत होता.

"अस्तिकांबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. त्यांना पाहताक्षणी पवित्र झाल्यासारखे वाटते. त्यांच्या आश्रमात मी एकदा गेलो होतो. वाटे तेथून जाऊच नये. राज्यपदाचा त्याग करून तेथेच राहावे. परंतु त्यांनी सांगितले की, राजा राहून संन्यासी हो. सर्वांचे कल्याण पाहा. मानवधर्माचा उपासक हो, आपल्या सर्वांचा पूर्वज जो मनू, आपल्या संस्कृतीचा आद्य संस्थापक जो मनू भगवान, त्याने जे धर्मसूत्र लिहिले त्याला त्याने मानवधर्मसूत्र असे नाव दिले.' आस्तिकांनी ही गोष्ट सांगितली. मला कौतुक वाटले. आस्तिकाच्या आश्रमात गेलो की, त्यांच्याप्रमाणे वाटते. तुमच्याजवळ बसलो म्हणजे तुमचे खरे वाटते. अनार्यांचा कधीकधी मला तिटकारा येतो. कोणी प्रेतांना पूजतात, कोणी भुतांना भजतात! कोणी झाडांना प्रदक्षिणा घालतात, कोणी नागासारखे सापांचीच पूजा करतात! कोणी कोणी तर लिंगपूजकही आहेत. जननेंद्रियांच्या पाषाणमयी प्रतिमा करून त्यांचीच ते पूजा करतात. मला हे सारे किळसवाणे वाटते. आम्ही आर्यही त्यांच्याप्रमाणे बावळटपणा करू लागलो आहोत. तेजस्वी सविता हा आमचा वास्तविक खरा देव ! ज्ञानाची उपासना करणे हा आमचा धर्म ! 'ज्ञान म्हणजे परमेश्वर' अशी आमची व्याख्या. परंतु आम्हा आर्यांचा तो महान धर्म धुळीत जाणार काय? अमृतत्वाची ध्वजा हातात घेऊन उगवणारी उषा, तिचे पूजन सोडून दगडांची का पूजा आम्ही करीत बसणार? भगवान आस्तिकांना याविषयी काय वाटते ते मी विचारणार आहे. " परीक्षिती म्हणाला.

“अरे, त्यांच्या आश्रमात नको जाऊ. विश्वप्रेमाची गोड गोड भाषा ते बोलतात व आपण गुंगून जातो. माणसाने डोके आकाशाला भिडविले तरी पाय जमिनीलाच चिकटलेले असतात. व्यवहार पाहावाच लागतो. शेवटी जगात संस्कृती टिकायची असते. संस्कृतीचा नीट विकास व्हावा म्हणून आपण जगले पाहिजे. शेतातील धान्य वाढावे म्हणून, तृण आपण उपटून फेकून देतो. मोत्यासारखे, सोन्यासारखे धान्य तृणावर करुणा करू तर मिळेल का? जे उच्च आहे, त्याच्या विकासासाठी नीचाने नष्ट झाले पाहिजे. आर्यांची संस्कृती वाढावी, आर्यांचा समाज सर्वत्र पसरावा, आर्यांच्या मुलाबाळांना राहायला नीट घरदार असावे, सुंदर शेतीभाती असावी, यासाठी अनार्यांनी नष्ट झाले पाहिजे. त्यांना आपण सामावून घेऊ शकणार नाही. त्यांच्यात व आपल्यात काडीचे साम्य नाही. त्यांच्याशी मिळते घेणे म्हणजे आपण खाली येणे. दुसऱ्याला तारायचे असेल तर त्याच्याबरोबर बुडून कसे चालेल? आपण अलग राहिले पाहिजे. राजा, तो आस्तिक मोठा बोलघेवडा आहे. त्याने आर्य व नागतरुणांना प्रेमाचा उपदेश चालविला आहे. 'एकत्र नांदा, परस्परांचे चांगले घ्या' असा ते प्रचार करतात. परंतु ह्यात धोका आहे. आस्तिक! नाव पाहा घेतले आहे केवढे! त्याचे मूळचे नाव निराळे होते म्हणतात. परंतु हा स्वतःला आस्तिक म्हणवू लागला. 'सर्वत्र मांगल्य आहे असे मानणारा तो आस्तिक. मी ते मानतो म्हणून मी खरा आस्तिक आहे. बाकीचे नास्तिक. ' अशी प्रौढी तो मिरवितो. राजा, अशांच्या नादी लागू नकोस. तुझ्या हृदयातील प्रेरणेला सत्य मान. कोट्यवधी आस्तिकांपेक्षा हृदयातील प्रेरणा अधिक महत्त्वाची आहे. त्या प्रेरणेचा आत्मा मारू नकोस.” वक्रतुंड आपले उपनिषद सांगत होता. “भगवान आस्तिकांना त्यांच्या मायबापांनीच आस्तिक नाव ठेवले होते.

त्यांची माता नागकन्या होती. त्यांचे वडील आर्य ऋषी होते. ज्या वेळेस या संकरसंभवसंतानाला आर्य नावे ठेवू लागले तेव्हा, 'हा आस्तिक आहे. सर्वांचे ठायी हा मांगल्य पाहील व इतरांस दाखवील.' असे त्यांचा पिता म्हणाला. तेव्हापासून आस्तिक नाव प्रसृत झाले. काही असो. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य आहे असे वाटते. त्याचे ते डोळे म्हणजे जणू प्रेमाची सरोवरे वाटतात. आपल्या जीवनातील सारे विरोध त्यांच्या दर्शनाने मावळतात. वासंतिक वाऱ्याची झुळूक येऊ लागताच वठलेली झाडे टवटवीत दिसू लागतात, त्याप्रमाणे आस्तिकांच्या कृपाकटाक्षाचा वारा लागताच आपल्या जीवनातील रखरखीतपणा नष्ट होऊन, तेथे मळे पिकले आहेत, बागा फुलल्या आहेत असे वाटू लागते. वक्रतुंड, तुमचा प्रसार तुम्ही निरनिराळ्या आश्रमांतून चालू ठेवा. आधी ऋषिमहर्षीना पटले पाहिजे. राजाने एकदम कोणताही पक्ष स्वीकारू नये. जनतेत कोणता वारा वाहत आहे ते राजाने बघावे.” परीक्षिती म्हणाला.

“राजाने बघू नये, त्याने वळण लावावे. जे योग्य वाटते ते जनतेला करायला लावावे.” वक्रतुंड त्वेषाने म्हणाला.

“परंतु योग्य काय ते कोणी ठरवायचे? ते एकदम थोडेच ठरवता येत असते? प्राचीन काळी मोठमोठ्या चर्चा होत, विद्वत्सभा भरत; जनता ऐकायला जमे; स्त्रियाही वाद करीत. अशा रीतीने विचारमंथन झाले पाहिजे. मी बोलावू अशी विद्वत्-परिषद ? आस्तिक वगैरे सर्व महान महान आचार्यांना आमंत्रणे देतो. आहे तुमची तयारी ? बोला.” परीक्षितीने विचारले.

“राजा, चर्चा मला आवडत नाही. तो काथ्याकूट असतो. सत्य चर्चेने मिळत नसते. ते ज्याच्या त्याच्या बुद्धीत स्वयंभू जन्मत असते. मी जातो. योग्य वेळ येईल. काळ अनंत आहे व पृथ्वीही विपुल आहे. माझ्या विचारसरणीचे द्रष्टे उत्पन्न होतील. वाट पाहत बसणे म्हणजेही सेवाच असते. तूही विचार कर. तुझा पुत्र जनमेयजय तरी एके दिवशी माझ्या हेतूंची पूर्णता करील. तो राज्यावर येईल व निर्नाग करील. मला त्याविषयी शंका नाही.” वक्रतुंड तोऱ्याने म्हणाला.

“म्हणजे माझ्या मरणाची वाट पाहता की काय तुम्ही? माझा वध करण्याची तर नाही ना खटपट चालली ?” हसून परीक्षितीने विचारले. “नागलोक संघटना करीत आहेत. तेच एक दिवस तुला गिळंकृत

करतील. असाच असावध राहा. सर्पपूजकांस अशीच सवलत दे. साप चावल्याशिवाय राहत नाही. तुम्ही नागांना जवळ घेऊ पाहाल; परंतु नाग चावण्यासाठी मात्र जवळ येतील. ते द्वेष विसरत नाहीत; सूड सोडीत नाहीत; खांडववनातील वाचलेला तो एक तक्षक कुळातील तरुण नाही का कर्णाजवळ गेला व म्हणाला “अर्जुनाला मारण्यासाठी मीही तुला साहाय्य करीन.” परंतु कर्णाने त्याला झिडकारिले. अशी ही खुनशी जात आहे. तिचा निःपात केला पाहिजे. ती ठेचली पाहिजे. तुला नसेल ते धैर्य तर तुझा पुत्र ते धैर्य दाखवील. कोवळ्या वृत्तीच्या लोकांकडून क्रांती होत नसते. समाजात कोणतीही उलथापालथ ते करू शकत नसतात. मनातून त्याची इच्छा असली तरी हात त्यांचा चालत नाही. जनमेजयाचा हात असा दुबळा होणार नाही. त्याचा हात नागावर वज्रासारखा पडेल असे मला वाटते. माझे विचार तुला पटतात. तुलाही पटते तर अधिक सत्वर कार्य झाले असते. असो. येतो मी. या चित्रशाळेतील ते खांडववनाची होळी दाखवणारे चित्र, ते फक्त पाहा. आर्यांचा विजयरथ त्या दिशेने, त्या मार्गाने गेला पाहिजे. समजले ना?" असे म्हणून वक्रतुंड निघून गेला.

वातायनात उभा राहून परीक्षिती पाहत होता. जोराने पावले टाकीत तो वक्रतुंड जात होता. जणू पायाखाली नागांना चिरडीतच होता. वक्रतुंड गेला. प्रासादासमोरील उपवनांतून गेला. परीक्षिती दूर पाहत होता. आकाशातील सूर्य मेघमालांनी झाकोळून गेला होता. विचार करीत तो उभा राहिला. 'माझ्या आयुष्यातच मला भयंकर प्रकार पाहावे लागणार का? माझ्या राज्यात यादवी सुरू होणार का? माझा पुत्रच हा द्वेषाग्नी पेटवण्यास कारणीभूत होणार का? त्याच्या आधीच माझे डोळे मिटले तर किती सुरेख होईल!" असे विचार त्याच्या मनात आले व त्याने आकाशाकडे वर हात करून "देवा, मला ने" म्हणून प्रणाम केला.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा