shabd-logo

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023

57 पाहिले 57
मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, मानवेतर सृष्टीशीही जर जिव्हाळ्याचे संबंध जोडील, तरच तो सर्व सृष्टीत श्रेष्ठ असे सिद्ध होईल. आपण सर्व सृष्टीचा संहार करतो म्हणून मोठे, असे म्हणवून घेण्यापेक्षा सर्व सृष्टीवर आपण प्रेम करतो म्हणून मोठे, असे म्हणवून घेण्यात मानवाचा खरा मोठेपणा आहे.

पशू, पक्षी, वृक्ष, वनस्पती यांच्याशी असे जिव्हाळ्याचे संबंध जोडण्याचा भारतीय संस्कृतीने प्रयत्न केला आहे. मानवी कुटुंबात त्यांना प्रेमाचे स्थान दिले आहे. मानवी शक्ती मर्यादित आहे; परंतु त्या मर्यादित शक्तीचे जे काही करता येईल ते मानवाने करावे असे भारतीय संस्कृती सांगते. आपण सर्व पशूंचा सांभाळ करू शकणार नाही. सर्व पशूंशी प्रेमाने वागू शकणार नाही. परंतु निदान गायी- बैलांशी तरी प्रेम जोडू या. सर्व पशुसृष्टी दूर राहिली; परंतु गायीच्या निमित्ताने पशुसृष्टीशी जोडले जाऊ या. गाय हा पशुसृष्टीचा एक प्रतिनिधी.

भारतीय संस्कृतीत गाय केवळ उपयुक्त वस्तू म्हणून राहिली नाही. गाय सर्वतोपरी उपयोगी म्हणून मानवाने जवळ केले ही गोष्ट खरी; परंतु गाय एकदा अंगणात आल्यावर ती कुटुंबातील एक वस्तू झाली. आपण आपले आईबाप म्हातारे झाले म्हणजे का त्यांना खाटकास विकावयाचे? त्यांना मारून त्यांचे का खत करावयाचे? हे निरुपयोगी, दुबळे मायबाप ठेवण्यात काय अर्थ, असे का म्हणावयाचे?

आईबाप म्हातारे झाले तरी त्यांना आपण मारीत नाही. त्यांचे पूर्वीचे उपकार आपण स्मरतो. त्यांचा देह रात्रंदिवस आपणासाठी झिजला हे आठवतो. त्यांचे प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, त्यांचे अपार श्रम-सारे आपल्या डोळ्यांसमोर असते. आपण त्या वृद्ध मायबापांना म्हणतो, “आता तुम्ही स्वस्थ बसा. बसून खाण्याची तुमची योग्यता आहे. तुमचे आम्हास ओझे नाही. तुमच्या अनंत सेवेबद्दल आम्ही कितीही दिले तरी ते थोडेच होईल. तुमचा आशीर्वाद द्या. कृतज्ञतापूर्वक तुमची आता आम्ही सेवा करू.”

गायी-बैल म्हातारे झाले तर त्यांची खाटकाकडे रवानगी करा, असे भारतीय संस्कृती सांगत नाही. ज्या गायीने दहा-दहा पंधरा- पंधरा वर्षे भरपूर दूध दिले, जिच्या दुधावरच आपले सर्वांचे पोषण झाले, जिने शेतीसाठी व इतर कामांसाठी आपणांस खंदे बैल दिले, अशा गायीस ती केवळ आता म्हातारी झाली म्हणून का सोडावयाचे? ती कृतघ्नता आहे. मनुष्य केवळ उपयुक्ततेवर जगू शकत नाही. मनुष्याला काही थोर भावना आहेत. त्या भावनांमुळे मानवाला किंमत आहे. या सर्व थोर भावना उपयुक्ततावादाच्या हत्याराने जर मारून टाकीत असाल, तर माणसाची किंमत शून्य होईल, हे ध्यानात धरले पाहिजे.

गायीचे जर नीट संवर्धन झाले तर दहा-पंधरा वर्षांत त्या आपणांस इतके दुग्धरूप द्रव्य देतील, की त्या द्रव्याच्या व्याजातही त्यांच्या म्हातारपणी त्यांचा सांभाळ आपण करू शकू. आजकाल बोंडलेभर दूध देणाऱ्या गायी या गोपूजक भारतात दिसत आहेत! अकबराच्या कारकीर्दीत तीस तीस शेर दूध देणाऱ्या गायी होत्या, असे ‘ऐने अकबरी’त उल्लेख आहेत. आजही युरोप-अमेरिकेत अशा गायी गावोगाव आहेत. हिंदुस्थानात सरकारी गोवर्धन गृहात अशा गायी दिसतात. नवीन शास्त्रीय ज्ञानाची कास धरून आपण गोसंगोपन व गोसंवर्धन केले पाहिजे. असे करू तर पुन्हा चार सागरांप्रमाणे ज्यांचे चार सड दुधाने भरलेले आहेत, अशा गायी भारतात दिसू लागतील. पुन्हा ठायी ठायी गोकुळे होतील. आणि मग गाय पोसायला जड वाटणार नाही. ती वृद्ध झाल्यावरही तिला आपण कृतज्ञतेने व प्रेमाने खायला-प्यायला देऊ.

कुटुंबातील एक माणूस अशा दृष्टीने भारतीय संस्कृती गायीकडे पहावयास शिकविते. आपण गायीसाठी गोग्रास काढून ठेवतो. आधी गायीसाठी पान वाढावयाचे व मग आपण जेवावयाचे. जेवताना तिची आठवण ठेवावयाची. आपण कपाळाला गंध लावतो, कुंकू लावतो. गायीच्याही कपाळी ते लावावयाचे. मनुष्य म्हणतो, “गायी! तू मुकी. तुझे स्मरण आधी. तुझ्या रूपाने सर्व पशूंचे मी स्मरण करतो. तुझे तर्पण करून सर्व पशूंचे तर्पण झाले असे मी समजतो.”

भारतीय संस्कृतीत सर्वत्र गाय भरली आहे. लहान मुलांना आया ज्या ओव्या म्हणतात, त्या ओव्यांत गायीवर किती गोड विचार गायिलेले आहेत. त्या गायीवरच्या ओव्या अत्यंत सहृदय अशा आहेतः

ये ग ये ग गायी ।
 चरुनी वरुनी तान्ह्या बाळाला म्हणूनी ।
 दूध देई गायी ग चरती ।
 कोवळीं कणसें तान्ह्या बाळा निरसें ।
 दूध पाजूं गायी हंबरती |
 प्रेमाचा पान्हा फुटे गळ्याचें दावें सुटे ।
 वासरांच्या अंगणात गाय |
 दाखविते माय गोड घांस खाय ।
 राजा माझा गायीचा गोवारी ।
 म्हशीचा खिलारी तान्ह्या बाळाचा कैवारी ।
 गोकुळींचा गायी ग चरती ।
 वांसरें कोठें गेलीं गंगेच्या पाण्या नेलीं ।
 तान्ह्या बाळानें गायी ग चरती ।
 कोंवळा ग चारा दुधाचा चारी धारा ।
 वांसरांना गायी ग चरती ।
 वांसरें हंबरती वाडा आहे हा श्रीमंती ।
 तान्ह्या बाळाचा गायीचा ग गोन्हा मांडी वळूनिया बसे वाडा शोभिवंत दिसे । 

माझ्या बाळानें अशा प्रेमळ गो- प्रेमाच्या ओव्या शेकडो आहेत. गायीच्या वासरांबरोबर खेळत भारतीय बाळे वाढत असतात. गायीची वासरे म्हणजे जणू आपली भावंडे !

आपण बाळाचे बारसे करतो. त्याप्रमाणे गायीच्या वासरांचेही बारसे करण्याचा एक दिवस आपण ठरविला आहे. दिवाळीच्या आधी आश्विन वद्य द्वादशीला आपण गाय- गोह्यांची बारस, किंवा गोवत्सबारस; किंवा वसुबारस हे नाव दिले आहे. बारस म्हणजे द्वादश, द्वादशी. बारसे म्हणजे बारावा दिवस. आश्विनातील कृष्णपक्षातील हा हेतुपुरस्सर बारावाच दिवस गायवासरांसाठी आपण नियुक्त केला आहे. त्या दिवशी गायवासरांची आपण पूजा करतो. त्या दिवशी त्यांचा उत्सव. माणसाच्या दिवाळीच्या आधी गायवासरांची दिवाळी. गायीच्या वासराचा जन्मल्यापासूनचा बारावा दिवस जणू आपण साजरा करतो.

त्याचे बारसे करतो. किती सहृदय आहे ही भावना!

गायीवासरांची पूजा करतो, त्याचप्रमाणे बैलांचीही आपण पूजा करतो. पोळ्याचा सण आपण करतो. सातारकडच्या बाजूला याला बेंदराचा सण म्हणतात. बेंदराच्या दिवशी या पोळ्याच्या दिवशी बैलाला विश्रांती. त्याला सजवावयाचे, त्याच्या गळ्यात माळा घालावयाच्या शेतकऱ्यांच्या बायकांच्या पायांतील तोड़े बैलांच्या पायांत घालण्यात येतात! पोळ्याच्या सणाच्या दिवशी गरीब शेतकरीसुद्धा पुरण घालतो. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य, त्यावर तुपाची धार. बैलांची थाटामाटाने मिरवणूक निघते. वाजंत्री वाजतात, बार उडतात, आनंद असतो. हा कृतज्ञतेचा आनंद असतो. ज्या बैलाच्या मानेवर आपण जू दिले, त्यांच्या मानेला घट्टे पडले; उन्हातान्हात, चिखलात ज्याला राबविले, ज्याने नांगर ओढले, मोटा ओढल्या, गाड्या ओढल्या, ज्याला रागाच्या भरात आपण आसूड मारले, पुरण टोचले, ज्याच्या श्रमांमुळे आपली शेते हिरवीगार डोलू लागली, धान्याने नटू लागली, ज्याच्या श्रमांमुळे मोत्यासारखी ज्वारी, सोन्यासारखे गहू पिकतील, अशा त्या कृष्णमूर्ती बैलांबद्दल कृतज्ञता दाखविण्याचा हा परम मंगल दिवस! या पोळ्याच्या सणाची कल्पनाच नुसती मनात येऊन माझे डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात व भारतीय संस्कृतीचा आत्मा मला दिव्य असा दिसू लागतो.

भारतीय संस्कृतीचे उपासक आज गायीबैलांना कसे वागवीत आहेत, हे दिसतच आहे! परंतु दास्य, दारिद्र्य, अज्ञान यांचा हा परिणाम आहे. इतर गोष्टी ज्याप्रमाणे यांत्रिक झाल्या आहेत, तसे हे सण यांत्रिक झाले आहेत. त्यांतील गोड भाव हृदयावर ठसत नाही. असे असले तरी आजही गायीबैलांवर अपार प्रेम करणारे शेतकरी भारतातआहेत. मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेणारे माझे एक खानदेशी स्नेही एकदा एक अनुभव मला सांगत होते. मुळशी पेट्यात बैलगाडीतून ते जात होते. बैलांना हाकण्याची त्यांना हुक्की आली. गाडीवानास ते म्हणाले, “तू मागे बैस, मी गाडी हाकतो. " गाडीवान मागे बसला. खानदेशी मित्र बैल हाकू लागले. बैलांच्या शेपट्या पिळवटू लागले. बैल पळावे म्हणून ते शिव्या देऊ लागले. बैलांना शिवी दिलेली ऐकताच तो शेतकरी संतापला! तो म्हणाला, “माझ्या बैलांना शिवी दिली, मला खपणार नाही. तुम्ही मागे बसा. द्या कासरा माझ्या हातात. माझे बैल म्हणजे माझे प्राण..."

भारतीय संस्कृती सांगते, “ गायीबैलांस प्रेम द्या. त्यांच्यापासून भरपूर काम घ्या; परंतु त्यांची निगाही राखा. त्यांना वेळेवर चारा द्या. चाबूक मारू नका. एखाद्या वेळेस राग येऊन माराल, कारण किती झाले तरी तुम्ही माणसेच; परंतु त्यात खुनशीपणा नको, माणुसकी नका विसरू. बोट बोट पुरण टोचून बैलांच्या अंगाची चाळण नका करू. त्या मुक्या जनावरांचे आशीर्वाद घ्या, त्यांचे शिव्याशाप नका घेऊ. तुमच्यासाठी मर मर मरणाऱ्या बैलांची हायहाय तुमचे कल्याण करू शकणार नाही. गायीगुरे किती प्रेमळ असतात. तुमच्या आवाज ऐकताच ती हंबरतात. तुमचा स्पर्श होताच ती नाचतात. धनी मेल्यावर चारापाणी न घेता प्राण सोडणाऱ्या गायीबैलांची उदाहरणे आहेत!”

कुराणात महंमद पैगंबर म्हणतात, “सायंकाळ होताच गायी-गुरे रानातून तुमच्यावरच्या प्रेमामुळे तुमच्या घरी परत येतात, ही किती थोर गोष्ट आहे!” खरोखरच ही मानवाला भूषण अशी गोष्ट आहे.

गायीच्या स्वरूपात आपण पशूंशी संबंध जोडला; त्याचप्रमाणे पक्ष्यांशीही आपण संबंध जोडले आहेत. ज्यांप्रमाणे सर्व पशूंशी आपण आपल्या दुबळेपणामुळे व अल्प शक्तीमुळे संबंध ठेवू शकत नाही, त्याचप्रमाणे सर्व पक्षीसृष्टीशी आपण संबंध ठेवू शकणार नाही. परंतु जे दोन-चार पक्षी घराच्या आजूबाजूला असतात, त्यांचे आपण स्मरण ठेवतो. आपण जेवावयाच्या आधी काव काव करून कावळ्यांना घास टाकतो. चिमण्या, कावळे हेच आपल्या सभोवतालचे पक्षी. त्यांचे स्मरण आपण करतो. लहान मुलाला जेवताना, “तो बघ काऊ, ती बघ चिऊ,” असे म्हणत म्हणत माता त्याच्या तोंडात घास भरविते.

काऊ काऊ चिऊ चिऊ

येथें बस दाणा खा, येथें बस पाणी पी

बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जाई

अशा रीतीने माय मुलास खेळवीत असते. ज्या चिमण्या- कावळ्यांच्या संगतीत मुले लहानाची मोठी होतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता नको का दाखवायला? कावळ्याला हाक मारून त्या निमित्ताने सर्व पक्ष्यांचे स्मरण मनुष्य करतो. स्वतः जेवावयाच्या आधी गायीच्या निमित्ताने पशूंचे स्मरण केले, कावळ्याच्या निमित्ताने पक्ष्यांचे स्मरण केले.

भारतीय संस्कृतीत पक्ष्यांचा पुष्कळच महिमा आहे. सुंदर सुंदर पक्ष्यांचा आपल्या जीवनात आपण संबंध आणला आहे. भव्य पिसारा उभारणारा मोर आपण कसा विसरू? मोराला आपण पवित्र मानले. सरस्वतीला वीणा हातात देऊन त्या मोरावर बसविले. आपण आपल्या जुन्या लामणदिव्यावर मोराची आकृती करून बसवीत असू. कारण मोराचे दर्शन म्हणजे शुभ दर्शन. पहाट - दिवा लावताच दिव्यावरचा मोर आधी दृष्टीस पडे.

कोकिळेची तशीच गोष्ट. आठ महिने मुकी राहून वसंतऋतू येताच ‘कुऊ कुऊ' ध्वनीने सर्व प्रदेश नादावून सोडणारी ती कोकिळा! भर उन्हाळ्यात झाडामाडांना नवपल्लव फुटलेले पाहून त्या कोकिळेच्या प्रतिभेलाही पल्लव फुटतात. ती 'कुऊ' गाणे गाऊ लागते. परंतु ती विनयी असते. लाजाळू असते. झाडांच्या गर्द फांद्यांत लपून तेथून ती कुऊ कुऊ करते. तो पवित्र मधुर, गंभीर, उत्कट आवाज म्हणजे सामगायन वाटते; उपनिषदच वाटते. भारतीय संस्कृतीने कोकिळाव्रत घालून दिले. कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय त्या व्रतात जेवावयाचे नसते. तो आवाज कानी पडावा म्हणून हे व्रत घेणाऱ्या बायका दूर दोन दोन कोस रानावनात जातात आणि तो आवाज ऐकल्यावर जेवतात.

जशी कोकिळा तसाच पोपट, पोपट, मैना यांचा आपणांस विसर पडणार नाही. हिरव्या हिरव्या पानासारख्या रंगाचा तो पोपट, कशी त्याची बाकदार लाललाल चोच, कसे सुंदर पंख ! कशी मान मुरडतो, कशी शीळ घालतो ! कसे ते बारीक गोलगोल डोळे ! कसा त्याचा तो काळा कंठ ! कसा तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो! कसा बोलतो! पोपटाला ते पिंजऱ्यात राहणे आवडत नसेल, परंतु माणसाला त्याच्याशी प्रेम जोडावेसे वाटते. त्याची तो काळजी घेतो. स्वतःच्या तोंडात पेरूची फोड धरून ती तो पोपटासमोर करतो. तोंडातील घास पोपटाला देतो. हिरवा हिरवा पिंजरा करून हिरव्या झाडांची त्याला विस्मृती पाडू पाहतो. मनुष्य हे सारे प्रेमाने करतो. पाखराला असे बंधनात घालून प्रेम जोडणे कसेतरी वाटते. परंतु मानवाचा आत्मा इतर सृष्टीशी संबंध जोडण्यासाठी कसा तडफडत असतो, त्याचे हे उदाहरण आहे.

आपण आपल्या मुलांबाळांस पाखरांची नावे ठेवतो. राघू, पोपट, मिठूलाल, मैना, हंसी, चिमणी, कोकिळा वगैरे नावे आपणांस माहीत आहेत. अशा रीतीने निरनिराळ्या प्रकारचा स्नेहसंबंध, आपलेपणा भारतीय संस्कृतीत पाखराच्या सृष्टीशी जोडण्यात आलेला आहे.

पशुपक्ष्यांप्रमाणे तृण- वृक्ष-वनस्पती यांच्याशीही भारतीय संस्कृती प्रेमळ संबंध जोडते. मनुष्य सर्व वनस्पतींना वाढवू शकणार नाही. ते आकाशातील मेघांचे काम आहे. परंतु आपण एक तुळशीचा माडा लावू. वनस्पतिसृष्टीचा एक प्रतिनिधी म्हणून तुळस मानू. तिची आधी पूजा. तिला आधी पाणी. तुळशीला पाणी घातल्याशिवाय बायका पाणी पिणार नाहीत. आधी तुळशीचे स्मरण. तुळशीचे स्मरण म्हणजे सर्व वनस्पतींचे स्मरण.

आपण तुळशीचे वृंदावन रंगवितो. तिचे लग्न लावतो. तिच्या लग्नात आवळे, चिंचा, ऊस या वनस्पतींचेच, वन्य फळांचेच महत्त्व. तुळस जणू कुटुंबातील, एक व्यक्ती. तिला जणू साऱ्या भावना आहेत. तिचे सारे सोहळे करावयाचे.

आपण वटवृक्षाची, पिंपळाची मुंज लावतो. त्यांना पार बांधून वनस्पतिसृष्टीतील जणू हे महान ऋषीच. त्यांची पूजा करतो. देतो.

सृष्टीतील हे थोर ईश्वरी वैभव पाहून आपण प्रदक्षिणा घालतो, प्रणाम करतो. आवळीभोजन करावे, वनात जेवावे, अशा कितीतरी गोष्टी वनस्पतिप्रेमाच्या आपण निर्माण केल्या आहेत. झाडांच्या पानांवर जेवण्याची व्रते आहेत. देवाला फुले वाहावयाची. परंतु देवाला पत्री फार प्रिय असे आपण ठरविले आहे. देवाला तुळस हवी, बेल हवा, दूर्वा हव्यात, शमी हवी. देवाच्या पूजेच्या निमित्ताने रोज सकाळी आधी फुलांशी भेट, दूर्वा- तुळस - बेलाशी भेट! घराभोवती तुळसी हव्यात, हिरव्यागार दूर्वा हव्यात, पारिजातक, जास्वंद, धोतरा, कण्हेर, जाई, जुई, गुलाब, मोगरा, चमेली, तगर वगैरे फुलझाडे हवीत. कदंब, आवळी, डाळिंब यांची झाडे हवीत. देवाला जी पत्री वाहावयाची ती या सर्व झाडांची पाने सांगितली आहेत. फुले नेहमी नसतात. परंतु पाने तर नेहमी आहेत. देवाला पानच प्रिय आहे. ती पाने रोज आणून वाहा. त्या निमित्ताने फुले, फळझाडे लावू. त्यांच्याशी प्रेमसंबंध जोडू.

भारतीय साहित्यात तरुलता-वेलींचे अपार प्रेम आहे. कालिदासाच्या काव्यनाटकांत पाहा. हे प्रेम तेथे दिसून येईल. शकुंतला आम्रवृक्ष व अतिमुक्तलता यांचे लग्न लावते. झाडावर वेल वाढवावयाची. वेल झाडाला विळखा देऊन बसते. वेलीमुळे वृक्षाला शोभा, वृक्षामुळे वेलीला आधार. किती कोमल भावना आहेत ह्या! शकुंतलेचे वर्णन करताना कण्व महर्षी म्हणतात, " शकुंतला झाडांना पाणी घातल्याशिवाय स्वतः आधी पाणी पीत नसे. तिला फुलांची, पल्लवांची हौस होती; तरीही झाडांची फुलें ती तोडत नसे. पल्लव खुडीत नसे.”

अशा शकुंतलेला प्रेमाचा निरोप देण्यासाठी कुलपती कण्व आश्रमातील तरुलता-वेलींना सांगत आहेत. त्या प्रेमळ शकुंतलेच्या वियोगामुळे आश्रमातील वृक्षांनीही, लतावेलींनीही टपटप अश्रू ढाळिले असतील.

राम बारा वर्षे वनवासाला निघाला. परंतु रामाला वनवास म्हणजे संकट नव्हते. रामाला अयोध्येतील त्या पाषाणरचित प्रासादापेक्षा रानावनांतील लताकुंज प्रिय होते. वने-कानने त्याला प्रिय होती. रामायणात रामाला 'वनप्रिय' असे विशेषण अनेकदा लाविले आहे. वृक्षवल्ली त्याला सखेसोयरे वाटत होते. राम म्हणताच ‘पंचवटी’ आठवते. विशाल वटवृक्षांच्या शीतल छायेत राम, सीता, लक्ष्मण आनंदाने राहिली. सीतेने पर्णकुटीभोवती झाडे लाविली. गोदावरीचे पाणी घालून त्यांना ती वाढवी. उत्तररामचरित नाटकात पुन्हा पंचवटीत आलेला राम सीतेने लावलेली झाडे पाहून रडतो, असे सहृदय वर्णन आहे.

रघुवंशात शंकराच्या पार्वतीने कमरेवर घडे घेऊन देवदारू वृक्ष मुलांप्रमाणे वाढविले असे वर्णन आहे. आणि हत्ती वगैरे येऊन आपले अंग त्या देवदारू वृक्षांच्या अंगावर घाशीत व त्यांची सालडे काढीत म्हणून ती दुःखी होई, असे सांगितले आहे. शंकरांनी मग पहारेकरी ठेवले.

अमुं पुरः पश्यसि देवदारुम्
 पुत्रीकृतोऽसौ वृषभध्वजेन

असे दिलीपराजाला तो पहारेकरी सिंह मोठ्या प्रेमाने सांगत आहे. वृक्ष-वनस्पतींना आपण मानवी भावना दिल्या आहेत.

उन्हाळ्यात तुळशीवर पाण्याची गळती लावावयाची व तिला उन्हाळा भासू द्यावयाचा नाही. सायंकाळ झाली, रात्र बाहेर पडली की फूल-फळ तोडावयाचे नाही, तृणांकुर - पल्लव खुडायचा नाही, अशी पद्धत आहे. संकष्टी चतुर्थीच्या रात्री मंगलमूर्तीची पूजा करावयाची असते. परंतु दिवसाउजेडी फुले-दूर्वा आणून ठेवण्याची रीत आहे. झाडे रात्री निजतात अशी भावना आहे. त्यांची झोप मोडू नये म्हणून कोण ही काळजी! एकदा महात्मा गांधींना पिंजणाच्या तातीला लावावयास थोडा पाला पाहिजे होता. रात्रीची वेळ होती. त्यांनी मीराबाईंना पाला आणावयास सांगितले. मीराबेन बाहेर गेल्या. लिंबाच्या झाडाची एक फांदी त्यांनी तोडून आणली. महात्माजी म्हणाले, “इतका पाला काय करावयाचा? मूठभर पाने आणावयाची. ही पाहिलीस का पाने कशी झोपली आहेत ती ! कशी मिटली आहेत. रात्री पाने तोडू नयेत. परंतु अगदी जरूरच पडली तर हलक्या हाताने आणावी. जरूर तितकीच. अहिंसेचा विचार करावा तेवढा थोडाच !” महात्माजींचे ते शब्द ऐकून मीराबाई सद्गदित झाल्या.

कोकणात ज्या वेळेस गणपती आणतात, त्या वेळेस त्यांच्यावर पावसाळी वस्तू टांगण्यात येतात. काकडी, सहस्रफळ, दोडकी देवावर टांगतात. कांगण्या, कवंडळे देवावर टांगतात. नारळ, ओल्या सुपाऱ्या टांगतात. सृष्टीचा सहवास देवाला प्रिय आहे.

मंगल समारंभात आम्रवृक्षाच्या पल्लवांशिवाय कधी चालावयाचे नाही. आंब्याचा टाळा नेहमी हवा. लग्न असो, मुंज असो, सत्यनारायण असो, घरभरणी असो, उदकशान्त असो, ऋतुशान्त असो, आम्रवृक्षाचे हिरवे पल्लव हवेत. सृष्टीचा आशीर्वाद हवा. आम्रवृक्ष म्हणजे प्रेम व पावित्र्य, माधुर्य व मांगल्य!

कोकणात नवान्नपौर्णिमा असते. त्या दिवशी दारावर शेतातील धान्याचे तोरण लावतात. भाताच्या लोंब्या, नाचणीची कणसे, झेंडू, कुरडू यांची फुले, आंब्याची पाने, या सर्वांमिळून ते तोरण गुंफतात. त्या तोरणाला 'नवे' हाच शब्द आहे. इंदूरला राजवाड्याच्या दारावर गहू व खसखस यांची पिके दाखविलेली आहेत.

पशुपक्षी, वृक्षवनस्पती यांच्याशी असे स्नेहबंध भारतीय संस्कृतीने निर्माण केले आहेत. पशुपक्षी, वृक्षवनस्पती यांना जीव आहे. त्यांच्यातील चैतन्य दिसते. त्यांना जन्ममरण आहे, म्हणून सुखदुःखही आहे, असे आपण समजतो. परंतु भारतीय संस्कृती याच्याही पलीकडे गेली आहे.

शिळासप्तमीच्या दिवशी मातीच्या चुलीची पूजा आहे. त्या दिवशी चूलमाईला विश्रांती. आदल्या दिवशीचे शिळेच त्या दिवशी खावयाचे. वर्षभर ती मातीची वा दगडाची चूल आपणासाठी तापली, एक दिवस तरी कृतज्ञतेने तिचे स्मरण करू या. या शिळासप्तमीच्या दिवशी चूल सारवतात, तिला नीट लिंपतात. नंतर लहानसा आंब्याचा रोपा चुलीमध्ये लावतात. तापलेल्या चूलमाईला आंब्याची शीतल छाया ! मातीच्या निर्जीव चुलीबद्दलही किती कृतज्ञता !

शिळासप्तमीप्रमाणेच दिव्याची अवस. जो दिवा आपल्यासाठी जळतो, अंधारात प्रकाश देतो, जो दिवा आपल्यासाठी तेलकट होतो, ओशट होतो, जो दिवा आपल्यासाठी तापतो, काळा होतो, त्या दिव्याबद्दल कृतज्ञता दाखविण्याचा हा दिवस. प्रकाशाइतके पवित्र काय आहे? सूर्य, अग्नी यांची भारतीय संस्कृतीत फार महती आहे. प्रकाश देणाऱ्या दिव्याचे उतराई कसे व्हावयाचे? रोज संध्याकाळी दिवा लावताच त्या प्रकाशाला आपण प्रणाम करतोच. दिव्याला प्रमाण करून आपण प्रकाशात असलेले सारे एकमेकांसही प्रणाम करतो. सायंकाळी 'दिव्या दिव्या दिपोत्कार' अशी गाणी म्हणतो. परंतु वर्षातून एक विशिष्ट दिवसही त्या दिव्याबद्दल कृतज्ञता प्रकट करण्यासाठी नेमला आहे. त्या दिवशी दिव्याची पूजा; दिव्यांचे महत्त्व.

हातातून भांडे पडले किंवा भांड्यावर भांडे आपटले, तर लगेच ‘नाद धरा' असे आपण म्हणतो. जणू ते भांडे रडत असते! ह्या दुःखी भांड्याला उगी करावयाचे. त्या भांड्याच्या वेदना ओळखावयाच्या. अशा प्रकारची ही प्रेममयी भारतीय संस्कृती आहे. नागपंचमीचा दिवस योजून त्या तेजस्वी, धगधगीत, स्वच्छ, संयमी अशी नागाचीही पूजा करावयास सांगण्यात आले आहे. नाग आधी रानावनांत राहतो. परंतु पावसाळ्याचे त्याचे भवन पाण्याने भरून गेले तर तुमच्या वळचणीस क्षणभर येऊन तो बसतो. क्षणभर आश्रय मागावयास आलेला जणू तो अतिथी असतो. त्याला वनात राहणेच आवडते. त्याला पावित्र्य आवडते. स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो. तो फुलांजवळ वास करील, केतकीजवळ जाईल. चंदनाला विळखा घालील! होताहोईतो नाग चावणार नाही. परंतु चावला म्हणजे मात्र मरण! वर्षानुवर्षे श्रम करून मिळविलेले सामर्थ्य तो उगीच व्यर्थ दवडीत नाही. म्हणूनच त्याच्या दंशात अमोघपणा असतो.

नाग शेताची राखणही करतात. उंदीर वगैरे शेतास लागू देत नाहीत. नागांचा हाही एक उपकारच म्हणावयाचा. अशा नागालाही त्या दिवशी पूजावयाचे, त्याच्या वारुळाजवळ दूध, लाह्या नेऊन ठेवावयाच्या. विषारी सर्पातीलही चांगुलपणा पाहावयास भारतीय संस्कृती सांगत आहे.

व्यापक जीवनाकडे पाहावयाची अशी ही भारतीय दृष्टी आहे. नद्यांचे उत्सव करा, त्यांची पूजा करा, त्यांना पाहून प्रणाम करा. कारण नद्यांचे अपार उपकार आहेत. गोवर्धन पर्वताची पूजा करा. कारण पर्वतांवर, डोंगरांवर गायींचे वर्धन करणारे गवत होते, पर्वतांवरच्या पाण्याच्या नद्या होतात. पर्वताची माती धुऊन खाली येते व शेते सुपीक होतात. पर्वत उपकारक आहेत.

नद्यांना आपण माता म्हणतो. त्यांच्या जीवनरसाने आपण जगतो. आईचे दूध नसले तरी चालेल, परंतु ह्या आपोमातांचे पय पाहिजे. नद्यांची नावे आपण आपल्या मुलींना ठेवतो. नद्यांना आपण कधी विसरणार नाही.

आणि सर्वांत थोर ही पृथ्वी! किती क्षमावान! किती उदार ! तिला आपण नांगराने टोचतो, परंतु ती कणसे घेऊन वर येते! आपण तिच्यावर किती घाण करतो. तिच्यावर नाचतो, कूदतो. परंतु ही भूमाता रागावत नाही.

"ऐशी ही धरणीमाय करीं क्षमा जगाला "

ती आपल्या सर्व लेकरांना क्षमा करते. भारतीय संस्कृती म्हणते, “भूमातेचे स्मरण ठेव. तिला विसरू नकोस.” आपल्या कहाण्यांत पृथ्वीची कहाणी आहे. पृथ्वीमहिमा आपण विसरलो नाही. चंद्र- सूर्य-ताऱ्यांची फुले तिच्या खोप्यात आहेत. समुद्राचे वस्त्र ती नेसली आहे. फुलांचे हार तिने घातले आहेत. हिरवी चोळी तिने घातली आहे. शेष-वासुकींचे तोडेतोरड्या तिच्या पायांत आहेत. भव्य महान महीमाता!

प्रातःकाळी उठताना त्या पृथ्वीमातेला म्हणावयाचे, “आई ! माझे पाय तुला आता शतदा लागतील. रागावू नकोस.”

"विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।"

चराचरावर प्रेम करू पाहणारी, कृतज्ञता सर्वत्र प्रकट करणारी ही भारतीय संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचा अंतरात्मा ओळखा. तिचा सूर ओळखा. ह्या संस्कृतीचे ध्येय काय, गन्तव्य - मन्तव्य प्राप्तव्य काय, याचा सहृदयतेने व बुद्धिपूर्वक विचार करा. आणि पूर्वजांची ही थोर दृष्टी घेऊन पुढे जा. तसा प्रयत्न करा. ध्येयाकडे जाण्याचा अविरत प्रयत्न करणे हेच आपले काम आहे.

विश्वावर प्रेम करण्याचे विशाल ध्येय देणाऱ्या हे थोर भारतीय संस्कृती, तुला शतशः प्रणाम ! तुला वाढविणाऱ्या थोर पूर्वजांनाही अनंत वंदने!
24
Articles
भारतीय संकृती
0.0
'भारतीय संस्कृती' या ग्रंथातून सानेगुरुंजींनी सारी सांस्कृतिक वर्ज्य-अवर्ज्यता, ही भारतीय संस्कृतीचा भागच कशी नाही, याकडे बघण्याची एक नवी, आधुनिक सांस्कृतिक दृष्टीच प्रदान केली आहे. धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, विवेकाधिष्ठित, शास्त्रीय वृत्तीचा समाजवादी नवभारत निर्माणाचा संकल्प केलेल्या पायाभूत महत्त्वाच्या शांततामय, सहिष्णू, विवेकी क्रांतीनायकांच्या, आजच्या पिढीच्या विस्मरणात ढकलल्या गेलेल्या, मोठ्या नाममालिकेतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नाव आहे, पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी. हिंदू समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कृतिशीलतेने झटत राहिलेले, शेतकरी-कामकऱ्यांचे दैन्य-दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लढे उभारणारे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे नेते, महिला, दीन, वंचित, शोषित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आयुष्य झिजवीत, स्वातंत्र्याचे समर हे त्यांच्याचसाठी आहे, याची जाण प्रगल्भ करीत नेणारे व तशी जनजागृती करणारे ते द्रष्टे विचारवंतही होते. केवळ भावूक श्यामच्या भावूक कहाण्या लिहिणाऱ्या मातृहृदयी गुरुजींपुरते त्यांचे जे व्यक्तिमत्त्व बंदिस्त केले गेले आहे, तेवढे ते मर्यादित व्यक्तित्व नव्हते. मानवतावादी संस्कृतिनिष्ठ माणूस व समाज घडवण्याचे त्यांचे व्रत होते आणि या व्रताची प्रेरणा जशी आधुनिक प्रबोधन युगाच्या विचारपरंपरेत होती तशीच ती उदात्त, सहिष्णू, विवेकी अशा भारतीय संस्कृतीतही होती. नव्हे, तो काळच भारतीय संस्कृतितेतील उदारमतवादाची आधुनिक उदारमतवादाशी सांगड घालत नवभारत निर्मिणाऱ्या विचारवंतांचाच होता. या संस्कार प्रकल्पात जे जे ग्रंथ पायाभूत महत्त्वाचे ठरले त्यात आजच्या पिढीसमोर आवर्जून आणला पाहिजे असा सानेगुरुजींचा 'भारतीय संस्कृती' हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे. नव्हे, आजच्या कोणत्याही मूळ ग्रंथ वाचनाशी कर्तव्यच नसलेल्या व त्यामुळे केवळ पूर्णपणे पूर्वग्रहग्रस्त, द्वेषाधारित आणि आम्ही म्हणून तीच संस्कृती भारतीय, बाकी सारे 'अराष्ट्रीय' ठरविणाऱ्या अविवेकी आणि अविचारी युगात तर हे दुर्मीळ झालेले पुस्तक आता नव्याने उपलब्ध करून घेऊन प्रत्येकाने जवळ बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
1

अद्वैताचे अधिष्ठान

3 June 2023
11
0
0

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्य

2

अद्वैताचा साक्षात्कार

3 June 2023
6
0
0

सर्व सजीव-निर्जीव सृष्टीत अद्वैताचा अनुभव येणे ही अंतिम स्थिती होय. मनुष्येतर चराचर सृष्टीबद्दलही आपलेपणा वाटणे, आत्मौपम्य वाटणे म्हणजे अद्वैताची पराकाष्ठा होय. मनुष्याला ते केव्हा साधेल तेव्हा साधो;

3

बुद्धीचा महिमा

3 June 2023
6
0
0

भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गाइलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय

4

प्रयोग करणारे ऋषी

3 June 2023
4
0
0

भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुतः एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद

5

वर्ण

4 June 2023
2
0
0

वर्णाश्रमधर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. वर्णाश्रम-स्वराज्य-संघ वगैरे संघही अस्तित्वात आलेले आहेत. परंतु वर्ण म्हणजे काय, आश्रम म्हणजे काय, यांसंबंधी गंभीर विचार फारसा केलेला आढळत नाही. प्रस्तुत

6

कर्म

4 June 2023
2
0
0

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला महत्त्व आहे? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आहे, द्वैत मिथ्या आहे. श्रीशंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात य

7

भक्ती

4 June 2023
1
0
0

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ?मुक्त होणे म्हणजे तरी का

8

ज्ञान

5 June 2023
0
0
0

आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचे कर्म उचलले, त्यात हृदयाची भक्ती ओतली, जिव्हाळा ओतला, तरी एवढ्याने भागत नाही. त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही. कर्मात ज्ञान

9

संयम

5 June 2023
0
0
0

ज्ञान-विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून, अनासक्त होऊन कर्म करावे हे खरे. परंतु हे बोलणे सोपे आहे. असे कर्म सारखे हातून होण्यास भरपूर साधना हवी. जीवनात संयम हवा. संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार न

10

कर्मफलत्याग

5 June 2023
0
0
0

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आह

11

गुरू-शिष्य

5 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गाइला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दं

12

चार पुरुषार्थ

5 June 2023
0
0
0

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी. मनुष्याने संपादण्यासारख्या वस्तू.

13

चार आश्रम

5 June 2023
1
0
0

सनातनधर्माला वर्णाश्रमधर्म असे म्हणतात. वर्णाश्रम हे भारतीय संस्कृतीचे प्रधान स्वरूप आहे. वर्णधर्म म्हणजे काय हे आपण मागे पाहिले आहे. आता आश्रमधर्म जरा पाहू.मनुष्याचा विकास व्हावा यासाठी चार आश्रमांचा

14

स्त्री-स्वरूप

6 June 2023
0
0
0

भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती. भारतीय स्त्रिया म्हणजे तपस्या, मूक सेवा. भारतीय स्त्रिया म्हणजे अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता काम करीत असतो व फुले फुलवीत असतो त्याप

15

मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे संबंध

6 June 2023
0
0
0

मनुष्याच्या नीतिशास्त्रात सर्व चराचर सृष्टीचा विचार केलेला असला पाहिजे. मानवही मानवापुरतेच जर पाहील, तर तोही इतर पशुपक्ष्यांच्याच पायरीचा होईल. मानव मानवेतर सृष्टीचे शक्य तितके प्रेमाने संगोपन करील, म

16

अहिंसा

6 June 2023
0
0
0

‘अहिंसा परमो धर्मः’ हे भारतीय संस्कृतीचे जीवनभूत तत्त्व आहे. भारतीयांच्या रोमारोमात हे तत्त्व बिंबलेले आहे. आईच्या दुधाबरोबर मुलाला हे तत्त्व मिळत असते. भारताच्या वातावरणात हे तत्त्व भरलेले आहे. भारती

17

बलोपासना

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीने ज्ञानावर व प्रेमावर भर दिला, त्याप्रमाणेच बळावर भर दिला आहे. बळ नसेल तर ज्ञान व प्रेम ही मनातल्या मनात मरून जातील. ज्ञान- प्रेमाला संसारात आणण्यासाठी, सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची

18

ध्येयांची पराकाष्ठा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत एकेका सद्गुणासाठी, एकेका ध्येयासाठी, सर्वस्वाचे समर्पण करणाऱ्या महान विभूती आपणांस दिसतात. भारतीय संस्कृती म्हणजे या विभूतींचा इतिहास. 'थोर पुरुषांची चरित्रे म्हणजे इतिहास' असे एक वचन

19

अवतार- कल्पना

6 June 2023
0
0
0

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अधःपात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वे

20

मूर्तिपूजा

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वतःचा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे.

21

प्रतीके

6 June 2023
0
0
0

प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या त्या शास्त्रांच

22

श्रीकृष्ण व त्याची मुरली

6 June 2023
0
0
0

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणत

23

मृत्यूचे काव्य

6 June 2023
0
0
0

भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे ठिकठिकाणी जे विचार आहेत, ते किती गोड आहेत व किती भव्य आहेत! मृत्यूची भीषणता भारतीय संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ!मृत्यू हे ईश्वराचेच एक

24

परिशिष्ट

6 June 2023
0
0
0

१. काळाची कल्पनाभारतीय संस्कृती एक प्रकारे दिक्कालातीताची उपासना करणारी आहे. अनंत काळ तिच्या डोळ्यांपुढे असतो. गीतेमध्ये ब्रह्मदेवाची कालगणनापद्धती आली आहे. हजारो युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस! या

---

एक पुस्तक वाचा