shabd-logo

तेरा

15 June 2023

2 पाहिले 2
आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडला धाव. खनित्राला त्या पिलांची आतडी लागून बाहेर आली! तेथे रक्त साचले! त्या शेतकऱ्याला वाईट वाटले. तो तेथे रडत बसला. तिकडून आली नागीण! तो तेथे पिले मेलेली. ती सळसळू लागली, वळवळू लागली. समोर शेतकरी रडत होता. नागीण त्याला म्हणाली, “माझी पिले मेली म्हणून तुलाही वाईट वाटत आहे, मग मला किती वाईट वाटत असेल? कोणी मारली ही पिले? ही मेलेली पाहून का तू रडत आहेस?" तो शेतकरी म्हणाला, “आई, माझ्याच हातून ही पिले मारली गेली. खणीत होतो. खाली पिले असतील ती कल्पना नव्हती. घाव घातला तो खोल गेला. पिलांना लागला. माझे डोळे भरून आले. क्षमा कर, आई.” नागीण म्हणाली. “तू पिले मारून पळून गेला नाहीस. नागीण येऊन डसेल असे मनात येण्याऐवजी तू रडत बसलास येथे. खरे आहे तुझे मन, खरे आहे जीवन. असा मनुष्य मी पाहिला नाही. जा हो तू. मी तुला दंश करणार नाही. क्षमा करते तुला." प्रणाम करून तो गेला. परंतु दुसऱ्या दिवशी तेथे येऊन पाहतो तो नागीण तेथे मेलेली होती. तिथे का प्राण सोडले? पिलांपाठोपाठ तीही का गेली? शेतकऱ्यांना उचंबळून आले. साधी सरपटणारी जात. परंतु पिलांवर किती माया ! आणि पिले मारणाऱ्यालाही क्षमा करणारे केवढे थोर मन ! त्याने फुले आणली, गंध आणले. चंदनाची काष्ठे जमविली. त्या पिलांना व त्या आईला त्याने अग्नी दिला. पुढे त्याने पाषाणाची सुंदर मूर्ती करून घेतली. नागीण आहे व तिची पिले जवळ खेळत आहेत अशी होती ती मूर्ती. तेथे त्या दिवशी मोठी यात्रा भरू लागली. मोठ्या वडाच्या झाडाखाली होती ती मूर्ती. गावोगावचे लोक येत; नाग येत, आर्य येत. दुकानवाले दुकाने घेऊन येत. फळांची दुकाने, फुलांची दुकाने; पेढ्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने; वस्त्रे विकणारे येत, शस्त्रे विकणारे येत; सुतार येत रथ घेऊन, लोहार येत विळे, कोयता, फाळ घेऊन. तेथे मल्ल कुस्त्या खेळत; मुले टिपऱ्या खेळत, गोफ विणीत; बायका फेर धरून नागाची गाणी गात, झोक्यावर झोके घेत. मोठा आनंद असे.

नागमूर्तीवर फुलांच्या राशी पडत, पत्रींचे पर्वत पडत. इतके दूध तेथे नागमूर्तीवर ओतले जाई की, तेथे एक दुधाची नदीच होई!

अशा त्या यात्रेला आश्रमातील मुले गेली होती. मोठी मुले गेली होती.

लहान मुले नव्हती गेली. यात्रा बरीच लांब होती. आश्रमातील लहान मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना बरोबर घेऊन आस्तिक नदीवर गेले. नदीच्या पाण्यावर त्यांनी खेळ आरंभिला. भाकरीचा खेळ.

" माझा दगड बघा कसा उड्या मारीत जाईल. बघा हा." शशांक म्हणाला.

“फेक बरे. " आस्तिक म्हणाले.

शशांकाने चिपतळ दगड घेऊन फेकला. त्याने सात उड्या मारल्या.

आस्तिकांनी एक दगड घेऊन फेकला. परंतु तो एकदम बुडाला. “तुमचा तर बुडाला.” शशांक म्हणाला.

"थांब फिरून मारतो हा." असे म्हणून त्यांनी दुसरा दगड फेकला. तो कसा टणटण उड्या मारीत गेला. शेवटी दिसलाही नाही.

“किती छान गेला तुमचा दगड.” शशांकाचा मित्र रत्नकांत म्हणाला.

“वेग दिला नीट तर दगडही पाण्यावरून उड्या मारतो. माणसाने आपल्या जीवनाला नीट गती दिली, नीट वेग दिला तर तोही बुडणार नाही, चिखलात पडणार नाही. आनंदाकडे जाईल.” आस्तिक म्हणाले.

“काही माणसे वाईट असतात. " शशांक म्हणाला.

“ती चांगली नाही का होणार?” रत्नकांताने विचारले.

“काय रे, शशांक ? आंब्याची कैरी अगदी लहान असते तेव्हा कशी लागते?" आस्तिकांनी प्रश्न केला.

" अगदी तुरट असते." तो म्हणाला.

“जरा मोठी झाली म्हणजे कशी लागते?” पुन्हा त्यांनी विचारले.

“आंबट लागते.” तो म्हणाला.

“ आणखी मोठी झाली म्हणजे ?" त्यांनी हसून प्रश्न केला. “फारच आंबट लागते. दात आंबतात." तो म्हणाला

“ आणि कैरी पिकून आंबा झाला म्हणजे?” त्यांनी विचारले.

“गोडगोड लागतो. कसा वरती तांबूस, पिवळसर रंग, कसा आत गोड, सुंदर रस. ' शशांक म्हणाला.

“शशांक, तुरट फळे आंबट होतात, आंबट, पुढे गोड होतात. तसेच माणसाचे आई. वाईट माणसे पुढे चांगली होतील. जसजसे त्यांना अनुभव येत जातील तसतशी ती शहाणी होतील. कैरी आंबट म्हणून जर तोडून फेकू तर पुढे रसाळ आंबा मिळणार मिळणार नाही. खरे ना?” आचार्यंनी विचारले.

"कैरी दोनतीन महिन्यांत पिकते, गोड होते. माणसे किती दिवसांनी पिकणार, गोड होणार?"

" किती का दिवस लागेनात? प्रत्येक मनुष्याचे जीवन एक दिवस पिकणार आहे ही गोष्ट विसरता कामा नये. मीही पिकेन, तोही पिकेल. सारे गोड आंबे होतील.” आस्तिक म्हणाले.

“ आंबट कैरी गोड होते. कोरडी नदी भरून येते. " शशांक म्हणाला. “वठलेली झाडे पल्लवित होतात, रात्र जाऊन प्रकाश येतो.” रत्नकांत म्हणाला. “लहान फळ मोठे होते, लहान नदी मोठी होते." शशांक म्हणाला.

“कळीचे फूल, फुलांचे फळ." रत्नकांत म्हणाला.

“धारेचा प्रवाह, प्रवाहाची नदी, नदीचा सागर. ” शशांक म्हणाला.

“या गंगेला किती मिळाल्या आहेत नद्या, आहे माहीत?” आस्तिकांनी विचारले.

“यमुना मिळाली आहे.”

"गंडकी, धोग्रा मिळाल्या आहेत. "

“शोण मिळाली आहे.”

“या सर्व प्रवाहांपासून गंगा अभिमानाने दूर राहती तर? 'यमुना काळीच आहे; गंडकीत दगडच फार आहेत; धोग्रा फारच धों आवाज करते; शोण फारच बेफान होऊन येते.' असे जर गंगा म्हणती व यांना जवळ न घेती तर काय झाले असते?” त्यांनी विचारले.

“गंगा गुतवळासारखी राहिली असती तर पटकन आटून गेली असती."

शशांक म्हणाला. “अभिमानाने अलग राहाल तर मराल, प्रेमाने सर्वसंग्राहक व्हाल तर जगाल, असा सृष्टीचा संदेश आहे.” आस्तिक म्हणाले. “शंकराच्या जटाजूटांतून गंगा निघाली म्हणजे काय?” शशांकाने प्रश्न केला.

“विष्णूच्या पायांपासून निघाली असेही रामायणात आहे.” रत्नाकर म्हणाला.

“विष्णू म्हणजेच सूर्याचे रूप म्हणजेच सर्वत्र प्रवेश करणारा. सूर्याचा प्रकाश सर्वत्र जातो. प्रकाश मिळणार नाही तर वृक्षवनस्पती वाढणार नाहीत. फुलेफळे होणार नाहीत, आपण माणसे जगणार नाही. उष्णतेशिवाय जगणे नाही. म्हणून विष्णू सर्वांचे पालन करणारा, रक्षण करणारा असे म्हणतात. सूर्य सर्वांचे जीवन चालवितो. सूर्य म्हणजेच विष्णू. सूर्याचे किरण म्हणजे विष्णूचे पाय. या किरणांनी पाण्याची वाफ होते. त्या वाफेचे ढग होतात. त्या ढगांतून पुन्हा पाणी आपणास मिळते. नद्या भरतात. सूर्याचे किरण, सूर्याचे पाय जर वाफ करणार नाहीत तर मेघ बनणार नाहीत. मग नद्या कोठून होणार? म्हणून ह्या विष्णुपादोद्भव आहेत. गंगाच काय, सर्वच नद्या विष्णुपादोद्भव आहेत. परंतु विशेषतः गंगेला म्हणतो. याचे एक कारण आहे. उन्हाळ्यात हिमालयावरचे हिम वितळते आणि लहान होणाऱ्या गंगेला अपार पाणी मिळते. उन्हाळ्यातही तिला पूर येतात. विष्णूचे पाय तिला पोसतात. म्हणून ती विष्णुपादोद्भव आणि शंकराचा जटाजूट म्हणजे मोठे काव्य आहे. या हिमालयाच्या कैलासावर शिवशंकर राहतो असे म्हणतात हा कोणता शंकर? अरे ते कैलासशिखर म्हणजेच शिव. भस्म फासलेला, चंद्र मिरवणारा दुसरा कोणता शिव? पयः फेनधवल, कर्पुरगौरा अशी विशेषणे या शिखरालाच देता येतील. याला शिव, शंकर म्हणतो. कारण ही शिखरे मेघांना आवडतात. मग हे मेघ मागे मुरडतात व या भरतवर्षात पाऊस पडतो. ही हिमालयाची शिखरे नसती तर कोठला पाऊस, कोठले अन्न, कोठले जीवन? म्हणून याला शिव, मृत्युंजय अशी नावे दिली. अशा या शंकराच्या डोक्यातून गंगा निघाली. म्हणजे या शिखरापासून ती निघाली. जटाजूट म्हणजे हिमालयावरची प्रचंड बने. आकाशाला भेटणारी भूर्ज व देवदारांची वने. हजारो वृक्षवनस्पती, लतावेली. हा शंकराचा जटाजूट. हे सारे काव्य आहे. आपले पूर्वज फार कविहृदयाचे होते. दाट धुके पसरले म्हणजे हा हिमालय भस्माच्छादित मुनीप्रमाणेच दिसेल ! हिमालयासारखा कोण योगी? कैलासराण्याहून कोण महान तपस्वी? त्याला शशिखंडशिखंडमंडन, चंद्रशेखर - नाना नावे दिली. अनेक पशूंना तो आधार देतो म्हणून पशुपती म्हटले. ह्या हिमालयावर कोणी योगी ध्यान करीत आहे अशी मूळ कल्पना. त्याला मग धूर्जटी वगैरे अनेक नावे दिली. हिमालयांतून वाहणाऱ्या नद्या, जगताचे आईप्रमाणे पोषण करणाऱ्या नद्या, त्या सर्वांना हा योगराणा जवळ घेतो. त्यांचा जणू तो पती, सांभाळकर्ता. म्हणून सांब, गिरीजापती गिरिजारमण अशीही त्याला नावे आहेत. सृष्टीत जे जे उदात्त, सुंदर, कल्याणमय आहे त्याला त्याला पूर्वज परमेश्वर मानीत. " आस्तिक म्हणाले. इतक्यात आवाज कानावर आले. गाणी कानावर आली. यात्रेहून मुले परत आली. धावत आली ती गंगेच्या तीरावर भगवान आस्तिकांना भेटायला ती इकडेच आली.

“ आले, सारे आले. " शशांकाने टाळी पिटली.

“इकडेच आले ते." रत्नकांत म्हणाला.

सर्वांनी येऊन वंदन केले. आस्तिकांच्या भोवती सारे बसले.

“कशी काय झाली यात्रा ? मौज होती ना?” आस्तिकांनी विचारले. “यंदाची यात्रा आम्ही कधी विसरणार नाही. अमर यात्रा, खरोखरची यात्रा. नागेश म्हणाला.

" काय होते यंदा तेथे ?” आस्तिकांनी प्रश्न केला. “हा शुद्धमती सर्व सांगेल.” बोधायन म्हणाला.

"गुरुदेव, तुम्ही तेथे हवे होतात. तुमचा संदेश सर्वत्र जात आहे. प्रेमाचा संदेश प्रतिवर्षाप्रमाणे यात्रा भरली. हजार आर्य व नाग जमले होते. स्त्रिया, पुरुष, मुले बाळे सर्वांचे थवेच्या थवे लोटले होते. कोणी पायी आले होते, कोणी रथांतून, कोणी रंगीत गाड्यांतून, कोणी घोड्यांवरून आले, कोणी पालखीतून आले. खेळ चालले होते. गाणी चालली होती. इतक्यात नागजातीचे काही तरुण हातात लहान लहान लाकडी गदा असलेले असे आले. त्यांच्या भोवती गर्दी झाली. त्यांच्यातील एकजण सांगू लागला. 'नाग तेवढे एक व्हा. हा नागांचा देश आहे. आपल्या सुपीक जमिनी आर्य घेत आहेत आणि पुन्हा आपणालाच दस्यू म्हणत आहेत. नागांच्या देवतांची यांनी निंदा व विटंबना चालविली आहे. साप मारतात व नाग देवांवर फेकतात. हे आपल्या स्त्रियांची कुदशा करतात. प्रथम विश्वास दाखवतात, मग फसवतात, सोडून जातात. ते आर्यस्त्रियांचे स्थान नागस्त्रियांस देत नाहीत. आर्य जर असा आपला पाणउतारा करतात, सर्व बाजूंनी आपणास हीन लेखतात, तर आपण का त्यांच्यात जावे ? नवीन सम्राट जनमेजय तर फारच नागांच्या विरुद्ध आहे. तरी आपण सावध व्हावे. नागसंघटनेचा संदेश सर्वत्र न्या.” वगैरे त्याचे भाषण चालले होते. इतक्यात गोऱ्या आर्यांची एक तुकडी आली. पाठीवर भाता व काखेस धनुष्य असे ते आले. त्यांच्या भोवती गर्दी झाली. त्यांचा नायक त्यांचे म्हणणे सांगू लागला, 'आर्य स्त्रीपुरुषांनो, ऐका, या अशा नागांच्या उत्सवात येत जाऊ नका. नागलोकांत मिसळणे पाप आहे. आपण श्रेष्ठ आहोत. नागपूजा करून दुष्ट व्हाल. वाकडी होतील मने. नाग ही नीच जात आहे. आपला वर्ण शुभ्र आहे. परंतु तो हळूहळू यांच्या मिश्रणाने काळा होईल. आपण ज्ञानाचे उपासक. गायत्रीमंत्राचे उपासक. आपण आपला अधःपात नाही करून घेता कामा. आर्य कुमारिका नागांशी लग्ने लावू लागल्या आहेत, ही फार वाईट गोष्ट आहे. एकेक आर्य तरुण अनेक आर्य कुमारिकांशी लग्न लावण्यास सिद्ध आहे. आर्यात कुमार कमी ही अडचण सांगू नये. आर्य कुमारांनीही नागकन्यांशी संबंध ठेवू नये. नागांप्रमाणे ह्या नागस्त्रिया हावभाव दाखवतात. परंतु हे हावभाव पाहून भुलू नका. शेवटी सर्व आर्य काळे करायचे असे मिष आहे त्यांच्या मनात.' दोन विरुद्ध भाषणे चालली होती. शेवटी भांडणे सुरू झाली. मारामारीवर पाळी आली. स्त्रिया मुले घेऊन धावपळ करू लागल्या. म्हातारे गर्दीत गुदमरू लागले. बाण काढून मारता येतो. परंतु जवळून काय ? नागतरुणांचे ते मुद्गल, त्या गदा आर्यकुमारांच्या मस्तकावर बसू लागल्या. कोणी दगड मारू लागले. इतक्यात एक आश्चर्य झाले. सुंदर गाणे कानावर आले. सुंदर बासरी कानावर आली.

ती सुंदर होती स्त्री. ती गाणे म्हणत होती. तिचा पती बासरी वाजवीत होता. ती दोघे निर्भयपणे त्या गर्दीत घुसली. मधुर गान, मधुर तान ! मारणारे एकमेकांस मिठी मारू लागले. विरोध विसरले. द्वेष शमले. प्रेमाचे वातावरण भरले. लोकांची तोंडे फुलली. त्या दोघांच्या भोवती हजारो लोक उभे राहिले. मुले नाचू लागली. स्त्रिया नाचू लागल्या. पुरुष नाचू लागले. नटराजाचा विराट नाच! आसपासची झाडे, दगडधोंडे सारे नाचत आहे असे वाटले. महान संगीताचा सिंधू तेथे उचंबळला!

मंजुळ वाजे वंशी

दंश विसरले दंशी

द्वेष विसरले द्वेषी

महान आश्चर्य झाले हो ।। पाणी आले डोळ्यांतून

शस्त्रे गळली हातांतून

प्रेम आहे हृदयातून

महान आश्चर्य झाले हो ।।

शत्रु मित्र झाले समान

गळून गेले दुरभिमान करिती मोक्षामृतपान

महान् आश्चर्य झाले हो ।।

बाजे नागानंदाची वेणू

प्रेमे नाचे अणुरेणू

अल्पशक्ती मी किती वर्णू

मौन आता वरतो हो । । "

शुद्धमती थांबला. आस्तिकाची जणू समाधी लागली. सारे शांत व गंभीर होते. आस्तिकांची भावसमाधी उतरली. त्यांनी आपले डोळे पुसले. प्रसन्नपणे सभोवती पाहिले. गंगेचा प्रवाह वाहत होता. आकाश लाल झाले होते, सोनेरी झाले होते.

"संगीत ही दैवी कला आहे. संगीत मोक्ष देणारी कला आहे. संगीताने आपण वर उचलले जातो. संगीताने उद्धार होतो. संगीत म्हणजे मानवाचे पंख. हे पंख लावून मनुष्य मोक्षाचे द्वार गाठतो. का होते असे? संगीतात हे कोठून आले सामर्थ्य? पाखरांचा कलरव ऐका, नदीची गुणगुण ऐका, पानांचा मर्मरध्वनी ऐका. मनावर एक प्रकारचा प्रसन्न परिणाम होत असतो. संगीतात मेळ असतो. संगीत म्हणजे संयम सहकार्य. संगीत म्हणजे विरोधाचा अस्त. आपल्या जीवनाचा संगीताशी संबंध आहे. संगीत ऐकून मनुष्य का वेडा होता? कोणतीही कला, तिच्यामुळे मनुष्य मुग्ध का होतो? कला म्हणजे सत्य, शिव व सुंदर यांचे संमेलन. कला सर्वांचा संयमपूर्वक स्वीकार करते. संगीतात आपल्या जीवनाचा आदर्श मिळतो. आपले जीवन म्हणजे एक मधुर संगीत करावयाचे हा त्याचा अर्थ, परंतु आपण हे विसरतो. आपण विरोधच उभे करतो. परस्परांशी मिळते घ्यावयास कधी तयार होत नाही. जीवनात कधी तुझे थोडे अधिक, कधी माझे, असे करावे लागते. कधी या सुराला प्राधान्य, कधी त्या परस्पर व्यवहार म्हणजे अगदी काटेकोरपणा नाही. जितक्यास तितके असे करून व्यवहार मधुर होणार नाही. परंतु केव्हा समजेल हे माणसाला? समजेल एक दिवस. बासरी सात सुरांची. परंतु मानवी जीवनाची बासरी अनंत सुरांची. ती सुरेल वाजू लागावयास वेळ लागेल. शशांका! गंगेच्या तीरावरची ही कोसच्या कोस पसरली जमीन सुपीक व्हायला किती वर्षे लागली असतील ते सांगता येईल का? ही जमीन कोणी सुपीक केली, आहे माहीत? सांगेल कोणी?” आस्तिकांनी प्रश्न केला.

“पुराबरोबर गाळ वाहून येतो व तो पसरतो. त्यामुळे जमीन सुपीक झाली.” शुद्धमती म्हणाली. “शेतकरी वाईट जमिनीत खत घालतो, चांगली माती तिच्यावर

पसरतो. तसेच या नद्या करतात. प्रतिवर्षी नवीन कस आणून निकस

झाल्यावर जमिनीवर पसरतात, होय ना?" शशांकाने विचारले.

“होय. चांगले सांगितलेस. परंतु हे काम शांतपणे हजारो वर्षे चालले असेल. तेव्हा हा गाळ पसरत पसरत शेकडो कोस दूरवर गेला ? सृष्टीतील महान घडामोडी मुकेपणाने शतावधी वर्षे चाललेल्या असतात. पंचमहाभुतांपैकी पाणी, वायू व तेज यांच्यामुळे बहुधा साऱ्या घडामोडी होत असतात. मनुष्यालाही समजात जर फरक घडवून आणावयाचा असेल तर यातील शक्ती त्याच्याजवळ हव्यात. मनुष्याजवळ उदार भावनांचे धो धो करणारे वारे हवेत, बुद्धीत प्रखर तेज हवे आणि आशेचे पाणी हवे. या तीन गोष्टी ज्यांच्याजवळ भरपूर प्रमाणात असतील तो क्रांती करील. वारा, तेज व पाणी, भावना, बुद्धी व आशा जीवनात या तीन वस्तू निर्मा या आश्रमातून या तीन वस्तू घेऊन जा. तुम्ही क्रांती कराल.” आस्तिक म्हणाले.
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा