shabd-logo

दोन

12 June 2023

2 पाहिले 2
वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटलेल्या असतात. काही रेषा अस्पष्ट असतात, काही खोल व स्पष्ट असतात. डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाचे भरलेले डोह.

“सुश्रुताआजी, तुम्ही आज हसत का नाही? आमच्याकडे आल्यात का नाही? आज आम्ही नदीवर गेलो होतो. तेथे मारामारी झाली. तुम्हाला कळले का?" शेजारच्या कार्तिकाने विचारले.

" कार्तिक, कोणाची झाली मारामारी? तुला नाही ना लागले? ह्या

लहान लहान मारामाऱ्यांतून पुढे भयंकर युद्धे होतात. ठिणग्यांतून वणवे पेटतात." ती म्हणाली.

“त्या पूर्वीच्या युद्धाच्या तुम्ही गोष्टी सांगू लागल्यात म्हणजे आम्हाला वाईट वाटते. एखादे वेळेस मला चेवही येतो. वीर व्हावे असे मला वाटते. वत्सलेच्या आजोबांची ती तलवार तुम्ही मला द्याल? वत्सलेच्या वडिलांचे ते धनुष्य मला द्याल? वणव्यात ना ते सापडून मेले?” कार्तिकाने पुन्हा आठवण करून दिली.

“होय, कार्तिक, माझा तो गुणांचा बाळ, तो एकुलता एक माझा मुलगा, वणव्यातून नागांची मुले वाचवता वाचवता जळून मेला. नागांच्या एका लहानशा वसाहतीस काही आर्यांनी आग लाविली. वत्सलेचा पिता, तो माझा बाळ रानात शिकारीस गेला होता. तो परत येत होता. त्याने आक्रोश ऐकला. त्या ज्वाला पाहिल्या. तो धावत गेला. त्याने आगीत उडी घेतली. एका मातेची मुले घरात होती. ती मुले आतून ओरडत होती. माता बाहेरून किंकाळ्या फोडीत होती. आपली मुले आपल्या डोळ्यासमोर आगीत जळून जाणार ह्या विचाराने ती मूर्च्छित झाली. परंतु माझा बाळ शिरला त्या आगीत. अंगावरच्या वस्त्रात तिची दोन मुले गुंडाळून तो बाहेर आला. आपल्या बाहुत त्याने ती घेतली. त्या मातेजवळ ती दोन मुले त्याने ठेविली. रत्नाकर घरी आला, परंतु आगीत भाजून आला होता. उपचार केला; परंतु तो मरण पावला. मी पुत्रहीन झाले. परंतु दुसऱ्या मातेच्या जीवनात त्याने आनंद ओतला. तो खरा मातृपूजक जो दुसऱ्या मातांचीही पूजा करतो, तो खरा धर्मपूजक जो दुसऱ्या धर्माबद्दलही आदर दर्शवितो. वत्सलेचा पिता नागांची निंदा करीत नसे. नागपूजेच्या वेळी तोही त्यांच्या उत्सव समारंभास जाई. आर्यजातीय लोक त्याचा तिरस्कार करीत, त्याला नावे ठेवीत. परंतु तो शांत राही. गुणी होता माझा बाळ. “सुश्रुतेच्या डोळ्यांतून पाणी आले.”

“तुम्ही वत्सलेच्या आईस का जाऊ दिले? जशा तुम्ही राहिल्यात तशा त्या राहिल्या असत्या. आई नाही म्हणून वत्सला एकदा आमच्याकडे रडली होती.” कार्तिक म्हणाला.

“माझे पती कुरुक्षेत्रावर पडले. ते लढाईला गेले तेव्हा माझ्या पोटात बाळ वाढत होता. जाताना ते म्हणाले, 'मी मेलो तरी सती जाऊ नकोस. बाळ होईल त्याला वाढव. त्याच्या सेवेत माझीच सेवा करशील. कुळाचा तंतू तोडू नकोस. परंपरा चालली पाहिजे. अशानेच पितृऋण फिटते.' मी म्हटले, ‘असे अशुभ नका बोलू, विजयी होऊन तुम्ही याल.' ते लढाईला गेले. परंतु पुन्हा त्यांची भेट झाली नाही. समरांगणावर ते पडले. त्यांची आज्ञा मी पाळली. बाळ वाढवला. कसा दिसे सुंदर! त्याचे नाव रत्नाकर ठेवले होते. तळहातावरील फोडाप्रमाणे त्याला मी वाढविले. डोळ्यातील बुबूळाप्रमाणे त्याला मी जपले. एकदा या अंगणात त्याला निजविले होते. मी घरात होते. चांदण्यात लहानशा पलंगडीवर झोपला होता बाळ. परंतु मी बाहेर आले तो वाघ तेथे उभा. बाळाला हुंगीत होता. जाईच्या फुलाला, निशिगंधाला हुंगीत होता. ते फूल त्याला खाववेना. पशूही कधीकधी असे वागतात की माणसांनी माना खाली घालाव्या. भूक लागली असेल तरच वाघ मारतो. स्वैर हिंसा मानवातच आहे. मी आले व वाघ गेला. बाळ उराशी धरला मी. असा तो वाढला. भर पुरात उडी टाकी, उंच झाडावर चढे. घोड्यावर बसण्यात तर तो फारच पटाईत. नेम अचूक मारी. पराक्रमी असून प्रेमळ होता. निर्भय असून नम्र होता. भेदभाव त्याच्या जीवनात नव्हता. एका नागकन्येजवळ त्याला लग्न लावायचे होते. परंतु मी 'नको' म्हटले. राहून राहून त्या गोष्टीचे मला वाईट वाटते. मातृभाक्त असल्यामुळे तो लग्नाला उभा राहिला. आनंदाचा संसार सुरू झाला. माझ्या आवडीची मुलगी मी पत्नी करून दिली. तरी तिच्यावर तो प्रेम करी. कधीही उणेपणा दाखवीत नसे. दुजाभाव दाखवीत नसे. वत्सला जन्मली. मोठी गोड मुलगी, परंतु ती जन्मली व रत्नाकर गेला. तो गेला व त्याच्याबरोबर त्याची पत्नीही सती गेली. मी तिला किती सांगितले की, “मुलगी लहान आहे. चार महिन्यांचीही नाही. तिचे संगोपन कर. तुझ्या मामंजींनी मला जे सांगितले तेच तुला मी सांगत आहे. मुलाला वाढविण्यात पतीचीही सेवा असते.' परंतु सुजातेने ऐकले नाही. ती म्हणाली, “तुमच्या पोटात बाळ वाढत होता म्हणून मामंजींनी तसे सांगितले. माझी ती स्थिती नाही. वत्सलेला तुम्ही वाढवाल . आईपेक्षा आजी अधिक प्रीती करते. मला जाऊ दे. त्यांच्या पाठोपाठ जाऊ दे. एक क्षणही त्यांचा वियोग मला सहन होत नाही.” मी परोपरीने सांगितले. 'मुलांना जन्म देऊन त्यांना निराधार असे जगात ठेवणे म्हणजे देवांचा अपराध आहे. त्या लहान मुलांनी कोणाकडे बघावे? मी म्हातारी. मी कितीशी जगणार?' पुष्कळ बोलल्ये. परंतु ती शेवटी म्हणाली, 'आम्ही मानव कितीसे कोणाचे पालन करणार? पालनकर्ता शेवटी तो जगदीश्वरच आहे. ज्याने सागर भरले, पर्वत स्थिर केले, आकाश अधांतरी उभे करून ते कोटीकोटी तारांनी नटविले, जो पोपटाला कंठ देतो, मोराला पिसारा देतो, गाईला वात्सल्य देतो, पिकाला संगीत देतो, असा तो प्रभू, तो आहेच सर्वांच्या पाठीमागे, तो खरा पाठीराखा. क्षणभंगुर टिकणारे आईबाप जातील. परंतु तो शाश्वत मायबाप आहेच आहे.' ती गेली. तिने ज्वाळा कवटाळल्या. ती अमर झाली. मी अभागिनी राहिले. परंतु मी वत्सलेला वाढवीत आहे. ती तरी वाढो. तिचा संसार पुढे सुखाचा होवो. का माझ्या हाताला यशच यायचे नाही? माझा पती, तो गेला! माझा पुत्र, तोही गेला, माझी सून तीही गेली. आता ही एक नात काय ती राहिली आहे. आज मनात येत होते की, ती तरी राहील का? ती एकदा अनुरूप पतीच्या घरी जाऊ देव माझे डोळे मिटू देत. कार्तिक, शेकडो स्मृती मी एकटी बसले म्हणजे मनात येतात, ती तलवार, तो भाला, ते धनुष्य, ही इकडे असलेली ढाल. या निर्जीव वस्तू नाहीत. किती प्रसंग, किती आठवणी! आणि तुला सांगू का एक आठवण? ऐक. कुरुक्षेत्रावर लढाईला जाण्याचे आदल्या दिवशी त्यांनी रानातून अशोकीच्या लाल फुलांचा तुरा आणला व मला म्हणाले, “कसा आहे सुंदर तुरा. थांब, तुझ्या कानात घालू दे." मी म्हटलं, 'मी भिल्लीण दिसेन आणि अशोकीची फुले शेवटी शोक देतात. सीतेचे सुसकारे व अश्रू यांच्यावर त्यांची वाढ झाली. अशुभ आहेत ही फुले.' ते हसले व म्हणाले, 'देवाच्या जगात अशुभ काही नाही. मी रणांगणावर मेलो तरी ते मंगलच आहे. मनात काहीतरी आणतेस. घाल ही कानात फुले.' मी खरंच कानात फुले घातली व त्यांनी टाळी वाजविली. ती त्यांची शेवटची प्रेमाची देणगी-प्रेमाची ती खूण. फुले मी जपून ठेवली. ते गेले. अशोकीची फुले शोकदायक ठरली. जणू 'मी मेलो तरी शोक करू नकोस' ह्या हेतूने का अशोकीची फुले त्यांनी दिली ? कर्तव्य करावे, शोक करू नये. शोकाने कर्तव्याची विस्मृती होते. प्रेम शेवटी कर्तव्यात परिणत झाले पाहिजे. पिकलेले प्रेम म्हणजे कर्तव्य व पिकलेले कर्तव्य म्हणजे प्रेम. शेवटी कर्तव्य प्रेमरूप होते व प्रेम कर्तव्यरूप होते. अशी का शिकवण आहे त्या मुक्या फुलांत ? अशोकीची फुले ! ती संन्यासी वेषाने नटलेली असतात! अशोक व्हावयाचे असेल तर आनासक्त रहा. आसक्तीची होळी करा असे का ही फुले सांगतात? ती वाळलेली फुले, किती वर्षे झाली त्या गोष्टीला? चाळीस वर्षे होऊन गेली, परंतु चंदनाच्या करंडकात ती वाळलेली फुले मी ठेवली आहेत. ज्या ज्या वेळेस मला अपार शोक होतो, दुःखाच्या आठवणी येतात, हृदय जळू लागते त्या त्या वेळेस तो अमोल करंडक मी हृदयाशी धरते. शोकसागर तरुण जाण्याचा तो माझा भोपळा आहे. तो करंडक म्हणजे माझा सेतू, माझा आधार, माझा विसावा! हा पाहा मी पदरात धरला आहे ह्या वेळेला, तू येण्याचे आधी स्मृतिसागर हेलावून आला होता. ह्या करंडकाच्या ह्या नावेचा आधार घेतला. ही बघ, ही चंदनाची डबी, ही सुंदर करंडिका रत्नाकराला त्याच्या एका नागमित्राने दिली होती. रत्नाकरास नागाबद्दल प्रेम वाटे, कसे काळेसावळे दिसतात, जणू गगनाची बाळे, समुद्राची मुले! असे म्हणायचा. त्याचे हृदय तो जिवंत असताना मला कळले नाही. आज अधिक यथार्थपणे मी त्याला जाणू शकते. रत्नाकर काळाच्या पुढे होता. त्याच्या काळात त्याचे विचार कोणाला पार रुचत नसत. समजत नसत. तो मेल्यावर त्याची ही डबी, नागमित्राने दिलेली ही प्रेमाची भेट, तिच्यातच माझी पतीची भेटही मी ठेवली. ही चंदनाची लहानशी डबी! परंतु ह्या डबीत अंतर्बाह्य माझ्या पुत्राचे व पतीचे जीवन भरून राहिले आहे आणि आर्य व नागजातीचे प्रेमही त्यात मिसळलेले आहे. माझा सारा ठेवा ह्यात आहे.” असे म्हणून सुश्रुतेने तो चंदनी करंडक मस्तकी धरला. तिने डोळे मिटले. जणू भारताच्या ध्येयाची ती पूजा करीत होती. भारताचे ईश्वरनिर्मित कर्म डोक्यावर धरून पवित्र होत होती.

कार्तिक सारे ऐकत होता, बघत होता. ती पवित्र समाधी त्याच्याने भंगवेना. हळूहळू तिने डोळे उघडले. तो करंडक हातात होता.

“वास येतो आहे चंदनाचा. " कार्तिक म्हणाला.

“तो चंदनाचा आहे का त्या नागबंधूंच्या प्रेमाचा आहे?” तिने विचारले. “सुश्रुताआजी, वत्सलेचे वडील आज असते तर त्यांनी कोणाची बाजू घेतली असती? नाग व आर्य यांची सारखी भांडणे होत आहेत. काय करावे कळत नाही. मी ज्या आश्रमात राहतो, तेथे नागांचा द्वेष शिकविला जातो. मला तेथे राहण्याची इच्छा होत नाही. परंतु बाबांचा हट्ट. घरी येथे आलो आहे तर लहान भाऊ सारखे नागांच्या विरुद्ध बोलत असतात. कारण बाबा तेच त्यांना शिकवतात. नाग का वाईट आहेत? जरा दिसतात काळे म्हणून का वाईट झाले ते? त्यांच्यातही शूर, त्यागी व प्रेमळ लोक आहेत. मग ही का भांडणे ? आज नदीवर मारामारी झाली. आर्य तरुण पोहत होते तेथे एक नाग तरुण आला. तेथे पाणी खोल होते. उड्या मारण्याची तेथे गंमत होती. परंतु आर्य कुमागंनी त्याला हाकलले. मग तिकडून नागकुमारांची टोळी आली. चांगलीच जुंपली. मी दोघांना शांत राहा सांगितले. 'नदी तर दोघांनाही या म्हणत आहे. ती कोणालाच ना म्हणत नाही. तिला काय वाटेल तुमची भांडणे पाहून? ती रडेल.' असे मी म्हटले. परंतु इतक्यात पाऊस येईल असे वाटले. टपटप पाणी पडू लागले. त्यामुळे मारामारी थांबली. आकाशाच्या अश्रूंनी थांबवले भांडवण! ‘मी तुम्हा सर्वांना माझ्या पांघरुणाखाली घेत असतो. मग तुम्ही का एकमेकांना जवळ घेत नाही?' असे का ते आकाश मुके अश्रू ढाळून त्या मुलांना शिकवीत होते? सुश्रुताआजी, गोष्टी वाईट थराला जाऊ लागल्या आहेत. मी माझा आश्रम सोडून देऊ का? परंतु बाबा रागावतील! आश्रम सोडायचा तर घरही सोडले पाहिजे. " कार्तिक म्हणाला.

“विचार कर व काय ते ठरव. पृथ्वी विपुल आहे. कोठेही कष्ट करील त्याला पोट भरता येईल.” सुश्रुता म्हणाली.

“आजी, केवळ पोट भरण्याचा प्रश्न नाही. आईबापांच्या प्रेमालाही मुकण्याचा प्रश्न आहे. वत्सला आई नाही म्हणून रडते आणि मी का असलेले आईबाप सोडून जाऊ?” त्याने विचारले.

“मी तसे नाही सांगत. परंतु आईबापांपेक्षाही ध्येय जर मोठे वाटू लागले, आईबापांच्या इच्छांपेक्षा आपल्या आत्म्याची हाक जर अधिक महत्त्वाची वाटू लागली, तर मग त्यांचाही त्याग विहित आहे. 'आत्म्याच्या भेटीसाठी सर्व विश्वाचाही त्याग करावा' असे ब्रह्मवेत्त्यांनी सांगितले आहे.” सुश्रुता म्हणाली.

“वत्सला आश्रमातून केव्हा येणार? ती का शिकतच राहणार? किती तरी दिवसांत ती भेटली नाही. कधी आली होती येथे ? वसंतोत्सवातसुद्धा नव्हती ना आली?” कार्तिकाने उत्सुकतेने विचारले.

“ती म्हणते, 'मी शिकेन व ब्रह्मवादिनी होईन. मला नको विवाह. मला नको संसार. मी विश्वाचा संसार करीन. लहान मुलाची आई होण्यापेक्षा ईश्वराची आई होण्याची मला इच्छा आहे. मी माझ्या जीवनात ईश्वराला वाढवीन. ब्रह्माला वाढवीन. माझ्या जीवनात अंतर्बाह्य परमेश्वर भरून राहील.' असे ती बोलते. काय आपण बोलतो ते तिचे तिला तरी समजते की नाही कोणास ठाऊक? मोठमोठी वाक्ये उच्चारते खरी, मीही तिच्या इच्छेविरुद्ध जात नाही. घरी मी लग्नाची गोष्ट काढीन म्हणून ती येतच नाही अलीकडे.” सुश्रुता म्हणाली.

“ वत्सलेला कितवे हे वर्ष, आजी?” त्याने हळूच विचारले.

“परीक्षिती राजाचा जनमेजय व वत्सला एकाच दिवशी जन्मली. वत्सलेला आता सतरावे वर्ष लागले. तशी काही फार मोठी नाही. शिकू दे, आपोआप एक दिवस येईल कंटाळा. मग वाटेल कधी संसारात पडेन असे. लहान मूल म्हणजेच भगवंताचे, परब्रह्माचे सानुले रूप असे मग तिला वाटेल आणि ते खरेही आहे. परब्रह्म सर्वत्र आहे, तर ते माझ्या मुलातही नाही का? माझ्याही मुलात आहे, नागांच्याही मुलांत आहे. दोघे वाढू देत. हसू देत, खेळू देत, सुखी होऊ देत, नाही का कार्तिक ? तू परत केव्हा जाणार आश्रमात? वाढदिवसासाठी आला होतास, तो तर झालाही. अजून घरात गोड शिल्लक आहे वाटते?” हसून तिने विचारले.

“ वत्सला येणार म्हणून कोठे तरी ऐकले. यासाठी राहणार होतो, भेटलो असतो तिला, पाहिली असती पुष्कळ दिवसांनी, येणार आहे का ती, आजी?”

त्याने जिज्ञासेने विचारले. “नाही रे, बाळ. आता येण्याला कारणही नाही." ती म्हणाली. “आजी, वत्सला नागजातीवर प्रेम करते का तिचा तिरस्कार करते? तिचे काय आहे मत?" त्याने प्रश्न केला.

"ती प्रेम करते. तिचे वडील तर नागकन्येजवळ लग्न करणार होते. ही गोष्ट कळल्यापासून तिच्या जीवनात क्रांती झाली. 'आजी, मला लग्न नकोच मुळी, परंतु कधीकाळी केले तर नागकुमाराजवळ मी लग्न करीन. परंतु तू नाही ना विरोध करणार? बाबांना तू नागकन्येजवळ लग्न लावू दिले नाहीस. पण तुझ्या नातीला तरी तू नागतरुणाजवळ लग्न लावू देशील की नाही? सांग ना आजी.' असे एक दिवस ती मला म्हणाली. मी सांगितले, 'नाही हो विरोध करणार. नाग काय, आर्य काय, मानवच सारे गुण असले म्हणजे झाले. मी पूर्वी वेडी होते. अडाणी होते. परंतु ज्या नागांसाठी तुझा पिता आगीत शिरला, त्या नागांचा आता मी कसा द्वेष करू? माझ्या मुलाने स्वतःच्या बलिदानाने मला ब्रह्मज्ञान दिले, वेदान्त शिकविला. त्याच्या जगण्याने शिकले नाही ते त्याच्या मरणाने मी शिकले. वत्सले, लग्न कर. अशी नको राहू. कुलतंतू तुटू नये म्हणून तुझे आजोबा सदैव इच्छित. म्हणून त्यांनी मला सती जाऊ दिले नाही. करशील ना तू लग्न?' ती हसली. 'मी नाही करणार लग्न, मी ज्ञानाशी लग्न लावीन, ब्रह्माशी लावीन.' असे म्हणून प्रेमाने ती मला बिलगली; माझ्या मांडीवर डोके ठेवून निजली. गोड आहे वत्सला. किती सुंदर व प्रेमळ ! आवाज कसा गोड आहे! आमच्या गाई गुराखी चारून आणी. वत्सला त्याच्याजवळ गाणी शिके. सारे तिला हवे, तीर मारायला शिकली, तलवार फिरवायला शिकली, पोहायला शिकली होती. परंतु पुरात उडी टाकायला भिते. कधी उंच झाडावर चढते व मला म्हणते, 'आजी, मी वानर, मी चिमणी; मी पोपट; मी मैना; मी कोकीळ; मी कावळा.' साऱ्या पक्ष्यांची नावे घेते. वरून विचारते, 'आजी, झाडांवरून आकाशाला हात नाही लागत. खालून आपलं उगीच वाटते की हात लागेल.' असे बोलणे, कसे हसणे! एकदा तिचा सुखाचा संसार पाहिला म्हणजे मग दुसरी मला इच्छा नाही.” सुश्रुता म्हणाली. “जातो, आजी, मी कदाचित मोठ्या पहाटे उठून जाई. आताच तुम्हाला नमस्कार करतो.” असे म्हणून कार्तिक सुश्रुतेच्या पाया पडला.

कार्तिक गेला. त्याचे का वत्सलेवर प्रेम होते? त्याच्या हृदयात का वत्सला शिरली होती, जीवनात आली होती? वाढदिवसासाठी म्हणून तो आला होता का वत्सला कदाचित भेटेल म्हणून आला होता? वत्सला येणार असे त्याला कळले होते, त्यामुळे का तो आला? वत्सलेला तो आवडला का? त्याच्या घराण्यात तर नागांचा द्वेष, त्याचे वडील तर नागाला दारात उभे करू देत नसत. वत्सला त्या घरात कशी जाईल? परंतु कार्तिक तसा नव्हता. त्याने नाग व आर्य तरुणांची मारामारी होऊ दिली नाही. तो समन्वयवादी होता, परंतु तो आर्य होता. 'लग्न लावायचेच झाले तर नाग तरुणाशी लावीन' असा वत्सलेचा निश्चय त्याने ऐकला व तो जरा निराश झाला. सुश्रुतेच्या लक्षात ती गोष्ट आली. ती विचार करू लागली. कार्तिक सौम्य वृत्तीचा तरुण होता. त्याच्यात तडफ नव्हती, धमक नव्हती, परंतु प्रसंगविशेषी त्याचे तेज प्रकट होत असे. तसा तो वाईट नव्हता. लहानपणी वत्सला व तो एकत्र खेळली होती. पाण्यात डुंबली होती. सुश्रुतेकडे तो अनेक वेळा जेवला होता; वत्सलाही कार्तिकाच्या घरी जेवली होती. परंतु ते सारे लहानपणी. लहानपणी मिळाले ते मोठेपणी मिळेल का? लहानपणी एकत्र जेवली, परंतु मोठेपणी एकत्र जेवतील का? मोठेपणी एकत्र राहतील का? पतीपत्नी म्हणून एकत्र राहू शकतील का?

सुश्रुतेने आपल्या एका मांडीवर वत्सला व एका मांडीवर कार्तिक लहानपणी निजविली होती. त्या दिवशी कार्तिकाला त्याच्या वडिलांनी मारले होते. तो रडायचा थांबेना. त्या दिवशी, 'आमच्याकडे चल, कार्तिक वाईट आहेत तुझे बाबा' असे म्हणून वत्सलाने त्याला घरी आणले होते. तो रडायचा थांबला. “तुझे बाबा नाहीत ते किती छान ! तुला नाही कोण मारणार.” असे त्या दिवशी तो बोलला व 'असे नये हो बोलू' म्हणून सुश्रुतेने त्याच्या तोंडावर हात ठेवला. दोघा मुलांना तिने मांडीवर निजविले. त्या दिवशी कार्तिक घरी गेला नाही. रात्री सुश्रुतेजवळच निजला. एका कुशीत कार्तिक, एका कुशीत वत्सला!

सुश्रुतेला सारे प्रसंग आठवू लागले. परंतु त्या वेळची वत्सला आज नव्हती. आज ती स्वतंत्र विचारांची, तेजस्वी कल्पनांची नवतरुणी होत होती. ती बंधनात पडू इच्छित नव्हती. आकाशाला मिठी मारू पाहत होती, दिक्कालातील तत्त्वाला भेटू पाहत होती! वेडी वत्सला ! शेवटी परब्रह्म एका मूर्तीत आहे, एका प्रेमसेवेत आहे, एका कटाक्षात आहे, अनंत काळ एका क्षणात आहे, एका मधुर स्मृतीत आहे, हे तिला शिकावे लागेल, सुश्रुता हसली. बंधनातच एक दिवस वत्सला मोक्ष मागील हे मनात येऊन सुश्रुता हसली!
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा