shabd-logo

सहा

12 June 2023

5 पाहिले 5
“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु ते दुष्ट असते तर माझ्यासाठी ते जीव धोक्यात टाकते ना! त्यांची ती दयाच मला जाळीत आहे. का गेले ते? तू त्यांना का जाऊ दिलेस? मी लवकर उठून बकुळीच्या फुलांचा हार त्यांच्या गळ्यात घालावा म्हणून गेले होते, तो इकडे ते गेले. तो पहा खुंटीवर बकुळीचा हार सुकून गेला. आजी, तुझ्याजवळ सुकलेली अशोकीची फुले व तुझ्या नातीजवळ सुकलेली बकुळीची फुले! सुकलेल्या फुलांवरच आपण जीवने कंठावयाची का? तू त्यांना बांधून का नाही ठेलेस? मी ठेवले असते बांधून. माझे सोने! त्या दिवशी मिळालेले जिवंत सोने! काळेसावळे सुंदर हसरे सोने! तू दडवलेस ते, आजी. आता पुन्हा कधी येईल सोन्याचा दिवस? एकेक क्षण आता युगाप्रमाणे वाटत आहे! कोठे जाऊ, कोठे पाहू? क्षणभर दिसला, नाहीसा झाला ! नागानंद ! परंतु मला तर दुःख येत आहेत. त्यांची आठवण विसरताही येत नाही. जो जो विसरू बघते तो तो अधिकच ते माझ्याशी एकरूप होतात. मी आता स्वतःला विसरेन, परंतु त्यांना विसरणे शक्य नाही. कधी येतील ते? का नाही येत? त्यांना का येथे संकोच वाटला? येथे का त्यांचे मन फुलेना, हृदय डुलेना? येथे का गुदमरवणारी हवा होती? मी तर नाही करीत नागांचा द्वेष. या गावातील माझ्या मैत्रिणीही नाही करीत द्वेष. त्यांनी तर त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली; मुलांनी हार घातले. असा गाव कोठे मिळेल त्यांना? शोधा म्हणावं. सारी नवखंड पृथ्वी शोधा. शोधून शेवटी येथे याल. माझे मन तुम्हाला खेचून आणील. जा रे, मना, जा, त्यांना शोध व घेऊन ये. आजी, माझे मन गेले उडून तर का मी उन्मयी स्थितीत जाईन, समाधीत जाईन? तू बोलत नाहीस. आजी, तुझेही नाही ना माझ्यावर प्रेम ! तुझ्यावरसुद्धा रागवायचा मला नाही ना अधिकार ! मी कोणावर रागावू, कोणावर लोभावू? कोणाशी रुसू, कोणाशी हसू ? कार्तिकावर मला रागावतासुद्धा नाही येत. नागानंद आले तर रागावेन त्यांच्यावर. लाल डोळ्यांनी बघेन त्यांच्याकडे येऊ देत तर खरे. येतील का गं ते, आजी? बोल गडे. काही तरी बोल." वत्सला आजीच्या गळा पडून म्हणाली.

“ वत्सले, मी तरी काय सांगू? येथे राहावेसे वाटते तर तो राहता. बळेच

राहवण्यात काय अर्थ? आग्रह करण्यात काय स्वारस्य ? मी त्याला जाऊ दिले. त्याला येथे राहणे प्रशस्त नसेल वाटले. एक तर येथे घरात पुरुष माणूस कोणी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तो पडला नाग व आपण पडलो आर्य. खरे ना?" आजी म्हणाली.

“आर्य व नाग, नाग व आर्य! मला काय त्याच्याशी करायचे आहे?” ती चिडून म्हणाली.

“समाजातील विचारांना भ्यावे लागते. समाजातील आंदोलनाची अगदीच उपेक्षा करून नाही चालत.” सुश्रुता म्हणाली.

“समाजातील आंदोलनावर का आमची जीवने लोंबकळत ठेवायची? या आंदोलनाला मग आम्हीही कलाटणी देऊ. आंदोलन इतरांनी करावे व आम्ही का मुकाट्याने ते पाहावे, त्याच्याबरोबर खालीवर व्हावे? आम्हीही आंदोलन करू. लाटेवर प्रतिलाट. आंदोलनावर प्रत्यांदोलन, क्रांतीवर

प्रतिक्रांती. एका पायरीच्या डोक्यावर दुसरी.” वत्सला म्हणाली. “परंतु साऱ्या पायऱ्या शेवटी वरच नेतील. जिने वाकड्या पायऱ्यांचे नागमोडी असोत, वा सरळ असोत. पाऊल वरच जात असते.” सुश्रुता म्हणाली.

“उलट अगदी सरळ, उंच जिन्यापेक्षा वाकडा जिनाच हितावह. सरळ जिना घेरी आणतो. वाकडा जिना सहज वर नेतो. नागांच्या इमारती बहुतेक नागमोडी जिन्याच्या असतात. आर्यांनी नागांपासूनच ही पद्धत घेतली. आजी, तो मयासुर काही आर्य नव्हता. परंतु कशी त्याची कला ! सारे आर्य आश्चर्यचकित होत, तोंडात बोटे घालीत.” वत्सला म्हणाली.

“ मी अगदी लहानपणी गेले होते ती मयसभा पाहायला. पाणी आहे असे वाटावे, ओचे वर घेऊन जावे तो काही नाही. जेथे पाणी नाही असे वाटे, तेथे नेमके असायचे. मोठा कलावान्! आमची फजिती होई, परंतु एकीकडे हसून आमची मुरकुंडीही वळे.” आजीबाई म्हणाली. “नाग काही वाईट नसतात. तुझे काय मत आहे, आजी?” वत्सलेने विचारले.

“बरेवाईट सर्वांत आहेत आणि कोणी वाईट असला तर त्याला सुधारावे हाच खरा मानवधर्म." सुश्रुता म्हणाली.

“आजी, माझे बाबा साप वगैरे मारीत नसत हे खरे का गं? कोणीतरी म्हणत होते परवा." वत्सलेने आठवण केली.

“हो. शक्य तो मारीत नसत. चिमट्याने तोंड पकडीत व दूर नेऊन सोडीत. एकदा कार्तिकाच्या घरी मोठा सर्प निघाला. फूं फूं करीत होता. परंतु तुझे वडील फुलांची एक करंडी घेऊन तेथे गेले. त्यांनी इतरांस दूर व्हायला सांगितले. ती फुलांची करंडी त्यांनी काठीने त्या सर्पाजवळ लोटली. फुलांचा घमघमाट सुटला होता. तो साप त्या करंडीत शिरला. वरून त्यांनी एकदम झाकण घातले व त्याला रानाम नेमके सोडले. तुझे वडील नागांची मने दुखवीत नसत. त्यांच्या प्रत्यक्ष अशा कृतीमुळे गावात फार कलागतीही होत नसत. दोन्ही समाज आनंदाने नांदत. नागपंचमीचे दिवशी आम्हीही जाग्रण करीत असू. फेर धरून नाचत असू. नागांची गाणी गात असू. परंतु तुझे वडील गेले व सारे मागे पडले. येथील नागमंडळी बहुतेक दुसरीकडे राहायला गेली. नागांच्या बायका खूप आनंदी. नानाप्रकारचे खेळ खेळायच्या, सुंदर गाणी

गात नाचायच्या, आमचा तो आनंद आज राहिला नाही.” सुश्रुता म्हणाली. “त्या दिवशी संध्याकाळी नागानंद कसे नाचले! त्यांच्याबरोबर मीही नाचले. ते मला जणू शिकवीत होते. आत हृदय नाचत होते. बाहेर देह नाचत होता. हातात हात घेऊन आम्ही नाचलो. एकदम बसलो, एकदम उठलो, एकदम गिरकी घेतली, एकदम हात वर केले! मजा ! मुलांनाही जणू उन्माद चढला होता. आमच्याभोवती मुले व आम्ही जमेकांभोवती. नाग लोक कलावान आहेत. सृष्टीच्या सान्निध्यात राहून ते शिकले असतील कला. नाही का? आजी, नागानंदांना सारे येते. त्यांना फुले फुलविता येतात, शेती करता येते, बासरी वाजविता येते, परड्या विणता येतात. ते आले तर त्यांच्याजवळून एक सुंदरशी परडी करून घेईन. फुले आणायला परडी. पण ते येतील का गं, आजी? कशाला येतील ते आपणाकडे? काय आहे आपणाजवळ? ना धन, ना दौलत ना प्रासाद, ना ऐश्वर्य. ना सहस्रावधी गोधन, या क्रोशावधी कृषी, काय आहे आपणाजवळ? एक शेत आहे. दुसरे काय आहे?" वत्सला निराशेने म्हणाली.

दिवस जात होते. वत्सलेचा आनंद नाहीसा झाला होता. ती खिन्न असे; म्लान दिसे. जणू तिची चित्कळा कोणी नेली, तिचे प्राण कोणी नेले. ती नदीतीरी जाऊन बसे व रडे. त्या नदीचे नाव कपोताक्षी होते. लालसर झाक पाण्यावर असे. वत्सला म्हणायची, “माते कपोताक्षी, कशाला मला सोडलेस, का टाकलेस? तू आपल्या कुशीत मला का कायमचे झोपवले नाहीस? तुझी वेदगीते ऐकत मी कायमची झोपले असते. परंतु आता काय? या बाजूनेच ते धावत आले व येथून त्यांनी उडी मारली. ह्या अभागिनीसाठी उडी मारली. मला तारणाराच माझ्या जीवनात आग पेटवीत आहे अशी कोणाला असेल का कल्पना? आपले तारणारे हात म्हणजे आगीचे कोलीत आहेत, अशी त्यांना तरी असेल का कल्पना? जगात सारा विरोध आहे. आनंदवणारे डोळेच आग लावतात. ती आग असा तर होते, परंतु नसावी असेही वाटत नाही! वत्सले, रड रड. या कपोताक्षीच्या प्रवाहात हृदयांतील प्रवाह ओत. समुद्राला मिळू जाणाऱ्या या नदीत तुझे हृदय रिते कर." असे ती बोले, मनात म्हणे..

एखाद्या भरलेल्या विहिरीजवळ ती जाई व म्हणे, "विहिरी, तू भरलेली. परंतु मी रिती. माझ्या जीवनाची विहीर कधी भरेल?” एखाद्या सुंदरशा फळांच्या मळ्याजवळ ती जाई व म्हणे, “मळ्या, तू भरारला आहेस, परंतु माझा मळा केव्हा भरारेल? माझा मळा का ओसाड राहणार? नाही का मिळणार मला बागवान, माझा बागवान? मळ्याला आतून कळा लागल्या 7 आहेत. बागवानचे दर्शन होताच एकदम फुलेल, फळेल. परंतु केव्हा होणार दर्शन?" एखादे वेळेस गावातील मुली एकत्र बसून फुलांचे हार करीत बसत. वत्सला एकदम तेथे जाई व विचारी, "कोणाला गं हार घालणार? सांगा गं सख्यानो, सांगा गं सयांनो; हे हार कोणाच्या कंठांत शोभणार, कोणाच्या छातीवर रुळणार? तुम्हाला भेटले वाटते कोणी, तुमची वाट पाहत आहे का कोणी? हे काय, स्वतःच्या गळ्यातच तुम्ही हार घालणार? आपलीच पूजा? आपली आपणच पूजा करण्यात काय अर्थ? दुसऱ्याने आपली पूजा करावी, ह्यात सुख आहे. मी माझ्या गळ्यात नाही घालणार हार ! माझ्या हातचा हार त्यांच्या गळ्यात घालीन, रोज हार करते व नदीच्या पाण्यावर सोडून देते. घरी सुकून जातात. नदीच्या पाण्यावर टवटवीत दिसतील नाही? त्यांना जाऊन किती दिवस झाले त्याचे ठिपके ठेवले आहेत भिंतीवर मांडून. चंदनाचे ठिपके. मांडतांना डोळ्यांतून अनंत ठिपके गळतात!"

ते ठिपके मी बघते व माझे डोळे टिपकतात, भिंतीवर नवीन एक ठिपका

एके दिवशी वत्सला बकुळीच्या उंच झाडावर जाऊन बसली. आजी शोधीत होती. तिने हाका मारल्या. वरून कोकिलेने उत्तर दिले. वत्सला वरून गाणे म्हणू लागली.

गाणे (चाल गोकुळीचा कान्हा माझा) असे कुठे राजा माझा सखे मला सांग सखे मला सांग सखे मला सांग असे कुठे राजा माझा सखे मला सांग ।।धृ. ॥ आसवांचा वाहे पाट

अहोरात्र बघते वाट

अंधकार हृदयी दाट

वेदना अथांग ।। असे. ॥

असे कुठे माझा नाथ 

असे कुठे माझा कान्त

झणी आण त्याची मात

जळे सर्व अंग ।। असे. 11

नको सखे मारू हाक

आस सर्व माझी टाक

आस सर्व झाली खाक

तो न येई का गं । असे. ।।

नसेल का त्याल हृदय

असेल का भारी अदय

कसा उडी घेतो अभय

कसे फेडू पांग ।। असे. ।।

जरी न तो धावून आला

मला देई हालाहाला

बळिच्या या फांदीला

सखे मला टांग ।। असे. 11 " वत्सले, खाली ये. आजीला रडवू नकोस." सुश्रुता डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

“आजी, खाली कशाला येऊ? येथून पटकन वर जाता येईल. देवाकडे पटकन उडून जाईन. रडू नको. आजी, येथे का बसले सांगू? अगं, तो लबाड येईल एकदम. झाडावर असले म्हणजे मला दिसेल. मग मी त्याला शीळ घालीन. तो ओळखील. कारण, त्या दिवशी सोने लुटताना मी तशी शीळ घालीत होते. त्याला फार आवडे. शीळ ऐकून तो इकडे येईल. या झाडाखाली येईल, मग मी वरून फुलांची वृष्टी करीन. डोळ्यांतील फुलांचा पाऊस पाडीन. त्यांना कोणती आवडतात ती विचारीन 'बकुळीची आवडतात की डोळ्यांतील आवडतात?' अशी वर नको बघूस. आजी. तुझी मान दुखेल. टाकू उडी ? मला झेलशील? पदरात घेशील ? बरे नको. मी खाली येते. आता घरातून बाहेरच नाही पडणार. पण तेही तुला आवडत नाही. म्हणतेस की, वत्सले, जरा हिंडावे, फिरावे. करू तरी काय मी? तो का येत नाही? मग प्रश्न नसता असा पडला. " असे म्हणत ती खाली आली.

वत्सला अगदी कूश झाली. तिला खाणे जाईना. दूध पिववेना. सुश्रुता सचिंत बसे.

“ वत्सले, तुझ्यासाठी मी घडाभर मध आणला आहे. तुला लहानपणी आवडत असे. मध घेत जा. थकवा जाईल. शक्ती येईल. भातावर मध घालावा, दूध घालावे घेत जाशील का? बघ तरी कसा आहे तो." कार्तिक म्हणाला.

"कार्तिक, अरे माझा मधाचा घडा निराळा आहे. वेडा आहेस तू. हा मध का चाटावयाचा आहे? ह्या घड्याऐवजी तो घडा आणतास तर? जिवंत घडा. त्याला शोधून आण. ते आले तर मातीही गोड मानीन. ते नसतील तर अमृतही कडू म्हणून धिक्कारीन. उपनिषदांत आहे ना ते वचन? त्याला एकाला जाणल्याने सारे जाणता येते. त्याची गोडी चाखली की मग इतर सारे गोड लागते. त्याचा अनुभव घेत आहे मी. शुष्क बाह्यज्ञान अनुभवाने ओले होत आहे. ठेव हा घडा. कार्तिक, रडू नकोस. तुझ्यासाठी मी काहीही करीन. काय करू सांग." तिने विचारले.

“ या जन्मी काही नको. या जन्मी मी तपश्चर्या करीन. तपश्चर्येशिवाय फळ वांच्छू नये. खरे ना?” तो सकंप म्हणाला.

“जग हे असेच आहे. मी एकासाठी रडावे, दुसऱ्याने माझ्यासाठी रडावे.

वत्सला म्हणाली.

“परतु त्या दुसऱ्यासाठी कोण रडत आहे? काही असे अभागी असतील

की ज्यांच्यासाठी कोणीच रडत नसेल.” कार्तिक म्हणाला.

“त्यांच्यासाठी चराचर सृष्टी रडत असेल. त्यांच्यासाठी नदी रडते, मेघ रडतात, दवबिंदू रडतात. अज्ञात अश्रू अनंत आहेत. कार्तिक, मी वाचणार नाही. मी मरेन. मरणे का वाईट आहे? वाईटच. अशा वयात मरणे वाईटच. आगडोंब पेटला असता मरणे वाईटच." वत्सला दुःखाने म्हणाली.

“तुझे सारे ब्रह्मज्ञान कोठे गेले?” त्याने विचारले.

“ती पोपटपंची होती. ते ज्ञान चुलीत गेले. या आगीतून जाऊन पुढे जे

ज्ञान मिळेल तेच निश्चित ज्ञान." ती म्हणाली.

सुश्रुता बाहेर गेली होती. वत्सलेने केळीच्या गाभ्याला अंगाशी धरले होते. गार गार काले, ते ती कपाळावर ठेवी, वक्षःस्थली ठेवी, गालांवर ठेवी, हातावर ठेवी. आग, भयंकर आग.

तो पाहा कोण आला? संकोचत आत आला. आत येऊन उभा राहिला. त्याचे अंग थरथरत होते. तो एकदम धाडकन पडला. वत्सला दचकली, चमकली, ती एकदम उठली. जवळ जाऊन बघते तो कोण?

“आले, दारात येऊन पडले. अरेरे, आले नी पडले. दुर्दैवी मी. मला भेटायला आले, लांबून आले, उपाशीतापाशी आले, जीव मुठीत घेऊन आले. कोमल मनाचा माझा राजा. देवा, जागा हो रे, डोळे उघड रे." ती त्याचे डोके मांडीवर घेऊन विलपू लागली. तिच्या डोळ्यांतील शतधारा त्याच्या मुखकमलावर गळत होत्या. ती हातांनी त्याचे केस विंचरीत होती. त्याला थोपटीत होती. ती मुकी राहिली. ती डोळे मिटून होती. फक्त अश्रू घळघळत होते. त्याचे मुखकमल फुलले. त्याने वर पाहिले, तिच्याकडे पाहिले.

“वत्सले, रडू नकोस.” तो म्हणाला. “रडू नको तर काय करू? तुम्हाला बरे वाटते का?" तिने कातर स्वरात विचारले.

“हो. जिवात जीव आला. चैतन्य मिळाले. शक्ती आली. तू रडू नको."

तो म्हणाला.

“ तुम्ही एकदा गोड हसा म्हणजे मी रडणार नाही." ती म्हणाली.

“ मी हसतो. परंतु माझे डोके खाली ठेव. आपण जरा दूर बसू.” तो

म्हणाला.

“नागांना का दूर राहणेच आवडते ? रानातील संकुचित बिळांत राहणे आवडते? आलांत ते दूर का बसायला? आलात ते दुरून का हसायला? दूर

राहण्यास शूरपणा नाही. तुम्ही का भिता? आर्यांना भिता?' तिने विचारले.

“भीती मला माहीत नाही." तो म्हणाला.

“मग?” ती म्हणाली.

“नाग आधी शंभरदा विचार करील. परंतु नाते जडल्यावर सोडणार नाही ते चिरंतन नाते." तो म्हणाला.

“आर्य का नाते सोडतात?" तिने विचारले.

“मी नागांचे सांगितले. आर्यांचे तुम्हाला माहीत." तो म्हणाला.

“आर्यही घृतव्रत असतात. सावित्रीची स्फूर्तिदायक कथा नागांच्या कानांवर आली नाही का?" तिने विचारले. “ कानावर नुसती आली, एवढेच नव्हे, तर वटसावित्रीचे व्रत नागस्त्रियाही

करतात. जे चांगले ते नाग घेतात. ते आर्यांचे का कोणाचे, हा विचार नाहीत

करीत. " तो म्हणाला.

“ भिकारी मिळेल ते घेतो. परंतु जो श्रीमंत आहे, तो उत्कृष्ट असेल त्याच

वस्तूचा संग्रह करील." ती म्हणाली.

"कोण भिकारी व कोण श्रीमंत? आपण सारी भिकारीही असतो व श्रीमंतही असतो. काही बाबतीत नागांचा अधिकार विकास झालेला असेल तर काही बाबतीचा त्यांना स्पर्शही नसेल झाला. तसेच आर्यांचेही. अहंकार लागू नये, म्हणून सर्वांना ईश्वराने अपूर्ण ठेवले आहे. परंतु हे माणसाला कळेल तो सुदिन." तो म्हणाला.

“आर्यांची वैवाहिक नीती का चंचल आहे?" तिने पुन्हा प्रश्न केला.

“मी तसे म्हटले नाही. परंतु आर्यांचे नागांशी जेथे जेथे संबंध आले तेथे तेथे असे दिसते. निदान वरिष्ठ आर्यांनी तरी असे प्रकार केले. त्यांनी नागकन्यांना क्षणभर हुंगले व फेकून दिले. बिचाऱ्या नागकन्या त्या क्षणाच्या स्मृतीलाच जीवनात अमर करून राहतात. आर्य स्वतःला जेते समजतात व त्या तोऱ्यात आमच्याजवळ वागतात. नागकन्या म्हणजे जणू एक भावनाहीन वस्तू. एक उपभोग्य वस्तू. ह्यापलीकडे ते किंमत देत नाहीत. आस्तिकऋषींच्या वडिलांनी मात्र पूर्व धैर्य दाखवले. त्यांनी एकदा नागकन्येशी लग्न लावले ते लावले! त्यामुळेच आज आस्तिक ध्येयवादी झाले आहेत. पित्याची ध्येयनिष्ठा त्यांचेजवळ आहे. परंतु, वत्सले, आपली गोष्ट अगदीच निराळी आहे. तू आर्यकन्या आहेस. अजून आर्यकन्यांनी नागांचे फारसे पाणिग्रहण केले नाही. जेत्या आर्यांना तो कमीपणा वाटतो. जर एखादी आर्यकन्या नागाला वरील तर ते त्या दांपत्याला छळतात! म्हणून आपण विचार केला पाहिजे अजून. घाईने सारे बिघडते. का? अशी का काळवंडली तुझी मुद्रा ? मला ‘हस’ सांगितलेस, आता तूही हस.” तो म्हणाला.

“आगं अंगावर ओतता आणि हस म्हणता." ती म्हणाली.

“मग मी काय करू?"

“परंतु तो कार्तिक आहे. चांगला आहे. सौम्य वृत्तीचा व प्रेमळ दिसला. कार्तिक का वाईट आहे?” त्याने विचारले.

“ कार्तिक वाईट नाही, श्रावण वाईट नाही, माघ वाईट नाही. फाल्गुन वाईट नाही! सारे चांगलेच. परंतु कोकिळेला वसंतातच वाचा फुटते. तुम्हाला सांगू का? आर्यकन्या आता बंड करणार आहेत. आम्ही नागांजवळ विवाह केले म्हणून जर आर्यपुरुष उठतील तर उठू देता. त्या कुरुभूमीवरील युद्धापासून आर्यात कुमारांची वाण पडली आहे. मुली पुष्कळ व मुलगे थोडे. ह्या मुलींची काय व्यवस्था लावावयाची? माझ्या आजीला विचारा. त्या काळी तर शेकडो आर्यकन्यांनी नागांना वरिलं, म्हणून तर तो वृद्ध वक्रतुंड तडफडत आहे. तुम्ही ऐकले असेल त्याचे नाव. मी ज्या आश्रमात होते तेथे तो आला होता, नागद्वेषांचे उपनिषद घेऊन. मीच त्याला वादात गप्प बसविले, तर तणतणत निघून गेला. गुरुदेवांनी माझे कौतुक केले. ह्या हजारो आर्यकन्यांची संमती का द्वेष्य मानायची? आम्ही स्त्रिया दूर राहणाऱ्या सृष्टीला जवळ आणू. त्या वक्रतुंडाच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी शेकडो आर्यमाता निघणार आहेत. पोटच्या पोरांची कापाकापी का मातांना पाहवेल? माता व भगिनीच निश्चय करतील तर जगातील द्वेष शमवितील. नागानंद, आपण या द्वेषांविरुद्ध मोहीम काढण्याची प्रतिज्ञा घेऊ या. हातात हात घेऊ व प्रेमाचा भारतभूमीवर पाऊस पाडू या. आस्तिकांच्या महान ध्येयाला वाढवू या. ह्या ध्येयाच्या सेवेत संकटांशी टक्कर देऊ, आगीत उडी घेऊ. येता ? घेता माझा हात ?” तिने भावनोत्कट हात पुढे केला.

तो मुका होता. तीही मुकी राहिली. दोन तारे जणू भूमीवर उतरले होते व थरथरत होते. भारताचे भवितव्य का ती दोघे बघत होती? महान ध्येये मौनातून निर्माण होतात. अकस्मात एखादा पर्वत समुद्रातून मान वर काढतो. अकस्मात एखादा महान तेजस्वी तारा निःस्तब्ध अशा अनंत आकाशात चमकू लागतो. अकस्मात एखादे सुंदर मोती गंभीर समुद्रातून तीरावर येऊन पडते व चमकते.

सुश्रुता आजी आली. ती दोघांकडे पाहतच राहिली.

"तुम्ही केव्हा आलात? तुमचा ध्यास घेतला होता हिने! अगदी वेड्यासारखी झाली होती. हल्ली तर अंथरुणात दिवसभर पडून राही. बरे झाले आलात ते. आता हिलाही बरे वाटेल.” सुश्रुता म्हणाली.

“यांना पाहताच सारी शक्ती आली. सारी रोगराई पळाली. प्रिय मनुष्याचे दर्शन म्हणजे धन्वन्तरीची भेट. आजी, हे आले तर एकदम धाडकन दारात पडले. मी दचकले. पाहते तो हे! मी घाबरले. त्यांच्या डोळ्यांना पाणी लावले, पदराने वारा घातला. त्यांनी डोळे उघडले तेव्हा जिवात जीव आला.” ती म्हणाली.

“माझ्या डोळ्यांना कोणते पाणी लावलेत?” नागानंदाने विचारले.

“खारट पाणी.” ती हसून म्हणाली. “मिठाचे का पाणी लावलेस? वेडीच आहेस तू.” आजी म्हणाली.

"झोंबले का हो?" तिने विचारले.

“खारट पाणी डोळ्यांना झोंबत नाही. उलट त्याने डोळे स्वच्छ होतात. देवाने डोळे धुण्यासाठी खारट पाण्याचेच हौद भरून ठेवले आहेत. भीष्मांना ज्याप्रमाणे पाताळातील सजीव पाण्याची तहान होती, त्याप्रमाणे जीवाला कधीकधी हृदय-पाताळातील ह्या खारट पाण्याची जरूर असते. त्याने डोळे उघडतात. तोंडे फुलतात. नीरस होऊ पाहणाऱ्या जीवनात चव उत्पन्न होते, रस उत्पन्न होतो.” नागानंद म्हणाला.

“तुम्हीसुद्धा का आजारी होतात? वाळलेले दिसता.” आजीने विचारले. “ते लांबून आले आहेत. प्रवासामुळे शीण आला असेल. सकाळी बघ ताजेतवाने दिसतील. बटमोगऱ्याच्या फुलाप्रमाणे दिसतील." ती हसून म्हणाली.

“काळ्या बटमोगरीच्या फुलाप्रमाणे ?” तो मंद स्मित करीत म्हणाला.

"काळा बटमोगरा असतो का तरी ? नागांच्या उपवनातून असतो वाटते?" तिने थट्टेने विचारले.

“नागांच्या उपवनात सारे असते. जे मनात येईल ते तेथे फुलवता येते. सारे मनाचे रंग, मन आपला रंग वस्तूला देते. हवा असेल तो रंग. मन म्हणजे मोठा जादुगार, मोठा चित्रकार. मन म्हणजेच ब्रह्मदेव, मन म्हणजेच सृष्टीचे तत्व. संकल्पाशिवाय सृष्टी नाही. मनाशिवाय संकल्प नाही.” नागानंद म्हणाला.

"तुम्ही का आश्रमात होता कुठे? तत्त्वज्ञान्यासारखी भाषा बोलता. वत्सलाही पूर्वी असे बोले. परतु तिची ती भाषा हल्ली मुकी झाली आहे. हल्ली तिची निराळीच भाषा ! माणसे निरनिराळ्या वेळी निरनिराळी भाषा बोलतात.” सुश्रुता म्हणाली.

" परंतु त्या निरनिराळ्या भाषांतून हृदयाचे रंग प्रकट होत असतात. एकाच हृदयाचे रंग, एकाच आत्म्याची नानाविध दर्शने. आपल्या सर्व व्यवहारांतून आपले अनंत जीवन प्रकट होत असते.” तो म्हणाला. “कोठल्या आश्रमात होता बरे? मागे नदीवर कार्तिकाला तुम्ही सांगितले होते की आश्रमात होतो म्हणून.” वत्सलेने आठवण केली.

“तो आश्रम आज नाही. त्या आश्रमात आर्य, अनार्य उभय तरुण होते. एके दिवशी आर्यांनी त्या आश्रमावर हल्ला केला. आश्रमाचे आचार्य समीप आले व म्हणाले, “हत्या करू नका. उद्यापासून हा आश्रम बंद होईल. हा आश्रम बंद झाला तरी सत्य आपोआप प्रसृत होईल. सत्य आश्रमावरच जगत नाही. सत्य सहस्र मार्गांनी वाढत असते. सत्याच्या प्रसाराचे नियम अतर्क्यं आहेत. सत्याच्या जगण्याची मला चिंता नको. आश्रम बंद समजा.” आम्हाला त्यांनी निरोप दिला. त्या वेळेस आम्हाला मरणप्राय दुःख झाले. परंतु ते म्हणाले, “आता आम्हीच एकेक आश्रम बना. जेथे जाल तेथे आश्रमीय ध्येयांची निर्भयपणे परंतु नम्रपणे, प्रेमळपणे परंतु निःस्पृहपणे, जोपासना करा. आपण दूर गेलो तरी जवळच आहोत. एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेलो तरी एकत्र आहोत. ज्ञानमय नात्याला, चिन्मय नात्याला दिक्कालांचा प्रतिबंध होत नसतो." आमचे आचार्य कोठे गेले ते कळत नाही. कोणी म्हणतात की, 'त्यांचा अवतार संपला.' माझे तर ते मायबाप होते. त्यांनी मला ज्ञान दिले, प्रेम दिले. सर्वच छात्रांवर त्यांचा लोभ. परंतु माझ्यावर अधिक, कारण मी पोरका होतो. मी या अफाट जगात एकटा होतो. एखादे गोड बोर मिळाले तरी ते ते माझ्यासाठी ठेवीत. किती किती त्यांच्या आठवणी! एके दिवशी आम्ही रानात मोळ्या आणण्यासाठी गेलो होतो. आमच्यातील एक नागकुमार जरा अशक्त होता; परंतु इतरांनी त्यालाही मोठी मोळी उपचालयला लावले. तो दमला, हळू चालू लागला. मीही हळू चालू लागलो. इतर मुले पुढे गेली. मी माझी मोळी खाली टाकली. त्या मुलालाही 'मोळी खाली टाक' म्हणून मी सांगितले. त्याच्या मोळीतील लाकडे मी माझ्या मोळीत घातली. त्याची मोळी हलकी केली. तो नको म्हणत होता. 'ती मुले चिडवतील, नावे ठेवतील' असे म्हणत होता. मी म्हटले 'बघू कोण चिडवतो तो' भिऊ नको. लहान हलकी मोळी त्याच्या डोक्यावर मी दिली. मोठी मोळी मोठ्या कष्टाने मी माझ्या डोक्यावर चढविली. आम्ही नाग मोळीतील एक लाकूड जरा लांब ठेवतो, त्याच्यावर मोळी टेकून उभी करतो व मग डोक्यावर घेतो. म्हणजे जड मोळीही दुसरा कोणी नसला जवळ तरी डोक्यावर घेता येते. आश्रमात आचार्य वाट पाहत होते. त्यांच्याच्याने राहवेना. ते आम्हाला पाहण्यासाठी निघाले. तोच 'आले आले' करून मुलांनी टाळ्या पिटल्या. माझी भक्कम मोळी पाहून आचार्य म्हणाले, “एवढी जड का मोळी आणावी?“ मी काही बोललो नाही. परंतु मागून त्यांना सारी वार्ता सांगितली. त्यांना वाईट वाटले. दुसरे दिवशी प्रार्थनेच्या वेळेस ते म्हणाले, “मुलांनो, 'समानता, समानता' तुम्ही म्हणता परंतु समानतेचा खरा अर्थ काय? पुष्कळ शब्द आपण उच्चारतो. परंतु त्या शब्दांचा नीट अर्थ न पाहू तर पस्तावू. वेदांचा अभ्यास करताना एखादा स्वर चुकला तरी अर्थात केवढा घोटाळा होतो ते तुम्ही पाहिलेच आहे. समानता, स्वतंत्रता हे शब्द तुम्हा तरुणांत वारंवार उच्चारले जात असतात. समानता म्हणजे सर्वांना समदृष्टीने पाहाणे, वागविणे. परंतु याचा अर्थ काय? याचा अर्थ का हा की लहान मुलालाही मोठ्या माणसाइतके काम करायला लावणे? ती समानता त्या मुलाला मारक होईल. तसेच माझ्यासारख्या वृद्धालाही तरुणाइतके काम करायला लावाल तर ती का समानता होईल? समानता म्हणजे ज्याच्या विकासाला जे पाहिजे ते देणे. कोणाच्याही विकासाला अडचण येऊ नये. आपल्या आश्रमात एखादा अशक्त मुलगा असला तर त्याला थोडा निराळा आहार दिला पाहिजे. त्याला जर थोडे दूध अधिक दिले तर का समानता नष्ट झाली? काय, तुम्ही त्या अशक्त पद्मनाभाला जड मोळी आणायला भाग पाडले? त्याच्याने चालवेना. तो थकला. जर नागानंदाने थांबून मनाचा मोठेपणा दाखविला नसता, त्या पद्मनाभाविषयी कळकळ दाखविली नसती, तर तो वाटेत पडता, सूर्याच्या प्रखर तापाने मरता. पुन्हा असे करू नका. ज्याला झेपेल तेवढे त्याला द्यावे. नागानंद भर पुरात उडी मारतो, म्हणून सर्वांना का मारायला सांगू? अलबत् सर्वांना तशी शक्ती यावी म्हणून खटपट केली पाहिजे. दुबळेपणाची पूजा नाहीच कधी करता कामा काम फार पडू नये, सर्वांनी आपली कीव करावी, आपणास सुकुमार म्हणावे, असल्या गोष्टीचा त्याग निश्चयेकरून केलाच पाहिजे. परंतु तारतम्यभाव ओळखला पाहिजे. या हाताची बोटे सारखी नाहीत. यांना छाटून सारखे करणे म्हणजे का समानता? तो मूर्खपणा होईल. परंतु त्यांच्या बोटांच्या वाढीसाठी हृदयांतील रक्त हवे असेल तितके मिळेल. समानतेच्या महान तत्त्वाची टिंगल करू नका. तसेच स्वातंत्र्याचे तत्त्व. किती जणांना त्याचा नीट अर्थ समजला असेल ते देव जाणे! स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. असंयमी स्वातंत्र्य मारक आहे. संयमी स्वातंत्र्य तारक आहे. तुम्हाला वासनेचे गुलाम होण्याचे स्वातंत्र्य पाहिजे की वासना संयत करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे? शेवटी मनुष्याची पात्रता तो देहभोगांना, इंद्रियसुखांना केवळ स्वतःच्या स्वार्थाला कितपत महत्त्व देतो यावरच आहे. तो वासनांचा दास आहे की स्वामी आहे. यावर त्याच्या स्वातंत्र्याची किंमत आहे." त्या दिवशी त्यांनी किती सांगितले ते प्रवचन माझ्या कानात घुमत आहे. मी थकून गेलो होतो म्हणून माझ्या पायाला त्यांनी तेल चोळले! थोर गुरुमाऊली होती ती! कोठे बरे ते असतील? कधी भेटतील? वत्सले, ह्या नागानंदाला त्यांनी बनविले आणि लहानपणी आईने बनविले. या दोन मातांनी माझ्या मडक्याला आकार दिला, माझ्या जीवनाच्या घड्यात रस भरला. " तो कंठ भरून येऊन बोलता बोलता थांबला. “आणि असा हा मंगल घडा मला डोक्यावर घेऊन नाचू दे. तुमचे जीवन मी पूजीन. ते माझे करीन. तुमचा भरलेला घडा माझ्या जीवनात ओता. तुमचा रिता होणारच नाही. आणि माझे जीवनही फुलेल.” वत्सला म्हणाली. “आता जेवा. कढत कढत भाकरी व दूध घ्या. ऊठ, वत्सला. उठवते का?" सुश्रुताने प्रेमळपणे विचारले.

“होय, उठवते की! आता दहा कोस पळतसुद्धा जाईन." ती म्हणाली. वत्सला व नागानंद जेवायला बसली. दोघांना अपार आनंद होत होता

तो तोंडावर फुलला होता. त्या खोलीत पसरला होता. सुश्रुतेच्या मुखावरही प्रसन्नतेचे मळे दिसत होते. कोणी बोलत नव्हते. हळूच नागानंद वत्सलेकडे बघे व त्याचा तुकडा खाली पडे. तिचेही तसेच होई. सुश्रुतेला हसू येई.

“का गं हसतेस, आजी? मला नको जा जेवायला मुळी. तू आपली हसतेस, मलाच हसतेस. उठू मी?” लडिवाळपणाचा राग आणून वत्सलेने विचारले.

“पोट भरले आहे म्हणून जेवायला नको असेल.” आजी म्हणाली.

“त्यांचेसुद्धा का भरलेले आहे? ते तर दमूनभागून आलेले. परंतु त्यांचीही भाकर सरत नाही.” वत्सला म्हणाली.

“ अति श्रमाने भूक मरते." नागानंद म्हणाला.

“अति आनंदानेही मरते.” सुश्रुता हसून म्हणाली.. "तुम्ही जेवा हो पोटभर.” वत्सला म्हणाली.

" त्यांना संकोच वाटत असेल अजून.” सुश्रुता म्हणाली.

“संकोच कशाचा? संकोच वाटता तर येथे येते का? आला असता का हो? हसू नका. खरे सांगा." वत्सलेने विचारले.

“मला हसू नको म्हणतेस आणि तू का हसतेस? मला तुझ्याकडे बघून हसू येते.” तो म्हणाला.

“मी विदूषक आहे वाटते? सोंग आहे वाटते?" तिने चिडून म्हटले.

“सोंग नाही तर काय? सारे गाव हसते तुला." आजी म्हणाली.

“तुम्ही दोघांनी मला रडवायचे ठरविले वाटते?" ती म्हणाली. “ठरवणार तरी केव्हा? मी तेथे नसताना तर हे आले, आटप आता. तेवढे दूध पी हो. ते नको टाकू.” सुश्रुतेने सांगितले.

दोघांची जेवणे झाली. सुश्रुतेने नुसते दूधच घेतले. “तुमचे पाय दुखत असतील?” वत्सलेने विचारले.

“नाही दुखत." नागानंद म्हणाला.

"मग हातांनी का बरे चोळीत होता?" तिने प्रश्न केला. “काटा गेला आहे पायात." तो म्हणाला.

"अजून आत आहे?" तिने काळजीपूर्वक विचारले.

“हो, खोल गेला असेल. तसाच दडपीत आलो." तो म्हणाला. " मी काढते हो. झोप येणार नाही नाहीतर..." वत्सला म्हणाली.

"नको. मी सकाळी काढीन." नागानंद म्हणाला. “पण मला छान काढता येतो.” ती म्हणाली,

“ खरेच हो, वत्सलेचा हात हलका आहे. माझ्या पायात मागे केवढा काटा गेला होता. परंतु मला काही कळू न देता तिने काढला. काढू दे तुमचा. झोप येईल. काटा असेपर्यंत कुठली झोप !” सुश्रुता नातीचे कौतुक करीत म्हणाली.

वत्सलेने सुईसारखे शस्त्र आणले.

“तुम्ही निजा. मी हळूच पाय धरून काढते. हसता काय?" ती खिजून

म्हणाली. " वत्सले, एवढासा काटा, त्याचे केवढे माजवले आहेस ते स्तोम !” तो म्हणाला.

“लहानच गोष्टी, परंतु त्या महान होतात. वेळीच जपावे, आपण प्रथम थट्टेवर नेतो सारे. परंतु पुढे गंभीर होते परिस्थिती. प्राणांशी पडते गाठ, हं, निजा अस्से, द्या आता पाय.” ती म्हणाली.

सुश्रुतेने दिवा मोठा केला. वत्सलेने डोळे मोठे केले. पाहू लागली काटा. तिने पाय स्वच्छ केला धुऊन. नंतर ओंच्यानीच तिने तो पुसला. ढोपरावर ठेवून पाय कोरू लागली. हळूहळू पाय उकरीत होती. मध्येच काट्याला सुई लागे. नागानंद हायस करी..

“लागली वाटतं सुई ? आता नाही तो लागू देणार.” ती म्हणे. शेवटी काटा निघाला. तिने तो पाय आपल्या हृदयाशी धरला व डोळे मिटले. नंतर हळूच तो तिने खाली ठेवला. ती लाजली, हसली.

" हा बघा काढला काटा, केवढा आहे!" ती म्हणाली.

“आता सारे निष्कंटक झाले ना?” त्याने विचारले.

“देवाला ठाऊक!" ती म्हणाली.

“आता मी निजतो. बाहेर निजतो. घरात मला झोप येणार नाही. रानात उघड्यावर निजणारा नागानंद कोंडवाड्यात निजू शकत नाही. ओटीवर झोपतो.” तो म्हणाला.

वत्सलेने अंथरूण करून दिले. "उशी हवी का?" तिने विचारले.

"कसली?" त्याने विचारले.

"कसली म्हणजे?" ती हसली.

उशी?" तो म्हणाला.

तिने एक स्वच्छ उशी आणून दिली. तो झोपला. तिने त्याच्या अंगावर “एकदा थंडीच्या दिवसात सापाचीच मी उशी केली होती. मऊ थंडगार “ रानात सापाची उशी, घरात कापसाची उशी.” ती म्हणाली.

एक कांबळही टाकली. “कांबळ कशाला?” तो म्हणाला.

“म्हणजे नाग पळून जाणार नाही. गारठणार नाही. ऊब आहे असे त्याला वाटेल." ती म्हणाली.

वत्सला निजली. तिच्या डोक्याकेसांवरून मंगल हात फिरवून सुश्रुता आजीही निजली. दूर कुत्रे भुंकत होते. मध्येच वाघाची एक डरकाळीसुद्धा ऐकू आली. वत्सला घाबरली. ओसरीला दार नव्हते. ओसरी उघडी होती. 'वाघ तर नाही ना येणार?' तिच्या मनात आले. ती उठून बाहेर आली. चंद्राचा प्रकाश नागानंदाच्या तोंडावर पडला होता. किती मधुर दिसत होते ते तोंड. चंद्र जणू सहस्र करांनी त्या मुखाला कुरवाळीत होता. वत्सला अनिमिष नेत्रांनी पाहत राहिली. तिच्या मनात काही विचार आला. नागानंदाच्या चरणांशी ती गेली. ते पाय आपल्या मांडीवर घेऊन ती चुरीत बसली. नागानंद स्वस्थ झोपेत होता.

काही वेळाने ती उठली. अंगणात उभी राहिली. तिने आपल्या हातांचे चुंबन घेतले. नागानंदाचे पाय चेपून ते हात कृतार्थ झाले होते. तिने ते हात आपल्या मस्तकावरून फिरवले. जणू नागानंदाच्या पायांची धूळ ती मस्तकी धरीत होती. ती धूळ म्हणजे तिची केशर कस्तुरी, ती धूळ म्हणजे सारी सुगंधी तेले, ती धूळ म्हणजे तिचा मोक्ष, तिचे सर्वस्व. तिला आज परब्रह्म मिळाले. “ वत्सले, अशी वाऱ्यात बाहेर काय उभी? वेड तर नाही तुला लागलं?

चांदण्यात वेड लागते हो. चल आत.” सुश्रुता बाहेर येऊन म्हणाली.

"आजी, वाघाची डरकणी मी ऐकली. म्हणून उठून आले. हे बाहेर निजलेले. मनात येऊ नये ते आले.” ती म्हणाली.

“ थापा मार. तू वाघ आला की काय हे का पाहायला आलीस? साऱ्या मुलखाची भित्री तू." आजी म्हणाली.

“मी भित्री ? पाण्याचा लोंढा येत असताही नाचत उभी राहणारी का भित्री? झाडांच्या टिटाळीला जाऊन तेथून उडी मारू पाहणारी का भित्री ? आजी, मला इतर काही म्हण. परंतु भित्री म्हणू नको. भित्रेपणा त्यांना आवडत नाही हो! भित्र्या वत्सलेकडे ते ढुंकूनही पाहणार नाहीत. मी नाही भित्री. " ती म्हणाली.

“ते ओटीवर निजले आहेत, वाघ आला तर काय होईल, अशी भीती नाही वाटली तुला?" आजी हसून म्हणाली.

"दुसऱ्याच्या संरक्षणाची काळजी वाटणे म्हणजे काही भ्याडपणा नाही. वाघ येता तर मी तो मारला असता." ती म्हणाली.

"जरा हळू ते जागे होतील. चल आत." आजी म्हणाली.

वत्सला जाऊन झोपली.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा