shabd-logo

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023

74 पाहिले 74
सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो; परंतु निदान मानवजातीपुरते तरी त्याने विशाल दृष्टीचे नको का व्हायला ?

या भरतभूमीत प्राचीन काळापासून परस्परभिन्न संस्कृतींचे संघर्ष सुरू झाले. भारताबाहेरील आर्य व एतद्देशीय थोर संस्कृतिसंपन्न अनार्य यांच्यामध्ये अनेक झगडे माजले. वेदांमधून या वैरांची वर्णने आहेत. दक्षिणेकडील वानर म्हणजे अनार्य लोकच. लंकेतील रावण हा आर्य होता. तो आपले साम्राज्य वरती नाशिकपर्यंत पसरवीत आला. वालीचे व त्याचे युद्ध झाले. या काळ्यासावळ्या एतद्देशीय लोकांना तो तुच्छतेने वानर म्हणे. परंतु दुसरे काही आर्य या अनार्य लोकांत प्रेमाने मिसळले. अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आला व या द्रवीडियन जनतेत मिसळला. त्याने तेथील लोकांच्या भाषेची व्याकरणे लिहिली. तामीळ भाषेचा पहिला व्याकरणकर्ता अगस्ती मानतात. तामीळ भाषा अत्यंत प्राचीन अशी सुसंस्कृत भाषा आहे. आर्य ऋषींनी अनार्य लोकांत आपले आश्रम स्थापिले, संस्कृतींची देवाण-घेवाण सुरू झाली. रामाला आर्य ऋषींनी अनार्यांची बाजू घेण्यास लाविले. रावणाचा रामाने पराजय केला. आर्य व अनार्य यांना जोडणारा राम हा पहिला महान पुरुष होय. राम सर्वांना प्रेमाने जवळ घेत आहे, अद्वैत वाढवीत आहे, गुण्यागोविंदाने नांदावयास शिकवीत आहे. राम हा मानव्याची उपासना करणारा आहे. माणुसकीचा धर्म तो ओळखतो.

आर्य व अनार्य एकमेकांत मिसळू लागले. परस्परांत विवाह होऊ लागले. परंतु कधी कधी आपल्या आर्यत्वाचा टेंभा मिरविणारे प्रतिष्ठित पुढारी दिसून येत व ते अनार्यांचा उच्छेद करू बघत. आज ज्याप्रमाणे हिटलर सर्व ज्यू लोकांना हाकलून देत आहे, त्याप्रमाणे जनमेजय सर्व नागजातींचा उच्छेद करावयास सिद्ध झाला होता. अर्जुनाने नागकन्यांशी लग्ने लाविली होती, परंतु नाग- स्त्रीपासून झालेल्या बभ्रुवाहनाला अभिमन्यूहून अर्जुन हीन समजत असे! परीक्षितीचा एका नागनायकाने खून केला त्यामुळे जनमेजय चिडला. सर्व नागजातीला जाळून भस्म करा, असे त्याचे अमानुष आदेश सुटले. ठायीठायी नागलोक जिवे जाळले जाऊ लागले. जे कोणी नागांना आश्रय देतील त्यांनाही तेच प्रायश्चित्त मिळेल असे उद्घोषिण्यात आले.

अशा वेळी भारतीय संस्कृतीचा संरक्षक भगवान आस्तिक उभा राहिला. मांगल्यावर ज्याची श्रद्धा तोच खरा आस्तिक! अद्वैत निर्माण करू पाहील तोच खरा आस्तिक! आस्तिक ऋषीस प्रत्यक्ष दृश्य संसारात अद्वैत पाहावयाचे होते. दृश्य संसारातील विरोध, वैषम्ये दूर करण्यासाठी प्रयत्न न करता परलोकाच्या गप्पा मारणारे ते खरोखर नास्तिक होत! तो खरा आस्तिक - की जो आजूबाजूला जे दिसत आहे त्याला सुंदरता आणू पाहतो. आज जे आस्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर नास्तिक आहेत, व जे नास्तिक म्हणून समजले जातात ते खरोखर आस्तिक आहेत. गीतेत सांगितले आहे की, यज्ञ न करणाऱ्याला हा लोक तर नाहीच, मग परलोक तर दूरच राहिला! म्हणजे या लोकाचे महत्त्व सांगतात. जीवयात्रा, लोकयात्रा हे शब्द प्राचीन मुनी महत्त्वाचे मानीत. संसाराला ते तुच्छ नसत मानीत. केवळ स्वतःच्या संसाराला पाहणे म्हणजे मिथ्या होय; परंतु समाजाच्या ध्येयाने स्वतःचा संसार पाहिला तर तो मिथ्या नाही. मला एकट्याला या जगात काय करता येणार? समाजामुळे मी पोसला जात आहे. समाजाची सेवा करण्यात व्यक्तीचा विकास आहे.

तो महर्षी आस्तिक समाजाची शकले झालेली शांतपणे कसा पाहील? आस्तिक उठला व नागलोकांना जाळणाऱ्या जनमेजयासमोर उभा राहिला. आस्तिकाची आई नागकन्याच होती! जनमेजयाला आस्तिक म्हणाला, “अरे, मलाही होळीत फेक, मीही नागकन्येच्या उदरातील आहे!” तपस्वी आस्तिकाचा महान त्याग पाहून जनमेजयाचे डोळे उघडले. नागजात का हीन समजायची? ज्या जातीत आस्तिकासारखी विश्ववंद्य माणसे निर्माण होतात, ती जात का तुच्छ ?

जनमेजयाने आस्तिकाचे पाय धरले. ते सर्पसत्र थांबले. आस्तिकाने भारताचे उज्ज्वल भवितव्य त्या दिवशी सांगितले. आस्तिक म्हणाले, “जनमेजया ! अरे, जगात कोणी तुच्छ नाही, कोणी उच्च नाही. सर्वांच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. आर्यांत काही गुण आहेत, अनार्यांतही आहेत. दोघांत दोषही आहेत. आपण परस्परांचे दोष न बघता दोषांखाली दडपलेली आंतरिक गुणसंपत्तीच पाहिली पाहिजे. जो दुसऱ्या जातिजमातींस सदैव हीन लेखील, तो नास्तिक समज. या अफाट देशात अनेक जाती आणि वंश आहेत. तुम्ही आर्य बाहेरून आलात. आणखीही अशाच जाती येतील. आज तुम्ही जो पायंडा पाडाल तो पुढे टिकेल. या भरतभूमीत शेकडो जातिजमाती एकत्र नांदत आहेत, असा प्रयोग होऊ दे. आर्य आणि अनार्य एक व्हा. आर्यांची दैवते अनार्यांची होवोत. अनार्यांची आर्यांची होवोत. आर्यांच्या सुंदर चालीरीती अनार्य घेतील, अनार्यांच्या सुंदर चालीरीती आर्य घेतील. अशा रीतीने नवीन भव्य संस्कृती निर्माण होवो. भारतीय संस्कृती म्हणजे सहस्र पाकळ्यांचे, शतरंगाचे भव्य कमल! या फुलात शेकडो विविध सुगंध निर्माण होवोत. नाना रंग, नाना गंध ! जनमेजया, नागजातीला सर्प हे दैवत फार प्रिय व पूज्य वाटते. तुझ्या पित्याने सापाला मारून तो मृत सर्प एका ऋषीच्या गळ्यात अडकविला ! नागांच्या दैवतांचा हा उपहास होता. नागांची नागपूजा तुम्हीही घ्या. नागपंचमीचा दिवस आपण रूढ करू या. आर्य व नागजातींच्या ऐक्याची ती खूण भावी पिढ्यांस मार्गदर्शन करील! "

भारतीय संस्कृतीचा हा महान विशेष आहे. अभेदात भेद व भेदात अभेदता हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. त्या प्राचीन ऋषीने एक पृथ्वीमोलाचा मंत्र सांगून ठेवला आहे:

"एक सत् विप्रा बहुधा वदन्ति"

“सत्य वस्तू एकच आहे; परंतु तिला नाना प्रकारे संबोधण्यात येत असते.” शेकडो दैवते एकाच शक्तीची नावे आहेत. एकाच पाण्याला ज्याप्रमाणे जल, नीर, वारी वगैरे नावे आपण दिली आहेत, त्याप्रमाणे या विश्वापाठीमागील शक्तीला आपण अनेक नावे देतो. आपण या नावांसाठी भांडतो! आतील अर्थ पाहू गेलो तर आपण केलेल्या अनर्थांचे आपणांस हसू येईल. आपण लाजेने मान खाली घालू.

आर्य व अनार्य यांच्या शेकडो दैवतांची एकी करण्यात आली. दैवतांची एकी करून मानवांचे ऐक्य साधण्यात आले. देवतांच्या हीन स्वरूपास आध्यात्मिक स्वरूप देण्याचे प्रयत्न झाले. अद्वैत अनुभवण्याचा तो केवढा महान प्रयत्न होता!

भारतीय संस्कृतीत प्रत्येक तत्त्व मनावर ठसविण्यासाठी काही प्रतीके सांगितलेली असतात; परंतु या प्रतीकांतील महत्त्व नाहीसे होऊन ते प्रतीक निर्जीव मढे होऊन जाते. प्रतीकातील अर्थ विलुप्त होतो व प्रतीकाची पूजा केवळ यंत्रवत सुरू होते. अद्वैताचे तत्त्व मनावर ठसविण्यासाठी एक महान प्रतीक सांगण्यात आले आहे.

समुद्रावर स्नानाला जा, संगमावर स्नानाला जा, नदीवर स्नानाला जा असे आपणांस शिकविण्यात आलेले आहे. आपण जेथे स्नान करू, तेथला भाव शरीर स्वच्छ होत असता मनातही शिरत असतो. नळावर स्नान करणाऱ्या माणसाचे हृदय नळाच्या तोंडाएवढे आकुंचित व क्षुद्र होण्याचा संभव असतो. विहीर नळापेक्षा बरी; परंतु विहीरही चोहोंकडून बांधून घेतलेली असते. तिचे तोंडही चिंचोळेच असते. परंतु नदी? ती खळखळ वाहात असते. शेकडो मैल जात असते. नदीवर स्नान करण्यात म्हणे पुण्य आहे! कोणते पुण्य ?

नळाखाली भिजलेले डोके नळासारखे होईल, नदीत बुडलेले डोके नदीप्रमाणे होईल. नदी पाप दूर करते. डोक्यातील घाण व हृदयातील घाण अंगावरील घाणीबरोबर वाहून जाते. नदी म्हणजे काय? नदी म्हणजे शेकडो ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रवाहांचे परममंगल अद्वैत दर्शन होय ! नदी म्हणजे अद्वैताची मूर्ती ! नदी म्हणजे सुंदर, उदार, परमोच्च सहकार्य ! ते शेकडो प्रवाह परस्परांस तुच्छ समजत नाहीत. गटार येवो की दुसरा कोणता प्रवाह येवो, सारे एकत्र येतात. “आपल्यातील घाण खाली बसेल, आपल्यातील प्रसन्नता प्रकट होईल.” या अमर श्रद्धेने सारे प्रवाह एकमेकांत मिसळतात, एकमेकांशी सहकार्य केल्यामुळे त्यांचा महान प्रवाह होतो. हे प्रवाह परस्परांपासून अहंकाराने दूर राहते, तर त्यांचा विकास झाला नसता. त्यांना लांबी, रुंदी, खोली प्राप्त झाली नसती. शेकडो एकर जमीन त्यांना सुपीक करता आली नसती. ते अहंकारी प्रवाह आटून गेले असते, नाहीसे झाले असते, त्यांच्यात किडे पडले असते. परंतु ते एकमेकांतील अभिजात पावित्र्य पाहून एकत्र आले व महान नदी निर्माण झाली.

नदीत बुडविलेल्या डोक्यात हे विचार उत्पन्न झाले पाहिजेत. नदीचे हे अद्वैत – गायन बुद्धीला ऐकू आले पाहिजे. परंतु गंगेवर अंघोळ करणारे गंगापुत्र दगडाहून दगड राहतात! सर्व प्रवाहांना जवळ घेणाऱ्या त्या नदीत उभे राहून ते दुसऱ्याचा उपहास करीत असतात! “तू तुच्छ, तू पतित, तू तिकडे जा - " असा रुद्र म्हणत असत व नदीत डुंबत असता मानवाचा उपमर्द हे करीत असतात. शेकडो वर्षे नदीत डोकी बुडत आहेत, परंतु डोकी खोकीच राहिली आहेत!

नदीपेक्षा संगम अधिकच पवित्र ! अद्वैताचा अनुभव घेणाऱ्या दोन संतांची भेट म्हणजे केवढे पवित्र दर्शन! वसिष्ठ-वामदेवांची भेट, रामदास-तुकारामांची भेट, महात्माजी व रवीन्द्रनाथ यांची भेट, जवाहरलाल व मानवेंद्र रॉय यांची भेट - म्हणजे ते महान काव्य असते.

“सतां सद्भिः सङ्गः कथमपि हि पुण्येन भवति ॥"

हजारो प्रवाहांनी पोटाशी घेत एक नदी येते, दुसरीकडून दुसरी एक तशीच नदी येते, व दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात! गंगा, यमुना व सरस्वती यांच्या संगमाला आपण अत्यंत पवित्र मानिले आहे. एकाच शुभ्र -स्वच्छ उंच हिमालयापासून गंगा-यमुना निघाल्या! परंतु गंगा जरा गोरीगोमटी; ती अहंकाराने वरून वरून चालली. यमुना काळीसावळी; जरा दुरून दुरून चालली. परंतु काळ्या यमुनेला प्रेमाने मिठी मारल्याशिवाय गंगेला शतमुखांनी सागराला भेटता येणे शक्य नव्हते. ती अहंकारी गंगा नम्रपणे थबकली. तिकडून यमुना आली. गंगेने हात पुढे केले. “ये, यमुने ये. तू काळीसावळी म्हणून मी तुला तुच्छ मानिले. परंतु तुझ्या तीरावर गोपालकृष्णाने भक्तिप्रेमाचा पाऊस पाडला. राव- रंक एक केले. सर्वांना 'सह नौ भुनक्तु'चा अनुभव दिला. ऐक्याची मुरली तुझ्या तीरावर वाजली. आकाशातील देव तुझ्या पाण्यात मासे झाले. तुझा महिमा थोर आहे. तू दिसायला काळीसावळी, परंतु आत- अंतरंगी अत्यंत निर्मळ आहेस. ये, मला भेट!” गंगेला गहिवरून आले. तिला बोलवेना.

यमुनाही उचंबळली. ती म्हणाली, “गंगाताई ! तू माझी स्तुती करतेस, परंतु तुझा महिमाही अपार आहे. माझ्या तीरी भक्ती वाढली, परंतु तुझ्या तीरावर ज्ञान वाढले. योगिराजा भगवान पशुपती तुझ्या तीरावर ज्ञानात तल्लीन झाला. शेकडो ऋषि- महर्षी तुझ्या तीरावर तपश्चर्या करीत असतात. मोठेमोठे राजे राज्ये तृणासमान मानून तुझ्या तटाकी ब्रह्मचिंतन करितात. गंगाताई, तू म्हणजे मूर्त ज्ञान

आहेस. मला तुझ्या शुभ्र पायांशी लोळण घेऊ दे !” गुप्त असणाऱ्या सरस्वतीची गंभीर वाणी ऐकू आली:

“ज्ञानाशिवाय भक्ती अंधळी आहे, भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे, आणि कर्मात अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान - भक्तीस अर्थ नाही. ज्ञानमयी गंगा भक्तिमय यमुनेत मिळू दे, आणि कर्ममय सरस्वतीस भक्ति-ज्ञानाचा स्पर्श होऊ दे. गंगा, यमुना व सरस्वती म्हणजे ज्ञान, भक्ती व कर्म यांचा मला संगम वाटतो. गंगाजमनी भांडे आपण पवित्र मानतो. दोन डोळ्यांतून घळघळणाऱ्या अश्रुधारांना आपण गंगा-यमुना म्हणतो. गंगा-यमुना आपल्या जीवनात शिरल्या आहेत. परंतु जेथे शिरल्या पाहिजे होत्या, तेथे अद्याप शिरल्या नाहीत. पांढरपेशांची गंगा काळ्यासावळ्या श्रमजीवी लोकांच्या यमुनेस अद्याप मिळाली नाही. पांढरपेशे लोक स्वतःला पवित्र व शुद्ध समजून बहुजनसमाजापासून दूर राहिले आहेत. वरिष्ठ वर्ग व कनिष्ठ वर्ग एकत्र येऊन प्रेमाने परस्परांस जोपर्यंत कवटाळीत नाहीत, तोपर्यंत भारताच्या ललाटीचे दास्य दूर होणार नाही. आणि समुद्रात स्नान करणे म्हणजे तर पावित्र्याची परम सीमा.

"सागरे सर्व तीर्थानि"

जगातील सर्वच प्रवाह समुद्र जवळ घेतो. म्हणून तो सदैव उचंबळत आहे. पाऊस पडो वा न पडो, समुद्राला आटणे माहीत नाही. जो सर्वांना जवळ घेईल त्याच्याजवळ सर्व तीर्थे आहेत, असे ऋषी सांगत आहेत.

"देव रोकडा सज्जनी"

भेदाभेद जाळून सर्वांना उराशी धरणाऱ्या सज्जनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष रोखठोक देव आहे. प्रत्यक्षावगम परमेश्वर तेथे आहे.
भारतीय संतांनी अशा रीतीने हा वस्तुपाठ आम्हाला दिला. परंतु त्यातील महान अर्थ कधीही आम्ही मनात आणिला नाही. संगमावर व समुद्रात स्नाने करून पापे जळणार नाहीत; त्या संगमावर व समुद्रात स्नाने करून परत आल्यावर त्यांचा महान अद्वैताचा संदेश प्रत्यक्ष जीवनात आणला तर समाज निष्पाप होईल, निर्दोष होईल. समाजात वाण उरणार नाही, घाण राहणार नाही, दुःख दिसणार नाही, सर्वत्र प्रसन्न असे वातावरण निर्माण होईल.

अद्वैताचा अशा रीतीने जीवनात साक्षात्कार कोणता भारतपुत्र करू पाहात आहे? आपण सर्वत्र डबकी निर्माण केली आहेत! चित्पावन, कऱ्हाडे, देशस्थ, यजुर्वेदी, शुक्लयजुर्वेदी, मैत्रायणी, हिरण्यकेशी अशी ब्राह्मणांतच शेकडो डबकी आहेत. आधी एकेका जातीचे डबके आणि त्या डबक्यात पुन्हा आणखी डबकी ! डबकी करून राहणारे व अहंकाराने टरोंटरों करणारे आपण सगळे बेडूक झालो आहोत! चिखलात उड्या मारावयाच्या व चिखल खायचा हे आपले पवित्र ध्येय झाले आहे!

जाति-जातींची, स्पृश्यास्पृश्यांची, ब्राह्मण-ब्राह्मणेतरांची, हिंदु- मुसलमानांची शेकडो डबकी आहेत. गुजराती, महाराष्ट्रीय, मद्रासी व बंगाली ही प्रांतीय डबकी शिवाय आहेतच ! डबक्यात राहणाऱ्यांस प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त होत नसतो. डबकी साचली की घाण निर्माण होते. डास-मच्छर यांचा बुजबुजाट होतो. रोग उत्पन्न होतात. भरतभूमीला भले दिवस यावेत अशी जर इच्छा असेल, तर ही डबकी दूर करण्यासाठी आपण उठले पाहिजे. भेदांच्या भिंती जमीनदोस्त केल्या पाहिजेत. सारे प्रवाह प्रेमाने जवळ येऊ देत. उचंबळू दे सागर !

"जाळीन भी भेद । येथे प्रमाण तो वेद"

अशी तुकाराममहाराज प्रतिज्ञा करीत आहेत. समाजाच्या कल्याणाची तळमळ असणारा प्रत्येक मनुष्य अशीच प्रतिज्ञा करील. भारतीय संस्कृतीच्या उपासकांनो! केलेत पाप तेवढे पुरे. उठा व हरिजनांना पोटाशी धरा. सर्व पददलित जनतेला प्रेमाने कवटाळा. एकाच ईश्वराची आपण सारी लेकरे. एकाच शुभ्र स्वच्छ चैतन्याची आपण रूपे. जितके जितके आपण प्रेममय होऊ, अद्वैत होऊ, तितके आनंदाने, भाग्याने उचंबळू.

जो दुसऱ्यास तिरस्कृत करील, तो स्वतः तिरस्कारिला जाईल. जो दुसऱ्यास तुच्छ लेखील, त्यालाही लाथा बसतील. आपण आपल्या पापांची फळे आज भोगीत आहोत. आपण दास्य पेरले, ते आज पोटभर मिळत आहे. आपण सर्वत्र गुलामगिरीला पुष्ट केले. पुरुषांची स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी, स्पृश्यांची अस्पृशांवर गुलामगिरी, रावांची रंकांवरील गुलामगिरी, सावकारांची कुळांवर गुलामगिरी, ज्ञानवंतांनी अज्ञानी जनतेवर लादलेली गुलामगिरी, शतमुखी गुलामगिरी आपण निर्माण केली व आज संपूर्णपणे गुलाम झालो आहोत. मराठ्यांचे राज्य अद्वैताच्या आधाराने निर्माण झाले. परंतु भेदाभेद निर्माण होताच ते नाहीसे झाले. 'मराठा तितुका मेळवावा' या मंत्राने मराठ्यांचे राज्य अस्तित्वात आले. परंतु ब्राह्मण, मराठे, प्रभु, शूद्र यांची आपापसांत स्पर्धा सुरू झाली, उच्च- नीचपणा सुरू झाला आणि भगवा झेंडा भस्मीभूत झाला. मराठे उत्तर हिंदुस्थानात गेले. त्यांनी रजपूत, जाट वगैरे लोकांना जवळ घेतले नाही, त्यामुळे मराठ्यांचा मोड झाला. हळूहळू ऐक्यमंत्र वाढवीत गेले पाहिजे होते. ‘मराठा तितुका मेळवावा' असे सांगणारे समर्थ झाले. पेशव्यांच्या काळात 'हिंदुमात्र मेळवावा' असे सांगणारा दुसरा कोणी समर्थ पाहिजे होता; आणि आज 'हिंदीमात्र मेळवावा' असे सांगणारा महात्मा पाहिजे आहे.

जीवनात असे अद्वैत अनुभवणारे महात्मे हीच मानवजातीची आशा आहे. मनुष्यजातीला किती उंच जाता येते हे महापुरुष दाखवीत असतात. आकाशात कोट्यवधी अंशांच्या उष्णतेने सूर्य जळत असतो, तेव्हा आपल्या अंगात ९८ अंश उष्णता असू शकते. भगवान बुद्धासारखे महात्मे वाघिणीवरही प्रेम करतात, तेव्हा कोठे मनुष्य शेजारच्या माणसावर थोडी दया करावयास सिद्ध होतो. समाज पुढे जावा, वर जावा, यासाठी विश्वप्रेमी पुरुषाची नितान्त आवश्यकता असते. ते प्रेमाचा समुद्र जीवनात उचंबळवितील, तेव्हा कोठे प्रेमाचा बिंदू आमच्या जीवनात येणे शक्य आहे! संत हे आपल्या प्रेमाने व तपश्चर्येने समाजाचे धारण करीत असतात. “सन्तों तपसा भूमिं धारयन्ति”

अद्वैताचा मंत्र जपत जीवनात संगीत आणणारे आपले पूर्वज होते. हिंदु-मुसलमानांतही ते आशेने ऐक्य आणीत होते. हिंदूंच्या देवस्थानांना मुसलमानी राजांनी देणग्या दिल्या व मुसलमानी पीरांना हिंदू राजांनी वतने दिली. हिंदू राजे मोहरम साजरा करीत व हिंदू उत्सवांत मुसलमानही येत. अंमळनेरच्या सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी देण्याचा मान मुसलमानांचा आहे! आणि त्यांना नारळ प्रसाद म्हणून देण्यात येतो! हिंदूंच्या रथाला मुसलमान बंधूंनी मोगरी पहिल्याने द्यायची! आजच्या काळात हा मूर्खपणा व स्वाभिमानशून्यपणा समजला जाईल. परंतु पूर्वजांची दृष्टी फार थोर होती. भारतात आलेल्या सर्वांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण करणे हे त्यांचे पारंपरिक पवित्र कर्तव्य होते. आस्तिकाने पेटविलेला तो नंदादीप त्यांना विझवावयाचा नव्हता. मुसलमानांच्या मोहरमात हिंदूही सामील होत. हिंदू जमीनदारांच्या घरी ताबूत यावयाचे. मुसलमानांस नारळ व गूळ देण्यात यावयाचा. आमच्या लहानपणी आमच्या गावात हे प्रेमळ संबंध मी पाहिले आहेत. गरीब मुसलमान मुले आमच्याजवळ कागद मागावयास येत व आम्ही त्यांना ते देत असू. माझ्या शेजारच्या बंधूंचा होऊ दे चांगला डोला !

हिंदूंच्या उत्सवाला मुसलमानांस बोलाविले तर ते येतात. माझ्या एका मित्राजवळ एक मुसलमान मुलगा प्रेमाने गणपति- अथर्वशीर्षं शिकला. माझ्या एका अंमळनेरच्या मित्राकडे दत्तजयंतीला मुसलमान मित्र आले होते.

आपल्यापेक्षा आपले पूर्वज अधिक समाजशास्त्रज्ञ होते. आपण आज साम्राज्यवादी परसत्तेचे गुलाम झालो आहोत. परकीय लोक आपल्यात भेद पाडीत आहेत. आपणही भेद पाडीत आहोत. भेद पाडून गुलामगिरी लादणाऱ्या सरकारला आपण साहाय्यभूत होत आहोत. भेदांवर अभेद हेच औषध आहे. विषावर अमृताचाच उपाय; दुसरा चालणार नाही.

पूर्वजांचे प्रयोग आपण पुढे नेऊ या. अद्वैत अधिक साक्षात्कारु या. भरतभूमीत ऐक्य निर्मून मग जगाला आपण हाक मारू. ही भरतभूमी मानवजातीचे तीर्थक्षेत्र होईल. सारे धर्म, भिन्न भिन्न संस्कृती, येथे एकत्र नांदत आहोत हे ऐकून सर्व देश भरतभूमीच्या पायांपाशी येतील! हे ईश्वरदत्त महान कार्य आपणास साधावयाचे आहे! हे महान ध्येय आपणास बोलावीत आहे. या महान ध्येयासाठी बाकी सारी क्षुद्रता आपण झडझडून फेकून दिली पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या उपासकांनी श्रद्धेने त्यागपूर्वक यासाठी उठले पाहिजे.
24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा