shabd-logo

प्रतीके

6 June 2023

30 पाहिले 30
प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांचे सूत्रग्रंथ आहेत. थोडक्यात, त्या त्या शास्त्रांचे सिद्धान्त त्या सूत्रांतून ग्रथित केलेले असतात. प्रतीके म्हणजे संस्कृतीची सूत्रे होत. खरे पाहिले तर प्रत्येक बाह्य क्रिया आंतरिक विचाराचे प्रतीक आहे. मनच शेकडो कृतींतून प्रकट होते. आधी मन लवते, मग बाहेर शिर लवते. आधी हृदय गहिवरते, मग डोळे भरून येतात. आधी मन संतापते, मग हात उगारला जातो. मनाला फुटलेले कोंब म्हणजे क्रिया.

भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतीके आहेत. त्यांचा अर्थ शोधला पाहिजे. ज्या वेळेस अर्थहीन प्रतीके पूजिली जातात, तेव्हा धर्म यंत्रमय होतो. त्या प्रतीकपूजेचा मग जीवनावर काहीही संस्कार होत नाही. अशी यांत्रिक प्रतीके मग निरुपयोगी वाटतात. नवतरुण त्या प्रतीकांना फेकून देतात. त्या प्रतीकांतील अर्थ सांगा, असे त्यांचे म्हणणे असते. अर्थ दिसताच ते प्रतीक जिवंत वाटते. त्या प्रतीकात सामर्थ्य येते.

या भिन्न भिन्न प्रतीकांकडे अर्थपूर्णदृष्ट्या पाहण्याचा मला नादच लागला आहे. ते अर्थ खरे असतील असे नाही. ते ते प्रतीक निर्माण होताना तोच भाव तेथे असेल असे नाही; परंतु नवीन अर्थ त्या प्रतीकात पाहिला म्हणूनही काही बिघडत नाही. अर्थाचा विकास होत असतो.

कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतीक आहे. सर्व प्रतीकांचा राजा असे कमळास म्हटले तरी चालेल. भारतीय संस्कृतीस कमळाचा सुगंध येत आहे. या कमलपुष्पात कोणता बरे एवढा महान अर्थ आहे?

ईश्वराच्या सर्व अवयवांना आपण कमळाची उपमा देतो. कमलनयन, कमलवदन, करकमल, पदकमल, हृदयकमल असे म्हणण्यात काय बरे स्वारस्य आहे ? कमळाजवळ अलिप्तपणा हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावरच राहते, चिखलात असून चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. ईश्वर करून अकर्ता असे आपण वर्णितो. या सर्व जगाचा पसारा तो चालवितो. परंतु अनासक्त रीतीने हा पसारा तो चालवीत आहे. कमळामध्ये अलिप्तता आहे. तसाच दुसरा गुण म्हणजे वाइटातूनही चांगले घेऊन स्वतःचा विकास करून घेणे, हाही गुण आहे. चिखलातूनही रमणीयत्व ते घेते. रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेविते. सुगंधाने भरून ठेविते.

सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश पाहताच ते फुलते. प्रकाश जाताच मिटते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय' ही भारतीय संस्कृतीची आरती आहे.

कमळ शतपत्र आहे, सहस्त्रपत्र आहे. शंभर पाकळ्या, हजार पाकळ्या काही कमळांना असतात. भारतीय संस्कृती हीसुद्धा शतपत्रांची आहे. शेकडो जातिजमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ, यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एकेक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृतीचे कमळ अद्याप पूर्ण फुललेले नाही. ते फुलत आहे. विश्वाच्या अन्तापर्यंत ते फुलत राहील. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमलपुष्प होईल. कारण पृथ्वी अनंत आहे, काळ अनंत आहे, ज्ञान अनंत आहे !

भरलेल्या पवित्र कमळाची गाणी गात शेकडो भ्रमर येतील; परंतु कमलपुष्प लक्ष देणार नाही. भारतीय संस्कृती स्वतःची स्तुतिस्तोत्रे गात बसणार नाही. जगाला वाटले तर तिची स्तुती करू दे. भारतीय संस्कृती गाजावाजा न करता फुलत राहील. जगाला गीतेची स्तुती

करू दे; जगाला बुद्धाचा महिमा गाऊ दे; जगाने गांधींना म्हणू दे

महात्माजी; जगाने म्हणू दे रवीन्द्रनाथांना महर्षी. भारतीय संस्कृती

आपल्या लेकरांस सांगते, “तुम्ही कर्मात रमा. निंदास्तुतीवर काटी

लावून ध्येयात बुडा.” तुम्ही स्वकर्मात इतके तन्मय झालात की

कीर्ती आपोआप तुमच्याकडे येईल, आपोआप तुमचे पोवाडे जग

गाईल. कमळ म्हणते, “अनासक्त राहा, प्रकाशाची पूजा करा, अमंगलातून मंगल घ्या, तपस्या करा, केवळ सत्कर्मात रमा, नवीन नवीन जोडा. " भारतीय संस्कृती म्हणजे काय, तर 'कमळ.'

दुसरे महान प्रतीक म्हणजे यज्ञ किंवा होम. भारतीय संस्कृती म्हणजे त्याग. समाजात एकमेकांसाठी झिजावे लागेल. त्याग करावा लागेल. एकमेकांनी एकमेकांचे जीवन व्हावयाचे. कोणताही संस्कार असो, कोणताही धार्मिक विधी असो, तेथे होम आहे. तुम्ही कोणतेही ध्येय घ्या, कोणतेही समाजसेवेचे कर्म उचला, तेथे तुम्हांला होम करावा लागेल. उत्तरोत्तर वाढता होम करावा लागेल. उपनयनाच्या वेळेस होम आहे. तुला ज्ञान मिळवावयाचे असेल, तर इतर सर्व सुखांचा होम करावा लागेल. “सुखार्थिनः कुतो विद्या, कुतो विद्यार्थिनः सुखम्” हे ध्यानात धरावे लागेल.

विवाहाच्या वेळेस होम आहे. तुम्हांला उभयतांस संसारात आनंद हवा असेल, तर परस्परांसाठी वैयक्तिक इच्छांचा होम करावा लागेल. तुमचा गृहस्थाश्रम तरच सुखकर होईल. पती आपलाच तुणतुणे वाजवील, पत्नी आपलाच हट्ट धरील, तर आनंद कसा नांदेल ? संसार म्हणजे सहकार्य, देवाण-घेवाण. आणि शेवटी तुमचा गृहस्थाश्रमही समाजासाठी आहे. समाज मागेल त्या वेळेस तुमची मुले बाळे, तुमचे घरदार, तुमचे सर्वस्व अर्पण करा; सेवा म्हणजे होम !

पावित्र्य म्हणजे चिर यज्ञ, उत्तरोत्तर अधिकाधिक पावित्र्य मिळविण्यासाठी क्षुद्र वस्तूंचा होम करावा लागतो. सर्वस्वत्याग म्हणजे निर्वाण, म्हणजेच मोक्ष, म्हणजे आपले मरण डोळ्यांनी पाहणे. म्हणजेच पावित्र्याची पराकाष्ठा!

या यज्ञप्रतीकाचेच भस्मप्रतीकात रूपांतर झाले आहे. संध्या करताना, देवपूजा करताना, अंगाला भस्म लावावयाचे, सर्वांगावर भस्म फासावयाचे. देवाची प्राप्ती, ध्येयप्राप्ती फुकाफुकी नाही, त्यासाठी होळी पेटवावी लागते. स्वार्थाची, सुखविलासांची राखरांगोळी करावी लागते. सर्वेन्द्रियांच्या वासनांचे भस्म करावे लागते. शरीराचे भस्म करावे लागते. देवघरात शिरत आहेस, भस्म लावून जा. ध्येयाची पूजा करावयाची आहे ना? सर्वस्वावर निखारा ठेवून बाहेर पड तुकाराममहाराजांनी म्हटले आहे:

"संसारास आग लावुनियां हातें । मागुतें परौते

पाहूं नये"

'संसारास आग लावून मागे पाहू नका. मागच्याचे कसे होईल याची चिंता नका करू.' तुझे ध्येय व तू! अमळनेरचे थोर संत सखाराममहाराज ज्या वेळेस पंढरपूरला जावयास निघत, त्या वेळेस ते आपल्या झोपडीला प्रथम काडी लावीत आणि मग पंढरपूरचा रस्ता धरीत! देवाकडे जाताना मागची भुणभुण नको. देवाकडे जाणे, ध्येयाची पूजा करणे, म्हणजे सतीचे वाण आहे!

आपण कपाळाला गंध का लावतो? देवाला गंध लाविल्यावर स्वतःला गंध लावावयाचे. आधी देवाला गंध, मग मला गंध. देवाची पूजा करून त्याच्या चरणी भक्त मस्तक ठेवतो. देवाच्या पायावर ठेवलेल्या स्वतःच्या कपाळाला तो गंध लावतो. “हे डोके आता माझे नाही, देवाचे डोके झाले. देवाला आवडणारे विचारच या डोक्यात आता येतील. हे मंगल मूर्तीचे डोके आहे. हे आता माकडाचे, आग लावणारे, घाणीने भरलेले डोके नाही. या डोक्याची आता पूजा करू दे. डोक्यालाही गंध लावू दे." अशी गंधाच्या पाठीमागची भूमिका आहे.

निरनिराळे महाराज व त्यांचे भक्तगण अंगावर मुद्रा ठोकतात. कपाळावर, छातीवर, दंडावर, सर्वत्र मुद्रा लावतात. त्यातील हाच अर्थ आहे. हे कपाळ देवाचे, हे हात देवाचे, हे हृदय देवाचे. सर्व अवयवांवर देवाचा शिक्का. देवाच्या सेवेत, जनताजनार्दनाच्या सेवेत, अवघाची संसार सुखाचा करण्याच्या महान कर्मात, ही गात्रे चंदनाप्रमाणे झिजतील, अशी प्रतिज्ञा मुद्रा मारण्यात आहे.

आपण यज्ञोपवीत घालतो. पूर्वीचा त्यातील अर्थ काहीही असो, मला एके दिवशी त्या तीनपदरी जानव्यात केवढा थोरला अर्थ सापडला. कर्म, ज्ञान, भक्ती यांचे तीन पदर म्हणजे हे जानवे. या तिन्हींची एकत्र बांधलेली गाठ म्हणजे ब्रह्मगाठ कर्म, ज्ञान व भक्ती जेव्हा आपण एकमेकांत मिसळू तेव्हाच ब्रह्माची गाठ पडेल! केवळ कर्माने, केवळ भक्तीने, केवळ ज्ञानाने ब्रह्मगाठ पडणार नाही. फुलांची पाकळी, तिचा रंग, तिचा गंध यांत अविनाभाव असतो. दूध, साखर व केशर ज्याप्रमाणे आपण एकजीव करतो, त्याप्रमाणे कर्म- ज्ञान-भक्तीचा एकजीव केला पाहिजे.

आपण देवाला न हुंगलेले फूल वाहतो. वास घेतलेले, वासलेले फूल वाहत नाही. ते फूल म्हणजे काय? ते फूल आपल्या हृदयाचे प्रतीक आहे. त्या फुलाच्या रूपाने आपण आपले हृदयपुष्पच देवाला वाहात असतो. वासनांनी वास न घेतलेले असे हृदय देवाला वाहा. ज्या हृदयाचा दुसरा कोणीही वास घेतलेला नाही, ज्या हृदयाचा दुसरा कोणी स्वामी नाही, दुसरा कोणी भोक्ता नाही, असे हृदय देवाला अर्पण करा. भक्ती अव्यभिचारिणी असते. – Love is jealous. प्रेमाला दुसरे सहन होत नाही. एकालाच हृदय दे. देवाला द्यावयाचे असेल, देवाला दे. जेथे देशील तेथे ते संपूर्णपणे दे. ताजे, रसाने भरलेले, निर्दोष, पूर्णपणे फुललेले, सुगंधी असे तुझे हृदयपुष्प सेवेच्या कर्मात अर्पण कर.

देवाला नैवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो? कोणता नैवेद्य देवाला प्रिय आहे? आपल्या सर्व क्रिया म्हणजे नैवेद्य. ते लहानशा वाटीभर निर्मळ दूध म्हणजे तुझ्या स्वच्छ सुंदर क्रिया होत. देवाला कर्माचा नैवेद्य अर्पण करावयाचा. जे केले ते देवाला अर्पण करावयाचे. “ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु” हा प्रत्येक कर्माचा अंतिम मंत्र आहे.

माझ्या मनात ज्या दिवशी ही कल्पना आली, त्या दिवशी देवाची मला करुणा आली. देव अनंत जन्मीचा उपाशी असेल असे मनात आले. घरात वृद्ध पवित्र माता असावी, ती इतर काही पदार्थ खात नसते; परंतु तिच्या मुलांनी तिला कांद्याची भजी, लसणाची चटणी, किंवा असेच पदार्थ नेऊन दिले, तर ती व्रतचारिणी माता काय म्हणेल? “बाळांना! माझी थट्टा नका करू. या पदार्थांना मी शिवते का? द्यायचे असेल तर नीट द्या, नाही तर काहीही देऊ नका; परंतु घाण नका आणू माझ्यासमोर.” असे ती माउली म्हणेल. देवही असेच म्हणत असेल. आपण मानव आज हजारो वर्षे ज्या अनंत क्रिया अंतर्बाह्य करीत आहोत, त्या सर्व देवाच्या जवळ पडत आहेत. त्या क्रियांचा नैवेद्य त्याला मिळत आहे. परंतु तो नैवेद्य त्याला खाववेल का? त्यातील एक तरी घास त्याला गिळवेल का? नैवेद्य दाखविणाऱ्या प्रत्येकाने हा विचार मनात आणावा.

देवावर आपण अभिषेक करतो. म्हणजे संतत धार घागरभर पाणी एकदम ओतणे म्हणजे अभिषेक नव्हे. अभिषेक हे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे ती पाण्याची धार सारखी अखंड देवावर पडत आहे, त्याप्रमाणे सारखी मनाची धार देवाच्या चरणी पडणे, परमेश्वराच्या स्वरूपी मनोबुद्धी पूर्णपणे तैलधारवत् जडणे, हा त्यातील अर्थ आहे. तो जलाभिषेक म्हणजे तुझ्या जाणिवेचा अभिषेक आहे.

आपण दक्षिणा ओली करून देतो. समाजाला जी जी देणगी देशील, जे जे दान देशील, त्यात हृदयाचा ओलावा असू दे. जे कर्म हृदयाचा ओलावा ओतून केलेले आहे ते अमोल आहे. तुझ्या सर्व क्रिया आर्द्र असू देत. कोरडी सहानुभूती नको. देखल्या देवा दंडवत नको. कष्टाचा रामराम नको.

आपण त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेवतो. ते रुक्मिणीचे तुळशीपत्र आहे. दक्षिणा रुकाभर असो की दशसहस्त्र रुपये असो, त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेव. ते भावभक्तीचे तुळशीपत्र आहे. पै का रुपया हा प्रश्न नाही. तेथे भाव असला म्हणजे झाले. देव भावाचा भुकेला. ज्या देणगीवर भक्तिभावाचे तुळशीपत्र नाही, ती देणगी मर्यादित आहे. परंतु भावाच्या तुळशीपत्रासह दिलेली दिडकी कुबेराच्या संपत्तीपेक्षा वजनदार आहे.

देवाला पत्री प्रिय आहे. तुळशीपत्र, बिल्वपत्र, दूर्वादळ, यांची देवाला आवड आहे. सामान्य लोकांची कर्मे अशी असतात. त्यांना ना फार गंध, ना फार रंग. परंतु देवाला ही कर्मे प्रिय आहेत. सुगंधी, रसमय असे कर्म एखादा महात्मा देवाला अर्पील. परंतु आपण सारे दुर्बळ जीव. पण आपली ही साधी कर्मे जर निर्मळ असतील, तर ती देवाला थोरा-मोठ्यांच्या कर्मांपेक्षाही आवडतील. संगीततज्ज्ञ मुलाच्या रागदारीपेक्षा लहान मुलाचे अ-कपट बोबडे बोलणे आईला अधिक आवडते.

स्वस्तिक चिन्ह भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे आहे. भिंतीवर आधी स्वस्तिक काढा. स्वस्तिक म्हणजे कल्याण, सर्वांचे शुभ असो, सर्वांचे भले होवो, असा त्या चिन्हाचा भाव आहे.

उपनयनाच्या वेळेस लंगोटी लावतात. कमरेला तीनपदरी मौंजी बांधतात. कमर बांधून विद्येसाठी बाहेर पड. लंगोटी लावणे म्हणजे इंद्रियदमन करणे. लंगोटबंद राहशील तरच गड्या ज्ञान मिळवू शकशील. स्वच्छंद व स्वेच्छाचारी राहून काहीही मिळवता येणार नाही. संयमी हो.

मांडीवर व दंडावर दर्भ कापतात. गुरूकडे सेवा करताना हातपाय झिजून तुटतील, परंतु खंत बाळगू नकोस. गायींच्या पाठीमागे रानात जावे लागेल. तुझे पाय गळतील. पाणी ओढून तुझे हात तुटतील. विद्येसाठी सारे केले पाहिजे. दर्भाच्या टोकासारखी कुशाग्र बुद्धी मिळवावयाची असेल तर हातपाय हालविल्याशिवाय कसे होईल?

मौंजीबंधनाच्या वेळेस मातृभोजन असते. इतके दिवस आईजवळ होतो, आता जायचे. ज्ञानासाठी दूर जावयाचे. शेवटचे ते सहभोजन असते. आई वासराला आता दूर करते. इतके दिवस सगुणभक्ती होती. आता निर्गुणभक्ती सुरू व्हावयाची. आता आई मनात. गुरुगृही आता गुरु हीच माउली. नवीन ज्ञानदात्री माउली आता जोडायची.

ब्रह्मचारी, परिव्राजक, संन्यासी या सर्वांच्या हातात दंड हवा. दंडधारी असण्यात खोल अर्थ आहे. दंड ज्याप्रमाणे सरळ असतो, तो वाकत नाही, लवत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मचारी वा संन्यासी यांनी वाकावयाचे नाही. मोहापुढे मान लववावयाची नाही. काम- क्रोध समोर आले, तर त्यांना हाकलून लावावयाचे. विकारांची मस्ती जिरवायची. त्याप्रमाणे ब्रह्मचारी वा संन्यासी कोणाची हांजी हांजी करणार नाही. तो ध्येयनिष्ठ राहील. ध्येयाला सोडणार नाही. ध्येयाला तडजोड माहीत नाही. सत्याला तडजोड माहीत नाही. गृहस्थाश्रम सारी तडजोड आहे. गृहस्थाश्रम म्हणजे तुझे थोडे, माझे थोडे. परंतु ब्रह्मचर्यसंन्यास म्हणजे प्रखरता. तेथे 'त्वया अर्धं मया अर्धं' असला बाजार नाही. तेथे सारे सरळ सीधे काम. ब्रह्मचाऱ्याची वा संन्याशाची मान एका ध्येयासमोर मात्र लवेल. गुरू म्हणजे ध्येयमूर्ती. त्याच्यासमोर लवेल. इतरत्र मात्र ती लवणार नाही. ब्रह्मचर्याचे, संन्याशाचे असे हे धगधगीत तेज आहे. त्या तेजासमोर जग वाकेल, जग लोटांगण घालील. ज्याच्यासमोर वासना- विकारांनी लोटांगण घातले, त्याच्यासमोर कोण लोटांगण घालणार नाही?

विवाहाच्या वेळेस अंतरपाट धरतात. शेवटची टाळी वाजताच हा अंतरपाट दूर होतो. वधू-वरांत आता अंतर नको. या घटकेपर्यंत अंतर होते; परंतु आता जीवन एकरूप झाले. आता मिळणी झाली. आता तू माझी व मी तुझा. तुझा हात माझ्या हातात, माझा हात तुझ्या हातात. तुझी माळ माझ्या गळ्यात शोभेल, माझी माळ तुझ्या गळ्यात शोभेल. परस्परांस शोभवू, संतोषवू. माझे ते तुझे, व तुझे ते माझे.

सप्तपदीचा विधी सर्वांत महत्त्वाचा. सात पावले बरोबर चाल. परंतु सात पावले म्हणजे का सात पावलेच? आपण नेहमी बरोबर राहू. बरोबर चालू.

संत म्हणति सप्तपदें सहवासें सख्य साधुशीं घडतें जो साधू असेल, त्याच्याबरोबर चार पावले चल. तो तुमचा होतो; तो तुम्हाला विसरणार नाही. सात पावले चालणे म्हणजे कायमचे सांगाती होणे. वार सात आहेत. आठवड्यातील सातही दिवशी आपण बरोबर आहोत. प्रत्येक दिवशी आपले पाऊल बरोबर पडत आहे. सप्तपदी म्हणजे जीवनयात्रेत आपण दोघे बरोबर राहू. बरोबर चढू. बरोबर पडू. सुखदुःखांत एकरूप राहू असा भाव. सप्तपदीच्या वेळेस अग्नीस सात प्रदक्षिणा घालीत असता वधूवरांस सूत्राने वेढवितात. वधूवरांभोवती सूत गुंडाळले जाते. वधूवर एकत्र बांधली जातात. वधूवरांचा जीवनपट आता एकत्र गुंफला जाणार. आता प्रत्येकाचा अलग जीवनपट नाही. दोघांनी मिळून सुखाचे वा दुःखाचे एकत्र वस्त्र विणावयाचे. बरे-वाईट जे काय होईल ते दोघांचे. त्या सूत्रामध्ये एकसूत्रीपणाही संदर्शिला जातो. आपण संसारात एकसूत्रीपणाने राहू, आततायीपणा अन्योन्यांनी दाखवावयाचा नाही, असाही अर्थ त्या सूत्रवेष्टनात पाहता येईल.

वरातीच्या वेळेस झाल असते. वराच्या घरी वधू येते, त्या वेळेस सोळा दीपांनी त्यांना ओवाळण्यात येते. झाल प्रत्येकाच्या माथ्यास लावण्यात येते. हे सोळा दिवे काय दाखवितात? हे सोळा दिवे म्हणजे चंद्राच्या षोडश कला असाव्यात. चंद्र ही मनाची देवता आहे. ‘चंद्रमा मनसो जातः' असे श्रुतिवचन आहे. चंद्राला मनाची देवता मानण्यात महान काव्य आहे. चंद्राला सदैव कृष्णपक्ष व शुक्लपक्ष. चंद्र कधी अर्धा, कधी पाव, कधी अजिबात नाहीसा होतो. आपल्या मनाचे असेच आहे. कधी ते अत्यंत उत्साही असते, कधी अगदी निराश, कधी सात्त्विक वृत्तीने उचंबळलेले, तर कधी द्वेषमत्सरांनी बरबटलेले. कधी मनांत अंधार, तरी कधी प्रकाश. मन क्षणात रडते, तर क्षणात हसते. या क्षणी उंच आकाशात, दुसऱ्याच क्षणी खोल अनंत दरीत !

असे जे हे चंचल मन, त्या चंचल मनाचा संपूर्ण रीत्या तुम्हा वधूवरांच्या संबंधात विकास होवो. मनाच्या षोडश सत्कलाविकासात, अशा ह्या षोडश दीपांनी एकमेकांस ओवाळण्यात, हे षोडश दीप वधूवरांस दाखविण्यात असा अर्थ असेल. विवाह का आहे? विवाह हा शेवटी परस्परांच्या विकासासाठी आहे. एकमेकांनी एकमेकांस हात देत, एकमेकांस शिकवीत, एकमेकांस सांभाळीत; उत्तरोत्तर अधिकाधिक विकास करून घ्यावयाचा. केवळ पुरुष अपूर्ण आहे; केवळ स्त्री अपूर्ण आहे; परंतु दोघांनी एकत्र येऊन जीवनाला पूर्णता आणावयाची, इत्यादी कितीतरी भाव त्या झालीमध्ये असतील. फारच पवित्र व सुंदर तो देखावा असतो. रात्रीची वेळ असते. वधू माहेराहून सासरी आलेली. नवीन जीवनाला प्रारंभ. वधूचे नाव बदलण्यात येते. जणू पूर्वीच्या आयुष्याचा तिने संन्यास घेतला. संन्यासाश्रमात पूर्वीचे नाव बदलतात. जणू नवीनच जन्म सुरु. पूर्वीचे संबंध, पूर्वीच्या आसक्ती, पूर्वीचे सारे पुसून टाकावयाचे. पतीच्या नवीन घरी नवीन संसार सुरू करावयाचा. हृदयाची गजबज झालेली असते. अशा वेळेस तें षोडश दीपदर्शन असते. त्या झालीतील दिव्यांच्या ज्योती झळाळत असतात. तुमच्या आत्मचंद्राचा असाच प्रकाश पडो.

नजर न आवे आतमज्योति तैल न बत्ती बुझ नहिं जाती जैसे माणिकमोती ।
 झिलमिल झिलमिल निशिदिन चमके जैसी निर्मल ज्योति ॥
कहत कबीर सुनो भाई साधू घरघर वाचत पोथी ॥
 
'रात्रंदिवस आत चमकणारे हे दिव्य स्वरूप, त्याची ओळख करून घ्या. घरोघर पोथ्या वाचतात; परंतु आत्मतत्त्व, जी कधी न विझणारी आत्मज्योती, माणिकमोत्यांप्रमाणे, निर्मळ तात्यांप्रमाणे अखंड तेवत आहे, ती कोणाच्या नजरेस येते?' कोणाच्याही नाही. परंतु वधूवरांनो! तुम्ही या आत्म्याची ओळख करून घ्या. हळूहळू शांतविषय होऊन मनाची प्रसन्नता, संपूर्ण प्रसन्नता, चिरंजीव प्रसन्नता प्राप्त करून घ्या.

भारतीय संस्कृतीतील षोडश संस्कारांत अशी अनेक प्रतीके आहेत. मरणानंतर जेव्हा शव नेण्यात येते, तेव्हा मडके पुढे धरावयाचे. म्हणजे हा मृण्मय देह होता, तो फुटला. त्यात रडण्यासारखे किंवा अनैसर्गिक असे काही नाही, हे सूचित केले आहे.

त्या शवाला स्नान घालतात. नवीन वस्त्र देतात. कारण ते नवीन घरी जावयाचे. शुद्ध, स्वच्छ होऊन देवाकडे जाऊ दे. कोरे करकरीत वस्त्र नेसून जाऊ दे. मरताना घोंगडीवर घेतात. त्यात अनासक्त होऊन, संचयवृत्ती सोडून देवाघरी जा, हा देह सोड, असे ध्वनित केले आहे. मरताना प्राण जाताच तुळशीपत्र तोंडावर ठेवतात. त्याचा अर्थ देहावर तुळशीपत्र ठेविले. हा देह आता देवाचा. जिवंतपणीही तुळशीच्या माळा वगैरे गळ्यात घालतात. त्यातील अर्थ हाच असतो, की देह देवाचा. देहावर तुळशीपत्र ठेविले.

कानांत रुद्राक्ष घालतात. म्हणजे कान शुभ ऐकोत; शिव, कल्याणकर असेच ऐकोत, हा भाव. कारण रुद्राक्ष शंकराला प्रिय. शंकर म्हणजे कल्याण करणारा. शंकराला ते आवडते जे सदा शिव असते; हितकर, मंगल असे असते. गळ्यातही रुद्राक्ष घालतात. बोटात पवित्रक घालतात. बोटे पवित्र कर्मे करतील हाच भाव.

वारकरी भगवा झेंडा नेहमी जवळ बाळगतो. जेथे जाईल तेथे देवाचा सैनिक, खुदा-इ-खिदमतगार, असा त्यात भाव आहे. भगवाच रंग का ? भगवा रंग त्याग सुचवितो. संन्याशाचीही वस्त्रे भगवी. संन्यास म्हणजे संपूर्ण त्याग; महान यज्ञ. भगवा रंग ज्वाळांचा आहे. ज्वाळा लालसर दिसतात, अगदी लाल नसतात; म्हणून हा भगवा रंग.

शंकराचार्यांसमोर नेहमी मशाल असते. याचा अर्थ सदैव प्रकाशाचीच पूजा करण्यात येईल असा असावा. धर्माचे ज्ञान देणारा आचार्य अंधारात राहून कसे चालेल? सदैव ज्ञानयज्ञ पेटता हवा, ज्ञानसूर्य तळपत असावा.

आपण मोठी यात्रा वगैरे करून आलो, म्हणजे काही तरी सोडतो. भगिनी निवेदितादेवींनी यातील रहस्य एके ठिकाणी सांगितले आहे. त्या यात्रेचे स्मरण राहावे, म्हणून आपण प्रिय वस्तूचा त्याग करतो. यात्रा म्हणजे पवित्र वस्तूंचे दर्शन, पवित्र स्थलांचे दर्शन; यात्रा म्हणजे जीवनाला पावित्र्य देणारा अनुभव. हा अनुभव आपल्या जीवनात अमर झाला पाहिजे. नाही तर तात्पुरते गंगेचे दर्शन प्रसन्न, पावन वाटते. पुन्हा घरी आल्यावर त्याचे काही स्मारक नाही. तर तसे होऊ नये, म्हणून आपण काही त्यागसंकल्प करतो. कोणी म्हणतो; मी रामफळ सोडीन, कांदा सोडीन. कोणी म्हणतो, डाळिंब सोडीन. असे काही तरी सोडण्याचे निश्चित केल्यामुळे ज्या ज्या वेळेस रामफळ पाहू, ज्या ज्या वेळेस कांदा वा डाळिंब पाहू, त्या त्या वेळेस काशीयात्रा पुन्हा आठवेल. पुन्हा गंगेचे स्मरण, महादेवाचे स्मरण, गंगातीरावरील प्राचीन ब्रह्मर्षी, राजर्षी यांच्या तपश्चर्येचे स्मरण; शंकराचार्यांच्या अद्वैताचे स्मरण. आपण पुन्हा त्या यात्रेत जणू जातो. एक क्षणात तो सारा अनुभव पुन्हा जागृत होतो व जीवनात अधिक खोल जातो. तो अनुभव आपल्या रक्तात मिसळतो, अधिक आपणास होतो.

आपण जीवनातील महान अनुभवांच्या संपत्तीची काळजी घेत नाही म्हणून आपण अंतर्दरिद्री असतो भिकारी हृदये व भिकारी मने !

"भिकारी जरी इतुकी केली मी वणवण

रिकामी झोळी माझी जवळ नाही कण"

आपली जीवनाची झोळी नेहमी रिकामी. कारण सारे अमोल अनुभव गळून जातात. महात्माजींचे दर्शन झाले, ते दर्शन आपल्या जीवनात साठवले गेले पाहिजे. विलायती वस्त्र सोडल्याने, ग्रामोद्योगी ज्या वस्तू नाहीत त्यांचा त्याग केल्याने, ते दर्शन अमर होईल.

हे अनुभव दोन रीतींनी अमर होतील. काही वस्तूंचा त्याग व काही वस्तूंचा स्वीकार. जे अमंगल आहे त्याचा त्याग करू, जे मंगल आहे ते घेऊ. विदेशी टाकू व खादीचे व्रत घेऊ. खादीच्यामुळे ते महात्माजींचे दर्शन कायमचे राहील, तो प्रसंग आठवेल. त्या वेळच्या भावना आठवतील. ते वातावरण आठवेल. आपले असे अनुभव अडून जाऊ देऊ नयेत. हे मोलवान अनुभव, पवित्र प्रसंग म्हणजे तर जीवनातील खरी मिळकत. परंतु तीच आपण विसरत असतो, फेकून देत असतो.

आपण घरून कोठे दूर जाऊ लागलो म्हणजे आपल्या हातावर दही देतात. ते दही खावयाचे, परंतु हात धुवावयाचे नाहीत. हात तसेच चाटून ठेवावयाचे. आरोग्याच्या दृष्टीने पाहणाऱ्यास ह्यात बावळटपणा वाटेल; परंतु भावनांच्या दृष्टीने पाहणाऱ्यास त्यात सहृदयता दिसेल. दही स्निग्ध वस्तू आहे. स्निग्धता विसरू नकोस. स्निग्धता धुऊन टाकू नकोस. जातानाही तुझ्या हातावर मी स्नेहाची स्निग्धता ओतीत आहे. ते चिकट ओशट हात, म्हणजे प्रेमाने हृदये चिकटविण्याची साधने आहेत. ओला हात घेऊन जा, येथून कोरडा जाऊ नकोस, असा त्यात भाव आहे. आणि तो हात तसाच राहू दे, म्हणजे ते प्रेम, ती आर्द्रता कधी विसरू नकोस.

जावयाच्या हातातवर लग्नाच्या भोजनाच्या वेळेस तुपाची आपोष्णी वाढतात. त्यातही हाच भाव आहे. मुलीची माता म्हणते, “हे प्रेम घ्या. तुमच्या हाती मुलगी सोपविली. तो तुमचा हात कठोर नका करू. तो तुमचा हात स्नेहार्द्र असू दे. प्रेमाने भारलेल्या हाताने माझ्या कन्येचा हात घरा.” ती तुपाची आपोष्णी घेणारे जावई आपला हात सदैव प्रेमळ राखतात का? ती तुपाची आपोष्णी पाहताच माझे हृदय भरून येते. जावयाचे हृदय भरून येते की नाही, मला माहीत नाही. परंतु त्या प्रतीकात मला सहृदयतेचा सागर दिसून येतो.

वधूवरांच्या अंगाला हळद लावितात. वस्त्रेही हळदीत रंगवितात. पिवळ्या रंगाचा काय अर्थ? हळद आरोग्यदृष्ट्या चांगली म्हणून ती वापरतात असे कोणी म्हणतील; परंतु ते आरोग्याच्या प्रतीकापेक्षा निराळेच काही आहे असे मला वाटते. तुमचे सारे सोने होवो, असा त्यात भाव आहे. सुखाचा संसार सोन्यासारखा होवो. अंगावर पिवळ्या सोन्याचे दागिने नसतील! ते जड दागिने नसले तरी चालतील. आपल्या संसारात त्यामुळे व्यत्यय नाही येणार. कोठेही कसल्याही परिस्थितीत आपण आनंदाने राहू, असा त्यात भाव असावा असे वाटते. हृदयाची संपत्ती त्यामुळे दिसते. भावनांच्या संपत्तीची, सहानुभूतीच्या सोन्याची वाण न पडो, असे ती हळद सुचवते. जीवनाचेच सोने करू असा त्यात भाव आहे.

संक्रान्तीस आपण तिळगूळ देतो. तीळ म्हणजे स्नेह. त्या स्नेहात गूळ मिसळावयाचा. म्हणजे कृत्रिम, वरपांगी, अंतर्विष असे प्रेम अतः पर नाही देणार तर त्या स्नेहात खरोखरच सद्भाव असेल. ते मधुर प्रेम असेल. ते मागचे सारे विसरू. आपल्या जीवनाचे संक्रमण होऊ दे. जीवनात क्रांती होऊ दे. पूर्वीचे द्वेष मत्सर जाऊन प्रेमाचे- सत्प्रेमाचे संबंध आता जोडू देत.

हुताशनीस होळी करून बोंब मारावयाची. हुताशनीच्या आधी महिनाभर शिमगा चालतो. मनुष्याच्या मनातील दबलेल्या वैषयिक वृत्तींस बाहेर काढून त्यांना जाळावयाचे असा त्यात हेतू आहे. आणखी काय आहे मनात, ओक आणखी काय आहे मनात, बोल. मनातील सारी घाण बाहेर काढावयाची. दहा दिवस लहान होळ्या; परंतु शेवटी प्रचंड होळी पेटवावयाची. जीवनातील सारी घाण जळली हे जगाला जाहीर करावयाचे. “ही पहा घाण जाळली सारी.” बोंबा मारून जगाला घाण दाखवून, ती त्याच्यादेखत जाळावयाची आणि मग ती राख अंगारा म्हणून लावावयाची. कारण त्या राखेतून नवजन्म होणार. जीवनाला खरा विशुद्ध रंग चढणार! होळीशिवाय रंगपंचमी नाही. जीवनातील घाण जाळा व मग रंगपंचमी खेळा. मग खरा आनंद! शंकराच्याच देवळात बूडबू करतात. कारण शंकराने मदनाची होळी पेटविली होती! देवालयात कासव असते. कासवाप्रमाणे इंद्रियांवर संयम मिळवा.

घेई ओढूनि संपूर्ण विषयांतून इंद्रियें ।

जसा कासव तो अंगें तेव्हां प्रज्ञा स्थिरावली ॥

कासव म्हणजे इंद्रियसंयमाचे प्रतीक. देवालयात घंटा वाजवावयाची, यामध्ये योगातील अनुहतध्वनीची कल्पना असावी असे वाटते. जिवाशिवाचे ऐक्य झाले, समाधी लागली. आनंदाचे गाणे सुरू झाले. मंगल वाद्ये जीवनमंदिरात सुरू झाली. अनुहतध्वनीची गर्जना सुरू झाली. योगमार्गात तो अनुहतध्वनी ऐकू येतो असे म्हणतात. अनुहत म्हणजे सारखा वाढणारा. सारखा अखंड असा एक नाद ऐकू येतो असे म्हणतात! घंटावादनात अनुहतध्वनी गर्भित असेल, वा देवाचे दर्शन झाले म्हणून मंगल वाद्य वाजवावे असाही अर्थ असेल; किंवा विश्वाचा पसारा चालविण्यात रंगून गेलेल्या देवाला हाक मारून, घंटा वाजवून सांगावयाचे की, “देवा, क्षणभर तरी तुझ्या दारात आलो होतो. क्षणभर तरी संसारातून मन बाहेर काढून, आपल्याच डबक्यातून बाहेर येऊन तुझे दर्शन घेतले बरे!" असाही भाव असेल.

भरलेल्या कलशाची फार महती आहे. लग्नाच्या वेळेस वऱ्हाडणी हातांत भरलेला कलश घेऊन उभ्या असतात. जीवन म्हणजे एक मातीचा कलशच आहे. ज्याप्रमाणे रित्या घड्याला महत्त्व नाही, त्याप्रमाणे रित्या जीवनाला महत्त्व नाही. घडा भरलेला असला म्हणजे त्याल आपण डोक्यावर घेतो, त्याप्रमाणे तुमचा जीवनाचा कलश जर प्रेमाने भराल, सत्कृत्यांनी भराल, ज्ञानाने भराल, तरच लोक तुम्हांला डोक्यावर घेतील. रिकामी घागर अमंगल आहे. भरलेली घागर मंगल आहे. भारतीय संस्कृतीतील हे मंगल कलश सांगत आहेत, “जीवन मांगल्याचे करा.”

देवाला निरांजन ओवाळणे म्हणजे काय ! खरोखर, हे जीवन पेटवून देवाला ओवाळावयाचे आहे. जीवनाची मेणबत्ती सारखी पेटवत ठेवावयाची. “देवा, ही जीवनाची मेणबत्ती समाजासाठी वितळली बरे!” असे देवाला निरांजन ओवाळून सांगावयाचे. पंचारती म्हणजे पंचप्राण. पंचप्राण ध्येयासाठी ओवाळून टाकावे लागतात.

उदबत्ती म्हणजे काय? “हे जीवन पेटवून मी सुगंध देईन”, असे सांगणे. पेटल्याशिवाय सुगंध नाही. देवाला चंदन लावणे म्हणजे काय? “हा देह चंदनाप्रमाणे झिजवून त्याचा गंध तुला देईन”, हाच त्यात अर्थ आहे. देवाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे काय? प्रदक्षिणेने देवाचे स्वरूप मनात ठसते. एक प्रदक्षिणा झाली की देवाला पाहावयाचे, प्रणाम करावयाचा, की पुन्हा दुसरी सुरू. प्रदक्षिणा तीन घाल, अकरा घाल, एकशे आठ घाल; जितक्या प्रदक्षिणा अधिक, तितकी मूर्ती अधिक ठसेल. प्रत्येकाने आपल्या ध्येयाभोवती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. मजुरांची सेवा हे ध्येय ठरविणाऱ्याने मजुरांच्या भोवती सारख्या प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. त्यांच्या चाळी पाहिल्या पाहिजेत. त्यांचे जीवन पाहिले पाहिजे. सारखे मजूर-देवाला प्रदक्षिणा घालाल तेव्हाच मजुरांचे खरे स्वरूप कळेल. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत की आनंद आहे, तोंडावर तेज आहे की प्रेतकळा आहे, त्यांना नैवेद्य मिळाला की नाही, त्यांच्या अंगावर वस्त्रे आहेत की नाहीत, ते तेव्हाच कळेल. राष्ट्रीय सभा खेड्यांतील कोट्यवधी शेतकऱ्यांस देव मानीत असेल, तर राष्ट्रीय सभेच्या भक्तांनी या खेड्यांना प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत! खेडे म्हणजे महादेवाचे मंदिर! त्या खेड्यातील देवाचे कसे स्वरूप आहे, तो कसा राहतो, कसा वागतो, काय खातो, काय पितो, काय वाचतो, ज्ञान आहे की नाही, घरात दिवा आहे की नाही, या देवाचे बैल रस्त्यातील गाऱ्यात फसतात की काय, उन्हाळ्यात पाण्याविना हा देह तडफडतो की काय, हे सारे पाहिले पाहिजे. ज्ञानाचे ध्येय असेल, तर थोर विद्वानांच्याभोवती फिरा. त्यांची सेवा करा. पृथ्वी व चंद्र सूर्याभोवती फिरून प्रकाश मिळवितात. तुम्ही निरहंकारपणे ज्ञानसूर्याभोवती फिरा. कलोपासक असाल तर त्या त्या कलावंतांभोवती फिरा.

प्रदक्षिणा घालता घालता त्या ध्येयदेवाची जन्मोजन्मी पूजा करावी असे वाटेल. “सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती” असे वाटेल. साष्टांग लोटांगण घालू. हा देह दंडवत ध्येयदेवाच्या सेवेत पडेल असे आपण निश्चित करू. म्हणून प्रदक्षिणेनंतर नमस्कार व शेवटचे मंत्रपुष्प, शेवटचे महासमर्पण. जीवनपुष्पाचे ते चिरसमर्पण!

उपनिषदांत भगवान सूर्यनारायण हे प्रतीक सांगितले आहे. हा सूर्य म्हणजे नारायण. सूर्य त्या चैतन्यमय प्रभूचे स्वरूप. सूर्य चराचराला चालना देतो. सूर्य उगवताच फुले फुलतात, पक्षी गातात, उडतात, गायीगुरे हिंडूफिरू लागतात, मानवांचे व्यवहार सुरू होतात. त्या विश्वंभराच्या विश्वचालनेची कल्पना या सूर्यावरून येईल. सूर्याची उपासना म्हणजेच या विश्वेश्वराची उपासना !

मूर्तिपूजा म्हणजे प्रतीक आहे. रामाची मूर्ती पाहताच रामाचे चरित्र डोळ्यांसमोर उभे राहते. एका क्षणात सारे रामायण जणू आठवते. एका क्षणांत सारे पावित्र्य येऊन सामावते.

परंतु पाषाणमयी मूर्ती पाहावयास जरा दूर जावे लागते. पाषाणमयी मूर्ती घडविण्यासही प्रयास. मूर्ती, पुतळे, चित्रे, ही सारी थोरामोठ्यांची किंवा प्रिय व्यक्तींची आपण प्रतीके करतो, ती तितकी सहजसाध्य नाहीत.

म्हणून नाम हे सर्वांत मोठे प्रतीक आहे. "इंद्राचे स्वरूप काय? इंद्राची मूर्ती कशी असते?” ह्या प्रश्नाला मीमांसक उत्तर देतात, “इं आणि द्र-इंद्र हा शब्द, ही दोन अक्षरे म्हणजेच इंद्राचे स्वरूप. हीच त्याची अक्षरमूर्ती.”

ॐ हे परमेश्वराचे नाव आपण ठेविले आहे. राम, कृष्ण अशी अनेक नावे तरी कशाला? त्या सर्व नावांचे सार म्हणजे ॐ सर्व शब्दसृष्टी कढवून हे एक ॐ अक्षर निर्माण केले आहे. ॐ मध्ये सारे स्वर आले, सारी व्यंजने आली. सारी वाङ्मये आली, सारे वेद आले. ॐ ही परमेश्वराची वाङ्मयी मूर्ती.

पाषाणमयी मूर्ती घडवावयाला त्रास; पुन्हा ती भंगुर. परंतु या अक्षरमयी मूर्ती सर्वांना सुलभ सोप्या असून पुन्हा अक्षर म्हणजे अभंग आहेत. माझ्या ओठांतील “राम” ही अक्षरमयी मूर्ती कोणता मुसलमान घेऊन फोडील?

म्हणून नाम हे महान प्रतीक आहे. नाम उच्चारताच सारे आठवते. सारा इतिहास एका नावात जणू येऊन बसलेला असतो. आई हा शब्द उच्चारताच मातेचे अनंत प्रेम आठवते. बाळ हा शब्द आठवताच मातेला मुलाच्या शतस्मृती आठवतात. आपण ऋषींचे तर्पण करतो, त्या वेळेस त्यांची नुसती नावे उच्चारतो. त्या नावांतच सारे पावित्र्य येऊन बसते. जसजसा काळ जातो तसतसा इतिहास घट्ट होत होत एका नावात सामावतो. जसे आकाशातील दूरचे पवित्र तारे, तशी ती दूरची नावे होतात. वसिष्ठं तर्पयामि, अत्रिं तर्पयामि, असे आपण म्हणतो; परंतु वसिष्ठ म्हणजे काय? अत्री म्हणजे काय? केवळ पावित्र्य! ते नाम उच्चारताच पवित्र वाटते. राम म्हणताच निराळा संस्कार होतो. हा प्रिय भारतवर्ष म्हणताच सारा थोर इतिहास डोळ्यांसमोर येतो. ते थोर शिवछत्रपती म्हणताच सारा रोमहर्षक पराक्रम आठवतो. म्हणूनच नामाला अपार महत्त्व दिले आहे. ते कोठेही घेता येते. घरी दारी, बसता-उठता, हे नामरूपदर्शन आहे. त्याला पैसे नकोत, फी नको, दक्षिणा नको, काही नको. “राधेकृष्ण बोल, तेरे क्या लगेगा मोल?” 'राधेकृष्ण' बोल बाबा. काही किंमत का द्यावी लागणार आहे?

ह्या अक्षरप्रतीकात केवढे सामर्थ्य आहे? चिंच म्हणताच जिभेला पाणी सुटते, मिरची म्हणताच हाय असे होते, हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून या नामाला कमी लेखू नका. सारा संसार नामरूपात्मक आहे; परंतु ते नामरूपसुद्धा शेवटी नामात सामावून जाते व केवळ नाम उरते!

असो. भारतीय संस्कृती वाढती आहे. वाढत्या संस्कृतीत प्रतीकेही नवीन नवीन येणार. नवीन तत्त्वज्ञान येताच नवीन प्रतीकेही येतात. राष्ट्रीय सभेचा तिरंगी झेंडा हे सर्व धर्मांच्या ऐक्याचे चिन्ह आहे. त्या झेंड्यावरील चरखा हा कोणाचीही पिळवणूक न करता केल्या जाणाऱ्या श्रमजीवनाचे चिन्ह आहे. चरखा म्हणजे स्वावलंबन, चरखा म्हणजे व्यक्तित्व, चरखा म्हणजे निर्दोष श्रमाची महती. खादी हे एक नवीन प्रतीक निर्माण झाले आहे. खेड्यातील उपाशी लोकांचे स्मरण म्हणजे खादी ! लाल झेंडा हे नवीन प्रतीक येत आहे. जगातील श्रमजीवी लोकांचे ते ऐक्यचिन्ह. हातोडा, कोयता म्हणजे श्रममाहात्म्याची प्रतीके.

अशा रीतीने प्रतीकांकडे पाहात जावे. खोल पाहण्याची दृष्टी आली म्हणजे एक प्रकारचा आनंद वाटतो. त्या त्या क्रिया, ती ती चिन्हे मग अर्थपूर्ण वाटतात. वस्तूंच्या अंतरंगाला हात लावला असे वाटते. आपण रसग्राही आहोत. बाह्य सालींनी कोणाचे समाधान होणार! भारतीय संस्कृतीच्या अंतरंगाला हात लावावयाचा असेल, तिचे खरे स्वरूप समजावून घ्यावयाचे असेल, तिचे खरे उपासक व्हावयाचे असेल, तर खोल दृष्टी घ्या. म्हणजे मग ह्या संस्कृतीचे अंतरंग प्रेमाने फुललेले, पावित्र्याने नटलेले, त्यागाने पेटलेले, माधुर्याने भरलेले, ज्ञानाने अलंकृत, आशेने शोभिवंत, उत्साहाने संस्फूर्त, आनंदाने पूरित असे दिसून आल्याशिवाय राहणार नाही!


24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा