shabd-logo

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023

19 पाहिले 19
भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो. निर्मळ हृदय व निर्मळ बुद्धी यांच्या बळावर भारतीय संस्कृती उभारण्यात आलेली आहे.

उदार विचारावर ही संस्कृती आधारलेली असल्यामुळे तिच्यात शेकडो फेरबदल झालेले आहेत. धर्मात दोन भाग असतात. एक शाश्वत तत्त्वांचा भाग, व एक अशाश्वत तत्त्वांचा भाग. जगात सर्वत्र या दोन गोष्टी आपणांस दिसून येतील. आपले शरीर बदलत असते, परंतु आतील आत्मा तोच असतो. समाजातील व्यक्ती जन्मतात- मरतात; परंतु समाज चिरंतन आहे. नदीच्या प्रवाहातील जलबिंदू सारखे बदलत असतात; परंतु प्रवाह कायम असतो.

धर्मातील यमरूप भाग बदलत नसतो, परंतु नियमरूप भाग बदलत असतो. यम म्हणजे धर्मातील त्रिकालाबाधित भाग. सत्य, अहिंसा, संयम, दया, प्रेम, परोपकार, ब्रह्मचर्य इत्यादी गोष्टींना यम अशी संज्ञा आहे. संध्या करणे, स्नान करणे, खाणेपिणे, जानवे घालणे, गंध लावणे, हजामत करणे, इत्यादी गोष्टी नियमात येतात. यम म्हणजे अचल धर्म व नियम म्हणजे चल धर्म. स्मृतींतून स्वच्छ सांगितले आहे, की यमाचा विचार न करता केवळ नियमांना जेव्हा महत्त्व प्राप्त होते, त्या वेळेस समाजाचा नाश होतो. परंतु या स्मृतिवचनाचे स्मरणही आम्हांस आज नाही! आज नियमांचे स्तोम आम्ही माजविले आहे. जानवे, गंध, शेंडी, यांचाच जणू धर्म बनला आहे! यमाची कदर आम्हांस नाही; नियम म्हणजेच आमचे सर्वस्व !

चल वस्तूला जेव्हा आम्ही अचल मानू लागतो व अचल वस्तूचे जेव्हा महत्त्व वाटत नाहीसे होते, तेव्हा धर्माचे सुंदर स्वरूप नष्ट होते. नियम आपणांस पदोपदी बाजूला ठेवावे लागत असतात. आपण ते बाजूला करीत नाही. परंतु आपले पूर्वज असे नव्हते. नियमांच्यावर यमधर्माचे अंकुशत्व ते सदैव ठेवीत असत.

एका काळी नियोगाची चाल धर्म म्हणून मानली जात होती. ज्या वेळेस आर्यावर्तात जमीन भरपूर होती व लोकसंख्याच फार कमी होती, त्या वेळेस नियोगाचा नियम करण्यात आला. परंतु पुढे हा नियम बदलण्यात आला. हा नियम नष्ट करण्यात आला. त्या त्या वेळचे विचार करणारे पुरुष समाजाचे नीट धारण व्हावे म्हणून त्या त्या काळाला उपयुक्त असे नियम करीत असतात. समाजात स्त्रियांची संख्या कमी असेल, तर अनेक पती मिळून एक पत्नी असा नीतिनियम करावा लागेल. समाजातील स्त्रियांची संख्या पुष्कळ व पुरुषांची कमी असेल, तर एका पुरुषाने अनेक स्त्रिया करण्यास हरकत नाही असा नियम होईल. अरबस्तानात महमदाला स्त्रियांची संख्या अधिक असल्यामुळे, बहुपत्नीकत्वाची चाल सांगावी लागली. ह्या चाली, ह्या रूढी, हे नियम तत्कालानुरूप असतात. समाजाची स्थिती बदलताच हे नियमही बदलतात.

प्राचीन काळातील इतिहास पाहिला, तर शेकडो फेरबदल आपणांस दिसतील. वेदकाळात बहीण व भाऊ यांच्या विवाहाचे उल्लेख आहेत. यम-यमी संवाद ह्यासाठी प्रसिद्ध आहे. यमी यमाला म्हणते, “भाऊ! तू माझ्याशी विवाहबद्ध का होत नाहीस?” यम म्हणतो, “पूर्वी तसे करीत. परंतु आता तसे करणे अधर्म मानले जाईल. लोक आपणांस नावे ठेवतील.” समाज नियमबद्ध होत होता. समाज प्रयोग करीत होता. एके ठिकाणी पुढील वचन आहे:

"सप्तमर्यादा कवयस्ततक्षुः”

“ह्या सात मर्यादा शहाण्या लोकांनी आता आखून दिल्या आहेत. “ह्या सात मर्यादांचे उल्लंघन होणे पाप समजले जाई. त्या काळातील कवी म्हणजे विचारवंत लोक, समाजाची परिस्थिती विशाल व सूक्ष्म दृष्टीने पाहून नवीन मर्यादा, नवीन नवीन नियम घालून देत असत. एका सूक्तात वसिष्ठ ऋषी म्हणतात, “उपैमि चिकितुषे जनाय” – चिकित्सा करणाऱ्या प्रज्ञावंताकडे माझे काय चुकले, ते विचारावयास मी जातो. समाजात असे महात्मे असत. त्यांचा सल्ला घेतला जाई.

नागपूरचे विद्वद्रत्न डॉ. दप्तरी यांनी लिहिले आहे की, त्या त्या युगात सप्तर्षी नवधर्म देत असत. मनू व सप्तर्षी त्या त्या काळातील युगधर्म सांगत. मनू म्हणजे जिज्ञासू जीव म्हणा. जिज्ञासू जीव त्या त्या काळातील पूज्य अशा सात पुरुषांकडे जाई. हे सात पुरुष एकमताने जो धर्म सांगत, तो त्या काळातील धर्म मानला जाई.

उदाहरणार्थ, आजच्या आंदोलनाच्या काळात जर योग्य धर्म पाहिजे असेल, तर आजच्या भारतवर्षातील सात थोर पुरुष एकत्र बसावेत. ते एकमताने ज्या गोष्टी ठरवितील तो आजचा युगधर्म होईल. डॉ. राधाकृष्णन, महात्मा गांधी, डॉ. कुर्तकोटी, पं. मदनमोहन मालवीय, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर अशी विविध विचारांची मंडळी एकत्र बसवावी. जे काही नियम सर्वानुमते व ठरवितील तो आजचा धर्म, ती आजची स्मृती. अशा प्रकारची आपली प्राचीन काळातील पद्धती होती.

स्मृतिग्रंथांतून नुसते वरवर चाळत गेले तरी शेकडो फरक आपणांस दिसतील. एके काळी मुलांच्या मौंजीबंधनाप्रमाणे मुलींचेही मौंजीबंधन करण्यात येत असे. ह्याचा अर्थ मुलांप्रमाणे मुलींनीही शिकावे असा त्या वेळचा धर्म होता. प्राचीन काळात वादविवाद करणाऱ्या पंडिता नारी पदोपदी आढळतात. वेदांमध्ये स्त्री-ऋषींची सूक्ते आहेत. रामायणात गोदावरीच्या तीरावर संध्या करणाऱ्या सीतेचे वर्णन आहे. स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार होता. त्या ब्रह्मवादिनी होत्या. सभांतून त्या चर्चा करीत. महाभारताच्या उद्योगपर्वात सत्तर वर्षांचे वय होईपर्यंत ब्रह्मचारिणी व ब्रह्मवादिनी म्हणून वागणारी एक तेजस्वी नारी विवाह करू पाहते, असा उल्लेख आहे.

संस्कृत नाटकांतून ऋषींच्या आश्रमांत विद्यार्थिनी एकत्र शिकत, असे उल्लेख आहेत. शाकुंतलात अनसूया, प्रियंवदा वगैरे शिकण्यासाठीच राहिलेल्या मुली आहेत. उत्तमरामचरितात वाल्मीकीच्या आश्रमात मुलीही शिकत, असे उल्लेख आहेत. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जावे, एका आश्रमात अभ्यासाचे नीट न जमले तर दुसऱ्या आश्रमात जावे, असाही प्रकार होता. ज्या वेळेस मुलींचे मौंजीबंधन होई व त्या शिकत, त्या वेळेस अर्थातच प्रौढविवाह असतील. परंतु प्रौढविवाह पुढे कदाचित बदलावे असे काही विचारवंतांस वाटले असेल. हिंदुस्थानात एकत्र कुटुंबपद्धती प्राचीन काळापासून आहे. एकत्र कुटुंबपद्धती यशस्वी होण्यासाठी स्त्रियांवर जबाबदारी आहे. प्रौढ मुलींना सासरची सर्व मंडळी आपलीशी वाटत नाहीत. पतीपुरते त्यांचे प्रेम असते. जर मुलींचे विवाह लहानपणीच केले, तर त्या लहानपणीच मधूनमधून सासरी जातील. लहानपणीच प्रेमाचे संबंध जडतात. दीराबद्दल, सासरच्या मंडळींबद्दल आपलेपणा त्या मुलींच्या मनात साहचर्याने व परिचयाने लहानपणी उत्पन्न होण्याचा संभव अधिक एकत्र कुटुंबद्धतीचा प्रयोग करणाऱ्यांनी कदाचित यासाठी प्रौढविवाह रद्द करून बालविवाह रूढ केले असतील.

किंवा मुले-मुली शिकल्यावर कदाचित भराभर भिक्षु भिक्षुणी होऊन जातील; परंतु कामवासना जिंकता न आल्यामुळे हे भिक्षु–भिक्षुणींचे संघ व्यभिचारी होतील, अशी भीती वाटल्यामुळे समाजाचे नियम करणाऱ्यांनी बालविवाह रूढ केले असतील.

कारणे कोणतीही असोत, त्यांनी फरक केला ही गोष्ट खरी. ते पूर्व प्रयोग करणारे होते. अमुक नियम अविचल असे ते मानीत नसत. पूर्वी वरचे वर्ण खालच्या सर्व वर्णांशी विवाह करत; वरिष्ठ वर्णाच्या पुरुषाला कनिष्ठ वर्णाच्या मुलीशी धर्ममय लग्न लावता येई. मनुस्मृती ‘भार्यां चतस्रो विप्राणाम्' म्हणून सांगते. ब्राह्मण चारी वर्णांच्या स्त्रिया करू शकेल. याज्ञवल्क्याने या बाबतीत बदल केला. तो म्हणाला, “ब्राह्मणाने तीन वर्णांतील मुलींशीच विवाह करावा. शूद्र वधूंशी विवाह करू नये.” असे बदल स्मृतिकार करीत असत.

काही स्मृतींतून पुनर्विवाहास परवानगी आहे; काहींत नाही. कलियुगासाठी म्हणून जी पराशरस्मृती सांगतात, त्या स्मृतीत पुनर्विवाहास संमती आहे. पुण्यातील थोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांची गोष्ट प्रसिद्धच आहे. त्यांनी पुनर्विवाहास सम्मती दिली होती. तुळशीबागेत एका स्त्री-कीर्तनकारिणीने समोर बसलेल्या रामशास्त्र्यांस प्रश्न केला, “रामशास्त्री ! पुरुषांना पुन्हा पुन्हा विवाह करण्यास सदैव परवानगी आहे. पहिली पत्नी मरून दहा दिवस झाले नाहीत, तोच दुसऱ्या लग्नाची तो तयारी करू शकतो. मग स्त्रियांनीच असे काय पाप केले आहे? स्त्रियांना पती मेल्यावर जर पुनर्विवाहाची इच्छा झाली तर तशी परवानगी का नसावी?” रामशास्त्री म्हणाले, “स्मृती ह्या पुरुषांनी लिहिल्या. त्यांनी पुरुषांची सुखसोय पाहिली. स्त्रियांच्या सुख-दुःखाची त्यांना काय कल्पना?”

ह्या चालीरीती सर्व बदलत असतात एवढाच याचा अर्थ. परंतु आपला समाज जेव्हा बदल करीत नाही, तेव्हा तो फार मोठी चूक करीत असतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. जुन्या जीर्णशीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल? अंगरखा तरी मोठा करा नाही तर मला तरी सदैव लहान ठेवा, असे त्या मुलाला म्हणावे लागेल! रूढीचे कपडे हे सदैव बदलत असावेत. उन्हाळ्यातील कपडे थंडीत चालणार नाहीत, थंडीतील कपडे उन्हाळ्यात चालणार नाहीत हा नियम आहे. असा बदल न कराल, तर थंडीत गारठून मराल व उन्हाळ्यात उकडून मराल !

हिंदुधर्म बुडाला बुडाला असे काही म्हणत असताता. कोणाच्या डोक्यावर शेंडी दिसली नाही, कपाळावर गंध दिसले नाही, तोंडावर मिशी दिसली नाही, गळ्यात जानवे दिसले नाही, म्हणजे त्यांना वाटते की, धर्म रसातळाला गेला! चित्रावती घातल्या नाहीत, प्राणाहुती घेतल्या नाहीत, आचमने अघमर्षणे केली नाहीत, म्हणजे म्हणतात धर्म बुडाला. परंतु, हा धर्म आधी किती लोकांचा आहे? आणि ह्या धर्माज्ञेचे महत्व तरी काय?

ही बाह्य चिन्हे बदलतात व बदलणारच. नवीन कालात नवीन चिन्हे निर्माण होत असतात. एके काळी डोक्यावर टोपी घालून जाणे मंगल वाटे; आता डोक्यावर काही न घालणे म्हणजेच कोणाला ऐक्याचे चिन्ह वाटेल. परंतु यात धर्माच्या बुडण्या-तरण्याचा काय प्रश्न आहे?

हिंदुधर्म काही चहाच्या पेल्यात बुडून जाण्याइतका किंवा मिशा काढताच मरून जाण्याइतका लेचापेचा नाही. हिंदुधर्म तेव्हा मरेल, जेव्हा बुद्धीची उपासना मरेल. “आमची बुद्धी तेजस्वी राहो” ही गायत्रीमंत्रातील प्रार्थना जेव्हा मरेल. पंडित मोतीलाल नेहरू स्नानसंध्या करीत नसतील, वाटेल ते खातपीत असतील; परंतु ते जे काही करीत, ते त्यांच्या बुद्धीला त्या त्या वेळेस जे योग्य दिसेल ते करीत, ते गायत्रीमंत्राचे आमरण उपासक होते. त्यांच्या गळ्यात जानवे नसेल, परंतु खरा गायत्रीमंत्र त्यांच्याजवळ अहोरात्र जिवंत होता. आणि मरताना त्या महापुरुषाच्या ओठांवर गायत्रीमंत्र होता! गायत्रीमंत्र गात गात त्यांचा आत्महंस उडून गेला!

मरताना सर्वांत महत्त्वाची वस्तू जीव बरोबर घेऊन जातो. आपण एका गावाहून दुसऱ्या गावी जाऊ लागलो, की सर्वांत महत्त्वाच्या वस्तू आपण बरोबर घेतो, केरकचरा टाकून देतो. या जगाच्या खोलीतून मोतीलाल परलोकच्या दुसऱ्या खोलीत जावयास निघाले. कोणती महत्त्वाची वस्तू त्यांनी बरोबर घेतली? त्यांच्या जिवाला कशाची भूक होती? शुद्ध विचारांची, बुद्धीच्या स्वातंत्र्याची, ज्ञानाच्या प्रकाशाची. जर्मन कवी गटे मरताना 'अधिक प्रकाश, अधिक प्रकाश' असे म्हणत मेला. मोतीलाल नेहरू “ तेजस्वी बुद्धी, स्वतंत्र बुद्धी" असे जपत निघून गेले.

प्रत्यही जानवे हातात धरून गायत्रीमंत्र जपणाऱ्यांना मरताना गायत्रीमंत्र आठवेल का? तो महान मंत्र त्यांच्या रोमरोमांत गेला आहे का? त्यांना जानवे महत्त्वाचे वाटते; परंतु गायत्रीमंत्रातील दिव्य विचार महत्त्वाचा वाटत नाही. विचाराची उपासना करणारा, ज्ञानासाठी धडपडणारा तोच खरा गायत्रीचा सांभाळकर्ता आहे. आणि यासाठीच स्वामी विवेकानंद म्हणत की, "ब्राह्मण पाश्चिमात्यांत अधिक आहेत. ज्ञानाची उपासना आमरण क्षणाक्षणाला करणारे आपणांत कोठे आहेत?" जानवी सांभाळून हिंदुधर्म सांभाळला जात नसतो. जानवी सांभाळणारे किल्ल्या व कानाकोरणी सांभाळतात! हातातील अंगठी व सल्लेजोडी सांभाळतात!

समाजात धर्म आहे की नाही हे कशावरून ओळखायचे? त्यागावरून. ज्यांच्याजवळ त्याग दिसेल, त्यांच्याजवळ धर्माचा आत्मा आहे. ज्या तरुणांना आज धर्महीन म्हणून म्हणण्यात येते, त्यांच्याजवळ जर त्याग असेल तर त्यांच्या जवळ धर्म आहे. शेंडीसाठी पूर्वी युद्धे झाली. ती शेंडी आज न ठेवणारे धर्महीन आहेत, हे म्हणणे पोरकटपणाचे आहे. शेंडी न ठेवणाऱ्याजवळ ज्याच्यासाठी मरावे, असे दुसरे काही आहे की नाही? सत्याग्रहाच्या चळवळीत तुरुंगात नित्यनेमाने टकळी सूत कातावयास मिळाली नाही म्हणून मरेतो उपवास करणारे लोक निघाले. प्रत्येकाला काही ना काही महत्त्वाचे वाटत असते. पूर्वीची चित्रे, पूर्वीची प्रतीके, पूर्वीची व्रते व पूर्वीचे नियम ह्यांत बदल होईल. नवीन व्रते व नवीन प्रतीके येतील, त्या त्या प्रतीकासाठी व व्रतासाठी प्राणार्पण करू पाहणारे तेज असले म्हणजे झाले.

इंग्लंडमध्ये बट्र्ड रसेल म्हणून एक प्रज्ञावन्त पुरुष आहे. त्याने एके ठिकाणी लिहिले आहे, की नीती दोन प्रकारची असते. एक ऋण-नीती व दुसरी धन- नीती. ऋण - नीती समाजाच्या हिताचे काहीएक करीत नसते. माळा जपतील, गायत्रीमंत्र म्हणतील, तीनतीनदा स्नाने करतील, भस्मे लावतील, गंध लावतील. हे सारे ऋण-नीतीचा उपासक करतो. परंतु जर आपण त्याला विचारले, “समाजातील उपासमार दूर करण्यासाठी काय केलेस? समाजास चांगले शिक्षण मिळावे म्हणून काय केलेस? स्त्रियांची स्थिती सुधारावी म्हणून काय केलेस?” या सर्व प्रश्नांना त्याचे उत्तर “नेति नेति" असेच येईल. याच्या उलट धन-नीती असते. धन-नीतीचा उपासक स्नान-संध्या करीत नसेल, देव-दर्शनास, कथा- कीर्तनास जात नसेल, माळा- भस्मे यांची उपासना करीत नसेल, परंतु समाजातील अन्याय दूर करण्यासाठी तो धाव घेतो. तो पददलितांची बाजू घेतो. सारी घाण जाळावयास तो उभा राहतो. जेथे जेथे विपत्ती असेल, संकट असेल, जुलूम असेल, अशरणता असेल, अरेरावी असेल, तेथे तेथे तो वीराप्रमाणे उभा राहील. स्वतःचे बलिदानही वेळ पडली तर तो देईल.

सनातनी लोक ऋण-नीतीचे उपासक असतात. नवीन कार्यकर्ते धन-नीतीचे उपासक असतात. ज्या समाजात कर्मशून्य ऋण- नीतीचाच पसारा फार दिसतो, त्या समाजाला धुळीस मिळावे लागते. ज्या समाजात प्रत्यक्ष सेवा करणारे धन-नीतीचे उपासक असतात, तो समाज वर येतो.

या धन-नीतीच्या उपासकांना समाजाचा छळ सोसावा लागतो. शंकराचार्यांनी नुसते अद्वैत सिद्ध केले नाही. ते समाजाच्या व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी कष्ट केले. दक्षिण देशात भिन्नभिन्न देवतांची उपासना करणारे संप्रदाय होते. या संप्रदायांमध्ये प्रचंड वैरे असतात. परंतु शंकराचार्य म्हणाले, “अरे, सारी एका शक्तीची रूपे. गणपती असो या सूर्य असो; शिव असो, शक्ती असो वा विष्णू असो; या पाचही देवतांची एकत्र पूजा करा. पंचायतनपूजा सुरू करा. भेदात अभेद आणा. अद्वैत कृतीत येऊ दे व कलहही मिटू देत. "

पंचायतनपूजा शंकराचार्यांनी सुरू केली. नवीन प्रयोग त्यांनी केला. अद्वैताचा प्रात्यक्षिक प्रयोग. शंकराचार्यांचा त्यासाठी छळ झाला. हे सबगोलंकार करणारे आहेत, हे प्रच्छन्न बुद्धपंथीच आहेत, अशी नाना दूषणे त्यांना मिळाली! त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला. शंकराचार्य मरणोन्मुख आईला भेटावयास गेले. आई मरण पावली. त्या मातेच्या मृत देहाला नेण्यासाठी कोणी मिळेना! शंकराचार्यांनी आईच्या देहाचे तीन तुकडे केले. एकेक तुकडा त्यांनी स्मशानात नेला व अग्नी दिला ! आज मलबार प्रांतात मेलेल्या मनुष्याच्या अंगावर तीन रेषा ओढतात. तीन तुकड्यांची ती कठोर निशाणी आहे!

संतांनी संस्कृतातील ज्ञान लोकांच्या भाषेत आणण्याचे महान कार्य सुरू केले. मनुष्याला ज्ञानाशिवाय कसे जगता येईल? सूर्याचे किरण सर्वांना हवेत, त्याप्रमाणे ज्ञानाचेही किरण जीवमात्रास हवेत. ज्ञान हे काही लोकांची वतनदारी असणे म्हणजे घोर अन्याय होता. संतांनी बंड पुकारले. ज्ञानेश्वर, मुकुंदराय, एकनाथ, सारे बंडात सामील झाले. तुकाराम तर म्हणू लागले, “अरे घोक्यांनो, पाठीवर भार वाहून चव कळत नाही!”

वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा येरांनी वाहावा भार माथां ॥

प्रत्यक्ष जीवनात जे अद्वैत अनुभवू लागले, त्यासाठी सनातनींचे होणारे विरोध न जुमानता जे वागू लागले, त्यांनाच वेद समजत होता. वेद म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार ! ज्ञान हे साक्षात्कारासाठी आहे. भरल्यापोटी चर्चेसाठी नाही.

पहिले बाजीराव पेशवे मस्तानीपासून झालेल्या पुत्राची मुंज करू पाहात होते. त्यांचे हसे झाले. त्यांना अपमान सहन करावे लागले. परंतु भारतीय संस्कृतीचा आत्मा त्यांनी ओळखला होता.

गीतेत चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. माझ्या मते त्यात फार थोर दृष्टी आहे. समाजाची उन्नती करणारे सारे शास्त्रच जणू त्यात आले आहे.

आर्ता जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।

आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे हे चार भक्त आहेत. आर्त भक्त म्हणजे काय? आर्त म्हणजे दुःख सांगणारा, देवाजवळ दुःख सांगणारा. हे कोणाचे दुःख ? मला वाटते, भक्त जो असेल तो केवळ स्वतःचे दुःख उगाळीत बसणार नाही. हा उदार आर्त आहे. या चारी भक्तांना उदार म्हटले आहे. जगाच्या दुःखाने तो आर्त भक्त दुःखी होतो. सर्व समाजांतील भीषण अन्याय पाहून त्याचे अंतःकरण तळमळते. समर्थांनी लहानपणीच आईला सांगितले:

"आई ! चिंता करितो विश्वाची"

समर्थांसारख्या उदार आर्त भक्तांना समाजाची चिंता प्रथम असते. या समाजाचे भले कसे होईल, समाज सुसंपन्न, सुसंस्कृत, सुश्लिष्ट कसा होईल, समाजात अन्न-वस्त्राची, ज्ञानविज्ञानाची विपुलता कशाने होईल, याची त्यांना चिंता लागते. या एकाच चिंतेने त्यांच्या हृदयाची होळी पेटत असते.

झाडूं संतांचे मार्ग । आडरानीं भरलें जग ।।

सारा संसार रानात शिरलेला त्यांना दिसतो. चुकीच्या मार्गाने लोक जात आहेत व त्यामुळे दुःखात पडत आहेत, असे त्यांना दिसते. या उदार आर्त भक्तांना चैन पडत नाही. किंकाळ्या त्यांच्या कानांवर येत असतात. भक्ताची ही पहिली स्थिती असते. जगाच्या दुःखाशी तो एकरूप होतो.

या उदार आर्ततेतून मग उदार जिज्ञासा उत्पन्न होते. दुःख तर आहे, परंतु हे दुःख का आहे याची कारणमीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. आर्त भक्तीतून जिज्ञासा उत्पन्न होते. प्लेग का येतो? चला शोधू त्याची कारणे. स्वतःच्या अंगात टोचून घेऊ या. प्रयोग करू या. पीतज्वर का होतो? उपदंश का होतो? भूकंप का होतात? ज्वालामुखीचे स्फोट का होतात? वादळे का होतात? पिकांचे रोग का येतात? समाजात व्यभिचार का आहेत? चोऱ्यामाऱ्या का आहेत? समाजात एकीकडे मोठमोठ्या माड्या आणि एकीकडे मातीच्या झोपड्या, असे चित्र का? काहींचे गाल फुगलेले, काहींचे बसलेले; काही अनवाणी, तर काही नवीन बूट घातलेले; काही मर मर मरतात, काही खुशाल गाद्यांवर मांसाच्या गोळ्याप्रमाणे लोळतात; काही अजीर्णाने मरतात, काही भुकेने मरतात; काहींना ज्ञानाचा गंध नाही, काही आमरण शिकतच आहेत! ही अनंत दुःखे का, याची मीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. राष्ट्राराष्ट्रांत लढाया का? भेद का? साम्राज्यवाद का ? गुलामगिरी का? का हे सारे?

अशा रीतीने मनुष्य विचार करू लागला म्हणजे त्याला नाना प्रकारची कारणे दिसतात. ती कारणे दूर करण्याचे उपाय तो शोधू लागतो. परंतु खरा उपाय कोणता ? दुःखे दूर करण्याचे अनेक मार्ग त्या जिज्ञासू भक्ताला दिसू लागतात. परंतु सारे मार्ग हितकरच असतील असे नाही. भक्तीची तिसरी स्थिती तो आता अनुभवतो. अर्थार्थी भक्त, दुःख दूर करण्यासाठी जे जे उपाय सुचले, त्यांतील कोणत्या उपायाने खरोखर अर्थ साधेल हे बघतो. अर्थ म्हणजे कल्याण. मनातील मांगल्याचा अर्थ कोणत्या मार्गाने गेले असता साधेल? अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा, प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करणारा, तिचे महत्त्वमापन करणारा.

समाजातील विरोध व वैषम्ये, हे भेद व ही दुर्भिक्ष्ये दूर करण्यासाठी साम्यवाद चांगला का? ही यंत्रे चांगली आहेत की वाईट आहेत? ग्रामोद्योग सुरू करावेत की यंत्राची पूजा सुरू करावी? हिंदु-मुसलमानांचे प्रश्न आर्थिक आहेत की दुसरी काही कारणे आहेत? हिंसेचा अवलंब करावा की अहिंसेचा ? निःशस्त्र प्रतिकार हितकर आहे की वांझोटा आहे? साम्राज्यान्तर्गत स्वराज्य चांगले की फुटून निघणे चांगले? मुले-मुली एकत्र शिकण्यात हित आहे की अहित आहे? शिक्षण स्वभाषेतून असावे की परभाषेतून ? प्रौढविवाह असावेत की बालविवाह ? पोशाख एक असावा की नसावा? घटस्फोटाची जरुरी आहे का? स्त्रियांना वारसा हक्क का असू नये?

समाजातील शेकडो दुःखांना उपाय जिज्ञासू आर्ताला सुचतात. त्या उपायांतील जे उपाय हितकर वाटतील ते उपाय भक्त हृदयाशी धरतो. जे निरनिराळे विचार त्याला स्फुरतात, त्यांतील हितकर विचारांना तो मिठी मारतो. अर्थार्थी भक्त आता ज्ञानी होतो. म्हणजे जे ज्ञान त्याला निर्मळ वाटते, निःशंक वाटते, अर्थमय वाटते, त्या ज्ञानाशी स्वतःचे तो लग्न लावतो. त्या ज्ञानाचा प्रयोग तो सुरु करतो, त्या प्रयोगासाठी सारे उर्वरित जीवन वेचतो. त्या प्रयोगासाठी साऱ्या निंदा, सारे अपमान, सारे कष्ट, तो हसत हसत सहन करतो. फास असो वा गोळी असो, सर्वांठायी त्याची आता तयारी असते. त्या ज्ञानाची, त्या सत्याच्या प्रयोगाची पूजा करण्यात, त्या सत्याचा महिमा वाढविण्यात, अपार आनंद त्याला होत असतो. तोच त्याचा मोक्ष, तेच त्याचे सर्वस्व.

लोकांच्या सुखदुःखांशी एकरूप होणे, त्यांच्या वेदनांनी विव्हल होणे, त्या वेदनांची मीमांसा करणे, जे उपाय सुचतील त्यांतील कोणते उपाय अधिक परिणामकारक, अधिक सत्यमय, अधिक मंगलावह हे पाहणे; व असे जे उपाय दिसतील त्यांच्यासाठी सारे आयुष्य देणे, हे ऋषींचे महान ध्येय असते. अशा रीतीने ते प्रयोग करतात व प्राण अर्पण करतात. प्राचीन काळापासून असे संत भारतीय संस्कृतीत झाले आहेत; आजही दिसत आहेत. अशा प्रयोग करणाऱ्या निर्भय, सत्यमय, ध्येयनिष्ठ वीरांनीच समाजाला पुढे नेले आहे.

विष्णुवीर गाढे । कळिकाळ पायां पडे ।।

असे ज्ञानोपासक विष्णुवीर कोणालाही भीक घालीत नाहीत. कोणत्याही सत्तेला ते भीत नाहीत. ध्येय-देवासमोर ते लवतात. ध्येय-देवाला पूजितात. दुसरा देव त्यांना माहीत नाही!

असा ध्येयाने पेटलेला महात्मा समाजात उभा राहिला, म्हणजे सारा समाज शेवटी पेटल्याशिवाय राहात नाही. त्याच्या महान प्रयोगात जनता सामील होते. ज्याप्रमाणे एखादा महान वृक्ष हळूहळू तपस्येने वाढतो, त्याला फुलेफळे येतात, मग वार येतो, त्या वृक्षाची बीजे तो महान वारा दशदिशांत फेकतो आणि जंगलेच्या जंगले उभी राहतात; त्याप्रमाणे एक असा दिव्य भव्य सत्याचे प्रयोग करणारा उभा राहतो, त्याच्या प्रयोगाची बीजे लाखो हृदयांत पडतात. मग त्याच्याभोवती त्या ध्येयाचे लाखो उपासक उभे राहतात! कारण शेवटी मनुष्य हा सत्यमय आहे. त्याच्या आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव जागृत होतो. मांगल्याची हाक त्याच्या हृदयाला ऐकू येते.

अशा रीतीने महान चळवळी होतात. प्रचंड क्रांत्या होतात. मानवजाती एक पाऊल पुढे टाकते. असे प्रयोग करीत मानवजात चालली आहे. जो समाज असे प्रयोग करणार नाही तो मरेल. जी संस्कृती असे प्रयोग करणार नाही, ती पै किंमतीची होईल.

24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा