shabd-logo

सतरा

20 June 2023

7 पाहिले 7
आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा मिळणार?

“शशांका, बरे वाटते का?” आस्तिकांनी त्याच्या तप्त मस्तकावर हात ठेवून विचारले. “भगवान्, तुम्हाला त्रास, तुम्ही जा ना तिकडे. इतर मुलांना कांही सांगा. माझ्यामुळे सर्वांचे नुकसान." शशांक म्हणाला.

" शशांका, आश्रमात दुसरे काय शिकायचे आहे? दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिकणे. तुझी सेवाशुश्रूषा करणे हेच या वेळचे शिक्षण. मी तुझ्या सेवेत गुंतलो असता तिकडे सर्वांनी शांतपणे रोजची कामे करणे हेच शिक्षण. शिक्षण म्हणजे रोज का काही उपदेश हवा? खरे शिक्षण म्हणजे एक प्रकारची दृष्टी. ती आली म्हणजे मुख्य महत्त्वाचे शिक्षण झाले. तू मनाला काही लावून घेऊ नकोस. कपाळावर पुन्हा भस्म व दही घालू का? गार वाटेल.” आस्तिकांनी गोड शब्दांत विचारले.

“हं घाला. तुम्ही घाला. मघा नागेशने घातले, तर डोळ्यांत गेले. पण मी बोललो नाही. तो मला आवडतो. माझे मघा पाय चेपीत होता.” शशांक म्हणाला.

“सेवा त्यानेच करावी. तुला दूध दिले का त्याने?" त्यांनी विचारले.

“हो, दिले." तो म्हणाला.

आस्तिकांनी एका द्रोणात दही व भस्म कालविले. त्याचा कपाळावर लेप दिला. थंडगार वाटले. वेदांतील सुंदर सुंदर मंत्र आस्तिक तेथे म्हणत होते. मधूनमधून उपनिषदांतील भाग म्हणत. मंगल गंभीर असे ते वेदपारायण वाटे. “किती छान आहेत हे मंत्र. सारे आपले गोड. " शशांक म्हणाला.

“होय. या द्रष्ट्या ऋषींची दृष्टी वस्तूच्या अंतरंगात गेली आहे. त्याला सर्वत्र मधु मधु दिसत आहे. माधुर्यसागर परमेश्वर दिसत आहे. त्या ऋषीला उषा गोड आहे, निशा गोड आहे, एवढेच नव्हे तर....

“मधुमत्पार्थिवं रजः । ”

मातीचा कणही गोड आहे. मातीचा कण, तो का क्षुद्र? जरा पाऊस पडताच त्यातून सुगंध बाहेर पडतो, हिरवे गवत बाहेर पडते. फुलांफळांतील अनंत रंग व अनंत रस हे कोठून आले? त्या मृत्कणांतून. केवढी थोर दृष्टी!”

असे म्हणून पुन्हा आस्तिकः 'मधु वाता ऋतायते

मधु क्षरन्ति सिन्धवः

माध्वीः गावो भवन्तु नः

हे मंत्र म्हणू लागले. एकीकडे ते शशांकला थोपटीत होते. शशांकाचा डोळा लागला.

"तुम्ही जा. आता मी बसतो." नागेश येऊन म्हणाला.

“सर्वांची झाली का जेवणे? तू जेवलास का पोटभर ?" त्यांनी हसून विचारले.

"मला मुले हसतात म्हणून मी हल्ली थोडेच खातो. सारे मला चिडवतात. " नागेश म्हणाला. “तू माझ्याबरोबर जेवत जा. वेडा कुठला ! मुलांनी चिडविले तर आपण त्यांना चिडवावे. बरे बस. " ते म्हणाले.

आस्तिक निघून गेले. आश्रमात आज काही ऋषिमंडळी येणार होती. सद्यःस्थितीवर विचारविनिमय होणार होता. आस्तिक अंगणात फेऱ्या घालीत होते. मुले झोपली होती. नागेश शशांकाजवळ होता.

आस्तिक! केवढे मंगलनाम! मानव्यावर विश्वास ठेवणारा तो खरा आस्तिक. देवधर्मावर विश्वास ठेवून मनुष्यांना तुच्छ मानणारा तो का आस्तिक? स्वतःची जात श्रेष्ठ, स्वतःचे राष्ट्र श्रेष्ठ, स्वतःचा धर्म श्रेष्ठ, बाकी सर्व तुच्छ, असे मानणारा का आस्तिक?

त्या काळातील तो एक खरा महान आस्तिक तेथे फेऱ्या घालीत होता. त्या आश्रमातून आस्तिक्याचे, श्रद्धेचे, मांगल्याचे, त्यागाचे वारे भरतवर्षभर जात होते. तेथून नवतरुणांना स्फूर्ती मिळत होती. नवनारींना चेतना मिळत होती. ह्या सर्व नवप्रचारांना आस्तिकांचा आधार होता. सर्वांच्या पाठीमागे ही थोर विभूती होती. सर्वांना ओलावा देणारी ही ज्ञानगंगा होती. सर्वांना प्रकाश देणारी ही चित्कला होती.

प्रत्येक 'अशी युगविभूती उत्पन्न होत असते. ह्या विराट संसाराचा युगात हळूहळू विकास होत आहे. एकेक पाकळी शतकांनी उघडते. एखादे युग येते व समाजपुरुषाचे एखादे कवच गळून पडते. आतील मांगल्याची मूर्ती संपूर्णपणे दिसू लागण्यापूर्वी किती कवचे गळावी लागतील? किती शतके लागतील ! परंतु होईल हळूहळू सारे. त्या त्या शतकात एखादी दुष्ट रूढी गळते, एखादा पूर्वग्रह जातो, एखादा दुष्ट आचार बंद होतो, असे चालले आहे.

या मानवी समाजाचे अंडे सारखे उबवले जात आहे. संतांच्या तपाने त्या अंड्याला ऊब मिळते. कोंबडीची अंडी पटकन उबविली जातात. पिले बाहेर येतात. परंतु कुंपणावरूनही त्यांना उडता येत नाही. पक्षीराज गरुडाचे अंडे विनता माता सहस्र वर्षे उबवीत होती. तेव्हा त्यातून तो प्रतापी गुरुत्मान बाहेर पडला. विश्वंभराला पंखांनी सहज नाचविता झाला. हा कोण गरुड ? हा कोठला गुरुत्मान? ही विनता माता कोण?

मानवी जीव म्हणजे हा गरुड. पूर्णत्वाला मिठी मारू पाहणारा जीव. परंतु गरुड व्हायचे असेल तर वाट पाहावी लागेल. विनता म्हणजे आपल्या विनम्र वृत्ती. विनम्र वृत्तीने काम होईल. घाईने काम होणार नाही. विनम्र होऊन ध्येयावर दृष्टी ठेवून तप करावयाचे. तप म्हणजे तनमने करून केलेला प्रयत्न, शरीराने, मनाने, बुद्धीने श्रमणे म्हणजे खरे तप.

असे तपस्वी, मनस्वी संत मानवी परिपूर्णतेला ऊब देत असतात. आस्तिक असेच एक ऊब देणारा होते. एक दिवस परिपूर्णतेला मानवी पक्षी मिठी मारील.

इतक्यात आश्रमात ऋषी आले. आस्तिक त्यांना सामोरे गेले. कुशल प्रश्न झाले. हस्तपादप्रक्षालन झाले. थोडासा फलाहार देण्यात आला. मुले झोपली होती. स्वतः आस्तिकच व्यवस्था ठेवीत होते. नंतर सर्वजण बाहेर अंगणात बसले. बकुळीच्या फुलांचा वास येत होता.

“फुलांचा मधुर सुवास सुटला आहे.” हारीत म्हणाले. “ त्या त्या ऋतूत ती ती फुले. सृष्टीची विविधता अपूर्व आहे. विविधतेमुळे आनंद आहे. जीवनाला एक प्रकारची सदैव नवीनता राहते. " दधीची म्हणाले.

" परंतु तीच विविधता आज कोणी नष्ट करू पाहत आहेत. जे भाग्य आहे त्याला दुर्भाग्य कोणी म्हणत आहेत. आर्यांना नाग नकोसे वाटत आहेत. जनमेजय हट्टास पेटला आहे. उपाय काय करावा? पुन्हा का मोठे युद्ध होणार? काही कळत नाही.” यज्ञमूर्ती म्हणाले.

"प्राचीन काळी दधीचींनी जे केले तेच आजही आपण करू या. त्यांनी हाडे दिली, स्वतःची हाडे दिली. त्याचे शस्त्र करून इंद्राने वृत्र मारिली. वृत्रावर दुसरी कोणतीही शक्ती चालेना. सर्व त्रिभुवनाला वृत्र व्यापून टाकीत होता, परंतु त्याला कोण अडवणार? तपोमूर्ती दधीचीनी आपले बलिदान केले. ती त्यांची हाडे मग त्या इंद्राने घेतली. याचा अर्थ काय? त्या चिमूटभर हाडांत का इंद्राच्या वज्रापेक्षा अधिक सामर्थ्य होते? होय. त्यात अनंत त्याग होता. मानवजातीबद्दलचे प्रेम त्यातून भरलेले होते. हुतात्मा दधीचींची ती हाडे बघताच वृत्र विरघळला; वृत्राला इतका धक्का बसला की तो मरून पडला. “त्यागेन एकेन अमृतत्वमानशुः । " त्यागाने सारे मिळेल आणि आपली निर्मळ जीवने अर्पिणे याहून कोणता त्याग ? माझ्या तर मनात असे येते आहे की स्वतः जनमेजयासमोर जाऊन उभे राहावे. त्याने नागांना आगीत टाकण्याचे सुरू केले आहे. त्याला त्याने सर्पसत्र असे नाव दिले आहे. जणू नाग लोक म्हणजे सापच! या नागांना जाळून का परमेश्वर संतुष्ट होणार आहे? जनमेजयाचा अहंकार संतुष्ट होईल. जनमेजयाचे डोळे निर्मळ करण्यासाठी आपण आपली जीवने होमू या. त्याच्या त्या नरमेधात आपण आपली आहुती अर्पूया. आश्रमातील पुष्कळसे छात्रही माझ्याबरोबर येणार आहेत. परंतु मी त्यांना घरी पाठवणार आहे. ‘आईबापांकडे जाऊन मग काय ते करा' असे त्यांना सांगणार आहे. मला निघावेसे वाटते. वाटेत समानधर्मे आणखी मिळतील. जनमेजयावर मोठा परिणाम होईल. पर्वतालाही फोडण्याचे सामर्थ्य निःस्वार्थ बलिदानात आहे. आपण होऊन केलेल्या जीवनार्पणात आहे.” आस्तिक म्हणाले.

"इंद्र तर युद्धार्थ चाल करून येत आहे असे कळते. जनमेजयाने त्याला अपमानास्पद पत्र लिहिले. त्यामुळे इंद्राला संताप आला आहे.” हारीत म्हणाले.

“आपण दोघांकडचे हजारो-लाखो शूर सैनिक मरण्याचे आधी हा प्रयोग करू या. आपण तपस्वी लोक. हे अग्नीत देह होमिण्याचे तप करू या. इंद्राला कदाचित मग युद्धच करावे लागणार नाही. प्रेम उत्पन्न व्हावे, द्वेष- द्रोह शमावेत म्हणून आपण जर आत्मसमर्पण केले तर ते का व्यर्थ जाईल? आणि समजा, व्यर्थ गेले, तर करणारे करतील युद्धे. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, जगात काही फुकट जात नाही. आपले बलिदान फुकट नाही जाणार. ते विचार करायला लावील. कोणाला तरी विचार करायला लावील. मनुष्य कितीही दुष्ट झाला तरी त्याच्यामध्येही खाली खोल संदेश दडलेला असतो. पृथ्वीच्या पोटात झरा असतो. वरची दगडमाती दूर करू तर तो झुळझुळ वाहणारा झरा दिसेल. मनुष्याच्या सत्प्रवृत्तीवर अहंकाराचे, दुष्ट आकांक्षाचे दगड पडलेले असतात. हे दगड आपण आपल्या देहार्पणाने दूर करण्याची खटपट करू या. आपण प्रत्यही अग्निपूजन करतो, समिधा अर्पितो. परंतु एके दिवशी माझ्या लक्षात आले की, ध्येयार्थ आपला देह अर्पणे म्हणजे खरे अग्निपूजन. या काष्ठमय समिधा जाळून प्रकाश मिळणार नाही, जीवनात ज्ञानाग्नी पेटणार नाही. देहाची समिधा होमू, आपल्या आसक्तीची, क्षुद्र वासनाविकारांची समिधा होमू तरच ज्ञानाग्नी प्रज्वलित होईल. आपणास आजच्या भेसूर अज्ञानांघरांत विचारवन्हि पेटवायचा आहे. द्वेषाने थैमान मांडले असताना प्रेमळ ज्योत पेटवायची आहे. त्याला हा आत्महोम हाच उपाय, “ एष एव पन्था विद्यते अयनाय, नान्यः पंथा । " हाच मार्ग, दुसरा नाही. लढाया लढतील. युद्धे करतील. त्यातून आणखीच वैर निर्माण व्हावयाची, हाडवैर उत्पन्न व्हावयाची. पुढील पिढीला ही वाढती वैरे द्यावयाची. त्यापेक्षा हा निर्देर होण्याचा मार्ग अंगीकारू या. आत्मा हा यजमान, श्रद्धा ही पत्नी व हा देह हा हवि असे हे दिव्य यज्ञकर्म आपण सुरू करू या. आपणा सर्वांस काय वाटते?” आस्तिकांनी विचारले.

“योग्य आहे आपला विचार. अशी एक पवित्र प्रेमज्वाला पेटवू या की या भरतखंडाला जी कायमची प्रकाश देईल; संतत मार्गदर्शन करील. माझे नाव आहे यज्ञमूर्ती. तुमच्याबरोबर येऊन नाव सार्थ करू दे मला.” यज्ञमूर्ती म्हणाले.

“माझे नाव दधीची. त्या महान प्राचीन हुतात्म्याचे नाव. मलाही त्या नावाला निर्मळ राखू दे." दधीची म्हणाले.

“माझे नाव हारीत, सर्व सृष्टीला हरीत करणारा तो का हारीत? शुष्क जीवनाला हिरवे हिरवे करणारा तो का हारीत? आज जीवन नीरस झाले आहे, शुष्क झाले आहे. सहानुभूती संपुष्टात आली आहे. मानवी जीवनातील जीवनदायी झरे सुकून गेले आहेत. ओसाड भगभगीत दिसत आहे समाजसंसार. अशा वेळेस माझा शेवटचा यज्ञ मला करू दे. 'यज्ञाद् भवति पर्जन्यः।' असे श्रीकृष्णानी सांगितले आहे. आपण बलिदान करू तर दुसऱ्याच्या हृदयात प्रेमाचा पाऊस पडेल. त्याच्या डोळ्यांतून प्रेमाचा पाऊस पडेल. खरेच 'यज्ञाद् भवति पर्जन्यः । ' या चरणाचा आज मला अर्थ कळला. गंभीर अर्थ, आकाशातील पावसासाठी बाहेरची समिधा, जीवनातील पावसासाठी देहाची समिधा, प्राणांची समिधा." हारीत म्हणाले.

“यज्ञाद् भवति पर्जन्यः । " महान मंत्र. भगवंतांनी त्याच वेळेस सांगितले आहे की जे जे पाहिजे असेल ते यज्ञाने मिळवून घ्या. यज्ञ म्हणजे कामधेनू, यज्ञ म्हणजे चिंतामणी. करू या आपण महान यज्ञ. पेटवू या ज्ञानमय प्रदीप. " आस्तिक म्हणाले.

"गुरुदेव, शशांक आपणास बोलवीत आहे." नागेशने नम्रपणे येऊन सांगितले.

“मी जाऊन येतो हं! तुम्ही विचार करा. शशांक जरा आजारी आहे. नागानंद व वत्सला यांचा मुलगा. तुम्ही ऐकली असाल त्यांची नावे. थोर पवित्र नावे.” असे म्हणून आस्तिक नागेशाबरोबर गेले.

शशांक तळमळत होता. आस्तिकांनी त्याचा हात हातात घेतला. कढत कढत हात! त्याच्या कपाळावरून त्यांनी प्रेमाने हात फिरविला. पोरगा भाजून निघत होता.

“बाळ, काय वाटते?” आस्तिकांनी मधुर शब्दांनी विचारले.

“तुमचा हात कपाळाला लागला की मला किती बरे वाटते. तुमचा हात आईचा हात, तुम्ही तर जगाची आई आहात. आईच्या हाताहूनही प्रेमळ हात. तुम्ही कोठे गेला होतात? आता तुम्ही बसा जवळ. नागेशला निजू दे. तुम्ही काय करीत होतात. तात?” शशांकाने मधुर दृष्टीने बघत विचारले. “ आश्रमात की नाही हारीत, दधीची, यज्ञमूर्ती वगैरे महर्षी आले आहेत त्यांच्याशी बोलत होतो. जनमेजयाचा द्वेषाग्नी कसा शांत करावा याचा विचार करीत होतो.” आस्तिक म्हणाले. “माझ्या बाबांची बासरी करील शांत. गोड बासरी. नाही का, तात?” शशांकाने विचारले.

“होय. तुझ्या वडिलांचे जीवन प्रेममय आहे, म्हणून ती बासरी तशी वाजते. त्यांनी आपले जीवनच मधुर केले आहे. ज्याच्या जीवनाची वेणू बेसूर नाही, त्याचीच बासरी मधुर वाजते." आस्तिक म्हणाले.

“तुम्ही का जाणार येथून? तुम्ही मला टाकून नका जाऊ. त्या दिवशी तुम्ही म्हणत होतात 'तुमच्याबरोबर होमकुंडात मी पण उडी मारीन.' नागेश जवळ असला म्हणजे मी अथांग गंगेत उडी मारतो. तुम्ही जवळ असलात म्हणजे धडधडणाऱ्या अग्निकुंडातही मी हसत उडी घेईन. मला न्या हां. न्याल ना?” त्याने त्यांच्या मांडीवर डोके ठेवून विचारले.

“किती कढत डोके! आधीच तुला आगीत घालून देव जणू सर्वांहून शुद्ध करीत आहे. शशांका, मी जाऊन येऊ का जरा? ते बसले आहेत तिकडे.” आस्तिकांनी विचारले.

“जा, पण मधूनमधून येत जा. मधूनमधून तहान लागते. पाण्याची नव्हे... तुम्हाला पाहण्याची. जा तुम्ही, तात.” तो म्हणाला. “नागेश आहे हं येथे ." असे म्हणून आस्तिक गेले. नागेश शशांकाला थोपटीत होता. त्याचे हातपाय चुरीत होता.

इकडे ऋषींचे बोलणे चालले होते.

“आस्तिकांचे आश्रमवासीयांवर किती प्रेम?” दधीची म्हणाले.

“ त्यांच्या आश्रमातून जे जे शिकून गेले ते थोर काम करीत आहेत. आस्तिक म्हणजे सेवामूर्ती, प्रेममूर्ती, ज्ञानमूर्ती. मागे एकदा आलो होतो येथे, तर स्वतः एका मुलाचे दात घाशीत होते. रागावून नाही, तर हसत हसत. मला कौतुक वाटले." यज्ञमूर्ती म्हणाले.

“आणि मी आलो होतो येथे एकदा. सर्व मुलांसह आम्ही वनात काष्ठे आणण्यासाठी गेलो. काही मुले झाडांच्या हिरव्या फांद्या तोडू लागली. तेव्हा आस्तिक म्हणाले, 'वाळलेली काष्ठे थोडी का आहेत? मुद्दाम जिवंत फांद्या का म्हणून तोडता? नाहीच मिळाले कोरडे इंधन तर मग ओले. मेलेले लाकूड आधी नेऊ या.' अशी त्यांची दृष्टी. मी तर चकितच झालो. उगीचच्या उगीच झाडाची फांदीही न दुखवू पाहणारे हे प्रेमसागर आहेत. जनमेजयासमोर जाऊन ते जर उभे राहतील तर त्याला काय वाटेल? ते वाटेने जाताना लक्षावधी लोकांना काय वाटेल? आणि ही लक्षावधी जनता का स्वस्थ बसेल? ती त्यांच्या पाठोपाठ येईल. इंद्राचे सैन्य पुरवले, परंतु हे शांतिसैन्य कसे पुरवणार? मला तर आतून उचंबळून येत आहे. हिरवी हिरवी करू आपण सृष्टी, जीवनाची सृष्टी, भारतीय सृष्टी! सुंदर अशा या भरतभूमीतील आपले जीवनही सुंदर करू. भरतभूमीत सुंदर सूर्य, सुंदर चंद्र! येथील जनतेच्या जीवातही निर्मळ ज्ञानसूर्य असो; मधुर प्रेमाचा, मधुर भावनांचा चंद्र विलसो. सुंदर बालसृष्टी, सुंदर अंतःसृष्टी! आस्तिक मार्ग दाखवील.” हारीत म्हणाले.

असा त्यांचा संवाद चालला होता. तो आस्तिक आले. "वेळ नाही ना फार लागला?” त्यांनी नम्रपणे विचारले.

“ आणि वेळ लागला असता म्हणून काय झाले? बरे वाटते का मुलाला ?” यज्ञमूर्तीनी प्रश्न केला.

“त्याला माझे आहे वेड. किती गोड आहे मुलगा ! त्याचा पिता तिकडे बासरी वाजवून द्वेष शमवीत आहे. त्याचाच हा पुत्र. याचे बोलणे म्हणजेच मधुर वेणुनाद आहे.” आस्तिक कौतुकाने म्हणाले.

“स्त्रियांनी म्हणे वाटेतून एका राजाचे सैन्य परतविले. शेकडो स्त्रिया शांतिसूक्ते गात, प्रेमगीते गात चालल्या होत्या. त्या सैन्यासमोर त्या उभ्या राहिल्या. 'आम्हाला मारा व मग जायचे असेल तर जा. आम्हाला मागे रडत ठेवू नका.' असे त्या म्हणाल्या. त्या स्त्रियांत वत्सलाच प्रमुख होती. या मुलाचीच ती आई ना?” हारीतांनी विचारले.

“हो.” आस्तिक म्हणाले.

“ आणि एका नागकन्येने हातात निखारे घेऊन जनमेजयाच्या राजपुरुषांना ‘स्त्रिया भीत नाहीत होमकुंडाला' हे दाखवून दिले म्हणतात. राजाचे अधिकारी तेथून पळून गेले. त्या गावातील भांडणे मिटून तेथे स्वराज्य स्थापिले सर्वांनी. एकेक आश्चर्यच. " दधीची म्हणाले.

“नवयुगाचा जन्म होण्याचे हे वातावरण आहे. सर्व स्त्री-पुरुषांच्या हृदयात एकच भाव जागृत झाला आहे. स्त्री-पुरुषांतील सुप्त शक्ती जागृत करणाऱ्या जनमेजयास धन्यवादच दिले पाहिजेत." आस्तिक म्हणाले.

“मग काय ठरले?” यज्ञमूर्तीनी प्रश्न केला. “एके दिवशी निघावयाचे. आस्तिकांनी दिवस कळवावा.” दधीची म्हणाले.

“महान यज्ञ पेटवायचा ना?” आस्तिकांनी विचारले.

"हो." हारीत म्हणाले.

“मग तुम्ही आता प्रचार करा. दिवस मी कळवितो." आस्तिक म्हणाले. “ठीक. " सारे म्हणाले.

ऋषिमंडळी मोठ्या पहाटे उठून निघून गेली. ती मंडळी गेली व वत्सला आणि नागानंद आली. येऊन शशांकाजवळ बसली.

" किती दिवसांनी आलीस, आई !” त्याने विचारले.

“येथे माझ्याहून मोठी आई होती. म्हणून नाही आले आणि, बाळ, आताही राहता नाही येणार. तुला भेटून जायचे आहे. स्त्रियांची शांतिसेना घेऊन मी प्रचार करिते आहे. आपापली मुलेबाळे सोडून भगिनी माझ्याबरोबर आल्या आहेत. मग मी का तुझ्याजवळ बसू? तो मोह दिसेल, ती आसक्ती दिसेल. आमच्या शांतिसेनेतील एकता कदाचित कमी व्हायची, खरे ना? आणि हे सुद्धा पुरुषांची शांतिसेना घेऊन हिंडत आहेत. मधुर मुरली वाजवून सर्वांना प्रेमवेडे करीत आहेत. तुला भेटायला आलो आहोत. लवकर बरा हो.” वत्सला म्हणाली.

“आई, मी बरा झालो तरी तात आस्तिकांबरोबर मी जाईन. ते जर निघाले त्या यज्ञकुंडांत, त्या सर्पसत्रात उडी घ्यावयास, तर मी त्यांच्या बरोबर जाईन. मी उडी मारीन, प्रल्हाद रडला नाही. सुधन्वा रडला नाही. मी पण नाही रडणार. हसेन व आगीत कुदेन. आई, तू रडू नको हं! हे काय, रडतेसशी ?" त्याने विचारले.

“तू एकटा म्हणून रडू आले." ती म्हणाली.

“एकटा वाटते वाचवायचा? वाचलो तरी पुढे मरेनच. आणि आज या तापातच मेलो तर? खरे ना, आई? मी काही मरणार नाही. लोक मला अमर करतील. माझ्या गोष्टी लिहितील, माझ्यावर गाणी रचतील. तुझा शशांक अनंत काळपर्यंत लोकांच्या ओठावर नाचेल, त्यांच्या हृदयांत बसेल. शशांक चिरंजीव होईल. " बाळ म्हणाला.

“बाळ, तू एकटा, तू जाणार, म्हणून नाही तुझ्या आईला वाईट वाटले. आपल्याजवळ एकच मुलगा अर्पावयास म्हणून वाईट वाटले." नागानंद म्हणाला.

"मलाही मागे वाटत असे की मी एकटा. मला भाऊ ना बहीण. परंतु या

आश्रमात कितीतरी भाऊ मिळाले. आता मी एकटा नाही. " शशांक म्हणाला.

“तुला दूध देऊ का?" मातेने विचारले. “दे.” तो म्हणाला.

तिने त्याला दूध दिले. त्याच्या मस्तकावरून हात फिरवीत बसली.

“तुम्ही शीतळाईचे गाणे म्हणता?" वत्सलेने नागानंदास विचारले.

“विसरलो आता मी." तो म्हणाला.

“ मला म्हणून दाखविले होतेत, आठवते का?" तिने विचारले. “हो आठवते. कपोताक्षीच्या काठी, सोन्याचा पाऊस पडला त्या दिवशी!" तो म्हणाला.

"सोन्याचा पाऊस?” शशांकने विचारले.

"होय बाळ. " माता म्हणाली.

“तुम्ही वेचले नाही ? " शशांकने विचारले.

“भरपूर वेचले. त्यातच तूही पुढे सापडलास धरून ठेवलेल्या, हृदयाच्या पेटीत भरून ठेवलेल्या, सोन्यातच पुढे तुझी चिमुकली मूर्ती मिळाली. सोन्याची मूर्ती!” माता त्याला कुरवाळून म्हणाली.

“मी का सोन्याचा? तर मग हे सोने खरे की खोटें ते आगीत घालून

पाहीन. पाहू ना. आई ?” त्याने विचारले.

“पहा...” माता म्हणाली.

“बाबा, बासरी वाजवायला नाही शिकलो मी येथे. तुम्ही जगाला ऐकवता, मला कधी ऐकवणार? येथे करा ना वेणुवादन. मी ऐकेन, सारे आश्रमवासी ऐकतील." शशांक म्हणाला.

“तू बरा हो, मग ऐकवीन. आज नको." नागानंद म्हणाला.

“बरा नाही झालो तर..." त्याने विचारले. “बरे, वाजवतो.” नागानंद म्हणाले.

“सर्वांनाच ऐकवा.” तेथे पाठीमागे येऊन उभे राहिलेले आस्तिक म्हणाले.

सर्व मुले जमली. आस्तिक तेथे मुलांतच बसले. नागानंदाने बासरी वाजविली. गोड गीत त्याने वाजविले. मुलांना बसवेना, ती नाचू लागली. हातात हात घेऊन नाचू लागली. शशांक नागाच्या फणेसारखी फणा करून बसता राहिला. थांबली वेणू.

“कल्पना आली आम्हाला. तुम्ही जनतेला कसे वेड लावीत असाल ते कळले. मुसळास अंकुर फोडणारे, पाषाणास पाझर फोडणारे संगीत !” आस्तिक म्हणाले.

“बांबूच्या बासरीतून मधुर सूर काढणे सोपे आहे. जीवनाच्या बासरीतून काढील तो खरा. भगवान्, आपले जीवन म्हणजे अमर मुरली. ती सारखी संगीतच स्रवत आहे." नागानंद म्हणाला.

नागानंद व वत्सला जायला निघाली. शशांकाला त्यांनी प्रेमाश्रूंचे न्हाण घातले. “भगवान, आम्ही जातो. कर्तव्यासाठी जातो." नागानंद म्हणाला.

“गुरुमाऊली आहे माझ्या बाळाला, या माऊलीची जरूर नाही.” वत्सला म्हणाली.

“मातेच्या प्रेमसिंधूतील एका बिंदूत कोटी कोटी आस्तिक वाहून जातील.” आस्तिक म्हणाले.

आस्तिक पोचवायला गेले. दोघे पाया पडली. आस्तिकांनी आशीर्वाद दिला. जलान्तापर्यंत पोचवून ते माघारे आले. आश्रमातील मुले गंभीरपणे उभी होती.

“आजारी मुलगा टाकून आईबाप जातात हे आजच पाहिले." एक छात्र म्हणाला. “आणखी पुष्कळ न पाहिलेल्या गोष्टी लवकरच पाहाल.” आस्तिक म्हणाले.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा